Sunday, February 22, 2026

मुझे दीदी चाहिये...

 *मुझे दीदी चाहिये...*


गोलू पाच साल का था। गोलू के पास ढेर सारे खिलौने थे...गाडी, ट्रक, रोबोट इत्यादी l मगर वह जल्दीही बोअर हो जाता था!

एक दिन गोलू ने उसने मम्मी से कहा...

 "मम्मी, मुझे ना दीदी चाहिये।"

मम्मी हंसते हुए बोली...

"अरे बेटा गोलू! तुम्हारे पास इतने सारे खिलौने हैं, वो तुम अकेलेही खूब खेल सकते हो फिर दीदी की क्या जरुरत है?"

 उसपर गोलू मुँह बनाकर बोला... "ये सब खिलौने बोलते तो ही नहीं... दीदी होती तो मेरे साथ खूब बातें करती ना।"

     शाम को पापा ऑफिस से घर आतेही गोलू भागकर उनके पास गया और बोला...

 "पापा, पापा आप मुझे दीदी लाकर देंगे ना? बताओ ना पापा!"

पापा मुस्कुराते हुए बोले...

"अरे बेटा, दीदी कोई खिलौना तो नहीं है... जो तुमको दुकान से खरीद कर लाकर दें।"

गोलू नाराज़ होकर बोला... 

"तो फिर मुझे कोई नहीं समझ पाता... आप भी नहीं और मम्मी भी नहीं!" इतना कहकर, गोलू उदास होकर खिड़की से बाहर देखने लगा। तभी सामने वाले घर से नेहा दीदी बाहर निकली। वह करीबन आठ साल की थीं और अक्सर बाहर खेलती रहती!

गोलू की ओर ध्यान जाते ही नेहा दीदी पास आकर बोली...

"अरे गोलू, क्यों ऐसे उदास बैठे हो?"

गोलू धीरे से बोला... "मुझे ना दीदी चाहिये... मगर यहां किसी के पास नहीं है।"

नेहा दीदी हंसकर बोली... "तो मैं हूँ ना! चलो, हम साथ खेलते हैं।"

       उस दिन से नेहा दीदी रोज गोलू के साथ खेलने लगीं। कभी वो उसे कहानी सुनाती थी... कभी पढ़ाई में मदद करती, तो कभी पास के झूले पर साथ झूलती थी!

       एक दिन बारिश हो रही थी। गोलू खिड़की से बाहर की ओर देख रहा था। उतने मे नेहा दीदी छाता लेकर उसके घर आईं और बोलीं...

"चलो गोलू, हम बारिश में कागज़ की नाव तैराते है!"

 वह सुनते ही गोलू उछल पडा... फिर दोनों ने मिलकर कागज की छोटी-छोटी नावें बनाई और बरामदे के पानी में तैराने लगे! उस वक्त गोलू बहोत खूश दिख रहा था!

फिर एक दिन गोलू खुशी खुशी से अपने मम्मी-पापा से बोला...

 "देखो मम्मी, पापा! अब मुझे मेरी दीदी मिल गई! नेहा दीदी ही मेरी असली दीदी है।"

उसपर पापा हंसते हुए बोले...

 "हां हां क्यो नहीं! बेटा सच्ची दीदी वही होती है, जो तुम्हें प्यार करती हो और मुसीबत मे भी साथ दे।"

उतने मे नेहा दीदी वहां उनके पास आ पहुंची... गोलू ने झटसे नेहा दीदी का हाथ पकड़कर कहा...

 "अब मैं कभी अकेला नहीं रहूँगा... क्योंकि मेरी दीदी मेरे पास है!"


 संदेश... रिश्ते केवल जन्म से नहीं, सिर्फ अपने खून से ही नहीं... तो अपनापन और प्यार से भी बनते हैं!

विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

वाईट सवय... (बोधकथा)

 वाईट सवय... (बोधकथा)

      पिंटू तसा बालपणापासूनच खोडकर होता. अभ्यासात मात्र तो हुशार होता. थोडा मोठा झाल्यावर पिंटूला जिथं तिथं थुंकण्याची वाईट सवय जडली. घरात असला तरी तो वॉश बेसिनमध्ये थुंकायचा नाही... तर तो घराच्या खिडकीतून, दरवाजातून कुठंही थुंकायचा. त्यामुळे पिंटूच्या या वाईट सवयीवरून त्याचे आईबाबा त्याला सतत ओरडायचे. तरी सुद्धा त्याची ही खोड काही केल्या जात नव्हती.

कुणाला अशी शंका यायची, हा पिंटू गुटखा, सुपारी तर खात नसेल! मात्र तसलं काही नव्हतं. त्याला कुठलंही व्यसन नव्हतं. का कुणास ठाऊक पण कुठंही थुंकण्याची वाईट सवय त्याला लागली होती. रस्त्यानं येता - जाताना किंवा शाळेत वर्गातल्या खिडकीतून पिंटू थुंकला नाही असं कधीही घडलं नाही.

    एकदा पिंटूच्या शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार होती. त्यासाठी शाळेत वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक आले होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आणि शेवटी त्यांनी सार्वजनिक स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयावर भाषण दिले. त्यांनी बोलताना रस्त्यावर कचरा, घाण टाकणे, थुंकणे या विषयावरही माहिती दिली. ते म्हणाले, “आपल्यापैकी अनेकांना रस्त्यावर केरकचरा टाकण्याची किंवा थुंकण्याची सवय असते."

डॉक्टरांचे बोलणे ऐकून सगळेच पिंटूकडे बघत खो खो हसू लागले. तेव्हा त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं.

नंतर सर्वांना शांत करत डॉक्टर म्हणाले, “अनेकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची वाईट सवय असते. रस्त्यावर थुंकल्यामुळे परिसरात घाण, दुर्गंधी पसरते. थुंकीवर माशा बसून रोगराई पसरण्याचा धोका संभवतो. पावसाळ्याच्या दिवसांत थुंकीच्या घाणीपासून साथीचे रोग पसरण्याचाही धोका असतो. तेव्हा तुम्ही प्रत्येकाने आपल्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे."

डॉक्टर पुढे म्हणाले, “आता तर आपल्या राज्यात शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार कुणी रस्त्यावर थुंकताना आढळल्यास एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षाही निश्चित केली आहे.''

डॉक्टरांचे भाषण ऐकून पिंटूला थुंकणे किती घातक असते ते समजले. मात्र त्याची थुंकण्याची सवय सुटता सुटत नव्हती. त्यामुळे तो खूप उदास राहू लागला. 

      दिवस असेच जात होते. बघता बघता 

दसऱ्याचा सण आला. पिंटूच्या बाबांनी त्याच्यासाठी भारीमधला ड्रेस आणला होता. त्यामुळे साहजिकच पिंटू खूप खूश होता. मग

नवीन ड्रेस घालून सायंकाळी तो बाबांच्या दुचाकीवरून बाबांच्या मित्रांकडे सोने वाटायला निघाला. थोडं पुढे गेल्यावर चौकात वाहतूक खोळंबली होती. तसंच रस्त्यावरही लोकांची गर्दी जमली होती.

 पिंटूच्या बाबांनी गाडी हळूहळू चालवत कसातरी रस्ता पार केला. पलीकडे गेल्यावर काही वेळाने सुरळीत वाहतूक सुरू असताना शेजारून एक पीएमटी बस गेली. बसच्या खिडकीत बसलेला पान खाणारा माणूस अचानक खिडकीतून बाहेर थुंकला. ती थुंकीची पिचकारी नेमकी पिंटूच्या अंगावर पडली आणि त्याच्या नव्याकोऱ्या कपड्यांची वाट लागली. पिंटू जोरात ओरडला. त्याच्या आवाजानं बाबा गडबडले आणि त्यांनी वेग कमी करत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तेव्हा कुठं काय घडलं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी कपाळावर हात मारून घेतला! पिंटू तर रडायलाच लागला. दसरा साजरा करण्याचा त्याचा मूड गेला. 

     त्यानंतर बाबांनी गाडी घराकडे वळवली. दोघंही घरी पोहोचले, मात्र पिंटूचं रडणं थांबलं नव्हतं. त्याच्या आईनं त्याची समजूत घातली आणि त्याला कपडे बदलायला दिले. आता परत जाण्यात अर्थ नाही असा विचार करून पिंटूला जवळ घेऊन बाबा म्हणाले, “पिंटू, आता समजलं का सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व? अरे, इतके दिवस आम्ही तुला सांगत तुला होतो. घराच्या खिडकीतून, दारातून रस्त्यावर किंवा इकडे तिकडे थुंकू नकोस! तुझ्या थुंकण्यामुळे किती लोकांना त्रास झाला, किती लोक घरी भांडायला आले ? ते कशासाठी आता समजलं ना! थुंकीमुळे आज तुझे कपडे घाण झाले तर तुला रडायला आलं. तुझा मूड खराब झाला. आपल्यामुळे दुसऱ्यांना देखील त्रास होऊ शकतो हे कळलं ना तुला आता!"

   बाबांचं बोलणं ऐकून पिंटूचे डोळे उघडले. त्यानं खाली मान घातली. त्याला खूप वाईट वाटलं. त्या दिवसापासून पिंटूनं निर्धार केला... वाटेल तिथं, सार्वजनिक ठिकाणी अजिबात थुंकायचं नाही म्हणजे नाहीच!

विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

मोबाईल 9923797725

मनातला एव्हरेस्ट…

 मनातला एव्हरेस्ट…

मी एका सामान्य कुटुंबातली सामान्य मुलगी. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय... मनात खदखदत असलेलं सारं सारं बाहेर काढायचंय! तो दुर्दैवी दिवस मी कसा विसरेन? मी अरूणिमा सिन्हा, वय वर्षे २९. मध्यमवर्गीय कुटुंबातील तुमच्यासारखीच. १२ एप्रिल २०११ या दिवशी मी एका नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणे आवश्यक असल्याने पद्मावती एक्सप्रेसने लखनऊ ते दिल्ली असा प्रवास करत होते. आरक्षण न मिळाल्याने रेल्वेच्या जनरल बोगीत बसले होते. संपूर्ण डबा प्रवाशांनी खचाखच भरला होता. सगळे लहान-मोठे, तळागाळातले लोक विनातक्रार प्रवासाचा अनुभव घेत होते आणि अचानक मध्यरात्रीच्या सुमारास लुटारू गुंडांची टोळी आमच्या डब्यात घुसली. बघताबघता त्यांनी हैदोस मांडला. कुणाचे दागिने तर कुणाचे पैसे, मौल्यवान वस्तू लुटण्यास त्यांनी सुरूवात केली. मग माझ्यावर पाळी आली. माझ्या गळ्यात सोनसाखळी असल्याने ती हिसकावून घेण्यास एकाने माझ्याशी बरीच झटापट केली. मी एक राष्ट्रीय पातळीची व्हॉलीबॉल चॅम्पियन असल्याने सहजासहजी हार मानणारी नव्हतेच. आत्मविश्वासाने त्या गुंडाला सामोरे जाण्याचे ठरवले. त्यावेळी मी तीव्र विरोध केला तेव्हा इतर गुंड त्याच्या मदतीला आले.

     माझा प्रतिकार त्या गुंडांसमोर तोकडा पडला. त्यांनी जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावून घेतली आणि मारहाण करून मला त्या चालत्या गाडीच्या डब्यातून त्यांनी बाहेर भिरकावून दिले. नेमक्या त्याचवेळी दुर्दैवाने विरूद्ध दिशेने दुसरी एक गाडी 'क्रॉस' होत असल्याने तिच्यावर जाऊन मी धडकलेच आणि दोन्ही चालत्या गाड्यांच्या मध्ये खाली आपटले गेले. गाड्या निघून गेल्यावर मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडू लागले... पण त्या काळोख्या भयाण रात्री तिथं कोण असणार? कोणीच आलं नाही… तब्बल सहा सात तास तशीच पडून होते… जीवघेण्या वेदनेनं विव्हळत! त्या कालावधीत जवळपास ४९ गाड्यांनी माझ्या आजूबाजूने ये-जा केली धाडधाड आवाज करत! काही वेळाने मग दिवस उजाडण्याची वेळ झाली. मी उठण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण पायात हालचालच नव्हती. बहुतेक पाय तुटला असावा! असह्य वेदना होत होत्या. एक जमेची बाजू म्हणजे डोक्याला काहीच मार लागला नसल्याने मेंदू जागेवरच होता म्हणजे ‘ब्रेन कॉन्शस’ कार्यरत होता. मी पूर्णपणे शुद्धीत होते पण रक्तस्रावामुळे ग्लानी आल्यासारखे वाटत होते. तरीही ओरडून हात हलवत उठण्यासाठी धडपड करत होते!

      आता चांगलंच उजाडल्यामुळे जवळच्या गावातील लोकांचे लक्ष माझ्याकडे वेधले गेले. दोन तीन व्यक्तिंनी जवळ येऊन माझी केविलवाणी अवस्था बघितली अन् ताबडतोब हालचाल करत त्यांनी मला उचलले. मग गावातील एका खाटल्यावर निजवले. विचारपूस केली. प्यायला पाणी दिले. माझ्या क्षीण होत चाललेल्या आवाजात त्यांना सगळी 'आपबीती' सांगितली. मग त्यांनी मला जवळच्या बरेली जिल्हा दवाखान्यात त्वरित दाखल केलं. तेथील डॉक्टरांनी माझी अवस्था बघितली. त्यांचे बोलणे मला ऐकू येत होते. डॉक्टर्स आपापसात बोलत होते... आपल्याजवळ रक्त नाही, अॅनेस्थेशिया नाही मग उपचार कसे करणार? ते आपली असमर्थता दर्शवत होते. मी इकडे आत्यंतिक वेदनेने तडफडत होते त्यावेळी!

      'जगण्याची धडपड माणसाला स्वस्थ बसू देत नाही!' हे वाक्य आठवलं अन् माझ्यात कुठून सामर्थ्य आलं कोणास ठाऊक…मी मोठ्याने ओरडले, 

"डॉक्टर, माझा पाय तुटलेला आहे. कसंही, काहीही करून मला वाचवा प्लीज. मी रात्रभर रेल्वे ट्रॅकवर पडून होते. काहीतरी करा हो लवकर..."

    तुम्हाला विश्वास बसणार नाही, तेथील डॉक्टर आणि फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय इत्यादींनी स्वतः रक्तदान करून मला रक्त दिले आणि मग अॅनेस्थेशियाच्या शिवाय शस्त्रक्रिया करून माझा पाय कापण्यात आला. त्यावेळच्या त्या असह्य वेदना खरंच इतक्या जीवघेण्या होत्या... आता कुठल्या शब्दात सांगू तुम्हाला? आजही तो प्रसंग आठवला की, संपूर्ण शरीरभर वीज चमकल्यासारखी होते! माझी गोष्ट नंतर मीडियाला कळाली. अरूणिमा राष्ट्रीय खेळाडू आहे, हेही त्यांना कळले होते. मग मला किंग जॉर्ज मेडिकल हॉस्पिटल, लखनऊ येथे हलवण्यात आले. तिथं सविस्तर तपासणी करून त्यानंतर दिल्लीच्या प्रसिद्ध ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये मला दाखल करण्यात आले. तेथे माझ्यावर तब्बल चार महिने उपचार सुरू होते. सुरूवातीच्या जवळपास पंचवीस दिवसानंतर थोडं ठीक झाल्यावर, तेथील स्थानिक वर्तमानपत्रातील वर्णन वाचून तर मला धक्काच बसला. त्यात लिहिले होते…’अरूणिमाजवळ रेल्वे तिकिट नव्हते म्हणून तिने चालत्या गाडीतून उडी मारली!' 

 त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी मात्र त्या बातमीचे मीडियाजवळ जोरदार खंडन केले. काही वर्तमानपत्रात तर अरूणिमाने आत्महत्येसाठी उडी मारली असेही वर्णन होते. आता तुम्हीच सांगा, माझ्या कुटुंबीयांना काय वाटलं असणार हे सगळं वाचून? परिवारातील तरूण मुलीची ती अवस्था बघून, जिचा एक पाय कापण्यात आला, पुढं काय होणार याची अजिबात शाश्वती नाही… त्यांच्यावर त्यावेळी काय प्रसंग ओढवला असणार तुम्ही कल्पना करू शकता! आणि माझी अवस्था तर… मला त्यावेळी हसावं की रडावं हेच कळेना! तपासणीअंती माझ्या मणक्यात तीन ठिकाणी 'फॅक्चर्स' निघाले. मी कधीतरी उठू शकणार की नाही हेही मला माहीत नव्हतं! तरीही म्हणतात ना... 'जहाँ चाह होती है, वहाँ राह मिलही जाती है।'

   माझ्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर काहीतरी वेगळं करून दाखवायचंच अशा प्रकारचे अनोखे विचार त्यावेळी त्या दवाखान्याच्या बेडवरच माझ्या मनात रुंजी घालत होते. आता आपला आवडता खेळ व्हॉलीबॉलला तर अलविदा करणे भागच होते कारण मला एक पाय नव्हता. कृत्रिम पाय जोडल्यानंतर पुढं काय करता येईल याचा विचार मी करू लागले अन् डोक्यात एक विलक्षण कल्पना सुचली... 'पंगू लंघुयते गिरीम्' आपण माऊंटेनिंग (गिर्यारोहण) करायचं... मनाशी निर्धार पक्का केला पण ते सहज शक्य नव्हतंच. एक तर अशा अवस्थेत मला प्रशिक्षण देणार कोण? आणि दुसरं असं की, प्रायोजकत्व कुठून मिळवायचं? तरीसुद्धा मी आपली अनोखी कल्पना सगळ्यांजवळ व्यक्त केली.. “मला गिर्यारोहण करायचंय, मला तो माऊंट एव्हरेस्ट सर करायचाय!'’

“काय? तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? तू वेडी तर झाली नाहीस ना? अगं हे कसं शक्य आहे? तुझा एक पाय नकली आहे, दुसऱ्या पायात रॉड आहे. तुला साधं चालतानाच लंगडत चालावं लागतं अन् हे काय भलतंच खूळ तुझ्या डोक्यात शिरलंय!”

“अगं, अरूणिमा तू राष्ट्रीय खेळाडू आहेस, त्या बळावर तुझ्या नोकरीसाठी प्रयत्न करूया ना आपण…”

   कुटुंबीयांचं आणि मित्र परिवाराचं बोलणं ऐकून मला वाटलं, लोक माझी 'फिजिकली कंडिशन' बघून आपापली मतं द्यायचे…'तू गिर्यारोहण करू शकणार नाहीस!’ मात्र माझा अंतरात्मा काय सांगतो, माझ्या आतला आवाज यांना कसा कळणार? माझा अंतरात्मा मला ओरडून सांगत होता... 'अरूणिमा तू हे नक्की करू शकतेस!' मला वाटते या जगात आपला सगळ्यात मोठा मोटिव्हेटर (समुपदेशक) आपणच असतो. जेव्हा आपला अंतरात्मा जागा होतो, आपण आपला आतला आवाज ऐकतो तेव्हा आपलं लक्ष्य प्राप्त करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. एकदा का आपलं लक्ष्य प्राप्त करण्याचा निर्धार पक्का केला की मग तो तुम्ही पूर्णत्वास नेणारच हे निश्चित! माझे कुटुंबीय भक्कमपणे माझ्यासोबत होते. माझा भाऊ तर माझा मोठा आधार होता. तो मला म्हणाला, 

“आपण बच्छेन्द्री पाल मॅडमकडे जाऊया. त्यांनी १९८४ मध्ये माऊंट एव्हरेस्ट सर केला होता…त्यांचा सल्ला घेऊन बघू. आपलं म्हणणं त्यांना पटवण्याचा प्रयत्न करूया. त्या नक्कीच काहीतरी चांगलं सांगणार... योग्य मार्गदर्शन करणार!” 

       मग आमचं ठरलं एकदाचं, बच्छेन्द्री मॅडमकडे जायचंच. काही दिवसातच मी आपल्या भावासह त्यांच्याकडं पोहोचले. त्यांची भेट घेतली आणि त्यांना काहीही न लपवता माझ्या बाबतीत घडलेलं सगळं खरं खरं सांगून मोकळी झाले. मग आपला दृढ निर्धार त्यांच्यासमोर व्यक्त केला... उत्तुंग गिर्यारोहणाचा, माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा! माझी मनापासून व्यक्त केलेली तळमळ ऐकून बच्छेंद्री पाल मॅडमच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या मला शांत करत म्हणाल्या…

"अरुणिमा तू एवढ्या मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत हा निर्धार केला आहेस म्हणजे तू आपल्या मनात नक्कीच एव्हरेस्ट सर केलाच आहेस! आता फक्त ते तुला आपल्या कृतीतून दाखवायचं आहे."

     माझं कुटुंबीय सोडून बच्छेंद्री पाल मॅडम या पहिल्याच होत्या ज्यांनी माझ्या दृढ निर्धाराचं मनापासून समर्थन केलं. बाकी सगळ्यांचाच नन्नाचा पाढा होता. तुमच्यापैकी बहुतेकांना हा अनुभव आला असणारच... *आपण आपल्या मनातील काहीतरी वेगळं करू इच्छितो तेव्हा विरोध हा ठरलेलाच असतो.* असो! आता तर माझं पुढील नियोजन पक्क होतं अन् माऊंट एव्हरेस्ट सर केलेल्या बच्छेंद्री मॅडमही माझ्या पाठिशी भक्कमपणे उभ्या होत्या. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं पण जेव्हा आपण ठरवलेल्या क्षेत्रात उतरतो तेव्हाच कळतं पाणी किती गहिरं आहे ते!

    काही दिवसातच मी बच्छेंद्री मॅडमच्या बेस कॅम्पमध्ये दाखल झाले. त्यांनी खूप कौतुक केलं. माझा आत्मविश्वास जागवला आणि म्हणाल्या…

 "अरूणिमा आता सिद्ध करायचंय तुला स्वतःला!” 

त्याठिकाणी गिर्यारोहणाच्या वेळी सगळे प्रशिक्षणार्थी सामान्य होते. फक्त मीच एकटी वेगळी होते. एखाद्या 'पिक'वर गेलो की ते म्हणायचे... "अरूणिमा तू हळूहळू ये... स्वतःला जप बरं का!" 

मग ते काही वेळातच वर टॉपवर पोहोचायचे अन् मला मात्र तीन-तीन तास लागायचे. कारण माझा डावा पाय नकली होता, उजव्या पायात रॉड होता. मणक्यात सुद्धा त्रास होताच पण मी जिद्द सोडली नाही! मग एकदा ठाम निश्चय करून संकल्प केला की एक दिवस असा नक्की येणार आणि मी सगळ्यांच्या आधी पोहोचणार अगदी टॉपवर! जवळपास आठ महिन्यानंतर... तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पूर्ण साहित्य सोबत घेऊन बेस कॅम्पमधून निघाल्यावर 'पिक'च्या टॉपवर मी सगळ्यांच्या आधी पोहोचले… त्यावेळी मी स्वतःवर जाम खूश होते. मात्र त्यापेक्षा जास्त आनंदी मी तेव्हा झाले, जेव्हा सगळे विचारायचे... “अरूणिमा तू नेमकं काय खातेस? इतकी ताकद कशी आली गं तुझ्यात? पाय नाही तरी चालतेस तरी कशी?"

   त्यानंतर बऱ्याच प्रयत्नाअंती मला 'स्पॉन्सरशीप' मिळाली… माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी! तरीसुद्धा एक समस्या होतीच… माऊंट एव्हरेस्टजवळ गेल्यावर स्वतःबद्दल सगळं समजावून सांगण्याची. सोबत येणाऱ्या तेथील शेरपाला जेव्हा कळलं, माझा पाय नकली आहे तेव्हा तो लगेच म्हणाला, 

"तुला घेऊन मी जाऊ शकणार नाही. तुझ्याबरोबर तर मला माझासुद्धा जीव गमवावा लागणार!" 

 मग बच्छेंद्री मॅडमनी त्याला सगळं व्यवस्थितपणे समजावून सांगितलं माझ्याबद्दल... माझ्या दृढ निर्धाराबद्दल! आणि हो, एक सांगायचंय मला आपण टीव्हीवर, चित्रपटात नेहमी बघतो निळ्याशार सुंदर टेकड्या, पर्वतरांगा वगैरे! प्रत्यक्षात मात्र तिथं गेल्यावर चित्र वेगळं असतं. ते बघून अंगावर काटा येतो. म्हणतात ना, ‘दुरून डोंगर साजरे’ अगदी तसंच!

    आणि मग सुरू झाला एक चित्तथरारक प्रवास... माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आम्ही एकूण सहाजण होतो. मोठ्या आनंदाने सुरूवात केली पण त्या भुसभुशीत बर्फात पाय ठेवायचे, तेव्हा माझा नकली पाय मुडपून जायचा आणि तोलही जायचा. त्यावेळी शेरपा ओरडायचा, "अरूणिमा तू आता परत जा, तुला जमणार नाही." 

 मग त्या शेरपावर एकदा मी मोठ्याने खेकसलेच…

 "मी येणारच. हा माझा पाय आहे. त्यानं कसं चालायचं हे मला चांगलं ठाऊक आहे." माझ्या आवाजातील जरब आणि माझा आत्मविश्वास बघून शेरपा चांगलाच वरमला आणि तो मनोमन समजला असणार... हे वेगळंच रसायन आहे! मग मी जाणीवपूर्वक लक्ष देऊन चालायला लागले. हळूहळू मला अंदाज येऊ लागला... त्या बर्फातील खाचखळग्यांचा! आम्ही कॅम्प-३ पर्यंतची चढाई पूर्ण केली. आता माझा आत्मविश्वास दुणावला होता. मग साऊथ पोलपर्यंतचा जीवघेणा प्रवास अन् नंतरच एव्हरेस्ट सबमिशन... खरंच खूप 'हॉरर' होतं सगळं! कारण पुढं जाताना वाटेत काही ठिकाणी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या व्यक्ती दिसायच्या. अशावेळी तर चांगल्या निर्ढावलेल्या गिर्यारोहकांचं सुद्धा मनोबल खच्ची होतं! मग आम्ही तर अगदी नवखे होतो... पहिलीच वेळ होती आमची. मनात एक विचार आला, ज्या उद्देशाने आपण माऊन्ट एव्हरेस्ट सर करण्यास पुढे सरकत आहोत त्यासाठी हे लोक इथं मृत्यूशी झूज देत आहेत! अशावेळी खरंच शरीरावर काटा उभा राहतो… ते म्हणतात ना, रोंगटे खडे हो जाते है! त्यावेळी मला खरंच अतिशय भीती वाटली… पंधरा मिनीटं तरी तशीच थांबले. अशावेळी निर्णय तुमच्या हातात असतो, तेव्हा अजिबात डगमगायचं नसतं!

     आणि अचानक त्यावेळी बच्छेंद्री पाल मॅडमचे उत्साहाने भारलेले ते बोल आठवले…

 "तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकाल तर तुमची बाकीची पाऊले आपोआपच पुढे सरकणार!" मग मन खंबीर करून ठाम निर्धाराने पाऊल पुढे टाकले अन् ठरवले, कुणी पुढे गेलं नाही तरी मी जाणारच! 'सबमिशन' पूर्ण करून एव्हरेस्ट सर करणारच... सगळ्यांसाठी! एक लक्षात ठेवा जसा आपण विचार करतो ना, तसंच आपलं शरीर ते 'जनरेट' करणं सुरू करतं.

एकप्रकारची उर्मी येते त्यावेळी, मग तुम्हाला कुणी कुणीच रोखू शकत नाही! धाडसानं एक एक पाऊल पुढे पडत होते. आता मागे वळून बघायचं नव्हतंच, काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासानं आम्ही पुढं पुढं सरकत होतो. 'हिलेरी स्ट्रीप' जवळ पोहचताच शेरपा अचानक माझ्या हाताला हिसका देऊन ओरडला…

“अरुणिमा आता पुढं जाणं फार अवघड आहे, शिवाय तुझा प्राणवायूचा कोटाही आता फारच कमी आहे!" 

त्यावेळी 'हिलेरी स्ट्रीप' नंतर पुढचा टप्पा म्हणजे एव्हरेस्ट सर करायचा होता. इतकं जवळ आल्यानंतर... आपल्या 'टार्गेट'च्या इतक्या जवळ आल्यावर कुणी तुम्हाला म्हणालं, 'आता परत जाऊया' तर कसं वाटणार? मी जवळजवळ खवळूनच शेरपाला बोलले... 

"मी आता परत जाणार नाही. परतण्यासाठी इथंपर्यंतचा प्रवास केला नाही मी, कळलं का… मी पुढं जाणारच!"

शेरपा अत्यंत काकुळतीने म्हणाला…

“अरुणिमा, अगं जिन्दगी राहील तर परत तुला प्रयत्न करता येणारच ना... दुसऱ्या प्रयत्नातही एव्हरेस्ट सर करता येईल!"

    जीवनात सुवर्णसंधी एकदाच येते, हे मला चांगलंच ठाऊक होतं. ती पुन्हा मिळणार नाही. आता ही संधी दवडून कसं चालणार? अन् मला एव्हरेस्टसाठी स्पॉन्सरशीप सुद्धा फार मुश्किलीने मिळाली होती, ती परत कधी मिळणार न मिळणार! मला बच्छेन्द्री मॅडम यांनी आणि माझ्या आईनेही सांगितलेलं त्यावेळी आठवलं... 

"कधी कधी जीवनात असे काही बिकट प्रसंग येतात, तेव्हा निर्णय आपल्याला एकट्यालाच घ्यावे लागतात!" 

अन् त्या विचाराने खरंच अंग रोमांचित झालं, अंगावर मूठभर मांस चढल्याचा साक्षात्कार झाला! मग शेरपाला समजावणीच्या सुरात म्हटलं… "भाई चल, आपल्याला गेलंच पाहिजे पुढं, आता थांबायचं नाहीच... एव्हरेस्ट सर करायचाच!" 

मग लगेच मी पाऊल पुढं टाकलं, आम्ही चालतच होतो अन् जवळपास एक ते सव्वा तासाने मी एकदम 'टॉप'वर होते… हो मी एव्हरेस्ट सर केला होता! आनंद गगनात मावत नव्हता... त्यावेळी असं वाटलं, दोन्ही हात वर करून जोरजोरात ओरडून सगळ्यांना सांगावं... 

"बघा आज मी एव्हरेस्ट सर केलंय... मी मुलगी असून, एका पायानं अधू असूनही इथपर्यंत आले अन् जगातलं सर्वात उंच ठिकाण माऊन्ट एव्हरेस्ट सर केलाय मी!"

      सगळ्यांना मला हेच सांगायचंय, *एकदा विचार पक्का करुन ठरवलं की तुम्ही सर्व काही करू शकता. फक्त गरज आहे तुमच्या निर्धाराची, ठाम निश्चयाची! तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागात अपंगत्व असूद्या पण सारासार विचार करणाऱ्या तुमच्या मेंदूमध्ये विचारांची अपंगता अजिबात यायला नको. जर का कुणाच्या मेंदूत विचारांची अपंगता असेल तर तो सामान्य धडधाकट माणूसही अपंगच आहे!*

 ८८४८ मीटरच्या उंचीवर एव्हरेस्ट सर केल्यावर त्या आनंदाच्या भरात मी शेरपाला म्हणाले…

 "भाई! चल, माझा एक मस्तपैकी फोटो काढ. मी आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा हातात घेते.” 

याठिकाणी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगते, तुम्ही बाहेर कुठंही गेल्यावरच आपल्या तिरंग्याचे मोल आपल्याला शतपटीने कळते!

मात्र त्यावेळी शेरपा मला उसळून म्हणाला,

 "अरूणिमा तू वेडी आहेस का? आता तुझा प्राणवायू कधीही संपणार. चल, आवर लवकर. झटपट परत निघायचंय आपल्याला!”

 मात्र माझ्या जिद्दीपुढे नतमस्तक होऊन त्याने माझा झकास फोटो घेतला. मग लगेच शेरपा माझ्यावर इतका रागावला ना, जेव्हा मी त्याला म्हटलं, "आता माझा व्हिडीओ तयार करायचाय!" 

     ८८४८ मीटरच्या उंचीवर प्राणवायू संपत आलाय अन् मी त्या शेरपाला व्हिडीओसाठी गळ घालतेय. त्यावेळी तो माझ्यावर रागावून म्हणाला…

"नको, मी जातो आहे खाली आता. तू मर इथंच!"

त्यावेळी मला कुठंतरी माझ्या अंतर्मनात जाणवलं, परत जाताना आपण जिवंत खाली पोहोचलो नाही तर हा व्हिडीओ तरी आपल्या घरचे बघतील आणि म्हणतील… "आपल्या बहाद्दर मुलीनं एव्हरेस्ट सर केलाय. ती डगमगली नाही. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तिनं माघार घेतली नाही!" 

हा विचार मनात येताच शेरपाला मी खूप समजावलं,

 "उगीच वेळ घालवू नकोस बाबा. अरे, मी वाचले नाही तर निदान हा व्हिडीओ तरी तू तिकडे पोहचता करशील ना?"

    शेवटी नाईलाजाने शेरपा तयार झाला. त्याने माझा तिरंगा फडकावित असलेला व्हिडीओ शूट केला. दिनांक २१ मे २०१३ रोजी १०.५५ वाजता मी ८८४८ मीटर उंचीवर, जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर होते. त्याठिकाणी तेव्हाचे तापमान उणे ६० डिग्री सेंटीग्रेड होते. मग लवकरात लवकर खाली उतरणे अतिशय आवश्यक असल्याने लागलीच उतरायला सुरूवात केली. शेरपा सोबत होताच पण...

…पण हाय! थोडं अंतर पार केल्यावर दुर्दैवानं माझा प्राणवायूचा पुरवठा संपत आल्याचं जाणवलं. मी अचानक जागच्या जागीच कोसळलेच! एव्हरेस्ट सर करणारे जास्तीत जास्त गिर्यारोहक परतीच्या प्रवासात, खाली उतरताना आपला प्राण गमावतात हे मी ऐकून होते. शेरपा जवळ येऊन मला हिंमत देत म्हणाला…

 "अरूणिमा मला भरवसा नव्हता की तू एवढा उंच एव्हरेस्ट सर करणार! पण तू आपली जिद्द पूर्ण केलीच. आता मला असं वाटतं, तू जिवंत खाली पोहचायलाच हवं. हे बघ, अशी हिंमत हारू नकोस. चल ऊठ, तुला चालायलाच पाहिजे." 

शेरपा मला हात धरून उठवायचा प्रयत्न करू लागला पण माझ्या शरीरात त्राणच नव्हतं. मला उठणंच अशक्य झालं तर चालायची बात तर दूरच! पण म्हणतात ना... आपल्या दुनियेचे जसे नियम आहेत, तसेच त्या परमेश्वराच्या दुनियेचेही काही नियम असणारच. त्याच्या यादीत त्यावेळी कदाचित माझं नाव नव्हतंच. माझी घटका भरायची होती! मला त्यावेळी प्रकर्षानं आठवलं... जेव्हा मी रेल्वे ट्रॅकवर पाय तुटलेल्या अवस्थेत तब्बल सहा-सात तास पडून होते, मला अगदी खेटून एक-दोन नव्हे तर तब्बल ४९ गाड्यांनी धडधडत ये - जा केली तेव्हाच मला असं वाटलं होतं… त्या दयाळू परमेश्वराने आपल्याला काहीतरी अचाट कार्य करण्यासाठीच जिवंत ठेवलेलं आहे… काहीतरी नवा इतिहास रचण्यासाठी!

   नेमकं त्याचवेळेस एक ब्रिटीश गिर्यारोहक उतरताना दिसला. त्याच्याजवळ दोन प्राणवायूचे नळकांडे उपलब्ध होते… त्याने आपलं ओझं कमी करण्यासाठी एक नळकांडे तेथेच सोडून तो खाली उतरू लागला होता. ते पाहताच मग वेळ न दवडता शेरपा लगेच ते नळकांडे घेऊन माझ्याकडे येत म्हणाला…

"बघ अरूणिमा, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. अगं एवढ्या उंचीवर प्राणवायू मिळणे म्हणजे अगदी स्वप्नवत असते. हे नळकांडे तुझ्यासाठी जणू त्या देवानेच पाठवले आहे."

आकाशाकडे दोन्ही हात उंचावत असलेल्या त्या शेरपाने त्वरित ते प्राणवायूचे नळकांडे मला लावून दिले आणि एक कडक सॅल्यूट ठोकला. मग माझ्या जिवात जीव आला. त्या दयाळू परमेश्वराचे मनापासून आभार मानले! त्या क्षणी जणू मला आकाशवाणी ऐकल्याचा साक्षात्कार झाला... 'भाग्यसुद्धा त्यालाच साथ देते, ज्याला जिंकायचं वेड असते!’

    मग मी तत्परतेनं उठून शेरपासोबत अधिक जोमाने खाली उतरायला लागले. आता हवामान झपाट्याने बदलत होते अन् त्या उत्साहाच्या भरात चालताना अचानक माझा नकली पाय निखळला! मी पडता पडता सावरले. आता तापमान उणे साठपेक्षाही कमी झाल्याचं शेरपा सांगत होता. माझे दोन्ही हात गारठून बधीर झाले. तळहाताची हालचालही होत नव्हती. बोटामधून रक्त यायला लागलं. शेरपाला ते मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तो त्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला...

 "आपण आता लवकरात लवकर खाली गेलेलं बरं, खालचं तापमान जरा जास्त असणार." 

त्यावेळी वेदनेमुळे प्रयत्न करूनही मी आपले अश्रू आवरू शकले नाही पण आता रडून उपयोग नव्हता. एका हाताने तो नकली पाय सरपटत व दुसरा हात 'रोप'ला धरून मी उतरायला लागले. तेव्हा दुसरा काही इलाजच नव्हता. असह्य वेदना सोबतीला होत्याच! काही वेळानंतर सपाट जागा बघून निखळलेला नकली पाय व्यवस्थित बसवण्यात मी यशस्वी झाले आणि सावकाश चालू लागले!

    ही थरारक मोहीम पूर्ण करायला सामान्य गिर्यारोहकाला सतरा ते अठरा तास लागतात. मला मात्र त्यावेळी एकूण २८ तास लागले. खाली सुखरूप पोहचल्यानंतर मला बघून सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटलं. त्यांच्यापैकी कोणीतरी म्हणालेही…

 "आम्हाला वाटलं अरूणिमा आता काही परत येणार नाही!" 

सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदमिश्रीत भाव होते. मला आता एकच सांगावंसं वाटतं ...

"सगळं काही आपल्या आतच असतं. जे करायचं आहे त्यासाठी आपल्या मनाचा निर्धार पक्का करायला हवा. माझी आता महत्त्वाकांक्षा आहे, जगातील सर्वच उंच ठिकाणं सर करण्याची. एक जिद्द आहे, एक जुनून आहे... उंच उंच भरारी घेण्याची!"

“अभी तो इस बाजकी असली उडान बाकी है

अभी तो इस परिंदे का इम्तहान बाकी है!

अभी अभी लांघा है समुंदरोंको मैने...

अभी तो पुरा आसमान बाकी है!!”




… विनोद श्रा. पंचभाई

   9923797725

महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती

 महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती


महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये खरंतर निसर्गाचा खूप मोठा वाटा आहे, त्यांना पारंपरिक पद्धतीचे जीवन जगण्यासाठी निसर्गाने मोलाची मदत केली आहे. त्यामुळे निसर्गाने आदिवासी जीवनाच्या विविध पैलूंवर आपला ठसा उमटवला आहे असे म्हणता येईल. निसर्गाशी असलेल्या या विलक्षण नात्याने दऱ्याखोऱ्यात तसेच डोंगरात राहणारा आदिवासी निसर्गाच्या सानिध्यातच स्वत:ला सुरक्षित समजू लागला. म्हणूनच आदिवासींची आपली संस्कृती, राहणीमान यात आपल्याला कमालीचे वेगळेपण जाणवते! ते निसर्गाच्या सगळ्याच रुपांचा आपलेपणाने स्वीकार करतांना आपल्याला आढळून येईल. निसर्गाने सुद्धा त्यांच्यावर मेहरबान होऊन मुक्तपणे उधळण केली आहे. त्यांच्याइतकी निसर्गाची जवळून ओळख शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना होणे शक्य नाही. निसर्गाने आदिवासींना एका अर्थाने ताजेतवाने राहण्याची शक्ती प्रदान केली आहे.

हजारो वर्षांपासून महाराष्ट्रात सहयाद्रीच्या पूर्व, पश्चिम उतारावर तसेच सातपुड्याच्या रांगांमध्ये आदिवासींचे वास्तव्य असल्याचे आढळून येते. भौगोलिक व नैसर्गिक समस्यांमुळे आदिवासी प्रदेशाचा विशेष विकास होऊ शकला नाही. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दुर्दैवाने त्यांच्यापर्यंत अत्यावश्यक सेवा, सुविधा पोहचल्या नाहीत. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा सुद्धा त्यांच्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मात्र आदिवासी बांधवांना निसर्गाने मायेने सांभाळले आहे.

सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये भिल्ल, कोकणा गावीत, दुबळा, कोरकू, धानका, तडवी, अशाप्रकारच्या जमाती वास्तव्य करून आहेत. यात विशेषतः महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, औरंगाबाद, अमरावती या जिल्हयांचा समावेश होतो. विदर्भातील डोंगराळ आणि जंगलमय प्रदेशात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, मेळघाट याठिकाणी गोंड, माडिया, कोरकू, कोलाम, परधान, आंध या जमाती राहतात.

आदिवासींचे जीवन म्हणजे त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन जवळून बघितल्यानंतर ते आपल्यासारख्या समाजातील माणसांपेक्षा प्रेमळ, मायाळू, तसेच प्रामाणिक, भोळे आणि दुसऱ्यांवर सहज विश्वास ठेवणारे, माणूसपण जपणारे आढळून येतील हे आवर्जून नमूद करावेसे वाटते! त्यांच्यात मानवतावादी सत्य सत्‌प्रवृत्ती सुध्दा बघावयास मिळते. मात्र दुर्दैवाने पौराणिक कथांमधून आदिम जमातीबद्दल त्यांची निर्दयी क्रूर अशी प्रतिमा रेखाटली असल्याचे दिसून येते, आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा समजून था घ्यायची असल्यास त्यांचे निरनिराळे सण, समारंभ आपण समजून घेतले पाहिजे. आदिवासी जमात कला आणि मनोरंजनप्रिय आहे. त्यांची नाचगाणी व सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक सणांशी निगडीत आहेत. सुगीच्या दिवसातील त्यांचे सण म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारचा आनंदोत्सवच असतो. कथा, किस्से सांगण्याची प्रथा आपल्या मानवी समाजात अगदी आदिम काळापासूनच चालत आली आहे. आदिवासी समाजात धार्मिक प्रसंगी कथा सांगणे, प्रसंगाला अनुसरून उखाणे, म्हणी यांचा वापर करणे या बाबींना अतिशय महत्व आहे. तसेच त्यांच्या समाजजीवनात लोकसाहित्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

दुर्दैवाने आजही आदिवासी समाजाचे अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, बुरसटलेल्या परंपरा इत्यादींनी संपूर्ण जीवनच व्यापले आहे. आपल्या प्रचलित सुधारलेल्या व्यवस्थेमधील तथाकथित लोक त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेताना दिसतात. आपला समाज त्यांच्याकडे वेठबिगार म्हणूनच पाहताना दिसतो. त्यांचे जीवन समजावून घेऊन आदिवासी जमातीचा, त्यांच्या विदारक वास्तवाचा अभ्यास होणे ही आज खरी गरज आहे. 'सरळपणाने कसे जगावे याचा अनुभव आदिवासींच्या वागणूकीतून मिळतो. खरंतर तेथूनच त्यांच्या एकंदरित समाज जीवनाची सुरूवात होते. नाचगाण्यांच्या कार्यक्रमात तर त्यांचे पाय जणू जमिनीवर थांबतच नाहीत ! त्यांच्या इच्छा आकांक्षांना नवीन पालवी फुटते, अशा प्रसंगात त्यांना वयाचे, स्थळांचे तसेच काळाचेही बंधन नसते. त्यावेळी या आदिवासी माणसांची मने खुल्या दिलाने निसर्गाशी रममाण होतात. अशावेळीच आपल्याला त्यांच्या संस्कृतीचे खरे दर्शन घडते.

आदिवासी लोक हे सहसा रानावनाच्या आसपास किंवा एखाद्या पाणवठ्याजवळ राहताना दिसतात. त्यांना वर्षातून साधारणपणे तीन महिने वीटांच्या भट्टीवर रोजगार उपलब्ध असतो. इतर वेळी ते जंगलातून विडी बनवायला लागणारी पानं (तेंदूपत्ता) खुडणे, लाकूडफाटा जमवणे, बकरी किंवा शेळ्यांसाठी हिरवा पाला तोडून आणणे, मासे पकडणे असे उद्योग करताना आढळतात. एक गोष्ट मात्र खटकते, शासनाने भरपूर संधी उपलब्ध करूनही आदिवासी समाज शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत उदासीन आहे. शासनाने चौथी पर्यंतचे शिक्षण त्यांच्यासाठी मोफत ठेवलेले आहे. वह्या, पुस्तके सुद्धा मोफत आहेत. शिवाय शाळेचा गणवेश तसेच रोजचा पौष्टिक आहारही मोफत आहे. मात्र हे सगळे असूनही आदिवासी लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत बेफिकिर असल्याचे आढळून येते. आपल्या मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे हा विचारच त्यांच्या मनात कधी गंभीरपणे येत नाही. मात्र काही पालक सोयीस्करपणे मुलांना शाळेत पाठवताना दिसतात... ते यासाठी की, मुले जर नुसतीच खोड्या करणारी असतील तर त्यांना सांभाळणे हे त्यांच्यासाठी कधीकधी दिव्य ठरते. मग अशा मुलांना शाळेत पाठवायची भूमिका ते घेताना दिसतात. दुसरे असे की, आदिवासी मुले बकऱ्या घेऊन चरायला जाणे, लांबून पाण्याचे हंडे भरून आणणे ही कामे करतात. त्यामुळे त्यातून वेळ मिळाला तरच ती शाळेत जाताना दिसतात. अनेकदा तर शाळा चुकवलीच जाते! या आदिवासी मुलांच्या पालकांच्या अजूनही हे ध्यानात येत नाही की आपली मुले शिक्षण घेऊन शहरी लोकांसारख्या नोकऱ्या करू लागतील. एकंदरीत या समाजाच्या शैक्षणिक विकासाला विशेष गती प्राप्त होईल अशी परिस्थिती सध्यातरी नाही!

आदिवासी लोक हे त्यांच्या आरोग्याबाबत मात्र खूप सुदैवी आहेत असेच म्हणावे लागेल. कारण त्यांना मिळणारे नैसर्गिक वातावरण आणि शुद्ध हवा! आपल्याला मिळणारी शहरातील हवा हा आपल्या आरोग्याचा शत्रू नंबर एक आहे, दुसरे म्हणजे पाणी: कालकावरून वाहणारे शुद्ध पाणी त्यांना सहज उपलब्ध होते. मात्र त्यासाठी त्यांना पायपीट करावी लागले. तसेच - चूल पेटवण्यासाठी लाकडे गोळा करताना, शेळ्यांसाठी हिरवा पाला आणताना तसेच रानातून मिळणारे विविध नैसर्गिक खाद्य पदार्थ आणताना त्यांची अखंड कसरत सुरु असते! पायवाट, टेकड्या, घाटरस्ते अशा भागातून ते सतत चालल असतात. कित्येकदा मोळ्या इत्यादी वजन उचलूनही त्यांना चालावे लागते, त्यामुळे त्यांचे शरीर अतिशय काटक असल्याचे दिसून येते.अस्थीरोग किंवा श्वासाच्या तक्रारी, हृदयरोग असे प्रकार त्यांच्यात आढळून येत नाहीत. बराच वेळ अन्नपाण्या शिवाय चालत राहिल्यामुळे त्यांच्या शरीराचा चिवटपणा अत्यंत जास्त वाढलेला असतो. तसेच महत्वाचे म्हणजे आदिवासीचा आहार! आपल्या शहरी आहारात आणि त्यांच्या आहारात खूप मोठा फरक आढळतो. ते लोक मोठ्या प्रमाणात कंदमुळे खाताना दिसतात. आपल्याला शहरात सहसा मिळणार नाही, अशा पालेभाज्यांची त्यांना माहिती असते. त्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात ते खातात. त्यांचे नेहमीचे जेवण म्हणजे डाळ-भात, कंदमुळे आणि एखादी हिरवी पालेभाजी! तसेच त्यांचा मांसाहार म्हणजे जलाशयातून पकडलेले मासे, किंवा इतर जलचर प्राणी, चारों अत्यंत शुद्ध हवा, निर्मक पाणी, निसर्गाच्या सानिध्यातील आहार तसेच कमालीची अंगमेहनत यामुळे आदिवासी लोक आरोग्याच्या बाबतीत शहरी लोकांपेक्षा निश्चितच सुदैवी आहेत. नाही म्हणायला त्यांना सर्दी-पडसे, ताप तसेच सर्पदंश हे प्रकारही होत असतात, मात्र त्याचे प्रमाण कमी असते, माशिवाय आपल्या शहरी वातावरणातील ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा आदिवासी जंगलात नसल्याने त्यांचे मानसिक आरोग्यही उत्तम असते, आणि त्याचा चांगला परिणाम त्यांच्या शारिरीक आरोग्यावर होतो.

स्वच्छतेच्या बाबतीत मात्र हे लोक उदासिन असल्याचे आढळून येते. अनेकदा पाण्याचा असलेला अभाव आणि त्यांचे होणारे स्थलांतर हे त्यामागील कारण असू शकले. त्यांची लहान मुले मातील पडलेले अन्न खाताना दिसतात. कुणाचे नाक वाहताना दिसले, एखाद्याच्या जखमेवर माशा बसलेल्या दिसतात; मात्र त्याकडे कुणाचेच लक्ष नसते, हे लोक आंघोळही पाण्याच्या उपवाब्धतेनुसार करताना दिसतात. सरसकट सगळेच असे अशाप्रकारे वागतात असे नाही. सततच्या अंगमेहनतीमुळे आदिवासींचा रंग रापलेला दिसलो. चेहऱ्यावर सतत गोंधळल्या सारखे भाव दिसतात. मात्र हे लोक अजिबात बावकर नसतात, ते त्यांच्या जीवनात चांगलेच हुशार असल्याचे दिसून येते. रानात कुठे गेल्यावर काय भाजीपाला किंवा कंद मुळे मिळणार हे त्यांना बरोबर कळते. रानातूनच ते झाडपाल्याची औषधेही मिळवतात. आदिवासी समाजाचे एक वेगळेच जग असते... आपल्यासारखे ताण, स्पर्धा, मत्सर, विकार, पैशाचा हव्यास, भय, तांत्रिक विकास, अगतिकता,  विकृती, स्वार्थ अशा घटकांचा त्यांच्या ठायी लवलेशही आढळणार नाही. शासनाने या लोकांना काही संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण मोफत आहे तसेच यांना नोकरीसाठी आरक्षणही आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांना लहानमोठे व्यवसाय उभारण्याची संधी प्राप्त करून दिली आहे, एकाच ठिकाणी राहणाऱ्यांना शासनाने घरकुल योजनेअंतर्गत घरेही बांधून दिली आहेत, मात्र एक महत्वाची आणि मोठी अडचण या लोकांना भेडसावते, ती म्हणजे त्यांच्या नावावरचे आरक्षण दुसरेच कुणीतरी पळवल्याचे आढळून येते अन हे प्रचंड मोठया प्रमाणावर सुरु आहे... घडत आहे! मग या आदिवासींपैकी कोणी खरोखर शिकलेला असला आणि आरक्षण मागायला गेला तर त्या जातीची सर्व आरक्षणे आधीच संपल्याचे त्यांना  समजते. नंतर' लक्षात येते, की ज्यांनी ते आरक्षण मिळवले ते आर्थिकदृष्ट्या चांगलेच मजबूत होते. अशावेळी या आदिवासींचा कुणीही वाली नसतो. म्हणजेच शासन यांच्यासाठी काहीतरी चांगले करू पाहात आहे, हे लोक शिकून (काही प्रमाणात ) सुधारू पाहत आहेत, आणि आपल्याकडचे भ्रष्ट लोक त्यांना मिळणारी संधी त्यांच्यापर्यंत पोहचणार नाही यासाठी प्रयत्नशील असतात. हे कुठेतरी थांबायला हवे आणि आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात सामील व्हायला हवेत असे मनापासून वाटते!

विनोद श्रा.पंचभाई 

मो. ९९२३७९७७२५




पुणे मेट्रो… उत्कंठा वाढवणारी दर्जेदार कादंबरी

 

    पुणे मेट्रो… उत्कंठा वाढवणारी दर्जेदार कादंबरी


       सकाळी पेपर हातात घेतला की, बातम्या दिसतात... प्रेम संबंधात आडकाठी ठरणाऱ्या पतीचा किंवा पत्नीचा खून, प्रेमाचा स्वीकार केला नाही म्हणून तरुणीवर ऍसिड हल्ला… प्रेयसीचा खून करून आत्महत्या, अशा कितीतरी दुर्दैवी घटना आपल्या समाजात घडताना आपण एवढ्यात सतत बघत असतो. प्रेमासाठी वाट्टेल ते करायची, अगदी समोरच्याचा जीव घेण्यापर्यंत मजल मारायची तयारी करणं आज अगदी सहज झालं आहे… दुर्दैवानं ही विकृती मोठ्या प्रमाणात फोफावत आहे! 

    

    प्रेम ही निखळ, निर्मळ, निस्वार्थ, उदात्त भावना आहे… त्यात स्वार्थाचा लवलेशही नसतो हेच आजकालची पिढी जणू विसरून गेली की काय अशी शंका घेण्यासारखी आजची परिस्थिती आहे! 

त्याच त्या बातम्या वाचत असताना, त्याच घटना किंवा दुर्दैवी प्रसंग ऐकत असताना… या सगळ्या निराशेच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक संदेश देणारी एक सहजसुंदर साहित्यकृती हातात आली… ती म्हणजे ‘पुणे मेट्रो’ ही उत्कंठा वाढवणारी कादंबरी!

    

   आजकाल लोकांना मोबाईलवर बोलायला भरपूर वेळ असतो मात्र आपल्या जवळच्या लोकांना देखील आपुलकीने भेटून प्रेमाचे चार शब्द बोलायला अजिबात वेळ नसतो, हे दुर्दैवी वास्तव आहे! अशा वातावरणात लेखक सुनील पांडे यांची ‘पुणे मेट्रो’ ही वाचनीय कादंबरी हाती पडल्यावर गार वाऱ्याची छानशी झुळूक सर्वांगावरून गेल्यासारखं वाटलं … कारण ही दर्जेदार कादंबरी वाचताना ‘आता पुढे काय’ ही उत्सुकता पदोपदी जाणवत राहते! 

       आपण कुठलाही प्रवास करत असताना शेकडो, हजारो माणसं सतत दृष्टीस पडतात. सगळेच यंत्रवतपणे ये - जा करत असल्यामुळे त्यावेळी कोणाशी बोलण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मात्र कधीकधी रोजचा प्रवास करत असताना अचानक अशा काही घटना घडतात की त्यातून आपल्याला अनोळखी माणसांसोबत बोलायचा प्रसंगही येतो. त्यानंतर सगळी औपचारिकता, शिष्टाचार बाजूला ठेवून अगदी मनमोकळेपणानं ऐसपैस बोलणं होतं. मग कालांतराने मनं जुळली की घट्ट मैत्री व्हायला वेळ लागत नाही... आणि नंतर कधी आपसात ऋणानुबंध जुळले हे आपलं आपल्याही कळत नाही! 

       ‘पुणे मेट्रो’ कादंबरीमध्ये नायक, नायिका आणि तिचे वडील ही तीनच मुख्य पात्रे असून त्यांच्याभोवतीच या कादंबरीचं कथानक फिरत राहतं… मग त्यांच्यामधील प्रभावी संवाद वाचताना जसजसं कथानक पुढे सरकते तसतशी वाचकांची उत्कंठा शिगेला पोहचल्याशिवाय राहत नाही! खरं तर हेच या कादंबरीचं सामर्थ्य आहे. त्यासाठी ‘चलना ही जिंदगी है… चलती ही जा रही है!’... हे जीवनाचं सरळ साधं तत्त्वज्ञान सांगणारी आणि त्यातून सकारात्मक संदेश देणारी ‘पुणे मेट्रो’ कादंबरी मुळात सगळ्यांनी वाचायलाच हवी! 

       मित्रवर्य लेखक सुनील पांडे यांचं निरीक्षण अफाट असल्यामुळे कथानकाची गुंफण आणि त्यातील प्रसंगांना कशाप्रकारे आणि कुठं ट्विस्ट द्यावं हे त्यांना छान जमते. म्हणूनच अगदी रोजच्या व्यवहारातील प्रसंग, कमीत कमी पात्र, अतिशय उत्तम आशय आणि मनाचा ठाव घेणारी प्रभावी संवाद शैली हे त्यांच्या कादंबरीचं खास वैशिष्ट्य ठरतं! विशेष म्हणजे कुठल्याही अलंकारिक भाषेचा आणि बोजड शब्दांचा आधार न घेता सरळसाध्या, सोप्या भाषेचा वापर ते करत असल्याने त्यांच्या साहित्यकृती नेहमीच वाचनीय ठरतात! 

      कथा, कादंबरी, चरित्र, व्यक्तीचित्रण इत्यादी सर्वच प्रकारात दर्जेदार आणि वाचनीय साहित्य लेखन करणाऱ्या सुनील पांडे यांना भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा! धन्यवाद!


...विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

   मो. क्र.९९२३७९७७२५


कादंबरीचे नाव... पुणे मेट्रो 

 एकूण पाने... १४८

किंमत ... २६५ रुपये 

लेखक... सुनील पांडे, पुणे 

प्रकाशन ... नवचैतन्य प्रकाशन, मुंबई 


       









विवेकानंद घडताना

 विवेकानंद घडताना


       “इतर अनेक धर्मांना एखादा ठराविक संस्थापक असतो मात्र हिंदू धर्मासाठी कोणतीही एक व्यक्ती मूळ मानली जात नाही. हा धर्म अनेक ऋषिमुनींच्या शतकानुशतकांच्या चिंतनातून, तपश्चर्येतून आणि अनुभूतीतून प्रकट झालेला आहे. म्हणूनच तो कोणाचाही व्यक्तिगत धर्म नसून सार्वत्रिक आणि शाश्वत सत्यावर आधारित धर्म आहे!” हे अत्यंत प्रभावी विचार आहेत युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे! 

 “माझ्या भगिनींनो आणि बंधुनो!” अशी आपल्या भाषणाची अनोखी सुरुवात करणाऱ्या स्वामींजींनी १८९३ साली शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत वरीलप्रमाणे अभ्यासपूर्ण विचार मांडले होते. त्यानंतर मग जगभर स्वामीजींचं नाव त्यांच्या प्रेरणादायी वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने गाजत राहिलं, हे आपण सगळे जाणतोच.

        प्रिय लेखकमित्र जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘विवेकानंद घडताना’ हे चरित्रात्मक पुस्तक आज बारकाईने वाचायला हाती घेतलं. खरंतर यापूर्वी देखील हे पुस्तक अधूनमधून थोडं वाचण्यात आलं होतं. त्याचवेळी वाटलं, स्वामीजींचा अगदी बालपणापासून उल्लेख असलेलं ‘विवेकानंद घडताना’ निवांतपणे सविस्तर वाचायलाच हवं. 

        आपल्या मनोगतातून लेखक जयंत कुलकर्णी यांनी… “जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, उच्च-नीच यामध्ये भांडत बसून, विभागून आपण अधिक दुर्बल होत आहोत, आपण स्वतःचे नुकसान करून घेत आहोत हे स्वामींजींनी सांगितलेले सत्य त्यावेळीही उपयोगी होते आणि आजही आहे.” अशाप्रकारे अत्यंत मार्मिक निवेदन केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकांनी ‘विवेकानंदांचे बालपण’ या पहिल्या प्रकरणापासून ते ‘धर्म प्रवर्तनाची सांगता’ या शेवटच्या प्रकरणापर्यंत स्वामीजींचा सविस्तर जीवनपट उलगडला आहे. हे सविस्तर चरित्र वाचताना त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… हे प्रेरणादायी पुस्तक लिहिताना त्यांनी उगाच बोजड किंवा अलंकारिक शब्दांचा आधार न घेता सहज सोपी भाषा वापरली असल्यामुळे वाचताना कुठंही कंटाळवाणं वाटत नाही! उलट स्वामी विवेकानंद यांच्या उत्तुंग विचारांनी अगदी भारावल्यासारखं वाटतं आणि आपल्याला पानांगणिक बऱ्यापैकी आगळीवेगळी अशी ज्ञानप्राप्तीही होते… आणि हेच या साहित्यकृतीचं यश आहे असं याठिकाणी नमूद केल्याशिवाय राहवत नाही! 

      स्वामीजींचा जन्म, त्यांचं बालपण, वडील विश्वनाथ आणि माता भुवनेश्वरीदेवी यांच्या छत्रछायेखालील त्यांची जडणघडण, स्वामीजींना आलेले स्तिमित करणारे अनेक अनुभव लेखक कुलकर्णी यांनी ‘विवेकानंद घडताना’ या साहित्यकृतीत मोठ्या खुबीने मांडले आहेत. त्याचप्रमाणे श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गु्रू शिष्यांची अनोखी भेट वाचताना भान हरपून जाते… त्यावेळी या प्रकरणातील प्रभावी संवाद आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही! एका भावस्पर्शी प्रसंगात श्रीरामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना विचारतात…

“मी गेल्या कित्येक दिवसापासून तुझ्याशी एक शब्दही बोललेलो नाही, तरी तू माझ्याकडे का येतोस?” 

त्यावर स्वामीजी हसून उत्तर देतात…

“गुरुदेव, मी दक्षिणेश्वरला तुमच्याकडे येतो कारण माझे तुमच्यावर प्रेम आहे. मला तुम्हाला पाहावेसे वाटते, बोलावेसे नव्हे. तुम्ही मला काही सांगाल, म्हणून मी येत नाही!”

हे ऐकून श्रीरामकृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात आणि ते म्हणतात…

“नरेंद्र, मी तुझी परीक्षा घेत होतो. मी तुला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले, पाहावेसे वाटले की या बाह्य थंडपणाने तुझे प्रेम कमी होते का… पण तू माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम ठेवलेस. म्हणूनच तू माझा खरा शिष्य आहेस!” 

 त्याक्षणी विश्वास, निष्ठा आणि प्रेमाने बांधलेले ते गु्रू शिष्याचे नाते अखंड झाले होते. आज आपण सर्वत्र बघतो, लाखो रुपये मानधन घेऊन प्रवचन करणारे आजचे मतलबी गु्रू आपल्या शिष्यांकडून अजूनही काही मिळते का… याचीच अपेक्षा बाळगतात!

      ‘विवेकानंद घडताना’ या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून लेखक जयंत कुलकर्णी यांनी आजची नवीन पिढी कशी घडवायला हवी याचा जणू परिपाठच मांडला आहे. त्यामुळे पालकांनी ‘विवेकानंद घडताना’ आधी स्वतः मुळातून वाचायला हवं आणि त्यानंतर आपल्या मुलांना ते वाचण्यासाठी आग्रह करायला हवा… जेणेकरून त्यांच्यावर उत्तम संस्कार होतील! खरंतर आजच्या भरकटत चाललेल्या परिस्थितीत अशाच उत्तम चरित्र ग्रंथांची समाजाला नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी, या अप्रतिम साहित्यकृतीच्या निर्मितीसाठी लेखक महोदय यांचं मनापासून अभिनंदन!

       गुणग्राहकता लाभलेले पुण्यातील हरहुन्नरी प्रकाशक शैलेंद्र कदम यांनी ‘विवेकानंद घडताना’ हा चरित्र ग्रंथ प्रकाशित केला आहे. तसेच साजेसे मुखपृष्ठ चित्रकार प्रशांत भारताल यांनी तयार केलंय. प्रत्येक घरात संग्रही असायला हवं असं हे प्रेरणादायी पुस्तक ‘विवेकानंद घडताना’ रसिक वाचकांनी आवर्जून खरेदी करून इतरांनाही भेट द्यायला हवं, जेणेकरून ते येणाऱ्या पिढीसाठी ते निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल.

       लेखक जयंत कुलकर्णी यांना त्यांच्या देदीप्यमान साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


पुस्तकाचे नाव :  विवेकानंद घडताना 

लेखक : जयंत शंकर कुलकर्णी 

एकूण पाने... २२४

किंमत.... २८० रुपये 

प्रकाशक... शैलेंद्र कदम, दुर्वा एजन्सीज् पुणे                 

परिचयकर्ता... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

संपर्क : 9923797725, 9423534156