Thursday, May 22, 2025

कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी.


कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी.


'आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी...

देशी विदेशीयों को मंदिर यह हमारा!' अशी सर्वव्यापक ललकारी देणारे तुकडोजी महाराज यांना त्यांचं अलौकिक कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 'राष्ट्रसंत' ही समर्पक उपाधी दिली. त्यांनी लिहिलेल्या 'ग्रामगीता' या ग्रंथाने इतिहास घडवला. त्याबाबत कर्मयोगी गाडगेबाबा यांचं वक्तव्य पुरेसं बोलकं आहे... "तुकडोजी बाबांची 'ग्रामगीता' ही आज गीता-ज्ञानेश्वरीप्रमाणं जनतेला खरं ज्ञान देऊन खेड्यापाड्यात, झोपडी-झोपडीत सुख समाधान पैदा करील असा भरवसा वाटतो. आज अशा ग्रंथाची गावोगावी गरज आहे. भगवंताच्या गीतेचं खरं मर्म 'सर्व जीव देवता समजून सेवा करा' हे या ग्रंथाच्या रुपात आज पाहिजे तशा तऱ्हेनं प्रकट झालं आहे. तुकडोजी बाबांचा बहुमोल प्रसाद सर्वांना ती सुख-शांती देवो, हीच सदिच्छा!"

    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी कर्मयोगी गाडगेबाबांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं! त्यासाठी आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून द्यायचे. त्यांचे उपदेशही साधे, सोपे पण परिणाम साधणारे असायचे. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून परोपरीने सांगायचे. ‘देव दगडात नसून तो माणसांत आहे’ हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा मनापासून प्रयत्न केला. 

     कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांनीही त्यांच्या अभिनव कार्यातून, कीर्तन आणि प्रभावी भजनांच्या माध्यमातून बुरसटलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले आहेत. निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी दोघांनीही त्यांच्या अमोघ वाणीने प्रभावीपणे समाजप्रबोधन केलं आहे. 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी' या पुस्तकात दोन्ही आधुनिक संतांच्या अलौकिक कार्याचा सहजसोप्या भाषेत आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांनाही हे पुस्तक नक्कीच आपलेसे करणार असा विश्वास आहे. 

जगण्याचा आधार... 'आनंदयात्री'

 

      जगण्याचा आधार... 'आनंदयात्री'


     नुकताच म्हणजे परवाच्या रविवारी जागतिक मातृदिन सर्वत्र साजरा करण्यात आला आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी मी आमचे ज्येष्ठ लेखक मित्र श्री. जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेलं 'आनंदयात्री' हे सुंदर पुस्तक वाचायला हाती घेतलं. त्यातील 'वात्सल्यसिंधू आई' हा अतिशय भावस्पर्शी लेख वाचताना नकळतपणे डोळे भरून आले! या लेखात लेखकाने आपल्या आईबद्दलच्या अत्यंत तरल भावना प्रकट केल्या आहेत. ते लिहितात... आईचा स्वभाव आनंदी असल्यामुळे तिच्याबरोबर राहणं हा आनंद सोहळा असायचा! लोकांना खाऊ पिऊ घालण्यात, मदत करण्यात तिला अपार आनंद मिळायचा. स्वतःसाठी म्हणून ती जगलीच नाही, पाणी जसं कोणत्याही रंगात मिसळून जातं, अगदी तसंच तिचं होतं!

    जयंत शंकर कुलकर्णी यांची गजानन महाराज 

यांच्यावरील "श्री गजानन कथासागर", "स्वातंत्र्याचे शिल्पकार भाग -१, २, ३ तसेच "लहानपण वाचव रे देवा!" अशी एकूण पाच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या एवढ्यातच प्रकाशित झालेल्या 'आनंदयात्री' या पुस्तकात लहान मोठे असे एकूण तीस लेख आहेत. सगळे लेख वेगवेगळ्या विषयांवरील असल्याने ते वैविध्यपूर्ण झाल्याचे आढळून येतात, त्यामुळेच ते वाचनीय झाले आहेत. या लेख संग्रहातील 'रांगेतला मी' या पहिल्या खुमासदार लेखापासून सुरुवात करून लेखक जयंत कुलकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून 'अंदमानची सफर' करत असताना पार देश विदेशाच्या विलक्षण सफरी देखील घडवल्या आहेत. त्यात 'विलोभनीय युरोपची रोमहर्षक सफर' तसेच 'छोटा तरी प्रभावी देश कुवेत' यांचाही समावेश आहे. 

     'आनंदयात्री'चे खास वैशिष्ट्य म्हणजे यातील काही लेखांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे व्यक्तीचित्रणही रेखाटण्यात आलं आहे. त्यात प्रामुख्याने 'भावगीत गायक : गजाननराव वाटवे', 'राजा माणूस : विनय लक्ष्मण करमरकर, 'वात्सल्यसिंधू आई' या सोबतच 'संत श्री गजानन महाराज महात्म्य', 'गुरुवीण नाही दुजा आधार' हे लेख वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहेत. त्याचप्रमाणे 'आठवणीतील गाणी, सांगतील जीवन कहाणी..!' या लेखात अनेक कलाकारांचं केलेलं वर्णन खूपच वाचनीय झालं आहे. मुळात हे सगळे लेख वाचायलाच हवेत एवढे सर्वांगसुंदर झाले आहेत. या संग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की... लेखकाने काही लेखातून अधूनमधून समर्पक अशा सुंदर गाण्यांची पखरण केली आहे. त्यामुळे योग्य तो परिणाम साधण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. 'जीवन गाणे होऊ दे..!' आणि 'जिवलगा कधी रे येशील तू?' हे लेख वाचताना ते प्रकर्षाने जाणवतं!

      'आनंदयात्री' मधील 'स्त्री शिवाय विकास? केवळ अशक्य!', 'स्वान्त सुखाय' तसेच 'औदार्य, आत्मसन्मान आणि आनंदी आयुष्य - ज्येष्ठाचे!' हे लेख सामान्य वाचकांना विचार करायला भाग पाडणारे आहेत. तर 'योद्धा' मधला सर्वांना मनापासून मदत करणारा हरहुन्नरी महेश कमालीची चुटपुट लावून जातो! या संग्रहातील निरनिराळ्या प्रसंगावर बेतलेले लेख काही ना काही संदेश देऊन जातात हे मात्र निश्चित! त्यामुळे वाचकांनी ते प्रत्यक्ष वाचूनच त्याचा आनंद घ्यायला हवा असं वाटतं. 

       पुण्यातील 'नरवीर प्रकाशन'तर्फे प्रकाशित झालेला 'आनंदयात्री' हा लेखसंग्रह म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातील धडपड आहे, तळमळ आहे तसाच तो आनंददायी, ऊर्जादायी सुद्धा आहे. तसंच सर्वसामान्य वाचकांना जगण्याची दिशा देणाराही आहे. म्हणूनच 'आनंदयात्री' प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा असं मनापासून वाटतं! इतरांना भेट देण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा 'आनंदयात्री' लेखसंग्रह लिहिल्याबद्दल लेखक जयंत कुलकर्णी यांचं मनस्वी अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा! धन्यवाद!


विनोद श्रा. पंचभाई, पुणे

 मोबाईल क्रमांक ९९२३७९७७२५


    पुस्तकाचे नाव... 'आनंदयात्री' (लेखसंग्रह )

     पाने... १६२

     किंमत.... ₹ २६०/- 

संपर्क... 9923797725, 9423434156


निखळ विनोदाचा नजराणा : 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी'

 निखळ विनोदाचा नजराणा : 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी'


    हल्ली मानवी जीवन खूपच धकाधकीचं झालं आहे. कोणालाही थोडा देखील निवांतपणा नाही, अशी आजची एकंदरीत स्थिती आहे. मग आपसात चेष्टा मस्करी, एकमेकांच्या खोड्या करणं, विनोद करणं तर दूरच! असं म्हणतात, 'एक वेळ कुणाला रडवणं सोपं असतं पण हसवणं महाकठीण कर्म आहे!' हां एक मात्र तितकंच खरं आहे... स्वतःचं चारचौघात हसं करून घेणं सहज घडून जातं. त्यावेळी मात्र लोक हसतातच. किती सोपं असतं नाही, दुसऱ्यावर हसणं!

    मला आठवतो, बऱ्याच वर्षापूर्वीचा जंजीर चित्रपट. त्यात एक दृश्य आहे... अभिनेता प्राण आपल्या गंभीर झालेल्या खास मित्राला म्हणजे अमिताभ बच्चनला हसवण्यासाठी गाण्याच्या माध्यमातून काय काय क्लृप्त्या वापरतो, ते खरंच ऐकण्यासारखं आहे. प्राण म्हणतो,  "छुपा न हमसे, जरा हाल-ए दिल बता दे तू, तेरी हंसी की किमत क्या है ये बता दे तू! कहे तो आसमान से चांद तारे ले आऊ, हसीं जवान और दिलकश नजारे ले आऊ! तेरा ममनून हूं, तुने निभाया याराना! तेरी हंसी है आज सबसे बडा नजराना!" 

    हल्ली गंभीर प्रकारच्या कथा, सतत विचार करायला लावणारे लेख तसेच कधीकधी डोक्यावरून जाणारं साहित्यही आपल्या वाचनात येत असते. त्यामानाने निखळ विनोदी साहित्य मात्र अभावानेच नजरेस पडतं. हलके फुलके प्रासंगिक विनोद, कोपरखळ्या जणू हद्दपार झाल्या की काय अशी आजची अवस्था आहे. त्याऐवजी कित्येक मासिके किंवा साप्ताहिकात ओढून ताणून केलेले पांचट विनोद यांचाच भरणा जास्त केलेला दिसतो! 

    अशा या काहीशा गंभीर परिस्थितीत 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी' हा भन्नाट विनोदी कथासंग्रह नुकताच वाचण्यात आला. या वाचनीय पुस्तकाचे लेखक आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि लोकप्रिय साहित्यिक नागेश शेवाळकर! पुण्यातील 'सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन'चे प्रकाशक सुरेंद्र गोगटे यांनी हा विनोदी कथासंग्रह प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात 'चहा सम्राट', 'देऊनी आवळा, काढला कोथळा!', 'बायको दिन, नवरा दीन', 'श्वानसुंदरी' अशा प्रकारचे आगळेवेगळे व टिपिकल शीर्षक असलेल्या जवळपास चौदा विनोदी कथा आहेत. म्हणजे वाचकांसाठी जणू पर्वणीच! 

     'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी' या कथासंग्रहात शेवाळकर सरांनी 'इंद्रायणी काठी' या पहिल्याच कथेत चौकार, षटकारांची मनसोक्त आतिषबाजी केली आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये जाहीर करण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे किस्से अतिशय धमाल पद्धतीने रंगवले आहेत. या कथेच्या अनुषंगाने कादंबरीमधील वाड्.मय चौर्य करून तसेच सेटिंग करून पुरस्कार कशा प्रकारे मिळवता येतात यावर त्यांनी विनोदी ढंगाने मार्मिक भाष्य केलं आहे. त्यामुळे या कथेची भट्टी मस्त जमून आली आहे. 'चहा सम्राट' कथेत तर लेखकांनी 'पत्नीतुल्य चहा'च्या भन्नाट किस्स्याचे असे काही वर्णन केले आहे की वाचकांची हसता हसता पुरेवाट होते! 'पोस्टमार्टम' ही वेगळ्या धाटणीची विनोदी कथाही छान मनोरंजन करते. 'दुसरी बायको'मधून 'कधीतरी असंही घडू शकतं' असं वाटायला भाग पाडणारी आणि उत्कंठा वाढवणारी इरसाल कथा वाचायला चांगलीच मजा येते. तर 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी' ही शीर्षक कथा वाचताना, आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाढवत अगदी शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. त्याचप्रमाणे 'मला लागली कुणाची...' या दीर्घ कथेतील सविस्तरपणे केलेले खड्डेपुराण अतिशय मिश्किलपणे मांडण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. 

    या कथासंग्रहातील बहुतेक कथेच्या माध्यमातून मर्यादा राखून घेतलेले चिमटे आणि त्यातून निर्माण झालेले निखळ विनोद चांगलीच खसखस पिकवतात. कुठल्याही प्रकारच्या पांचटपणाला येथे थारा नाही. या कथासंग्रहातील प्रत्येक कथेसाठी पात्रांची केलेली निवड, त्यांची अफलातून नावे आणि टिपिकल प्रसंग त्या-त्या कथानकात जिवंतपणा आणतो!

    एकंदरीतच लेखक शेवाळकर सर यांना असलेली निखळ विनोदाची जाण आणि मिश्किलपणा प्रत्येक कथेतून पदोपदी जाणवतो! कुठल्याही प्रकारच्या बोजड आणि अलंकारिक शब्दांचा वापर न करता लेखकांनी त्यांच्या शैलीत कथेत पेरलेली सहज सोपी भाषा, प्रभावी संवादशैली हे या कथासंग्रहाचं खास वैशिष्ट्य आहे. यातील सगळ्याच कथांच्या माध्यमातून सामान्य वाचकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले असल्याचं जाणवतं. म्हणूनच 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी' हा विनोदी कथासंग्रह नक्कीच वाचनीय झाला आहे असं म्हणता येईल. दैनंदिन जीवनातील ताणतणाव घालवण्यासाठी आपल्या मराठी वाचकांनी तरी आवर्जून वाचावा असा हा विनोदी कथासंग्रह आहे... 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी'.

     लेखक शेवाळकर सर यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील देदीप्यमान साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो! धन्यवाद!


पुस्तकाचे नाव... 'बायकोची एकसष्टी,नवऱ्याची षष्ठी' 

                         (विनोदी कथासंग्रह )                       

लेखक...            नागेश शेवाळकर, पुणे ( भ्र. क्र. ९४२३१३९०७१)

प्रकाशक...         सुरेंद्र गोगटे, 'सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन', पुणे

किंमत...            ₹ २५० /-

एकूण पाने...       १६४ 

परिचयकर्ता...     विनोद श्रा.पंचभाई, पुणे (भ्र. क्र. ९९२३७९७७२५)