Tuesday, April 30, 2019

वाचनाने मला काय दिले...

वाचनाने मला काय दिले...

असं म्हणतात...एखादे पुस्तक  एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. अन मला वाटतं हे अगदी खरंय !
कारण लहानपणापासून आतापर्यंत माझ्या वाचनात बरीच पुस्तकं आली आहेत. मात्र थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे "अग्नीपंख" हे पुस्तक जेव्हा मी वाचले त्यावेळी एक प्रकारची ऊर्जाच  मिळाली. जगण्याला जणू चालना मिळाली. आगळी वेगळी उर्मी, उत्साह अंगात संचारल्यासारखं वाटलं ! नैराश्य कुठल्या कुठे पळून गेलं !

अग्नीपंख " हे खरंतर डॉ. कलाम यांच आत्मचरित्र आहे. हे पुस्तक वाचताना  त्यांनी अगदी बालपणापासून केलेला जीवनसंघर्ष,  शिक्षणासाठीची त्यांची प्रामाणिक धडपड आपल्याला एक नवी दिशा देते. एस. एल. व्ही.  या भारतीय बनावटीच्या पहिल्या प्रक्षेपणास्त्र  वाहकाच्या अत्यंत अवघड निर्मितीच्या वेळी  डॉ. कलाम यांना सुरुवातीला अपयश आले. मात्र खचून न जाता त्यांनी त्या संबंधीच्या संशोधनात स्वतःला  झोकून दिले. आणि आपल्या सहकाऱ्यासह अतिशय परिश्रम घेऊन एस. एल. व्ही.ची निर्मिती केली. यावरून आपल्याला जीवनाकडे
बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो हे नक्की !

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक "मु°शी प्रेमचंद" यांचे 'गोदान' हे  त्यावेळेसचे लोकप्रिय पुस्तक वाचण्यात आले. अतिशय गरीब परिस्थितीत रोजचा जगण्याचा जीवघेणा संघर्ष, दोन
वेळच्या जेवणासाठी करावा लागणारा आटापिटा तर कधीकधी मजबूरीने  उपाशी राहण्यासाठी केलेली मानसिकता हे प्रसंग वाचताना त्यावेळेस विद्यार्थीदशेत 'गोदान' मधून बरेच काही शिकायला मिळाले. कुठल्याही परिस्थितीशी दोन हात कसे करायचे याबाबत जणू मार्गदर्शन लाभले. नंतरही  'प्रेमचंद' यांच्या बऱ्याच कथा वाचण्यात आल्या. त्यातून सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत खंबीर कसे राहायला हवे याचे अमूल्य असे धडे मिळाले.

साने गुरुजी यांचे "श्यामची आई" म्हणजे अखिल विश्वातील आईसाठी आदर्श उदाहरणच! जे कोणी हे पुस्तक वाचतील  ते नक्कीच अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही. "एक होता कार्वर" हेही असेच खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा  "ग्रामगीता" ग्रंथ तर सर्वसामान्यांना संपूर्ण जीवनाचे सोप्या भाषेत तत्वज्ञान सांगते एवढं त्यात सामर्थ्य आहे. राष्ट्रसंतानी ग्रामगीतेतून  अगदी छोट्या छोट्या ओव्यामधून अतिशय प्रेरणादायी उपदेश देऊन कर्मयोगाला प्राधान्य दिले आहे. "ग्रामगीता नाही पारायणासि...वाचता वाट दावी जनासि!!" हे सांगताना राष्ट्रसंतानी निरर्थक कर्मकांड कुचकामी ठरविले आहे.

  "एक तरी अंगी असू दे कला!
नाही तर काय फुका जल्मला!!" असा इशारा देतानाच राष्ट्रसंतानी....
 "मुलात एखादा तरी असावा गुण!
 ज्यात पोट भरेल त्यात निपुण!
न ये संसारामाजी अडचण! कोणत्याही परि!!" आणि
"मुलगी बहु शिकली शाळेमाझारी!
परि स्वयंपाक करता न ये घरी !
काय करावी विद्या चातुरी? कामाविण लंगडी ती!!
अशाप्रकारे विद्यार्थी दशेपासून अनमोल संस्कार दिलेले आहेत. म्हणूनच ग्रामगीतेचा माझ्यावर विशेष प्रभाव आहे.

मला वाचनाची आवड असल्याने कुठल्याही व्यसनापासून दूर राहण्याचा जीवनात खूप मोठा फायदा झाला आहे. कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने माणूस जेव्हा नैराश्यच्या आहारी जातो, तेव्हा त्याला कुठले तरी व्यसन सहज जडते. मात्र तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर व्यसनापासून तुम्ही निश्चितच दूर राहू शकता हे मी स्वानुभवाने सांगतो. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडण्यास मदतच होते हे मुद्दाम आवर्जून सांगावेसे वाटते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे याविषयी एक खूपच मार्मिक वाक्य आहे... "वाचन हे आपल्याला एकांतात सांगोपांग  विचार करण्याचा निखळ आनंद देते !"

                     ......  विनोद श्रा. पंचभाई
                              तपोवन,  वारजे, पुणे
                           मो. 9923797725

Monday, April 22, 2019

हम साथ साथ है....


    हम साथ साथ है...
या जगात प्रत्येकावरच कधी ना कधी अशी वेळ येते, की त्यावेळी त्याला खूप एकटं एकटं वाटतं! जगण्यातच राम वाटत नाही... कुणाचं काही ऐकून घ्यावसं वाटत नाही अन् कुणाशी बोलावंसंही वाटत नाही. अशावेळी कुणी मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, कोणीही आपला वाटत नाही. सगळं जगच परकं वाटतं.!

अशा या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी सुदैवानं कोणी आपल्याला समजून घेणारं भेटलं, तरच आपली 'नैया' पार होऊ शकते..! त्याचप्रमाणे आपल्या दु:खाच्या प्रसंगी जवळचा कोण, परका कोण याचीही खरी ओळख होत असते. एक प्रसंग येथे मुद्दाम नमूद करावासा वाटतो...  जवळचे एक नातेवाईक गंभीर आजाराने त्रस्त असल्याने त्यांना एका नामांकित दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टर त्यांचे व्यवस्थित उपचार करत होते. त्यावेळी त्यांच्या संपर्कातील बरीच मित्रमंडळी भेटायला यायची. तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांशी काहीतरी वाद किंवा मतभेद असल्याने त्यांच्याशी न बोलणारे सुद्धा त्यांना भेटायला यायचे. ते बघून खरोखरीच त्यांचं कौतुक करावंसं वाटलं. मात्र अशाप्रकारच्या घटना अपवादानेच बघायला मिळतात. 

       लग्न समारंभ किंवा इतर सुखद प्रसंगात आप्तस्वकीय, नातेवाईक इत्यादी एकत्र येत असतात. त्यावेळी तेथे गप्पांंना ऊत आलेला असतो. मग त्याठिकाणी हजर न राहू शकलेल्या नातेवाईकांबद्दल 
 बरीच चर्चा होते. काही लोक त्यांंच्या कागाळ्या करणे तसंच ते कसे वाईट आहेत याचंच चर्वितचर्वण  करताना दिसतात. मग त्या ठिकाणी नसलेल्या 'त्या' नातेवाईकांच्या स्नेहीजणांच्या कानावर ही गोष्ट पडते आणि वादविवाद सुरु होतात. कधीकधी तर आपसातील वाद इतके विकोपाला जातात, की हमरीतुमरीवरुन मारामारीचे प्रसंगही उद्भवतात! अशाप्रकारच्या निरर्थक वाद घालण्याला खरंतर काहीच अर्थ नसतो. उलट त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या इतर निमंत्रित लोकांचे मनोरंजन होते! असे वाद सामंजस्याने टाळलेही जाऊ शकतात, पण कुणीही पुढाकार घेण्यास तयार नसतो.

दुर्दैवाने आपल्या मित्रांपैकी किंवा नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीचे निधन होते! अशावेळी बरेच ओळखीचे तसेच अनोळखी लोक सुद्धा त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र येतात. त्यांचे जवळचे जिवाभावाचे मित्र गोळा होतात. तसेच   त्यांच्यासोबत शत्रूप्रमाणे वागणारे लोकही तेथे उपस्थित असलेले दिसतात. अशा प्रसंगात आपसातील मतभेद विसरून, आपसात चर्चा करून तो प्रसंग निभावून नेताना आपल्या बघण्यात येते. त्यावेळी आपसात न बोलणारे सुद्धा भूतकाळ विसरून सलोख्याने वागताना दिसतात.

याठिकाणी सांगण्यासारखा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की आपण फक्त दु:खाच्या प्रसंगी किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगीच आपसातील मतभेद विसरून अगदी सामोपचाराने वागतो. त्याचप्रमाणे नेहमीसाठी जर गोडीगुलाबीने राहिलो तर आपलं जगणं किती सुखकर होईल हाही विचार व्हायला हवा. मतभेद तर प्रत्येक ठिकाणी असतातच. ते शांतपणे सोडवलेही जाऊ शकतात. आवश्यकता आहे , आपला अहम् पणा सोडून पुढाकार घेण्याची! कुणीतरी एकाने जर नम्रपणे पुढाकार घेतला तर सगळ्या प्रक्रिया सहज घडू शकतात.  नंतर सामंजस्याने चर्चा करून त्यावर निर्णायक तोडगा निश्चितच काढला जाऊ शकतो. अगदी क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद नक्कीच टाळता येतात..! 

   कुटुंब म्हणा किंवा समाज म्हणा , त्यातील सर्वजण मिळून मिसळून एकत्र राहिले तर एकीमध्ये किती शक्ती आहे याचा प्रत्यय आल्यावाचून  राहणार नाही. किरकोळ वाद कधीही मिटवण्यासाठी थोरामोठ्यांंचा सल्ला अशावेळी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे आपसातील सलोखा वाढण्यास मोलाची मदतच होईल.... तेव्हाच खर्या अर्थाने आपण म्हणू शकणार...'हम साथ साथ है!'

                                           .... विनोद श्रा.पंचभाई 



  



Monday, April 1, 2019

राम जन्मला गं सखे....


राम जन्मला गं सखे...

"लळा जिव्हाळा शब्दच खोटे
मासा माशा खाई !
कुणी कुणाचे नाही राजा
कुणी कुणाचे नाही!!" 
यासारखी अतिशय अर्थपूर्ण, भावपूर्ण आणि अजरामर गाणी लिहिणारे गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात आधुनिक वाल्मिकी गदिमा! दरवर्षी रामनवमीचा मंगलमय सण जवळ आला की गदिमांच्या अविस्मरणीय अशा 'गीतरामायण' मधील गीते सर्वत्र कानी पडू लागतात. सगळीकडच्या परिसरातील वातावरण अक्षरशः राममय होऊन जाते! या अभूतपूर्व अशा गीतरामायणात एकूण ५६ गीतांच्या रचनांंचा समावेश आहे. साक्षात सरस्वती माता प्रसन्न असणाऱ्या गदिमांनी त्यांच्या काळात गीतरामायणातील एक एक पद लिहायला सुरुवात केली. त्यांच्या गीतांमधील शब्दाशब्दात अत्यंत गहन अर्थ भरलेला आपल्याला दिसून येतो.

गीतरामायणाचा कार्यक्रम सर्वप्रथम १ एप्रिल १९५५ रोजी रामनवमीच्या दिवशी पुणे आकाशवाणी केंद्रावर
प्रसारित करण्यात आला. त्या प्रसंगीचा अनुभव सांगताना स्वतः गदिमा म्हणतात..."गीतरामायण आकाशवाणीवर प्रसारित करण्याचा पहिलाच दिवस होता. पहिलं गीत लिहून, चाल लावून तयार होतं. बाबुजींनी फक्त सादर करण्याचा अवकाश होता. आकाशवाणीने प्रसारणाच्या सर्व वेळा आधीच जाहीर केल्या होत्या. आणि रामायणाचे गीतरुपांतर ऐकायला अनेक जण उत्सुकतेने वाट बघत होते दहा वाजण्याची! मात्र अचानक एक अडचण उद् भवली... सकाळी आकाशवाणी केंद्रावर ऐनवेळी गाण्याची प्रतच सापडेना."  भरपूर शोध घेतला पण सगळं व्यर्थ! प्रसारणाची वेळ जवळ येत होती. काय करावं कुणाला काही सुचत नव्हतं. मग केवळ अर्ध्या तासाच्या आत प्रतिभावंत गदिमांनी नवीन गीत लिहून काढलं. त्या गीताला लगेच बाबुजींनी म्हणजे गायक-संगीतकार सुधीर फडके यांनी एक अजरामर चाल लावली. त्यानंतर प्रसारणाच्या अगदी वेळेवर त्यांनी सादर केलं एक नितांत सुंदर अन् अजरामर गीत... " स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती!"

अशीच एक विलक्षण आठवण... गदिमांच्या सहधर्मचारिणी विद्याताई माडगूळकर यांनी सांगितलेली... 
स्थळ - पुण्याच्या पाषाण विभागाजवळ असलेला निसर्गरम्य पंचवटी परिसर. तेथील गदिमांचे निवासस्थान. त्यावेळी गदिमांना गीतरामायणातील रामजन्माचा प्रसंग लिहायचा होता. सकाळी उठल्यानंतर सर्व आवरुन गदिमांनी आंघोळ उरकली. नंतर त्यांनी चहा, नाश्ता घेतला. मग आपल्या लिखाणाचं साहित्य घेऊन गदिमांनी बैठक मारली. त्यांचं चिंतन, मनन सुरू झालं. विचार करता करता दोन प्रहर उलटले. गीतरामायणात एकूण ५६ गीते गदिमांनी लिहिली आहेत, पण गीतातील शब्द सुचायला त्यांना कधी वेळ लागला किंवा त्रास झाला असं कधीच झालं नव्हतं. यावेळी मात्र त्यांना समर्पक शब्द सुचत नव्हते.

काही वेळाने गदिमा घराच्या आवारातील तुळशी वृंदावनाजवळच्या कट्ट्यावर जाऊन बसले. थोड्या वेळातच दिवेलागणीची वेळ झाल्यानं तिथं काळोख पसरू लागला...मात्र कागदावर एक शब्दही उमटू शकला नाही! गदिमा आपल्याच तंद्रीत होते ! अंधार पडायला लागल्यानं घरातील कुणीतरी आवारात इलेक्ट्रीक बल्बची सोय केली. गदिमा विचार करत थोड्या येरझारा घालायचे आणि पुन्हा कट्ट्यावर बसायचे. रामजन्माचा प्रसंग हा एकच विषय त्यांच्या डोक्यात पिंगा घालत होता... मनात तोच विषय घोळत होता! दुसरं काही सुचत नव्हतं.

बघता बघता मध्यरात्र उलटली! विद्याताईंंना अचानक जाग आली. त्यांनी माडीवरच्या खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं. गदिमा आपल्याच तंद्रीत बसलेले त्यांना दिसून आले. तेव्हा त्यांनी आवाज देऊन सहज गमतीनं विचारलं... "झाला की नाही रामजन्म...?"
सौ.चा आवाज कानी पडताच गदिमा उद् गारले, "हा कुण्या माडगूळकरांच्या घराण्यातील जन्म नव्हे, तर प्रत्यक्ष प्रभुरामचंद्र जन्माला यायचे आहेत. कळलं का..?"

गदिमांची जणू समाधी लागली होती. काही वेळाने त्यांनी आपल्याच तंद्रीत विचार करता करता लेखणी उचलली. मग पहाटेच्या त्या आल्हाददायक प्रहरी कागदावर शब्द उमटू लागले....
" चैत्रमास, त्यात शुध्द नवमी ही तिथी
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती !
दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला?
राम जन्मला गं सखे राम जन्मला!!"

                      
                      विनोद श्रा. पंचभाई
                   1/3 बी, तपोवन सोसायटी
                   तपोधाम रोड, वारजे, पुणे-58
                   मो. क्र. 9923797725