Friday, March 29, 2019

सोच बदलो... तुम बदलोगे


सोच बदलो...तुम बदलोगे।

"विचार सतत वाहतात पण त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही. ते नदीप्रमाणे असतात. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला पण सत्ता चालली ती विचारांचीच! मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही." हे अनमोल चिंतन आहे... आचार्य विनोबा भावे यांचं!

चांगल्या विचारांनीच माणूस घडत असतो. मात्र सकारात्मक विचार करणार्या लोकांची प्रगती लवकर होताना आपल्याला दिसून येईल. याउलट नकारात्मक विचार करणार्या व्यक्तींंना अनेक संकटांना, दुर्धर प्रसंगाना सामोरं जावं लागतं! साधारणतः बर्याच लोकांचं आपल्या विचारांकडे लक्ष नसतंच. दिवसभरात अनेक विचार प्रत्येकाच्या मनात येत असतात. सतत निरनिराळे विचार मनात आले तर सर्वसामान्य माणसाच्या मनाचा कोंडमारा होतो. अशा विचारांना नकारात्मकतेची झालर लागली तर मग विचारूच नका. त्यावेळी मनाची अवस्था सैरभैर झाल्याशिवाय राहत नाही!

एखादी चांगली क्रुती करताना मनात येणारा सकारात्मक विचार आपल्याला पकडून ठेवता यायला हवा. सतत त्याचंच चिंतन मनात असायला हवं. त्यामुळे आपल्या हातून होणाऱ्या कामाची अंमलबजावणी अगदी व्यवस्थितपणे पार पडणार यात शंकाच नाही. मात्र अशावेळी मनात येणारा पहिला विचारच जर नकारात्मक असला तर पुढे संकटांची मालिका येण्यास वेळ लागणार नाही! म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्या मनात येणाऱ्या पहिल्या सकारात्मक विचारावरची पकड घट्ट करण्याची सवय जर आपण लावली तर मग अख्खा दिवस आपलाच समजा. सगळं कसं आपल्या मनासारखं घडणार... कुठलंही महत्त्वाचं काम तेव्हा चुटकीसरशी होणार हे निश्चित!

बर्याच वेळा आपण जसं नाही तसं दुसऱ्यांंना दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र अशा प्रकारच्या वागण्यातून फारसं काही साध्य होत नाही. उलट निराशाच आपल्या पदरी पडल्याचं लक्षात येतं. त्यामुळे नकारात्मक विचार आपसूकच आपल्या मनात रूंजी घालू लागतात. मग कितीही प्रयत्न केला तरी कुठल्याही कामात मन लागत नाही! याउलट आपण जसे आहोत तसेच जर चारचौघात वावरलो तर कुठलंही दडपण आपल्या मनावर राहणार नाही. पर्यायानं आपला आत्मविश्वास वाढून सकारात्मक विचार आपल्या मनात येणार हे नक्की! एकदा का आपल्या मनात सकारात्मक विचार यायला लागले की मग आपल्या विचारसरणीमध्येही चांगले बदल घडू शकतात. या चांगल्या बदलांमुळेच समाजात आपल्या बद्दल आदराची भावना निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

आजकाल केवळ स्वतःसाठीच जगण्याची जणू स्पर्धा लागली आहे की काय, अशी एकूण परिस्थिती आहे! स्वतःसाठी जगताना इतरांचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. मग त्यांना मदत करणं तर दूरच. जो इतरांसाठी काहीतरी चांगलं करताना दिसतो त्यालाच सकारात्मक विचारांची उर्जा लवकर प्राप्त होते अन् हीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपले दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकानं आपला आवाका बघून गरजवंतांंना मदत करण्याचा विचार तरी मनात आणून बघावा असं वाटतं! अशाप्रकारचे विचार मनात आले तरी सकारात्मक 'सोच' च्या दिशेने आपण जात आहोत हे आपल्या लक्षात येईल.

 काही आडमुठ्या स्वभावाचे पालक आपल्या मुलांना अगदी नकळत्या वयापासूनच 'हे करु नको, ते करू नको, 'तिकडे जाऊ नकोस, इथं हात लाऊ नकोस', 'ते बघू नको, हे खाऊ नको'  असा सारखा नन्नाचा पाढा सुरू करतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये एकप्रकारची नकारात्मक भावना वाढीस लागते. नंतर शाळेत शिकत असताना अशा मुलांच्या सुदैवाने जर शिक्षक उत्तम मिळाले तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे कालांतराने  सकारात्मक विचार त्यांच्या अंगी बाणले जातात. मग अभ्यास करताना किंवा परीक्षेच्या वेळी त्यांना सकारात्मकतेचा फायदा होताना दिसतो. घरचे वातावरण भिन्न असले तरी अशाप्रकारचे विद्यार्थी निर्भेळ यश संपादन करताना दिसतात. म्हणजेच सकारात्मक विचारांना आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे यावरून लक्षात येते.

 आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रसंगानुरूप छोटे मोठे विनोद करणे , चांगल्या विचारांच्या पुस्तकांचे वाचन करणे, तणाव न वाढवणारे हलकेफुलके चित्रपट किंवा नाटकं बघणे, आपल्या परिसरातील झाडांना, पक्ष्यांना पाणी देणे इत्यादी गोष्टीसुध्दा आपल्यामधील सकारात्मकता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. तसेच चांगल्या विचारांच्या निर्व्यसनी लोकांशी मैत्री असणे हे सुध्दा आपल्या तणाव मुक्तीसाठी फायदेशीर ठरते.   त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक द्रुष्टीकोन आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो !

संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा बहुमोल संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध म्हणतात... " खूप जास्त विचार करणे हे दुःखाचे मोठे कारण आहे. त्यामुळे विचार नकारात्मक बनतात!" 
हे बुद्धांचं वचन निर्विवाद सत्य असल्याचं आपल्याला पदोपदी जाणवतं... कारण अति विचार करणारे लोक कालांतरानं "डिप्रेशन" मध्ये गेल्याची अनेक उदाहरणं आपल्या बघण्यात येतात. मग दुर्दैवानं त्यात काही आपले जवळचे मित्रही असतात. त्यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, त्यांचं उत्तर ठरलेलंच असतं... "कुछ समज मे नहीं आता यार, मानो दिमाग का दही हो गया है..!" अशा प्रकारच्या व्यक्तींंना मग निष्णात समुपदेशकच योग्य ते मार्गदर्शन करून सकारात्मकतेची दिशा दाखवू शकतात! 

अब्राहम लिंकन यांचं उदाहरण याठिकाणी खूप महत्त्वाचं ठरतं. त्यांनी आपल्या जीवनातील बहुतेक निवडणूकांंमध्ये पराभव स्वीकारला. मात्र सरतेशेवटी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सगळ्यांंना आश्चर्याचा धक्का दिला तो त्यांच्यातील सकारात्मक विचारसरणीमुळेच! भीषण अपघातात पाय गमावलेल्या आणि नंतर क्रुत्रिम पाय बसवून एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न मनाशी बाळगणारी अरूणिमा सिन्हा! प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि "एव्हरेस्ट मी माझ्या मनात सर केला आहे!" अशी प्रचंड सकारात्मक उर्जा तनामनात घेऊन तिने शेवटी जगातील सर्वात उंच अशक्यप्राय एव्हरेस्ट सर केलाच. त्याचप्रमाणे नेहमीच सळसळत्या उत्साहाने आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर यशाची एकानंतर एक शिखरे पादाक्रांत करणारे आपले 'मिसाईल मँन' डॉ. अब्दुल कलाम हे तर सकारात्मक उर्जेचे मूर्तीमंत उदाहरण! 
अशाप्रकारच्या असंख्य प्रेरणादायी व्यक्तींंचे दाखले आपल्याला मार्गदर्शक ठरु शकतात. गरज आहे फक्त आपण आत्मविश्वासानं अन् सकारात्मक विचारांनी मार्गक्रमणा करण्याची...आपल्यासोबत इतरांना सुद्धा प्रेरित करण्याची..!
                                 ..... विनोद श्रा.पंचभाई
                                  भ्र. क्र. ९९२३७९७७२५






 

Friday, March 22, 2019

बेफिकिरी नाही बरी



बेफिकिरी नाही बरी...


"ए आई  , आज ना मला सुट्टी आहे. मी जाऊ पियूकडे खेळायला?" संकेत अधीरतेनं म्हणाला.
"अरे थांब जरा, माझं आवरलं की, तुला सोडून देते."
"अगं मी जातो ना एकटाच , इथं जवळच तर आहे पियूचं घर.."
"अरे बाबा, मला माहिती आहे ते, जवळ आहे पण रस्ता ओलांडून जावं लागतं ना...आणि केवढी रहदारी असते त्या रस्त्यावर!" 
"अगं जातो ना मी, तू नकोच काळजी करू ... मी व्यवस्थित रस्ता ओलांडतो ना!" 
"अरे बाळा, काळजी मी करणार नाही तर कोण करणार? थांब थोडा शांत रहा जरा" आई संकेतला समजावणीच्या सुरात म्हणाली. अशाप्रकारचे प्रसंग  आपल्याला नेहमीच घरोघरी बघायला मिळतात.

  चिंता करणं किंवा काळजी घेणं हा मनुष्यप्राण्याचा स्वभावधर्म आहे. आईला आपल्या बाळाची काळजी असतेच...तसेच डॉक्टरला आपल्या रूग्णांची तर शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी लागते! बस चालक असो की रेल्वेगाडीचा चालक असो किंवा विमान चालवणाऱ्या पायलटला पण आपल्या प्रवाशांची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागते. नगरसेवकापासून ते मंत्री पदापर्यंत पोहचलेल्या खासदारांना सुद्धा आपल्या मतदार संघातील मतदारांची काळजी घ्यावी लागते... त्यात त्यांचा स्वार्थ असतो हे सांगायला नकोच! प्राणी सुद्धा याला अपवाद नाही.जगाच्या पाठीवरील कुठल्याही प्राणीमात्राला आपल्या पिल्लांची काळजी असते आणि ते साहजिकच आहे म्हणा!

काही व्यक्ती इतक्या संवेदनशील असतात, की त्यांना स्वतःपेक्षा इतरांचीच जास्त काळजी असते...असे लोक स्वतःच्या बाबतीत मात्र कमालीचे बेफिकीर असतात! तसेच रस्त्यावर दुचाकी किंवा बाइक चालवताना बहुतांश लोकांना एक अनुभव नक्कीच येत असणार...आपण घाईत असताना आपल्या बाइकचा साईड स्टँड काढायला चुकून आपण विसरलो तर आपली काळजी घेणारे व आपल्याला तो स्टँड काढायची आठवण करून देणारे अनोळखी हितचिंतक हमखास भेटतात. मला वाटतं, अखिल  विश्वात आपली सगळ्यात जास्त काळजी करणारे हेच अनोळखी हितचिंतक असावेत नाही का... त्यांना असंख्य सलाम!

काही महाविद्यालयीन विद्यार्थी कमालीचे संवेदनशील असतात. परीक्षा जवळ आली की त्यांना खूप टेन्शन येत असल्याचं जाणवतं! मग अभ्यासाच्या काळजी पोटी त्यांच्या प्रक्रुतीवर विपरीत परिणाम होतो. त्यांचा अभ्यास जर वेळेआधी पूर्ण झाला नाही तर ते कुठल्या थराला जाणार याचा काही नेम नसतो. अभ्यास झाला नाही तर त्यांचा भ्रमनिरास होतो. ते खूप लवकर निराश होतात आणि प्रसंगी दुर्दैवाने आत्महत्येच्या आहारी जातात! खरंतर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे आवश्यक आहे!

आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेणं जसं
आवश्यक आहे तसंच रस्त्यावर वाहन चालवताना आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं सुध्दा अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वाहतूकीचे नियम पाळणे आणि रस्ता ओलांडतानाही काळजी घेणे आवश्यक आहे! कारण आपल्याप्रमाणेच इतरांनासुध्दा त्यांच्या कुटुंबाची काळजी असते ही जाणीव आपल्याला असायला हवी. काही महाभाग कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अगदी बेफाम होऊन सुसाट वेगाने गाड्या चालवताना दिसतात. आपल्यामुळे लोकांना काही त्रास होत असणार हे त्यांच्या गावीही नसते. या अशा प्रकारच्या बिलंदरांना दुसऱ्याबद्दल काही सोयरसुतक नसते आणि स्वतःबाबतही हे लोक कमालीचे बेफिकीर असतात. मग एखाद्या दिवशी जिवावर बेतणारा अपघात झाल्यास पश्चाताप करण्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाही!

आजकाल बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत घेऊन जाण्यापासून तर त्याच्या अभ्यासाची नको तितकी काळजी घेताना दिसतात. काहीजणांना तर आपल्या मुलांचं अख्खं "होमवर्क" पूर्ण करण्याची काळजी घेण्याचं खूप टेन्शन असतं. हे जरा अति  होतं, नाही का? करू द्या ना...त्यांचा अभ्यास त्यांना, वेळ पडल्यास तुम्ही मार्गदर्शन करू शकताच ना! तशीही आपल्याकडील स्पर्धात्मक शिक्षण पध्दतीमुळे, आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाची काळजी घ्यावीच लागते.आईला ज्याप्रमाणे आपल्या मुलांची काळजी असते, त्याप्रमाणे बरेच प्रामाणिक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेताना दिसतात. शेवटी त्यांच्या शाळेचा निकाल तसंच एकंदरीत दर्जा पण त्यांच्यावरच अवलंबून असतो म्हणा..!

अखिल विश्वाचं कल्याण होण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी त्या जगन्नियंत्याजवळ पसायदान मागितलं, ते आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी असलेल्या आत्यंतिक काळजीपोटीच !  आपणही आपल्या कुटुंबासाठी, समाजातील दीन दुबळ्यांसाठी, आपल्या देशासाठी काळजी घ्यायला हवी, नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे अशी जाण ठेवायला हवी! मग प्रत्येकाचं जगणं सुसह्य झाल्याशिवाय राहणार नाही.

                           ......  विनोद श्रा.पंचभाई
                        
                            
      



जिंदगीका साथ निभाता चला गया...

 जिंदगीका साथ निभाता चला गया...

कुछ अजीबसी घुटन
       कुछ अजीबसी कश्मकश...
जाने अन्जाने रास्तोपर
               कितनी जानलेवा 'रश'!

जिंदगी के लिए भागम् भाग
                या मर मिटनेकी दौड ?
हर कदमपर यहां
              लगती जैसे लोगोंकी होड!

पैसा कमानेके लिए
                    यह जिंदगी है या...
जिंदगी जीने के लिए
                        कमाते हम पैसा?
सवाल पुंछता हूं दोस्तोंसे
         तो हसकर जवाब मिलता है,
तू नहीं समजेगा अभी
                  तुझे हम बताए कैसा!

चंद सपने पुरे करते करते
              बहुतसे अपने बिछड गये!
कुछ दिल तोडकर गये
            तो कुछ आसानीसे छोड गये!

फिर भी ना तकरार है जिंदगीसे
                    ना कोई शिकवा गिला!
सभी को गले लगाते चले हम
                      प्यारसे जो भी मिला!!

.....विनोद.

खोली...

खोली...

घर कितीही मोठं असलं तरी
प्रत्येकाला हवी असते
एक आपली हक्काची खोली...

स्वतःशीच गुजगोष्टी करायला
दुनियेपासून एकांत मिळवायला!

कधी मनसोक्त वाचन करायला
तर कधी काही सुचलेलं लिहायला!

हवी असते एक खोली...
रेडिओ वरील मंद संगीत ऐकायला
एकाग्र चित्तानं चिंतन करायला!

अगदी शांतपणे पडून राहायला
अन् कधीतरी चक्क झोप काढायला!

 खरंच हवी एक
आपली हक्काची खोली...
कधीकधी स्वतः वरच चिढायला
तर कधीकधी एकांतात रडायला!

स्वतःच्या चुकांचा पाढा वाचायला
इतरांच्या उपदेशाचे मनन करायला!

कधीमधी जुन्या जखमांवरची
हळुवार काढायला खपली!
हवीच आपली एक
स्वतःची हक्काची खोली!
   
...विनोद.

सबसे मीठा बोल रे बाबा....

सबसे मीठा बोल रे बाबा...

"हत्ती बनून चारा खाण्यापेक्षा मुंगी बनून साखर खाणेच इष्ट!" अशा अर्थाची एक म्हण हिंदीमध्ये बरीच प्रचलित आहे. जीवनातील कुठल्याही क्षेत्रात आज आपण बघतो , प्रचंड चढाओढ आहे. कधी कुठल्या प्रकारचा प्रसंग कोणावर ओढवणार हे कोणीच सांगू शकत नाही. हल्ली जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी दिसते. तेव्हा पायी चालणाऱ्यांंना कधी कुणाचा धक्का लागणार याचा नेम नसतो. अशावेळी त्या प्रसंगाचं थोडं भान ठेवून, गोड बोलून परिस्थिती सहजतेनं हाताळणं कधीही चांगलं... 'टेक इट इझी' म्हणतात ना अगदी तसंच!

आजच्या मायावी जगात आपला कार्यभाग साधायचा असेल तर उगाच वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. जे काम सामंजस्यानं सहजासहजी होत असेल तर तेथे आपला बडेजाव न दाखवता नम्रपणा धारण करणंच रास्त ठरतं. त्यासाठी सौम्य भाषेत प्रसंगी गोड बोलून आपण आपलं कार्य तडीस नेऊ शकतो. आपण कुणीतरी मोठे आहोत असं दाखवत आपली छाप पाडणे कधीकधी घातक ठरतं , त्यामुळे होऊ घातलेलं किरकोळ काम सुद्धा फिस्कटू शकतं!

आजकाल गल्लीबोळात खेळणाऱ्या छोट्या छोट्या मुलांपासून तर नेत्याअभिनेत्यापर्यंत प्रत्येक जण एकमेकांंवर कुरघोडी करताना दिसतो. अगदी किरकोळ कारणही त्यासाठी पुरेसं ठरतं. त्यामुळे होतं काय की आपसात बेबनाव तर निर्माण होतोच शिवाय वातावरण सुद्धा गढूळ बनतं. तेव्हा अशाप्रकारच्या प्रसंगांंना सामोरं जाताना कुणीतरी पुढाकार घेऊन आपसात वाद न घालता संवाद साधणं तितकंच  महत्त्वाचं ठरतं! त्यासाठी कुणी कितीही अरेरावीची भाषा वापरली तरी त्याकडे दुर्लक्ष करून सौम्य भाषेत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करणे, प्रसंगी गोड बोलणे आपल्यासाठी कसं फायदेशीर आहे हे समजून घ्यायला हवं!

अगदी साधं उदाहरण बघा... एखाद्या प्राथमिक शाळेतील एखाद्या शिक्षकाने हसत खेळत 'आनंदी आनंद गडे' सारखी कविता मुलांना शिकवली तर वर्गातील वातावरण कसं हलकंफुलकं आणि प्रफुल्लित होतं! याउलट विद्यार्थ्यांवर सतत नको त्या प्रश्नांची सरबत्ती सोडणार्या शिक्षकांना मुलं चांगलीच वचकून असतात. वर्गातील वातावरण तणावमुक्त आणि हलकंफुलकं ठेवण्यासाठी काही शिक्षक अधूनमधून प्रासंगिक घटना तसंच छोटे मोठे विनोद विद्यार्थ्यांना सांगत असतात. त्यामुळेच मग साने गुरुजीसारखे मुलांचे मानसशास्त्र जाणणारे शिक्षक सर्वांनाच हवेहवेसे वाटतात... ते त्यांच्या हळुवार आणि संवेदनशील म्रुदु भाषेमुळेच ना !

त्याचप्रमाणें एखाद्या सरकारी किंवा खासगी कार्यालयात तेथील कामाच्या व्यापामुळे तणावग्रस्त वातावरण बघायला मिळते. मग अशावेळी तेथील एखादा सहकारी , त्या परिसरातील वातावरण हसतं खेळतं ठेवण्यासाठी प्रासंगिक विनोद करत असेल किंवा एखादी गाण्याची ओळ गुणगुणत असेल तर त्याचं कुणाला वावगं वाटण्याचं काहीच कारण नाही. उलट त्यामुळे इतर सहकार्यांचा मानसिक ताण कमी होण्यास मदतच होणार हे मात्र नक्की! पर्यायाने कामाची गुणवत्ता सुधारण्यास हातभारही लागेल हे वेगळं सांगायला नको.

मागच्या पिढीतील सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या एका चित्रपटातील गाण्याच्या पुढील ओळी आठवून बघा... " लोगोंका दिल अगर हां जितना तुमको है तो बस मीठा मीठा बोलो..." खरंच किती अर्थपूर्ण गाणं आहे नाही? तणावमुक्त जगण्याचं सार भरलं आहे या गाण्याच्या ओळीत! आपल्या जवळच्या मित्रानं किंवा नात्यातील एखाद्या सदस्यानं कुठल्याशा क्षुल्लक कारणावरून अबोला धरला तरी त्याचं मन वळविणं अजिबात अशक्य नाही. गरज आहे फक्त अन् फक्त दोन शब्द गोड बोलून आपण स्वतःच पुढाकार घेण्याची! मग जे काम धाक दपटशा दाखवून होणार नाही तेच काम दोन गोड शब्द बोलून होऊ शकतं याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

कार्यालयात काम करताना सुद्धा बहुतेकांना अनेक दिव्यांना सामोरं जावं लागतं. अनेकांना तर कधी एकदाची कार्यालयाची वेळ संपते आणि कधी आपण घरी जातो असं होऊन जातं. कधी कधी कामाचे प्रचंड व्याप असतात, नाही असं नाही! अशावेळी जास्तीचं 'टेन्शन' न घेता गोडीगुलाबीनं, आपल्या सहकार्यांंच्या मदतीनं, त्यांच्याशी दोन गोड शब्द बोलून काम करुन घेणं सहज शक्य असतं. नाहीतरी आपल्याला नेमून दिलेली कामे शेवटी आपल्यालाच करायची असतात. मग रडत रखडत, ताणतणावात काम न करता हसत खेळत, मोकळ्या वातावरणात संबंधित कामे करून बघायला हरकत नसावी. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कामे करताना उत्साह टिकून राहण्यास मदतच होईल. शिवाय सकारात्मकता सुध्दा वाढणार यात शंकाच नाही!

शेवटी काय, दबावाखाली कामे होतीलही... मात्र ती मनासारखी होईलच याची शाश्वती नसते. म्हणून गोड बोलून, मिळूनमिसळून काम करण्यास प्राधान्य दिलं तर एकप्रकारचं समाधान लाभणार हे निश्चित! कुणीतरी जुन्याजाणत्या विचारवंतांने म्हटलंच आहे..."व्यापार करताना किंवा नोकरी सांभाळताना नेहमी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी!" आपण निदान तसा प्रयत्न तरी करून बघायला काय हरकत आहे? झाला तर शेवटी फायदा आपलाच होणार ना! बाकी सुज्ञास सांगणे न लगे..!

                               ...... विनोद श्रा.पंचभाई
                                 भ्र.क्र.९९२३७९७७२५

Thursday, March 21, 2019

पुरावे..

पुरावे...

सांगा मित्रांनो ...
आता मी नेमके काय करावे?
जवळचेच लोक मागतात
माझ्या जिवंतपणाचे पुरावे..।

ज्यांच्यासाठी मरमर मरावे
अन् दुष्काळात पाणी भरावे
तेच आज मागतात..
माझ्या कर्तृत्वाचे पुरावे..।

या स्वार्थी दुनियेत सारेच शहाणे
आणि आपण अडाणी ठरावे.!
आपल्या प्रामाणिकपणाचे
कुठून देऊ मी यांना पुरावे..?

या तथाकथितांसमोर ...
ओरडून घसा मी किती खाकरावे..
या खोटारड्यांपुढे सत्याचे
मी देऊ कसे पुरावे...?

स्वत्व विकून ज्यांनी कीर्तीरुपे उरावे
अशा पांढरपेशांंना...
मम शरीरात आहे आत्मा,
याचे देऊ कसे पुरावे...?

एकमेकांविषयींचे नाते
हे खरंच विश्वासाचे ठरावे..।
मग कोणी मागणार नाही
कुणाला जीवघेणे पुरावे..!

           ..... विनोद श्रा. पंचभाई😇

Wednesday, March 20, 2019

मनाचा ब्रेक... उत्तम ब्रेक



मनाचा ब्रेक... उत्तम ब्रेक
"अहो आमचे 'हे' ना अगदी साधेभोळे! त्यांना कश्शाचं काही कळत नाही. कुण्या मित्राने यांना कुठे चल म्हटलं तर हे लगेच तयार असतात. मग आपल्याला जायचंय कुठं, हेही त्यांना आपल्या मित्रांना विचारावंसं वाटत नाही. आता हेच बघा ना...त्यादिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये आयोजित केलेल्या पार्टीत केवढा तमाशा झाला, अन् त्याचं खापर मात्र लोकांनी आमच्या ह्यांच्या वर फोडलं..!" अंजूताई तावातावाने बोलत होत्या.
" म्हणजे? अनिल भाऊंनी असं केलं तरी काय हो?..." सविताताईंनी आश्चर्यानं मध्येच विचारलं.
"काय झालं... यांच्या ऑफिसमध्ये एका मित्राच्या बदलीनिमित्त 'सेन्डाँफ पार्टी ठरली होती. तिथं कुणीतरी उत्साही मित्राने यांना खूप आग्रह करून थोडं 'ड्रींक' करायला लावलं. मग काय...आमच्या यांना त्याची सवय नसल्याने अन् हे कधी 'घेत' नसल्याने त्यांना भान राहिलं नाही. यांचा बोलण्यावरचा ताबा सुटला, आपल्या वरिष्ठांना चुकून काही तरी बोलले. आणि मग वाद वाढतच गेला. अशावेळी ऑफिसमधील इतरांनी तरी यांना समजवावं की नाही? समजावणं तर दूरच, उलट बाकीचे कुठल्याही प्रकारची मध्यस्थी न करता बघ्यांची भूमिका घेऊन मजा घेत नुसते तमाशा बघत राहिले. तरी मी यांना सारखं म्हणत होते, तुम्ही त्या पार्टीला जाऊ नका... पण माझं मेलीचं इथं ऐकणार कोण?" बोलता बोलता अंजूताई ना रडू कोसळलं...नंतर अजून बरंच काही बोलत होत्या!
अशाप्रकारचे छोटेमोठे प्रसंग आपल्या बघण्यात नेहमीच येत असतात. कालांतराने ते आपण सहजपणे विसरूनही जातो. यावर गंभीरपणे विचार केला असता एक गोष्ट लक्षात येते... ती ही की, भगवंतानं प्रत्येकाला सारासार  विचार करण्याची शक्ती आणि विवेकबुद्धी दिलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वरील प्रसंगांंना सामोरं जाताना आपल्या मनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. त्यासाठी गरज आहे प्रबळ इच्छाशक्तीची!! कारण मन मानेल तसं वागण्यानं त्याचे परिणामही भोगावे लागतील हे मात्र निश्चित. त्यामुळे आपल्या मनावर कधी ब्रेक लावायला हवा हे ज्याचं त्यानंच ठरवायला हवं!
अगदी छोट्याछोट्या प्रसंगात सुद्धा लहान मुलांचं तर सोडाच, स्वतःला मोठे समजदार समजणारे पण अनेकदा घायकुतीला येताना आपल्याला दिसतात. तेव्हा तेथे कोणीही सामोपचाराने घ्यायला तयार नसतो. मग कधीकधी त्याचे खूप गंभीर परिणाम ही भोगण्याची परिस्थिती निर्माण होते..!
शांतपणे विचार केला असता असं लक्षात येईल... अशा प्रकारचे प्रसंग किंवा घटना या नक्कीच टाळता येऊ शकतात. त्यासाठी आवश्यक ता आहे... मनावर नियंत्रण ठेवण्याची, प्रसंग बघून यशस्वी माघार घेण्याची!."मनाचा ब्रेक... उत्तम ब्रेक" या उक्तीप्रमाणे मन मानेल तसं न वागता मनाला थोडा ब्रेक लावून, प्रयत्नपूर्वक थोडं वळण देऊन वळविणे हेच केव्हाही श्रेयस्कर..!

              ........... विनोद श्रा.पंचभाई
                       मो. क्र.९९२३७९७७२५

Sunday, March 17, 2019

झूठ बोले... कौवा काटे..!


झूठ बोले, कौवा काटे..।

"ऐसी जगह बैठिए, कोई ना बोले ऊठ।
 ऐसी बात बोलिए, कोई ना बोले झूठ।।" या अतिशय मार्मिक दोह्याच्या मार्फत क्रांतिकारी संत कबीर महाराज यांनी पंधराव्या शतकात सर्वसामान्य जनतेला उपदेश केला होता. आजची परिस्थिती तेव्हापेक्षा सुधारली आहे असं अजिबात नाही. उलट सत्ता लालसेपोटी चढाओढ आणि खोटारडेपणाला जणू ऊत आला आहे. वरील दोह्याचा मतितार्थ लक्षात घेतला तर तो आज सर्वांसाठी खूपच परिणामकारक ठरु शकतो. कारण सर्रास खोटं बोलून आपला कार्यभाग साधणारे आपल्या समाजात सर्वत्र सर्रासपणे आढळतात. एकदा खोटं बोललं की ते 'खरं' ठरवण्यासाठी त्यांना परत परत खोटं बोलावं लागतं. त्याचाच पाठपुरावा करावा लागतो.

काही काही लोकांना खोटं बोलण्यातच समाधान वाटतं. खोटं बोलल्याशिवाय त्यांना राहवत नाही. आता हेच बघा ना... आपल्या दुकानातील माल खपवण्यासाठी दुकानदार किंवा विक्रेते हमखास खोटं बोलण्याचा आधार घेतात. ते त्यांचं वस्तू विकण्याचं एक प्रकारचं तंत्रच असतं म्हणा! तसंच काही लोकांना नुसत्या थापा मारण्याची सवयच जडली असते. मग थापा मारण्यासाठी, त्या रंगवून सांगण्यासाठी खोटं बोलणं हे ओघानं आलंच..!
 
तसं बघितलं तर सामान्य पापभिरू माणसाला विनाकारण खोटं बोलणं खूप अवघड जातं. खोटं बोलण्याला धाडसही लागतं. कधी तशी वेळ आलीच तर सामान्य माणसाला खोटं बोलण्यासाठी मनाची तयारी करावी लागते.खोटं बोलायला मानसिकता सुद्धा तशी बनवावी लागते. मग त्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीचं समाधान झालं नाही तर त्यांनं विचारलेल्या प्रश्नांना किंवा शंकांना उत्तर देण्यासाठी परत परत नाईलाजानं खोटं बोलावं लागतं. अशावेळी मात्र त्या सामान्य पापभिरू माणसाची भंबेरी उडाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रसंगांंना सामोरं जातेवेळी त्याची पार वाट लागू शकते!

काही व्यक्ती मात्र खोटं बोलण्यात एवढे पटाईत असतात की, "या सम हाच" असं म्हणायची पाळी येते. अगदी शंभर टक्के खोटं बोलण्यात या व्यक्तीची एवढी सुसूत्रता असते की ऐकणारा मंत्रमुग्ध झाल्यावाचून राहत नाही. तो धादांत खोटं बोलत आहे हे ज्याला माहीत असतं ( म्हणजे त्याच्या जवळच्या व्यक्तीला ), त्याला एका क्षणी असंही वाटतं की... याला नक्कीच एखादा पुरस्कार द्यावा ! काही महाभाग बोलताना इतकी 'फेकाफेकी' करतात की ऐकणार्याच्या ते लगेच लक्षात येते. त्यावेळी त्यानं बोलताना अतिशयोक्ती आणि अतिरंजितपणाचा कळस गाठल्यानं लोकांच्या नजरेतूनही तो चटकन उतरतो. मग त्याचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक सुद्धा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास सहसा तयार नसतात. अशा 'फेकाफेकी' करणार्या बोलबच्चन व्यक्तीकडे सगळेच साशंक नजरेने बघतात. मात्र त्याचं त्याला काहीच सोयरसुतक नसतं. खोटं बोलण्याचं, थापा मारण्याचं जणू त्याला व्यसनच जडलं असतं!

काही व्यक्तींंना कारण नसताना, खोटं बोलून दुसऱ्या वर प्रभाव पाडायची सवय असते. तसेच बोलताना इतरांना 'डॉमिनेट' करण्यात ते धन्यता मानतात. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जातील, हे त्याच्या गावीही नसते. तसंच काही लोक मात्र हेतुपुरस्सर खोटं बोलून आपला कार्यभाग साधून घेताना दिसतात. 'चांगल्या आणि विधायक कारणासाठी खोटं बोलणं गरजेचं असेल तर जरूर खोटं बोलावं' अशाप्रकारचे मत मांडतानाही आपल्या समाजात काही महापुरुष दिसून येतात. नेहमीच सत्य बोलणारा धर्मराज युधिष्ठिर सुद्धा महाभारताच्या रणसंग्रामाच्या वेळी 'अश्वत्थामा मेला... नरोवा कुंजोरवा..!' याप्रमाणे अर्धसत्य बोलला होता. मात्र त्यावेळेस चं त्याचं बोलणं न्यायाच्या, धर्माच्या बाजूंनी होतं. ती एक युध्दनीती होती... विधायक कारणास्तव!

असं म्हणतात... जी व्यक्ती खरोखरच स्वतःशी प्रामाणिक असते, ती सहसा खोटं बोलण्यास धजावत नाही! अशी व्यक्ती समजा जर खोटं बोलत असली तर तिच्या हावभावावरुन जाणकारांच्या लगेच लक्षात येतं की ती खोटं बोलत आहे. त्याचप्रमाणे खोटं बोलण्याचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे जे काही खोटं बोललं जातं ते सगळं लक्षात ठेवावं लागतं. खरं बोलणार्याला मात्र ती भीती नसते. खरं बोलणारा आनंदी आणि तणावमुक्त असतो तर नेहमी खोटं बोलणारा नेहमीच तणावात वावरताना दिसतो!

"बच्चे मन के सच्चे" म्हणतात ते उगाच नव्हे. लहान मुलांच्या चेहऱ्यावर सदैव निरागसता आणि सच्चे भाव दिसून येतात. ती तणावमुक्त असल्याने त्यांच्या मुखकमलांवर सदानकदा हास्य फुललेलं आढळतं! मग जसजशी मुलं मोठी होऊ लागतात, तशी त्यांना मोठ्यांंच्या सहवासात हळूहळू खोटं बोलण्याची बाधा जडणं सुरू होतं. त्याला बर्याच अंशी पालक म्हणा किंवा घरातील वातावरण म्हणा तसंच काही अंशी शाळेत मिळणारी वागणूकही जबाबदार ठरु शकते. कालांतरानं थोडं मोठं झाल्यावर खोटं बोलणं काही मुलांच्या अंगवळणी पण पडतं! शेवटी सांगायचा मुद्दा असा की, विनाकारण किंवा गरज नसताना उगाच खोटं बोलणं हे कधीकधी खूपच घातक ठरू शकतं! तेव्हा आपण इतरांसोबतच स्वतःशी सुध्दा प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूया..! बाह्य क्रुत्रिम वस्तुंवर प्रेम करण्यापेक्षा आपल्या माणसांवर प्रेम करुया... स्वतःवर प्रेम करूया... निदान तसा प्रामाणिक प्रयत्न करुया म्हणजे विनाकारण आणि उठसुठ खोटं बोलण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही...

"हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
  माणसाने माणसाशी माणसासम वागणे...!"

                             ..... विनोद श्रा. पंचभाई
                               भ्र.क्र.९९२३७९७७२५

Saturday, March 16, 2019

कोण दिवस येई कसा...


कोण दिवस येई कसा...

" सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम, द्वेष यांच्यात लढाई!
द्वेष जाहला विजयी आणिक
प्रेम लपे आईच्या ह्रदयी!!"

ही मर्मस्पर्शी कविता जवळपास पस्तीस,छत्तीस वर्षापूर्वी नववीच्या अभ्यासक्रमाला होती... आता कवींचं नाव आठवत नाही. मात्र या कवितेचा भावार्थ मागच्या पिढीच्या ह्रदयात कायमचा कोरला गेला असणार, हे नक्की. आज आपल्याला बर्यापैकी लोकांमधील संवेदनशीलता, प्रेमभावना कमालीची कमी झाल्याचं पदोपदी अनुभवायला मिळते! कधी नव्हे इतका पराकोटीचा द्वेष उफाळून येताना दिसतो. उपरोक्त कवितेचा खरा अर्थ आजच्या व्यवहारात प्रकर्षांनं जाणवतो आहे! 
      या दुनियेतून 'सत्ययुग' इसवीसनाच्या पूर्वीच हद्दपार झालं आहे. नाही म्हणायला गांधीजींचे "सत्याचे प्रयोग" काही अनुयायांनी अनुसरले असतीलही.पण आता आजच्या यांत्रिक युगात मात्र ते पूर्णपणे दुर्लक्षित झालेलं आहे, असंच दुर्दैवानं म्हणावं लागतं.तसंच आपसातील सामंजस्याची, सलोख्याची प्रेमभावना सुध्दा हळूहळू लोप पावत असल्याचं जाणवत आहे, हे जिवंतपणाचं लक्षण असलेला कुणीही मान्य करणार यात शंका नाही!  कारण एकच आहे...कधी नव्हे इतका आज आपमतलबीपणा बोकाळला आहे, समाजात स्वार्थीपणा पराकोटीचा वाढला आहे!  
"मी आणि माझं... मला काय दुसऱ्याचं"  हीच व्रुत्ती जिकडेतिकडे फोफावताना दिसून येत आहे.त्यामुळेच परस्परांविषयी वाटणारी आत्मियता , सहानुभूती, प्रेम, आपुलकी या मानवाच्या स्वाभाविक भावना पुढच्या पिढीला फक्त कथा कादंबर्यातच वाचायला मिळणार की काय अशी शंका यायला लागली आहे! 

याचं कारण म्हणजे आपल्या समाजात राक्षसी व्रुती वेगानं पसरत असल्याचं चित्र आपण सर्वसामान्य लोक सर्वत्र बघत आहोतच. समाजातील बहुतेक क्षेत्रात राक्षसी महत्वाकांक्षा बाळगणारी मंडळी आपल्याला जिकडेतिकडे आढळतात.उद्योगक्षेत्र तसेच राजकारण क्षेत्रात तर झपाट्यानं अशा प्रकारच्या महाभागांची संख्या वाढत आहे.वैद्यकीय, संशोधन, बांधकाम इत्यादी क्षेत्रंही याला अपवाद नाहीत. दुर्दैवानं ही व्रुत्ती सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शिक्षणक्षेत्रात तसंच साहित्यिक क्षेत्रात सुध्दा आढळून येत आहे...बरोबरीनं कार्य करणारे, मदतीला धावून जाणारे, जीवाला जीव देणारे एखाद्या क्षुल्लक कारणावरून कधी कधी एकमेकांच्या जीवावर उठतात तेव्हा आपल्यासारख्या अतिसामान्य लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी घोर निराशा होऊन  "किती हे अध:पतन!" असं म्हणण्याची पाळी आपल्यावर येऊन ठेपते! 

आजच्या विभक्त कुटुंब पध्दतीत जगणाऱ्या लोकांचं  चित्र सुध्दा यापेक्षा वेगळं नाही.आजकाल जगण्यात एकप्रकारचा यांत्रिकपणा आला असल्याचं सर्वत्र दिसून येत आहे. एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा कमी होत आहे की काय असं बोलायला नक्कीच वाव आहे. कारण यांत्रिक युगामुळे जो तो नाईलाजानं "डिजिटल लाईफ" च्या आहारी गेला आहे. त्यामुळे होतं काय की, रात्री उशिरापर्यंत जागणं, झोप व्यवस्थित न झाल्यास चिडचिड होणं, पर्यायानं ताणतणाव वाढणं हे ओघानं आलंच. मग घरातील अगदी जवळच्या आपल्या माणसांशी सुध्दा कामापुरतं बोलणं होतं. कालांतरानं त्याचं पर्यावसान कधीकधी तुटक वागण्यात किंवा अबोला धारण करण्यात पण होतं. आपसात कुरबुरी वाढतात. कधीकधी क्षुल्लक कारणावरुन आपसात खटके उडाल्याची बरीचशी उदाहरणं आपल्या बघण्यात येतात.प्रकरण पार टोकाला गेलं की घटस्फोटासारखे प्रकारही होताना दिसतात.

हे नेमकं कशामुळे घडतं याचा विचार जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल... आज निरनिराळ्या क्षेत्रात कमालीची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करणं हेही ओघानं आलंच.याचा दुष्परिणाम आपल्या कुटुंब संस्थेवर सुध्दा होत असल्याचं दिसून येत आहे.आजच्या घडीला बहुतेक घरातील पती पत्नी दोघंही नोकरी करत असल्यानं, कालांतरानं त्यांच्यात एकप्रकारची 'जेलसी' व्रुत्ती निर्माण होत असल्याचं आपल्याला आढळून येईल.'घरातील मी कमावता आहे किंवा मी कमावती आहे, तुझ्या पेक्षा माझा पगार जास्त आहे त्यामुळे सगळं कसं माझ्या म्हणण्याप्रमाणंच व्हायला हवं' हा अहंभाव निर्माण होत असल्यानं साहजिकच आपसात द्वेषभावना वाढत आहे! मग अशा प्रसंगांना वेळोवेळी सामोरं जावं लागल्यानं प्रचंड ताणतणाव,नैराश्य,अस्वस्थता इत्यादी संकटांचा त्यांना सामना करावा लागतो. अशावेळी विभक्त पध्दतीमुळे छोट्या कुटुंबात कुणी जेष्ठ नसल्यानं, त्यांचा आश्वासक आधार किंवा सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा यापासून त्यांना वंचित राहावं लागतं! त्यांची कमतरता प्रकर्षानं जाणवते पण काही इलाज नसतो. 

आजच्या यांत्रिक प्रणालीमुळे जगण्याची परिभाषा जणू बदलून गेली आहे. निसर्ग नियमानुसार रात्री वेळेवर झोपणं व सकाळी लवकर उठणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र नेमकं हेच आपण विसरून गेलो आहे. रात्री पार्ट्या करणं त्यासाठी उशिरापर्यंत जागणं हे आजकाल 'स्टेटस सिम्बॉल' झालं आहे. मग दिवसा माध्यान्ह होईपर्यंत झोपून राहणे हेही ओघानं आलंच. त्यामुळे आपल्या शारिरीक रचनेत वेगानं बदल होत असल्याचं दिसून येईल. अगदी युवावस्थेपासूनच निरनिराळ्या व्याधींना आपण आपसूकच आमंत्रणं देत आहोत हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा दुर्दैवानं खूप उशीर झालेला असतो! मग आपल्या कर्माची फळं भोगण्यावाचून गत्यंतर नसतं. म्हणूनच हे सर्व टाळण्यासाठी वेळीच सावध होणं किती गरजेचं आहे हे आपलं आपणच कधी ठरवायचं हे विचारायला कुण्या जोतिष्याकडे जाण्याची गरज नाही! 

"कोण दिवस येई कसा कोण जाणतो...."
या राष्ट्रसंतांच्या उक्तीप्रमाणे आपण वेळीच सावध होऊन आपलं एकंदरीत जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करूया. आपापसातील द्वेषभावना विसरून सामंजस्य, सलोखा, आपुलकी निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं ही आजच्या काळाची गरज आहे. त्यानुसार आपलं जगणं तणावमुक्त, निरामय, आरोग्य संपन्न करूया...अगदी आजपासून, आत्तापासून..!
                           .......  विनोद श्रा.पंचभाई
                                      ९९२३७९७७२५


आम्ही दोघी


आम्ही दोघी...

"नमस्कार मँडम, मी सोनू, सोनल सुरेशराव कदम आणि ही माझी जुळी बहीण मोनू. आमच्या बाबांची बदली नाशिकवरून या शहरात झाल्यानं आम्ही इथं प्रवेश घेतला आहे... सहाव्या वर्गात!"
"बरं! मग काय..?" आपल्या डोळ्यावरचा चष्मा नीट करत शाळेच्या कार्यालयातील त्या मँडमनं विचारलं.
"आमचा वर्ग कुठं आहे ते सांगा ना प्लीज!" सोनू नम्रपणे म्हणाली.
"एक मिनिट हं... तुम्ही इयत्ता '६ ड' मध्ये जाऊन बसा ... दुसऱ्या मजल्यावर आहे पलीकडे..." टेबलावरच्या रजिस्टर मधील दोघींच्या नावाच्या नोंदी बघून मँडमनी तिला सांगितलं.
"धन्यवाद मँडम" आभार व्यक्त करुन सोनू आणि मोनू '६ ड' वर्गाच्या दिशेने निघाल्या. पायर्या चढत असताना त्यांना मुलींचा गोंगाट ऐकू आला. मग दुसऱ्या मजल्यावर येताच त्यांना दुरूनच 'इयत्ता ६ ड' पाटी दिसली. दोघीही एकाच वेळी वर्गात शिरल्यानं गोंगाट करत असलेल्या मुली एकाएकी शांत झाल्या अन् सोनू-मोनूकडे बघतच राहिल्या! त्या दोघीही जुळ्या बहिणी असल्यानं त्यांच्या चेहऱ्यात विलक्षण साम्य होतं. मग वर्गातील मुली आपसात कुजबुज करू लागल्या... "अगं बघतेस ना विजू, कसल्या भारी दिसतात त्या दोघी!"
"हो ना! खरंच, अगदी सिनेमातल्यासारखा डबल रोलच गं...! बरं का शितू, आपण ना त्यांच्याशी बोलूया आणि मैत्री करून घेऊ...मग काय मस्त धम्मालच..." विजू आपली मैत्रीण शितूला टाळी देत म्हणाली.
" हो हो नक्कीच गं ... चल उठ लवकर, त्यांना गाठूया आपण..." शितू आपल्या जागेवरून लगेच उठली अन् विजूचा हात धरत म्हणाली.

शितू आणि विजू त्या दोघींकडे जायला वळल्या. तोपर्यंत सोनू मोनूच्या भोवती वर्गातील बर्याच मुली गोळा झालेल्या होत्या आणि कुतुहलाने बघत होत्या. त्या दोघी मात्र थोड्या गोंधळल्या...काय करावं, काय बोलावं,कुठे बसावं, काही काहीच त्यांना सुचत नव्हतं! तेवढ्यात विजू, शितू त्यांच्या जवळ पोहोचल्या. विजू पुढं झाली आणि सोनूचा हात आपल्या हातात घेत हसतच म्हणाली... "हाय... मी विजया म्हात्रे अन् ही माझी मैत्रीण शितल माने. आणि तुम्ही?"
"आम्ही ना... मी सोनल आणि ही माझी बहीण मोनाली. बाबांची बदली इकडे झाल्यानं नाशिकहून आलोय.!" सोनू उत्साहानं बोलली. मात्र मोनू  कुठं बसायला जागा मिळते का म्हणून वर्गात सगळीकडे नजर फिरवत अगदी शांतपणे उभी होती. तेवढ्यात शितू म्हणाली..." तुम्ही दोघी आज पहिल्यांदाच वर्गात आलात ना .... मग चला की आमच्याशेजारी बसायला... तो बाक मोकळाच आहे..."
"हो हो ... चालेल." आतापर्यंत गप्प असलेली मोनू लगेच बोलली. नंतर त्या दोघी मुलींंच्या घोळक्यातून चालत विजू अन् शितूसोबत तिसऱ्या रांगेतील बाकाजवळ आल्या. बाकावरील धूळ साफ करून  सोनू मोनू तिथं निर्धास्तपणे बसत नाही तोच शितू त्यांना हसत म्हणाली... " तुमच्या दोघींच्या चेहऱ्यात इतकं कमालीचं साम्य आहे ना की बस्स! मला परत सांगणार का सोनल कोण आणि मोनाली कुठली ते?"

शितूनं विचारलेल्या  प्रश्नावर सोनू खळखळून हसली. तिच्या हसण्यात विजू आणि आजूबाजूच्या मुलीही सामील होत्याच. मग सोनू हसतच म्हणाली... "हे बघ शितल, मला सोनू म्हणायचं आणि हिला मोनू... नाहीतर घोळ व्हायचा तुझा." एवढं बोलून तिनं लगेच मोनूला टाळी दिली. मग सोनू - मोनूची लवकरच विजू आणि शितूसोबत गट्टी जमली. तेवढ्यात वर्गावर बाई येत असल्याची मुलींना चाहूल लागली. काही क्षणातच सगळा वर्ग शांत झाला. वर्गशिक्षिका असलेल्या दाणीबाई वर्गात येताच सर्वांनी उभं राहून त्यांना अभिवादन केलं. मग त्यांनी सगळ्यांंची हजेरी घ्यायला सुरुवात केली... पल्लवी नंदूरकर.... रागिणी खोत... शितल माने... विनीता परांजपे...!

सर्व वर्गाची हजेरी पूर्ण झाली मात्र सोनू-मोनूची नावं बाईंनी घेतली नाही. त्यामुळे त्या दोघी आपल्या जागेवर उठून उभ्या राहिल्या. तेव्हा बाईंचं लक्ष त्यांच्याकडे गेलं... त्या सोनू अन् मोनू कडे आळीपाळीने आ वासून बघतच राहिल्या! मग न राहवून सोनू बाईंना म्हणाली, "बाई आमची हजेरी घेतली नाही हो तुम्ही..!"
तिच्या आवाजाने बाई भानावर आल्या आणि मग आपल्या पुस्तकातील एक कागद काढून तो वाचत त्या म्हणाल्या, "मोनाली कदम, सोनल कदम बरोबर ना... का गं तुम्ही दोघी जुळ्या बहिणी ना..?"
"हो बाई! अगदी बरोबर."
"बरं तुमची नावं मी लिहून घेते हजेरी बूकात...आणि हो, मागील दोन दिवसांचा अभ्यास अन् आपल्या वर्गातील एकंदर शिस्तीबाबत पल्लवी तुम्हाला सांगेलच. ती या वर्गाची माँनिटर आहे... बसून घ्या आता ..!" दाणीबाई भारदस्त आवाजात म्हणाल्या.

शाळा सुटल्यावर सोनू-मोनू, विजू अन् शितूसोबत वर्गाबाहेर पडल्या. मग शितल आणि विजू बस थांब्याकडे जायला निघाल्या.तेवढ्यात ने-आण करण्यासाठी ठरवलेली रिक्षा तेथे आली. सोनू, मोनू रिक्षात बसून घराकडे रवाना झाल्या. रस्त्याचं, निरनिराळ्या दुकानांचं निरीक्षण करत त्या घरी पोहचल्या. आजी समोर दिसताच दोघींनी आपापली दप्तरं बाजूला ठेवून तिला

Tuesday, March 12, 2019

पुस्तक परीक्षण -- "प्रज्वलित मने'' (Ignited minds)


युवकांचे प्रेरणा स्थान.. डॉ. अब्दुल कलाम

 "ज्या व्यक्तीचे विचार उच्च असतात त्या व्यक्ती धर्माचा उपयोग आपल्या मैत्री साठी करून घेतात. नीच विचारांची माणसे मात्र धर्माचा उपयोग एकमेकांवरील द्वेषासाठी करतात." असा मर्मस्पर्शी संदेश देणारे थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी 'इग्नायटेड माईन्डस्' हे अफलातून पुस्तक लिहिले आहे. त्याचा अतिशय सुरेख अनुवाद लेखक चंद्रशेखर मुरगुडकर यांनी करून "प्रज्वलित मने" हे अत्यंत वाचनीय पुस्तक आजच्या युवकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. सन २०२० पर्यंत भारताचं रूपांतर एका विकसित देशामध्ये व्हावं या द्रुष्टिकोनातून भारतातील तरूणांच्या मनात स्फुल्लिंग चेतवावं असा मानस डॉ. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकातून व्यक्त केला आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आपल्या कार्यासाठी स्वतःला झोकून देण्याची व्रुत्ती या बळावर युवाशक्तीला काहीही अशक्य नाही असा द्रुढविश्वास त्यांना आहे. "माझ्या तंत्रज्ञान आणि त्याच्या नियोजनाच्या कालखंडात मी तरूणांच्या ताकदीवर आणि क्षमतेवर अवलंबून राहिलो. माझे सर्व तरुण सहकारी म्हणजे माझी शक्ती होती, ज्या शक्तीने मला कधीच दगा दिला नाही." असं ते प्रामाणिकपणे विशद करतात.

'भारताच्या आणि भारतीयांच्या क्षमतेविषयी मला वाटणार्या आदराचं प्रकटीकरण म्हणजे हे पुस्तक' ही उदात्त भावना डॉ. कलाम यांनी आपल्या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे. तसेच आपल्या क्षेत्रात कार्य करत असताना युवकांबरोबर आलेले अनुभव त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहेत. "माझ्या या विकसित भारताच्या स्वप्नात सहभागी व्हा आणि त्या माध्यमातून तुमची स्वतःची व इतरांची स्वप्ने साकार करा. माझा हा प्रयत्न आहे तो केवळ मार्गदर्शनासाठी. माझे विचार दुसऱ्यावर लादण्याचा माझा उद्देश नाही." असं ते परोपरीने सांगतात. या पुस्तकाच्या सर्व च प्रकरणांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांचा सविस्तर आढावा घेतला आहे. त्यांना भारतभर भेटलेल्या मुलांसोबत घडलेला संवाद तसेच निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्ती, विचारवंत, शास्त्रज्ञ, साधू, मौलवी यांचे विचार या पुस्तकात वाचताना सामान्य वाचक भारावून जातो, अंतर्मुख होतो! 

" राष्ट्र प्रेमाचं आणि देशभक्तीचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे जपान. एकता आणि अखंडता या त्यांच्यातल्या सद्गुणांमुळे अत्यंत केविलवाण्या अवस्थेत झालेल्या पराभवाचे रूपांतर त्यांना आर्थिक महाशक्तीमध्ये करता आलं. जे देश आज उच्चस्थानावर पोहचलेले दिसतात, त्यांच्यामध्ये उद्दिष्टांची जाणीव प्रकर्षाने दिसून येते. प्रामुख्याने जपान या देशाचं उदाहरण या बाबतीत देण्यासारखं आहे." अशाप्रकारचे प्रेरणादायी उतारे हे पुस्तक वाचताना आढळतात. तसेच आपल्या ध्येयाप्रती सातत्य आणि सुसूत्रीकरण असे दोन्ही गुण एकत्रितपणे असणारी द्रुष्टी लाभलेले डॉ. विक्रम साराभाई या अद्वितीय शास्त्रज्ञाबरोबर काम करताना आलेले डॉ. कलाम यांचे अनुभव वाचकांच्या ज्ञानात भरच टाकतात.

   डॉ. कलाम जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्यांना भेटले. त्या भेटीमध्ये मुलांनी त्यांना शेकडो प्रश्न विचारले. बहुतेक प्रश्नांमधून मुलांची निष्पाप व्रुत्तीच पाहायला मिळाल्याचं ते आवर्जून नमूद करतात. गुजरात येथील आनंद याठिकाणी ते काही विद्यार्थ्यांना भेटले. तेव्हा एक विलक्षण प्रश्न त्यांना एकाने विचारला... "आपला शत्रू कोण?" 
तो प्रश्न त्यांना आवडल्याने , त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडूनच उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं मिळाली. नंतर एका निरागस मुलीकडून उत्तर आलं... " आपला खरा शत्रू आहे गरीबी!" खरंच किती विचारपूर्वक आणि मार्मिक उत्तर दिलं त्या मुलीनं! मुलांच्या भावना जपणारे, त्यांचे प्रश्न मनापासून ऐकून घेणारे आणि त्यांचे समर्पक उत्तर देऊन समाधान करणारे डॉ. कलाम यांनी हे पुस्तक त्या निरागस मुलीलाच अर्पण केल्याचा येथे आवर्जून उल्लेख केला आहे.
   
 अशाच एका प्रसंगात एका मुलाने डॉ. कलाम यांना बेधडक प्रश्न विचारला..."मला एक सांगा सर, पाकिस्तानची शस्त्रास्त्रे भारतीय शस्त्रास्त्रापेक्षा अधिक प्रभावी आहेत का?"
त्यावर हा प्रश्न त्या मुलाच्या मनात कसा काय आला याबाबत डॉ. कलाम यांनी त्याला विचारले असता, आपल्या प्रसार माध्यमातून त्याला जे वाचायला मिळालं त्यातून त्याला हा प्रश्न पडला होता.
"आपल्याकडे कितीही बलाढ्य ताकद असली तरी तिला कमी लेखायची प्रव्रुत्ती आपल्या देशात आढळते. कुठल्याही प्रकारचे क्षेपणास्त्र किंवा कुठल्याही प्रकारचे अण्वस्त्र विकसित करून पुढे त्यांचे उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे. या प्रकारची क्षमता अख्ख्या जगात फक्त चारच देशांकडे आहे. तू तुझ्या मनातली ही शंका काढून टाक." डॉ. कलाम यांचे हे देशाभिमानाने ओतप्रोत असलेले उत्तर ऐकून त्या मुलाचे पूर्ण समाधान झाले.

डॉ. अब्दुल कलाम एका ठिकाणी म्हणतात..."माझ्या लहानपणापासून आज वयाच्या सत्तरीपर्यंत देशातील अनेक धर्मांचा अभ्यास करण्याची संधी मला लाभली. याबाबतीत मी स्वतःला सुदैवी समजतो. सगळे धर्म एकाच मध्यावधी कल्पनेची महती सांगताना मला दिसले, आणि ती कल्पना म्हणजे आत्मिक समाधानाची! भारतामध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे तिचा पाया हा आत्मिक समाधानाच्या तत्वावरच रचलेला आहे. आपल्याकडे फक्त उद्दिष्टांच्या जाणीवांचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे आपण आपल्या संस्कृतीशी प्रामाणिक राहू शकत नाही आणि स्वतःशी देखील नाही." 
त्याचप्रमाणे "अपयशामध्ये यश दडलेले आहे. विस्कळीत आणि गोंधळात पडलेल्या परिस्थितीमध्ये उद्याची आशा लपली आहे, तर सगळ्या अडचणींमध्ये त्यांची उत्तरे लपलेली आहेत. विविध श्रद्धास्थाने आणि आदर्श असलेले आपण एक अब्ज नागरिक आहोत. जोपर्यंत एक ठोस असा सार्वत्रिक द्रुष्टिकोन आपण अंगीकारत नाही तोपर्यंत देशाची ही 'शिवण' उसवतच राहणार आहे आणि जातीजमाती मधले भेद अधिक रूंदावत जाणार आहेत. सतत उसवत जाणारी आणि भेगाळणारी ही शिवण आपण घट्ट करण्याची, सशक्त करण्याची आज नितांत गरज भासते आहे. ज्यातून एकसंध भारताची निर्मिती होऊ शकेल." असा प्रखर आशावाद डॉ. अब्दुल कलाम व्यक्त करतात. शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याबरोबर अध्यात्माची सांगड घालणे आजच्या काळाची गरज आहे असे त्यांचे प्रामाणिक मत त्यांनी मांडले आहे. ते म्हणतात..."सर्वात सुंदर क्रुती कोणती आहे, तर समोरच्या माणसाला मन:शांती लाभेल असे वागणे, भुकेलेल्या माणसाला अन्न देणे, अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात देणे, काळजीत पडलेल्या माणसाला आधार देणे आणि जखमी लोकांच्या वेदनांवर फुंकर घालणे!"

"विद्यार्थ्यांनी या देशाला एक 'विकसित देश' म्हणून पुढे आणण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे. आपली मने प्रज्वलित करून विचारांचा आवाका वाढवला पाहिजे. युवाशक्ती ही देशाची खरी संपत्ती आहे. ते मोठे होतील तेव्हा त्यांच्या समोर आपण कोणाला उभे करणार आहोत? आई वडील आणि प्राथमिक शिक्षक हे मुलांचे चांगले आदर्श होऊ शकतात. जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा उच्च दर्जाचे व सचोटीने वागणारे, तंत्रज्ञान, विज्ञान, राजकारण आणि उद्योग यासारख्या सर्वच क्षेत्रातील राष्ट्रीय नेते त्यांच्या समोर आदर्श म्हणून आपण उभे करायला हवेत" असे आपले प्रांजळ मत आणि विद्यार्थ्यांविषयी त्यांना वाटणारी विलक्षण तळमळ या पुस्तकातून डॉ. कलाम यांनी व्यक्त केली आहे!

'चिनार पब्लिशर्स' यांनी प्रकाशित केलेले तसेच लेखक चंद्रशेखर मुरगुडकर यांनी अनुवादित केलेले "प्रज्वलित मने" हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने, युवापिढी ने तसेच सर्व वयोगटातील वाचकांनी आवर्जून वाचायलाच हवे इतके प्रेरणादायी आहे. सहज सोपी भाषाशैली आणि मुद्देसुद मांडणी यामुळे हे पुस्तक अतिशय वाचनीय ठरले आहे. स्वतः डॉ. अब्दुल कलाम यांची प्रस्तावना आणि चित्रकार के. सय्यद यांचे आकर्षक मुखपृष्ठ "प्रज्वलित मने" ला लाभले आहे. असे हे सर्वांसाठी प्रेरणादायी आणि वाचनीय पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवे. लेखक चंद्रशेखर मुरगुडकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
                               ...   विनोद श्रा. पंचभाई

प्रकाशक....सौ.सुषमा नहार
पाने....  १४४
किंमत...१५०रु.

डिजिटल जीवन...


डिजीटल जीवन...

रोज सकाळी उठल्याबरोबर आजकाल बहुतेक जण न चुकता आपला मोबाईल,  Laptop किंवा काँप्युटर उघडून बघतात... माझ्यासाठी कुणाचा, कुठला संदेश तर नाही ना! मग त्यांना कळते, whatsapp वर इतके संदेश आणि माहिती उपलब्ध आहे की ती वाचता वाचता बराच वेळ जाणार. काँप्युटरवरील ईमेल्स तपासण्यात व त्यांचे उत्तर देण्यासाठी तासभर तरी जाणारच. बर्याच लोकांना वाटते, आपण स्वतःला 'अपडेट' ठेवायला हवं. अगदी बरोबर आहे, स्वतःला अपडेट ठेवणं, झपाट्याने बदलणार्या जगाच्या बरोबरीनं चालणं हे एक वेळ ठीक आहे.परंतु नियमित जीवन 'डिस्टर्ब' करून हा सगळा खटाटोप, अन् तोही विकतचा, कशासाठी? आपला अमूल्य वेळ या खटाटोपात खर्च करून काय साधलं जाणार??

   काही लोकांना व्यवसायासाठी, त्यांच्या महत्त्वाच्या नियमित कार्यासाठी वरील गोष्टी आवश्यकही असतात. ती काळाची गरजही आहे. मात्र आजकाल शाळा, महाविद्यालयातील बरेचसे विद्यार्थी, अनेक संस्थांंचे प्रशिक्षणार्थी एवढंच कशाला सरकारी, निमसरकारी तसंच खासगी कार्यालयातील काही कर्मचारी-अधिकारी हेही सध्याच्या परिस्थितीत whatsapp चे जणू शिकारच झाल्याचे दिसून येत आहेत. एखाद्या कार्यालयात जाऊन कधीही बघा... बरेचसे अधिकारी, कर्मचारी तुम्हाला त्यांच्या जागेवर आढळणार नाही. कँन्टीनमधील फक्त चहाचा आस्वाद घेण्यासाठी हे तासभर तरी लावणारच! फार नाही पंधरावीस वर्षापूर्वी कुठल्याही कार्यालयातील कर्मचारी एखाद्या टपरीवर किंवा कँन्टीनमध्ये जमायचे तेव्हा त्यांच्या आपसात गप्पा रंगायच्या. त्यावेळी वातावरण कसं गजबजून गेलेलं असायचं पण आता... आता ज्याला बघावं त्याला... सगळे आपल्याच विश्वात रममाण! प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल अन् सगळ्यांंच्याच त्यात खूपसलेल्या माना! बरं चालताना सुध्दा हे मोबाईलमध्ये चाळे करत खालमानेनेच चालणार... कोणी ताठ मानेनं चालताना दिसला तर शपथ! सगळ्यांचं जगणंच जणू डिजीटल झालंय.

  क्षणाक्षणाला रंग बदलणार्या या दुनियेत सर्वसाधारण माणूस आज आपलं अंतरंग हरवून बसलाय! स्वतःचे विचार तो आज नीटपणे मांडू शकत नाही. स्वतःचे छंद मन लावून जोपासू शकत नाही, कारण मन एकाग्र होऊ शकत नाही ना! आज सामान्य माणसाची जीवनशैलीच पूर्णपणे बदलून गेली आहे. तो एकवेळ वडापाव खाऊन अख्खा दिवस काढणार पण आपला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी मात्र आवश्यक ती रक्कम वेगळी काढून ठेवणार ही आजची वस्तुस्थिती आहे. तसेच कमी पगारावर काम करणारे किंवा आर्थिक स्थिती यथातथाच असणारे सुद्धा आजकाल अँड्रॉइड मोबाईल बाळगताना दिसतात. मग नेटपँकसाठी लागणारी रक्कमही ते विवंचनेत असतानाही जमवतात. त्यामुळे मग अशाप्रकारच्या काही लोकांना तणावाचा सामना करावा लागतो. कारण अशाप्रकारचं 'डिजीटल' जीवन जगणंच त्यांच्यासाठी सर्वस्व होऊन बसतं!

  पूर्वी कुठल्याही स्तरावरील मानवाच्या आवश्यक गरजा म्हणजे "रोटी-कपडा-मकान" समजल्या जायच्या. त्यासाठी माणूस दिवसभर प्रामाणिकपणे राबून रात्री निवांतपणे निद्रादेवीच्या आधीन व्हायचा. तेव्हा ना कुठला तणाव असायचा, ना पैशाची 'तंगी' असायची! मात्र आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणं, पार्ट्या झोडणं हे 'स्टेटस सिम्बॉल' झालंय. अशाप्रकारे जीवनशैली झपाट्यानं बदलत गेल्यानेच झोपण्याच्या वेळा कधी बदलल्या हे आपलं आपल्यालाच कळलं नाही. अन् मग पर्यायानं कित्येक मानसिक आजार आपल्याला जणू अहेरात मिळाल्याप्रमाणे चिकटले, अजूनही चिकटत आहेत!

    महासत्ता होण्याच्या नादात आपली डिजीटल प्रगती झाली आणि होते आहे. मात्र सर्वसामान्य माणसाची मानसिकद्रुष्ट्या अधोगतीच होत आहे, हेही मान्य करावंच लागेल. आज चंद्रावर, मंगळावर जाण्याची तयारी जोमात सुरू आहे पण गावाजवळ असलेल्या आपल्या भावाकडे, बहिणीकडे जायला आपल्याला वेळ मिळत नाही हे कशाचं द्योतक आहे? एवढंच कशाला सकाळी घरून आपल्या कामावर निघालेला माणूस सायंकाळी किंवा रात्री वेळेवर घरी परतणारच याचीही आज आपण शाश्वती देऊ शकत नाही! कारण इथं कुणाला कुणासाठी वेळच नाही... जो तो आपल्याच नादात गुंग असल्याचं दिसून येतं, हे आपल्या पुढारलेल्या समाजाचं खरंतर दुर्दैवच म्हणावं लागेल!

  आज आपली जीवनशैलीच 'डिजीटल' झाल्यानं सर्वच स्तरातील लोक कधी नव्हे एवढे आपमतलबी झाल्याचं दिसून येत आहे. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय नातेवाईक सुद्धा आजकाल मदत करण्यास कचरतात, ही वस्तुस्थिती आहे. समजा आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही आप्तस्वकीयांकडे गेले तरी तुम्हाला तिथं चित्र वेगळं दिसणार नाही. एकतर टीव्हीवर मालिका बघण्यात ते मग्न दिसतील किंवा त्यांच्या हातात मोबाईल तरी असणार... टीव्ही वर जाहिराती सुरू झाल्या की मग तुम्हाला ते विचारणार, "बोला, कसं काय येणं केलं? कुठलं काम काढलं आज?" म्हणजेच काय नवीन तंत्रज्ञानामुळे डिजीटल यंत्रणा आपण स्विकारली खरी पण दुर्दैवानं आपलं जीवनही आज डिजीटल झालंय..! कालाय तस्मै नमः ... आता दुसरं काय म्हणणार!!
                                   .... विनोद श्रा.पंचभाई
                   1/3B, तपोवन सोसायटी, तपोधाम रोड
                      वारजे, पुणे...411058
                      मो.क्र. 9923797725
                ( पूर्व प्रसिद्धी... पाणिनी मासिक जानेवारी२०१९ , मुंबई)

Sunday, March 10, 2019

प्रार्थना

🌹प्रार्थना 🌹

हे दयासागरा, दयाघना
कधी येशील बघण्या
भारत आपुला पुन्हा!

तू वचन दिले होतेस आम्हा...
"येईल मी सत्वर परतुनि
धर्माला येईल जेव्हा ग्लानि "

इथे तर धर्मच भ्रष्ट केलाय
खुद्द धर्माच्या ठेकेदारांनी!
तुझ्याच नावाचा वापर करून
हे करती सर्रास मनमानी!!

इथे अतिरेक्यांना मिळते अभय
चोर दरोडेखोर फिरतात निर्भय!

सज्जनांवर खटले
दुर्जनांना मात्र डबोले!
पदके मिळवती वशिल्याचे तट्टू
नेते मलिदा खाऊन झालेत गट्टू!

तुला हे सांगताना गिरीधरा..
आमचीच वाटतेय आम्हास लाज!
उगाचंच आशेवर आम्ही,
कधीतरी बदलेल हा समाज!

हे देवकीनंदना,
करितो तुला प्रार्थना!
काही विपरीत घडण्याआधी..
दाखवूनि चमत्कार,
घे पुन्हा तू अवतार!
शेवटी तुच आमचा तारणहार!!
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
                ..... विनोद श्रा.पंचभाई

हायकू रचना..

काही हायकु रचना...

माझे दुर्गुण
जावोत ते जळून
यावे सद्गुण.।

ना पाठीराखा
नाही दुजा रे कोणी
तू चक्रपाणी..।

या दुनियेत
परके ते झालेले
होवो आपले..।

माझं अस्तित्व
शोधतो मी गावात
आलो रानात..।

प्रेरणादायी
तुझं इथं असणं
आता नसणं..।

....... विनोद श्रा. पंचभाई

असे गुरू... असे चेले...


असे गुरू... असे चेले..!


गोंदिया जिल्ह्यात नोकरी करत असताना बरेच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. निरनिराळ्या स्वभावाची माणसे भेटली. काही शहाणे, अतिशहाणे तर कधीकधी माणसातील अनेक प्रकारचे नमुने सुद्धा बघायला मिळाले. 

मुळचे नागपूरचे असलेले एक होतकरू शिक्षक गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका खेडेगावातील शाळेत नोकरी करत होते. त्यामुळे ते त्या शाळेत गोंदिया येथून रोज जाणे येणे करायचे. नंतर आठवड्याच्या शेवटी नागपूरला जायचे. त्यांच्याशी नेहमी भेटीसाठी होत असल्याने परिचय वाढला. मित्रत्वाची भावना निर्माण झाली. त्यांनी सांगितलेला त्यांच्या शाळेतील त्यांच्यावरच ओढवलेला एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतो...
शाळेत आठवीचा वर्ग सुरू होणार होता. एक एक विद्यार्थी वर्गात येऊन बसत होता. खेडेगावातील शाळा असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती तशी किरकोळच होती. शिक्षक वर्गात पोहचले. हजेरीपट उघडून त्यांनी एकेकाचे नाव पुकारण्यास सुरुवात केली. अजूनही उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्गात येणे सुरूच होते. नंतर एकदाचं हजेरी घेणं शिक्षकांनी संपवलं आणि गणित विषय शिकवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दोन विद्यार्थी घाईघाईने वर्गात येण्यासाठी दरवाजाजवळ थांबून म्हणाले... "गुरुजी आत येऊ का..?"
"कारे बाबांनो, एवढ्या उशीरा शाळा असते का...?"
शिक्षकांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्यातील एक जण म्हणाला... "गुरुजी, त्या आपल्या डोंगरे गुरुजींंनी आम्हाला एक काम सांगितलं होतं म्हणून उशीर झाला.
"बरं बरं ! जा बसा आपापल्या जागेवर!" त्यांना हाताने इशारा करून परत त्यांनी शिकवण्यास सुरुवात केली. मात्र शिक्षक पाठमोरे झाले की, ते उशीरा आलेले दोन्ही विद्यार्थी आपसात कुजबुज करत होते. बोलताना तोंडात काहीतरी चघळत होते. मग शिक्षकांच्या नकळत वर्गाच्या खिडकीमधून तोंडातून पिचकारी टाकत होते. त्यांचे हे असले 'उद्योग' लक्षात यायला शिक्षकांना फारसा वेळ लागला नाही.
मग शिक्षकांनी त्या दोघांजवळ जाऊन दरडावून विचारलं..."काय रे , काय आहे तुमच्या तोंडात? लवकर बोला."
तोंडात गुटखा असल्याने त्यांना धड बोलताही येईना. शिक्षकांनी त्यांचे खिसे तपासले तेव्हा त्यातून गुटख्याच्या दहा बारा पुड्या निघाल्या. मग मात्र शांत स्वभावाच्या त्या शिक्षकांचा संयम सुटला. त्यांचा संताप अनावर झाला अन् त्यांनी त्या मुलांच्या कानाखाली आवाज काढला. तेव्हा त्यांच्यातील एकाने लगेच उत्तेजित होत, खिडकीतून बाहेर पिचकारी टाकत शिक्षकांना म्हणाला..."ओ गुरुजी... मारू नका मला. या पुड्या त्या डोंगरे गुरुजींंच्या हायेत. आमच्या नाय. त्यांनी मगाशी हेच काम सांगतलं व्हतं."
त्या मुलाचं बोलणं ऐकून शिक्षक हबकूनच गेले आणि सुन्न झाले!

 आता सांंगा... हे असे डोंगरे गुरुजी सारखे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवणार की बिघडवणार? अशाप्रकारचे गुरु लाभले तर त्यात त्या विद्यार्थ्यांचा तरी काय दोष? खेडेगावातील बरेचसे पालक आपापल्या शेतीव्यवसायात सतत कामात असतात. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांकडे पुरेसा वेळ द्यायला एकप्रकारे दुर्लक्षच होते. हल्लीच्या शहरी पालकांसारखे ते जागरूक नसतात. आपली मुलं शाळेत जातात याचंच त्यांना अप्रुप वाटतं. शहरातील प्रत्येक शाळेत नियमितपणे पालक सभा होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल आणि वागणूकीबाबत पालकांना 'अपडेट' मिळत असते. अशा प्रकारच्या पालकसभा खेडेगावातील शाळांमध्ये अभावानेच होताना दिसतात. नाही म्हणायला, काही धडाडीचे आणि जागरूक शिक्षक खेडेगावातील पालकांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना दिसतात. त्यांना मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या शिक्षणाबद्दल मार्गदर्शन ही करतात. मात्र दुर्दैवानं अशा सेवाभावी, आदर्श शिक्षकांची आपल्या समाजात आजघडीला तरी खूपच वानवा आहे!

 खरं सांगायचं तर खेडेगावातील, विशेषतः दुर्गम भागातील शाळेत कार्यरत असणारे बरेच शिक्षक हे सहजपणे व्यसनाधीनतेकडे आक्रुष्ट होताना दिसतात. त्यांना वाटतं, आपल्याकडे अशा दुर्गम भागातील आडवळणाच्या शाळेत कुणाचंच लक्ष नसणार, आपण कसंही वागलो तरी काही फरक पडत नाही, आपलं कुणी काहीच वाकडं करू शकणार नाही. नंतर त्या शाळेच्या वार्षिक निरीक्षणाच्या वेळी अशाप्रकारचे हे महाभाग शिक्षक पध्दतशीरपणे सर्व 'मँनेज' करून व्यवस्थित 'सेटिंग' करण्यात नेहमीच अग्रेसर असतात.

दुर्दैवाची बाब अशी की या व्यसनी शिक्षकांच्या सानिध्यात राहिल्याने काही विद्यार्थ्यांना सुध्दा त्यांच्या नकळत्या वयातच व्यसन जडण्याची दाट शक्यता असते. मग 'जसा गुरु, तसा चेला' व्हायला फारसा वेळ लागत नाही. कारण त्या निरागस मुलांच्या आईवडिलांना वाटतं... आपला मुलगा शाळेत जातो. तो शिकून बाबूसाहेब बनणार! शाळेत मुलाला पाठवलं की आपलं काम संपलं अशीच मानसिकता आजही मागासलेल्या ग्रामीण भागात सर्वत्र आढळते. याच गोष्टीमुळे अशाप्रकारच्या व्यसनी शिक्षकांचे फावते. मग वार्षिक परीक्षा झाल्यावर निकाल लावायचं काम हेच शिक्षक करत असल्याने अगदी 'ढ' विद्यार्थी पण उत्तीर्ण होतात. आपला मुलगा पास झाला म्हणून त्याचे आईवडील सुद्धा खुश असतात. त्यामुळे अशा व्यसनी शिक्षकांविरूद्ध तक्रार देण्यासाठी सहसा कुणी धजावत नाही!
  आपल्या देशात गुरुची महती वादातीत आहे. गावातील उदाहरण द्यायचं झाल्यास अगदी सांदिपणी आश्रमातील शाळेपासून ते सानेगुरुजींंच्या शाळेपर्यंत आदर्श गुरुंंची एक थोर परंपरा आपल्याला लाभली आहे. त्यामुळेच एवढ्या तेवढ्या कारणावरून गुर गुर करणाऱ्या गुरुची नव्हे तर सर्वार्थानं निस्वार्थ ज्ञानदान करणाऱ्या गुरुजींंची आज समाजाला नितांत गरज आहे.
"ईश्वराचे जन्म देणे। आईबापासि निमित्त करणे।
विद्या गुरुंचे शिकवणे। भाग्य बने गावाचे।।

या कोवळ्या कळ्यांमाजी।लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी।
विकसता प्रकटतील समाजी।शेकडो महापुरुष।।

आदर्श होतील विद्यार्थीगण।गावाचे पालटेल जीवन।
कोठेच न उरेल गावंढळपण।टिकावूपरिवर्तन यामार्गे।।

विद्यामोले ऐसे चढता। येईल भाग्य गावाचे हाता।
तुकड्यादास म्हणे तत्त्वता।विसरूनका हा मूळमंत्र।।                                                    ----- ग्रामगीता

                       विनोद श्रा. पंचभाई
                    मो.क्र.९९२३७९७७२५

कठीण समय येता...

कठीण समय येता...
निनादचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. त्यानं अतिशय बिकट परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं. घरची परिस्थिती फारच बेताची! घरात आईवडील, दोन बहिणी, धाकटा भाऊ आणि स्वतः निनाद असं सहा जणांचं भरलं कुटुंब. त्यात निनाद सर्वात मोठा. निनाद लहानपणापासून अतिशय हुशार असल्यानं त्यानं इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरची पदवी मिळवली. भाऊ बहिणींचंही शिक्षण सुरू होतं. सगळ्यांंना घरच्या परिस्थितीची जाणीव होती. आईबाबांंनी खूप कष्ट घेऊन, प्रसंगी कर्ज घेऊन त्यांचं शिक्षण सुरू ठेवलं होतं!
निनादला मात्र आणखी पुढे शिकायचं होतं... पण त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव असल्यानं त्यानं नोकरी करता करता पुढील शिक्षण घ्यावे असे मनाशी पक्कं ठरवलं. मग त्यानं नोकरी मिळवण्यासाठी बर्याच कंपन्यांंमध्ये आपले 'रिझ्युम' सादर केले. मात्र दुर्दैवानं म्हणावा तसा प्रतिसाद त्याला मिळत नव्हता. एक दिवस त्याला अचानक एका मोठ्या कंपनीचा मेल आला... मुलाखतीसाठी त्याला बोलावण्यात आलं होतं. मुलाखत लगेच दुसऱ्याच दिवशी सकाळी दहा वाजता होती. त्यामुळे निनादनं लगबग करून आवश्यक कागदपत्रं तयार करून ठेवली.
   घरी एकच दुचाकी गाडी होती अन् ती सुध्दा निनादचे बाबा घेऊन जायचे. त्यामुळे त्याला बसनं जाणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून निनाद आपलं सर्व आवरून तयारीला लागला. आईबाबांना सांगून लवकरच तो घराबाहेर पडला. घरापासून बसस्थानक थोडं लांब असल्यानं तो घाईघाईनं चालू लागला. थोडा पुढं गेल्यावर समोरच त्याला रस्त्यावर गर्दी दिसली. एवढी गर्दी कशासाठी जमली असणार ... निनादनं कुतूहल म्हणून पुढं जाऊन डोकावून बघितलं...आणि तो बघतच राहिला! तेथे रस्त्यावर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट जाणवत होत्या! चौकशी केली असता त्या तरूणाच्या दुचाकीला कोणीतरी मागून जोरदार धडक देऊन पळून गेल्याचं निनादला समजलं. बघणारे लोक त्याठिकाणी हळहळ व्यक्त करत होते. मात्र कोणीही त्या तरूणाला मदत करावी म्हणून पुढे येत नव्हते. निनादनं ते द्रुश्य बघताच त्याच्या मनात आलं... आपण थोडी मदत करून पुढे जावं... त्यानं जमलेल्या लोकांना विनंती करून बघितली., पण कुणीही काही प्रतिसाद दिला नाही. लोक बघायचे आणि निघून जायचे. निनाद विचार करू लागला...''मुलाखतीला जावं की नाही. नोकरी मिळवणं पण खूप आवश्यक आहे. त्यामुळे घरी आईबाबांना नक्कीच हातभार लागणार होता! काय करावं? याला दवाखान्यात घेऊन जावं की मुलाखतीला जावं..!"  
मनाच्या दोलायमान स्थितीत असतानाच 'माणुसकी खातर आपण याला मदत करावीच' असा विचार पक्का करून निनादनं एक रिक्षा थांबवली. मग रिक्षाचालकाच्या मदतीने त्या अपघातग्रस्त तरूणाला जवळच्या दवाखान्यात लगेच दाखल केलं. त्यावेळी त्याची शुद्ध हरपली होती! नंतर त्या तरूणाच्या खिशातून मोबाईल काढून 'आई' लिहिलेला नंबर लावला आणि "थोडी दुखापत झाली आहे ... घाबरण्यासारखं काही नाही. तुम्ही सावकाश या, तोपर्यंत मी इथं आहेच" अशा प्रकारे व्यवस्थित बोलून निनादनं त्यांना दवाखान्याचा पत्ता सांगितला. एव्हाना त्या तरूणावर उपचार सुरू झाले होते. थोड्याच वेळात त्याचे आईबाबा पण तेथे पोहचले. त्यांना  निनादनं सगळी माहिती दिली आणि तेथेच थांबून उपचार पूर्ण होईपर्यंत मदत केली. तेवढ्या वेळात तो  मुलाखतीला जाणं पण विसरून गेला होता! त्या तरूणाचे आईबाबा आपले डोळे पुसत त्याचे आभार मानत होते .... " तुम्ही जर याला वेळेवर याठिकाणी आणलं नसतं तर... काय झालं असतं एक तो देवच जाणे!"
त्या तरूणाच्या आईबाबाकडून निनादला त्याचं नाव अतुल असल्याचं कळलं. तो एका मोठ्या कंपनी मध्ये मँनेजर च्या हुद्द्यावर कार्यरत होता. सकाळी त्याला उशीर झाल्याने तो घाईघाईतच घरून निघाला होता. आणि घरापासून थोड्या अंतरावर त्याला अपघात झाला होता. एकुलता एक असलेला अतुल त्याच्या आईवडीलांसाठी जीव की प्राण होता! त्याला बहीण भाऊ कोणी नव्हते. निनादनं स्वतः चा मोबाईल नंबर अतुलच्या आईबाबांना दिला आणि सांगितले, "कधीही आवश्यकता वाटली तर मला फोन करा मी तुमच्या मदतीला लगेच येतो." मग तो रात्री उशीरा घरी परतला.
 निनादच्या घरी सगळे त्याचीच वाट बघत होते. घरी पोहचताच त्याने घडलेला सर्व प्रकार सविस्तर पणे सांगितला. त्याच्या आईबाबांना निनादनं केलेल्या अचाट कामगिरी बद्दल, त्याच्या सहकार्याबद्दल मनस्वी समाधान वाटले. बाबा म्हणाले, "नोकरी काय पुन्हा मिळेलच पण गेलेला जीव परत मिळाला नसता आणि त्याच्या आईबाबांचा आधार कायमचा हरपला असता!" 
निनाद दिवसभराचा दमलेला असल्यानं हातपाय, तोंड धुवून 'फ्रेश' झाला. नंतर जेवण आटोपून तो गाढ झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तो दवाखान्यात गेला तेव्हा अतुल शुध्दीवर आला होता व आता तो बोलण्याच्या मनःस्थितीत होता. त्याच्या आईनं अतुलला निनादची ओळख करून दिली. त्यानं कोणत्या परिस्थितीत त्याला दवाखान्यात दाखल केलं, आणि त्यामुळे निनादला मुलाखतीला जाता आलं नाही वगैरे सर्व सविस्तर सांगितलं. मग अतुलनं मनापासून त्याचे आभार मानले अन् त्याच्या शिक्षणाबद्दल माहिती विचारली. निनादनं त्याला स्वतःबद्दलची इत्यंभूत माहिती दिली. अतुलनं लगेच आपल्या एका मित्राला फोन केला आणि आपल्या अपघाताची थोडक्यात माहिती दिली. मग निनादचा सर्व 'बायोडाटा' त्याला कळवला. त्याचा तो संबंधित मित्र एका कंपनीचा 'डायरेक्टर' होता. त्याच्या कंपनीत हुशार इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची गरज होतीच. फोनवर त्या मित्रानं सर्व कागदपत्रासह निनादला दुसऱ्या दिवशी त्याच्या कार्यालयात पाठवण्यास सांगितलं. फोनवर बोलणं झाल्यावर अतुल निनादला हसत म्हणाला... "आपण आता चांगले मित्र झालो आहोत, म्हणून औपचारिकता अजिबात चालणार नाही. त्यामुळे कुठलेही आढेवेढे न घेता तू उद्या या कंपनीत मुलाखती साठी जायचंच.." निनादनं त्याच्या हातातील कागद घेतला आणि सद्गदित होत म्हणाला, "खरंच तुम्ही माझ्यासाठी खूप मोठं काम केलंय...."
"अरे आपल्या जिवलग मित्राला तुम्ही आम्ही म्हणायचं नसतं आणि मित्राला फक्त थोडी मदत करतोय फार जास्त काही नाही. कळलं का निनाद..?"
नकळत निनादच्या डोळ्यात अश्रू जमा झाले! त्यानं अतुलचा हात हातात घेतला अन् घट्ट दाबला.मग त्याच्या आईबाबांना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला आणि घरी जायला निघाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी करून निनाद उत्साहात घराबाहेर पडला. त्यापूर्वी त्यानं न चुकता आईबाबांचे आशीर्वाद घेतले. अतुलनं सांगितलेल्या पत्त्यावरील कंपनीत निनाद वेळेवर पोहचला. नंतर राजेशकुमार अशी पाटी लागलेल्या केबिनमध्ये तो गेला... "गुड माँर्निंग सर, मी निनाद बोरकर मला...."
"अरे वा... या या मिस्टर निनाद. तुमच्याबद्दल मला अतुलनं बरंच काही सांगितलं आहे. प्लीज बसा तुम्ही".... निनादचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच राजेशकुमार यांनी त्याचं स्वागत केलं. निनादला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. मग त्यानं आपले कागदपत्रं टेबलावर राजेशकुमार यांच्या समोर ठेवले. निनादची निरनिराळी प्रमाणपत्रं बघून त्याच्यातील 'टँलेन्ट'ची कल्पना त्यांना आली. अतुलनं त्याच्या अपघातापासूनची सर्व हकिकत राजेशकुमार यांना आधी दिली होतीच. त्यामुळे निनादला त्यांनी त्याच्यातील परोपकारी व्रुत्ती आणि प्रामाणिकपणा बघून नोकरीवर दुसऱ्या दिवशीपासून रुजू होण्यास सांगितलं. तेव्हा निनादचा आनंद गगनात मावत नव्हता! त्याने राजेशकुमार यांचे खूप आभार मानले आणि बाहेर पडला.
  निनादनं एका दुकानातून मिठाईचा बाँक्स विकत घेतला. मग रस्त्यावर असलेल्या फळविक्रेत्याकडून काही फळं घेतली आणि तो सरळ दवाखान्यात गेला. तिथं अतुल नुकताच झोपून उठला होता.त्याला फळं देत निनादनं त्याला नोकरी मिळाल्याचं सांगितलं. अतुल अत्यानंदानं म्हणाला, "अरे मस्तच यार, खूप खूप अभिनंदन! आता पार्टी हवीच..."
 "हो नक्कीच...मला तुझे कसे आभार मानावे हेच कळत नाही..."
"हो का? मग असू दे रे आभार मानू नकोच..." हसतच अतुल उठण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्याच्या पायात फ्रँक्चर असल्यानं पूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे अतुलला अजूनही काही दिवस दवाखान्यात काढण्याशिवाय पर्याय नव्हता. नंतर काही वेळाने निनादनं अतुलचा निरोप घेतला आणि तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडला.
 निनादला आता कधी एकदा घरी पोहचतो असं झालं होतं. नोकरी मिळाल्याची खुशखबर त्याला घरी सगळ्यांंना द्यायची होती. घराजवळ आला तेव्हा त्याचा धाकटा भाऊ निषाद बाहेरच भेटला. त्याला सोबत घेऊन निनाद आनंदात घरी गेला. त्यानं आईबाबांना नोकरी मिळाल्याची बातमी देत आईच्या हातात मिठाईचा डबा दिला. त्याच्या आईनं तो देवासमोर ठेवला. सर्वांनी देवाला नमस्कार केला. आईबाबांना आता क्रुतक्रुत्य झाल्याचं समाधान वाटत होतं!
      निनाद रोज न चुकता दवाखान्यात अतुलला भेटायला जात होता. आता दोघंही खूप चांगले जिवाभावाचे मित्र झाले होते. दोघांच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध दिवसेंदिवस द्रुढ होत गेले. आता निनादच्या बहीणभावाचं शिक्षण व्यवस्थित होत असल्यानं त्याला खूप समाधान वाटत होतं. कधीकधी निनादच्या मनात विचार यायचा... आईवडिलांनी केलेल्या योग्य संस्कारामुळेच आपण अतुलला झालेल्या अपघातात मदत करण्यास उद्युक्त झालो. आज त्याच्यासारखा एक जिवाभावाचा मित्र तर मिळालाच शिवाय अपेक्षेपेक्षा चांगली नोकरी सुध्दा मिळाली.

                                  विनोद श्रा. पंचभाई
                                 मो.क्र. 9923797725
  

Friday, March 8, 2019

चक्रव्यूह

''चक्रव्यूह''

आपण कितीही
सरळ मार्गाने चालत असलो तरी,
घ्यावीच लागतात अचानक
कधीतरी वळणं !
मग----
नको असलेल्या वळणावर
भेटतात नेमकी नको असलेली माणसं!
आणि आयुष्याला लागतं 
वेगळंच वळण ! 
मग बेमालूमपणे जातो आपण
व्यसनांना शरण ! !

आणि होतात तेव्हा ---
परतीचे सगळेच मार्ग बंद! 
आपण आपले नसतोच, 
नकळत जगणं होतं बेधुंद! !
मग-----
अवस्था होते आपली ,
चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी!
नसतो आपण कुणाचेच, 
भासते त्यावेळी सारी दुनियाच पारखी!

मनापासून वाटतं तेव्हा ,
कुठेतरी दिसेल आशेचा किरण! 
कधीतरी जगण्याला 
लागणार एक नवीन वळण !
                        ---- विनोद श्रा.पंचभाई

नेहमी मीच का ऐकून घ्यायचं?

‘‘नाही, मला हीच वही पाहिजे... हाच रंग मला आवडला आहे, त्या नंदूला दुसरी वही घ्यायला सांग!’’ अनुने आरडाओरडा करत घर जणू डोक्यावर घेतलं होतं. आई तिला समजावताना आता वैतागली होती! शेवटचा उपाय म्हणून समजावणीच्या सुरात म्हणाली,
‘‘अगं असं काय वेड्यासारखं वागतेस अनु? तू नंदूची दिदी ना! मग आपल्या छोट्या भावाला एका क्षुल्लक वहीसाठी का रडवतेस? देऊन टाक ती वही त्याला, हवं तर तू दुसरी कुठलीही घे!’’
‘‘नाही, अजिबात नाही! मी ही वही घेणार म्हणजे घेणारच..’’ अनु ठामपणे म्हणाली.
‘‘अगं असं करु नकोस... आपल्या छोट्या भावाला रडवून तुला काय मिळणार आहे? आपण मुलीच्या जातीनं ऐकून घ्यायला हवं ना...! हे बघ, माझं ऐक जरा. नाहीतर बाबा आल्यावर आणि त्यांना हे कळल्यावर मलाच बोलणी खावी लागणार!’’ आईने तिला इशारा दिला.
‘‘म्हणजे काही झालं तरी मीच ऐकून घ्यायचं प्रत्येकवेळेस असंच ना..!’’ अनु फणकार्‍यानं म्हणाली आणि तिने रागारागानं हातातील वही नंदूकडे भिरकावून दिली. वही मिळाल्यामुळे नंदू टाळ्या पिटू लागला.
अनुच्या बालमनाला आता थोडं कळायला लागलं होतं... आपण मुलगी आहोत म्हणूनच आई आपल्याला सारखी रागावत असते आणि नंदूचे नको तेवढे लाड करते... नुसतं लाडोबा करून ठेवलंय त्याला... जे हवं ते त्याला लगेच मिळतं... सगळे हट्ट पुरवले जातात त्याचे... त्यामुळेच किती हट्टी झालाय नंदू इतक्यात! आईला समजत कशी नाही इतकी साधी गोष्ट? 
विचार करता करता तिला एकदम शाळेतील कदम बाईंची आठवण आली. किती छान शिकवतात सगळ्यांना... कसलाही त्रागा नाही की चिडचिड नाही. सतत हसतमुख चेहर्‍याच्या कदम बाई वर्गात आल्या की कसं प्रसन्न वाटतं. त्यांचा सहवास खूपच हवाहवासा वाटतो. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द ऐकण्यासाठी सर्वांचेच कान आतूर असतात. त्या बोलतात तेव्हा असं वाटतं त्यांनी  बोलतच रहावं आणि आपण फक्त ऐकत रहावं!
संध्याकाळी बाबा घरी आले. त्यांनी येताना सोबत आईस्क्रीम आणलं होतं. छोटा नंदू  दिसताच बाबांनी त्याला उचलून घेतलं. त्याचे पापे घेतले, लाड केले आणि म्हणाले... ‘‘आज आम्ही आमच्या नंदूसाठी आईस्क्रीम आणलंय... कोणतं फ्लेवर खाणार आमचा नंदूबाळ? मँगो की स्ट्रॉबेरी...’’
‘‘बाबा, स्ट्रॉबेरी मला हवंय!’’ शेजारी उभी असलेली अनु पटकन म्हणाली.
‘‘अनु, आधी आपल्या अभ्यासाचं आवर आणि ते दप्तर भरून ठेव! मगच आईस्क्रीम मिळणार!’’ आतल्या खोलीतून बाहेर येत आई तिला बोलली. 
‘‘हो बेटा अनु, तू आपला अभ्यास पूर्ण करून घे. आईस्क्रीम काय, ते सगळ्यांसाठीच आणलंय... नंतर तुला मिळणारच आहे.’’ बाबा तिला समजावणीच्या सुरात म्हणाले.
‘‘पण बाबा मला स्ट्रॉबेरी हवंय. ते माझ्यासाठी ठेवणार ना...?’’ अनुनं बाळबोधपणानं विचारलं.
‘‘नाही दिदी... स्ट्रॉबेरी मीच घेणार, माझ्यासाठीच आणलंय बाबांनी...’’ नंदू मध्येच बाबांना बिलगत ओरडला.
‘‘बघा हो बाबा, हा कसा करतोय... जे मला हवं असतं ना, नेमकं त्यासाठीच हा हट्ट करतो..’’ अनु त्रासिक चेहरा करून म्हणाली.
‘‘अगं पण तू दिदी आहेस ना त्याची... त्याला जरा समजून घेत जा... तुझा धाकटा भाऊ आहे तो... त्याच्यासाठी ऐकून घ्यायला हवंस तू!’’ बाबा तिची समजूत काढत म्हणाले.
 ‘‘हो का! म्हणजे नेहमी मीच समजून घ्यायला हवं...’’
‘‘पण मी म्हणते, मीच का ऐकून घ्यायचं सदा न कदा?’’
‘‘मी मुलगी आहे म्हणूनच ना!’’ रडवेल्या स्वरात अनु उद्गारली!
‘‘अगं किती त्रागा करतेस आणि छोट्याशा गोष्टीचा बाऊ करून काय मिळणार आहे तुला? नंदूला रडताना बघून आनंद मिळणार आहे का तुला?’’ आई करारीपणे म्हणाली. 
‘‘आणि मला रडायला आलं तर मी रडायचं पण नाही... मी फक्त प्रत्येक वेळी ऐकूनच घ्यायचं असंच ना?’’ अनु आवेशात म्हणाली.
‘‘आता कसं समजावायचं या पोरीला काही कळत नाही! तुम्हीच बघा आता आपल्या लेकीकडे... माझी कामं पडली आहेत... हिच्या नादात सगळं आवरायचं राहिलं... स्वयंपाकाचं पण बघायला हवं!’’ बाबांकडे बघत आई म्हणाली आणि आतल्या खोलीत निघून गेली.
अनु हिरमुसल्यासारखी बसून होती. तिचं आता अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. काहीतरी करायचं म्हणून ती पुस्तकं आणि वह्या वेगवेगळ्या करत होती. मग दप्तर भरायला लागली. नंतर आपल्या आवडत्या चित्रकलेच्या वहीची पानं उलटत असताना तिला झाशीच्या राणीचं चित्र दिसलं. राणी घोड्यावर बसलेली असून घोडा धावतो आहे असं ते चित्र होतं. या चित्राबद्दल तिच्या मनात नेहमी कुतूहल जागं व्हायचं कारण कदम बाईंनी शाळेत झाशीच्या राणीच्या पराक्रमाची गाथा सगळ्यांना ऐकवली होती! कधीकधी तिला वाटायचं आपणही या राणीसारखं घोड्यावर स्वार होऊन खूप वेगानं फेरफटका मारावा. घोडा नाही तर निदान छोटी सायकल तरी आपल्याजवळ असावी अशी कल्पना ती रंगवायला लागली. मग या वाढदिवसाला बाबांना सायकलच घेऊन मागायची असं तिनं ठरवलं.
आज नंदूचा पाचवा वाढदिवस होता. नेमका रविवारीच वाढदिवस आल्यानं बाबा आणि अनु दोघंही घरीच होते. आईची नेहमीप्रमाणे लगबग सुरू होती. बाबांनी सजावट करायला आणलेले फुगे आणि रंगीबेरंगी पट्ट्या पिशवीतून बाहेर काढल्या अन् फुगे फुगवायला सुरुवात केली. अनु सुद्धा त्यांना मदत करु लागली. फुगा फुगवताना एखादा फुगा फुटला की नंदूला खूप मजा वाटायची आणि तो टाळ्या वाजवायचा. नंतर फुगे आणि रंगीबेरंगी पट्ट्या लावून घरी मस्त सजावट करण्यात आली. वाढदिवस असल्याने नंदू आज खूप खुश होता. त्याच्यासाठी बाबांनी तीनचाकी सायकल आणली होती.
सायंकाळी अनुच्या घरी बच्चेकंपनी गोळा झाली. नंदूचा वाढदिवस घरगुती पद्धतीनं धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. आईने त्याला औक्षण करून ओवाळले. अनु आणि छोट्या छोट्या बालमित्रांनी नंदूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि टाळ्या वाजवल्या. बाबांनी त्याचे कौतुक करत त्याच्यासाठी आणलेल्या तीनचाकी सायकलवर बसवले. तेव्हा नंदूचा आनंद गगनात मावत नव्हता. मग सगळ्यांनी खूपच धमाल केली. 
सकाळी शाळा असल्याने अनु लवकरच उठली. कालचा दिवस नंदूच्या वाढदिवसात गेल्याने अनुचा वह्या, पुस्तकांचा पसारा तसाच पडला होता. तिनं आपलं दप्तर आवरलं. थोडं वाचन केलं. मग आईची हाक कानावर पडताच आंघोळीसाठी उठली. तेवढ्यात तिचं लक्ष नंदूच्या तीनचाकी सायकलकडे गेलं. नंदू पलीकडच्या खोलीत झोपलेला होता. आईचं आपल्याकडे लक्ष नाही हे बघूनच अनु तीनचाकी सायकलवर बसायला गेली, मात्र अचानक तिला आईच्या ओरडण्याचा आवाज आला... ‘‘अगं काय चाललंय तुझं... आज शाळेला दांडी मारण्याचा विचार आहे का? चल पटकन आंघोळ उरकून घे. बस येईलच इतक्यात...’’ 
‘‘हो गं, आलेच!’’ अनु कसंबसं बोलली आणि आंघोळीला पळाली.
पहिलाच तास कदम बाईंचा असल्याने मुलींनी वर्ग गच्च भरला. अनु आणि तिची जिवलग मैत्रीण रेणू यांची आपसात कुजबुज सुरू होती. काही मुली वाचनात दंग होत्या तर काही एकमेकींच्या खोड्या काढण्यात मग्न होत्या. तेवढ्यात कदम बाई वर्गाकडे येत असल्याची मुलींना चाहूल लागली आणि सगळ्या अगदी शांत झाल्या. बाई वर्गात येताच सर्वांनी उठून त्यांना अभिवादन केले. बाईंनी हसत मुखाने त्याचा स्वीकार केला आणि उपस्थिती घ्यायला सुरुवात केली.
‘‘मुलींनो, आज आपण बालकवींची कविता शिकणार आहोत... कोण सांगणार बालकवींचं पूर्ण नाव?’’ 
कदम बाईंनी प्रश्न विचारायचा अवकाश, अनु लगेच उठून उभी राहिली आणि म्हणाली... ‘‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे..!’’
‘‘शाब्बास अनु... बैस खाली!’’ कदम बाईंनी तिला हातानं इशारा करत बसायला सांगितले आणि शिकवायला सुरुवात केली...
‘‘बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बर्‍याच कविता लोकप्रिय ठरलेल्या आहेत. तर आपण आज त्यांची गाजलेली कविता ’आनंदी आनंद गडे’ वाचणार  आहोत... तसेच गाणारही आहोत! माझ्या सोबत तुम्हाला गायला आवडेल ना?’’
‘‘हो’’ सगळ्यांनी एका सुरात होकारार्थी आवाज काढून वर्ग दणाणून सोडला!
मग कदमबाईंनी तालासुरात कविता गायला सुरुवात केली... आनंदी आनंद गडे... इकडे तिकडे चोहीकडे
नंतर लगोलग वर्गातील मुलींनी ताल धरला!
शाळा सुटल्यावर अनु शाळेच्या मुख्य द्वाराजवळ उभी होती. तिचे बाबा तिला घ्यायला येणार होते. एक एक करत सर्व मुली शाळेबाहेर पडल्या. अनु मात्र चातकासारखी आपल्या बाबांची वाट बघत थांबली होती. शेवटी कंटाळून ती जवळ पडलेल्या एका बाकावर बसली. काही वेळाने तिला स्कुटरवर बाबा येताना दिसले. सोबत नंदू पण होता. बाबा जवळ येताच वाट पाहून कंटाळलेली अनु म्हणाली... ‘‘काय हो बाबा, किती उशीर? सर्व मुली कधीच निघून गेल्या अन् मी बसली तुमची वाट बघत!’’
‘‘अगं मी वेळेतच पोहचणार होतो पण तेवढ्यात हा नंदू आला ना घरी त्याच्या ’किलबिल’ मधून! मग याचा गणवेश बदलायला, खायला, आवरायला थोडा वेळ लागला... बरं चल बैस पटकन मागच्या सीटवर... जाऊया घरी!’’
खरंतर अनुला बाबांसोबत स्कुटरवर पुढं उभं रहायचं होतं. मात्र तिथं नंदू उभा असल्याने ती काहीच बोलली नाही आणि मुकाटपणे मागच्या सीटवर बसली!
येत्या 5 तारखेला अनुचा वाढदिवस होता पण त्याच दिवशी तिचे बाबा त्यांच्या ऑफिसच्या कामाने मुंबईला जाणार होते. घरी सगळ्यांंनाच माहिती होतं अनुचा वाढदिवस 5 ऑगस्टला आहे ते...! तिचे बाबा सायंकाळी घरी आल्यावर म्हणाले... ‘‘बरं का अनु, येत्या सोमवारी म्हणजे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच मला महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जायचंय... तिथून परतायला रात्री उशीर पण होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं, आपण तुझा वाढदिवस 4 तारखेला म्हणजे रविवारीच करुया...!’’ 
‘‘हो... चालेल बाबा... पण मला दुचाकी सायकल घेऊन हवी आहे वाढदिवसाला... घेणार ना बाबा?’’
बाबा काही बोलणार तेवढ्यात अनुची आई म्हणाली, ‘‘अगं अनु, काय करणार आहेस तू आतापासून सायकल घेऊन...? शाळेत जायला रिक्षा आहेच की! काही नको सायकल वगैरे... हवं तर बाहुली घेऊया एखादी!’’
आईचं निर्वाणीचं बोलणं ऐकून अनु लगेच उत्तेजित होऊन म्हणाली... ‘‘नकोय मला बाहुली... मला सायकलच हवी... बाबा सांगा ना तुम्ही आईला..!’’
‘‘अगं असं काय करतेस वेड्यासारखं... तू दिदी आहेस ना, मग थोडं ऐकून घेत जा ना... तुझ्यासाठी सायकल कधीतरी घ्यावीच लागणार आहे पण आता नको... मागच्याच महिन्यात नंदूच्या वाढदिवसाला बराच खर्च झालाय...!’’ बाबा तिची समजूत काढत म्हणाले.
‘‘म्हणजे नंदूला काय हवं नको तेच बघायचं तर... माझं काय, मी दिदी आहे ना म्हणून मी गप्प बसायचं... मीच सगळं ऐकून घ्यायचं असंच ना?’’
अनु लगेच फणकार्‍यानं बोलली आणि रडायला लागली.
‘‘अनु, आता बस झालं... गप्प बैस जरा, उगाच छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करत जाऊ नकोस तू... सायकल काय तुला आज ना उद्या मिळणारच आहे... माझं ऐकून घे जरा आणि ते दप्तर लवकर आवरून घे..!’’
आई तिच्याजवळ गेली अन् तिचे डोळे पुसत म्हणाली.
‘‘हो... हो! मीच ऐकून घेते सगळं... बाबा मला काही नकोच माझ्या वाढदिवसाला, खरंच काही नको. मी आता काहीच मागणार नाही!’’ रागारागाने अनु म्हणाली.
‘‘अगं! अनु बाळ, एवढा राग चांगला नसतो... तू आता शांत हो बरं... जा हात तोंड धुवून ये! आपण जेवायला बसूया सगळे!’’ बाबांनी तिच्या पाठीवर हात फिरवत समजावलं. 
मग काही न बोलता ती आपलं दप्तर आवरु लागली... मात्र तिच्या मनात विचार आलाच... नेहमी मीच का ऐकून घ्यायचं...?
- विनोद श्रा. पंचभाई 
९९२३७९७७२५