Saturday, January 14, 2023

आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व: सुदाम खरे

 आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व: सुदाम खरे


विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील सुदाम आनंदा खरे हे सुप्रसिद्ध कवी सर्वांना चिरपरिचित आहेत. त्यांंचा जन्म ५ जानेवारी १९४४ रोजी झाला. त्यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण तांदुळवाडी येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी बुलढाणा शहर गाठले आणि अनेक समस्यांना तोंड देत आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती बिकट असली तरी त्यांना शिक्षणाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. मग मॅट्रिक झाल्यावर सुदाम खरे यांनी त्यापुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येथे जाऊन मिलिंद विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. मुळातच हुशार असलेल्या सुदाम खरेंनी तेथे बीएससीची पदवी मिळवली. त्यानंतर ते बुलढाणा येथे परतले. मात्र स्वस्थ न बसता तेथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि बी. एड. ची पदवी प्राप्त केली. 


१९६९ मधील जुलै महिन्यात सुदाम खरें यांनी बुलढाणा येथील भारत विद्यालयात विज्ञान शिक्षक म्हणून नोकरीला सुरूवात केली. तेथे ते ७ मे १९७५ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे आणि चिकाटीने नोकरी केली. ८ मे १९७५ पासून २६ डिसेंबर १९८८ पर्यंत म्हणजे तब्बल तेवीस वर्षापेक्षा जास्त काळ ते विज्ञान शिक्षक म्हणून सेवेत होते. त्यानंतर त्यांनी विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदासाठी २७ डिसेंबर १९८८ रोजी कार्यभार स्वीकारला. ते या पदावर जानेवारी २००२ पर्यंत कार्यरत होते. या सगळ्या धावपळीच्या काळातही  खरेंनी त्यांचे छंद जोपासले. 


 कथा , कविता लेखन यात सुदाम खरे यांना आधीपासूनच आवड होती. अनेक दिवाळी अंकातून तसेच दैनिक वृत्तपत्रातून त्यांच्या कथा, कविता व वैचारिक लेख प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे कितीतरी काव्यवाचनाच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय  सहभाग असायचा. सुदाम खरे हे खरोखरच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळून भाषण, संवाद, संभाषण आणि सूत्रसंचालन या प्रांतातही प्रभावीपणे मुशाफिरी केली आहे. हिंदी, मराठी गाणे गायन यातही त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या साहित्याची दखल दैनिक देशोन्नती, लोकमत, लोकनायक, लोकशाही वार्ता, महानायक, महासागर, मातृभूमी, तरूण भारत, पुण्यनगरी, सकाळ, संध्यानंद, बहुजन महाराष्ट्र, विदर्भ मतदार, हिंदुस्थान, बहुजन समाचार अशा विविध वृत्तपत्रांनी वेळोवेळी घेतली आहे. त्यांनी शब्द साहित्य संमेलन, नागपूर (एप्रिल २०११), अस्मितादर्श साहित्य संमलेन, कळंब (जानेवारी २०१२), स्त्री शक्ती साहित्य संमेलन, यवतमाळ (सप्टेंबर २०१२), अस्मितादर्श साहित्य संमेलन, जळगांव (नोव्हेंबर २०१२), शब्दगंध साहित्य संमेलन, अहमदनगर (डिसेंबर २०१२) अशा विविध साहित्य संमेलनात आपला सहभाग नोंदवला आहे. 


सुदाम खरे हे कला अकादमी, बुलडाणा आणि अस्मितादर्श, औरंगाबाद या संस्थेचे आजीव सदस्य आहेत. तसेच त्यांच्या अफाट कार्याचा तपशील बघितला तर त्यांचा आवाका किती मोठा आहे याची कल्पना येते. ते गृहनिर्माण सोसायटीचे प्रवर्तक म्हणून काम करतात तसेच कर्मचारी संघटना, पतसंस्था , रजिस्टर्ड सामाजिक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. त्यांनी अनेक श्रमदान शिबीरे, जंगल सफर उपक्रम, सायकल सफर उपक्रम राबवले आहेत. वेळोवेळी क्रीडा स्पर्धांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. हे करत असतानाच त्यांनी अनेक सामाजिक प्रबोधन, परिवर्तन कार्यक्रमात सहभागही नोंदवला आहे. त्याचप्रमाणे बाल आरोग्य तपासणी शिबीर, युवक-युवती नेतृत्व प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन तसेच टेलरींग प्रशिक्षण वर्ग संचालन करण्यात देखील ते नेहमी आघाडीवर असतात. नर्सिंग असिस्टंट, प्रशिक्षण केंद्र संचालन, ग्रंथपाल प्रमाणपत्र प्रशिक्षण संचालन , थोरांची जयंती, पुण्यतिथी, महिला दिन साजरे करणे यासारख्या कार्यक्रमांचे सुध्दा खरे नियोजन करतात. 


सुदाम खरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांना नोव्हेंबर २०११ ला नागपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले समाजगौरव सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच नागपूर येथील छत्रपती शिवाजी समाजसेवक सन्मानही प्राप्त झाला आहे. युवा समूह वर्धा यांच्या वतीने काव्य स्पर्धा पुरस्कार ऑक्टोबर २०१२ मध्ये देण्यात आला. नागपूरच्या मदत संघटनेच्या वतीने उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काही त्यांना प्रदान करण्यात आला. सध्या ते बुलढाणा येथे आंबेडकरी साहित्य अकादमीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. 

 कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार करणे, गरजुंना यथाशक्ती आर्थिक मदत पुरवणे यात ते जातीने अग्रेसर असतात. 


सुदाम खरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. कुंदा खरे यांनी सुद्धा शिक्षिका म्हणून त्यांनी कारकिर्द फुलवली आहे. या खरे दांपत्याच्या संसारवेलीवर जागृती आणि क्रांती या दोन कर्तृत्ववान कन्या प्रकटल्या. सुदाम खरे यांच्या मुली जागृती अमोल जाधव आणि क्रांती कपील कंकाळ या दोघीही सध्या त्यांच्या संसारात व्यग्र आहेत. सुदाम खरे यांना उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धी लाभो हीच सदिच्छा! 

... विनोद श्रा. पंचभाई, लेखक पुणे

Monday, January 9, 2023

वाचनाचा छंद... निर्भेळ आनंद!

 सुप्रभात मित्रांनो!

आपणांस आजच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त

 भरभरून शुभेच्छा!😊 


वाचनाचा छंद... निर्भेळ आनंद!


असं म्हणतात...एखादं पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. मला वाटतं हे अगदी खरंय !

कारण लहानपणापासून आतापर्यंत माझ्या वाचनात बरीच पुस्तकं आली आहेत. मात्र थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे "अग्निपंख" हे पुस्तक जेव्हा मी वाचले त्यावेळी एक प्रकारची ऊर्जाच  मिळाली. जगण्याला जणू चालना मिळाली. आगळीवेगळी उर्मी, उत्साह अंगात संचारल्यासारखं वाटलं ! नैराश्य कुठल्या कुठे पळून गेलं !


"अग्निपंख " हे खरंतर डॉ. कलाम यांचं आत्मचरित्र आहे. हे पुस्तक वाचताना  त्यांनी अगदी बालपणापासून केलेला जीवनसंघर्ष,  शिक्षणासाठीची त्यांची प्रामाणिक धडपड आपल्याला एक नवी दिशा देते. एस. एल. व्ही.  या भारतीय बनावटीच्या पहिल्या प्रक्षेपणास्त्र  वाहकाच्या अत्यंत अवघड निर्मितीच्या वेळी  डॉ. कलाम यांना सुरुवातीला अपयश आलं. मात्र खचून न जाता त्यांनी त्या संबंधीच्या संशोधनात स्वतःला  झोकून दिलं. आणि आपल्या सहकाऱ्यांसह अतिशय परिश्रम घेऊन एस. एल. व्ही.ची निर्मिती केली. यावरून आपल्याला जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो हे नक्की !


महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक "मुंशी प्रेमचंद" यांचे 'गोदान' हे  त्यावेळेसचं लोकप्रिय पुस्तक वाचण्यात आलं. अतिशय गरीब परिस्थितीत रोजचा जगण्याचा जीवघेणा संघर्ष, दोन वेळच्या जेवणासाठी करावा लागणारा आटापिटा तर कधीकधी मजबूरीनं  उपाशी राहण्यासाठी केलेली मानसिकता हे प्रसंग वाचताना त्यावेळेस विद्यार्थीदशेत 'गोदान' मधून बरंच काही शिकायला मिळालं. कुठल्याही परिस्थितीशी दोन हात कसे करायचे याबाबत जणू मार्गदर्शन लाभले. नंतरही  'प्रेमचंद' यांच्या बऱ्याच कथा वाचण्यात आल्या. त्यातून सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत खंबीर कसं राहायला हवं याचे अमूल्य असे धडे मिळाले.


साने गुरुजी यांचं "श्यामची आई" म्हणजे अखिल विश्वातील आईसाठी आदर्श उदाहरणच! जे कोणी हे पुस्तक वाचतील  ते नक्कीच अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही. "एक होता कार्वर" हेही असेच खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा  "ग्रामगीता" ग्रंथ तर सर्वसामान्यांना संपूर्ण जीवनाचं सोप्या भाषेत तत्वज्ञान सांगते एवढं त्यात सामर्थ्य आहे. राष्ट्रसंतानी ग्रामगीतेतून अगदी छोट्या छोट्या ओव्यांमधून अतिशय प्रेरणादायी उपदेश देऊन कर्मयोगाला प्राधान्य दिले आहे. "ग्रामगीता नाही पारायणासि...वाचता वाट दावी जनासि!!" हे सांगताना राष्ट्रसंतानी निरर्थक कर्मकांड कुचकामी ठरविले आहे.


  "एक तरी अंगी असू दे कला!

नाही तर काय फुका जन्मला!!" असा इशारा देतानाच राष्ट्रसंतानी....

 "मुलात एखादा तरी असावा गुण!

 ज्यात पोट भरेल त्यात निपुण!

न ये संसारामाजी अडचण! कोणत्याही परि!!" आणि

"मुलगी बहु शिकली शाळेमाझारी!

परि स्वयंपाक करता न ये घरी !

काय करावी विद्या चातुरी? कामाविण लंगडी ती!!

अशाप्रकारे विद्यार्थी दशेपासून अनमोल संस्कार दिलेले आहेत. म्हणूनच 'ग्रामगीता' या दिव्य ग्रंथाचा माझ्यावर विशेष प्रभाव आहे.


मला वाचनाची आवड असल्यानं कुठल्याही व्यसनापासून दूर राहण्याचा जीवनात खूप मोठा फायदा झाला आहे. कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने माणूस जेव्हा नैराश्याच्या आहारी जातो, तेव्हा त्याला कुठलं तरी व्यसन सहज जडतं. मात्र तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर व्यसनापासून तुम्ही निश्चितच दूर राहू शकता हे मी स्वानुभवाने सांगतो. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडण्यास मदतच होते हे मुद्दाम आवर्जून सांगावेसे वाटते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे याविषयी एक खूपच मार्मिक वाक्य आहे... "वाचन हे आपल्याला एकांतात सांगोपांग विचार करण्याचा निखळ आनंद देते !"


                     ......  विनोद श्रा. पंचभाई

                             भ्र.क्र.९९२३७९७७२५