Thursday, December 3, 2020

विजेता... कथा

 पुण्यातील प्रसिद्ध "एकता" मासिकाचा दिवाळी अंक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला. त्यात माझ्या "विजेता" या कथेला स्थान मिळाले आहे. नक्की वाचा.... 🙏🙏😊


कथा ... विजेता


बऱ्याच दिवसांनी आज विलासची गाठ पडली. इतक्या मित्रांच्या घोळक्यात विलास वेगळाच 

भासला. भरपूर गप्पा झाल्या. आधी कुणाशी सहसा न बोलणारा विलास आज भरभरून बोलत होता. हास्य विनोद करत होता. त्याचा हा बदललेला स्वभाव सकारात्मकता दर्शवत होता. मग काही वेळानं पुढच्या आठवड्यात भेटण्याचं ठरवून सर्व मित्र एक एक करून आपल्या जागेवरून उठायला लागले. रमाकांत उठला तसा मीही उठलो. कारण रमाकांतसोबत त्याच्या गाडीवर आल्यानं मला उठणं भागच होते. विलास आणि इतर मित्रांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.


मला सहज आठवलं... दहावी - बारावीच्या वेळी विलास सोबतच होता. बारावीची परीक्षा संपली. तेव्हा आम्ही मित्र एकत्र जमलो. गप्पा टप्पा झाल्या. मग विषय निघाला ... बारावी नंतर पुढं काय? इतका वेळ गप्प असलेला विलास अचानक म्हणाला, 

"माझं ठरलंय आधीच, भारतीय सेनेत दाखल व्हायचं! "

"काय? काय बोलतोस विलास, अरे तुझ्या घरच्यांना माहिती तरी आहे का हे?" मी त्याला मध्येच विचारलं.

"हो तर! माझे काका भारतीय सेनेत हवालदार आहेत. शिवाय एक चुलतमामाही लान्सनायक आहेत." विलास ठामपणे म्हणाला.

"अरेवा! म्हणजे आपला दोस्त देशसेवा करणार तर! वा मित्रा छानच! तुझ्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. मात्र तिकडे गेल्यावर आम्हाला विसरू नकोस म्हणजे झालं." बोलता बोलता रमाकांत हसतच पुढं म्हणाला...

"आम्ही काय, चुकून बारावी पास झालोच तर वडिलांच्या दुकानात बसणार त्यांना मदत करायला."


आज पुण्यात मिनी मॅरेथाॅनचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही सर्व मित्र वेळेआधीच जमणार होतो. विलास सुध्दा येणार म्हणून रमाकांतचा रात्रीच फोनवर निरोप मिळाला होता. तेव्हापासून मला उत्सुकता होती... ती यंदा विलास नक्कीच बाजी मारणार याची! कारण तो भारतीय सेनेचा खंदा शिपाई होता. आम्हा सर्व मित्रांना त्याचा खूप अभिमान होता. लष्करात त्यानं पळण्याच्या शर्यतीत तसंच कितीतरी क्रीडाप्रकारातील स्पर्धांमध्ये अनेक बक्षीसं जिंकली होती. शाळेतही त्यानं खो-खो कबड्डीमध्ये नाव कमावलं होतं. त्यावेळी विलास सहसा जास्त बोलत नसे. मात्र त्याचा सहवास सगळ्यांनाच हवाहवासा वाटायचा.  चारचौघात उठून दिसणाऱ्या विलासची नवीन माणसावर छाप पडायची.


रमाकांतच्या स्कूटरवरून आम्ही वेळेआधीच बालगंधर्वजवळच्या छत्रपती संभाजी उद्यानासमोर पोहोचलो. त्यावेळी तिथं अभिजीत, विजय आणि त्यांचे काही मित्र ट्रॅकसूट घालून तयारीत असलेले दिसले. त्या सर्वांनी मिनी मॅरेथॉन स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. माझी नजर विलासला शोधत होती मात्र अजूनही तो न आल्यानं मी अचंबित होऊन रमाकांतला विचारलं,

"अरे यार, विलास येणार होता ना? तू रात्री बोलला होतास मला..." पुढचं बोलणं तसंच राहिलं. बाईकवरून उतरणाऱ्या विलासकडे माझं लक्ष गेलं. तो त्याच्या भावासोबत बाईकवरून आला होता. रमाकांतही तिकडेच बघत होता. विलास त्याच्या भावासोबत किंचित लंगडत आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. आम्ही आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिलो. जवळ आल्यावर तो स्मित करत म्हणाला,

"अरे असं काय बघताय तुम्ही... आणि रम्या तू पळणार नाहीस का स्पर्धेत? खरंतर तुलाच 'चिअर अप' करायला आलोय मी! "

"यार तू पण ना! तू येणार होतास म्हणूनच आम्ही आलो रे .... पण तुझ्या पायाला काय झालं?" रमाकांतनं विचारलं.  मलाही कुतूहल होतं जाणून घेण्याचं... पळण्याच्या स्पर्धेत विलास नाही म्हणजे काय! 

तेवढ्यात अभिजीत, विजय आणि त्याचे मित्र आमच्याजवळ आले आम्ही सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. विलास हस्तांदोलन करत विजयला हसत म्हणाला... 

"आपल्या क्लबचं नाव काढायचंय तुला. आपल्या ट्रिक्स लक्षात ठेव आणि बिनधास्त पळ. चल ऑल द बेस्ट!! "

"ओके मित्रा थँक्स! तू मात्र काळजी घे पायाची बरं का!" विलासच्या खांद्यावर हात ठेवत विजय म्हणाला आणि सगळ्यांना बाय करत तो मित्रांसह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाला. 


न राहवून रमाकांतनं परत एकदा विलासला विचारलं... "विल्या सांगणार नाहीस का तू आम्हाला? तो विजू पण जाताना तुला सांगून गेला पायाची काळजी घ्यायला. नेमकं काय झालं रे ?"

"अरे काही विशेष नाही. तू नकोस काळजी करू जास्त. मी एवढा धडधाकट उभा आहे तुझ्यासमोर! " बिनधास्तपणे विलास म्हणाला. तेवढ्यात इतका वेळ गप्प असलेला त्याचा भाऊ अचानक म्हणाला...

"दादाला गुडघ्यापासून नकली पाय बसवला आहे! "

"क..काय? " माझ्या तोंडून एवढाच शब्द बाहेर पडला. आम्हाला धक्काच बसला. आता विलास काय बोलतो याची उत्सुकता होती. रमाकांत अविश्वासानं कधी विलासच्या चेहऱ्याकडे तर कधी त्याच्या पायाकडे बघत होता. 


तिकडे मिनी मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली होती. बरेच स्पर्धक पळतपळत दूरवर निघून गेले होते. मग थोडा गंभीर होत विलासनं बोलायला सुरुवात केली...

"तुम्हाला माहितीच आहे काश्मीरच्या सीमेवर शत्रूसोबत सतत चकमकी झडत असतात. असंच चार महिन्यापूर्वी आमची गस्त चालू असताना सीमेच्या पलीकडून अचानक गोळीबार सुरू झाला! त्यामुळे आम्ही त्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. अनेक फैरी झडल्या. जवळपास दीड-दोन तास धुमश्चक्री सुरू होती. शत्रूला पिटाळून लावल्यानं मग सगळं शांत झालं होतं. मात्र तणावग्रस्त वातावरणात वाढ झाली होती. आमचा एक जवान शहीद झाला आणि आमच्या मेजरला खांद्यावर आणि माझ्या पायाला गोळी लागल्यानं आम्ही जखमी झालो झालो होतो! "


"ओह गॉड! म्हणजे अगदीच जीवावर बेतलं होतं तर..!" मध्येच रमाकांत बोलला. 

"हो ना ! सीमेवर असे प्रसंग नेहमीच घडत असतात. कुठून शत्रूची गोळी येईल आणि कधी कुणाचा वेध घेईल हे सांगता येत नाही. शेवटी 'जान है तो जहान है' हेच खरं! मग डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले माझा पाय वाचवण्याचे. पण जास्त रक्तस्त्राव झाल्यानं अन् गोळी रुतून बसल्यानं इन्फेक्शन होऊ नये म्हणून गुडघ्यापासून पाय कापून काढावा लागला. तरीही आताच्या अत्याधुनिक साधनांमुळेच, हा नकली पाय असूनही त्याचा मला सराव झालाय मित्रांनो! काळजी करण्यासारखं काहीच नाही. "

एखादी किरकोळ दुखापत व्हावी आणि ते हसण्यावारी न्यावं अशा अविर्भावात विलास बोलत होता. त्याच्या देहबोलीतून कमालीचा आत्मविश्वास झळकत होता. 

"यार विल्या, खरंच खूप अभिमान वाटतो तुझा! तुझ्यासारखे जीवावर उदार होणारे मातृभूमीचे रक्षक आज सीमेवर आहेत म्हणूनच आम्ही इकडे निश्चिंतपणे जगतो आहोत. अख्खा देश सुरक्षित आहे तो केवळ तुमच्यामुळेच! हॅट्स ऑफ मित्रा! "


मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील काही स्पर्धक दुरून येताना दिसत होते. आमचं लक्ष मुसंडी मारून झेप घेत असलेल्या विजय कडे गेलं. अचानक विलास दोन्ही हात वर करून मोठ्याने ओरडला...

"कीप इट अप विजू ... कीप इट अप!" 

आणि अपेक्षेप्रमाणे घामाघूम झालेल्या विजयने नियोजित आडव्या दोरीला स्पर्श करुन ती ओलांडली. नावाप्रमाणे विजयनं स्पर्धेत विजय मिळवला होता. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. विलास आपल्या पायाची पर्वा न करता उत्स्फूर्तपणे पुढे सरसावला आणि विजय जवळ पोहोचला. त्याला बघताच विजयनं जवळ जाऊन विलासला मिठी मारली. आम्ही सगळे त्यांच्याकडेच कौतुकानं बघत होतो. विजयनं स्पर्धेत बाजी मारली होती मात्र खऱ्या अर्थानं आज विलास विजयी झाला होता!


... विनोद श्रा. पंचभाई

तपोवन सोसायटी, वारजे, पुणे. 

भ्र. क्र. 9923797725

Wednesday, September 16, 2020

हजार धागे सुखाचे!

 हजार धागे सुखाचे


माणूस संवेदनशील अन् भावनाप्रधान असला की त्याचे विचारही भावस्पर्शी आणि मनाचा ठाव घेणारे असतात. लेखक किरण सोनार यांच्या बाबतीत असंच काहीसं त्यांच्या कथा वाचताना जाणवतं! त्यांचा 'हजार धागे सुखाचे' हा कथासंग्रह नुकताच पुण्यातील 'चपराक' प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आला. यात वेगवेगळ्या पठडीतील आणि 'हटके' म्हणता येतील अशा एकूण आठ कथांचा समावेश करण्यात आला आहे.


'पोरका बाप' ही पहिलीच कथा वाचताना ती  मनाला चटका लावून जाते आणि वाचक अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही! या कथेतील अण्णा आणि प्रवीणचे संवाद आपल्याला अस्वस्थ करतात. 'अनमोल श्वास' ही कथा वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चांगलीच यशस्वी ठरली आहे . या कथेतील दुकानमालक असलेला योगेश छोट्या स्वामीला कुत्र्याचं पिलू फुकट द्यायला का तयार होतो याची उत्सुकता वाचताना जाणवते. 'इरपाची लढाई' ही नक्षलवादाच्या दाहकतेवर बोट ठेवणारी कथाही आपल्या मनाचा ठाव घेते! यातील लालू मडावी आणि त्याचा मुलगा इरपा यांचं पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात जणू 'सँडविच' होतं. 'इकडे अाड तिकडे विहीर' अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवते. मात्र इरपाच्या पुढाकारानं गावकऱ्यांच्या श्रमदानातून शेततळं बांधण्याचं कार्य पूर्णत्वास जातं! या कथेच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागातील स्थानिक लोकांसाठी एक सकारात्मक आशावाद लेखकानं फुलवला आहे. 


सुख, समाधान, आनंद आणि याच्या विपरीत गोष्ट म्हणजे दु:ख! या चार गोष्टी भोवतीच आपलं अख्खं आयुष्य आपण जगत असतो. तसं पाहिलं तर सुख, आनंद आणि समाधान हे तिन्ही शब्द जवळपास सारखेच वाटतात मात्र तसं अजिबात नाही. एखाद्या गोष्टीमध्ये सुख वाटत असलं तरी त्यापासून समाधान प्राप्त होईलच असं नाही! किंवा एखादी आनंद देणारी घटना सुख देईलच असंही नसतं. सुख आणि आनंद हे क्षणिक असतं मात्र समाधानाचं तसं नसतं! काही काही गोष्टीपासून मिळणारं समाधान हे चिरकालही टिकू शकतं. नेमका अशाप्रकारचा सकारात्मक भाव 'हजार धागे सुखाचे' या कथेतून लेखकानं अतिशय परिणामकारक रीतीने मांडला आहे. तसंच या कथासंग्रहातील 'अनपेक्षित पाऊल वाट' मधून दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. 'नजरेतून शिक्षा', 'शाळेची खिचडी', 'स्कार्फवाली बाई' या कथाही वाचनीय ठरल्या आहेत. एकंदरीत 'हजार धागे सुखाचे' हा कथासंग्रह अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. 


 प्रभावी संवाद आणि उत्कंठा वाढवणारी लेखकाची भाषाशैली या कथासंग्रहाच्या निश्चितच जमेच्या बाजू आहेत.  'हजार धागे सुखाचे' साठी ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड यांची सुरेख प्रस्तावना लाभली आहे. तसंच प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांनी प्रभावी पाठराखण लिहिले आहे.  "माध्यमाच्या रूपाने होणारी निर्मिती बहुतेक वेळा अल्पकाळ टिकणारी असते तर साहित्य निर्मिती दीर्घकाळ टिकते. अर्थात साहित्य निर्मितीची ठिणगी पेटविण्याचे काम माध्यमेच करीत असतात हे तेवढेच सत्य आहे." असे विचार लेखकानं आपल्या मनोगतात मांडले आहेत. 


 'हजार धागे सुखाचे'

 'चपराक' प्रकाशन 

  पृष्ठे -- ८०

  किंमत -- ₹ १०१/-


Tuesday, September 1, 2020

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व - प्रणव मुखर्जी

 

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व - प्रणव मुखर्जी

स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमधील दिग्गज नेत्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मात्र पहिल्यांदाच हा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केन्द्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या रूपानं पश्चिम बंगाल या राज्याला मिळाला. त्यांनी २५ जुलै २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १४ जुलै २०१७ पर्यंत पाच वर्षे देशाचं हे सर्वोच्च असलेलं पद भूषविलं! 

प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील बीरभूम जिल्ह्यातील मिराती या खेडेगावात १९ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ते बालपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यामुळे त्यांचा वर्गात पहिला क्रमांक ठरलेलाच असायचा! त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण बीरभूम येथे झालं. त्यावेळी ते शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले होते. तेव्हा त्यांची बुद्धिमत्ता पाहून सामान्य स्थितीत असलेले  त्यांचे वडील कामदा किनकर मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जींना उच्च शिक्षण देण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी बीरभूमच्या 'सूरी विद्यासागर' महाविद्यालयात शिक्षण घेत राज्यशास्त्र आणि इतिहास या दोन विषयात प्रथम श्रेणीत एम.ए. च्या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर वडिलांच्या परवानगीने त्यांनी कलकत्ता शहर गाठले आणि स्वतःला कायद्याच्या अभ्यासात झोकून दिले. त्यासोबत तेथे त्यांनी नोकरी साठीही प्रयत्न सुरू ठेवले. 

एल.एल.बी. ही कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर प्रणव मुखर्जी यांना १९६३ साली २४ परगणा जिल्ह्यातील 'विद्यानगर' महाविद्यालयातून नोकरीसाठी बोलावणं आलं. त्याप्रमाणे तेथील प्राचार्यांना भेटून त्यांनी राज्यशास्त्र हा विषय शिकवण्याचा निर्णय घेतला. राज्यशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने प्रणव मुखर्जी काही दिवसातच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक लोकप्रिय प्राध्यापक म्हणून गणले जाऊ लागले. नोकरी करत असतानाच इतर क्षेत्रातही सक्रिय राहायला हवं हा विचार करून एक दिवस त्यांनी 'देशेर डाक' चं कार्यालय गाठलं. 'देशेर डाक' त्यावेळी आघाडीचं वृत्तपत्र होतं. तेथील संपादकांनी चर्चेच्या वेळी प्रणव मुखर्जी यांची बुद्धिमत्ता हेरून त्यांना पत्रकारिता करण्यास प्रोत्साहित केलं. मुखर्जींचं लेखन, वाचन अफाट असल्याने त्यांनी लगेच सहमती दर्शवली. मग प्राध्यापकी पेशासोबतच त्यांनी पत्रकारिताही सुरू झाली.

वडील कामदा किनकर मुखर्जी हे देशाचे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी देश पारतंत्र्यात असताना दहा वर्षांहून अधिक काळ तुरूंगवास भोगला होता! १९२० पासून त्यांनी इंग्रजी सत्तेविरूद्ध सर्व प्रकारच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास सुरूवात केली होती. तसेच कामदा मुखर्जी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सक्रिय सदस्य होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या विधान परिषदेचे अध्यक्ष पदही भूषवले. वडिलांच्या या राष्ट्रीय चळवळीतील योगदानाने प्रेरित झालेल्या प्रणव मुखर्जींनी १९६९ मध्ये राज्यसभेसाठी आपले नामांकन दाखल केले. अन् ते निवडून ही आले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतः ला झोकून दिले. त्यावेळी असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली राजकीय कारकीर्द फुलवली. १९७३-७४ मध्ये इंदिरा गांधीनी त्यांच्यावर अर्थखात्याच्या राज्य मंत्रीपदाचा कार्यभार सोपवला. त्यावेळी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि नाबार्ड यांची स्थापना करण्याच्या निर्णयात प्रणव मुखर्जी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती!

१९८२ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी यांना केन्द्रीय अर्थमंत्री म्हणून अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील पद देण्यात आलं. ती जबाबदारी संयमाने सांभाळत त्यांनी त्यावेळी अर्थतज्ज्ञ म्हणून जागतिक कीर्ती संपादन केलेले डाॅ. मनमोहनसिंग यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक केली. प्रणव मुखर्जी तब्बल पाच वेळा राज्यसभेवर निवडून आले होते. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना ते राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात निवडून आले होते. त्यावेळी म्हणजे १९९५-९६ मध्ये त्यांना परराष्ट्रमंत्रीपद बहाल करण्यात आले. १९९५ मधील न्यूझीलंडच्या आँकलंड शहरी राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या परिषदेत त्यांनी हजेरी लावली होती. तेथे त्यांनी भारताची भूमिका प्रभावी पणे मांडून उपस्थितांवर आपली छाप उमटवली होती.तसेच देशविदेशात शासकिय दौरे करून आपल्या देशाचं परराष्ट्रीय धोरण तेथील कार्यक्रमात मांडून आपली भूमिका स्पष्ट केली.

१९९७ साली प्रणव मुखर्जी यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर पंतप्रधान  डाॅ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र २००६ मध्ये त्यांना पुन्हा परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं. त्याकाळी त्यांनी अनेक देशंाचे दौरे केले. त्यांच्यात असलेल्या विद्वतेनं आणि सडेतोड वक्तृत्व शैलीनं उपस्थित श्श्रोत्यांवर चांगलीच छाप पडायची. २००८ साली त्यांनी अमेरिकेचा दौरा केला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश यांच्या सोबतची भेट विशेष गाजली. त्यावेळी आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण आणि परखड विचार प्रभावीपणे मांडून उपस्थितांसमोर ठसा उमटवला. त्यानंतर २००९ साली लोकसभेच्या निवडणूकीनंतर डाॅ. मनमोहन सिंग पंतप्रधान यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जींना परत एकदा अर्थमंत्रीपद बहाल करण्यात आले. ते निष्णात कायदेतज्ज्ञ होतेच. शिवाय राज्यशास्त्र आणि अर्थ शास्त्राचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. २००८ साली त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा बहुप्रतिष्ठित असा 'पद्मविभूषण' या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं! तसेच २०१० साली त्यांना 'आशियातील एक उत्तम अर्थमंत्री' म्हणूनही सन्मानित करण्यात आलं. १९८२ ते २०१२ या तीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून अनेक अंदाज पत्रकं सादर केली. 

संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव तसेच प्रशासनाचा, मंत्रीपदाचा, पक्ष संघटनेचा, उत्तम वक्तृत्वाचा दांडगा अनुभव प्रणव मुखर्जी यांच्या पाठिशी होता. त्याचप्रमाणे लोकसभा आणि राज्य सभेतील नेतृत्वाचा त्यांना प्रचंड अनुभव असल्याने त्यांना सर्वानुमते काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा! ६९% मते मिळवून प्रणव मुखर्जींनी त्यावेळी विजयश्री खेचून आणली आणि तेरावे राष्ट्रपती म्हणून देशाच्या सर्वोच्चपदी
 ते विराजमान झाले! प्रभावी वक्ते आणि विद्वत्तेनं परिपूर्ण असलेल्याने त्यांचे बौद्धिक आणि राजकीय कसब वाखाणण्यासारखं होतं. मात्र त्यांच्याच कारकीर्दीत २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांच्या काँग्रेस पक्षाचं सपशेल पानिपत झाल्याचं त्यांना  आपल्या डोळ्यांनी बघावं लागलं! त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर, काँग्रेसेतर भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावरही कुठल्याही प्रकारचा वाद किंवा मतभेद न करता प्रणव मुखर्जी यांनी आपली राष्ट्रपती पदाची पाच वर्षाची कारकीर्द निर्विविघ्नपणे पार पाडली! 

प्रगाढ वाचक असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. न्यूयाॅर्कमधून प्रकाशित होणाऱ्या 'यूरो मनी' या नियतकालिकातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार १९८४ साली प्रणव मुखर्जी यांना जगातील सर्वोत्तम पाच अर्थमंत्र्यांच्या नामावलीत स्थान देण्यात आले होते. राष्ट्रपती पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतरही ते समाजकार्यासाठी सक्रिय होते. नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून त्यांना विशेष अतिथी म्हणून हजर राहण्यासाठी निमंत्रण आलं. त्यावेळी निमंत्रण स्वीकारु नये म्हणून त्यांच्या पक्षाच्या आणि समविचारी पक्षाच्या कित्येक नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र  
प्रणव मुखर्जी यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचा परिचय देत सर्वांचा विरोध झुगारून रा. स्व. संघाचे निमंत्रण स्वीकारले आणि तेथील कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली राष्ट्रीय ऐक्याची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली. 

अतिशय शांत, संयमी स्वभावाचे प्रणव मुखर्जी यांना बागकाम करण्याची तसेच शास्त्रीय अन् सुगम संगीत ऐकण्याचीही आवड होती. अभिरूचीसंपन्न असलेले प्रणव मुखर्जी कला आणि संस्कृतीचे भोक्ते होते. त्यांना विद्यार्थी जीवनापासून लिखाणाची आणि वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांच्या कडे भारतातील तसेच जगातील गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकांचा संचय उपलब्ध होता. 

असे हे अत्यंत सभ्य आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व दिनांक ३१ आँगस्ट २०२० रोजी या नश्वर जगाचा निरोप घेत काळाच्या पडद्याआड झाले! त्यांना 'चपराक परिवारातर्फे विनम्र आदरांजली!!

विनोद श्रा. पंचभाई
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

Saturday, August 29, 2020

यांच्याकडे कोणी लक्ष देणार का??

 यांच्याकडे कोणी लक्ष देणार का??


"आजकल सब खामोश है कोई आवाज नही करता,
 शायद सच बोलकर कोई किसीको नाराज नही करता! "
 आज उद् भवलेली परिस्थिती याहून वेगळी नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कारण हातावर पोट असणाऱ्यांवर आज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहण्याची भयंकर वेळ येऊन ठेपली आहे! आज काम मिळण्याची मारामार असल्यानं, जे काय मिळालं ते काम मुकाटपणे करायचं आणि येणारा दिवस कसातरी ढकलायचा... जेवढी मजुरी मिळते ती काही न बोलता घ्यायची अन् निघायचं हेच आज मजुरांच्या नशिबी आलं आहे! कामाच्या ठिकाणी त्यांनी मिळणाऱ्या मजुरीवरून साधा 'ब्र' जरी काढला तरी मुकादमाचं वाक्य ठरलेलंच असते, "तुम्हारे जैसे हमको छप्पन मिलते है, काम नही करना है तो जा सकते हो!" 
एकंदरीतच पोटासाठी, आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी सगळं सहन करण्याचं त्यांच्या नशिबी आलं आहे. आज ही परिस्थिती यांच्यावर का आली?

  मार्च महिन्यात संपूर्ण देशभर लाॅकडाऊन सुरू झाल्यानं लहानमोठे हाॅटेल्स, मोठाले माॅल, विविध क्षेत्रातील कंपन्या, अनेक प्रकारच्या फॅक्टरीज् अचानक बंद पडल्या! त्यामुळे  या सर्वांशी संबंधित असणारे असंख्य मजूर एका झटक्यात बेरोजगार झालेत. काही कंपन्यांनी त्यांना एक दोन महिन्याचा पगार दिलाही असेल मात्र मोठ्या प्रमाणावर असलेले बांधकाम क्षेत्रातील मजूर, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकांवर फिरून गरजेच्या वस्तू विकणारे, शाळा - महाविद्यालयांबाहेर बसून किरकोळ चीजवस्तू विकणारे, मंदिराबाहेर हार, फुलं तसंच पूजेच्या वस्तूंची विक्री करणारे असे सगळेच हवालदिल झाले आहेत! असं काहीतरी अचानक घडेल याची कोणीही कल्पना केली नसणार. कोरोनाच्या या अनोख्या संकटामुळे कित्येक जण 'डिप्रेशन'मध्येही गेल्याची अनेक उदाहरणं आहेत! 

अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांना हातपाय गाळून बसण्यापेक्षा काहीतरी करण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. त्यामुळे मिळेल ते काम करायला त्यांचा आटापिटा सुरू झाला! त्याचा परिणाम असा झाला... आज अनेक शहरातील मजूर अड्डयावर कधी कुणी पाहिली नसेल एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमू लागली आहे. त्यावेळी 'सोशल डिस्टन्स' बाबतचे नियम पाळणं त्यांच्या ध्यानीमनीही नसतं. त्याबद्दल मजूर अड्ड्यावर जमलेल्या मजुरांना हटकले असता त्यांच्या तोंडी 'कोरोना गेला खड्ड्यात' हीच भावना व्यक्त होताना दिसून येते. पोटाची भूक त्यांना स्वस्थ बसू देत नाही! कारण त्यांच्यावर त्यांचं अख्खं कुटुंब अवलंबून असतं. स्वतः मात्र अर्धपोटी राहून आपल्या कुटुंबासाठी, त्यांची पोटं भरण्यासाठी त्यांची सतत तारेवरची कसरत सुरू असते. त्याकरिता कसंही करून मजुरी मिळावी म्हणून हे मजूर भल्या सकाळीच मजूरअड्डा गाठताना दिसतात. त्यात मग बंद पडलेल्या हाॅटेलमध्ये कधीकाळी काम करणारी तरणीताठी पोरं,  विविध क्षेत्रातील कामावरून काढून टाकण्यात आलेले दुर्दैवी मजूर, जीवनोपयोगी  किरकोळ वस्तू रोज विकून आपला चरितार्थ चालवणारे असे असंख्य नवशिके मजूर या मजूरअड्ड्यावर गर्दी करताना दिसतात. रोज सगळ्यांनाच काम मिळतं असं मात्र होत नाही. तिथंही जीवघेणी स्पर्धा असतेच असते! त्यावेळी नेमका याच गोष्टींचा फायदा तिथले बेरकी मुकादम घेताना दिसतात. कमी मोबदला देऊनही त्यांना मजूर सहज उपलब्ध होत असल्यानं या मुकादमांची तिथं मनमानी सुरू असते. त्यांच्यावर कुणाचाच अंकुश नसतो. त्यामुळे कमजोर लोकांना आपल्या दबावाखाली ठेवण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा दुर्दैवानं आजही आपल्या समाजात बघायला मिळत आहे!

अचानक उद् भवलेल्या या कोरोना संकटामुळे अनेक शहरांसोबतच ग्रामीण भागातही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारी, कोरोनाची टांगती तलवार असतानाच शाळा - महाविद्यालये बंद असल्यानं विद्यार्थ्यांना सध्या आॅन लाईन शिक्षण देणं सुरू आहे. त्यामुळेच जवळपास प्रत्येक पालकाजवळ अँड्राॅईड मोबाईल असणं आवश्यक झालं आहे. मात्र आर्थिक दृष्टीनं निम्न स्तरांवरील सामान्य पालकांजवळ तसंच ग्रामीण भागातील बऱ्याच जणांकडे अशाप्रकारचा अँड्राॅईड मोबाईल उपलब्ध नसतो! आधीच घरात खायची मारामार मग तिथं आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी अशाप्रकारच्या मोबाईलची सुविधा उपलब्ध करून देणं शक्य तरी कसं होणार?   ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्यानं त्यांच्या मुलांचा बराचसा वेळ शेतातच जात असतो. त्यातून कसातरी वेळ काढून शाळेत हजेरी लावण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते! मात्र आताच्या आँनलाईन शिक्षणामुळे त्यांच्यासमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी विशिष्ट वेळ काढून शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित करणं त्यांना शक्य होत नाही. त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागातील खेडेगावातील विद्यार्थी  शिक्षणाच्या ओढीमुळे कित्येक किलोमीटर पायपीट करत मोठ्या गावातील किंवा तालुक्याच्या शाळांमध्ये हजेरी लावताना दिसायचे. मात्र आता या कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा , महाविद्यालये ओस पडली आहेत. त्यामुळे अशा अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य सुद्धा अंधकारमय झालं आहे! समजा या भागातील विद्यार्थ्यांना अँड्राॅईड मोबाईल कोणी देऊ केला तरी इंटरनेटची सुविधा मिळेलच याची खात्री नसते. अशावेळी त्यांच्या या गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी पाच वर्षातून एकदा प्रामाणिकपणे हजेरी लावणारे पुढारी मदतीला धावून जाणार का? हा मोठा यक्षप्रश्न आहे.

महामारीच्या अभूतपूर्व संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व चित्रपटगृह, नाट्यगृह, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणारे सभागृह, मंगल कार्यालयं अजूनही बंद आहेत. त्यावर सर्वस्वी अवलंबून असणारे अनेक पडद्यामागचे कलाकार, गेटकिपर, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी, किरकोळ खाद्यपदार्थ विकणारे असे कितीतरी आजही बेरोजगार आहेत. तसंच गावागावात जाऊन लोकनाट्य, तमाशा सादर करून गुजराण करणारे, रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ करणारे किंवा पोतराज यांचं भवितव्यही दावणीला लागलं आहे! त्यांच्यावर आज कशाप्रकारचा प्रसंग ओढवला असणार याची कल्पना न केलेलीच बरी! त्यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आजकाल आपली बहुतेक प्रसारमाध्यमं 'हाय प्रोफाईल' नेते, अभिनेते यांच्याकडेच जास्त लक्ष देण्यात मश्गूल असतात. त्यात त्यांचंही काही चुकत नाही म्हणा... त्यांना महत्त्वाच्या 'ब्रेकिंग न्यूज' गोळा करण्यासाठी किती श्रम पडत असणार ना! मग उपरोक्त नमूद केलेल्या वंचित, पीडित लोकांकडे त्यांचंच काय कुणाचंही कसं काय लक्ष जाणार? आज आपण बघतो, नेहमी रस्त्याच्या कडेला पाणीपुरी, भेळपुरी इत्यादी विकणारे तसंच पानटपरी चालवणारे आज पदपथावर किरकोळ भाजीपाला किंवा  मक्याची कणसं विकताना आढळतात. त्यांनाही शेवटी पोटासाठी काहीतरी करावंच लागणार ना! मात्र पदपथावर दुकान लावणं हे नियमबाह्य असल्यानं त्यांचं साहित्य उचलून नेण्यासाठी महानगरपालिकेची गाडी कधी येईल याचा काही नेम नसतो. अशा तणावाच्या परिस्थितीत जीव मुठीत धरून चार पैसे कमावण्यासाठी ते रोजच आटापिटा करताना दिसतात. शेवटी पोटाची भूक कोणालाच स्वस्थ बसू देत नाही हेच खरं!
"भूख है मजहब इस दुनिया का और हकीकत कोई नही!
बचके निकल जा इस बस्तीसे करता मोहब्बत कोई नही!!"

विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे 
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

Tuesday, August 18, 2020

जागतिक लेफ्ट हँन्डर्स डे!

 आज १३ आॅगस्ट !

जागतिक लेफ्ट हँन्डर्स डे!

त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख जरूर वाचा 

आणि आपल्या बहुमोल प्रतिक्रिया द्या! 😊 


डावखुऱ्यांच्या वेदना कुणाला कळणार का?


प्रसंग पहिला ...

         मोठ्या उत्साहानं सहलीला निघालेली बस नियोजित ठिकाण आल्यावर एका झाडाखाली थांबली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बसमधून उतरले. आता सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती! त्यामुळे शिक्षकांच्या सूचनेनुसार सर्व विद्यार्थी गोलाकार बसले. मग त्यांनी आपापले डबे उघडले. शिक्षकही त्यांच्या सोबतच बसले. सर्वांनी जेवायला सुरूवात केली. अचानक शिक्षकांचं लक्ष अविकडे गेलं अन् ते त्याच्यावर ओरडलेच, "अरे अवि तू डाव्या हाताने का जेवतोस? असा कसा रे तू? तुझ्या आईबाबांनी घरी काही शिकवलं नाही का?"

इतर विद्यार्थी त्याच्याकडे उपहासानं बघत होते. बिचारा अवि काही न बोलता खाली मान घालून बसला होता! मान वर करून शिक्षकांकडे बघण्याचं धैर्य त्याच्यात नव्हतं!


प्रसंग दुसरा ...

          मंदिरातील आरती नुकतीच संपली होती. मंत्रपुष्पांजली झाल्यावर पूजाऱ्यांनी प्रसाद वाटप करण्यास सुरूवात केली. भाविक मंडळी दर्शन घेण्यासाठी रांगेत उभी होती. काही वेळातच प्रसाद वाटप करत पुजारी विक्कीपर्यंत येऊन पोहचले. विक्कीनं आपला डावा हात पुढं केला. तोच पुजारी त्याच्यावर खेकसले, "अरे प्रसाद उजव्या हातात घ्यायचा असतो, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? आईबाबांनी काही संस्कार केले की नाही का तुझ्यावर?"

विक्की जन्मतःच डावखुरा असल्यामुळे त्यानं प्रसाद घेण्यासाठी नैसर्गिकरित्या आपला डावा हात पुढं केला यात त्याचा काय दोष? 

           आपल्याकडे डाव्या हातानं काम करणाऱ्या मुलांना पालक नेहमीच टोकताना दिसतात. शाळेतही अशा मुलांना शिक्षकांची बोलणी खावी लागते. इतर विद्यार्थी मित्रांचे टोमणे सुद्धा त्यांना सहन करावे लागतात! आपल्या समाजात काही ठिकाणी अजूनही डाव्या हातानं काम करणं हे अशुभ मानलं जातं! तसंच बऱ्याच वेळा डावखुऱ्या विद्यार्थ्यांना पालकांच्या किंवा शिक्षकांच्या दबावामुळे नाईलाजानं उजव्या हातानं काम करावं लागतं. पूर्वीच्या काळी डावखुऱ्या लोकांना ते सामान्य नाहीत म्हणून हिणवलं जायचं, कमी लेखलं जायचं. दुर्दैवानं याची सुरूवात शाळेपासूनच व्हायची! 

            लहान असताना जेव्हा आपण हातात खडू घेऊन पाटीवर रेषा ओढायला सुरूवात करतो तेव्हाच स्पष्ट होतं, आपण डावखुरे होणार की उजवे होणार! आपला कुठलातरी एक हात जास्त प्रभावीपणे काम करतो हेही लक्षात येतं. डावखुरं असणे किंवा उजवं असणे हे आपल्या जनुकांशी संबंधित आहे पण नेमक्या कुठल्या जनुकांवर ते अवलंबून आहे हे मात्र अद्यापही समजलेलं नाही. डावखुरं असण्याचा मेंदूशी काय संबंध आहे यावर संशोधन सुरू आहे आणि त्याबाबत बरेच वादही सुरू असल्याचं आपल्या वाचनात येतं. मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू नियंत्रित करतो तर डावा भाग आपल्या शरीराची उजवी बाजू नियंत्रित करतो. म्हणजेच डावखुरं असणं म्हणजे मेंदूच्या रचनेवर मोठा परिणाम करणारं असतं! युनिव्हर्सिटी काॅलेज आॅफ लंडन येथील मानसशास्त्रज्ञ ख्रिस मॅकमॅनस यांनी 'राईट हँन्ड, लेफ्ट हँन्ड' हे पुस्तक लिहलं आहे. त्यात ते म्हणतात... "ज्या पद्धतीने डावखुऱ्या व्यक्तीच्या मेंदूची मांडणी असते, ती फारच वैविध्यपूर्ण असते. माझं वैयक्तिक मत असं आहे की, डावखुरे लोक जास्त बुध्दिमान असतात आणि त्यांच्यात उणिवांना तोंड देण्याचं सामर्थ्य जास्त असते. जर तुम्ही डावखुरे असाल तर तुमच्या मेंदूच्या रचनेत किंचित बदल असल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे इतरांकडे नसणारी कौशल्यं तुमच्याकडे असतात!"    

               डावखुऱ्या लोकांना समाजात वावरताना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं! डावखुरा माणूस डावीकडून उजवीकडे कागदावर शाईच्या पेनानं लिहिताना त्याच्या बोटांना शाई तर लागतेच शिवाय लिहिलेलं पुसलं जाण्याचीही शक्यता असते. तसंच 'शेक हँन्ड' करताना डावखुऱ्या माणसाचा डावा हातच नैसर्गिकरित्या पुढं जातो. त्यावेळी उजव्या माणसानं त्याचा उजवा हात पुढं केलेला असतो. महत्त्वाचं म्हणजे पोलीस किंवा सैन्यदलात कार्य करणाऱ्यांना डाव्या  हातानं सॅल्यूट करता येत नाही, तो नियमानुसार उजव्या हातानंच करावा लागतो! त्यासाठी डावखुऱ्यांना मात्र उजव्या हातानंच सारखा सराव करावा लागतो. शेवटी नोकरी करायची म्हटल्यावर असा सराव करणं हेही ओघानं आलंच! दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, आपल्या नेहमीच्या वापरातील बऱ्याचशा वस्तू उजव्या हाताचा विचार करूनच तयार केलेल्या असतात. जसे-- कॅमेऱ्याचं क्लिक बटन, काॅम्प्युटरचा माऊस, शिलाई मशीन, बाईकची किक, दरवाज्याचं हँन्डल, गिटारच्या तारा या आणि अशाप्रकारच्या कितीतरी गोष्टी फक्त उजव्यांच्या सोयीनुसार निर्माण केलेल्या असतात. त्यामुळे डावखुऱ्यांना वेळोवेळी गैरसोयीचा सामना करावा लागतो!

              डावखुऱ्या लोकांबाबत पूर्वीपासून चालत आलेल्या काही अंधश्रध्दा पण आहेत. एस्किमो लोकांमध्ये असा समज आहे की डावखुरा माणूस हा मंत्र,तंत्र जाणणारा किंवा जादू करणारा असतो. पूर्वीच्या काळी जपानी माणसाला लग्नानंतर जर त्याची बायको डावखुरी आहे असं समजलं तर तो तिला चक्क घटस्फोट द्यायचा. त्याकाळात 'डावखुरा माणूस नरकात जातो' अशीही समजूत प्रचलित होती! आपल्याकडे अजूनही डाव्या हातानं ठराविक कामं करणं अशुभ मानलं जातं. डाव्या हातानं पैसे देणं किंवा घेणं, डाव्या हातानं प्रसाद घेणं किंवा वाटप करणं निषिद्ध मानलं जातं! अजूनही काही लोक आपलं मूल डावखुरं आहे हे लक्षात येताच त्याच्या डाव्या हाताला चटके देणं किंवा त्याचा डावा हात बांधून ठेवणं असे प्रकार करताना दिसतात. असले अजब प्रकार करणं चुकीचं तर आहेच शिवाय त्या मुलावर अन्याय करण्यासारखं आहे. कारण अशा वागणूकीमुळे डावखुऱ्या मुलांची नैसर्गिक वाढ खुंटू शकते पर्यायानं त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोठा अडथळा येऊ शकतो!

            याउलट आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात डावखुरी माणसं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि सरस काम करू शकतात. त्यामुळे ते भविष्यात टिकाव धरू शकतील असे मत तज्ज्ञांकडून वर्तवले जात आहे. एका जागतिक सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, डावखुरे लोक बुध्दिमान, संवेदनशील अन् सर्जनशील असतात! त्यामुळे हल्लीच्या अर्थव्यवस्थेनुसार उत्पादकांनी मनावर घेतलं तर डावखुऱ्या लोकांना उपयुक्त वस्तूंची मोठी बाजारपेठ ते उपलब्ध करून देऊ शकतात. कारण आजघडीला संपूर्ण जगात सुमारे बारा टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे डावखुरे आहेत. एकट्या ब्रिटनमध्ये जवळपास सत्तर लाख लोक डावखुरे आहेत. तेथे त्यांच्या सोयीसाठी बऱ्याच उपयोगी वस्तू बाजारात उपलब्ध होत आहेत. लंडनमध्ये खास डावखुऱ्या लोकांसाठी 'एनीथिंग लेफ्ट हँन्डेड' नावाचं दुकान कार्यरत आहे. तेथे काम करणारे कर्मचारी सुद्धा डावखुरेच आहेत. त्यामुळे त्यांना येणाऱ्या ग्राहकांशी आपुलकीनं संवाद साधता येतो. कात्रीपासून ते काॅम्प्युटर पर्यंत सर्व उपयुक्त वस्तू डावखुऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. अशाप्रकारची दुकानं जगात सर्वत्र उघडणे अपेक्षित आहे!

          उपलब्ध आकडेवारीवरून संपूर्ण जगात साधारणपणे जवळजवळ दहा ते बारा टक्के लोक हे डावखुरे आहेत. पुरूषांमध्ये हे प्रमाण बारा टक्क्यांपेक्षा जास्त असून स्त्रियांमध्ये ते नऊ ते दहा टक्के इतके आहे. उजव्यांचं प्रमाण अधिक असलेल्या या दुनियेत डावखुऱ्या लोकांनी स्वत:चा एक क्लब

 स्थापन केला आहे. संपूर्ण जगात त्याच्या शाखा अस्तित्वात आहेत. १३ आँगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात 'लेफ्ट हँन्डर्स डे' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १३ आँगस्ट १९७६ रोजी अमेरिकतील कँपबेल कंपनीच्या वतीने साजरा करण्यात आला. नंतर १९९० साली इंग्लंडमध्ये 'लेफ्ट हँन्डर्स क्लब'ची स्थापना झाली. तर भारतात औरंगाबाद येथील संदीप विश्नोई यांनी 'इंडियन लेफ्ट हँन्डर्स क्लब'ची स्थापना केली. उजव्या हातानं काम करणं कधीही सोयीचं असतं असा समज आपल्या समाजात अगदी पूर्वापार चालत आलेला आहे. हाच समज दूर करण्यासाठी आणि समाजातील डावखुऱ्या लोकांबाबत जागरूकता आणण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो. खरंतर डावखुरे असल्याचे फायदे किंवा तोटे याबाबत जाणीव व्हावी हीच या दिवसामागची भूमिका असते. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या बारा टक्के लोक डावखुरे असल्याने ते डाव्या हातानंच आपली कामे करत असतात. तसंच काही डावखुरे त्यांच्या उजव्या हातानं सुद्धा तेवढ्याच क्षमतेनं काम करू शकतात. हेच डावखुरे लोक आपल्या कुशलतेमुळे आणि काही विशिष्ट गुणांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात हेही वेळोवेळी सिद्ध झालं आहे. अगदी प्राचीन इतिहासापासून त्याची अनेक उदाहरणं देता येतील. अख्खं जग जिंकायला निघालेला सिकंदर उर्फ अलेक्झांडर तसंच फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट हे डावखुरे होते. त्याचप्रमाणे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन अन् ज्यानं जगभरातील रसिकांना आपल्या अफलातून अभिनयानं हसवता हसवता रडवलं असा श्रेष्ठ विनोद सम्राट म्हणून गणलेला अभिनेता चार्ली चॅप्लिन हेही डावखुरे असल्याची नोंद आहे. खेळांची मैदानं गाजवलेले गॅरी सोबर्स, अँलन बाॅर्डर, ब्रायन लारा तसंच आपल्याकडील सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराज सिंग इत्यादी डावखुऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात इतिहास रचलेला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामा त्याचप्रमाणे आपल्याकडील  महात्मा गांधी, रतन टाटा, अमिताभ बच्चन या सर्व डावखुऱ्यांचं महान कार्य आपण जाणतोच! अतिशय महत्त्वाचं म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा डावखुरेच आहेत. हे सर्व डावखुरे त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे उजव्यांपेक्षाही बऱ्याच अंशी निश्चितच उजवे आहेत असंच म्हणावं लागेल.

         त्यामुळे १३ आँगस्टला कोणी डावखुरा माणूस भेटला तर त्याच्याशी डाव्या हातानंच 'शेक हँन्ड' करून 'लेफ्ट हँन्डर्स डे'च्या निमित्तानं त्याचं अभिनंदन करायला उजव्यांनी विसरू नये हीच रास्त अपेक्षा! !


                     आपलाच एक डावखुरा मित्र ...

                    विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे.

तुम्हाला नकार देणे जमते का?

 तुम्हाला नकार देणे जमते का?


"माझं थोडं ऐकता का श्यामराव? मला थोडे पैसे पाहिजे होते. आपल्या कंपनीच्या फंडातून मिळाले की लगेच परत करणार तुम्हाला! बघा नाही म्हणू नका, एक महत्त्वाचं काम निघालं वेळेवर म्हणून गरज भासली पैशांची!"

"तुमचं सगळं बरोबर आहे विलासराव पण काय आहे, आता या एक तारखेलाच मुलीच्या शिकवणीचे पैसे भरले मी. नाहीतर नक्की दिले असते. प्लीज समजून घ्या हं!"

  अशाप्रकारचे संवाद दैनंदिन जीवनात आपल्या कानावर नेहमी पडत असतात. वेळप्रसंगी पैशाची गरज प्रत्येकालाच भासत असते हे वास्तव आहे! तरीही काही लोकांना मात्र कुठल्या ना कुठल्या कारणासाठी सतत पैसे मागण्याची जणू सवयच जडलेली असते. अशावेळी त्याची शहानिशा न करता आपण बिनधोकपणे पैशाची मदत केली तर ते परत मिळवणे सगळ्यांनाच जमते असं नाही! उदाहरणार्थ आपण एखाद्या गरजवंत मित्राला मदत म्हणून लगेच पैसे काढून दिले आणि त्यानं संध्याकाळी बीयरबारमध्ये जाऊन उडवले तर त्या मदतीला काय अर्थ? तेव्हा अशाप्रकारच्या महाभागांना नकार देणं जमलं पाहिजे!


          आपल्या शेजारचे किंवा परिचितांपैकी कोणी दवाखान्यात रूग्णशय्येवर असल्याचं कळलं अन् त्याला त्यावेळी रक्ताची गरज आहे तर अशावेळी मात्र आडेवेढे न घेता, वेळ न दवडता आपण स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करायलाच हवी! तसंच शेजारी राहणारे काही कामानिमित्त परगावी गेले असतील आणि नेमकं त्याचवेळी अचानक त्यांच्या घरच्या आजी- आजोबांनी तातडीच्या मदतीसाठी बोलावलं असेल तर त्यांना नकार देणं कृतघ्नपणाचं ठरेल! अशावेळी वेळात वेळ काढून सर्व प्रकारची मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि या गोष्टीचं आपल्याला भानही ठेवायला हवं. काही काही प्रसंग असे असतात की त्याप्रसंगी आपल्याला नकार देणं अगदी जिवावर येतं. तरीही मनाविरूद्ध काही घडत असल्यास त्यावेळी प्रयत्नपूर्वक नकार देणं पण जमलं पाहिजे. आता एक हा प्रसंग बघा... रुपालीचं लग्न ठरणार होतं. तिच्या घरचे सगळेच आनंदात होते. कारण मनासारखं जवळचं स्थळ सांगून आलं होतं. एकुलता एक देखणा मुलगा. मोठ्या पगाराची नोकरी. घरची परिस्थितीही उत्तम! एवढं सगळं व्यवस्थित असूनही रूपाली मात्र प्रचंड तणावात होती! का तर तिला नेमकं कारण माहिती होतं, मुलगा व्यसनी होता! अशावेळी रूपालीनं संकोच न करता घरातील आई, बाबा, भाऊ, आजी, आजोबांसमोर आपलं मन मोकळं करून स्पष्ट नकार कळवणं आवश्यक ठरतं! लग्नानंतर मुलगा सुधारणार अशा खोट्या आशा बाळगणं इथं  मूर्खपणाचं ठरतं!


            कधीकधी आपण आपल्या अगदी जवळच्या मित्राला कुठल्यातरी कार्यक्रमाला सोबत जाण्याबाबत, त्याला वाईट वाटू नये म्हणून नाईलाजानं शब्द देऊन बसतो. मग जेव्हा त्याच्यासोबत त्या संबंधित कार्यक्रमाला जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्या घरगुती अडचणीमुळे किंवा अन्य कारणांमुळे जाणं शक्य होत नाही. त्यावेळी मित्राला नकार कळवणं आपल्याला जिवावर येतं! सरळ नकार देणं जमत नसल्यानं तेव्हा मित्राचा आलेला फोन न उचलणं किंवा स्वतःचा फोन बंद करून ठेवणं असे प्रकार घडतात. मग आपसात गैरसमज वाढत जातात. तेव्हा असे प्रकार टाळण्यासाठी स्वतःहूनच फोन करून नकार कळवणं हे कधीही चांगलं!


           एक महत्त्वाचा मुद्दा असा की, ऊठसूट अगदी किरकोळ कारणासाठी लगेच नकार देणंही योग्य नाही. समजा तुम्ही तुमच्या मित्र परिवारातले किंवा नातेवाईक मंडळीत लोकप्रिय व्यक्ती आहात, तुमचा सहवास त्यांना हवाहवासा वाटतो. तेव्हा अशावेळी एखाद्या कार्यक्रमासाठी तुमचा नकार त्यांच्यासाठी भ्रमनिरास होण्यास कारणीभूत ठरू शकतो! याप्रसंगी थोडं सामंजस्य दाखवून आपल्या माणसांसाठी होकार देणंच श्रेयस्कर! तसंच समजा तुमचं समाजात बऱ्यापैकी वजन आहे आणि एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्हाला प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलंय. तशाप्रकारच्या पत्रिका छापून वाटपही करण्यात आलं आहे. तेव्हा मात्र त्या कार्यक्रमाला न जाणं किंवा वेळेवर नकार कळवणं कृतघ्नपणाचं ठरणार याची जाणीव असायला हवी!


         आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनात बरेच चांगले वाईट अनुभव येत असतात. कधीकधी कुठल्या तरी वस्तूची खरेदी करताना फसवणूकही होते. कारण काय तर आपण त्या वस्तूंच्या मोहात अडकतो. दुकानदार सुद्धा त्या विशिष्ट वस्तूंचे अवास्तव वर्णन करण्यात पटाईत असतात. त्यांना त्यांचा माल विकायचा असतो. मग एकदा का आपण त्या वस्तूंच्या मोहात अडकलो की काही केल्या आपल्या तोंडून 'आता घेऊ शकत नाही' असा नकार तर निघत नाहीच शिवाय 'आज नको नंतर बघतो' असंही त्यावेळी बोलणं जमत नाही! अशाप्रकारचे अनुभव इतरांकडून आपल्याला  पदोपदी ऐकायला मिळतात. एवढंच काय यापुढचं पाऊल म्हणजे आपण दारात येणाऱ्या विक्रेत्याला किंवा फेरीवाल्याला स्पष्ट नकार न देता काहीतरी किरकोळ वस्तू खरेदी करतोच! नंतर मात्र ती वस्तू खराब निघाली की त्या विक्रेत्याच्या नावानं मग बोटं मोडत बसतो. कधीकधी काही किरकोळ विक्रेते ( फेरीवाले ) त्यांचा माल खपवण्यासाठी सतत मागे लागतात. तेव्हा त्यांना स्पष्ट नकार देणं अवघड होऊन जातं. अशावेळी थोडं कठोर होऊन खंबीरपणे त्याला स्पष्ट शब्दात 'नाही' किंवा 'नको' म्हणता आलं पाहिजे!


             काही प्रसंगी स्पष्ट नकार न दिल्यास आपल्यावर नामुष्कीही ओढवू शकते. आता हे एकच उदाहरण बघा... संदीप हा धडाडीचा युवक त्याच्या कामात निष्णात आणि प्रामाणिक असल्यानं त्याच्या कंपनीत नेमून दिलेलं काम तो मन लावून करायचा. वेळेच्या आधीच आपलं टार्गेट पूर्ण करायचा. मग आपल्या इतर सहकाऱ्यांनाही मदत करायचा. नेमक्या याच अतिकामसू वृत्तीमुळे त्याला काही ठराविक मित्र आपलं पेंडींग काम सोपवू लागले. संदीपच्या चांगूलपणाचा फायदा घेऊ लागले. एकदा कामावर असताना त्याला अचानक नातेवाईकाचा फोन आला... कुणाचा तरी अपघात झाला होता! संदीपला तातडीनं निघणं आवश्यक होतं पण नेहमीप्रमाणे त्यानं आपल्या एका सहकारी मित्राचं काम हाती घेतल्यानं त्यातच तो व्यग्र होता. त्यामुळे त्याला तिथून लवकर निघताही येत नव्हतं आणि आपल्या मित्राला कामही सोपवता येत नव्हतं. त्याची अवस्था 'इकडे आड तिकडे विहीर' अशी झाली होती..! अशाप्रसंगी तरी स्पष्ट नकार देता यायला हवा जेणेकरून नामुष्कीची अवस्था ओढवणार नाही! 


कधीकधी आपल्याला असेही अनुभव येतात ... एखाद्या मित्राला अथवा नातेवाईकास आपण मोठ्या विश्वासानं मदत मागतो. मात्र त्यावेळी तो लवकर होकार तर देत नाहीच अन् स्पष्ट नकार सुद्धा त्याच्या तोंडून बाहेर पडत नाही. तो नुसता मूग गिळून मख्खासारखा आपल्याकडे पाहत असतो! कधी कुणावर कुठल्या प्रकारचा प्रसंग ओढवणार हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे 'वेळ' बघून किंवा परिस्थिती पाहून नकार देणंही जमलं पाहिजे. नाहीतर 'आ बैल मुझे मार!' अशाप्रकारचा बिकट प्रसंग अापल्यावर  ओढवण्यास वेळ लागणार नाही! बाकी सुज्ञास सांगणे न लगे!!


विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे

भ्र. क्र. ९९२३७९७७२५

Thursday, August 13, 2020

डावखुर्यांच्या वेदना कुणाला कळणार का?

 आज १३ आॅगस्ट !

जागतिक लेफ्ट हँन्डर्स डे!

त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख जरूर वाचा 

आणि आपल्या बहुमोल प्रतिक्रिया द्या! 😊 


डावखुऱ्यांच्या वेदना कुणाला कळणार का?


प्रसंग पहिला ...

         मोठ्या उत्साहानं सहलीला निघालेली बस नियोजित ठिकाण आल्यावर एका झाडाखाली थांबली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बसमधून उतरले. आता सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती! त्यामुळे शिक्षकांच्या सूचनेनुसार सर्व विद्यार्थी गोलाकार बसले. मग त्यांनी आपापले डबे उघडले. शिक्षकही त्यांच्या सोबतच बसले. सर्वांनी जेवायला सुरूवात केली. अचानक शिक्षकांचं लक्ष अविकडे गेलं अन् ते त्याच्यावर ओरडलेच, "अरे अवि तू डाव्या हाताने का जेवतोस? असा कसा रे तू? तुझ्या आईबाबांनी घरी काही शिकवलं नाही का?"

इतर विद्यार्थी त्याच्याकडे उपहासानं बघत होते. बिचारा अवि काही न बोलता खाली मान घालून बसला होता! मान वर करून शिक्षकांकडे बघण्याचं धैर्य त्याच्यात नव्हतं!


प्रसंग दुसरा ...

          मंदिरातील आरती नुकतीच संपली होती. मंत्रपुष्पांजली झाल्यावर पूजाऱ्यांनी प्रसाद वाटप करण्यास सुरूवात केली. भाविक मंडळी दर्शन घेण्यासाठी रांगेत उभी होती. काही वेळातच प्रसाद वाटप करत पुजारी विक्कीपर्यंत येऊन पोहचले. विक्कीनं आपला डावा हात पुढं केला. तोच पुजारी त्याच्यावर खेकसले, "अरे प्रसाद उजव्या हातात घ्यायचा असतो, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? आईबाबांनी काही संस्कार केले की नाही का तुझ्यावर?"

विक्की जन्मतःच डावखुरा असल्यामुळे त्यानं प्रसाद घेण्यासाठी नैसर्गिकरित्या आपला डावा हात पुढं केला यात त्याचा काय दोष? 

           आपल्याकडे डाव्या हातानं काम करणाऱ्या मुलांना पालक नेहमीच टोकताना दिसतात. शाळेतही अशा मुलांना शिक्षकांची बोलणी खावी लागते. इतर विद्यार्थी मित्रांचे टोमणे सुद्धा त्यांना सहन करावे लागतात! आपल्या समाजात काही ठिकाणी अजूनही डाव्या हातानं काम करणं हे अशुभ मानलं जातं! तसंच बऱ्याच वेळा डावखुऱ्या विद्यार्थ्यांना पालकांच्या किंवा शिक्षकांच्या दबावामुळे नाईलाजानं उजव्या हातानं काम करावं लागतं. पूर्वीच्या काळी डावखुऱ्या लोकांना ते सामान्य नाहीत म्हणून हिणवलं जायचं, कमी लेखलं जायचं. दुर्दैवानं याची सुरूवात शाळेपासूनच व्हायची! 

            लहान असताना जेव्हा आपण हातात खडू घेऊन पाटीवर रेषा ओढायला सुरूवात करतो तेव्हाच स्पष्ट होतं, आपण डावखुरे होणार की उजवे होणार! आपला कुठलातरी एक हात जास्त प्रभावीपणे काम करतो हेही लक्षात येतं. डावखुरं असणे किंवा उजवं असणे हे आपल्या जनुकांशी संबंधित आहे पण नेमक्या कुठल्या जनुकांवर ते अवलंबून आहे हे मात्र अद्यापही समजलेलं नाही. डावखुरं असण्याचा मेंदूशी काय संबंध आहे यावर संशोधन सुरू आहे आणि त्याबाबत बरेच वादही सुरू असल्याचं आपल्या वाचनात येतं. मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू नियंत्रित करतो तर डावा भाग आपल्या शरीराची उजवी बाजू नियंत्रित करतो. म्हणजेच डावखुरं असणं म्हणजे मेंदूच्या रचनेवर मोठा परिणाम करणारं असतं! युनिव्हर्सिटी काॅलेज आॅफ लंडन येथील मानसशास्त्रज्ञ ख्रिस मॅकमॅनस यांनी 'राईट हँन्ड, लेफ्ट हँन्ड' हे पुस्तक लिहलं आहे. त्यात ते म्हणतात... "ज्या पद्धतीने डावखुऱ्या व्यक्तीच्या मेंदूची मांडणी असते, ती फारच वैविध्यपूर्ण असते. माझं वैयक्तिक मत असं आहे की, डावखुरे लोक जास्त बुध्दिमान असतात आणि त्यांच्यात उणिवांना तोंड देण्याचं सामर्थ्य जास्त असते. जर तुम्ही डावखुरे असाल तर तुमच्या मेंदूच्या रचनेत किंचित बदल असल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे इतरांकडे नसणारी कौशल्यं तुमच्याकडे असतात!"    

               डावखुऱ्या लोकांना समाजात वावरताना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं! डावखुरा माणूस डावीकडून उजवीकडे कागदावर शाईच्या पेनानं लिहिताना त्याच्या बोटांना शाई तर लागतेच शिवाय लिहिलेलं पुसलं जाण्याचीही शक्यता असते. तसंच 'शेक हँन्ड' करताना डावखुऱ्या माणसाचा डावा हातच नैसर्गिकरित्या पुढं जातो. त्यावेळी उजव्या माणसानं त्याचा उजवा हात पुढं केलेला असतो. महत्त्वाचं म्हणजे पोलीस किंवा सैन्यदलात कार्य करणाऱ्यांना डाव्या  हातानं सॅल्यूट करता येत नाही, तो नियमानुसार उजव्या हातानंच करावा लागतो! त्यासाठी डावखुऱ्यांना मात्र उजव्या हातानंच सारखा सराव करावा लागतो. शेवटी नोकरी करायची म्हटल्यावर असा सराव करणं हेही ओघानं आलंच! दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, आपल्या नेहमीच्या वापरातील बऱ्याचशा वस्तू उजव्या हाताचा विचार करूनच तयार केलेल्या असतात. जसे-- कॅमेऱ्याचं क्लिक बटन, काॅम्प्युटरचा माऊस, शिलाई मशीन, बाईकची किक, दरवाज्याचं हँन्डल, गिटारच्या तारा या आणि अशाप्रकारच्या कितीतरी गोष्टी फक्त उजव्यांच्या सोयीनुसार निर्माण केलेल्या असतात. त्यामुळे डावखुऱ्यांना वेळोवेळी गैरसोयीचा सामना करावा लागतो!

              डावखुऱ्या लोकांबाबत पूर्वीपासून चालत आलेल्या काही अंधश्रध्दा पण आहेत. एस्किमो लोकांमध्ये असा समज आहे की डावखुरा माणूस हा मंत्र,तंत्र जाणणारा किंवा जादू करणारा असतो. पूर्वीच्या काळी जपानी माणसाला लग्नानंतर जर त्याची बायको डावखुरी आहे असं समजलं तर तो तिला चक्क घटस्फोट द्यायचा. त्याकाळात 'डावखुरा माणूस नरकात जातो' अशीही समजूत प्रचलित होती! आपल्याकडे अजूनही डाव्या हातानं ठराविक कामं करणं अशुभ मानलं जातं. डाव्या हातानं पैसे देणं किंवा घेणं, डाव्या हातानं प्रसाद घेणं किंवा वाटप करणं निषिद्ध मानलं जातं! अजूनही काही लोक आपलं मूल डावखुरं आहे हे लक्षात येताच त्याच्या डाव्या हाताला चटके देणं किंवा त्याचा डावा हात बांधून ठेवणं असे प्रकार करताना दिसतात. असले अजब प्रकार करणं चुकीचं तर आहेच शिवाय त्या मुलावर अन्याय करण्यासारखं आहे. कारण अशा वागणूकीमुळे डावखुऱ्या मुलांची नैसर्गिक वाढ खुंटू शकते पर्यायानं त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोठा अडथळा येऊ शकतो!

            याउलट आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात डावखुरी माणसं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि सरस काम करू शकतात. त्यामुळे ते भविष्यात टिकाव धरू शकतील असे मत तज्ज्ञांकडून वर्तवले जात आहे. एका जागतिक सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, डावखुरे लोक बुध्दिमान, संवेदनशील अन् सर्जनशील असतात! त्यामुळे हल्लीच्या अर्थव्यवस्थेनुसार उत्पादकांनी मनावर घेतलं तर डावखुऱ्या लोकांना उपयुक्त वस्तूंची मोठी बाजारपेठ ते उपलब्ध करून देऊ शकतात. कारण आजघडीला संपूर्ण जगात सुमारे बारा टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे डावखुरे आहेत. एकट्या ब्रिटनमध्ये जवळपास सत्तर लाख लोक डावखुरे आहेत. तेथे त्यांच्या सोयीसाठी बऱ्याच उपयोगी वस्तू बाजारात उपलब्ध होत आहेत. लंडनमध्ये खास डावखुऱ्या लोकांसाठी 'एनीथिंग लेफ्ट हँन्डेड' नावाचं दुकान कार्यरत आहे. तेथे काम करणारे कर्मचारी सुद्धा डावखुरेच आहेत. त्यामुळे त्यांना येणाऱ्या ग्राहकांशी आपुलकीनं संवाद साधता येतो. कात्रीपासून ते काॅम्प्युटर पर्यंत सर्व उपयुक्त वस्तू डावखुऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. अशाप्रकारची दुकानं जगात सर्वत्र उघडणे अपेक्षित आहे!

          उपलब्ध आकडेवारीवरून संपूर्ण जगात साधारणपणे जवळजवळ दहा ते बारा टक्के लोक हे डावखुरे आहेत. पुरूषांमध्ये हे प्रमाण बारा टक्क्यांपेक्षा जास्त असून स्त्रियांमध्ये ते नऊ ते दहा टक्के इतके आहे. उजव्यांचं प्रमाण अधिक असलेल्या या दुनियेत डावखुऱ्या लोकांनी स्वत:चा एक क्लब

 स्थापन केला आहे. संपूर्ण जगात त्याच्या शाखा अस्तित्वात आहेत. १३ आँगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात 'लेफ्ट हँन्डर्स डे' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १३ आँगस्ट १९७६ रोजी अमेरिकतील कँपबेल कंपनीच्या वतीने साजरा करण्यात आला. नंतर १९९० साली इंग्लंडमध्ये 'लेफ्ट हँन्डर्स क्लब'ची स्थापना झाली. तर भारतात औरंगाबाद येथील संदीप विश्नोई यांनी 'इंडियन लेफ्ट हँन्डर्स क्लब'ची स्थापना केली. उजव्या हातानं काम करणं कधीही सोयीचं असतं असा समज आपल्या समाजात अगदी पूर्वापार चालत आलेला आहे. हाच समज दूर करण्यासाठी आणि समाजातील डावखुऱ्या लोकांबाबत जागरूकता आणण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो. खरंतर डावखुरे असल्याचे फायदे किंवा तोटे याबाबत जाणीव व्हावी हीच या दिवसामागची भूमिका असते. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या बारा टक्के लोक डावखुरे असल्याने ते डाव्या हातानंच आपली कामे करत असतात. तसंच काही डावखुरे त्यांच्या उजव्या हातानं सुद्धा तेवढ्याच क्षमतेनं काम करू शकतात. हेच डावखुरे लोक आपल्या कुशलतेमुळे आणि काही विशिष्ट गुणांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात हेही वेळोवेळी सिद्ध झालं आहे. अगदी प्राचीन इतिहासापासून त्याची अनेक उदाहरणं देता येतील. अख्खं जग जिंकायला निघालेला सिकंदर उर्फ अलेक्झांडर तसंच फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट हे डावखुरे होते. त्याचप्रमाणे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन अन् ज्यानं जगभरातील रसिकांना आपल्या अफलातून अभिनयानं हसवता हसवता रडवलं असा श्रेष्ठ विनोद सम्राट म्हणून गणलेला अभिनेता चार्ली चॅप्लिन हेही डावखुरे असल्याची नोंद आहे. खेळांची मैदानं गाजवलेले गॅरी सोबर्स, अँलन बाॅर्डर, ब्रायन लारा तसंच आपल्याकडील सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराज सिंग इत्यादी डावखुऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात इतिहास रचलेला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामा त्याचप्रमाणे आपल्याकडील  महात्मा गांधी, रतन टाटा, अमिताभ बच्चन या सर्व डावखुऱ्यांचं महान कार्य आपण जाणतोच! अतिशय महत्त्वाचं म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा डावखुरेच आहेत. हे सर्व डावखुरे त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे उजव्यांपेक्षाही बऱ्याच अंशी निश्चितच उजवे आहेत असंच म्हणावं लागेल.

         त्यामुळे १३ आँगस्टला कोणी डावखुरा माणूस भेटला तर त्याच्याशी डाव्या हातानंच 'शेक हँन्ड' करून 'लेफ्ट हँन्डर्स डे'च्या निमित्तानं त्याचं अभिनंदन करायला उजव्यांनी विसरू नये हीच रास्त अपेक्षा! !


                     आपलाच एक डावखुरा मित्र ...

                    विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे.

Thursday, July 9, 2020

हमारे पांव का कांटा हमीसे निकलेगा !

हमारे पाँव का कांटा हमीसे निकलेगा...

विजय रोजच्या प्रमाणे आजही आपल्या कामावर जाण्यासाठी निघाला. मुख्य रस्त्यावर पोहचताच त्याला प्रचंड वाहतुकीचा सामना करावा लागला. सिग्नलला थांबलेली वाहनं, सिग्नल सुटताच स्पर्धेत धावतात तशी एकमेकांशी स्पर्धा करू लागली. विजयसुद्धा रोजच्या सवयीप्रमाणे रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्सचा सामना करत, खाचखळगे चुकवत आपली बाईक दामटत पुढं जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र दुर्दैवानं त्याच्या बाईकचं मागचं चाक पंक्चर झालं! तेव्हा त्याला थांबणं भागच होतं. विजय आपली बाईक रस्त्याच्या कडेला घेऊन थोडा थांबला आणि आजूबाजूला कुठं पंक्चर काढणारा दिसतो का याचा तो शोध घेऊ लागला. मात्र जवळपास कोणीही न आढळल्यानं तो निराश झाला!

शेवटी बाईक ओढत विजय एका मोठ्या झाडाजवळ आला अन् सावली बघून तिथं थांबला. नंतर तो विचार करू लागला ... माझ्या बाबतीत आज नेमकं असं का घडत आहे? पहाटे अचानक विजपुरवठा बंद झाल्यानं झोपमोड झाली. मग नाइलाजानं लवकर उठावं लागलं. सकाळी दूधवाला पण आला नाही. नंतर इस्त्रीचे कपडे आणायला गेलो तर त्याचंही दुकान बंद! घरून निघताना नेहमी एका किकमध्ये सुरू होणाऱ्या  बाईकनं सुद्धा आज त्रास दिला. का व्हावं असं ..? विचार करत असतानाच त्याचं लक्ष पलीकडे झाडाखाली गाणं म्हणणाऱ्या व्यक्तीकडे गेलं. तो आपल्या लाकडी गु-हाळानं ( चरक ) उसाचा रस काढण्यासाठी गाणं गात गोलाकार फिरत होता. त्याचा घामाघूम पण हसरा चेहरा बघताच विजयनं त्याच्या मनात आलेले नकारात्मक विचार क्षणात झटकून टाकले. मग त्यानं आपली बाईक तिकडे नेेेत साईड स्टँडला लावली आणि 'एक ग्लास ऊसाचा रस' अशी आँर्डर दिली.

विजय आता सकारात्मक दृष्टीने विचार करू लागला ... रोज लवकर सुरू होणारी आपली बाईक आज ब-याच प्रयत्नांनी सुरू झाली आणि त्यानंतर आता टायर पंक्चर झाला. म्हणजेच पुढं जाऊन येणारं अरिष्ट टळलं म्हणायचं! आजचा दिवस रजा टाकून सत्कारणी लावायचा विचारही त्याच्या मनात आला. अशाप्रकारचे थोडेफार कमीअधिक प्रसंग प्रत्येकाच्याच जीवनात येत असतात. अशा प्रसंगांना आपण कशाप्रकारे सामोरं जायला हवं हेच यावेळी महत्त्वाचं ठरतं! सकारात्मक विचार मनात असले की आपण निर्णय सुद्धा अचूक घेत असतो. तुमच्यापासून कुणी संपत्ती हिरावून नेऊ शकतो पण तुमची निर्णय घेण्याची क्षमता कोणीही हिरावू शकत नाही. त्यासाठी मनाचं आरोग्य जपणं अशावेळी अतिशय गरजेचं ठरतं! खरंच आपलं मनाचं आरोग्य उत्तम असलं की मग नकारात्मक विचार करायला वेळही मिळणार नाही.

सध्याच्या परिस्थितीत आपल्याला कधी नव्हे इतकी  सकारात्मक विचार अंगीकारण्याची नितांत आवश्यकता आहे. या लाॅकडाऊनमुळे एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली असणार, की आपल्या कलांना वाव मिळाला तर आपणही काहीतरी भव्यदिव्य करू शकतो. आतापर्यंत ज्यांना आपण खूप डोक्यावर घेत होतो ( उदा. सिनेमातील नट, क्रिकेट खेळाडू ) ते फक्त आपलं मनोरंजनच करू शकतात हेही एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल. त्यांच्यापेक्षा घरी राहून सुद्धा आपापल्या कला सादर करून आपण एकमेकांचं मनोरंजन करू शकतो अन् त्यानं वेगळंच समाधान मिळू शकतं! आजपर्यंत ज्या माॅलमध्ये किंवा हाॅटेल्समध्ये जाऊन निरनिराळ्या पदार्थावर आपण ताव मारून जिभेचे चोचले पुरवत होतो, त्यापेक्षा आपल्या घरी राहून वेगवेगळे प्रयोग करून एकसे बढकर एक चविष्ट पदार्थ करू शकतो असा आत्मविश्वास पण अनेक व्यक्तीत निर्माण झाला आहे.

विदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्ताने  जाणाऱ्या लोकांबाबत कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे. तसंच विदेशी लोक खूप हुशार असतात, ते खूप शिकलेले असतात, खूप समजदार असतात असा सामान्य भारतीयांमध्ये समज होता. मात्र आता अख्ख्या जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे "कौन कितने पानी मे है!" हे आपल्याला चांगलंच कळून चुकलंय. यांच्यापेक्षा ज्यांना आपण अत्यंत मागासलेल्या भागातील आदिवासी समजतो, त्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना कितीतरी पटीनं सुज्ञ म्हणता येईल. ते या लाॅकडाऊनच्या काळात गपगुमानपणे सर्व सूचनांचे आणि नियमांचे पालन करताना दिसतात. ते बिचारे हीरोगिरी करत विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरत नाहीत. किंवा तपासणी करायला आलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर दगडफेक करत नाहीत!

या लाॅकडाऊनच्या काळात एक बरं झालं,  ताणतणाव वाढवणार्या तसंच प्रेक्षकांचा अंत बघणाऱ्या निरर्थक आणि रटाळ मालिका बंद दाखवणं बंद झालं. त्याऐवजी जुन्या संस्कारक्षम मालिका बघताना जुन्या स्मृतींना उजाळा मिळत आहे. त्याचप्रमाणे ज्यांना रोजच्या धकाधकीच्या व्यग्र जीवनशैलीमुळे आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नव्हता, त्यांना 'वर्क फ्राॅम होम' या अभिनव पद्धतीमुळे ते सहज शक्य झालंय. तसंच ज्या मित्रांशी, नातेवाईकांशी दोन मिनिटं सुद्धा फोनवर बोलता येत नव्हतं त्यांच्याशी मनमोकळेपणानं संवाद साधणं आज अगदी सहजतेनं होत असल्याचा सुखद अनुभव आपण घेत आहोत!

एकंदरीतच कृत्रिमपणे जगणं ( जसं हाय, हॅलो करत हात मिळविणे)  बंद होऊन आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे दोन्ही हात जोडून नमस्कार करून त्यातला आगळावेगळा आनंद आज आपल्याला प्राप्त होत आहे . भारतातच नाही तर सर्व जगात हीच पद्धत सध्या रूढ आणि लोकप्रिय  होताना दिसत आहे. तरीही कोणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विविध जातीधर्माचे नटलेल्या आपल्या देशात प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. परंतु 'मन मानेल तसं' वागून इतरांना त्याचा त्रास होणार नाही आणि हा त्रास जीवघेणा ठरणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेणं एवढंच आज सर्वांना अपेक्षित आहे!  शेवटी प्रसिध्द शायर राहत इंदोरी यांचा शेर पेश आहे...
" ना किसी राहपर, ना राहगुजर से निकलेगा,
   हमारे पाँव का कांटा हमी से निकलेगा!!"

...विनोद श्रा. पंचभाई
  भ्र.क्र.९९२३७९७७२५

Thursday, June 25, 2020

मेवाडनरेश महाराणा प्रताप

पुण्यातील "चपराक प्रकाशन" तर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या माझ्या "मेवाडनरेश महाराणाप्रताप" या लघु कादंबरीतील काही रोमहर्षक अंश नक्की वाचा .....

चिरपरिचित सुमधुर स्वर सर्वांच्या कानावर पडला ...
                       "जागो हे मेवाड मनस्वी!
                        समय नही है अब सोने का
                        उठ, रण - साज सजा ले !
                        सीमाएँ है सुलग रही जब
                         तू भी शस्त्र उठा ले !!
                         सजा आरती तलवारों की
                         ओ! स्वातंत्र्य तपस्वी... !"
तो आवाज एका चारणीचा ( गायिकेचा ) होता. आपल्या गाण्याच्या माध्यमातून ती जनजागृती तर करायचीच, त्याचप्रमाणे वेळप्रसंगी राणाप्रतापांसाठी हेरगिरीचं काम सुद्धा अगदी बेमालूमपणे करायची.
"मेवाडच्या गौरव गायिकेचा हार्दिक प्रणाम स्वीकारावा महाराणाजी!" राणांना अभिवादन करत चारणी म्हणाली.
"ये, तुझं स्वागत आहे. तुझे मधुर स्वर कानी पडले की झोपलेला आत्माही खडबडून जागा होतो! तू इथं आमचीच नाही तर संपूर्ण मेवाड प्रान्ताची प्रेरणा आहेस. चेतनाशक्ती आहेस. तुझ्या रूपानं चित्तोडची महाशक्ती माता अंबाभवानीच मेवाडच्या उद्धारासाठी अवतरित झाल्याचा आम्हाला भास होतो!" स्तुतिसुमने उधळत राणाप्रतापांनी चारणीचा गौरव केला.

              उदयपूर मधील उदयसागर तलावाचा काठ! सुंदर नक्षीदार शामियाना सजलेला. अकबर बादशहाचा सेनापती राजा मानसिंहाची सर्वाना प्रतीक्षा होती. कुँवर अमरसिंह व इतर सरदार स्वागतासाठी तयारच होते. तेवढयात महाराणा प्रतापसिंहांसोबत राजा मानसिंह शामियान्याकडे येताना दिसले. सर्वांनी त्यांचे स्वागत केले ...
"महाराणांचा विजय असो! मानसिंह राजांचे स्वागत अाहे."
"यावे राजाजी! विराजमान व्हावे!" शामियान्यात प्रवेश करताच राणाप्रताप उद्गारले.
"आप भी पधारिये महाराणाजी!" मानसिंह त्यांना म्हणाला.
"आपल्याकडे सर्व कुशलमंगल आहे ना राजाजी" औपचारिकता म्हणून राणांनी विचारलं.
"सध्यातरी सर्व क्षेमकुशल आहे. फक्त एका खासगी कौटुंबिक अडचणींची चिंता आहे. आमची धाकटी बहीण मानाबाई, ती उपवर झाल्यामुळे सुयोग्य वराच्या शोधात आहोत आम्ही." बोलताना मानसिंहने महाराणांवर अर्थपूर्ण दृष्टिक्षेप टाकला. मात्र राणाप्रताप काहीच बोलले नाहीत. मग न राहवून काही वेळानं मानसिंहानं राणांना प्रश्न केला,
"सक्ती नाही महाराणाजी पण एक विचारू का?"
"विचारा ना राजाजी! " राणाप्रताप सहजपणे म्हणाले.
"आपले ज्येष्ठ कुँवर अमरसिंह यांच्यासाठी आपण आमच्या मानाबाईचा संबंध स्वीकारला तर आम्ही कृतार्थ होऊ!" मानसिंह स्पष्ट शब्दात बोलला.
"आम्हाला आपला प्रस्ताव स्वीकारण्यात आनंदच झाला असता पण मेवाडचे महाराणापद ग्रहण करताना आम्ही काही प्रतिज्ञा केल्या होत्या. त्यातील एक प्रतिज्ञा आहे... जोपर्यंत चित्तोडसह संपूर्ण मेवाड प्रान्त मोगलांच्या राजवटीतून मुक्त होत नाही तोपर्यंत कुँवर अमरसिंहचा विवाह केला जाणार नाही! " राणाप्रतापांनी आपला निर्धार व्यक्त केला.
"महाराणाजी! ही प्रतिज्ञा अंमलात आणणं खूपच अवघड आहे असं तुम्हाला नाही वाटत? " मानसिंहानं विचारलं.
"कशाला वाटावं? आमच्या पूर्वजांनी यवनांना हिन्दुस्थानातून बाहेरच काढलं नाही तर थेट इराणपर्यंत त्यांना पिटाळून लावलं. मग आता देशातल्या देशात त्यांना मेवाडमधून घालवणं काहीच अवघड नाही! " राणाप्रताप त्वेषानं बोलले. तरीही मानसिंह संयम बाळगत शांततेनं त्यांना म्हणाला, "एक लक्षात घ्या राणाजी! मोगल आज हिन्दुस्थानचे राज्यकर्ते आहेत. त्यांचं सामर्थ्य प्रचंड आहे. म्हणून त्यांच्याशी संघर्षाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आपसात सलोखा करणं जास्त हितावह ठरेल. थोडा विचार करावा आपण!"
"माफ करा राजाजी! मोगलांचं सामर्थ्य म्हणजे काय, तर तुम्ही आम्ही लोकच ना! आपली राजपूतांची शक्ती जर वजा केली तर बादशहा जवळ काय शिल्लक राहणार? " राणाप्रताप नेमकेपणानं निर्वाणीचं  बोलले.
"पण राणाजी, आजच्या परिस्थितीत सलोख्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आम्ही बादशहा सोबत सलोखा केला म्हणूनच आज अंबर प्रान्ताचं आमचं राज्य आणि आम्ही सुरक्षित आहोत!" मानसिंहांच्या या लाचारीच्या बोलण्यावर चांगलं सणसणीत उत्तर द्यावं असं राणाप्रतापांच्या मनात आलं होतं पण त्यांनी स्वतःला वेळीच सावरलं, अन् संयम राखत धारदार आवाजात म्हणाले ...
"संघर्ष कोणी सुरू केला राजाजी? मेवाडच्या किंवा इतर राजपूत राजांनी कधीतरी आग्र्यावर आक्रमण करण्याचा मनसुबा केला का? इतिहासात अशी एक तरी नोंद आहे का? नाही ना! उलट प्रत्येक मोगल बादशहाने साम्राज्य विस्तारासाठी कित्येक वेळा कुरापती काढण्याचंच काम केलं. या बादशहाला तर राजपूती रक्ताची चटक लागली आहे जणू! त्या चित्तोडवर तीस हजार निरपराध राजपूतांची कत्तल केल्यावरही त्याची तहान भागली नाही. म्हणूनच तो सारखा राजपूत राजांवर स्वाऱ्या   करून त्यांची राज्ये अंकित करत सुटला आहे.जोधपूर, बिकानेर, बुंदी किंवा तुमच्यासारख्या अंबरच्या राजपूत राजाला सैन्यासह त्या बादशाहाच्या खिदमतीत हजर राहावं लागतं! राजपूत राजे आज आपला स्वाभिमानच गमावून बसले आहेत असं वाटत नाही का तुम्हाला राजाजी ?"
 महाराणांचे सडेतोड बोल ऐकूनही थोडं सामोपचारानं प्रयत्न करावा म्हणून मानसिंह शांतपणे म्हणाला, "महाराणाजी! राजपूतांचा रक्तपात टळावा असंच आम्हाला वाटतं. म्हणूनच तर तुम्हाला तडजोडीचा सल्ला द्यायला आलो आम्ही! तुम्हाला काय वाटतं ..?"
"तडजोड होऊ शकते राजाजी ... ती केवळ एका अटीवरच.
बादशहाने मेवाड प्रान्तातून त्याचे सर्व सैन्य काढून घेऊन आमची मातृभूमी स्वतंत्र करावी. स्वतंत्र सार्वभौम राज्य म्हणून मेवाडला मान्यता द्यावी, आणि आपण वाईट वाटून घेऊ नये पण इतर मांडलिक राजांप्रमाणे आम्ही बादशाहाच्या दरबारात हजेरी लावायला येणार नाही!" महाराणा आत्मविश्वासानं बोलत होते. ते पुढं म्हणाले,
"आमच्या सिसोदिया पूर्वजांनी आजपर्यंत अपमानास्पद तडजोडी करण्याऐवजी जोहार आणि केसरियाचा अवलंब केला. हा इतिहास वाचताना कोणाही राजपूताची छाती अभिमानाने फुलून जाईल. याउलट मांडलिक राजांनी आपली इज्जतच मोगलांकडे गहाण टाकली. भविष्यात तुमचे वंशज हा इतिहास वाचताना शरमेनं माना खाली घालतील...!" राणाप्रतापांचे हे बोलणे मानसिंहाला चांगलंच झोंबलं. मध्येच उसळून रागानं तो म्हणाला,
"महाराणाजी , आपण आम्हाला सिसोदियाबद्दल एवढं गर्वानं सांगता मात्र एक गोष्ट विसरता... तुमच्याच महान वंशातले तुमचे सावत्रभाऊ सागरसिंह आज स्वतःच्या स्वार्थासाठी बादशहाचे तळवे चाटत आहेत."
"राजाजी! आपण आमचे सन्माननीय अतिथी आहात. आमच्या मनात आपल्याबद्दल आदराची भावना आहे. मात्र आपण आमच्यावर हा कठोर आघात केलाच आहे तर आम्हालाही एका कटुसत्याची आठवण करून द्यावी लागेल. ऐका राजाजी, सागरसिंहाची वर्तणूक आमच्यासाठी पीडादायक आणि लांच्छनास्पद बाब आहे! तरीही त्याच्यामुळे आमच्या इज्जतीचे धिंडवडे उठवण्याची हिंमत कोणी करणार नाही. मात्र एक कटुसत्य आपण लक्षात घ्यावे, इतर राजपूत राजांप्रमाणे आजपर्यंत एकही सिसोदिया राजपूत रमणी मोगल बादशहाचं शय्यागार सजवायला गेलेली नाही!" राणाप्रतापांचं हे घणाघाती सत्य कानावर पडताच मानसिंहांची तळपायाची आग मस्तकात गेली! तो मोठ्यानं ओरडला ... "राणाजी S S !" संतापानं त्याचा हात तलवारीच्या मुठीवर गेला.
    थोड्या वेळानं मानसिंहाला शांत करत राणाप्रताप म्हणाले,
"आपण शांत व्हावे राजाजी! अजूनही वेळ गेली नाही. वेळीच सावध व्हा. आपण कछवाह आणि आम्ही सिसोदिया एक होऊन संयुक्तपणे मोगलांवर तुटून पडलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यानंतर आपण संपूर्ण राजस्थानचे महाराजे बना. आम्ही आपले मेवाड सांभाळू. आपण यावर निश्चित विचार करावा."
"आम्ही येतो राणाजी! " आपल्या जागेवरून उठत मानसिंह गुर्मीतच पुढं म्हणाला, "आता आपली भेट रणभूमीवरच होईल. आज ना उद्या बादशहा आपल्या पारिपत्यासाठी सैन्य पाठवणारच. तेव्हा सेनापती म्हणून मलाच आपल्याविरूध्द चालून यावं लागेल! "
"त्याही परिस्थितीत आम्ही आपले खंबीरपणे स्वागत करू! " राणाप्रताप निग्रहानं म्हणाले..

Thursday, April 9, 2020

आम्ही दोघीच!

vinodpanchbhai
Sent
Write
Calendar

आम्ही दोघीच... कथा

"पुढील थांबा नळस्टाॅप... पुढील थांबा नळस्टाॅप" स्वयंचलित उद् घोषणा ऐकून नीतू आपल्या जागेवरून उठली, अन् बस थांबताच ती नळस्टाॅपला उतरली. तो भाग तिला काहीसा अपरिचित होता. मात्र आपल्या मोबाईलच्या 'गुगल मॅप' वर तिनं हवं असलेलं 'शारदा सेंटर' शोधून काढलं.आणि त्या दिशेने झपाझप पावलं टाकत चालू लागली. तेव्हा तिच्या मनात क्षणभरासाठी विचार तरळला... सरळ रेल्वे स्टेशन गाठावं आणि आपल्या गावाकडे निघून जावं, म्हणजे हा रोजचा आटापिटा तरी वाचणार! मात्र लगेच नीतूनं मनात आलेला तो नकारात्मक विचार झटकला. चालता चालता तिला तिच्या बाबांच्या मित्राचं वाक्य आठवलं, "बेटा संघर्षही जीवन है कभी घबराना मत, कोई भी कठनाई आए तो उसका डटके मुकाबला करना।" मग तिच्यात कमालीचा उत्साह संचारला.

प्रसन्नतेनं तिनं परत एकदा मोबाईलमध्ये शारदा सेंटरचं लोकेशन बघितलं. रस्त्यावरुन पुढच्या वळणावर थोडं पुढं गेल्यावर नीतूला 'शारदा सेंटर' नावाची भव्य इमारत दिसली. ती आत्मविश्वासानं महाद्वारांतून आत शिरली. नंतर तेथील सुरक्षा रक्षकाला आपले ओळखपत्र दाखवून इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टकडे वळली. तोच तिच्या कानावर ओळखीचा आवाज पडला, "अगं नीतू थांब जरा... मी पण आलेय!"
नीतूनं गर्रकन वळून मागे बघितलं तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटलं. कारण तिची शाळेतली मैत्रीण पूजा तिच्याकडेच येत होती. जवळ आल्यावर न राहवून तिनं विचारलं, "काय गं पूजा, तू कशी काय इथं? "
"अगं नीतू हाच प्रश्न मी तुला विचारणार होते. बरं ते जाऊ दे, कशी आहेस तू? आणि काय गं, तू तर त्या पिंपरीच्या कंपनीत जाॅब करत होतीस ना..?"
"अगं किती प्रश्न विचारतेस... चल आधीच उशीर झालाय. जाता जाता बोलूया आपण. इथं या चौथ्या मजल्यावरच्या मेडिकल कंपनीत मुलाखत आहे माझी नोकरीसाठी...."
तिचं बोलणं मध्येच तोडत पूजा म्हणाली, "अरे वा! मी पण तिथंच चाललेय गं इंटरव्ह्यूसाठी. काय योगायोग आलाय बघ, आपण शाळा काॅलेजात एकत्र होतोच. अन् आता जाॅब मिळाला तर इथं पण सोबत मिळणार तुझी! "

तिच्या चेहऱ्यावरील उत्साह बघत नीतू विचार करू लागली... शाळेत जास्त न बोलणारी, शांत असणारी ही पूजा किती बडबड करतेय. किती फरक पडलाय हिच्यात! नकळत ती स्वतःची तुलना पूजाशी करू लागली.
"काय गं, कसला विचार करतेस एवढा? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस या इंटरव्ह्यूचं, माझ्याकडे बघ मी किती बिनधास्त आहे." पूजाच्या बोलण्यानं नीतू भानावर आली. तिला पूजाचं नवल वाटलं अन् काहीतरी बोलायचं म्हणून बोलली, "नाही अगं पूजा, माझं ना सकाळपासून थोडं डोकं धरलंय. टेन्शन बिन्शन मी कधी घेत नाही गं. बघूया इथं काय विचारतात ते..!"

चौथ्या मजल्यावर पोहचताच तेथील व्हरांड्यात अनेक युवक युवती गोळा झाल्याचं दोघींना जाणवलं. तसेच समोरच्या बाजूला त्या नामांकित मेडिकल कंपनीचा भलामोठा बोर्ड त्यांच्या दृष्टीला पडला. लगबगीनं नीतू आणि पूजा रिसेप्शनिस्टकडे गेल्या व तिथं त्यांनी आपापले नाव नोंदवले. मग जवळच्याच एका बाकडयावर बसून दोघींच्या गप्पा सुरू झाल्या.
"अगं आपण शाळेत होतो तेव्हा तुझं मात्र वेगळंच विश्व होतं. कुणाशी जास्त बोलायचं नाही की कुणाच्यात कधी मिसळायचं पण नाही असंच तुझं तेव्हाचं वागणं होतं. नुसताच अभ्यास एके अभ्यास! एवढा बदल कसा काय झाला गं तुझ्यात?" हसतच नीतूनं विचारलं. पूजालाही हसू आलं! तिनं लगेच बोलायला सुरूवात केली ...
"आपण त्या ज्युनियर काॅलेजमधून बारावी पूर्ण केल्यानंतर खरंतर मला डाॅक्टर व्हायचं होतं पण टक्केवारी थोडी कमी पडल्यानं बीएस्सी नर्सिंग कडे वळले. तिथं ना आमचा ग्रुप एवढा भन्नाट होता ... सारखी दंगामस्ती चालायची होस्टेलवर. नुसतीच धम्माल! कुणालाही शांत बसू द्यायचे नाहीत कुणी. मग काय, मलाही त्यांच्यात मिसळणं भाग पडलं ना...." बोलता बोलता पूजाला हसू आवरत नव्हतं. एकमेकांना टाळी देत दोघीही मनसोक्त हसल्या.

काही वेळाने अचानक कंपनीच्या दरवाज्याजवळ गर्दी होत असल्याचं सगळ्यांना जाणवलं. ते बघून पूजा आणि नीतू आपल्या जागेवरून उठल्या अन् लगेच तिकडे गेल्या. बघतात तर काय, मगाशी तिथं बसलेली ती हसतमुख रिसेप्शनिस्ट चक्कर येऊन पडली होती! तिला पाहताच पूजा लगबगीनं पुढं गेली आणि त्या रिसेप्शनिस्टचा हात आपल्या हातात घेऊन नाडीच्या ठोक्यांची तपासणी करू लागली. तेवढयात नीतूनं जवळ असलेली पाण्याची बाटली काढली. मग पूजानं लगेच बाटलीमधील थोडं पाणी रिसेप्शनिस्टच्या चेहऱ्यावर शिंपडलं. तेव्हा तिनं शरीराची हालचाल केल्याचं जाणवलं अन् ती डोळे किलकिले करत असल्याचं दिसताच पूजानं तिला दीर्घ श्वास घ्यायला आणि सोडायला सांगितलं. तसं केल्यानंतर त्या रिसेप्शनिस्टला थोडं हायसं वाटलं. तेवढ्यात कंपनीची एक स्त्री कर्मचारी घाईघाईतच तिथं पोहचली व म्हणाली, "चला तुमच्यासाठी ती बघा अँब्यूलन्स आली आहे. मला हात द्या, मी सोबत आहे तुमच्या!"
पूजाच्या मदतीने रिसेप्शनिस्ट जागेवरून उठली. आता ती बरीच सावरली होती. तरी तिला कमालीचा थकवा जाणवत होता! एव्हाना कंपनीने काही लोक तिथं गोळा झाले होते. तेवढयात त्या नामांकित कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा पोहोचले. आधीच फोनवर मिळालेल्या माहितीमुळे एकंदरीत परिस्थिती त्यांच्या लक्षात आली.

रिसेप्शनिस्ट उठून उभी झाली मात्र तिच्यात चालायचं त्राण नव्हतं! मग पूजानं तिचा एक हात आपल्या खांद्यावर घेऊन तिला चालायला मदत केली. तसेच दुसर्या बाजूने नीतू मदतीला होतीच. त्यांच्या आधी कंपनीची स्त्री कर्मचारी रिसेप्शनिस्टची बॅग घेऊन चालत अँब्युलन्सपर्यंत आली अन् तिनं अँब्युलन्सचा दरवाजा धरून ठेवला. मग पूजा आणि नीतूच्या साह्यानं रिसेप्शनिस्ट अँब्युलन्समध्ये चढली. तिनं दोघींचेही आभार मानले. सोबत असलेली स्त्री कर्मचारी चढल्यानंतर अँब्युलन्स रूग्णालयाकडे रवाना झाली. लगेच पूजा आणि नीतू माघारी वळल्या. त्या दोघींच्याही हालचाली कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरांच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं. त्यानंतर त्यांनी ताबडतोब पूजा व नीतूला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. दोघींचाही बायोडाटा त्यांच्या समोरच्या मोठ्या टेबलावर होताच.

"या, या! स्वागत आहे तुमचं. " एम. डी. दातार सर
उद् गारले.
"धन्यवाद सर!" नीतू अन् पूजा एका सूरातच म्हणाल्या.
"तुमच्यामध्ये असलेली मदतीची भावना बघून मी प्रभावित झालोय. हे बघा तुम्ही आता नि:संकोचपणे बसून घ्या, याठिकाणी कुठल्याही प्रकारची औपचारिकता नकोय. "
दातार सर त्यांच्या खूर्चीवर बसत म्हणाले. परत एकदा आभार मानत नीतू आणि पूजा त्यांच्या समोरच्या खूर्च्यांवर अवघडत बसल्या.
"खरंतर मीच तुम्हा दोघींचे आभार मानायला हवेत. तुम्ही कुणाची वाट बघत बसण्यापेक्षा तातडीने आमच्या रिसेप्शनिस्टला- टिनाला मदत केली. तिचे प्रथमोपचार केले. खरंच आजकाल कुणी एवढं करत नाही. नुसतीच बघ्याची भूमिका घेतात. दुरूनच फोटो घेण्यात सगळे मश्गूल असतात. बरं तुम्ही काय घेणार? चहा की काँफी?" दातार सरांनी टेबलावरील बेल वाजवली.
"नको सर, आम्हाला खरंच काही नको! " पूजा लगेच म्हणाली.
"हे पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय आता कसलीही औपचारिकता नको. आपण मनमोकळेपणाने बोलूया मात्र आधी चहा घेऊया.." दातार सर दिलखुलासपणे हसतच बोलले.
"चालेल सर, धन्यवाद!" नीतू अगदी सहजतेनं म्हणाली आणि शेजारी बसलेल्या पूजाकडे बघून तिनं स्मित केलं. पूजाचाही अवघडलेपणा आता दूर झाला होता. चहा घेत घेत दातार सरांनी दोघींसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली.

काही वेळाने दातार सर विषय बदलत म्हणाले, "तुम्हा दोघींचेही रिझ्यूम मी बघितले आहेत. शिक्षणातील प्रगती छानच आहे. मात्र तुम्हाला कामाचा अनुभव दिसत नाही. हरकत नाही. आमच्या प्रशिक्षण केंद्रात तुम्ही दोघी मन लावून कंपनीची कामे समजून घ्या..."
"म्हणजे सर तुम्ही आमची मुलाखत न घेताच नेमणूक पण केलीत! " आनंदानं उत्तेजित होत पूजा मध्येच बोलली. त्यावर हाताने इशारा करत दातार सर म्हणाले, "ऐका... तुमच्यासारख्या इतरांना मदत करणाऱ्या आणि होतकरू मुलींची आम्हाला आमच्या कंपनीसाठी नितांत गरज आहे. आणि बरं का, तुमच्यामध्ये असलेला आणि आजकाल सहसा न आढळणारा समयसूचकता हा गुण मगाशी मला प्रकर्षानं अनुभवायला मिळाला. तेव्हाच तुमची जागा पक्की केलीय मी! त्यामुळे इंटरव्ह्यूची फार्मालिटी आता नकोच."
"थँक्यू व्हेरी मच सर! खूप गरज होती सर या नोकरीची, तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही आता..." नीतू गहिवरून म्हणाली. बोलताना तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले! मग पूजाने आनंदाने तिचा हात आपल्या हातात घेतला.
"सो आॅल द बेस्ट ... तुम्ही अगदी उद्यापासूनच जाॅईन करावं असं मला वाटतं म्हणजे या सोमवार पासून सुरू होणाऱ्या ट्रेनिंग बॅचमध्ये तुमचा नंबर लावता येईल." दातार सरांनी नीतू व पूजाला शुभेच्छा देत म्हटलं.
"येस सर, आम्ही उद्या वेळेच्या आत पोहोचतो. थँक्यू सर!" पूजा उत्साहानं बोलली.
नंतर दोघीही आपल्या जागेवरून उठल्या परत एकदा दातार सरांचे आभार मानून केबिनबाहेर पडल्या. प्रफुल्लित चेहऱ्याने नीतू आणि पूजाने एकमेकांचं अभिनंदन केलं. आता लिफ्ट न वापरता दोघीही गप्पा करत पायर्या उतरू लागल्या. उद्या परत येण्याच्या निश्चयाने त्यांनी 'शारदा सेंटर' सोडले!

विनोद श्रा.पंचभाई

Sunday, March 29, 2020

पॅकेजच्या विळख्यात ...



पॅकेजच्या विळख्यात .....

"का रे सतीश, तुला बरं नाही का? तुझे डोळे का असे लालभडक दिसतात अन् चेहराही आकसलेला!"
"काही नाही काका. हल्ली नाईट ड्युटी असते ना, त्यामुळे सतत जागरण होत असतं. खूप कामं असतात."
"अरे मग दिवस पाळीची ड्यूटी का घेत नाहीस? किती रोडावलास रे!"
" अहो काका, आमच्या कंपनीत दिवसा ना फक्त कार्यालयीन स्टाफ असतो. चार महिन्यापूर्वी माझं ट्रेनिंग असल्याने तेव्हा दिवसा जात होतो. आता मात्र माझी रात्रपाळीच असते."
"अशी कुठली जगावेगळी कंपनी आहे तुझी? फक्त रात्रपाळी करायला सांगते."
"काका, कसं आहे ना ती युरोपियन कंपनी असल्याने तिकडे जेव्हा दिवस असतो त्यावेळी आपल्याकडे रात्र असते. मग ती कंपनी सुरू असतानाच कामं करावी लागतात आम्हाला!" सतीश जांभई देत म्हणाला.
"म्हणजे त्या विदेशी कंपनीच्या सेवेसाठी आपण आपली रात्र - रात्र जागून काढायची असंच ना! अरे किती हा आटापिटा! सतीश काय ही अवस्था करून घेतलीस स्वतःची. अरे नोकरीसाठी आपली एखादी भारतीय कंपनी का बघत नाहीस? "
"कसं आहे काका! आपल्या अनेक भारतीय कंपन्यांनी विदेशी कंपन्यांसोबत 'टाय अप' करून घेतलेलं असतं. म्हणून मग त्यांच्यासाठी कामं करावी लागतात. शिवाय भरपूर पॅकेजची आँफर असल्याने त्यांना माणसंही सहज मिळतात."
"ते ठीक आहे रे! पण मग आपल्या झोपेचं खोबरं करून, प्रकृतीची हेळसांड करून त्या कंपन्यांसाठी आपण कामं करायची ... का तर म्हणे पैसे भरपूर मिळतात. ते काय तुमचं पॅकेज भरघोस मिळतं म्हणून त्यासाठी आपलं अमूल्य आयुष्य पणाला लावायचं! काय ही जिंदगी आहे ... व्व्व्वा! "
"अहो काका, दिवसाला झोप काढतोच ना! आणि कुठलीही आय.टी. कंपनी, मग ती भारतीय असो की विदेशी असो कामं ही असणारच!" सतीश म्हणाला.

नंतर मनात विचार आला, आता कोण सांगणार या सतीशला, रात्रीची झोप ही रात्रीच काढायची असते. किती बदलली आज याची जीवनशैली! नकळत जुने दिवस आठवले... शाळेत असताना सतीश सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहानं भाग घ्यायचा. निबंध स्पर्धेत तर त्याचा पहिला नंबर ठरलेला असायचा. मग कालांतरानं महाविद्यालयातही त्यानं आपला छंद जोपासला होता. शिवाय महाविद्यालयाच्या क्रिकेट संघातर्फे सतीश खेळायचा. कितीतरी क्रिकेटच्या सामन्यात त्यानं मैदान गाजवलं होतं. अष्टपैलू म्हणून बरीच बक्षीसं त्यानं मिळवली होती. अन् आज बघतो तर जाड भिंगाचा चष्मा लावून सतत आपला लॅपटाॅप घेऊन बसलेला! किती बदलला हा सतीश! कधीकधी उगाच शंका येते, खरंच हाच तो आधीचा सतीश आहे ना. सदैव हसतमुख असलेला बोलघेवडा सतीश सतत डोळ्यापुढं येतो... त्यावेळी त्याच्या सोबत असण्यामुळे, त्याच्या बडबडीमुळे तो सगळ्यांना हवाहवासा वाटायचा. एक दिवस जर का नजरेस पडला नाही तर त्याचं नसणं लगेच जाणवायचं!

या आय.टी. क्षेत्रातल्या पॅकेजच्या नोकर्यामुळे उत्पन्न वाढलं, राहणीमान उंचावलं पण जीवनशैली मात्र कधी नव्हे इतकी विस्कळीत झाली आहे, हे विदारक सत्य मान्य करावंच लागेल! दैनंदिन वेळापत्रक बदलल्याने लोकांचं खासगी जीवन खूपच बदललं आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही नाइलाजानं त्याचा त्रास सहन करण्यावाचून पर्याय नसतो. आज आपण बघतो, सतीशसारखे कितीतरी युवक, युवती या आयटी पॅकेजच्या विळख्यात गुरफटून गेले आहेत! त्याचा मोबदला म्हणून भरपूर उत्पन्न मिळणार हे मान्य, परंतु या युवावर्गाच्या मानसिक स्थितीत झपाट्यानं बदल होत आहे ही आजची वस्तुस्थिती आहे. यावर सकारात्मक पद्धतीनं चिंतन होण्याची गरज आहे, जेणेकरून पुढे येणाऱ्या परिस्थितीवर सहजपणे मात करणे शक्य होऊ शकते! बाकी सुज्ञास सांगणे न लगे!!

विनोद श्रा. पंचभाई, पुणे
भ्र. क्र.९९२३७९७७२५.

Tuesday, March 17, 2020

पालखी माऊलीची

"पालखी माऊलीची "

पालखी निघाली माऊलीची
         वारकरी चालती पंढरीची वाट!
टाळ मृदंगासंगे निघाले शिस्तीत
       मागे पडला रम्य तो  दिवे घाट!

भान विसरोनी दिवस रात्र
शिथिल होईपर्यन्त गात्र न् गात्र!

पालथी घातली कितीक गावं अन् वने!
चालती एक दिलाने जिंकून सर्वांची मने!

काही पोहचले गड जेजूरीला
             पडण्या खंडोबाच्या पाया!
तर काही चालती संतांच्या संगे
          सोबतीला नित्य माऊलीराया!

 उत्साहाच्या भरात भाविकांनी
             सर केला उंच कडे पठार !
सगळे मिळून गर्जना करती
              जय मल्हार, जय मल्हार!

लाखोंच्या संख्येने जमले आता निरेच्या तिरी
भक्तिभावाने धुंद होती सगळे वारकरी!

पांडुरंगाची आस लागली प्रत्येकास सारखी
घेऊन निघाले उत्साहाने माऊलीची पालखी!

कधी एकदा पोहचू पंढरीला
                     मनी लागला ध्यास!
त्या विठुरायाच्या दर्शनासाठी
                   अडकला जसा श्वास !

आपसातील हेवेदावे येथे
                     खरंच किती नगण्य!
माऊलीच्या कृपेने होईल
                जीवन सगळ्यांचे धन्य!!

                    ..... विनोद श्रा. पंचभाई

Wednesday, March 11, 2020

मांगल्याचा शुभारंभ ..... गुढी पाडवा

मांगल्याचा शुभारंभ --- गुढी पाडवा सण

आपल्या भारतीय संस्कृतीत बहुतेक सर्वच सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसंच प्रत्येक सण साजरा करण्यामागे विशिष्ट हेतू असतो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला असाच एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढी पाडवा! या सणाने आपल्या नववर्षाची सुरूवातहोते म्हणजेच ख-या अर्थाने मांगल्याचा शुभारंभ होतो. त्यामुळे सगळीकडे  मनामनात नवचैतन्य निर्माण होताना दिसते! आपसातील वैरभाव विसरून, गैरसमज दूर करून अस्वस्थता, उदासीनता यावर विजय प्राप्त करणारा अन् चैतन्याची उधळण करणारा हा मंगलमय गुढी पाडवा सण !

गुढी पाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला, सदाबहार वसंत ऋतुच्या साक्षीने महाराष्ट्रासह देशभर सर्वत्र साजरा केला जातो. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीनिमित्त विजय दिन म्हणून 'संवत्सर पाडवो' या नावाने साजरा करण्यात येतो. तसंच उगादी, चेट्रीचंड इत्यादी नावानेही हा सण देशाच्या विविध भागात साजरा होतो. त्याचप्रमाणे शालिवाहन संवत्सराचा सुद्धा हा पहिला दिवस आहे. गुढी पाडवा हा पूर्ण शुभ मुहूर्त असल्याने यादिवशी नवीन वस्तूंची खरेदी तसंच नवीन उपक्रमांचा किंवा व्यवसायाचा प्रारंभ केला जातो. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणेही अतिशय लाभदायक मानले जाते. गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्राची सुरूवात होते. त्यामुळे पुढे येणाऱ्या श्रीराम जन्मोत्सवाची तयारी पण या दिवसापासून केली जाते.

या मंगलमय सणाला सांस्कृतिक इतिहास आहे. गुढी पाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदेला सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाने अखंड विश्वाची निर्मिती केली असं आपल्या वेदांमध्ये वर्णन आहे. त्यामुळे हा सण निर्मितीच्या सृजनाचाही आहे. तसंच प्रभू श्रीरामचंद्रांनी चौदा वर्षाचा वनवास भोगल्यानंतर लंकानरेश रावणाचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी गुढ्या उभारून, पताका - तोरणे लावून अयोध्या नगरी सुशोभित केली होती. याच दिवशी शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला होता! या राजाच्या नावानेच आपल्याकडे नवीन कालगणना म्हणून शालिवाहन शक सुरू झाला. या शालिवाहन शकावरच आपल्याकडील पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके आधारलेली आहेत.

गुढी पाडव्याच्या दिवशी लोक सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर गुढ्या उभारतात. गुढी उभारणीसाठी बांबूपासून काठी तयार केली जाते. ही काठी स्वच्छ धुवून तिच्या टोकाला नवीन वस्त्र किंवा साडी गुंडाळून त्यावर कडूनिंबाची डहाळी, साखरेची गाठी, आंब्याची पानं आणि फुलांचा हार घालण्यात येतो. नंतर या काठीच्या टोकावर तांब्याचा, पितळेचा किंवा चांदीचा आपल्या सोयीनुसार जसा जमेल तसा तांब्या अथवा फुलपात्र बसवले जाते. गुढी उभारायची जागा व्यवस्थितपणे स्वच्छ करून रांगोळी काढून सुशोभित करण्यात येते. मग तयार केलेली गुढी घराच्या प्रवेश द्वारावर उंच ठिकाणी उभारली जाते. काही लोक आपापल्या सोयीप्रमाणे गच्चीवर किंवा गॅलरीत सुद्धा गुढीची उभारणी करतात. नंतर गुढीला गंध, फुलं, अक्षता वाहून पूजा केली जाते. निरांजन लावून दूध साखरेचा तसंच गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटण्यात येतो. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा फुलं, अक्षता वाहून उभारलेली गुढी सावकाश उतरवली जाते! अशी ही गुढी पाडवा सणाची पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे. यादिवशी लोक उत्साहात, आनंदात सण साजरा करून एकमेकांना नववर्षा निमित्त शुभेच्छांचे आदानप्रदान करतात.

आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही गुढी पाडवा महत्त्वाचा सण मानला जातो. गुढीसाठी कडूनिंबाची पाने वापरली जातात. ही पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. गुढी उभारल्यानंतर ओवा, मीठ, हिंग, मिरे व साखर कडूनिंबाच्या पानासोबत वाटून खाण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश होणे, त्वचा रोग बरा होणे, धान्यातील कीड थांबवणे अशाप्रकारचे अनेक औषधी गुण या कडूनिंबाच्या पानात आहेत, असा आयुर्वेदात उल्लेख आहे. गुढी पाडवा हा सण ऋतुंचा राजा असलेल्या वसंत ऋतुच्या कालखंडात येत असल्यामुळे या दिवसांमध्ये चैतन्य फुललेलं असते!  सर्वत्र उत्साहाचं वातावरण असते. या वसंत ऋतुत पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. आपल्या सणांमध्ये पानं,फुलं, पत्री यांना अतिशय महत्त्व आहे. या पाना - फुलांना , झाडांना महत्त्व देण्याचा खरा उद्देश म्हणजे झाडांची निगा राखणे, त्यांचे संवर्धन करणे! पर्यायाने पर्यावरणाचेही संवर्धन होते. तद्वतच आपल्या सद् गुणांचंही संवर्धन करणे हा गुढी पाडवा साजरा करण्यामागचा उद्देश समजून घेणं गरजेचं आहे.

आपल्याकडे आजकाल एक नवीनच पद्धत अनुभवायला मिळत आहे. 'गुढी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा' किती सहजसुंदर आणि ऐकायला गोड वाटणारे शब्द आहेत... पण नाही! आम्ही 'हॅपी गुढी पाडवा' च म्हणणार! आमच्या काँन्व्हेन्टमध्ये इंग्रजी शिवाय दुसरी भाषा बोलण्याची परवानगी नाही, असं मोठ्या अभिमानाने सांगणारी एक नवीन पिढी या देशात तयार होत आहे. तसंच इंग्रजांचे गोडवे गाणारे अजूनही आपल्या देशात कमी नाहीत. त्यांना आपला सांस्कृतिक वारसा तसंच गुढी पाडव्यासारख्या सणांशी काही देणे-घेणे नसते! मात्र ३१ डिसेंबरला अशा महाभागांना सांगावं लागत नाही. इंग्रजी नववर्षाची चाहूल यांना नाताळापासूनच लागते. इंग्रजी नवीन वर्ष हे सर्व जगात साजरे केले जाते हे मान्य, पण आपल्या भारतीय नववर्षाची सुरूवात ही गुढी पाडव्यापासून होते हे आपल्याला नवीन पिढीला सांगावं लागतं, त्याची आठवण करून द्यावी लागते हे दुर्दैवच! भावी पिढी आधुनिक भारताचा आधारस्तंभ आहे असं आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो. मात्र ही पिढी सुसंस्कारित व्हावी यावर सखोल चिंतन करण्याची वेळ या गुढी पाडव्याच्या निमित्तानं येऊन ठेपली आहे इतकंच प्रामाणिकपणे सांगावंस वाटतं!

गुढी उभारूया ऐक्याची
 समाधान अन् सौख्याची!
स्वागत करूया नववर्षाचे
मनामनातल्या हर्षाचे! !

...विनोद श्रा. पंचभाई
भ्र. क्र. ९९२३७९७७२५

Tuesday, February 11, 2020

राजसभाग्य : उत्कंठा वाढवणारी भावस्पर्शी कादंबरी



उत्कंठा वाढवणारी भावस्पर्शी कादंबरी

परमेश्वरानं आपल्याला दिलेलं अनमोल जीवन, सुंदर रीतीनं जगण्यासाठी सर्वसामान्यांची अविरतपणे धडपड चाललेली असते. हे आयुष्य जगताना सगळ्यांनाच विविध टप्प्यांवर काही ना काही वळणं घ्यावीच लागतात. मात्र येणार्‍या प्रत्येक वळणावर चांगली माणसं भेटतीलच असंही नाही! लौकिकार्थानं अगदी ‘सोन्याचा चमचा’ तोंडात घेऊन आलेल्या एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सर्व सुखसोयींनी समृद्ध झालेलं आपल्या बघण्यात येतं. त्याला जन्मभर कुठल्याही गोष्टींची ददात नसते. याउलट एखाद्या व्यक्तीचं आयुष्य दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकल्यासारखं सदैव वाटेवरील काट्याकुट्यांनी भरलेलं असतं! अशावेळी आपण नियतीला किंवा नशिबाला नावं ठेऊन मोकळे होतो. राजसच्या नशिबी आलेलं दोलायमान जीवन लेखक सुनील पवार यांनी ‘राजस भाग्य’ या आपल्या कादंबरीच्या माध्यमातून अतिशय परिणामकारकरित्या अधोरेखित केलं आहे. ही वाचनीय कादंबरी पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’तर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.
अगदी नकळत्या वयात, आई जग सोडून गेल्यावर राजसची झालेली सैरभैर अवस्था, मग काही काळ लाभलेली आजीची भक्कम साथ मात्र नंतर सावत्र आई घरात आल्यानं आणि टारगट मित्रांच्या संगतीमुळं अभ्यासाकडं होणारं दुर्लक्ष, त्यामुळं वडिलांकडून मिळणारा मार इत्यादी प्रसंग जणू आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत, असं ही कादंबरी वाचताना प्रकर्षानं जाणवतं! ‘लळा, जिव्हाळा शब्दच खोटे, माशा मासा खाई! कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही!’ या गदिमा यांच्या अविस्मरणीय गीतासारखी राजसची त्यावेळी स्थिती होते.
बालपण सरल्यानंतर घडण्या-बिघडण्याच्या वयात राजसच्या सुदैवानं शेजारी राहणार्‍या मानलेल्या आईची व बहिणीची-पूर्वाची त्याला समर्थ साथ लाभते. तसंच शाळेतील वर्गशिक्षिका असलेल्या बाईंमुळं त्याची गाडी थोडी रूळावर येते. बाईंच्या आश्वासक आधारामुळं त्याच्यात आत्मविश्वास जागृत होतो. त्याच्या जगण्याला उभारी मिळते. आठवीत दोनदा नापास झालेला राजस बाईंच्या मार्गदर्शनानं आणि पूर्वाची साथ लाभल्यानं अभ्यासात कमालीची प्रगती करतो. त्याच्या वागणुकीनं वडीलसुद्धा प्रभावित होतात आणि त्याला हवी ती मदत करतात. नंतर दहावीच्या वर्गात असताना मानसी राजसच्या आयुष्यात येते. तिची साथसंगत लाभल्यानं आणि मुळातच दोघंही अभ्यासात अत्यंत हुशार असल्यामुळं मेरीटमध्ये उत्तीर्ण होतात. मात्र वीज चमकून लुप्त व्हावी तशी मानसी राजसच्या आयुष्यातून निघून जाते! हा आघात राजस मोठ्या मुश्किलीनं पचवतो आणि स्वतःला सावरतो.
महाविद्यालयाच्या स्वप्नाळू जगात राजसच्या आयुष्यात सरिता नावाची गर्भश्रीमंत मुलगी प्रवेश करते. मग अनिश्चितेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात त्याचं आयुष्य कशाप्रकारे पुढं सरकतं? राजस आणि मानसीची भेट होते का? सरिताचं पुढे काय होतं? पूर्वा आणि त्याच्या आवडत्या बाई कोणत्या भूमिका निभावतात? या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी ‘राजस भाग्य’ ही उत्कंठा वाढवणारी वाचनीय कादंबरी वाचणंच अधिक रंजक ठरणार यात शंका नाही! सहजसोपी भाषाशैली आणि प्रभावी संवाद हेच खरं ‘राजस भाग्य’चं बलस्थान आहे.
त्याचप्रमाणे ....
जोडीन मी माणसे चार..
नाही कधी घुसमटणार..
अंत:करणी भिजलो जरी..
तरी असेल हास्याची धार!!

सुकल्या त्या गुलाबाचा
गंध श्वासात भरला आहे..
आठवणीतला तो पाऊस
मी ओंजळीत धरला आहे!!

जो नित्यनेमे वाचतो, तोच जाणतो शब्द
शब्द सौंदर्यावर मन नकळत होते लुब्ध ..
लुब्ध झाले मन सहज गुंतत जाते शब्दात
शब्दात काय वर्णावे ते, भिडतात मनास शब्द!!

अशाप्रकारच्या अतिशय समर्पक चारोळ्या अन् काव्यपंक्तींची लेखकानं अधूनमधून केलेली पखरण यामुळं कादंबरीला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.
या आकर्षक कादंबरीचं अत्यंत विलोभनीय मुखपृष्ठ चितारलं आहे चित्रकार संतोष घोंगडे यांनी! ‘राजस भाग्य’ सर्वार्थानं वाचनीय ठरल्यानं ही कादंबरी वाचकांच्या पुस्तकांच्या खजिन्यात संग्रही असायला हवी.
- विनोद श्रा.पंचभाई, वारजे, पुणे
- राजस भाग्य
लेखक - सुनील पवार
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे
7057292092
पाने 264 - मूल्य 250

Tuesday, January 28, 2020

मुलं खोटं का बोलतात?

मुलं खोटं का बोलतात ?

आपण लहान मुलांना 'नेहमी खरं बोलावं' असंच सांगत असतो. मात्र आपल्याला हवं तेव्हा आपण मुलांशी खोटं बोलतो. अगदी साधी गोष्ट बघा... जेव्हा मुलं एखादी गोष्ट आणि त्यामागची कारणं विचारतात तेव्हा आपण त्यांना आपल्या सोयीनं हवं ते सांगतो. लहान मुलं अनुकरणप्रिय असल्यानं मोठ्यांची वागणूक पाहूनच ते शिकत असतात. त्यामुळे त्यांना योग्य वेळी चांगली वागणूक मिळाली नाही तर दुर्दैवानं त्यांचं नुकसान होऊ शकतं! त्यासाठी पालकांनी काय करायला हवं? मुलांशी कसं वागायला हवं ? यावर अतिशय गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे.

 कधीकधी मुलांच्या कलानं घेणं, त्यांचंही ऐकून घेणं गरजेचं ठरतं. तर कधी त्यांच्याशी समजावणीच्या सुरात बोलणं अन् अगदीच पर्याय नसेल तेव्हा प्रसंग पाहून थोडं कठोर होणंही स्वाभाविक ठरतं! लहान मुलं आपलं बोलणं, वागणं हे त्यांच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून शिकत असतात. आपलं वागणं आणि घरच्यांशी किंवा इतरांसोबत बोलणं हे त्यांच्यासाठी सारखंच असतं! त्यामुळेच घरातील मोठ्यांनी वागण्याबाबत आणि बोलण्याबाबत स्वतः दक्ष राहणं जरूरीचं ठरतं!

काही काही घरातील वातावरण अतिशय कडक असतं. अशावेळी मुलं त्यांच्याकडून नकळत घडलेल्या चूका मोकळेपणानं पालकांना सांगू शकत नाही. मुलांकडून एखादी चूक घडली तरी ते खूप घाबरेघुबरे होतात. रडकुंडीला येतात. घरात वातावरण कडक असल्यानं आपल्या चुकीला माफी मिळणार नाही, त्यासाठी शिक्षा होणारच अशाप्रकारचा गैरसमज अथवा न्यूनगंड मुलांच्या मनात पटकन येतो! तेव्हा ही संवेदनशील मुलं ती चूक लपवण्यासाठी खोटं बोलायला शिकतात.

घरातील मोठ्यांकडून काही चूका झाल्या तरी त्यांना शिक्षा होत नसते, परंतु आपल्याकडून छोटीशी चूक झाली तरी मार खावा लागतो अशी समजूत मुलं करून घेतात. मग अशावेळी त्यांच्या मनात मोठ्यांबद्दल राग निर्माण होण्यास वेळ लागत नाही. एकप्रकारची अढी निर्माण होऊ शकते... आणि हे होणं स्वाभाविकच आहे. आपण खरं सांगायचा प्रयत्न केला तरीही आपल्याला मार बसणार, त्यापेक्षा आपण काही गोष्टी लपवून ठेवायला हव्यात अशी त्यांची भावना होते. मग हळूहळू मुलांना खोटं बोलायची सवय जडते!

आजच्या परिस्थितीत मुलांकडून एखाद् दुसरी चूक झाली किंवा त्यांच्याकडून आपल्या मनाविरूद्ध काहीही घडले तरी पालकांनी समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. 'तुझ्याकडून चूक झाली असेल रे पण तू खरं काय ते सांग, मी तुला मारणार नाही! ' असं पालकांनी बोलणं हे मुलांना खरं बोलायला मदत करणारच ठरणार हे निश्चित!  ऊठसूट रागावणं, मारणं हा काही मुलांना सुधारण्याचा पर्याय ठरु शकत नाही. उलट मुलांवर त्याचा नकारात्मक आणि वाईट परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आजच्या सुशिक्षित आणि सुज्ञ पालकांनी समजून घ्यायला हवं!

"इस दुनियामे कुछ तो अच्छा रहने दो!
    बच्चोंको बस बच्चों जैसा जीने दो!!

... विनोद श्रा. पंचभाई
भ्र.क्र. ९९२३७९७७२५