समर्पण
एकदा संत कबीर महाराजांकडे एक यूवक आला. त्यानं थोडं संकोचत, चाचरतच संत कबीरांना विचारलं...
"महाराज मला एक गंभीर स्वरूपाचा प्रश्न पडला आहे. प्रश्न थोडा खाजगी आहे. तुम्हाला विचारला तर चालेल का?"
"अरे जीवन जगत असताना आपल्याला प्रश्न पडायलाच हवेत. तू नि:संकोच विचार!" कबीर महाराज त्याला आश्वस्त करत बोलले.
"महाराज, मी सध्या द्विधा मनस्थितीत सापडलो आहे. माझा प्रश्न असा आहे की, विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?"
प्रश्न विचारल्यावर आता महाराज काय उत्तर देतात, याबाबत त्या युवकाला खूप उत्सुकता होती. मात्र त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं करत संत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने अत्यंत अधीर होऊन त्या युवकाने परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळी सुद्धा संत कबीरांनी काही उत्तर न देता घरात असलेल्या आपल्या पत्नीला हाक मारली आणि ते म्हणाले...
"अगं आतून तो कंदील घेऊन ये इकडे."
त्यावेळी त्या युवकाला मोठं आश्चर्य वाटलं. आपल्याकडे साफ दुर्लक्ष करत महाराजांचं हे काय चाललंय असं त्याला वाटलं. मग मात्र न राहवून त्यानं विचारलंच...
"महाराज आता दिवसाढवळ्या कंदिलाची काय गरज आहे? एवढ्या उजेडात तर सगळं काही स्वच्छ दिसतंय ना!"
त्यावर कबीरांनी हसतच त्याला उत्तर दिलं...
"बेटा! ऐक आता, हेच तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विवाह करताना स्वतःमध्ये पूर्ण समर्पणाचा भाव असणं आवश्यक आहे. तेथे तर्कवितर्क, शंकाकुशंका अशा प्रकारच्या क्षुल्लक गोष्टींना अजिबात थारा नकोच… मी माझ्या पत्नीला आतून कंदील आणायला सांगितला, तिनं तो लगेच आणला सुद्धा! 'कशाला पाहिजे?', 'दिवसा कंदिलाची काय गरज?' अशाप्रकारचे विनाकारण प्रश्न विचारून तिनं शंका उपस्थित केली नाही. तर तिनं कंदील तात्काळ आणून दिला. अशाप्रकारचा समर्पण भाव संसार करताना दोघातही असायला हवा. हा समर्पण भाव तुझ्यामध्ये आणि तुझ्या होणाऱ्या अर्धांगिनीत असल्यास तू निश्चितच विवाह करू शकतोस!"
संत कबीर महाराजांची वाणी ऐकून त्या युवकाला आपण कृतकृत्य झाल्याचं वाटलं, त्याचं पूर्ण समाधान झालं होतं! संत कबीरांना वंदन करून तो तिथून बाहेर पडला.
या प्रसंगावरून आपल्या असं लक्षात येईल की, संसार करताना समर्पण अन् विश्वास किती गरजेचा आहे. आजच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात एकमेकांवरील विश्वासाची भावना कमी होताना दिसत आहे. त्याऐवजी आजकाल निरनिराळ्या शंकाकुशंका विचारून एक दुसऱ्याला भंडावून सोडणं, अगदी क्षुल्लक कारणांवरून भांडण करणं असे प्रकार सर्रास होताना दिसू लागले आहेत. याला कारणंही तशीच आहेत... आपल्या आजूबाजूला नित्यनेमाने घडणाऱ्या दुर्दैवी घटना, प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या अतिरंजित बातम्या तसेच दुरदर्शन संचाच्या विविध वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या ताणतणाव वाढवणाऱ्या मालिका यामुळे नाही म्हटलं तरी सर्वसामान्य जनतेच्या भावना विचलीत होतातच. त्यामुळे मग काही प्रमाणात का होईना आपले विचार कुंठित होण्यास वाव मिळतो. एकदा का आपली सारासार विचार करण्याची शक्ती आणि बुद्धी भ्रमित झाली की तिथं निरनिराळ्या शंकाकुशंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. हे आजचं कटू वास्तव आहे यात शंकाच नाही!
डॉक्टर अभिजित गाढ झोपेत असताना पहाटे पहाटे त्यांचा मोबाईल वाजल्याने अनिच्छेनंच त्यांनी फोन उचलला. काही बोलायच्या आधीच त्यांना पलीकडून आवाज आला ...
"सर, सर मी रागिणी बोलतेय. कालचा तो पेशन्ट रमेश कसातरीच करतोय ... सारखा हात पाय झाडत आहे सर. तुम्ही सांगितलेलं औषध देण्याचा प्रयत्न केला तर तेही घेत नाही तो आणि..."
तिला पुढचं बोलू न देता डॉ. अभिजित लगेच म्हणाले ...
"हे बघ रागिणी, तू अशी घाबरून जाऊ नकोस. असं कर आता, त्याला अँटीबायोटिक्सचं इंजेक्शन सलाईनमधून दे तोपर्यंत मी पोहचतोच."
"ओके सर,थँक्स! करून घेते मी."
पाचोरासारख्या तालुक्याच्या छोट्या शहरात डॉ. अभिजित यांनी दोन वर्षांपूर्वी आपलं क्लिनिक सुरू केलं होतं. पन्नाशी ओलांडलेले डॉ. अभिजित मुंबईच्या एका बड्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला कंटाळून तिथली आरामाची नोकरी सोडून परत आले होते. त्यांनी त्यावेळी ठरवून टाकलं होतं... काहीही झालं तरी आपण आपल्या कर्तव्याशी तडजोड करायची नाही, आपलं काम प्रामाणिकपणे, अगदी समर्पित भावनेनं आणि निष्ठेनं करायचं!
आपल्या क्लिनिकमध्ये पोहचताच डॉ. अभिजित तडक रमेशच्या
बेडजवळ गेले. तिथं रागिणी त्यांचीच वाट पाहत उभी होती. डॉक्टरांना बघताच ती म्हणाली,
"सर मी मगाशी इंजेक्शन दिलंय, नुकतीच झोप लागली आहे त्याला!"
"ओके! आपण त्याच्या काही टेस्ट घेऊयात, तू त्या पॅथेलॉजीला फोन करून कोणाला तरी सॅम्पल घ्यायला बोलावून घे." डॉ. अभिजित रमेशची तपासणी करता करता बोलले.
"येस सर! लगेच बोलावून घेते." रागिणी तत्परतेनं म्हणाली. ती हातात मोबाईल घेऊन पलीकडे वळणार तोच डॉ. अभिजित यांनी तिला अचानक विचारलं...
"बरं याच्याकडील कोणी नातेवाईक वगैरे आले की नाही?"
"अं, नाही ना सर. याला इथं दाखल करायला सोबत आलेला कालचा तो माणूस पण तुम्ही निघाल्यावर बाहेर पडला. तेव्हापासून तो आलाच नाही."
"ओह... आय सी!" डॉ. अभिजित उदगारले. विचार करतच ते आपल्या केबिनमध्ये जाऊन बसले. नुकतंच उजाडलं असल्यामुळे सर्वत्र शांतता पसरली होती. डोळे मिटून शांतपणे विचार करता करता दोन दिवसापूर्वीच संपन्न झालेल्या व्याख्यानमालेचा कार्यक्रम डॉक्टर अभिजित यांच्या डोळयांसमोर तरळला आणि त्यातील प्रोफेसर सरदेसाई यांची मनाचा ठाव घेणारी प्रभावी वाक्यं त्यांना आठवू लागली ...
"सध्याच्या अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे अतिसुशिक्षित माणूस एकप्रकारे आत्मकेंद्रित होऊ लागला आहे. कधी नव्हे इतका तो आपमतलबी सुद्धा होत चालला आहे अन् त्यामुळे जवळच्या नात्यातील दुरावा वाढत चालला आहे असंही आपल्याला हल्ली निदर्शनास येईल. कधीकाळी आपल्या मित्रपरिवारात किंवा आपल्या नातेवाईक मंडळीत सुद्धा आनंदानं रमणारा हा माणूस आज मात्र भलताच आत्मकेंद्रित झालेला दिसून येतो! हा झालेला बदल अचानक एका रात्रीत घडणे शक्य नाही. त्याची निरनिराळी कारणं असल्याचं आपल्या लक्षात येईल. आजूबाजूची परिस्थिती, आयुष्यात अचानक घडलेल्या अप्रिय घटना, जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू तसेच केवळ ऐकीव माहितीच्या आधारे इतरांविषयी झालेले गैरसमज या गोष्टीही कारणीभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे दूरदर्शनच्या निरनिराळ्या चॅनलवरील विविध मालिकांच्या भडिमारामुळे, त्यातून दाखवल्या जाणाऱ्या परिणामकारक दृश्यांची आजचा हा शिकला-सवरलेला माणूस आपल्या खासगी आयुष्याशी तुलना करू लागतो. अशावेळी मात्र तो आपली सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवतो. तसंच समाज माध्यमांमार्फत सतत कानावर पडणाऱ्या बातम्या, वृत्तपत्रांतून वाचण्यात आलेले अतिरंजित प्रसंग याचाही त्याच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही."
"आज आपणा सर्वांनाच माहिती आहे, महिन्याला लाख - दीड लाख रूपये उत्पन्न असणारी व्यक्ती सुद्धा सुखासमाधानात जगताना दिसत नाही. मग सारखी अस्वस्थता, निद्रानाश, ताणतणाव, साशंकता, भीती इत्यादी कारणांमुळे स्वभावात एकप्रकारचा चिडचिडेपणा निर्माण होतो. कालांतराने मग अशी व्यक्ती नैराश्याच्या आहारी जाते. याउलट अगदी हातावर पोट असणारा मजूर वर्ग मात्र आपल्याला शांतपणे जगताना दिसतो. दिवसभर शारिरीक श्रमाची कामे करुन तो रात्री शांतपणे झोपी जातो. त्याला ना चोरांचं भय असतं ना कुठली चिंता असते. रात्री त्याला ना चॅटिंग करण्यात स्वारस्य असते ना तो कुठला क्रिकेटचा सामना बघत जागत असतो ... तर जमिनीवरच मस्तपैकी ताणून देतो. कारण हातावर पोट असलेल्या त्याला सकाळी लवकर कामावर जाण्याची घाई असते. जेवढं आपण जास्त श्रम करू तेवढे जास्त प्रमाणात पैसे मिळणार हे त्याला ठाऊक असतं. म्हणूनच त्याला त्याच्या कामाप्रती एकप्रकारचा समर्पण भाव असतो. त्यामुळे तो अगदी जीव ओतून काम करतो! मग संध्याकाळी आपल्या श्रमाचा मोबदला घेऊनच तो समाधानाने घरी परततो."
"आधीच्या काळात शाळेतील शिक्षक आजच्यासारख्या शिकवण्या न घेता विद्यार्थ्यांना मनापासून शिकवायचे. त्यांना घडवायचे. त्यावेळी शिकवताना ते तल्लीन व्हायचे... स्वतःला झोकून द्यायचे. अशाप्रकारची समर्पित वृत्ती आजच्या शिक्षकांमध्ये अभावानेच आढळून येते. पूर्ण समर्पित भावनेनं शिकवणारे शिक्षक म्हणून याठिकाणी साने गुरुजी यांचं उदाहरण देता येईल. त्यांना मुलांचं मानसशास्त्र अतिशय उत्तमप्रकारे अवगत होतं. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. तसेच आचार्य अत्रे ज्यावेळी शिक्षकीपेशात होते तेव्हा त्यांनी त्यावेळच्या विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांच्यासाठी त्यावेळी 'नवयुग वाचनमाला' सुरू केली होती... ती विद्यार्थी घडवण्याच्या त्यांच्या तळमळीमुळेच! त्याचा परिणाम असा झाला, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने फायदा तर झालाच, शिवाय त्यांना वाचनाची सुद्धा गोडी लागली. अशाप्रकारचे विद्यार्थ्यांची खरी 'नाडी' ओळखणारे शिक्षक आज मात्र खरंच शोधावे लागतात ही वस्तुस्थिती आहे!"
"आज आपण सर्वत्र बघतो, कुठलंही क्षेत्र घ्या... आपलं काम करताना 'शाॅर्टकट मेथड' वापरण्याची वृत्ती फोफावताना दिसून येते. त्यामुळे त्या केलेल्या कार्यात 'क्वालिटी' आढळण्याची शक्यता फारच कमी असते. नवीन इमारतींच्या बांधकामाचं उदाहरण याठिकाणी देता येईल. मात्र काही प्रमाणात याला अपवादही असतात, नाही असं नाही. सरसकट सर्वच लोक 'टाईमपास' प्रकारचे काम न करता अगदी मनापासून आपलं काम करणारे पण आपल्या बघण्यात येतातच! तरीसुद्धा आपल्या कामाप्रती आधीसारखी असलेली समर्पित वृत्ती आजकाल कुठंतरी लुप्त झाली की काय अशी आज एकंदर परिस्थिती उदभवली आहे. कारण कसंतरी चालढकल करून आपलं काम करायचं आणि महिनाअखेर जास्त मोबदल्याची अपेक्षा ठेवण्याची वृत्ती आज सर्वच क्षेत्रात वाढली आहे... आणि यामुळेच कामाप्रती असलेला समर्पण भाव लुप्त होताना दिसतो आहे."
"येणाऱ्या पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवण्यासाठी, आपला समाज समृद्ध आणि सुदृढ करण्यासाठी आपणच ध्यास घ्यायला हवा. त्यासाठी आपण समर्पित भावनेनं कार्य करण्याची आपल्यापासूनच सुरूवात करण्याचा आज संकल्प करूया. आपल्या आदरणीय पूर्वजांपासून प्रेरणा घेऊन आपलं सामाजिक दायित्व पार पाडण्याचा आपण आजच निर्धार करूया … "
अचानक मोबाईल फोनची रिंग वाजल्यानं डॉ. अभिजित यांची विचारशृंखला खंडित झाली. त्यांनी मोबाईल उचलला. गॅलक्सी पॅथेलॉजीचा कॉल येत असल्याचं दिसताच मोबाईल कानाला लावत ते म्हणाले...
"हं बोला धनंजय, काय म्हणता."
"सर गुडमॉर्निंग! सगळे रिपोर्ट तसे नॉर्मलच आढळून आलेत. मी तुम्हाला व्हाट्सअप केलं आहे सर!"
"ओके! मी बघून घेतो... थँक्स धनंजय."
आपल्या मोबाईलमधील टेस्ट रिपोर्टवर नजर फिरवल्यानंतर डॉक्टर अभिजित यांनी सवयीनुसार भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. सकाळचे साडेसहा वाजले होते. ते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी एकदा रमेशच्या बेडकडे डोकावून बघितलं. तो गाढ झोपलेला त्यांना दिसला. तसंच पलीकडच्या टेबलावर डोकं ठेवून खुर्चीवर बसलेली रागिणी त्यांच्या नजरेस पडली. बहुधा तिचा डोळा लागला असावा असा विचार करत डॉ. अभिजित स्वतःच क्लिनिकबाहेर पडले आणि सरळ समोरच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेले. त्यांना आवश्यक त्या वस्तूची यादी तिथल्या माणसाला सांगितली. मग त्या सर्व वस्तू शक्य तितक्या लवकर क्लिनिकमध्ये पाठवायला सांगून डॉक्टर आपल्या क्लिनिकमध्ये परतले.
आत येणाऱ्या डॉक्टरांची चाहूल लागताच रागिणी तत्परतेनं जागेवरून उठली. ते लक्षात येताच डॉ. अभिजित म्हणाले…
“अगं उठू नकोस…रिलॅक्स! आता थोडी विश्रांती घे… नंतर आपल्याला याच्या अपघातग्रस्त पायाचं ऑपरेशन करावं लागणार आहे! त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूची यादी समोर देऊनच आलोय मी आता.”
“सर तुम्ही मला सांगायचं होतं ना… मी गेले असते त्या मेडिकल शॉपमध्ये.”
“रागिणी, तू रात्रभर आपल्या पेशन्ट्सकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवून असतेस याची मला जाणीव आहे… आता ना खरंच तू थोडा आराम कर,
बरं का!” डॉ. अभिजित तिला समजावणीच्या सुरात म्हणाले.
“करते सर… पण या पेशंटचे कोणी नातेवाईकही आले नाहीत आणि तो कालचा माणूस पण गायब झालाय…” रागिणीला अडवत डॉक्टर लगेच बोलले…
“त्याची काळजी करू नकोस तू… ते नंतर बघता येईल. आधी याच्या जीवघेण्या वेदना कमी करण्यासाठी आपल्याला लगेच ऑपरेशनची तयारी करायची आहे.”
“हो सर. तुम्ही खरंच आपल्या पेशंटची खूप काळजी घेता सर… मी आधी काम करत होते तिथं, त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला वेगळेच अनुभव यायचे.” रागिणी म्हणाली.
“म्हणजे? नेमकं काय म्हणायचं आहे तुला?” डॉक्टरांनी अचंबितपणे तिच्याकडे पाहत विचारलं.
“सर, त्या नावाजलेल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर आधी ठराविक रक्कम भरायला सांगतात. मग पोलीस बोलावून घेतात. सर, तोपर्यंत त्या अपघात झालेल्या पेशंटची अवस्था काय होत असेल याची आपल्याला कल्पनाच करवत नाही!”
रागिणीचं बोलणं ऐकून डॉ. अभिजित एकाएकी गंभीर झाले आणि त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलची आठवण आली… तिथला सगळा भोंगळ कारभार, तिथल्या कामाची निराळीच तऱ्हा आठवली! त्याच अवस्थेत ते आपल्या केबिनकडे वळले.
सगळी व्यवस्था झाल्यानंतर रमेशच्या अपघात झालेल्या पायाचं ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पडलं होतं. मात्र त्या दरम्यान रागिणीच्या मोबाईल फोनवर मध्येच रिंग वाजल्याचं डॉ. अभिजित यांना जाणवलं. मात्र त्याकडे तिनं दुर्लक्ष करून फोन बंद केल्याचंही त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी टेबलावरची बेल वाजवून रागिणीला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि म्हणाले…
“रागिणी, तू आता निघालीस तरी चालेल… बराच वेळ झालाय.”
“सर, त्या चार नंबरच्या पेशंटचं ड्रेसिंग करायचं राहिलं आहे आणि…”
“हे बघ ती संगीता येईलच इतक्यात, तिला सांगतो मी करायला… आणि तुला मगाशी फोन पण येत होता ना, काही प्रॉब्लेम आहे का?”
“नाही सर प्रॉब्लेम काहीच नाही. आज मुलाचा वाढदिवस आहे ना, त्याचाच हॉस्टेलवरून फोन येत होता… निघालीस का म्हणून विचारत होता तो.”
“अरे मग तू हे आधी सांगायचं होतं ना… मगाशी ऑपरेशन झाल्यावर लगेच निघता आलं असतं तुला!”
“कसं सांगणार सर! तुम्ही एवढ्या समर्पित भावनेने काम करत होता आणि मी तुमच्या मदतीसाठी नुसतीच उभी होते… खरंतर मला हे सगळं शिकून घ्यायचं होतं पण नर्सिंगला ऍडमिशनच मिळत नव्हती आणि घरच्यांनी पण लग्नाची घाई केली…” बोलता बोलता रागिणीला खूप गहिवरून आलं. तिला पुढे बोलवत नव्हतं. डॉ. अभिजित जागेवरून उठले आणि तिला पाण्याची बाटली देत म्हणाले…
“ शांत हो रागिणी! इथं बैस, थोडं पाणी घे…आणि नीट ऐक आता, घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नसतो. तू तुझं काम प्रामाणिकपणे करतेस ना, यातच सगळं आलं. इथं माझ्या लक्षात आलंय… तू प्रत्येक पेशंटची व्यवस्थित काळजी घेतेस. कुणाला काय हवं, नको ते बघतेस. हे बघ इथं तुला हळूहळू सगळं शिकून घेता येईल!”
“तुम्ही शिकवणार सर मला? ते पेशंटला टाके घालायला, त्यांना…” उत्तेजित होत रागिणी बोलत असतानाच डॉक्टरांनी तिला रोखलं आणि म्हणाले…
“हे बघ, तुला या कामाची मनापासून आवड आहे ना, मग क्रमाक्रमाने सगळं जमणार तुला! आता तू असं कर, इथून लगेच निघ. तिकडे मुलगा वाट बघत असणार, त्याला माझ्यातर्फेही वाढदिवसाच्या शुभेच्छा सांग! एक मिनिट… हे घे, त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जा!”
आपल्या पाकिटातून काही पैसे काढून डॉक्टरांनी रागिणीच्या हातावर ठेवले. तेव्हा तिच्या डोळ्यांत आपसूकच आसवं गोळा झाली होती! मात्र स्वतःला सावरत तिनं डॉक्टर अभिजित यांना वाकून नमस्कार केला आणि ती क्लिनिकबाहेर पडली!