Tuesday, January 28, 2020

मुलं खोटं का बोलतात?

मुलं खोटं का बोलतात ?

आपण लहान मुलांना 'नेहमी खरं बोलावं' असंच सांगत असतो. मात्र आपल्याला हवं तेव्हा आपण मुलांशी खोटं बोलतो. अगदी साधी गोष्ट बघा... जेव्हा मुलं एखादी गोष्ट आणि त्यामागची कारणं विचारतात तेव्हा आपण त्यांना आपल्या सोयीनं हवं ते सांगतो. लहान मुलं अनुकरणप्रिय असल्यानं मोठ्यांची वागणूक पाहूनच ते शिकत असतात. त्यामुळे त्यांना योग्य वेळी चांगली वागणूक मिळाली नाही तर दुर्दैवानं त्यांचं नुकसान होऊ शकतं! त्यासाठी पालकांनी काय करायला हवं? मुलांशी कसं वागायला हवं ? यावर अतिशय गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे.

 कधीकधी मुलांच्या कलानं घेणं, त्यांचंही ऐकून घेणं गरजेचं ठरतं. तर कधी त्यांच्याशी समजावणीच्या सुरात बोलणं अन् अगदीच पर्याय नसेल तेव्हा प्रसंग पाहून थोडं कठोर होणंही स्वाभाविक ठरतं! लहान मुलं आपलं बोलणं, वागणं हे त्यांच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून शिकत असतात. आपलं वागणं आणि घरच्यांशी किंवा इतरांसोबत बोलणं हे त्यांच्यासाठी सारखंच असतं! त्यामुळेच घरातील मोठ्यांनी वागण्याबाबत आणि बोलण्याबाबत स्वतः दक्ष राहणं जरूरीचं ठरतं!

काही काही घरातील वातावरण अतिशय कडक असतं. अशावेळी मुलं त्यांच्याकडून नकळत घडलेल्या चूका मोकळेपणानं पालकांना सांगू शकत नाही. मुलांकडून एखादी चूक घडली तरी ते खूप घाबरेघुबरे होतात. रडकुंडीला येतात. घरात वातावरण कडक असल्यानं आपल्या चुकीला माफी मिळणार नाही, त्यासाठी शिक्षा होणारच अशाप्रकारचा गैरसमज अथवा न्यूनगंड मुलांच्या मनात पटकन येतो! तेव्हा ही संवेदनशील मुलं ती चूक लपवण्यासाठी खोटं बोलायला शिकतात.

घरातील मोठ्यांकडून काही चूका झाल्या तरी त्यांना शिक्षा होत नसते, परंतु आपल्याकडून छोटीशी चूक झाली तरी मार खावा लागतो अशी समजूत मुलं करून घेतात. मग अशावेळी त्यांच्या मनात मोठ्यांबद्दल राग निर्माण होण्यास वेळ लागत नाही. एकप्रकारची अढी निर्माण होऊ शकते... आणि हे होणं स्वाभाविकच आहे. आपण खरं सांगायचा प्रयत्न केला तरीही आपल्याला मार बसणार, त्यापेक्षा आपण काही गोष्टी लपवून ठेवायला हव्यात अशी त्यांची भावना होते. मग हळूहळू मुलांना खोटं बोलायची सवय जडते!

आजच्या परिस्थितीत मुलांकडून एखाद् दुसरी चूक झाली किंवा त्यांच्याकडून आपल्या मनाविरूद्ध काहीही घडले तरी पालकांनी समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. 'तुझ्याकडून चूक झाली असेल रे पण तू खरं काय ते सांग, मी तुला मारणार नाही! ' असं पालकांनी बोलणं हे मुलांना खरं बोलायला मदत करणारच ठरणार हे निश्चित!  ऊठसूट रागावणं, मारणं हा काही मुलांना सुधारण्याचा पर्याय ठरु शकत नाही. उलट मुलांवर त्याचा नकारात्मक आणि वाईट परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आजच्या सुशिक्षित आणि सुज्ञ पालकांनी समजून घ्यायला हवं!

"इस दुनियामे कुछ तो अच्छा रहने दो!
    बच्चोंको बस बच्चों जैसा जीने दो!!

... विनोद श्रा. पंचभाई
भ्र.क्र. ९९२३७९७७२५