Tuesday, December 24, 2024

ज्येष्ठ नागरिक म्हणजे महातारे...

 ज्येष्ठ नागरिक म्हणजे महातारे...

      या लेखाच्या निमित्ताने सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ लोकप्रिय साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या बाबतीत घडलेला किस्सा येथे आवर्जून नमूद करणं माझं कर्तव्य समजतो...
पु. ल. म्हणतात, वय हे मनाला असतं... शरीराला वय असतं असं मला वाटत नाही. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. विख्यात पंडित सातवळेकर होते, ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं. त्यांना जेंव्हा शंभरावं वर्ष लागलं तेंव्हा मला असंच मनात आलं की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे तर आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करुन यावं. म्हणून मी पंडित सातवळेकरांकडे गेलो. शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. विचार केला, आजारी असतील, आपण दोन मिनिटात नमस्कार करावा, बरं वाटतंय ना, काळजी घ्या वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला त्यांच्याकडे गेलो त्या वेळेला बघतो तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं
तपासत बसले होते. तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते.
       मी त्यांना नमस्कार वगैरे केला. अचानक मला ते म्हणाले, "मी वाचलं आहे तुमचं साहित्य!"
मी घाबरलोच एकदम. त्यावेळी 'असलं काही लिहिण्यापेक्षा बरं
लिहा' असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पंडित 
सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील असं मला कधीही
वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे,
म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं.
 नंतर ते म्हणाले "आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम
एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या
तरुण पोरांना माहीत नाहीत ते मी निवडून काढणार आहे
आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात
पुढली आठ-दहा वर्ष जातील".

    त्यावेळी तब्बल शंभराव्या वर्षी सुद्धा पुढील आठ-दहा वर्षांचं नियोजन पंडित सातवळेकर यांच्याकडे होतं. बरेचदा ज्येष्ठ नागरिक म्हातारे अशासाठी होतात... आपण जगतोय कशासाठी? या साध्या 
प्रश्नाचं उत्तर देखील त्यांना देता यायचं नाही. केवळ आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी किंवा महिना संपल्यावर पेन्शन अथवा नोकरी करत असल्यास पगारासाठी हे यावरचं उत्तर होऊ शकणार नाही.
आपण कशासाठी जगतोय? हा प्रश्न ज्येष्ठ नागरिकाला पडला की 
एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन डोळयांसमोर यायला हवं! आता कुणी म्हणेल, सर्वसामान्य मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिकाला बऱ्याच बाबतीत आर्थिक विवंचना तसेच अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत असतात. अशावेळी त्याच्या डोळ्यासमोर उदात्त प्रयोजन येणं तरी शक्य होईल का? मान्य आहे, सगळेच पंडित किंवा विद्वान नसतात! मात्र काही प्रमाणात तरी समाधान, शांती मिळेल असं जगणं आपल्या नशिबी यावं एवढी रास्त अपेक्षा सर्वांचीच असते. त्यासाठीच साधंसं का असेना, जीवनात निदान कुठलं तरी नियोजन नजरेसमोर असावं असं वाटतं. मग अशा प्रकारच्या नियोजनासाठी वाचन करणं, संगीत शिकणं, पेंटिंग करणं इत्यादी अनेक कलांचा आधार सामान्य ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रात ते बरंच काही करू शकतात. उदाहरणार्थ... शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक गरजवंतांना ज्ञानदान करू शकतात. तसेच इतर मंडळी आपली शारीरिक आणि आर्थिक क्षमता पाहून विधायक समाज कार्याचं उद्दिष्टही ठरवू शकतात... जेणेकरून सतत कार्यरत राहिल्याने म्हातारपण नावालाही जाणवणार नाही आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक महातारे ठरतील यात शंकाच नाही!
     साधारणपणे ज्येष्ठ नागरिकांची मूळ समस्या आहे एकटेपणाची! एकत्रित कुटुंबात राहूनही आपली उपेक्षा होत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते आणि ते स्वत:ला एकटे समजतात, असे 'एज वेल फाऊंडेशन'ने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. आणखी एक ठळक बाब या सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आली... ती म्हणजे काही दशकापूर्वी ज्येष्ठांच्या ज्या समस्या होत्या, त्यात आता आमूलाग्र बदल झालेले आहेत. कारण काही वर्षांपूर्वी मोठ्या संख्येने आपल्या देशातील युवक नोकरीच्या शोधात परदेशात गेले आणि लग्न वगैरे करून तेथेच स्थायिक झालेत. मग काही लोकांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्यासोबत राहण्यासाठी परदेशात बोलावून घेतले. तर काही वृद्ध दांपत्य स्वतःच्या मिळकतीतून मोठे घर बांधून आपली मुलं कधी तरी परत येतील या आशेवर पुढची स्वप्ने रंगवत भारतातच राहिले!
       परदेशी जाणाऱ्या काही ज्येष्ठांनी आपली गावातील सर्व संपत्ती विकून टाकली. उर्वरित आयुष्य परदेशात मुलांसोबत चांगल्या प्रकारे व्यतीत करू असा विचार त्यांनी त्यावेळी केला असावा. मात्र तिकडे गेल्यावर त्यांचा लवकरच भ्रमनिरास झाला! एक तर अनोळखी प्रदेशात कोणी बोलायला नाही. मग दिवसभर नातवांची देखभाल करायची आणि कसेतरी दिवस ढकलायचे हे जिणं त्यांच्या नशिबी आलं... कालांतराने एकटेपणाचं दुःखही त्यांच्या वाट्याला आलं! थोड्या फार प्रमाणात हीच समस्या भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची देखील आहे. 
     बऱ्याच मध्यमवर्गीय कुटुंबातील युवक, युवती रोजगाराच्या शोधात शहरात जातात. महागाईमुळे पती, पत्नी दोघांनाही नोकरी करावी लागते. मग ते आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्यासोबत राहण्यासाठी गावाकडून शहरात बोलावून घेतात. मात्र शहरातील 'फास्ट लाईफ'मुळे आपल्या आईवडिलांच्या नेमक्या काय समस्या आहेत, हे जाणून घ्यायला त्यांना सवड नसते! आपल्या मुलांसोबत त्यांनी वेळ घालवावा, त्यांची काळजी घ्यावी ही अपेक्षा ते करतात. मात्र वृद्ध सासू सासऱ्यांनी नातवावर गावाकडील संस्कार करण्याचा प्रयत्न केला तर ते सुनांना आवडत नाही. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती असते... ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाने व सुनेने त्यांच्याकडे फक्त नातवंडांना सांभाळणारा सेवक म्हणूनच पाहिलेले असते!
       जे ज्येष्ठ नागरिक शहरात किंवा गावात एकटेच राहतात, त्यांना हल्ली कमालीचा एकटेपणा अनुभवायला येतो. त्यांच्यापेक्षा कमी वयाचे लोक सुद्धा त्यांच्यासोबत बोलायला तयार नसतात मग ज्येष्ठासोबत मिळून मिसळून राहणे तर दूरच! कारण ज्येष्ठ लोक आपल्याला एखादे काम सांगेल, अशी भीती त्यांना असते.
       परदेशात राहणाऱ्या मुलांच्या आईवडिलांपैकी कुणीतरी एक अस्वस्थ असेल तर परिस्थिती खूपच बिकट होऊन बसते. नाईलाजाने अशा वृद्ध जोडप्यास घरात एकटेच राहून जीवन व्यतीत करावे लागते. आपल्या मुलांशी, नातवाशी ते फक्त फोनवरच बोलू शकतात. फार तर व्हिडीओ कॉल करूनच त्यांना पाहू शकतात. दुर्दैवाने मग ते तशा परिस्थितीत फक्त मरणाचीच वाट पाहत असतात! 
     या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच सकारात्मक विचार करून त्यावर तोडगा काढण्याचा मनापासून प्रयत्न करायला हवा असे वाटते. आणि ते तशा प्रकारचा प्रयत्न निश्चितच करू शकतात. त्यासाठी आपलं आता वय झालं आहे, आपण म्हातारे झालो आहोत हा विचार मनातून समूळ काढून टाकायला हवा. आपण म्हातारे नव्हे तर महातारे आहोत हेच मनावर बिंबवायला हवं!
     एका विचारवंतानं म्हटलं आहे... "प्रॉब्लेम कुणाला नसतात, ते अगदी शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक प्रॉब्लेमवर तोडगा हा असतोच. तो सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा हवा असतो तर कधी माणसं हवी असतात. या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो!"
तसंच आपल्या आयुष्यात येणारे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम किंवा समस्या देखील प्रयत्न केल्यास सुटू शकतात. ते कधीही सुटणार नाहीत असा आपण उगाच समज करून घेतो. मात्र या समस्या सोडवण्यासाठी थोडे पेशन्स महत्वाचे ठरतात. त्यासाठी वर सांगितल्यानुसार आपल्या आवडीचे कुठलेही छंद जोपासायला सुरुवात तरी करावी. मित्र परिवार वाढवावा, त्यांच्यात मिसळून मनसोक्त गप्पा माराव्यात. एखादा हास्य क्लब जॉईन करावा. व्यायाम, प्राणायाम, मेडिटेशनची सवय लावून घ्यायला हवी. वाचनीय पुस्तकं वाचावीत किंवा एखाद्या वाचनालयात फेरफटका मारून मासिके तरी चाळावीत. जीवनात पुष्कळ काही करण्यासारखं आहे... आपण उगाच बाऊ करून घेतो, मला हे जमणार नाही किंवा मी हे कसं करू, माझ्याच्यानं नक्की होणार का? कधी कधी आपला इगो, स्टेटसही आडवा येतो, मात्र त्याला इलाज नाही! तुम्हाला खूश राहायचं ना... मग त्या इगोला, ऍटिट्यूडला वेळीच मूठमाती द्यायला हवी आणि आपल्या जगण्याला नवी दिशा द्यायला हवी... अगदी आजपासून, नव्हे आत्तापासून!
'दो कदम आगे बढाकर तो देखो!
किसी को जरा हसाकर तो देखो!!'

... विनोद श्रा. पंचभाई 
     मोबाईल क्रमांक : 9923797725

.

वेगळ्या धाटणीचा वाचनीय कथासंग्रह

 

वेगळ्या धाटणीचा वाचनीय कथासंग्रह : राघव शेला


               नुकताच कवयित्री,लेखिका सौ. स्वाती विवेक कुंभार यांचा 'राघव शेला' हा सर्वांगसुंदर कथासंग्रह वाचनात आला. यातील 'गौरीची गोष्ट' वाचत असताना आपसूकच 'जंजीर' या चित्रपटातील गाणं आठवलं... "तेरी हंसी की किमत क्या है, ये बता दे तू!..... कहे तो आसमां से चांद तारे ले आऊं..." अभिनेत्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरण्यासाठी त्याचा मित्र ना-ना प्रकारे आपल्या गाण्यातून त्याला साद घालत असतो. त्याची मनस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असतो!

               असं म्हणतात की 'माणसाला होणाऱ्या आजारापैकी जवळपास ९५ टक्के आजार त्याच्या मानसिकतेतून उत्पन्न झालेले असतात.' आजार झाला की आपण तो बरा करण्यासाठी भरमसाट औषधांचा वापर करतो, मात्र रोगाच्या मुळाशी असलेल्या मनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही! बरेचदा मनात येणारे नकारात्मक विचार, विनाकारण वाटणारी भीती, मग बदलत जाणारी मनस्थिती यातूनही शरीरातील लहानमोठ्या आजारांना चालना मिळण्यास मदत होते. 'राघव शेला' या कथासंग्रहाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या 'गौरीच्या गोष्टी'तील गौरीला कुठल्याही प्रसंगी जमलेल्या गर्दीची भीती वाटत असते! ती कशामुळे वाटते? गौरीला भीती वाटण्याचं नेमकं काय कारण असतं? तिच्या आयुष्यात असं काय काय घडतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही गुंतवून ठेवणारी दीर्घकथा वाचताना वाचकांना उलगडत जातात.

                या कथासंग्रहात अगदी सुरुवातीलाच सादर केलेली 'गौरीची गोष्ट : जी२०' ही भावस्पर्शी दीर्घकथा, जणू एखादी लघुकादंबरी शोभावी इतकी छान जमली आहे. यातील गौरीच्या आयुष्यात येणारे आशुतोष, शिल्पा, कबीर आणि इतर पात्र यांचे आपसातील संवाद वेळप्रसंगी योग्य तो परिणाम साधण्यात यशस्वी ठरले आहेत. तसेच अधूनमधून प्रसंगानुरूप पेरलेल्या 'आप से जो हुई बातें, फिर किसी से कही नही गयी...' किंवा 'पुराने गम अब गम नही लगते, हाँ अब तुम सितमगर नही लगते!' अशाप्रकारच्या शेरोशायरींनी या कथेत बहार आणली आहे. एकूणच 'गौरीची गोष्ट' छान जमल्यामुळे वाचनीय ठरली आहे. 

                  'आपण कितीही आधुनिक झालो तरी आपण आपली मुळं, आपले संस्कार, आपले आदर्श सोडत नाही. कुठे ना कुठे ते आपल्या वागण्या-बोलण्यातून जाणवतातच!' अशा प्रकारचं निवेदन लेखिकेने आपल्या मनोगतात व्यक्त केलं आहे. त्याची प्रचिती 'राघव शेला' मधील कथा वाचताना पदोपदी येत राहते. 'कळा ह्या लागल्या जीवा', 'गुरूदक्षिणा', 'मौसम है आशिकाना', 'ऋणानुबंध' या कथा वाचताना ते प्रकर्षाने जाणवते! तर 'इन मीन साडे तीन...!' ही टिपिकल कथा विचार करायला भाग पाडते. 

                  'फेलो ट्रॅव्हलर', 'बेस कलर' तसेच 'तपस्या', 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..!' या वेगळ्या धाटणीच्या कथा जगण्यासाठीचा वेगळाच संदेश देऊन जातात. या 'राघव शेला' कथासंग्रहात लेखिकेने निरनिराळे विषय हाताळले आहेत, त्यामुळे प्रत्येक कथेत वैविध्य जाणवल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे या कथासंग्रहाचा शेवट एकूण चार वेगवेगळ्या विषयांच्या 'अलक'ने अर्थात अति लघुत्तम कथांनी आणि तीन शब्दकथा 'शुक्रवार कॅलेंडर पर्वत'ने केला आहे. एकंदरीत या संग्रहातील सर्वच कथा वाचनीय ठरल्या आहेत.

                  कुठलीही अलंकारिक आणि बोजड भाषा नाही की उपदेशांचे डोस नाही. सहज, सोपी तसेच मनाचा ठाव घेणारी भाषा हे या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट्य आहे. तद्वतच कथेत आवश्यक त्या प्रसंगी केलेली अनुरूप अशा काव्याची उधळण हेही वाचकांच्या मनाला भावणारं आहे. त्यासाठी लेखिकेचं मनापासून कौतुकच करायला हवं! 

                  पुण्यातील 'वैशाली प्रकाशन'मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या 'राघव शेला' या कथासंग्रहाला ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांचा अप्रतिम अभिप्राय लाभला आहे. तसेच समर्पक आणि देखणे मुखपृष्ठ सौ. रुपिका अनिकेत पाटील यांनी रेखाटले आहे. 'राघव शेला' या अप्रतिम आणि सर्वार्थाने वेगळ्या शैलीच्या कथासंग्रहाच्या लेखिका सौ. स्वाती विवेक कुंभार यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

पुस्तकाचं शीर्षक : राघव शेला ( कथा संग्रह )

लेखिका : सौ. स्वाती विवेक कुंभार 

प्रकाशक : वैशाली प्रकाशन, पुणे 

किंमत : ₹ १६० 

पाने : १००

पुस्तक परिचय : विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

                      





एक पर्व संपले..!

 एक पर्व संपले..!

   
   मुक्काम पोस्ट : तपोवन सोसायटी, वारजे... 
आमची तपोवन सोसायटी म्हणजे एक भलं मोठं आदर्श कुटुंबच! एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे सदस्य, आपसात असणारी आपलेपणाची भावना, गरजवंतांना नेहमी मदत करण्याची भावना ही येथील ठळक वैशिष्ट्यं! महत्वाचं म्हणजे तपोवनमध्ये वावरणारी ज्येष्ठ मंडळी म्हणजे सगळ्यासाठी आधारस्तंभ, जणू प्रत्येकाच्या मायेचा आधार! त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीतून बहुतेकांना काही ना काही शिकता आलं... बरेचदा त्यांचं मोलाचं मार्गदर्शनही लाभलं. माझं म्हणालं तर मागील जवळपास वीस वर्षांत मला आपल्या तपोवनमधील या ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळीकडून बरंच काही शिकता आलं. त्यांच्या अनुभवसंपन्न खजिन्यातून काही ना काही मिळवता आलं, त्याबाबतीत मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. 

     मात्र गेल्या काही वर्षात, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडावे तसे एका पाठोपाठ एक, तपोवनला अभिमान वाटावा अशी आधारस्तंभ असलेली ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी हळूहळू गळून पडायला सुरुवात झाली! इथं मला लिहिताना यातना होत आहेत... पण केवळ आपल्या भावना व्यक्त करण्याशिवाय आता पर्याय उरला नाही. केळकरकाका, देशपांडेकाका, चितळेकाका यांच्यासोबत बरेचदा साहित्यविषयक चर्चा व्हायच्या. तसेच उत्तमराव जोशीकाका त्यांच्या पोलीस खात्यातील रोमहर्षक अनुभव त्यांच्या शैलीत सांगायचे. तर खाजगीवालेकाका मुंबईच्या गमतीजमती सांगायचे. सडेतोड बोलणारे उकिडवे आजोबा त्यांच्या मिश्किल गप्पामधून कुठल्यातरी गंभीर मुद्द्यावरही चर्चा करायचे. त्याचप्रमाणे आगरकर काकू त्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेन्ट खात्यातील किस्से मस्त रंगवून वर्णन करायच्या. आता ही सर्व आदरणीय मंडळी काळाच्या पडद्याआड विसावली आहे, चिरविश्रांती घेत आहेत! 

     केळकर काकांकडे अनेक लेखकांच्या साहित्यकृतींचा मोठा खजिनाच होता. त्यामार्फतच मला माहिती नसलेल्या काही दिग्गज साहित्यिकांची ओळख झाली. काकांचं वाचन किती अफाट आहे, हे त्यावरून जाणवलं. सुप्रसिद्ध लेखक विश्राम बेडेकर आणि मुंबईच्या इतर साहित्यिकांविषयी केळकर काका भरभरून बोलायचे... त्यावेळी त्यांनी बोलत राहावं आणि आपण नुसतं ऐकत राहावं असंच वाटायचं! ते ऐकून, कानात साठवून आपण खरंच साहित्यसंपन्न झाल्याचा खूप अभिमान वाटतो. विश्राम बेडेकर यांचं ‘एक झाड, दोन पक्षी’ हे आत्मचरित्र केळकर काकांनी मला आवर्जून वाचायला दिलं होतं…त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहील!

     पुणे शहरात प्रसिद्ध असलेल्या 'ब्रिटिश लायब्ररी'चे सभासद असणारे आणि तेथील पुस्तकं नियमितपणे वाचणारे तसंच त्यावर नेहमी चर्चा करणारे चितळे काका म्हणजे तपोवनमधील प्रसन्न व्यक्तीमत्व! त्यांच्याशी बोलताना आपण किती सामान्य आहोत याची प्रचिती त्यावेळी यायची, एवढं त्यांचं अफाट विश्व अनुभवसंपन्न होतं! मला आठवतं... 'महानायक' कादंबरीच्या निमित्ताने बोलताना चितळे काकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस या अतुलनीय महापुरुषाबद्दल आगळीवेगळी आणि बारीकसारीक माहिती सांगितली होती. त्यांची ते वर्णन करण्याची शैली खरंच अदभूत होती. आता मात्र फक्त आठवणी उरल्या आहेत! 

      उत्तमराव जोशी काका म्हणजे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले रुबाबदार व्यक्तीमत्व! ते पुण्यातील महत्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या डेक्कन पोलीस स्टेशनला नेमणूकीला होते. तिथं कार्यरत असताना त्यांच्या कारकिर्दीत घडलेले अनेक किस्से आणि घटना जोशीकाका त्यांच्या विशिष्ट शैलीत सांगायचे. त्यावेळी ते किस्से ऐकणारे भान हरपून जायचे आणि काका पुढं काय बोलतात, त्यासाठी सगळे सावरून बसायचे. काही काही आरोपीबाबतचे विलक्षण प्रसंग तर उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणारे असायचे... दुर्दैवाने आता जोशी काका नसल्यामुळे ते किस्से निश्चितच कायम स्मृतीत बंदिस्त राहतील यात शंका नाही!

      त्याचप्रमाणे आमच्या शेजारीच राहणारे उकिडवे आजोबा घरी आले की आमची मस्त गप्पांची महफिल रंगायची. आमच्या त्या गप्पांमध्ये कधीकधी वर राहणाऱ्या आगरकर काकू देखील सहभागी व्हायच्या. उकिडवे आजोबा यांची बोलण्याची लकब मजेशीर पण सडेतोड होती. कोणाचा मुलाहिजा न बाळगता ते स्पष्ट आणि रोखठोक बोलायचे. आगरकर काकू त्यांच्या ऑफिसमधील लोकांच्या वागणुकीच्या करामती छानपैकी रंगवून सांगायच्या. दोघांसोबत होणाऱ्या सविस्तर चर्चेतून त्यावेळी आम्हाला बरंच काही शिकता आलं. त्त्यांच्या अनुभवांचे बोल आताही मार्गदर्शक ठरतात हे विशेष! 

       आपल्या मिश्किल बोलण्यातून अधूनमधून कोपरखळ्या करणारे आणि समोरच्याचा गमतीने हळूच चिमटा काढणारे देशपांडे काका मला खरंतर तपोवनचे पु. लं. (देशपांडे ) वाटायचे! त्यामुळे त्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटायचा. त्यांच्या सानिध्यातले तास दोन तास जगण्यासाठी अनोखी ऊर्जा देऊन जायचे. देशपांडे काकांना वाचनाची प्रचंड आवड होती, तसंच त्यांची संगीताची जाणही विलक्षण होती. ते पेटी ( हार्मोनियम ) अप्रतिमरित्या वाजवायचे... आयुष्याच्या शेवटपर्यंत हार्मोनियमने त्यांना साथ दिली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही! एक आवर्जून सांगावंस वाटतं, देशपांडे काकांकडे गेल्यावर त्यांचा पहिला प्रश्न असायचा... "आता कुठल्या विषयावर लिहितोस?      तसंच मी लिहिलेल्या पुस्तकातील त्यांना काय काय आवडलं, ते छान वर्णन करून काका आवर्जून सांगायचे. त्यावेळी त्यांची ती मिळालेली पावती म्हणजे माझ्यासाठी मोठा पुरस्कारच वाटायचा! कधीकधी तर पाच सहा दिवसात भेट झाली नाही तरी काका अधिकारवाणीने विचारायचे, "अरे कुठे होतास इतके दिवस? मला भेटायला आला नाहीस!" 

        हे नश्वर जग सोडायच्या आधी देशपांडे काका भेटले ते दीनानाथ हॉस्पिटलच्या बेडवरच! त्यावेळी त्यांच्या शरीरात विविध प्रकारच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. आयसीयूमध्ये भेटायला आत गेलो तेव्हा ते जागेच होते. मी जवळ पोहचल्याची चाहूल त्यांना लागली असावी. ते बहुधा बोलायच्या प्रयत्नात होते, मात्र ते शक्य नसल्यामुळे मी लगेच त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. आयसीयूमध्ये जास्त वेळ थांबता येत नसल्याने बाहेर जाताना मी काकांना नमस्कार केला, त्यांनी माझ्याकडे बघितलं. दुसऱ्याच दिवशी काका व्हेंटिलेटरवर असल्याचं समजलं... आणि लगेच काही दिवसातच ते आपल्याला सोडून गेल्याचा निरोप मिळाला! त्यादिवशी आयसीयूमधून बाहेर पडताना काकांना केलेला नमस्कार, 'अखेरचा दंडवत' ठरेल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. एक पर्व संपलं होतं! 

        या ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि परम आदरणीय असलेल्या वरील मंडळीनी तपोवनला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं. त्यांच्या नित्य सहवासामुळे, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याने वैयक्तिकरित्या मी श्रीमंत झालो हे इथं नम्रपणे नमूद करतो. मात्र आता ते देदिप्यमान पर्व संपल्याने एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे... हे आपल्या तपोवनचं दुर्दैवच म्हणावं लागेल!
        सोडून गेलेल्या पण आशीर्वादरूपाने कायम आपल्यासोबत असलेल्या आधारस्तंभांना 
भावपूर्ण विनम्र आदरांजली!

… विनोद श्रा. पंचभाई,

देशभक्त उद्योगपती रतन टाटा

     जगाच्या इतिहासात पिढ्यान् पिढ्या धनाढ्य असणारे कित्येक संस्थानिक, राजकारणी किंवा उद्योगपती होऊन गेले आहेत. गर्भश्रीमंतीचा वरदहस्त लाभलेल्या कितीतरी दिग्गज व्यक्ती आपल्याला भारतीय समाजात वावरताना दिसतात. मात्र त्यातील सर्वच बाबतीत यशस्वी ठरलेले बोटावर मोजण्याइतकेही आढळून येणार नाही. आपल्या बापजाद्याच्या इस्टेटीवर निव्वळ मजा मारणारे, वारसाने मिळालेला वारेमाप पैसा पाण्यासारखा उधळणारे, गरिबांना कवडीमोल समजणारे, कुणाशी काही देणं घेणं नसण्याची वृत्ती असणारे या खंडप्राय देशात सर्वत्र आढळतील. मात्र समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो अशी प्रकर्षाने जाणीव असणारे, इतरांना सढळ हाताने मदत करणारे, दीनदुबळ्याविषयी, मुक्या प्राण्यांबद्दल आत्यंतिक कळवळा असणारे गर्भश्रीमंत अभावानेच दिसून येतील. त्यामुळेच इथं नमूद करावंसं वाटतं... सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणारे सगळेच खऱ्या अर्थाने श्रीमंत नसतात. म्हणूनच आजच्या या मतलबी जगात रतन टाटा यांचासारखा एखादाच सर्वार्थाने 'श्रीमंत' ठरतो!   

   रतन टाटा यांची सौम्य, शांत मूर्ती डोळ्यासमोर आली की लहान-मोठा असो की कुणी अमीर-गरीब असो प्रत्येक जण त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. हे भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी आलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही, विशेषतः उद्योगपतींच्या बाबतीत तरी! रतन टाटा यांचे स्वभावगुण खरोखरच वाखाणण्यासारखे आहेत. अतिशय साधी राहणी, प्रखर देशप्रेम, नीतिमत्ता, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा दुजाभाव न करणे, कामगारांबद्दलची अपार तळमळ, प्राण्यांविषयीचं आत्यंतिक प्रेम, जिव्हाळा, गरजवंतांना मदत करण्याची तत्परता अशा कितीतरी स्वभाव गुणांनी रतनजींचं व्यक्तीमत्व खुलून दिसायचं.          मैदानातील एखाद्या सांघिक खेळात विजय मिळवण्यासाठी संघातील सर्वच खेळाडूंमध्ये आपसात ताळमेळ असणं गरजेचं असतं. सामना खेळताना परस्पर सहकार्याची आणि संघात आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी उत्कृष्टरीत्या पेलण्याची जबाबदारी प्रत्येक खेळाडूला घ्यावी लागते. नेमका हाच ताळमेळ रतनजी टाटा यांनी टाटा उद्योग समूहामध्ये जुळवून आणला. टाटा समूहामधील सर्व कंपन्यांना एकत्र आणून रतनजींनी त्यांच्यात समन्वय साधला. या समन्वयामुळे कंपनीच्या विकासाला एक प्रकारची सांघिक गती मिळवून दिली. सांघिक ताळमेळामुळे नवीन निर्णय घेणं आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करणं खूप सोयीचं झालं. एका समूहामध्ये असलेल्या अनेक कंपन्या असोत किंवा एकाच कंपनीमधील अनेक विभाग आणि त्या विभागातील सर्व कामगार असोत... या सर्वांमध्ये आपसात ताळमेळ असणं खूप गरजेचं असतं. असा ताळमेळ नसेल तर कंपनीत गोंधळाची स्थिती निर्माण होऊन व्यवस्थापन करणं अवघड होऊ शकतं याची जाणीव, व्यापक दूरदृष्टी असलेल्या रतनजी टाटा यांना होती. त्यामुळेच त्यांची संपूर्ण कारकीर्द देदीप्यमान आणि विलक्षण लक्षवेधी ठरली!

गरुडझेप अंतराळवीरांची

 ब्लर्ब… 


    आकाशातून ये जा करणारे विमान सर्वसामान्यांसाठी आता कुतूहलाची बाब राहिली नाही. मात्र अवकाशात, अंतराळात झेप घेणारे एखादे अंतराळयान नक्कीच उत्सुकता वाढवणारा विषय ठरतो. मग त्यातून जोखीम पत्करून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांबद्दल जाणून घ्यायला कुणालाही आवडेल. पहिला अंतराळवीर कोण किंवा पहिली महिला अंतराळवीर कोण होती? हाही प्रश्न पडणं साहजिकच आहे. 
      चंद्राच्या पृष्ठभागावर पहिलं पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग, पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा, त्याचप्रमाणे भारतीय मूळ असलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या आणि अशा अनेक अंतराळवीरांच्या कारकिर्दीची माहिती या पुस्तकातून करून देण्यात आली आहे. भारतासह रशिया, अमेरिका, चीन, जपान या देशातील बऱ्याच अंतराळवीरांची सविस्तर ओळख ‘गरुडझेप अंतराळवीरांची’ या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिली असल्यामुळे हे पुस्तक सर्व प्रकारच्या विद्यार्थी मित्रांच्या ज्ञान आणि माहितीमध्ये निश्चितच मोलाची भर टाकणारे ठरणार असा विश्वास आहे.