Thursday, September 30, 2021

दहा वर्षानंतरच्या शाळा

   दहा वर्षानंतरच्या शाळा


 इंग्रजांच्या काळात आपल्या कडे शाळा खूपच कमी प्रमाणात होत्या. तेव्हा ज्या शाळा होत्या त्या सुध्दा इंग्रजांच्या अमलाखाली होत्या. कालांतराने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यानंतर त्यांनी मागासवर्गीय मुलांसाठी ही विनामूल्य शाळा सुरू केल्या आणि शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. मग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी खेड्यापाड्यात सुध्दा विनामूल्य शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे सर्वसामान्यांना शिक्षणाची सोय झाली. त्याकाळात शाळेतील शिक्षक मन लावून शिकवायचे. आपले विद्यार्थी चांगले घडावेत हाच ध्यास त्यांनी घेतला होता. 


मात्र आज परिस्थिती अशी आहे की आता आपल्याकडे शाळा, काॅलेजची कमतरता नाही. अगदी छोट्या छोट्या शहरात सुध्दा इंग्रजी काॅन्व्हेन्टच्या सोयी झाल्या आहेत. परंतु आजचे शिक्षण खूप महागडे आहे. अॅडमिशन मिळवण्यासाठी अव्वाच्या सव्वा फी नाइलाजाने द्यावी लागते. तसेच शाळेत शिकवायला शिक्षक असूनही शिकवणी वर्ग लावणे अत्यावश्यक झाले आहे. साने गुरुजींसारखे आदर्श शिक्षक आज नाहीत. त्यामुळे आर्थिक कमकुवत पण कुशाग्र बुद्धिची मुले शिक्षणापासून वंचित राहणार की काय अशी भीती वाटते! 


भविष्यात म्हणजे साधारणपणे दहा वर्षांनंतर आपल्याला शाळा, महाविद्यालये कमी झालेली दिसू शकतात. कारण पुढे संगणकीय पध्दतीने घरी बसून शिक्षण घेणे सहज शक्य होणार आहे. सध्याच्या 'कोरोना' परिस्थितीत त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतोच आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे दहा वर्षांनंतरच्या शाळा कशा प्रकारच्या असणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. परदेशात जशी संगणकीय शिक्षणपध्दती सुरू आहे, तशा प्रकारची शिक्षणप्रणाली आपल्याकडील शाळांमध्ये सुरू झाली असेल. त्यामुळे येत्या काळात अशाप्रकारच्या संगणकीय शिक्षण प्रणालीसाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकांची गरज भासणार हे ओघाने आलेच. 


  तब्बल ३४ वर्षानंतर आपल्याकडील शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल होणार आहे. सकारात्मक दृष्टिने विचार केला तर हा होणारा बदल विद्यार्थ्यांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याचं आपल्या लक्षात येईल. कारण या शिक्षण पध्दतीत व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाने पुढील शिक्षणासाठी आपल्या आवडत्या शाखा निवडण्याला भरपूर वाव आहे. मात्र शिक्षकांनी सकारात्मक विचार करून चांगले विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टिने हे आव्हान स्वीकारणे अपेक्षित आहे. 

 

येणाऱ्या दहा वर्षांनंतरच्या शाळांमधून अत्याधुनिक सोयी, सुविधा उपलब्ध असल्या तरी शिक्षण घेणे अतिशय खर्चिक ठरणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आजही दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती हलाखीची असणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना येणाऱ्या काळात शिक्षणापासून वंचित राहावे लागणार की काय ही भीती कायमस्वरूपी आहेच! अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी नाममात्र शुल्क आकारून सर्व सोयींनी युक्त अनुदानित शाळा सुरू करण्यावर सरकारने भर द्यावा. तसेच या शाळा व्यवस्थितरित्या चालवण्यासाठी नियमावली करून त्याची कडक अंमलबजावणी करणे महत्त्वाचे ठरेल. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीसारख्या सरकारी योजना काटेकोरपणे राबवणेही गरजेचे असे वाटते. कारण देशातील प्रत्येक व्यक्ती साक्षर होणे ही काळाची गरज आहे. 


... विनोद श्रा. पंचभाई, पुणे

भ्र.क्र. ९९२३७९७७२५



Tuesday, September 21, 2021

लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव


लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव


स्वातंत्र्य पूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. मात्र त्यापूर्वी सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होत होते. टिळकांनी या उत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले हे जास्त महत्त्वाचे! त्यामागे त्यांचा उद्देश अतिशय व्यापक होता. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशातील सामान्य लोकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आणून त्यांच्यात जनजागृती करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. म्हणजेच पर्यायाने जनजागृती करण्यात यशस्वी झाल्यावर इंग्रजांविरुध्द चळवळ सुरू करणे शक्य होणार होते. त्यामुळे समाजाला एकसंध करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले. 

इंग्रजांच्या काळात आपल्या देशात जातीपातीच्या प्रथा, रूढी, परंपरा, जुन्या चालीरिती आवर्जून पाळल्या जायच्या. लोक आपसात भेदभावही करायचे. काही जातीतील लोकांना तर मंदिराच्या समोरून जायला पण मनाई होती. त्यावेळी मंदिरातील देवालाच म्हणजे गणपतीलाच बाहेर काढून त्याला सार्वजनिक स्वरूप टिळकांनी बहाल करून देण्याचे अत्यंत विधायक कार्य त्याकाळात केले. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांना या सार्वजनिक उत्सवात सहभागी होता येऊ लागले. 

लोकमान्य टिळक पूर्वी विंचुरकरांच्या वाड्यात राहत असत. तिथे १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना प्रबोधन करणे हा टिळकांचा मुख्य हेतू असल्याने या गणपती उत्सवात प्रबोधनात्मक व्याख्यानांवर अधिक भर दिला जात असे. स्वतः टिळकांचेही व्याख्यान त्यात होई. १८९५ मध्ये विंचुरकरांच्या वाड्यात लोकमान्यांचे 'महाभारतातील दोन महापुरुष' या विषयावर व्याख्यान झाले. 'श्रीकृष्ण आणि भीष्माचार्य हे दोन प्रमुख राजकारणी होते,' असे प्रतिपादन त्यांनी केले. विंचुरकर वाड्यातील गणेशोत्सवात पांगारकर, प्रा. जिनसीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आदी वक्त्यांची भाषणे होत. १९०५ पासून केसरी संस्थेचा गणपती उत्सव गायकवाड वाड्यात (केसरीवाड्यात) होऊ लागला.

केसरीवाडा गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रबोधनात्मक कार्यक्रम व व्याख्यानांवर असलेला भर. अगदी प्रारंभापासून येथे जी व्याख्याने झाली, त्याचे विषय लोकजागृती व प्रबोधन करणारे होते. १९०५ च्या उत्सवात लोकमान्य टिळकांनी 'देह आणि आत्मा' या विषयावर व्याख्यान दिले. १९०७ मध्ये सीताराम केशव दामले यांचे 'राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०८ मध्ये महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांचे 'लोकशिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०९ मध्ये 'धर्म आणि शास्त्र' या विषयावर व्याख्यान झाले. गणेशोत्सवात प्रबोधनावर भर असावा, हा लोकमान्यांचा हेतू असल्याचे त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणातून स्पष्ट होते. 

या उत्सवातील दहा दिवस होणाऱ्या व्याख्यानांनी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून बरीच मोलाची माहिती आणि ज्ञान मिळते याची प्रचिती लोकांना येऊ लागली. त्यामुळे टिळकांनी सुरू केलेल्या या सार्वजनिक गणेशोत्सवाला कमालीची लोकप्रियता लाभली. यावरून लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. 

. लोकमान्य टिळक यांच्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. 'केसरी-मराठा' ट्रस्ट म्हणजेच 'केसरी'ची, संस्थेने १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली. पुण्यातील मानाचा पाचवा गणपती म्हणून केसरी वाड्यातील गणेशोत्सव आजही उत्साहात साजरा करण्यात येतो. या सार्वजनिक गणेशोत्सवाने वैचारिक व्याख्याने, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम अशी परंपरा अजूनही कायम ठेवली आहे.
... विनोद श्रा. पंचभाई, पुणे
    भ्र. क्र. ९९२३७९७७२५

Sunday, August 29, 2021

माझी नोकरी माझा अभिमान

 माझी नोकरी माझा अभिमान... 


सूर्य पश्चिमेकडे कलला होता. पुण्याला जाणारी सर्वसाधारण बस लोणावळा एस. टी. बस स्थानकावरून नुकतीच सुटली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे बसमधील प्रवाशांची संख्या तशी नगण्यच होती. थोड्याच वेळात मळवली गावाच्या थांब्यावर बस थांबली. दोन स्त्रिया बसमध्ये चढल्या आणि महिला कंडक्टर असलेल्या पल्लवी पाटील हिनं डबलबेल वाजवताच बस मार्गस्थ झाली. दोन्ही स्त्रिया तिच्याकडे बघतच राहिल्या त्यातील एकीनं न राहवून विचारलं... 

"ताई तुम्ही या बाळाला सोबत घेऊन ड्यूटी करताय, कमाल आहे तुमची... याला सांभाळायला घरी नाही का कुणी?"

"त्याचं काय आहे काकू, आता सवयच झालीय, आणि बाळ त्याच्या आईसोबतच हवं ना! बरं तुम्हाला कुठं जायचंय अन् मास्क कुठंय तुमचा? "

"दोन तळेगावची तिकीटं द्या. मास्क गडबडीत विसरले बघा ताई!"

"बरं हा घ्या मास्क माझ्याकडून... आधी व्यवस्थित लावून घ्या अन् ही तिकीटं धरा." तिकीटं दिल्यावर पल्लवी पैसे मोजत म्हणाली. 


कामशेत बोगदा ओलांडल्यानंतर बस पुन्हा थांबली. चार पाच मजूर बसमध्ये चढण्याच्या तयारीत होते. विशेष म्हणजे कुणाच्याही चेहर्यावर मास्क नव्हते. ते लक्षात येताच पल्लवी म्हणाली... 

"काका, तुम्ही दिवसभर इथं मजूरी करता... कुणासाठी? आपल्या कुटुंबासाठीच ना! मग त्यांच्या जिवाची काळजी नाही का तुम्हाला? तुम्ही स्वतः मास्क लावत नाहीत, त्यामुळे तुम्हाला तर धोका आहेच शिवाय तुमच्यापासून इतरांना सुध्दा तुम्ही संकटात टाकणार. हे घ्या, तुम्ही सगळे आधी हे मास्क चेहर्यावर लावून घ्या आणि नंतरच बसमध्ये चढा."

पल्लवीनं दिलेले मास्क हाती घेऊन त्यांच्यातील एक मजूर म्हणाला, "थॅंक्यू दीदी! हम लोग पत्थर फोडने की मजदूरी करते है ना... तब बहोत पसीना आता है और सांस भी फुलती है... इसीलिए हम मास्क उतारकर रख देते है! "

"हां दीदी, सुबह हम सब मास्क लगाकरही आये थे यहां ... अभी ये बस पकडने के चक्कर मे जल्दीमे वहीं छुट गये!" दुसरा मजूर चेहर्यावर मास्क लावत म्हणाला. 

"ठीक आहे, बसून घ्या आत. कुठं जाणार तुम्ही सगळे? पुणे स्टेशन ना?" पल्लवीनं आपल्या बाळाला थोपटत विचारलं. 

"नही दीदी, देहू रोड दिजीये पांच टिकट.. " पाचशेची नोट पल्लवीकडे देत एक मजूर पुढं म्हणाला, "वो आपके मास्क का पैसा भी इसीसे काट लिजीये।"

"ओ काका! मास्क मी माझ्यातर्फे दिलेय... मला माझ्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काळजी आहे म्हणून... आणि तुम्ही सुट्टे द्या की!" पल्लवी आवाज वाढवत म्हणाली. एव्हाना बसने वेग धरला होता. मग सर्व मजूरांनी आपापले पैसे काढून मोजले अन् नेमके तिकीटांचे पैसे पल्लवीकडे सुपुर्द केले. तिनं लगेच त्यांना तिकीटं दिली आणि एकदा पाठीमागे नजर टाकली. बाहेर पूर्ण काळोख असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचे हेडलाईट्स तेवढे चमकताना दिसत होते. 


काही वेळानं भरधाव वेगाने धावणाऱ्या बसचा वेग अचानक कमी झाला. ते लक्षात येताच पल्लवीनं मान उंचावून समोर बघितलं. समोर थोड्या अंतरावर थांबलेली वाहनं तिला दिसली. तिचं बाळ मांडीवर झोपलं होतं. त्यामुळे जागेवरून न उठताच तिनं बसचालकाला मोठ्या आवाजात विचारलं... 

"शिंदे काका काय झालं असणार हो पुढं? "

"आत्ताच काही सांगता येणार नाही! " रस्त्यावरची आपली नजर न हटवता बसचालक शिंदे म्हणाले आणि त्यांनी समोरच्या वाहनाचा अंदाज घेत हळूहळू बस थांबवली. समोर थांबलेल्या ट्रक्स, मोटारींची रांग दिसत असल्याने ते बाजूचा दरवाजा उघडून बसखाली उतरले. बस थांबल्याचं लक्षात येताच काही प्रवासी सुध्दा त्यांच्या जागेवरून उठले अन् दरवाज्याकडे निघाले. ते बघून पल्लवीनं त्यांना बजावलं... 

"आपापले मास्क न काढता सावकाश उतरा, बाहेर अंधार पसरला आहे... आणि आपल्या या बसकडे लक्ष असू द्या. पुढची वाहनं निघाली की कधीही आपली बस सुटणार!"


काही वेळाने बसचालक शिंदे परत येऊन आपल्या जागेवर बसले आणि मागे वळून म्हणाले... 

"बरं का पल्लवी, पुढं मोठा अपघात झाला आहे... लक्झरी बस अन् कंटेनर ट्रकमध्ये! उभ्या असलेल्या कंटेनरवर लक्झरी जाऊन धडकली असणार, कारण बसच्या पुढील भागाची पार वाट लागलीय."

"क्.. काय... बापरे! खूपच भयंकर अपघात झालेला दिसतो." घाबरतच पल्लवी बोलली. 

"हो ना... आता दोन्ही वाहनं बाजूला काढेपर्यंत आपण अडकलो की! पोलीस आणि अॅंब्युलन्स त्याठिकाणी पोहोचले आहेत म्हणा मदतीला... त्यामुळे लवकर सगळं सुरळीत होईल अशी आशा करूया..." बसचालक शिंदे बरंच काही बोलत होते मात्र पल्लवीचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. तिनं आपले डोळे मिटून घेतले अन् विचार करू लागली. मग तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळला...

 ... ऐन सांजवातीच्या वेळेला तिचा मोबाईल वाजला होता. मोबाईल उचलताच त्यावर तिला निरोप मिळाला, 

"पल्लवीताई लवकरात लवकर ससूनला पोहोचा. तुमच्या नवर्याच्या बसला अपघात झालाय. त्यांना आय.सी.यू. मध्ये दाखल केलंय."


ससून रूग्णालयातील संध्याकाळची जीवघेणी वेळ! पल्लवी घाईघाईनं छोट्या चिन्टूसह आय.सी.यू. वाॅर्डाच्या दिशेनं चालत होती. एका अनामिक भीतीनं तिचा जीव वरखाली होत होता! वाॅर्डाच्या प्रवेशद्वारात तिला अडवण्यात आलं. वाॅचमननं तिला सांगितलं, डॉक्टरांच्या टीमचा वाॅर्डात राऊंड सुरू आहे. तिला आता प्रतीक्षा करण्याशिवाय इलाज नव्हता. ती बाजूच्या एका बाकड्यावर जाऊन बसली. मात्र तिचे डोळे आय.सी.यू.च्या प्रवेशद्वाराकडे लागले होते. काही वेळाने तिनं छोट्या चिन्टूला आपल्या मांडीवर बसवून डोळे मिटून घेतले. मनात ना- ना विचारांनी थैमान घातलं होतं... कसा झाला असेल अपघात? एवढी सावध ड्रायव्हिंग असूनही नेमकं काय चुकलं असणार यांच्या हातून? बसमधील सर्व प्रवाशांच्या जीवाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे, असं हे कितीदा तरी बोलले असतील! आजपर्यंतच्या आयुष्यात साध्या सायकलचाही अपघात यांच्या हातून झाला नाही. मात्र आजच कसं हे विपरीत घडलं? निरनिराळ्या विचारांनी पल्लवीचं मन कासावीस झालं होतं! तेवढ्यात कुणीतरी बोलत असल्याचा आवाज तिच्या कानावर पडला अन् तिनं डोळे उघडले. आपसात बोलत असलेले पाच सहा डॉक्टर आय.सी.यू. वाॅर्डातून बाहेर पडताना तिला दिसले. ती लगबगीने उठली. छोट्या चिन्टूला तिनं उचलून घेतलं अन् अक्षरश: पळतच ती आय.सी.यू. वाॅर्डाच्या दिशेनं आत गेली. चपला बाहेर काढून ठेवण्याचंही तिला भान नव्हतं. आत गेल्यावर तिथल्या एका सिस्टरनं पल्लवीला चपला बाहेर काढून येण्यास बजावलं. बाहेर चपला काढून ती लगेच आत गेली तेव्हा तिच्या नवर्याचा, संदीपचा बेड तिला डाव्या बाजूला दिसला. 


एका हाताला सलाईनची नळी तर दुसऱ्या हाताला रक्ताच्या बाटलीतून पुरवठा करणारी नळी जोडलेली, कपाळाला विशिष्ट प्रकारचा पट्टा बांधून त्याचं कनेक्शन बाजूला ठेवलेल्या मोठ्या मशीनला जोडलेलं होतं. नाकातोंडावर ऑक्सिजनचा मास्क एवढं सगळं बघून पल्लवी गांगरली आणि ती जागेवरच थबकली! त्याक्षणी तिला वाटलं, आपण आता चक्कर येऊन तर पडणार नाही ना ... पण तिनं स्वतःला कसंबसं सावरलं. तेवढ्यात तिच्याजवळ एक सिस्टर आली अन् तिच्याकडे छोटा कागद देत म्हणाली...

 "तुम्ही यांच्या मिसेस ना... हे बघा, आताच डॉक्टरांनी हे इंजेक्शन्स लिहून दिले आहेत. तुम्ही लगेच बाहेरून घेऊन या."

थरथरत्या हातांनी पल्लवीनं सिस्टरच्या हातातील कागद घेतला. तिच्या डोळ्यात आसवं तरळली. तिनं रडवेल्या स्वरात सिस्टरला विचारलं, 

"ही इंजेक्शन्स इथं मिळणार नाही का सिस्टर? माझ्याकडे जास्त पैसे नाहीत हो!"

"हे बघा, शक्यतो आम्ही इथलीच औषधं वापरत असतो. तुमच्या पेशन्टला आता आवश्यक असणारी ही इन्जेक्शन्स आमच्याकडे नाहीत. कळलं का? तुमच्या परिचितांपैकी कुणाला फोन करून बघा अन् तातडीनं मागवून घ्या... पेशन्टची कंडीशन क्रिटिकल आहे." सिस्टरचं बोलणं ऐकून पल्लवीला धक्काच बसला. तिला काही सुचत नव्हतं. मग विचार करत, आपल्या बाळाला सांभाळत ती बाहेर निघाली. मोबाईल काढून तिनं मगाशी अपघाताचा निरोप मिळालेल्या नंबरवर काॅल लावला. पलीकडून लगेच आवाज आला... 

"हॅलो मी शेवाळे बोलतोय... तुम्ही पोहचलात का ससूनला?"

"हो काका! इथं थोडा प्राॅब्लेम आलाय मला... डॉक्टरांनी त्यांच्या राऊंडच्या वेळी यांच्यासाठी काही इंजेक्शन्स लिहून दिले आहेत. ते बाहेरून घ्यायला सांगितले पण माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत हो!"

"हे बघा काळजी करू नका तुम्ही... आम्ही आताच तिथून परतलो. मगाशी संदीपसाठी तिथं ऑक्सिजनची सोय लावून दिली अन् आमच्या काही बांधवांनी रक्तदानही केलं. मी तुमच्यासाठी मदत म्हणून पैसे पाठवतो. तुम्ही तिथंच आय.सी.यू.च्या गेटजवळ थांबा."

धन्यवाद काका... पण तुम्ही कोण बोलताय..?" पल्लवीनं उत्सुकतेनं विचारलं. 

"मी एसटी आगार प्रमुख शेवाळे! आज संदीपला त्याच्या छोट्याशा चुकीची खूप मोठी किंमत मोजावी लागली... "

"कसली चूक केली त्यांनी? " शेवाळे बोलत असतानाच पल्लवीनं अधीर होत मध्येच विचारलं. 

"नेहमी सेफ ड्रायव्हिंग करणार्या संदीपनं हायवेवरून परत येताना का कुणास ठाऊक एका टेम्पोला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक समोरून वेगात येणाऱ्या ट्रकला त्याची बस धडकली!"

"अरे देवा! काय करून बसले हे... " पल्लवी कसंतरी एवढंच बोलू शकली आणि थरथरत शेजारच्या बाकड्यावर विसावली मग ती भींतीला टेकून बसली. त्यावेळी ती शेवाळेंचं पुढचं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती... तिला वाटलं, आपल्याभोवती अख्खं जग फिरतंय अन् आपण कुठंतरी जोरात आपटणार!


दोन दिवस झाले तरी संदीप शुध्दीवर आला नव्हता. 

डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. एस. टी. चे आगार प्रमुख शेवाळे आणि काही सहकारी तिथं अधूनमधून येऊन जायचे. आदल्या दिवशी पल्लवीचे सासू सासरे पोहोचल्यामुळे तिच्या बाळाला सासूनं आपल्या ताब्यात घेतलं होतं. पल्लवीची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. मागील दोन दिवसापासून ती जागची हलली नव्हती. तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. हताशपणे आपल्या नवर्याकडे डोळे लावून बसल्याने तिचा चेहरा सुजला होता, डोळे लालभडक दिसत होते! मग काही वेळाने त्याच संध्याकाळी संदीपच्या आयुष्याचीही संध्याकाळ झाली! शुध्दीवर न येताच त्याची प्राणज्योत मालवली... पल्लवीनं फोडलेला हंबरडा ऐकून अख्ख्या आय.सी.यू. वाॅर्डाचा परिसर न्थरारला! त्यादिवशी दुपारपासून तिला सोबत करणार्या तिच्या आईनं तिला सावरण्याचा प्रयत्न केला. या धक्क्यातून सावरायला पल्लवीला बरेच दिवस लागले. म्हणतात ना... कुठल्याही दु:खावर एकच रामबाण औषध आहे, ते म्हणजे काळ! काही काळ, पुरेसा अवधी लोटला की दु:खाची तीव्रता कमी होते. दु:ख पचवण्याची ताकद आपसूकच माणसात निर्माण होते. पल्लवीच्या बाबतीतही हेच घडलं! 


घरच्या परिस्थितीमुळे पल्लवीला बारावी उत्तीर्ण झाल्यावर आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. नंतर अनुरूप स्थळ चालून आल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचं लग्न उरकलं. त्यामुळे काहीतरी करून दाखवण्याच्या पल्लवीच्या इच्छा, आकांक्षा अपुर्याच राहिल्या. तरीही तिनं तक्रार न करता आलेल्या परिस्थितीचा सामना करत आपला संसार फुलवला. सगळ्यांशी जुळवून घेतलं. मात्र संदीपच्या अचानक निघून जाण्यानं आता ती पार खचून गेली होती! सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर पल्लवी आपल्या दोन वर्षांच्या बाळासह आईकडे राहायला आली. मात्र काही दिवसातच आईसोबत राहत असलेल्या नोकरीपेशा विधवा वहिनीचे टोमणे 

तिच्या कानी पडू लागले. परिस्थिती माणसाला सगळं सहन करायला शिकवते पण पल्लवीचा स्वाभिमान तिला स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणूनच वास्तवाचं भान ठेवत तिनं आपल्या बाळासाठी, स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवलं. आता ती वेळ आली होती! 


राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख शेवाळे यांच्या सतत संपर्कात असल्यामुळे पल्लवीला निरनिराळ्या प्रकारच्या नोकऱ्यांबाबत बरीच माहिती मिळाली. मग तिनं काही कंपन्यामध्ये नोकरीसाठी अर्ज केले. केवळ बारावीपर्यंतचं जुजबी शिक्षण आणि कॉम्प्युटर किंवा आय.टी.आय.सारखं औद्योगिक शिक्षण नसल्यानं तिला नकार मिळू लागले. तरीही तिचे प्रयत्न सुरूच होते. नंतर काही दिवसांनी राज्य परिवहन महामंडळात कंडक्टरच्या जागा निघाल्याचं तिला शेवाळे यांच्याकडून कळलं. त्यात महिलांसाठीही काही जागा राखीव होत्या. पल्लवीनं लगेच त्यांची भेट घेतली आणि आवश्यक ते फाॅर्म्स भरून कंडक्टरच्या जागेसाठी अर्ज दाखल केला. दोन महिने उलटल्यावर तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. त्यादरम्यान पल्लवीला आगार प्रमुख शेवाळेंचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. परिणामी तिची मुलाखत छान पार पडली. तिनं हजरजवाबीपणे दिलेल्या उत्तरांनी परीक्षक चांगलेच प्रभावित झाले. त्यांच्या शेऱ्यामुळे तिची कंडक्टर पदासाठी निवड करण्यात आली. 


आनंदातच पल्लवी घरी परतली. तिनं महिला कंडक्टरच्या पदासाठी आपण सिलेक्ट झाल्याची बातमी आईला दिली. मात्र तिला ती तितकीशी रूचली नाही. संध्याकाळी तिची वहिनी घरी आल्यावर आईनं आपली चिंता व्यक्त केली... 

"त्या एसटी खात्यात सगळे पुरूषच नोकरी करताना दिसतात गं! खरंच तुला झेपणार का ही नोकरी? पल्लू जरा विचार करून बघ बाई..!"

मग संधी मिळताच वहिनी तिला म्हणाली... 

"बसमध्ये अनेक प्रकारचे लोक प्रवास करत असतात. त्यात कधीकधी व्यसनी आणि बेवडे सुध्दा असतात. त्यांच्यासमोर तुझा निभाव लागणं अवघड आहे!"

दोघींचं बोलणं पल्लवीनं शांतपणे ऐकून घेतलं. ती अजिबात नाउमेद झाली नाही. उलट आव्हान म्हणून ही नोकरी करायचीच असा दृढ निश्चय तिनं मनोमन करून टाकला. नंतर दोघींकडे पाहत ती ठामपणे म्हणाली... 

"मला वाटतं, तुम्ही दोघींनीही डॉ. अब्दुल कलाम यांचं 'अग्निपंख' हे आत्मचरित्र वाचलं नाही. ते म्हणतात... 'सतत सक्रिय रहा. जबाबदारी स्वीकारा. नाविन्याची कास धरा. आपल्या कामावर विश्वास ठेवून नेहमी कार्यरत रहा!' आई तुला सांगते, मी ही नोकरी आव्हान म्हणून स्वीकारणार आहे. मी तसं ठरवलंच आहे. तू माझी अजिबात काळजी करू नकोस!" 


काही दिवसातच पल्लवी तिच्या कामावर रूजू झाली. मग प्रशिक्षण कालावधीही तिनं व्यवस्थितपणे पूर्ण केला. तिथं दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रामाणिकपणे आपली नोकरी करायची हे तिनं निश्चित करून टाकलं. कधी एकदा आपण स्वतंत्रपणे कंडक्टर म्हणून बस हाताळणार असं तिला झालं होतं. सुरूवातीला जवळपासच्या फेऱ्यासाठी तिला पाठवलं जायचं. अशातच एकदा बसमध्ये असताना तिचा मोबाईल वाजला. पलीकडून शेवाळे बोलत होते... 

"काय म्हणतेस पल्लवी, कशी सुरू आहे नोकरी?"

"सर एकदम मस्त! खूप भारी वाटतंय... आता बसमध्येच आहे. तुम्ही कसे आहात?"

"मी ठीक आहे. तुझा हा सकारात्मक दृष्टीकोन खूप छान वाटला. एक नेहमी लक्षात ठेव... आपली नोकरी आपल्यालाच करायची आहे. त्यामुळे ती रडत कुढत न करता हसत खेळत कशी करता येईल हाच आपला प्रयत्न ठेवायचा, एवढंच तुला सांगायचं होतं!" 

"हो सर! तुम्ही सांगितलेलं नक्कीच ध्यानात ठेवणार मी."

"तू मला आधीसारखंच काका म्हटलं तरी चालेल! आणि हो, नोकरी करताना काही अडचण आल्यास कसलाही संकोच न बाळगता मला सांगायचं." शेवाळे म्हणाले. त्यावर पल्लवी हसतच म्हणाली... 

"तुम्ही आता माझे अधिकारी आहात सर... अन् मी यावेळी नोकरीवर असल्यानं तुम्हाला सरच म्हणणार ... सध्या मला इथं कसलीही अडचण नाही आणि मला वाटतं, ती पुढेही येणार नाही. कारण कंडक्टरची ही नोकरी मला आवडली आहे अन् माझ्या नोकरीचा मला अभिमान वाटतो सर!"

"व्वा पल्लवी... व्हेरी गुड! तुझ्या आयुष्यात तू नक्कीच खूप प्रगती करणार! माझा आशीर्वाद आहे तुला... चल मी ठेवतो फोन, काळजी घे."

"खूप खूप धन्यवाद सर!" पल्लवी म्हणाली. मग मोबाईल खाकी शर्टच्या खिशात सरकवत ती खिडकीतून बाहेर बघायला लागली... 


आपल्याच विचारात मग्न असलेली पल्लवी बसचालक शिंदेच्या आवाजानं भानावर आली... 

"पल्लवी सगळे पॅसेंजर आले असतील तर दरवाजा लावून घे ना!"

"हो, हो शिंदे काका! वाहतूक सुरळीत झालेली दिसतेय." समोरून येणारी वाहने बघत पल्लवी म्हणाली अन् बसमधील प्रवाशांची खात्री करण्यासाठी तिनं सर्वत्र नजर फिरवली. मग दरवाजा लावून घेत तिनं डबलबेल वाजवली ... शिंदेंनी बस सुरू केली. थोड्याच वेळात बस भरधाव वेगात धावू लागली. त्यामुळे आता हवेत गारवा जाणवत होता. पल्लवीनं खिडकी लावून घेतली आणि आपल्या अडीच - तीन वर्षाच्या बाळाकडे पाहत त्याच्या भविष्याचं नियोजन करण्यात मश्गुल झाली! 


पोलिसांच्या समस्या आणि त्यांची मानसिकता

 

पोलिसांच्या समस्या आणि त्यांची मानसिकता

प्रसंग पहिला...

"मॅडम तुम्हाला कळत नाही का, आपलं खातंं हे शिस्तीचं खातं आहे... इट्स डिसीप्लीन फोर्स! तुम्ही दोन दिवसांची रजा घेऊन गेल्यानंतर आज चौथ्या दिवशी अन् तेही आत्ता यावेळी उगवता. खरंतर कालच सकाळी दहा वाजेपर्यंत तुमचं हजर होणं अपेक्षित होतं. तरीही चक्क दीड दिवस उशिरा इथं पोहोचता... हा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हवालदार शिंदे या महिन्यात यांचा एक दिवसाचा पगार कपात करायचा, नोंद करून ठेवा.. " ठाणेदार रुबाबात म्हणाले.
"सर असं करू नका हो. माझं ऐकून तरी घ्या... मी... " महिला पोलीस काॅन्स्टेबल रागिणी मध्येच बोलली.
"काय ऐकून घ्यायचं? मागच्याच वर्षी तुम्हाला लांबलचक प्रसुती रजा मिळाली होती... आणि अजूनही अधूनमधून तुम्हाला रजा हव्या असतात."
"सर मी काल पहाटेलाच गावाहून निघाले होते पण थोडक्यात बस चुकली. मग नंतर सायंकाळचीच बस असते... आणि माझं सहा महिन्याचं बाळ सोबत घेऊन प्रवास करायचा होता. म्हणून आज पहाटे लवकर निघाले. सर, यावेळी थोडं समजून घ्या. यापुढे असं होणार नाही". गयावया करत रागिणी म्हणाली.
" ते काही नाही... तुमच्यासारख्या महिला पोलीसांना फक्त सवलती तेवढ्या पाहिजे असतात. आणि कामाचं म्हटलं तर सगळा आनंदीआनंद असतो! " ठाणेदारांचं कुत्सित वक्तव्य ऐकून रागिणीचा स्वाभिमान दुखावला. ती लगेच म्हणाली...
"सर रागावू नका पण आता स्पष्टच बोलते... आपल्या ठाण्यात महिला पोलीसांकरीता साधी बाथरूमची सोय नाही हे तुम्हांलाही माहिती आहे. मग त्यासाठी आम्ही थोडा वेळ काढून समोरच असलेल्या आमच्या क्वार्टरमध्ये जाऊन आलं तर त्याला सवलत म्हणायची का? आता राहिला प्रश्न कामाचा... सर, माझी वायरलेस ड्यूटी असताना किंवा कुठलाही बंदोबस्त असताना मी कधीही ड्यूटी सोडून जात नाही, हे तुम्हांला पण माहिती आहे."
रागिणीचे सडेतोड बोल ऐकल्यानंतर ठाणेदार थोडे वरमले आणि म्हणाले,
"हे बघा, आम्हालाही तुमच्यासाठी सेपरेट बाथरूम व्हावं असंच वाटतं. म्हणूनच डीएसपी कार्यालयाला त्याविषयीचा प्रस्ताव पाठवला आहे. तो मंजूर झाला की लवकरच तुमची सोय होईल. आणि आपल्या वरिष्ठांशी बोलताना आवाज वाढणार नाही याचं भान ठेवत चला. आता या तुम्ही ! "

प्रसंग दुसरा...
गडचिरोली जिल्ह्यातील एक अतिदुर्गम आऊट पोस्ट. तेथील पोलीस कर्मचार्यांना राहण्यासाठी, खरंतर दिवस ढकलण्यासाठी तात्पुरतं तयार केलेलं
पत्र्याचं शेड! तिथला हा मार्मिक संवाद...
"यार महेश, यावेळी मी गावी गेलो नाही तर खूप मोठा प्राॅब्लेम होणार रे! " सतीशनं आपली चिंता व्यक्त केली.
"का? काय झालं? तिकडे कोणी सिरियस आहे का? की पैशाचा वगैरे प्राॅब्लेम आहे ?" आपला सरकारी गणवेश हॅंगरला अडकवत महेशनं त्याला विचारलं.
"तसं काहीच नाही. तुला माहीतच आहे धाकट्या बहिणीचं लग्न जमलंय... साखरपुडा होऊन सहा सात महिने पण उलटले. अरे चार महिन्यापूर्वी लग्नाचा मुहूर्तही काढला होता. मात्र तो नाईलाजानं पुढे ढकलावा लागला. त्याचं कारण माहिती तुला?... त्यावेळी आपण नुकतेच या नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी आलो होतो म्हणून मला रजा मिळणार नव्हती." सतीशनं आपलं मन मित्रासमोर मोकळं केलं.
"अरे मग आता काय अडचण आहे? तू रजेचा अर्ज पाठवला होतास ना..? " महेशनं विचारलं
"हो रे! १५ दिवसाच्या रजेचा अर्ज दिला होता. मग आपल्या विभाग प्रमुखांनाही भेटलो तेव्हा ते म्हणाले, '१५ दिवस कशाला हवेत, दोन तीन दिवसासाठी जाऊन ये'. आता तूच सांग, सगळं कसं शक्य होणार? तुला माहिती आहे... इथून गावी पोहोचायचं म्हटलं तर प्रवासात अख्खा दिवस जाणार..! "
"एक काम कर, तू सरळ आपल्या एस. पी. साहेबांना भेटण्यासाठी अर्ज कर आणि त्यांना भेटून  आपली रजा मंजूर करून घे." महेशनं सुचवलं.
"तेही माझ्या मनात आलं होतं रे. तुला त्या अजयचा किस्सा लक्षात आहे का? त्याची आई गंभीर आजारी असतानाही त्याला रजा मिळाली नव्हती. मग त्यानं एस.पी. साहेबांना भेटण्यासाठी अर्ज केला होता मात्र आपल्या विभाग प्रमुखांनी तो पुढे पाठवलाच नव्हता. बिचारा अजय शेवटपर्यंत आपल्या आईला भेटायला जाऊ शकला नाही. नंतर तिच्या निधनाची बातमी आल्यावरच त्याला रजा मिळाली होती! " सतीश बोलता बोलता गंभीर झाला.
"हे बघ मित्रा, आता जास्त विचार करू नकोस. तू असं कर... सर तुला दोन तीन दिवस सोडायला तयार आहेत ना, मग तू लगेच निघ आणि नंतर गावाहून रजा वाढवण्यासाठी डायरेक्ट एस. पी. साहेबांना टेलिग्राम करून टाक! " महेशनं नामी युक्ती सुचवली.
"तू म्हणतोस ते पटतंय मला. पण तुला माहिती आहे, याचे परिणाम नंतर मलाच भोगावे लागणार. सर मलाच टार्गेट करतील रे!" सतीश त्याच्याकडे बघत निराशपणे म्हणाला.

प्रसंग तिसरा...
अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा प्रशस्त कक्ष. वातानुकूलित यंत्रणा असलेल्या त्या कक्षात आपल्या अत्याधुनिक आसनावर वरिष्ठ अधिकारी विराजमान झाले होते. समोरच्या भल्यामोठ्या टेबलावर हाॅटलाईन टेलिफोन, ब्राॅडबॅन्ड सुविधा असलेले काही फोन तसेच अद्ययावत बिनतारी संदेश यंत्रणा सुसज्ज होती. शेजारीच काही फाईल्स आणि कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यातील एक फाईल उचलून ती चाळण्यात अधिकारी महोदय व्यग्र होते. त्यांच्या आदेशाची तत्परतेने अंमलबजावणी करण्यासाठी समोर उभ्या असलेल्या आपल्या रिडरला त्यांनी अचानक आदेश दिला...
"हे कोण सदानंद सातपुते, बोलवा त्यांना ताबडतोब आत... अजून बरीच सेवा शिल्लक असताना स्वेच्छा निवृत्ती का मागताहेत हे..?"
"येस सर, लगेच बोलावून घेतो" रिडर अदबीनं म्हणाले आणि लगेच कक्षाबाहेर पडले. बाहेरील व्हरांड्यात साहेबांना भेटण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या आणि त्यासाठी ताटकळत थांबलेल्या कनिष्ठ अधिकारी, कर्मचार्यांची गर्दी जमली होती. त्यातील हवालदार सदानंद सातपुतेंना निरोप मिळताच ते तातडीनं पुढं आले आणि रिडरसोबत अधिकारी कक्षाकडे वळले. स्वच्छ गणवेश परिधान केलेल्या सातपुतेंनी चालता चालता खिशातून रूमाल काढून आपल्या चेहर्यावरचा घाम पुसला.

"सर, आत येऊ का?" सदानंद सातपुतेंनी कक्षामध्ये प्रवेश करताच नम्रतेनं विचारलं. वरिष्ठ अधिकार्यांनी काही न बोलता त्यांना मानेनंच होकार दिला. रिडरच्या सूचनेनुसार शिस्तीत टेबलासमोर आल्यावर सातपुतेंनी अधिकारी महोदयांना कडक सॅल्यूट ठोकला आणि ते 'सावधान' पोझिशनमध्ये त्यांच्याकडे बघत उभे राहिले. मग काही वेळानंतर आपल्या आरामदायी आसनावर पाठीमागे टेकत अधिकार्यांनी प्रश्न केला...
"सदानंद सातपुते, कुठल्या पोलीस ठाण्यात नेमणूक आहे तुमची?"
"सर, शहापूर पोलीस ठाणे." सातपुतेंनी नम्रपणे उत्तर दिलं.
"बरं! तुमचा आतापर्यंतचा कार्यकाळ तसा बरा दिसतो आणि अजूनही आठ-नऊ वर्षे सेवा बाकी आहे. मग स्वेच्छा सेवानिवृत्ती का मागताय तुम्ही?" त्यांच्याकडे रोखून बघत अधिकार्यांनी विचारलं. 'सावधान'मध्ये शिस्तीत उभे असलेले सातपुते अदबीनं हळू आवाजात म्हणाले...
"सर, मला दोन तीन वर्षापासून मधुमेहाचा आणि बीपीचा सारखा त्रास जाणवतो आहे आणि... " सातपुतेंचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच अधिकारी गरजले,
"अहो मग व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊ शकता ना... आपल्यासाठी शासनानं वैद्यकीय सेवा पुरवल्या आहेत की..! "
"हो सर, ट्रीटमेंट सुरूच आहे... पण घरी बायकोही सारखी आजारी असते आणि मुलांकडेही लक्ष देता येत नाही. म्हणून खूप टेन्शन येत असतं सर.." कसं तरी धैर्य एकवटून सातपुतेंनी आपली अडचण बोलून दाखवली.
"टेन्शन? कसलं टेन्शन घेता तुम्ही? तुम्ही काय मुख्यमंत्री, पंतप्रधानापेक्षा मोठे झालात का टेन्शन घ्यायला? टेन्शनचं तर मला सांगूच नका. हवं तर त्यासाठी नियमितपणे प्राणायाम करा."
"सर, सततच्या बंदोबस्त ड्यूटीमुळे नियमित व्यायामासाठी वेळ काढणं जमत नाही." सातपुते दबक्या सुरात म्हणाले.
"बंदोबस्ताचं कारण तुम्ही मला सांगू नका. बंदोबस्त काय तुम्हाला एकट्यालाच आहेत का? हे बघा, आपल्या खात्यात बंदोबस्त ड्यूटी हे रूटिन वर्क आहे... समजलं? "
"सर, सेवानिवृत्ती मागण्यामागचं एक अजून कारण आहे. कृपया राग मानू नका, आता स्पष्टच बोलतो... खूप गरज असल्यावरही साधी साप्ताहिक सुट्टी मिळत नाही. तसंच ज्यावेळी हव्या होत्या त्यावेळी रजाही आजपर्यंत मला मिळाल्या नाहीत. सारखा  दबावतंत्राचा सामना करावा लागतो आणि सर ... "
"कुठल्या दबावतंत्राची भाषा करता तुम्ही? आपल्या वरिष्ठ अधिकार् यासमोर बोलत आहात तुम्ही याचं भान ठेवा! " अधिकारी जवळजवळ ओरडलेच.
"हेच ते! सर, तुम्ही आमचे अतिवरिष्ठ अधिकारी आहात याचा आम्ही नेहमी मान राखतोच पण इतका वेळ झाला... मी इथं आल्यापासून याठिकाणी तुमच्या चेंबरमध्ये तुमच्यासमोर 'सावधान' पोझिशनमध्ये उभा आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितलंही, मला मधुमेहाचा आणि बीपीचा त्रास आहे. तरीही तुम्ही मला या इथं इतक्या रिकाम्या खुर्च्या असूनही साधं बसायला सांगितलं नाही. जरा आमच्या भावनाही समजून घ्यायला हव्यात तुम्ही... बस्स एवढीच अपेक्षा होती. असू द्या, माझ्या मनातलं बोलून दाखवलं. काही चुकलं असेल तर माफ करा. आता मी आपल्या खात्यात आणखी नोकरी करू शकणार नाही. कृपया मला स्वेच्छा सेवानिवृत्ती देऊन मुक्त करावं हीच नम्र विनंती आहे..!" बोलता बोलता सातपुतेंना गहिवरून आलं.

वरील काही प्रसंगांवरून पोलीस खात्यातील दबावतंत्राचा आणि मुस्कटदाबीचा अंदाज वाचकांना आला असेलच. इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्षांपेक्षाही जास्त काळ राज्य केलं. त्यांची त्या काळातील दंडुकेशाही पोलीस खात्यात आजही कायम आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आपल्या हाताखालच्या कर्मचार्यांना मन मानेल तसं वागवणं या इंग्लिश पोलीस अधिकार्यांपासून वारसात मिळालेल्या हुकूमशाहीचा कित्ता गिरवणं आजही काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना भूषणावह वाटतं! कनिष्ठ कर्मचार्यांना ते जणू आपल्या घरचे नोकर समजतात आणि सर्रासपणे तशीच वागणूक देताना दिसतात. भाजी किंवा किराणा माल आणणं, स्वतःच्या मुलांना शाळेत पोहोचवणं आणि परत घरी आणून सोडणं, कुटुंबियांना फिरायला नेणं इत्यादी कामासाठी काही वरिष्ठ अधिकारी हाताखालील कर्मचार्यांना वापरून घेतात. यावर कडी म्हणजे या सर्व प्रकारच्या खासगी कामासाठी हे अधिकारी बिनदिक्कतपणे सरकारी वाहनं वापरताना दिसतात. नव्हे तो स्वतःचा हक्कच समजतात! अशावेळी कोणी  धाडस दाखवून त्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याची एकतर अतिदुर्गम भागात बदली करण्यात येते...किंवा त्या कनिष्ठ अधिकारी, कर्मचार्यांवर काहीबाही सबबींचा ठपका ठेवून खातेनिहाय चौकशीचा ससेमिरा लावण्यात येतो.

गोंदियासारख्या दुर्गम जिल्ह्यातील एका कनिष्ठ अधिकार्याची ह्रदयस्पर्शी व्यथा येथे जशीच्या तशी मांडण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे या खात्यातील दाहकता आणि वरिष्ठ अधिकार्यांची भावनाशुन्यता सहज लक्षात येईल... गोंदिया येथे श्वान पथकाचं कार्य सांभाळणारे पी.एस.आय. दर्जाचे एक कनिष्ठ अधिकारी कार्यरत होते. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे नुकत्याच या जगात आलेल्या कुत्र्याच्या पिलांचं अतिशय काळजीपूर्वक लालनपालन करणं आणि नंतर ते पिल्लू जसजसं मोठं होईल तसतसं त्याला पोलीस तपासायोग्य प्रशिक्षण देऊन तयार करणं! तसंच कालांतरानं त्यांच्या मदतीनं विविध ठिकाणी घडणाऱ्या चोरी, दरोडे, खून इत्यादीसारख्या घटनांचा माग काढणं! हे काम ते आपल्या सहकार्यांसह अगदी मन लावून समर्पित भावनेनं करायचे. प्रसंगी काही अडचणी आल्यास कसलीही तक्रार न करता त्या त्यांच्या लेव्हलवर निस्तरायचे.
गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे नक्षलग्रस्त असल्याने सरकारी नियमानुसार दोन ते तीन वर्षांत ऐच्छिक ठिकाणी त्यांची बदली होणं अपेक्षित होतं. त्यासाठी त्यांनी त्यांचे कुटुंबिय राहत असलेल्या नागपूरला बदलीही मागितली होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी स्थळ  बघणं! गोंदिया जिल्ह्यात चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतरही त्यांची बदली होऊ शकली नाही. काही दिवसांनी मुलीचं लग्न जमलं आणि त्यांची बदलीही झाली मात्र ती नागपूरला नव्हे तर गडचिरोली या अतिदुर्गम जिल्ह्यात! मग ते तिथल्या चक्रव्यूहात असे काही अडकले की स्वतःच्या पोटच्या पोरीच्या लग्नाच्या वेळी सुध्दा हजर राहू शकले नाही. आपल्या श्वान पथकातील अनेक श्वानांना ज्यांनी जीव लावून लहानाचं मोठं केलं, त्यांना पोलीस तपासासाठी प्रशिक्षण देऊन तयार केलं, खात्याची इमानेइतबारे सेवा केली... अशा कर्तव्यदक्ष सह्रदयी माणसाला शेवटी काय मिळालं? आपल्या स्वतःच्या पिलासाठी... पोटच्या पोरीच्या लग्नासाठी, तिच्या डोक्यावर अक्षता टाकायलाही त्यांना हजर राहता आलं नाही हा केवढा दैवदुर्विलास!!
काही दिवसांनी या प्रामाणिक आणि सच्च्या अधिकार्याला कळलं... मुंबईला जाऊन जर आधीच 'सेटींग' केली तर पाहिजे त्या ठिकाणी लगेच बदली मिळवता येते. मात्र त्या वाटेला न जाता ताठ मानेनं या माणसानं आपली उर्वरित नोकरी पार पाडली आणि नंतर सन्मानानं सेवानिवृत्त झाले. तरीही त्यांच्या मनात एक शल्य मात्र कायम होतंच... स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर अक्षता न टाकता आल्याचं!
याउलट प्रचंड विरोधाभास दर्शवणारी पुढील घटना बघा... काही दिवसानंतर याच गोंदिया जिल्ह्यात देशाच्या माननीय पंतप्रधानांचा दौरा असल्यानं अतिमहत्त्वाचा बंदोबस्त होता. त्यामुळे सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या होत्या. बंदोबस्ताची पूर्वतयारी सुरू झाली. अनेक ठिकाणी बिनतारी यंत्रणा उभारण्यात आल्या. पंतप्रधानांसोबत असणाऱ्या कडक सुरक्षेच्या ताफ्याची रंगीत तालीमही सुरू होती. बंदोबस्ताचा दिवस अवघ्या दोन दिवसांवर आला असताना वरिष्ठांच्या खास मर्जीतील एका पीएसआय दर्ज्याच्या कनिष्ठ अधिकार्याला त्याच्या भाचीच्या लग्नासाठी बाहेरगावी जायला लगेच सोडण्यात आले... आता बोला! वरिष्ठांची हांजी हांजी करणारे अगदी सहजतेनं बिनदिक्कतपणे येथे नोकरी करू शकतात मात्र स्वतःचा स्वाभिमान विकून!

महाराष्ट्र पोलीस दल हे आपल्या देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी एक आहे. महाराष्ट्र राज्यातील मोठ्या शहरात पोलीसांच्या कामकाजासाठी आयुक्तालये निर्माण केली आहेत. सध्या एकूण अकरा पोलीस आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस दले राज्यात कार्यरत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पोलीसांचे मनुष्य बळ सुमारे एक लक्ष ऐंशी हजार इतके आहे. म्हणजेच जवळपास बारा कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या प्रगत महाराष्ट्रात तब्बल ६६७ व्यक्तीमागे एक पोलीस असे प्रमाण आहे! त्यामुळे साहजिकच पोलीसांवरचा कामाचा ताण वाढून जास्त वेळ ड्यूटी करण्याचा प्रसंग त्यांच्यावर अनेकदा येत असतो.

दररोज बारा ते चौदा तास किंवा कधीकधी त्यापेक्षाही जास्त ड्यूटी करणार्या काही पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना साहजिकच आरोग्याच्या निरनिराळ्या समस्या उद्भवताना आढळतात. मग अशावेळी 'पोलीस कुटुंब आरोग्य योजने' मार्फत दिलेल्या कार्डच्या मदतीने नेमून दिलेल्या विशिष्ट दवाखान्याच्या फेर् या सुरू होतात. मात्र तेव्हा कळते... त्या दवाखान्यात 'एक्स रे' मशीन पासून बरीचशी चाचणी उपकरणं निकामी आहेत. तेव्हा मात्र पेशन्टच्या जवळच्या नातेवाईकांना आपल्यालाच 'हार्ट अटॅक' येतो की काय असं वाटल्याशिवाय राहत नाही! जिथं सर्व सोयीसुविधा आहेत, अत्याधुनिक चाचणी उपकरणं आहेत अशा रूग्णालयात या 'पोलीस कुटुंब आरोग्य योजनेचे' कार्ड स्वीकारले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच पोलीस कर्मचारी या अत्याधुनिक रूग्णालयात उपचार घेण्यास लायक नसतात. सरतेशेवटी कंटाळून पोलीस बांधव जवळपासच्या खासगी रुग्णालयात उपचार घेताना दिसतात. मग अशावेळी नाईलाजानं त्यानं आजारपणाची रजा घेतली तर कधीकधी ती रजा बिनपगारी गणण्यात येते.
समजा शहरात एखादा मोठा व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी बंदोबस्त आहे. त्यावेळी त्याची पूर्वतयारी करत असताना एखाद्या कनिष्ठ अधिकार्याला किंवा कर्मचार्याला अचानक ह्रदय विकाराचा अथवा मधुमेहाचा त्रास उद्भवला तर तो नाईलाजानं आजारपणाची रजा घेतो.( कारण व्हीआयपी बंदोबस्त असला की वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या रजा बंद केलेल्या असतात) मात्र अशाप्रसंगी काही वरिष्ठ अधिकारी 'बंदोबस्त ड्यूटी टाळण्यासाठी जाणूनबुजून आजारपणाची रजा घेतली' असा त्या संबंधित अधिकारी/कर्मचार्यावर ठपका ठेवतात आणि सरळसोट बिनपगारी रजेचा आदेश काढतात. त्यावेळी त्या कर्मचारी/अधिकार्याची मानसिक अवस्था कशी आहे किंवा तो खरंच तो आजारी आहे की नाही याची खातरजमा करणं गरजेचं असतं. मात्र तसं अगदी क्वचितप्रसंगीच होताना दिसून येतं.

यावरही कडी म्हणजे काही ठिकाणच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकारी/कर्मचार्यांच्या मजबुरीचा फायदा उचलतानाही आढळतात. अगदीच स्पष्ट सांगायचं तर ....
'माझ्यासाठी इंग्लिश खंबा घेऊन ये आणि तू रजेचा अर्ज ठेवून बिनधास्त निघून जा. मग परत येताना काहीतरी गिफ्ट घेऊन ये आणि रजेचा अर्ज फाडून टाक!' अशाप्रकारचे वक्तव्य करणारे आणि कर्मचार्यांच्या विवशतेचा फायदा घेऊन विकृत आनंद मिळवणारेही काही 'लालची' अधिकारी या खात्यात आहेत. अशा बोटांवर मोजण्याएवढ्या नालायक अधिकार्यांमुळे अख्खं पोलीस खातं बदनाम होताना दिसतं. त्याचबरोबर लक्ष्मीनारायण, अरविंद इनामदार यांच्यासारखे आपल्या स्टाफचे हित जपणारे, कर्तव्य दक्ष आणि सक्षम अधिकारीही या खात्यात होऊन गेले आहेत ... ज्यांनी खर्या अर्थानं पोलीस खात्याची शान वाढवली आहे.

या खात्यातील महिला पोलीसांच्या सुद्धा अनेक गंभीर समस्या आहेत. ग्रामीण भागातील तसेच अतिदुर्गम भागात असलेल्या बर्याच पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचार्यांसाठी प्रसाधन गृहाची मोठी समस्या आहेच. मात्र शहर विभागात देखील अशा समस्या भेडसावताना दिसतात. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातील पोलीस मुख्यालयात काही वर्षापूर्वी तिथल्या सर्वोच्चपदी असलेल्या महिला अधिकार्यांनी पोलीस दरबार भरवला होता... हेतू हा की पोलीसांच्या समस्यांचं निराकरण करणं! त्यावेळी बर्याच पोलीस कर्मचार्यांनी धैर्य एकवटून तेथील प्रसाधन गृहाच्या समस्या त्या अधिकार्यांसमोर प्रकर्षानं मांडल्या. त्याप्रसंगी त्या महिला अधिकार्यांनी 'तुमची समस्या तुम्ही आपल्या प्रभागातील नगरसेवकाकडे का मांडत नाही? ते तुम्हांला नक्की मदत करतील' अशाप्रकारचं दिलेलं उत्तर गंभीरपणे विचार करायला लावणारं आहे! कारण वास्तविक पाहता पोलीस कल्याण निधीसाठी सामान्य पोलीस शिपायापासून ते अधिकार्यांपर्यंत सर्वांकडून ठराविक रकमेची कपात होत असते. ही जमा झालेली रक्कम कुठे आणि कशासाठी वापरली जाते हा संशोधनाचा विषय ठरेल! बरेच वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या आधिपत्याखालील कर्मचार्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस दरबार घेत असतात. पण त्यामुळे नेमकं काय साध्य होतं हे त्यांनाच माहीत! अशाप्रकारच्या दरबारात कितीही इच्छा असली तरी बरेच कर्मचारी आपल्या समस्या बिनधोकपणे मांडताना दिसत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं... जर आपले प्रश्न वरिष्ठांसमोर मांडले तर ते आपल्या विभाग  प्रमुखांविरूध्द तक्रार केल्यासारखंच होणार... आणि मग पुढे नोकरी करताना आपल्याला त्यांचा रोष पत्करावा लागणार!

वाहतूक पोलिसांच्या समस्या मात्र वेगळ्याच प्रकारच्या आहेत. त्यांना कधी कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागणार हे त्यांनाही ठाऊक नसतं. एकतर उन्हापावसाची तमा न बाळगता सतत उभं राहून चौकातील रस्त्यावर ड्यूटी करत असताना रोज नवीन प्रसंगाशी तोंड देण्याची मानसिकताही त्यांना ठेवावी लागते. हल्ली बर्याच शहरात वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार वाढले आहेत. अशावेळी पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना पण घडतात. तसंच महिला वाहतूक पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंतही काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांची मजल गेली आहे. तर कधीकधी राजकीय दबावाखाली काम करण्याचे प्रसंग देखील वाहतूक पोलिसांवर ओढवतात. अशावेळी मग नाहक कुचंबणा आणि अपमान सहन करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसते! कारण काही तथाकथित राजकारणी नेत्यांचे थेट गृह मंत्रालयापर्यंत संबंध असतात. मग त्यांचे चेले नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन वाहतूक पोलिसांवर दबाव आणण्याचा अनेकदा प्रयत्न करतात. अशाप्रसंगी यांना कोणी पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी धैर्य एकवटून नडला तर त्याचा बळीचा बकरा झालाच म्हणून समजा!

आणखी एका महत्त्वाच्या विषयाचा उहापोह करण्याचं याठिकाणी गरजेचं आहे. आपण दरवर्षी १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीच्या वृत्तपत्रात राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांची नावे आणि फोटो बघत असतो. त्यांचा आपल्याला अभिमानही वाटतो. मात्र सरसकट सगळेच अधिकारी/कर्मचारी या राष्ट्रपती पदकांसाठी लायक असतात असं नाही. आपल्या हाताखालच्या कर्मचार्यांना हवं तसं राबवून आपलं इप्सित साध्य करून त्याचं श्रेय स्वतः घ्यायचं म्हणजेच स्वतःचं नाव पुढे करायचं... असले प्रकार येथे सर्रासपणे चालतात. मग प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे आणि खरोखरच जे राष्ट्रपती पदकांसाठी लायक असतात अशा कितीतरी कर्मचार्यांची नावे मागे पडतात... आणि ज्यांना अगदी वरच्या लेव्हलपर्यंत जाऊन सेटींग जमलेलं असतं त्यांची नावे पुढं येतात. तसंच काही मर्जीतल्या कर्मचार्यांच्या डोक्यावर 'साहेबांचा' कायम वरदहस्त असतो... अशांचीही या पदकांसाठी वर्णी लागते! आणि जे बिचारे प्रसंगी कुठल्याही प्रकारची रजा न घेता 'आपलं काम भलं नि आपण भलं' अशा पद्धतीनं कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पदक तर सोडाच नियमानुसार देय असलेली पदोन्नती सुध्दा त्यांची सेवानिवृत्ती जवळ येऊन ठेपल्यावर मिळते! बरं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी... समाजाचं रक्षण करायला सदैव कटिबद्ध असलेल्या या पोलिसांची साधी संघटना देखील नाही. नव्हे तशी संघटना काढायला सरकारची परवानगीच नाही. मात्र अतिवरिष्ठ ( आय. पी. एस. लेव्हलच्या ) अधिकार्यांची संघटना अस्तित्वात आहे. का? तर म्हणे, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध ते आवाज उठवू शकतात. हा दुजाभाव का व कशासाठी? याचं उत्तर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त होऊन पाऊण शतक होण्याच्या मार्गावर आहे तरीही अद्यापपर्यंत सापडलेलं नाही!

हल्ली कोरोनानं घातलेल्या जीवघेण्या थैमानामुळे तर सर्वसामान्य पोलीस अधिकारी/कर्मचार्यांचं जिणं फारच जिकिरीचे झालं आहे. सततच्या 'पब्लिक काॅन्टॅक्ट'मुळे आणि वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची टांगती तलवार त्यांच्यावर असतेच. शिवाय घरी परतल्यावर आपल्या कुटुंबियांना संसर्ग होऊ नये म्हणून सतत खबरदारीही त्यांना घ्यावी लागते. पोलीस खात्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि चोवीस तास सेवा बजावत असलेले विभाग म्हणजे बिनतारी संदेश विभाग आणि मोटार परिवहन विभाग!  अतिशय कमी स्टाफच्या (४० टक्क्यापेक्षा कमी) जिवावर, चोवीस तास कार्यरत असणारी अत्याधुनिक बिनतारी संदेश यंत्रणा अखंडपणे सुरू राहावी म्हणून या विभागातील तांत्रिक अधिकारी/कर्मचारी सतत झटत असतात. दुर्दैवानं यंत्रणेत काही बिघाड झाल्यास त्याची दुरूस्ती करून यंत्रणा अद्ययावत करण्याचं अत्यंत क्लिष्ट कार्य बिनतारी विभागातील कर्मचारी डोळ्यात तेल घालून करत असतात. तसंच पोलीस मोटार परिवहन विभागातील वाहनं सतत कार्यान्वित ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य तेथील अधिकारी/कर्मचारी तत्परतेनं करत असतात. अशावेळी पोलीस बिनतारी विभागातील आणि मोटार परिवहन विभागातील कर्मचार्यांना यंत्रणेची नियमित देखभाल करण्यासाठी सतत निरनिराळ्या पोलीस ठाण्यात जाणं गरजेचं असतं. चोवीस तास इमर्जन्सी सेवा असल्यानं या कर्मचार्यांना सततच्या जागरणाच्या आणि तणावाच्या समस्या नेहमी उद्भवताना दिसतात. तसंच कोरोनाच्या संसर्गाचा संभाव्य धोका सोबतीला आहेच!

या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं मागच्या वर्षी ५५ वर्षावरील वयाच्या पोलीसांना लोकसंपर्क असलेल्या ठिकाणी ड्यूटी देऊ नये असा जीआर काढला होता. मात्र आधीच अतिशय अपुर्या असलेल्या स्टाफच्या समस्येमुळे नाईलाजानं ५५ वर्षे ओलांडलेले कितीतरी पोलीस अधिकारी/कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार ड्यूटी बजावत होते आणि आजही बजावत आहेत. परिणामी महाराष्ट्र राज्यातील कित्येक पोलीस बांधव कोरोनाचे शिकार होऊन शहीद झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे कितीतरी हसत्या खेळत्या संसारांचं होत्याचं नव्हतं झालं हे वेगळं सांगण्याची गरज नाही! हल्लीच्या कोरोना संसर्गाच्या काळात काही पोलीस बांधव कधी नव्हे इतक्या द्विधा मनस्थितीत असल्याचं आढळून येत आहे. तरीही बरेचसे बांधव आपल्या कर्तव्यालाच प्राधान्य देताना दिसतात आणि आपली मानसिकता सातत्यानं सकारात्मक ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना आढळतात. स्मशान भूमीतील सेवाकार्य असो की व्हीआयपी बंदोबस्त असो... ते सारख्याच क्षमतेनं आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या चौफेर कर्तृत्वाला हजारो सलाम!!

याठिकाणी विनोद पितांबर अहिरे (पोलीस नाईक, पोलीस मुख्यालय, जळगाव) या पोलीस बांधवाचा  अंगावर शहारे आणणारा 'मृत्यूघराचा पहारा करताना' हा बोलका लेख जसाचा तसा नमूद करण्याचा मोह आवरला नाही. त्यावरून सद्यस्थितीची भीषणता आणि पोलीसांची मानसिकता वाचकांच्या निश्चितच लक्षात येईल!

"मृत्यूघराचा पहारा करताना"
      
         मी, पोलीस नाईक, विनोद पितांबर अहिरे, पोलीस मुख्यालय जळगाव. गेली तेरा दिवसांपासून या कोरोना कक्षाच्या इमारतीला  पहारा(गार्ड ड्युटी) करीत आहे. पण मी आज या कक्षाला "मृत्य घर" संबोधतो आहे. आणि होय हे मृत्यु घरच आहे तथा मृत्यूपेक्षा ही भयंकर आहे. कारण मी आतापर्यंत अनेक बंदोबस्त, पहारे केले आहेत.अनेकदा तर आत्महत्या खून  यासारख्या क्लिष्ट प्रकरणांमध्ये "व्हिसेरा"राखीव ठेवण्याची विनंती करून स्वतः शवविच्छेदन गृहात उपस्थित राहून जेव्हा डॉक्टर त्या मृत मानवी देहाचे  वेगवेगळे अवयव परीक्षणासाठी बाहेर काढतात.तेव्हा मात्र मलाही आणि डॉक्टरांनाही भीतीचा लवलेश सुद्धा शिवत नव्हता.परंतु आज मात्र त्यांनाही या "कोरोना कक्षात" रुग्णसेवा देताना आणि मलाही पहारा देतांना मृत्यूच्या एका अनामिक भीतीने पछाडले आहे. मला या मृत्यु घराच्या फाटकावर पहारा देताना  मला एका बाजूला माझा तीन वर्षाचा बंडू (माझा लहान मुलगा)  बोबड्या स्वरात पप्पा पप्पा म्हणत  दिसत आहे. आणि दुसर्‍या बाजूला  माझी मातृभूमी दिसत आहे. या क्षणाला प्रचंड घालमेल माझ्या जीवाची झाली आहे. पण क्षणात माझ्या मनात असाही विचार येतो की,  अशी द्विधा मनस्थिती करून कशी चालेल.  ही मातृभूमी  आपल्याला का सहजासहजी थोडीच मिळाली आहे. माझ्या अनेक शूर वीर बांधवांनी  या स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात  आपल्या प्राणांची आहुती दिली.  तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आपणास उपभोगण्यास मिळालं आहे.  जर स्वातंत्र्यच नसतं तर आपण पोलीस तरी झालो असतो का?  मिसरूड फुटण्याच्या वयातच  भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशपाक यांचाही तर परिवार असेलच ना  मग त्यांनी तर एका क्षणाचा विचारही न करता "वंदे मातरम" म्हणत म्हणत ते फासावर चढले  आणि या मातृभूमीला आलिंगन दिले. होय मीही तयार आहे.  माझ्या मातृभूमीसाठी इथला मृत्यू स्वीकारायला, पण.... इथला मृत्यू आपल्या पुरता मर्यादित नसून तो आपल्या अनेक आप्तस्वकीयांना आपल्या "कवेत"घेत असतो. आणि  अप्रत्यक्षपणे माझ्या  "मातृभूमीवर" पुन्हा हल्ला चढवत असतो. म्हणूनच की काय या "कोरोना कक्षाच्या"  इमारतीला  पहारा करताना  मला भय वाटत आहे.म्हणूनच मी याला आज मृत्यू घर संबोधतो आहे.जेव्हा जेव्हा माझा येथे पहारा सुरू असताना येथील एखाद्या रुग्णाचा मृत्यू होतो, तेव्हा तेव्हा त्या मृत व्यक्तीच्या घरातील रक्ताच्या लोकांना आपल्या आईच्या,बापाच्या,मृत शरीराला स्पर्श तर सोडाच,पण त्याला जवळ देखील येऊ दिले जात नाही. ते बिचारे कुठेतरी, कोपऱ्यात  हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश करीत असतात. त्यावेळेला त्यांचं मी एक माणूस म्हणून त्यांचा हात माझ्या हातात घेऊन त्यांचं साधं सात्वन देखील करायला जाऊ शकत नाही.फक्त लांबूनच त्यांच्या दुःख वेदना माझ्या या उघड्या डोळ्यांनी मी पहात असतो. म्हणूनच मी आज या "कोरोना कक्षाला" "मृत्यू घर" संबोधतो आहे. आणि होय हे मृत्यूचे घरच आहे.या कक्षाच्या आत असलेले "देवदूत" (डॉक्टर) आपल्या एका हातात मृत्यू आणि दुसऱ्या हातात मेडिसीन रुपी शस्त्र घेऊन या कोरोना नामक राक्षसाचा मुकाबला करीत आहेत. पण तो दिवसेंदिवस त्यांच्यावर वरचढ होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत अनेक देवदूत (डॉक्टर), माझे सहकारी या राक्षसाची लढताना धारातीर्थी पडत आहेत. आणि मला या क्षणाला एकाच गोष्टीचं शल्य वाटतं की, मी त्यांना काही मदत करू शकत नाही काही संरक्षण देऊ शकत नाही. कारण आतापर्यंत या "मातृभूमीवर" जेव्हा जेव्हा अंतर्गत संकट आलीत तेव्हा तेव्हा केंद्रस्थानी मीच होतो (म्हणजे सर्व पोलीस) आणि याच निधड्या छातीने त्या संकटांचा मुकाबला करण्याची ताकत माझ्या "वीर बाहू" मध्ये होती. पण आता मात्र माझ्या सहकाऱ्यांचे आणि माझ्या मायबाप जनतेचे या कोरोना नामक राक्षसाच्या हातून धडाधड मुडदे पडत असतांना मला मात्र सुन्न होऊ़न पहावं लागत आहे. आणि हो "जनता" माझ्यासाठी माय बापच आहे. कारण त्यांच्याच पैशातून मला पगार मिळतो आणि माझे कुटुंब चालते, त्याच माझ्या मायबाप जनतेचं या "कोरोना" नामक राक्षसापासून मी त्यांचे रक्षण करू शकत नाही. यासारखे दैवदुर्विलास जीवनात कोणते असू शकते.भलेही आज माझी मायबाप जनता माझ्यावर फुलांचा वर्षाव करीत आहे. मला योद्धा म्हणून संबोधते आहे. पण तुम्हाला सांगतो माझ्या मनातल्या मनात मला करंटेपणा चा भास होत आहे. कारण मी इतका हताश आणि भयगंडीत होऊन, बंदोबस्त, पहारा, कर्तव्य कधीच केले नव्हते. आणि कर्तव्य पार पाडीत असताना मला माझ्या मृत्यूची भीतीही कधीच वाटली नव्हती. पण आता मला स्वतःला सुरक्षित ठेवून मला ड्युटी करावी लागत आहे. कारण तसं केलं नाही तर मीही या राक्षसाच्या तावडीत सापडेल आणि माझी आई-वडील, कुटुंब सहकारी, शेजारी माझ्यासकट आपसूकच या राक्षसाच्या "गुहेत" जातील त्यानंतर मात्र हा राक्षस असुरी आनंद घेत घेत त्यांचे एकेक करून धडाधड मुडदे पाडिल आणि तेव्हाही मी काहीच करू शकणार नाही फक्त हतबल होऊन माझ्या नातेवाईकांचे आणि जनतेचे मृत्यू माझ्या या उघड्या डोळ्यांनी मला पाहावे लागतील. आणि जेव्हा आपल्या डोळ्यादेखत आपल्या आईचा, बापाचा, मुलाचा, पत्नीचा, सहकाऱ्यांचा,मृत्यू होतो तेव्हा, आपण काहीच करू शकत नाही तेव्हा "करंटे" पणाची जाणीव होणार नाही तर काय गर्वाने छाती फुगेल? आणि म्हणूनच मी आज या "कोरोना कक्षाला" मृत्यूचे घर संबोधतो आहे.
आतापर्यंत खूप बंदोबस्त केलेत. पहारे केले, मंत्री, आमदार, मोठे अधिकारी,यांचे अंगरक्षक ड्युटी केली तेव्हा मी असताना ते माझ्या भरोशावर ते आणि तुम्हीही मुक्तपणे संचार करीत असत. आणि आलाच जर कोणी एखादा शत्रू समोर तर माझ्या नाईन एम एम पिस्टल मधील गोळीने त्याला क्षणात कंठस्नान घालण्याची ताकद माझ्या भूजांमध्ये मध्ये नक्कीच होती. पण आता मात्र शत्रु अदृश्य असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही.आता माझी शस्त्रंही बदललेली आहेत. आणि ड्युटी चे स्वरुपही बदलले आहे. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की, माझी पिस्टल, माझी रायफल, माझी अश्रुधुराच्या नळकांड्या यासारखे शस्त्र सोडून मला शस्त्र म्हणून सँनीटायझर, ग्लोज, मास्क,फेसगार्ड अशी वापरावी लागतील आणि माझी अवस्था एका पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होऊन मला पहारा, कर्तव्य करावे लागेल आणि अजून किती मृत्यू बघावे लागतील म्हणून मी आतुर होऊन माझ्या त्या शास्त्रज्ञ बांधवांची वाट बघतो आहे. की जे आज जीवाचे रान करून या राक्षसाचा मुडदा पाडण्यासाठी आपले शस्त्र परजत आहेत.पण दुर्दैवाने अजूनही त्यांची शस्त्रे पूर्णपणे परजली गेली नाहीत. जोपर्यंत ते शास्त्रज्ञ बांधव आपली शस्त्र परजून या कोरोना नामक राक्षसाचा खात्मा करीत नाही. तोपर्यंत तुम्ही फक्त घरातच बसा....
म्हणजे तुमचा मृत्यू आम्हाला हताश होऊन उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ न येऊ देता आणि आम्हाला तुमचे संरक्षण करता येत नाही म्हणून करंटेपणाची जाणीव न होऊ द्यायची असेल तर अपण विनाकारण घराबाहेर पडून त्या मृत्यू घराच्या दिशेने न जाता आपण घरातच सुरक्षित रहा आणि त्या "मृत्यू घराला" कायमचे टाळे लावा......
जय हिंद! जय महाराष्ट्र!
        आपला
विनोद पितांबर अहिरे, दक्षता नगर,
पोलीस मुख्यालय जळगाव

टीप.. : हा लेख कोणावरील आकसापोटी अथवा द्वेषापोटी लिहिलेला नसून या लेखात पोलीसांच्या समस्या आणि त्यांची मानसिकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

... विनोद श्रा.पंचभाई
     भ्र. क्र. ९९२३७९७७२५

Friday, March 19, 2021

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद

 

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद

आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. निरनिराळ्या भाषा आणि संस्कृतींचा सुंदर मिलाफ आपल्या देशातील अनेक राज्यात बघायला मिळतो. असंख्य थोर संत महंतांची परंपरा आपल्याला लाभल्यामुळे लौकिकार्थाने भारतभूमी पावन झाली आहे! अनेक शूरवीर, लढवय्ये, राजे महाराजे यांच्या पराक्रमामुळे जगभरात आपल्या देशाची ख्याती पसरली आहे. कलिंगाच्या युध्दात भयंकर रक्तपात आणि प्राणहानी झाल्यानंतर पश्चात्तापदग्ध झालेला व नंतर शांतीसाठी बौध्द धर्माचा प्रसार करणारा बलशाली सम्राट अशोक आपल्या देशात होऊन गेल्याचं उदाहरण आहे. मोगल सम्राट जलालुद्दीन अकबराला यशस्वीपणे टक्कर देणारा आणि इतर राजपूत राजांनी अकबराचं मांडलिकत्व पत्करण्याचं धोरण अवलंबलं तेव्हा एकट्याच्या बळावर मेवाडसह अख्ख्या राजपुतान्याचं रक्षण करणारा महाप्रतापी राणाप्रताप सुध्दा आपल्याकडेच होऊन गेला. तसेच अक्षरश: शुन्यातून हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघणारे आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज नावाचे युगपुरुष याच पवित्र भूमीत होऊन गेले!

अशाप्रकारची महान परंपरा लाभलेला आपला देश कालांतराने, इंग्रजांच्या आगमनानंतर गुलामगिरीत जखडला गेला. त्यावेळी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक महापुरुषांनी निकराचे प्रयत्न केले. कित्येक लढे उभारले गेले. चळवळी झाल्या, सत्याग्रह झाले. इंग्रजांच्या विरोधात देशभर जनसागर पेटून उठला. त्यांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी आपल्या असंख्य देशबांधवांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावली. कित्येकांनी प्राणांची आहुती दिली!  सशस्त्र क्रांतीची ठिणगी भडकली आणि आपल्या जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यासाठी लढणारे नीडर क्रांतिकारक उदयास येऊ लागले. क्रांतिकारक हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर नावे येतात ती हसत हसत फाशीचा दोर आपल्या गळ्यात अडकवणारे महान क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची! त्याचप्रमाणे क्रांतीची मशाल अखंडपणे धगधगत ठेवणारे क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंग्रा, अश्फाक उल्ला खान, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, शंकर महाले इत्यादी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान भारतवासी कदापि विसरू शकणार नाही. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान देऊन ते येणाऱ्या पिढ्यांंसाठी प्रेरणास्रोत ठरले! १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वीही आपल्या देशात अनेक सशस्त्र उठाव झालेत. अशा प्रेरणादायी सशस्त्र उठावांसाठी क्रांतीची मशाल पेटवणारे आद्य क्रांतिगुरू ठरले होते... लहुजी वस्ताद साळवे! त्यांच्या आखाड्यातील तालमीत कितीतरी क्रांतिकारक युध्दकलेचं शिक्षण घेऊन तयार झाले. त्यामुळे खर्या अर्थाने लहुजी वस्ताद 'किंगमेकर' ठरले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांवर स्वराज्यातील पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच लहुजी वस्ताद यांनी वेळप्रसंगी गनिमी कावा वापरून आपल्या शिष्यांना शस्त्रविद्या शिकवली. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्रांतिकारकांना शस्त्रं पुरवून मदत केली, अगदी तशा प्रकारचेच अद् भूत कार्य लहुजी वस्ताद यांनी त्यांच्या शंभर वर्षे आधी केले होते. त्यामुळेच ते आद्य क्रांतिगुरू ठरले!

लहुजी वस्ताद यांचे पूर्ण नाव लहुजी राघोजी साळवे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या 'पेठ' या खेडेगावात झाला. त्यांच्या आईचे नाव विठाबाई तर वडिलांचे नाव राघोजी. लहुजींनी आपले वडील राघोजीबाबांकडून शस्त्रविद्या शिकून घेतली. त्याचप्रमाणे कुस्ती, मल्लखांब, दांडपट्टा चालवणे यातही ते लवकरच तरबेज झाले. त्यामुळे बालपणापासूनच त्यांची  शरीरयष्टी मजबूत आणि बांधेसूद होती. ते दिसायला गव्हाळवर्णी होते. त्यांच्या धारदार डोळ्यात समोरच्याचा वेध घ्यायची चमक असायची. हळूहळू राघोजीबाबांकडून लहुजींनी लढाईच्या वेळी वापरात येणार्या शस्त्रांची माहिती करून घेतली. त्यामुळे त्यांच्या स्वभावात एकप्रकारचा करारीपणा आला होता. भित्रेपणाचा लवलेशही त्यांच्या ठायी नव्हता. नंतर काही दिवसातच लहुजी घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे यात पारंगत झाले. ते आपल्या वडिलांसोबत पुरंदर किल्ला पालथा घालायचे. कधीकधी घोड्यावर स्वार होऊन घनदाट जंगलात सुध्दा जायचे. तेथे त्यांना हिंस्र श्वापदे दिसायची. राघोजीबाबा सोबत असल्यामुळे ते निर्भय असायचे. काही दिवसातच लहुजींनी जंगली प्राण्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचं कसब आपल्या वडिलांकडून शिकून घेतलं. त्यामुळे त्यांच्यात  धीटपणा मुरत गेला. लहुजी धाडसी होते पण त्यांच्या स्वभावात उर्मटपणा नव्हता.

राघोजीबाबांना अवगत असलेली भिंत चढण्याची अत्यंत अवघड कला त्यांनी आपल्या आवडत्या लहुजींना प्रयत्नपूर्वक शिकवली. त्यासाठी भिंतीतील ओबडधोबड पण मजबूत अशा दगडात आपल्या हाताच्या पंंजाची बोटे एखाद्या घोरपडीसारखी घट्टपणे रोवून मग सरड्यासारखं चढून जावं लागायचं. या अतिशय अवघड कलेत स्वतः राघोजीबाबा तरबेज होतेच. ही अत्यंत जोखमीची आणि दुर्मिळ कला शिकताना छोट्या लहुजींची बोटे कधीकधी रक्तानं माखायची! तरीही त्यांनी वेदना सहन करत निर्धारपूर्वक भिंतीवर चढण्याची अवघड कला सराव करून आपल्या वडिलांकडून शिकून घेतली आणि काही दिवसातच लहुजी त्यात तरबेजही झाले.

कालांतराने राघोजीबाबा साळवे आणि लहुजी वस्ताद यांना पेशव्यांच्या दरबारातून बोलावणे आले.  त्यावेळी आपल्या देशात इंग्रजांचा अंमल सुरू होता. पुणे आणि आसपासच्या परिसरात पेशव्यांचे राज्य होते. मात्र इंग्रजांच्या कृपेने दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद मिळाले होते त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय पेशव्यांना कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नव्हता. त्यांच्या जुलमी राजवटीपुढे कुचंबणा होत होती. अस्वस्थ झालेल्या पेशव्यांनी आपले विश्वासू व पराक्रमी सेनापती बापू गोखले यांच्यासोबत सल्लामसलत केली आणि त्यांच्या मदतीने गुप्तपणे युध्दाच्या तयारीला लागले. या युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची व शूर, धाडसी सैनिकांचीही गरज होती. त्यावेळी पेशव्यांच्या शस्त्रागारात बर्याच दिवसापासून हजारो शस्त्रे अक्षरशः गंजत, त्यांचा वापर न होता नुसतीच पडून होती! शस्त्रास्त्रांची ही अतिशय जोखमीची जबाबदारी गुप्तपणे कोण सांभाळणार असा विचारविनिमय सुरू असताना पेशवे, बापू गोखले आणि दरबारातील मंडळींच्या नजरेसमोर एकच धाडसी, पराक्रमी नाव पुढे आले... ते म्हणजे राघोजी साळवे! राघोजींच्या पराक्रमामुळे प्रभावित झालेल्या पेशव्यांनी भरलेल्या दरबारात त्यांची शस्त्रागार प्रमुखपदी नियुक्ती केली. मग राघोजींनी वेळ न दवडता लागलीच कामाला सुरुवात केली. लहुजी आणि इतर काही सहकारी सैनिकांच्या मदतीने त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन रात्रंदिवस काम केले. तलवारी, भाले, दांडपट्टे, कट्यारी अशाप्रकारची विविध शस्त्रे अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करून युध्दासाठी तयार केली. ते बघून पेशव्यांनी राघोजीबाबा आणि लहुजींच्या कर्तबगारीवर समाधान व्यक्त केले.

आता शस्त्रास्त्रे तयार होती. मात्र युध्दात प्रत्यक्ष लढणारे शूर सैनिक आणि योद्ध्यांची कमतरता जाणवायला लागली. इंग्रजांना सुगावा लागू न देता सर्व सरदार, मनसबदार युद्ध पातळीवर कामाला लागले. हे युद्ध परकीय शत्रू इंग्रजांच्या विरोधात होते त्यामुळे तेथे धाडसी, पराक्रमी सैन्याशिवाय आपला निभाव लागणार नाही याची जाणीव पेशव्यांसह बापू गोखले आणि राघोजीबाबांनाही होती. त्यासाठी पेशव्यांना वर्दी देऊन राघोजी साळवे, लहुजीसह भोर, पुरंदर या परिसरात गेले. तेथे त्यांनी गुप्तपणे कर्तबगार, लढवय्ये सैनिक गोळा केले. त्यात प्रामुख्याने मातंग, रामोशी, कोळी अन् भिल्ल इत्यादी मागासवर्गीय सैनिकांचा भरणा होता. ही मंडळी राघोजीबाबांच्या जिवाला जीव देणारी, स्वामिनिष्ठ होती. बघता बघता मराठी मुलुखात एकप्रकारचं चैतन्य पसरलं! जवळपास चाळीस हजार सैनिक पुणे परिसरात जमा झाले. यात लहुजी सुध्दा सामील होते. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं तेवीस वर्षे!

युध्दासाठी सैन्याची जमवाजमव पूर्ण झाली होती. आता इंग्रजी सेनेसमोर दोन हात करण्यासाठी आपण सज्ज आहोत असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेहर्यावर झळकत होता. अखेर ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकी येथे भीषण युद्धाला सुरूवात झाली. बापू गोखलेंच्या नेतृत्वाखाली मराठी सैनिकांनी संपूर्ण ताकदीनिशी इंग्रजी सेनेवर जोरदार आक्रमण केले. बंदुका, तोफांचा वापर होऊ लागला. राघोजी, लहुजीसह अनेक सरदार आणि सैनिक जिवावर उदार होऊन शत्रू सेनेवर तुटून पडले. मात्र त्यावेळी इंग्रजी सैन्याकडे आधुनिक शस्त्रे होती. त्यांच्यासमोर मराठी सैन्याचा जास्त वेळ टिकाव लागणार नाही अशी चिन्हं दिसू लागली. तरीही सहजासहजी माघार न घेता सेनापतीसह राघोजी निकराने लढत होते. आणि आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून तरणेबांड लहुजी जिवावर उदार होऊन पराक्रम गाजवत होते. काही वेळाने अचानक सूं सूं करत बंदुकीची एक गोळी आली आणि बापू गोखले यांच्या घोड्याच्या मानेत घुसली! घोडा कोसळताच त्याचवेळी दुर्दैवानं गोखलेंनी युध्दातून माघार घेतली. त्यामुळे आपला सेनापती पळताना बघून विचलित झालेल्या मराठी सैनिकांची जिकडेतिकडे पळापळ, धावपळ सुरू झाली. नंतर काही क्षणातच दुसरा आघात झाला... पराक्रमी राघोजीबाबा यांचा इंग्रजांच्या बंदुकीने अचूक वेध घेतला. ते बंदुकीच्या गोळीचे शिकार होऊन घोड्यावरून खाली कोसळले! धारातीर्थी पडलेल्या राघोजींना इंग्रजी सैनिकांनी घेरले आणि बंदुकीच्या दस्त्याने ठेचून ठेचून मारले. त्यावेळी लहुजी समोरच थोड्या अंतरावर लढत होते. आपल्या प्राणप्रिय वडिलांच्या मृत्यूचे विदारक दृश्य त्यांना दिसले. ते बघताच त्यांचा संताप अनावर झाला अन् चपळाईने लहुजी वडिलांना मारणार्या इंग्रजी सैनिकांवर तुटून पडले. आपल्या तलवारीने त्यांना लहुजींनी अक्षरशः कापून काढले!

सेनापती पळून गेल्याने आणि राघोजीबाबांच्या बलिदानाने सैनिक सैरभैर झाले होते. शेवटी मराठी सैन्याने माघार घेतली. अतिशय दु:खद अंत:करणाने लहुजी धारातीर्थी पडलेल्या वडिलांजवळ आले. त्यांनी आपल्या धाडसी व पराक्रमी पित्याच्या छातीवर डोकं टेकवलं तेव्हा त्यांना अचानक रडू कोसळलं! मात्र मनावर ताबा ठेवत स्वतःला सावरत त्यांनी अतिशय संयमाने वडिलांचं निर्जीव शरीर आपल्या घोड्यावर ठेवलं आणि ते घराकडे निघाले.
घरी पोहोचल्यावर त्यांना बघताच त्यांच्या आईने, विठाबाईने हंबरडा फोडला! त्या माऊलीचा आक्रोश बघून इतका वेळ संयम राखून असलेल्या लहुजींचाही बांध फुटला. ते रडत रडत आईजवळ गेले आणि तशा स्थितीतही आपल्या मातेचं सांत्वन करू लागले. आपला पराक्रमी पती अचानक सोडून गेल्याचं विठाबाईना तीव्र दु:ख झालं! मात्र त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, त्याचा नक्की बदला घेणार अशी शपथ त्यांनी लहुजीना घ्यायला लावली.

आपल्या सैन्याचा खडकीच्या युध्दात पराभव झाल्याचं कळताच दुसऱ्या बाजीरावाने शनिवारवाडा सोडून पुण्यातून पलायन केलं. पराक्रमी राघोजी साळवे यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं तो दिवस होता १७ नोव्हेंबर १८१७! त्यावेळी इंग्रजांनी शनिवारवाड्यावर पूर्ण ताबा मिळवला होता. दुर्दैवानं मराठी साम्राज्याच्या इतिहासातील १७ नोव्हेंबर १८१७ हा दिवस इतिहासाला काळिमा लावणारा ठरला! छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय मेहनत घेऊन, अतुलनीय शौर्य गाजवून, अफाट कर्तबगारीने उभं केलेलं मराठी साम्राज्य अशाप्रकारे धुळीला मिळालं होतं! इतके दिवस शनिवारवाड्यावरील डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज इंग्रजांनी खाली उतरवला आणि त्याठिकाणी ब्रिटिश सरकारचा युनियन जॅक उभारण्यात आला. आपल्या प्रिय, आदर्श छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आपल्या डोळ्यासमोर लयाला गेल्याचा दु:खद प्रसंग बघण्याचं दुर्भाग्य तमाम मराठी जनतेवर ओढवलं होतं! शनिवारवाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकताना बघून तरण्याबांड लहुजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते अत्यंत उत्तेजित आणि संतप्त झाले अन् त्याचवेळी त्यांनी शपथ घेतली...
"ही ब्रिटिश राजवट उलथवून टाकल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. या शनिवारवाड्यावर पुन्हा भगवा ध्वज फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही! " नंतर आपल्या वडिलांना श्रध्दांजली अर्पण करताना लहुजींनी ''मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी!" अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा घेऊन राघोजीबाबांची समाधी उभारली. ही समाधी आजही पुण्यातील वाकडेवाडी येथे अस्तित्वात आहे.

खडकीच्या युध्दाचा लहुजींच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला होता. त्या घटनेपासून त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यासाठी झोकून दिले. स्वातंत्र्य मिळवणे हाच आपल्या जीवनाचा मूलमंत्र बनवून टाकला. स्वातंत्र्य हेच आपल्या आयुष्याचे एकमेव ध्येय ठरवून ते त्यासाठी शेवटपर्यंत झटले! आपल्या पराक्रमी वडिलांच्या बलिदानाचा बदला घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसायचं नाही. या जुलमी, पाताळयंत्री इंग्रजांना आपल्या देशातून कायमचं हुसकावून लावायचंच असा वज्रनिर्धार लहुजींच्या रोमरोमात संचारला होता! त्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावण्याचं ठरवलं. आपला दृढ निर्धार पूर्ण करण्यासाठी लहुजींनी आयुष्यच पणाला लावलं अन् त्यासाठी जन्मभर ब्रह्मचर्य पाळण्याचा कठोर निश्चय त्यांनी केला. नंतर त्यांनी आयुष्यभर अत्यंत निष्ठेने ब्रह्मचर्य पाळलं... स्वातंत्र्यप्राप्ती हाच त्यांच्या जीवनाचा श्वास बनला!

छत्रपती शिवाजी महाराजांना लहुजी वस्ताद आपले आदर्श मानायचे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दर्याखोर्यात राहणार्या शूर मावळ्यांना गोळा केले, त्यांना युध्दकलेचं तंत्र शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास जागवला आणि त्यानंतर अतुलनीय पराक्रम गाजवून शौर्याने मोगली सत्तेला यशस्वी टक्कर दिली... तसंच धाडसी आणि जबरदस्त नियोजन करण्याचं लहुजींनी ठरवलं! त्यासाठी त्यांनी डोंगरदऱ्यामधील मातंग, रामोशी, भिल्ल, चांभार, महार, कोळी, लोहार तसेच इतर बलुतेदार युवकांना गोळा करण्याचा सपाटा लावला. मग त्यांचं आपल्या पध्दतीनं समुपदेशन करून इंग्रजांच्या विरोधात संपूर्ण सामर्थ्यासह उभं राहण्याचं लहुजींनी ठरवलं. आता माघार घ्यायची नाही, या ब्रिटिश सरकारला उलथवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हे त्यांनी आपल्या तनामनात ठसवून घेतलं!

राघोजीबाबांनी लहुजींना बंदुका चालवण्यात तरबेज केलं होतं. त्यामुळे लहुजी वस्ताद शस्त्रविद्येचे उत्तम जाणकार होते. नंतर त्यांच्या नियोजनानुसार पुण्यातील गंजपेठेत १८२० मध्ये मोठा आखाडा बांधण्यात आला. त्या आखाड्यात दररोज अनेक युवक येऊ लागले. 'सामर्थ्यवान होऊनच स्वातंत्र्य मिळवता येते' हा लहुजींचा मंत्र पटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर युवावर्ग भारावल्यासारखा लहुजींच्या तालमीत येण्यासाठी धडपड करू लागला. त्यांना लहुजी स्वतः दांडपट्टा, छडीपट्टा शिकवायचे. तलवारबाजीचे बारकावे, भालाफेक, नेमबाजी, बंदुका चालवणे अतिशय काळजीपूर्वक शिकवायचे. त्याकाळी लहुजींकडे 'गुदगुदा' हे विशिष्ट प्रकारचे हत्यार होते. त्याची मूठ
लाकडी, तर टोकावर पोलादी फाळ होते. या फाळाला टोकदार काटे असायचे. त्यांच्याकडे तोफा सोडून सर्व प्रकारची शस्त्रे उपलब्ध होती. हळूहळू लहुजींचा शिष्यवर्ग वाढत गेला. त्यांचं हे जोखीमपूर्ण प्रशिक्षण कार्य अत्यंत गुप्तपणे सुरू होतं. त्यासाठी त्यांनी गुलटेकडी आणि पर्वतीच्या परिसरातील कडेकपारीत जागा निवडली होती. त्यांचे विश्वासू सहकारी डोळ्यात तेल घालून सर्वत्र लक्ष ठेवायचे. त्याठिकाणी येणाऱ्या आपल्या शिष्यांना सुध्दा लहुजी वारंवार सावधानतेच्या सूचना द्यायचे.
त्यांच्या आखाड्यात मातंग, रामोशी युवकांशिवाय सर्वच जातिधर्मातील युवावर्ग येऊ लागला. स्वातंत्र्य लढ्यासाठी जात, धर्म विसरून त्यावेळी एक होणे ही काळाची गरज होती. स्वतः लहुजींना सुध्दा कोण कुठल्या जातीचा आहे यात अजिबात स्वारस्य नव्हते. सगळ्यांना शस्त्रविद्या शिकवणे हाच त्यावेळी त्यांचा धर्म होता. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन ब्रिटिश राजवटीविरुद्ध यशस्वी लढा देणे हेच एकमेव ध्येय होते! त्यामुळेच त्याकाळी लहुजी वस्ताद यांना मागासवर्गीयांमध्ये जेवढा मान होता तेवढाच आदर त्यांना उच्चवर्णीयांमध्येही होता. त्यांचे त्याकाळातील कार्य स्वार्थासाठी नव्हे तर देशाच्या कल्याणासाठी, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी होते. त्यांच्या तालमीत येणाऱ्या कुठल्याही तरूणाकडून शस्त्रविद्या किंवा मल्लविद्या शिकवण्यासाठी त्यांनी कधीही कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही. लहुजी नेहमी म्हणायचे, "माझी गुरूदक्षिणा म्हणजे प्रत्येकाने आपल्या भारतमातेच्या मुक्ततेसाठी सदैव तत्पर राहून तिची प्रामाणिकपणे सेवा करणे हीच!" हळूहळू लहुजींच्या तालमीत असंख्य क्रांतिकारी तरूण तयार होऊ लागले. ते वेगवेगळ्या जातीधर्माचे होते तरी त्यांच्यात कसलाही भेदभाव नव्हता. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, सदाशिव बल्लाळ गोवंडे, विष्णू विनायक गद्रे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सय्यदभाई उस्मान, मोरो विठ्ठल वाळवेकर, गोपाळ मोरेश्वर साठे, दत्तू दोडके, सखाराम परांजपे, सादू कांबळे, ज्ञानेश्वर सकट अशा कितीतरी गणमान्य व्यक्तींच्या नावांची गणना लहुजी वस्ताद यांच्या शिष्य परिवारात करता येईल. स्वातंत्र्यासाठी समर्पित वृत्तीने झोकून देण्यासाठी तत्पर असलेल्या या असंख्य शिष्यगणातून प्रत्येकाने वेगवेगळ्या मार्गांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मोलाचे कार्य केले आहे.

"युध्दकलेत निपुण आणि  ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्त्व सध्यातरी लहुजी वस्तादांशिवाय दुसरे कुणी नाही!" असं लोकमान्य टिळक त्यावेळी ठामपणे म्हणायचे. यावरून लहुजींचे कार्य किती महान होते याची आपण कल्पना करू शकतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले होते. सामाजिक एकता, बंधुता, समता या त्रिसूत्रीचे भान ठेवून लहुजींनी तरूणांच्या तनामनात स्वातंत्र्य ज्योत सतत धगधगत ठेवली! त्यांच्या आखाड्यात येणारे युवक हे केवळ पुणे परिसरातील नव्हते. तर ते सातारा, अहमदनगर, भोर, सुपे, मावळ प्रांत इत्यादी भागातूनही मोठ्या प्रमाणात यायचे. या असंख्य तरूणांच्या तनामनात क्रांतीची मशाल पेटवण्याचे आणि ती कायम धगधगत ठेवण्याचे महान कार्य लहुजी रात्रंदिवस करत होते. त्यामुळे देशभक्तीने भारावलेले हे धाडसी तरुण इंग्रजांच्या विरोधात कधीही तुटून पडायला आणि प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदान देण्यासाठी उत्सुक होते. अशा या जाज्ज्वल्य देशप्रेमाने जिवावर उदार होणाऱ्या युवकांची संघटना तयार करण्याचे अत्यंत जिकिरीचे आणि जोखमीचे कार्य लहुजी करत होते! त्यासाठी त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. विवाहबंधनात, संसाराच्या रहाटगाडग्यात ते अडकले नाहीत. त्यांनी फक्त अन् फक्त स्वातंत्र्य हेच ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवले. त्यांनी कधीच स्वतःच्या आर्थिक उन्नतीचा विचार केला नाही तर
आपल्या मातृभूमीला गुलामगिरीच्या शृंखलेतून सोडवायचा ध्यास मनी जपला होता!

पुण्यात आखाडा सुरू केल्यापासून लहुजी त्यावेळी लहुजी वस्ताद म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याकाळी उच्चवर्णीयांचे वर्चस्व असणाऱ्या पुणे शहरात लहुजींनी पाण्यासाठी विहीर बांधणे आणि ती सर्वांसाठी खुली करणे हे कार्य म्हणजे मोठी सामाजिक क्रांतीच होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्या पारतंत्र्याच्या काळात विषमतेच्या विषारी डोहाकडून समतेच्या नितळ प्रवाहाकडे जाणारी ती अभिमानास्पद बाब होती. स्वातंत्र्य लढ्यासाठी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यास अस्पृश्य- सवर्ण  असा भेदभाव करणे तेव्हा परवडणासारखे नव्हते. कारण फूट पाडून राज्य करणे हाच ब्रिटिशांचा स्थायीभाव होता. त्यात ते कमालीचे वाकबगार होते... तीच त्यांची कूटनीती होती! म्हणूनच लहुजींनी त्याकाळी सर्वांना सोबत घेऊन आपले विधायक कार्य करण्यावर जास्त भर दिला. आपणच आपसात भांडत बसलो तर इंग्रजांचेच फावणार होते. त्यामुळे धर्म, जात असा भेदभाव न करता, अशा क्षुल्लक गोष्टींना तिलांजली देऊन सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य लढ्यासाठी सिद्ध व्हावे असे लहुजींना वाटायचे. त्याकाळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली होती. तसेच मागासवर्गीय मुलांसाठीही शाळा सुरू करून त्यांना शिक्षणाची दारे खुली केली. तेव्हा त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. ती गंभीर परिस्थिती बघून त्यावेळी लहुजी वस्ताद आणि त्यांचे शिष्य महात्मा फुल्यांच्या मदतीला धावून आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक तयार करत असतानाच लहुजींनी महात्मा फुले यांच्या सोबत सामाजिक क्रांती करण्यासाठीही अत्यंत तळमळीने त्याकाळी पुढाकार घेतला होता.

उमाजी नाईक आणि लहुजी वस्ताद यांचे त्यांच्या पूर्वजांपासून जिव्हाळ्याचे संबंध होते. उमाजींना लहुजीबद्दल कमालीचा आदर होता. त्यांच्या कार्याचा उमाजींना खूप अभिमान वाटायचा. वेळ मिळेल तेव्हा ते लहुजींच्या आखाड्यात हजेरी लावत. त्यांच्यासोबत कडेकपारीत निशानेबाजीचाही सराव करायचे. उमाजींच्या पूर्वजांना पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना 'नाईक' ही पदवी बहाल करून सन्मानित केले होते. त्याकाळी इंग्रजांनी संपूर्ण भारतात आपल्या सत्तेचे जाळे पसरण्यास सुरूवात केली होती. कालांतराने त्यांनी पुण्यावर ताबा मिळविल्यानंतर इतर किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी रामोशी, मातंग समाजाकडून काढून घेतली. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. अशा बिकट परिस्थितीत उमाजी नाईक आणि त्यांचे सहकारी उत्तेजित होऊन बेभान झाले. त्यांनी मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गनिमी काव्याचं तंत्र अवलंबण्याचं ठरवलं... आणि इंग्रजांविरुद्ध बंडाचं रणशिंग फुंकलं! या बंडाला लहुजींचा पाठिंबा होताच. त्यांच्या आखाड्यात तयार झालेले विठुजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बापू सोळकर या साथीदारांना सोबत घेऊन उमाजी नाईक यांनी कुलदैवत जेजुरीच्या खंडोबारायाला पिवळा भंडारा उधळून शपथ घेतली आणि त्यावेळी इंग्रजांच्या विरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली!

उमाजी नाईक यांना गावागावातून पाठिंबा मिळू लागला. त्यामुळे त्यांनी गोरगरीब जनतेसाठी स्वतः चे प्रतिसरकार उभे केले. परिणामी उमाजींची इंग्रजांवर जबरदस्त दहशत बसली! उमाजी आणि त्यांचे सहकारी गरीब शेतकर्यांना गायी, बैल, शेतीचे सामान इत्यादी घेऊन द्यायचे. तसेच सावकारांनी जुलमाने ताब्यात घेतलेल्या जमिनी आणि दागिने ज्यांचे त्यांना परत मिळवून देऊ लागले. त्यामुळे उमाजींच्या काळात गरीब गावकरी जनता सुखी समाधानी अन् निर्धास्त होती. म्हणूनच उमाजींची वाढती लोकप्रियता इंग्रजांची झोप उडवू लागली. लोकांचीही हिंमत वाढली आणि ते इंग्रजांना शेतसारा द्यायला नकार देऊ लागले. मग चिडलेल्या माॅकिन टाॅस या इंग्रज अधिकार्यानं उमाजींना पकडण्यासाठी पुरंदरच्या मामलेदाराला ब्रिटिश सैन्य देऊन पाठवलं. मात्र लहुजींच्या तालमीत तयार झालेल्या आपल्या साथीदारांसह उमाजींनी इंग्रजांना पुरंदरच्या पश्चिमेस गाठलं. आणि भीमपराक्रम गाजवत त्यांनी इंग्रजी सेनेचा दारूण पराभव केला. नंतर १८२४ मध्ये उमाजींनी विश्वासू साथीदारांसह पुण्यातील भांबुर्डा येथील इंग्रजी राजवटीचा खजिना लुटून नेला. त्यातील बरीचशी रक्कम त्यांनी देवळांच्या देखभालीसाठी आणि गोरगरिबांना वाटप केली. त्यानंतर ३० नोव्हेंबर १८२७ रोजी त्यांनी इंग्रजांना इशारा दिला, ''आज हे एकच बंड तुमच्या विरोधात सुरू असले तरी अशाप्रकारचे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील आणि तुम्हांला हुसकावून लावतील!'' इंग्रजांना सळो की पळो करून सोडत  डिसेंबर १८३० मध्ये उमाजींनी आपला पाठलाग करणारा इंग्रज अधिकारी 'बाॅईड' आणि त्याच्या सेनेला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ केले आणि त्यांना परत जाण्यास भाग पाडले. त्यावेळी काही इंग्रजी सैनिकांना प्राणही गमवावे लागले! नंतर लगेच १६ फेब्रुवारी १८३१ रोजी उमाजींनी इंग्रजांविरुद्ध जाहीरनामा प्रसिद्ध केला.. "आता भारतीयांनी इंग्रजी नोकरी करणे सोडावे. सर्वांनी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजी राजवटीचे खजिने लुटावेत. त्यांना शेतसारा किंवा पट्टी देऊ नये. इंग्रजांची जुलमी राजवट आता जास्त काळ न टिकता ती लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये आणि तसे केल्यास आमचे नवीन सरकार अशा लोकांना कठोर शासन करेल!"

आता कसंही करून उमाजींना जेरबंद करणे हे एकच लक्ष्य इंग्रजांनी ठेवले आणि त्यादृष्टीने त्यांनी आपले धूर्त डावपेच आखायला सुरूवात केली. नंतर त्यांनी एक फर्मानच काढले, "उमाजी नाईक यांची माहिती देणार्यास दहा हजार रुपये रोख आणि दोनशे एकर जमीन बक्षीस म्हणून देण्यात येईल."
इंग्रजांची ही मात्रा बरोबर लागू पडली आणि घात झाला! उमाजींच्या सैन्यातील काळोजी नाईक आणि नाना चव्हाण हेच इंग्रजांना फितूर झाले! १५ डिसेंबर १८३१ च्या काळरात्री काळोजीच्या माहितीवरून इंग्रज अधिकारी माॅकिन टाॅस याने भोर तालुक्यातील उतरोली गावात बेसावध असलेल्या उमाजींना जेरबंद केले! नंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या प्रिय मातृभूमीसाठी फासावर जाणारा पहिला क्रांतिवीर ठरला नरवीर उमाजी नाईक! ३ फेब्रुवारी १८३२ रोजी तो पुण्याच्या मामलेदार कचेरीत हसत हसत फासावर चढला! त्यानंतर निर्दयी इंग्रजांनी इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजींचं निर्जीव शरीर कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडावर तीन दिवस लटकावून ठेवलं. केवढं हे क्रौर्य! अशा या महापराक्रमी उमाजी नाईकांनंतर जवळपास तेरा वर्षांनी म्हणजे १८४५ मध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले.

उमाजींना फाशी दिल्याचं वृत्त ऐकताच लहुजींना अपार दु:ख झालं! त्या रात्री ते खूपच अस्वस्थ होते. रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. आपला जिवाभावाचा साथीदार, जिवलग मित्र अचानक गेल्याने त्यांचं कशातच लक्ष लागत नव्हतं. उमाजीसोबत घालवलेले क्षण आठवताच त्यांना गहिवरून यायचं... त्यानंतर लहुजी कितीतरी दिवस अस्वस्थ होते! इंग्रजांनी फाशी देण्यापूर्वी तब्बल महिनाभर उमाजी आणि त्यांच्या साथीदारांचे अतोनात हाल केले. मात्र त्यांनी ना कुण्या साथीदारांची नावे सांगितली, ना लहुजींच्या आखाड्याची माहिती दिली. किती कणखर अन् बळकट ह्रदयाची माणसं होती ती... म्हणूनच लहुजींना त्यांचा रास्त अभिमान होता. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वीच सशस्त्र उठावाद्वारे इंग्रजांना सलग चौदा वर्षे सळो की पळो करून त्यांची झोप उडवणारा नरवीर उमाजी नाईक यांना बेसावध अवस्थेत पकडून पुण्यात आणणारा इंग्रज अधिकारी माॅकिन टाॅस त्याच्या चरित्रात म्हणतो... "उमाजीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती किंवा तो पकडला गेला नसता तर तो दुसरा शिवाजी झाला असता!"

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म ४ नोव्हेंबर  १८४५ ला रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावी झाला. त्यांना आधीपासूनच कुस्ती, व्यायामाची आवड असल्याने ते पुण्यात आल्यावर चांगल्या तालमीच्या शोधात होते. काही दिवसातच त्यांचा संपर्क लहुजी वस्ताद यांच्याशी आला. वासुदेव बळवंत फडके यांची उंची सहा फूट होती. गौरवर्णीय, सरळ टोकदार नाक, पाणीदार डोळ्यांचे, समोरच्या वर छाप पाडणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. रोज ते तब्बल तीनशेपेक्षा जास्त जोर अन् बैठका मारायचे. त्यांनी लहुजींच्या तालमीत मल्लविद्येसोबत शस्त्रविद्येचेही शिक्षण घेणे सुरू केले. त्यातील बारकावे ते लहुजींकडून समजून घेऊ लागले. त्यावेळी दांडपट्टा हे शस्त्र त्यांच्या विशेष आवडीचे होते. त्यामुळे दांडपट्टा फिरवण्यात ते लवकरच तरबेज झाले. क्रांतिगुरू लहुजींचा वासुदेव फडक्यांवर विशेष जीव होता. फडक्यांच्या मनात सुध्दा लहुजीविषयी कमालीचा आदर होता. त्यांचे निर्मळ आणि जिव्हाळ्याचे नाते दिवसेंदिवस वृध्दिंगत होत गेले.

१८७० च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे इंग्रज सरकारने दुर्लक्ष केले. लोकांचे हाल बघवत नव्हते. त्यावेळी फडक्यांनी स्वतः पुढाकार घेऊन, दुष्काळग्रस्त भागात जाऊन लोकांना मदत केली. त्याचवेळी जुलमी राजवट उलथवून टाकण्याची भाषा वापरून त्यांनी जागोजागी ज्वलंत भाषणे देण्यास सुरुवात केली. त्यांच्या तडफदार ओघवत्या शैलीतले बोल ऐकण्यासाठी त्यावेळी युवापिढी गर्दी करू लागली. लहुजींना त्यांचा खूप अभिमान वाटायचा. त्यांच्यासोबत फडके गुप्तपणे सल्लामसलतही करायचे. इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी त्यांचे तरूण रक्त सळसळत होते! त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसामुग्रीची गरज असल्याचे लक्षात येताच त्यांनी पुणे, मुंबई आणि इतर शहरातील धनाढ्य, सुशिक्षित भारतीयांकडे मदतीची मागणी केली. मात्र निराशाच पदरी पडली! त्यानंतर त्यांनी न डगमगता लहुजींच्या सल्ल्याने आपला मोर्चा मागासलेल्या वर्गाकडे वळवला. त्यावेळी मात्र फडक्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात युवावर्ग स्वातंत्र्य लढ्यासाठी मदत करण्यास तयार झाला. त्यांना लहुजींच्या तालमीत युध्दकलेचं प्रशिक्षण देण्याचं कार्य सुरू झालं. सर्व जण उत्साही वातावरणात मनापासून तयारीला लागले.

अशाप्रकारे आपले 'सैन्य' तयार केल्यानंतर वासुदेव  फडक्यांनी आपल्या पराक्रमी साथीदारांसह इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतपणे युध्दाची घोषणा केली. स्वस्थ न बसता शिरूर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाडी टाकून, लूट जमवून त्यांनी सैन्यासाठी 'रसद' जमवली. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांसाठी का होईना अख्ख्या पुणे शहरावर कब्जा मिळवला. त्यावेळी लहुजींच्या तालमीत तयार झालेल्या सर्व जातीधर्मातील युवकांची त्यांना साथ लाभली. स्वातंत्र्यलढ्याचं कार्य सुरू असताना त्याकाळी फडक्यांची रानावनात भटकंती सुरू असायची. त्यामागे उद्देश एकच होता... स्वातंत्र्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा! या भ्रमंतीदरम्यान त्यांची रामोशी लोकांशी गाठ पडायची. अत्यंत धाडसी आणि एकनिष्ठ असलेले हे रामोशी शरीराने काटक अन् बलवान असल्याने त्यांच्याकडे पूर्वी किल्ल्याच्या राखणदारीची जबाबदारी असायची. मात्र इंग्रजांची जुलमी राजवट सुरू झाली आणि कित्येक गडकिल्ले खालसा करून ते त्यांनी आपल्या अमलाखाली आणले. त्यामुळे रामोशी, बेरड जमातीच्या लोकांवर जंगलात भटकंती करत लाकडे गोळा करून कसंतरी आपलं पोट भरण्याची पाळी आली! याच धाडसी आणि शूर रामोशींना एकत्र करून फडक्यांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारला. त्यांच्या मदतीने सतत छुपे हल्ले करून सरकारी खजिने लुटून इंग्रज सरकारला जेरीस आणले. त्यांच्या या सशस्त्र उठावांमुळे त्याकाळी भारतीयांमध्ये नवा जोम संचारला होता! बिकटप्रसंगी कशाप्रकारे डावपेच आखायचे याबाबत फडके लहुजींसोबत सल्लामसलत करून पुढील योजना तयार करायचे. स्वस्थ बसणार्यांपैकी ते नव्हतेच... त्यांच्या डोळ्यांत केवळ अन् केवळ स्वातंत्र्याचं स्वप्न होतं!

इंग्रजांना हुलकावणी देण्यासाठी वासुदेव बळवंत फडके प्रसंग बघून वेषांतरही करायचे. त्यांचं स्वातंत्र्य कार्य जोमात सुरू असताना एके दिवशी हेन्री विल्यम डॅनियल या इंग्रज अधिकार्याला फडक्यांचा सुगावा लागला. तो त्यांना पकडण्यासाठी मागावरच होता. मात्र फडक्यांनी रस्त्यात अक्कलकोटजवळील गाणगापूर येथून इंग्रजांना हुलकावणी देऊन पंढरपूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. रस्त्यात चिखल, दगडधोंड्यांचा सामना करत, अंगात ताप असूनही लढवय्या वृत्तीचे फडके चालतच होते. हेन्री विल्यम डॅनियलचा पाठलाग सुरूच होता. काही वेळानंतर मात्र तीव्र वेदना सहन करत अखंडपणे चालणार्या फडक्यांना ग्लानी आल्यासारखे वाटले... आता त्यांच्यात पुढे चालण्याचे त्राण उरले नव्हते! तरीही ते धैर्याने कसेतरी जवळच्या 'देवरनावडगा' गावात पोहोचले. खूप असहनीय वेदनांनी त्यांना ग्रासल्याने काही क्षण विश्रांती घ्यावी असा विचार करून ते एका बुध्द विहारात गेले. त्यावेळी त्यांच्या कंबरेला पिस्तूल होतेच. त्यावर हात ठेवून फडके विश्रांतीसाठी पहुडले. त्यांच्या मागावर असलेला इंग्रज अधिकारी डॅनियल काही वेळातच तेथे पोहोचला. झोपेत असलेले फडके त्याच्या दृष्टीस पडले. ती २० जुलै १८७९ ची मध्यरात्र होती... जणू काळरात्रच! त्या काळरात्री डॅनियलनं आपला डाव बरोबर साधला. फडक्यांना झोपेत असतानाच अटक करण्यात आली.

पुण्यात आणल्यावर फडक्यांना तुरूंगात ठेवण्यात आले. त्यानंतर लगेच त्यांच्यावर ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यावेळी पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी वासुदेव बळवंत फडके यांना आजीवन कारावास आणि हद्दपारीची शिक्षा ठोठावली गेली! लहुजी वस्तादांना ही बातमी कळताच खूप वाईट वाटले. आपल्या प्रिय लढवय्या शिष्याला एवढी कठोर शिक्षा ठोठावण्यात आली याचे त्यांना अतोनात दु:ख झाले! त्यांच्यावर या घटनेमुळे प्रचंड आघात झाला. ते एकांतात असताना एकटेच दु:खात होरपळत राहिले! नंतर फडक्यांना आजीवन कारावास भोगण्यासाठी येमेन या अरेबियन देशाच्या 'एडन' शहरातील तुरूंगात ठेवण्यात आले. शिक्षा भोगत असताना फडक्यांनी एके दिवशी संधी साधून आपल्या कोठडीचे दार बिजागर्यांसह उचकटून काढले आणि ते त्या मजबूत तुरूंगातून निसटले. मात्र दुर्दैवाने काही दिवसातच ते पुन्हा इंग्रजांच्या हाती लागले. आता मात्र एडनच्या तुरुंगात त्यांच्यावर कडक पहारे बसवण्यात आले.

इकडे भारतात इंग्रजांनी फडक्यांना साथ देणाऱ्या रामोशी लोकांच्या वस्तीत धाडसत्र सुरू केले. पुण्यातील प्रत्येक आखाड्यात जाऊन इंग्रजांनी चौकशी सुरू केली. याचा सुगावा लागताच लहुजींनी ताबडतोब आपल्या सर्व आखाड्यातील शस्त्रास्त्रे शिष्यांमार्फत सुरक्षित ठिकाणी हलवणे सुरू केले. काही किरकोळ शस्त्रे विहीरीत टाकली. त्यानंतर काही दिवसातच इंग्रज पोलीस लहुजींच्या चौकशीसाठी त्यांच्या कडे येऊन धडकले. त्यांनी लहुजींची सखोल चौकशी केली. त्यावेळी उतारवयामुळे त्यांचं शरीर थकलं होतं मात्र मन अजूनही खंबीर होतं! चौकशीत इंग्रजांना काहीच माहिती मिळू शकली नाही. ते हात हलवत परत गेले.
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके या आपल्या धाडसी, पराक्रमी शिष्याला इंग्रजांनी पकडल्याचं दु:ख लहुजींच्या जिव्हारी लागलं होतं! त्यांच्यावर या घटनेचा खूप मोठा आघात झाला होता. त्यांचं मन सैरभैर होऊ लागलं. कशातच त्यांचं मन लागत नव्हतं. स्वातंत्र्याचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होईल हाच एक आशावाद लहुजींना जगण्याचं बळ देत होता. प्रयत्न करूनही त्यांचं मानसिक स्वास्थ्य डळमळायला लागलं. त्यांना जेवण जात नव्हतं. रात्र रात्र झोप येत नव्हती! रात्री त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या लाडक्या शिष्यांचे चेहरे दिसायचे... कधी त्यांना उमाजी नाईक तर कधी वासुदेव बळवंत फडके दिसायचे! कधीकधी त्यांच्या नजरेसमोर खडकीचं भीषण युद्ध दिसायचं. त्यात त्यांच्या प्रिय वडिलांचं धारातीर्थी पडलेलं रक्तबंबाळ शरीर दिसायचं! मग खूप अस्वस्थ होऊन लहुजी दचकून उठायचे. सततच्या जागरणाने आणि अस्वस्थतेमुळे लहुजींची प्रकृती आता कमालीची ढासळू लागली. आपल्या डोळ्यासमोर इंग्रजांची जुलमी राजवट त्यांना उलथवून टाकायची होती. हा विचार मनात येताच त्यांना अतोनात वेदना व्हायच्या!

त्याकाळी लहुजी वस्ताद एकटेच स्वातंत्र्याचा विचार करत पुण्यातील संगम पुलाच्या परिसरात भटकंती करायचे. आपल्याकडून आता पूर्वीसारखे क्रांतिकार्य होऊ शकणार नाही याचं त्यांना अतिशय वाईट वाटायचं! अतोनात वेदना व्हायच्या. त्यावेळी त्यांनी आपल्या वयाची ८६ वर्षे पूर्ण केली होती. जागरणाने आणि अस्वस्थतेमुळे त्यांची तब्येतही खूप खालावली होती. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीची महत्त्वाकांक्षा लहुजींना स्वस्थ बसू देत नव्हती. आता शरीर साथ देत नव्हतं तरीही त्यांचं मन खंबीर होतं! आपल्या डोळ्यासमोर जुलमी इंग्रजी राजवटीचा युनियन जॅक उतरताना त्यांना पाहायचा होता. धूर्त ब्रिटिशांना आपल्या प्रिय मातृभूमीतून हुसकावून लावायचं होतं. तेच त्यांचं खरं स्वप्न होतं. या विचाराने लहुजी खूपच अस्वस्थ व्हायचे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या विचाराने त्यांना जणू पछाडले होते! या विचारात असतानाच स्वातंत्र्याची क्रांतिज्योत धगधगत ठेवत अखेर लहुजींनी १७ फेब्रुवारी १८८१ रोजी या नश्वर जगाचा निरोप घेतला! ते येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देऊन गेले. खर्या अर्थाने लहुजी वस्ताद आद्य क्रांतिगुरू ठरले!

८६ वर्षांचं दीर्घ आयुष्य लहुजींना लाभलं. मात्र आयुष्यभर त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. संसारगाड्यात न अडकता ते अखेरपर्यंत  मातृभूमीसाठी आपला देह झिजवत राहिले! ते आपल्या निस्वार्थ क्रांतिकार्यामुळे, असीम त्यागामुळे तसेच अचाट साहसामुळे क्रांतिकारकांचे खरे क्रांतिगुरू ठरले. लहुजी वस्ताद यांच्या मृत्यूनंतर जवळपास ६६ वर्षांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र स्वातंत्र्यासाठी सर्वप्रथम शपथ घेणार्या, सशस्त्र क्रांतीसाठी कार्य करणाऱ्या लहुजी वस्ताद या आद्य क्रांतिगुरूंचे स्मरण आज किती जणांना होते? स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही लहुजी वस्ताद दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिले असे खेदाने नमूद करावे लागते! इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे असे अभूतपूर्व, दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवणारे शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या स्मृतिला मानाचा मुजरा! विनम्र अभिवादन!!

विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे.
भ्र.क्र. ९९२३७९७७२५






 

खिळवून ठेवणारी गुढ कादंबरी: 'अमानवी विनवणी'

 

  खिळवून ठेवणारी गुढ कादंबरी:
'अमानवी विनवणी'

"ग्रेट वगैरे काही नाही. ह्रदयावर दगड ठेवून बोलतेय मी... आम्ही तिघी म्हणजे लोखंडाचे तुकडे आहोत. तुझ्या सारख्या लोहचुंबकाकडे कायम खेचले जाणारे... आम्ही नाही जाऊ शकत दूर तुझ्यापासून".
" मी पण नाही दूर जाऊ शकत तुझ्यापासून".
" मग हा निर्णय का घेतलास?"
"मला नाही माहीत... कुठली तरी अदृश्य शक्ती हे सारं करायला लावतेय असं वाटायला लागलंय!"
"आता तू तरी असं नको बोलूस."
"ती शक्तीच मला वाचवू शकेल शुभा."
एखाद्या विलक्षण गुढ आणि रहस्यमयी चित्रपटात शोभतील असे जबरदस्त संवाद नुकत्याच 'चपराक प्रकाशन'तर्फे प्रकाशित झालेल्या 'अमानवी विनवणी' या हटके कादंबरीत नुकतेच वाचनात आले. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी ही कादंबरी एकदा हाती घेतली की, ती पूर्ण वाचल्याशिवाय हातची सुटणार नाही एवढी सशक्त गुढरम्य भयकथा लेखकानं यात यशस्वीपणे फुलवली आहे.
   
        एक प्रख्यात आणि लोकप्रिय नाटककार असलेले भास्कर शास्त्री हवापालट म्हणून कोकणातील एका चाहत्याकडे मुक्कामाला जातात. त्यांचं जुनं घर समुद्राजवळच्या घनदाट झाडांच्या मध्यात, फारशी वस्ती नसलेल्या जागी असते! तिथल्या त्या अनोख्या, रम्य वातावरणात त्यांना अचानक एक रोजनिशी हाती लागते... ती वाचताना ते शहारतात! मग एका गुढ, रहस्यमय नाटकाचा विषय त्यांना सुचतो. कोकणातून आपल्या घरी परतल्यावर शास्त्री सुचलेलं भयनाट्य भराभर लिहून मोकळेही होतात. याच भयनाट्याची पार्श्वभूमी या विलक्षण कादंबरीला लाभली आहे. विरूपाक्ष नावाची मध्यवर्ती भूमिका साकारणार्या पात्राभोवती या कादंबरीचं कथानक लेखकांनी त्यांच्या अनोख्या शैलीत ज्या पद्धतीनं फुलवलं आहे, ते वाचत असताना आपण भयचकित झाल्याशिवाय राहत नाही... नकळतपणे त्यातच गुंतत जातो. "हे अस्वस्थ आत्म्यांनो, मला तुमचे भास नाहीत पण श्वास जाणवतायत. मात्र तुम्ही जिवंत शरीर घेऊन जर इप्सित साध्य करू इच्छित असाल तर ते जमणार नाही. सूड घेऊ, सूड घेऊ म्हणून कितीही आक्रंदन केलं तरी या विरूपाक्ष ला ओलांडणे तुम्हाला जमणार नाही. संकेत मिळाले नाहीत तर भटकत रहावं लागेल असंच शतकानुशतकं. सोडा, सूड बुद्धी सोडा आणि मुक्त व्हा... मुक्त व्हा...!" अशाप्रकारचे विरूपाक्षचे भन्नाट संवाद आपल्या अंगावर काटा आणतात!

     काही वेळातच कादंबरीचं कथानक आपल्या तनामनाचा, सर्वस्वाचा ताबा घेते... आणि पुढे पुढे तर कमालीचे अनपेक्षित धक्के बसत जातात. विरूपाक्षची भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर अवतरतं आणि जबरदस्त वातावरण निर्मिती होते. नाटक ऐन भरात आलेलं असतं. प्रेक्षक श्वास रोखून बघत असताना, आता रहस्याचा परमोच्च बिंदू गाठणार आणि रहस्य उलगडणार असं वाटत असताना विरूपाक्ष अचानक मंचावर कोसळतो! तेव्हा क्षणभर वाचकांच्याही काळजाचा ठोका चुकतो... मती कुंठित होते! काय असते हे रहस्य? विरूपाक्षची भूमिका करणार्या अनेक पात्रांची अशी अवस्था का होते? शेवटी हे रहस्य कसं उलगडते? या प्रश्नांची नेमकी उत्तरं हवी असेल तर ही शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी विलक्षण रहस्यमय आणि वाचताना अंगावर काटा आणणारी गुढ कादंबरी 'अमानवी विनवणी' प्रत्येकांनी वाचायलाच हवी.

  या कादंबरीचे लेखक सदानंद भणगे सर यांनी त्यांच्या मनोगतात त्यांनी शेक्सपियरची नाटके तसेच इंग्रजी कादंबर्या अभ्यासल्याचं नमूद केलेलं आहे. तसेच बर्याच दिवाळी अंकात त्यांच्या भयकथा, रहस्य, गुढकथा प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामुळे 'अमानवी विनवणी'च्या दमदार
आगमनानंतर आता त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या उत्कंठा वाढवणार्या कादंबर्यांचं लेखन अपेक्षित आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. भणगे सरांना पुढील देदीप्यमान वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
   
'अमानवी विनवणी' ही अतिशय दर्जेदार गुढ, भयकथानक असणारी आगळीवेगळी कादंबरी  चपराक प्रकाशनतर्फे प्रकाशित करून प्रकाशक-संपादक घनश्याम पाटील यांनी वाचकांचा आनंद द्विगुणित केला आहे. तसंच अत्यंत समर्पक, गुढ वलय असलेलं मुखपृष्ठ साकारणारे चित्रकार संतोष घोंगडे नक्कीच कौतुकास पात्र ठरले आहेत. त्यांचं मनस्वी अभिनंदन! उत्कंठा वाढवणारं वेगवान कथानक, सहजसोपी प्रवाही भाषा, मनाचा वेध घेणारे प्रभावी संवाद आणि खिळवून ठेवणारं थरारक रहस्य हे या कादंबरीचं यश म्हणता येईल. म्हणूनच बर्याच कालावधीनंतर भेटीला आलेल्या या गुढरम्य भयकथा असलेल्या कादंबरीचा वाचकांनी नक्की लाभ घ्यावा असं येथे आवर्जून नमूद करतो.
धन्यवाद!
                         ... विनोद श्रा. पंचभाई, पुणे
                              भ्र.क्र. ९९२३७९७७२५

कादंबरीचं नाव... अमानवी विनवणी
प्रकाशक ...        चपराक प्रकाशन, पुणे
मूल्य...               ₹ २००/-
                

अंतर्मुख करणारा बालकथा संग्रह: लाल दिनांक

 

अंतर्मुख करणारा बालकथा संग्रह: लाल दिनांक

        बालकांचं मानसशास्त्र तरलतेनं जाणणार्या लेखक नागेश शेवाळकर यांचा 'लाल दिनांक' हा आगळावेगळा बालकथा संग्रह काही दिवसांपूर्वी वाचनात आला. यात वेगवेगळ्या विषयांवरील एकूण पंधरा बालकथा त्यांनी सहजसुंदर शैलीत मांडल्या आहेत. अगदी सुरुवातीलाच 'आमच्या मिस... आजी' या कथेच्या माध्यमातून हल्लीच्या काळात हरवून गेलेला  'मामाचं पत्र हरवलं' हा खेळ मस्त फुलवला आहे. तसंच रोजच्या खेळाला कंटाळलेल्या मुलांना अनेक जुने खेळ शिकवताना मिस आजी त्यांच्यात कशा समरसून जातात, हेही कथा वाचताना जाणवतं!

         चार वर्षांनी एकदाच म्हणजे लिप ईयरला येणारा २९ फेब्रुवारी हा दिवस! या दिवशी जर एखाद्या मुलाचा वाढदिवस असला तर..? आपला वाढदिवस असणारी २९ फेब्रुवारी ही तारीख दरवर्षी का येत नाही म्हणून सचिनची होणारी तगमग, मग त्याचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करायचा, त्यासाठी त्याचे आईबाबा आणि शिक्षिका कशाप्रकारे सचिनची समजूत काढतात हे सगळं आपल्याला 'वाढदिवस सचिनचा' या अत्यंत भावस्पर्शी कथेत वाचायला मिळते. ते वाचताना आपण नकळतपणे अंतर्मुख होतो!

       "का रे श्रावण, आम्ही तुला एवढे चिडवतो.  तुला राग येत नाही का?"
"राग कशाला येईल? किर्तनात बुवा काय सांगतात माहीत आहे... ते म्हणतात की, प्रत्येकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे. जे आपल्याशी वाईट वागतात, त्यांच्याशीही प्रेमानेच वागावे. आपण जर त्यांना जशास तसे उत्तर दिले तर मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहतो? प्रेमाने, संयमाने जग जिंकता येते."
  "आम्हाला नाही जमणार बुवा तुझ्या सारखे."
"प्रयत्न केला तर सारे जमते. इच्छा तेथे मार्ग. परवाच्या दिवशी मंदिरात एका मोठ्या बुवांचे कीर्तन झाले. ते म्हणाले, " या जगात पाण्यासारखे सरळमार्गी कोणीही नाही. पाणी ज्या रस्त्याने जाते, त्या मार्गावरील छोटे छोटे अडथळे ते बाजूला करते आणि पुढे जात राहते. त्याचप्रमाणे आपण संयमाने वागलो तर चिडवणारे आपोआप शांत होतात."
हे ह्रदयस्पर्शी आणि भावनिक संवाद आहेत 'श्रावणबाळ' या मनोवेधक कथेतील! या कथेच्या माध्यमातून लेखकाने लहान थोर सर्वांनाच खूप मोठी शिकवण दिली आहे. कथा वाचताना आपण तिच्याशी कधी एकरूप होऊन जातो हे आपले आपल्यालाच कळत नाही!
            'एक वाढदिवस असाही' या कथेत महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी येणारा अजयचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा होतो? त्याची आजी त्याच्यासाठी कुठल्या नामी युक्तीचा आधार घेते हे प्रत्यक्ष वाचणे मनोरंजक ठरेल. तसंच 'नातू माझा भला'च्या माध्यमातून लेखकाने आजी आणि नातवाचं भावनिक, मर्मस्पर्शी नातं अशा काही मार्मिकपणे फुलवलंय की नकळत डोळ्यात आसवं गोळा होतात!
           या बालकथा संग्रहात श्यामची पत्रावळ, परीकथा, बक्षिसाची किमया, पत्र बाप्पाचे या वेगळ्या धाटणीच्या पण अर्थपूर्ण आणि वाचनीय कथा आहेत. एकापेक्षा एक मनाचा वेध घेणार्या कथा आणि त्या फुलवताना वापरलेली ओघवती शैली, साधी सोपी भाषा हे 'लाल दिनांक'चं बलस्थान म्हणता येईल. पुस्तकाचं शिर्षक असलेली 'लाल दिनांक' ही कथा तर भन्नाटच आहे आणि कथेला अनुसरून सुंदर, विलोभनीय मुखपृष्ठ साकारलं गेलं आहे. हे सर्वांगसुंदर पुस्तक आपल्या पाल्यांसाठी, बालमित्रांसाठी विकत घेऊनच यातील कथांचा आस्वाद वाचकांनी घ्यायला हवा असं याठिकाणी आवर्जून नमूद करतो.
लेखक नागेश शेवाळकर यांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा! धन्यवाद!
                              ... विनोद श्रा. पंचभाई
                              भ्र. क्र. ९९२३७९७७२५

पुस्तकाचे नाव... लाल दिनांक
प्रकाशक ... सोहम क्रिएशन अॅंड पब्लिकेशन, पुणे
मूल्य      ...  ₹ १५०/-

संस्काराचे विचारदुर्ग...

 

संस्काराचे विचारदुर्ग...

"जाति न पुछो साधू की
पूछ लिजिए ज्ञान।
मोल करो तलवार का
पडी रहेन दो म्यान ।।"
या संत कबीर महाराजांच्या दोह्यानुसार संतांना वेगवेगळ्या जातीपातीत न अडकवता त्यांनी अखिल मानवजातीसाठी दिलेला एकात्मतेचा संदेश युवा कीर्तनकार असलेले लेखक रमेश वाघ यांनी 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' या आपल्या पहिल्यावहिल्या दर्जेदार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. 'ज्ञानियांचा राजा' ज्ञानोबा माउलीपासून ते समर्थ रामदास स्वामी यांच्यापर्यंत एकूण दहा थोर संतांच्या अलौकिक कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक नुकतेच पुण्यातील ख्यातनाम प्रकाशन संस्था 'चपराक' तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
जगाच्या पाठीवर आजपावेतो कितीतरी बलशाली राजे-महाराजे, सम्राट, सुलतान, हुकूमशहा आले आणि गेले. त्यांची कायम न टिकणारी सत्ता देखील धुळीला मिळाली. अख्खं जग जिंकण्याची ईर्षा बाळगून अनेक राज्ये पादाक्रांत करत रुबाबात निघालेला सिकंदरही शेवटी त्याच्या मनसुब्यात अयशस्वी ठरल्यानंतर रिकाम्या हातानंच हे जग सोडून गेला, हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. मात्र या अखिल विश्वावर एकछत्री अंमल कायम टिकून राहिला तो संतांच्या अनमोल विचारांचाच... हे त्रिकालाबाधित सत्य कोणीही नाकारू शकत नाही! लौकिकार्थानं अजूनही संतांचंच राज्य या भूतलावर असल्यानं ही चराचर सृष्टी, मानवजात अस्तित्वात आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातील पुढील समर्पक ओव्या वाचल्यावर त्याची साक्ष पटते ...
"राजे किती आले, गेले। त्यांचे कायदे नष्ट झाले।
सत्तेचे दरबार उजाडले। परि राज्य चाले संतांचे।।
संतांचा तो प्रचार अमर। अजूनिही लोक-मनावर।
राज्य चालवोनि निरंतर। लाखो जीवां उद्धरितो।।
न लगे सत्तेचा बडगा। नको भयभीतीहि सन्मार्गा।
आपापले कर्तव्य जगा। प्रचारसूर्यचि दाखवी।।"

लेखक रमेश वाघ हे पेशाने शिक्षक असून त्यांचं विद्यार्थी घडवण्याचं निरंतर कार्य अभिमानास्पद आहेच. आता 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' या संतांची मांदियाळी असलेल्या त्यांच्या अनोख्या पुस्तकातून, त्यातील संतांच्या अमूल्य विचारांच्या माध्यमातून संस्कारक्षम 'माणूस' घडवण्याचं कार्यही निश्चितच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. तरीही ते त्यांच्या मनोगतातून "आपुलिया बळे नाही मी बोलत। सखा कृपावंत वाचा त्याची।।" अशाप्रकारच्या प्रामाणिक भावना व्यक्त करतात.

या विचारदुर्गात ज्ञानोबा माउली, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबाकाका, नरहरी सोनार, सेना महाराज, चोखामेळा, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी अशा एकूण दहा महनीय संतांच्या चरित्रांची अतिशय साध्या,सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तकाचे प्रत्येक पान वाचताना वाचक 'भावविभोर' होऊन जातो आणि त्याचं अंत:करण हेलावल्याशिवाय राहत नाही! अनेक मार्मिक आणि भावस्पर्शी प्रसंग, त्यांना अनुसरून लिहिलेली प्रभावी संवादशैली ही 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' ची खासियतच म्हणावी लागेल. या पुस्तकातील एकच प्रसंग याठिकाणी नमूद करतो...
एकनाथ महाराज एकेदिवशी गोदावरीवरुन स्नान करून येत होते. रस्त्यामध्ये एक माडी होती. तिथे एक यवन पान खाऊन खिडकीमध्ये बसलेला होता.
तो नाथांच्या अंगावर थुंकला. नाथ पुन्हा गोदावरीवर गेले. आंघोळ करून परतले. पुन्हा तो थुंकला! असं एकशे आठ वेळा घडलं. नाथ काहीच बोलले नाहीत. त्यानंतर तो यवन नाथांना शरण आला व म्हणाला, "माझं चुकलं महाराज, मला क्षमा करा."
नाथ म्हणाले, "तुझं काहीच चुकलं नाही. उलट तुझ्यामुळे मला गोदावरीचं एकशे आठ वेळा स्नान घडलं त्यासाठी मीच तुझे आभार मानावयास हवेत."
काहीही झालं तरी कुणावर रागवायचं नाही हे नाथांचं ठरलेलं होतं. किती सहनशीलता... केवढा मोठा मनाचा संयम! हल्ली आपण बघतो, अगदी क्षुल्लक गोष्टींवरून सुध्दा आपल्याला राग येतो. मनाचा संयम, सहनशीलता जणू लुप्त होत चाललीय! या पुस्तकातील महान संतांच्या चरित्रांचे वाचन केल्यानंतर त्यांच्या अलौकिक विचारांचं निदान काही अंशी तरी आपण सामान्य जणांनी आचरण केलं तरी हे अनोखं पुस्तक लिहिण्याचं सार्थक होईल असं वाटतं.
'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' हे खरंतर संस्कारांचं विचारदुर्ग आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक पालकानं आपल्या मुलांसाठी आवर्जून संग्रही ठेवावं असं सुचवावसं वाटतं.
एक दोन नव्हे तब्बल दहा संतांच्या चरित्रांना पुस्तक रूप बहाल करणार्या अवलिया संपादक, प्रकाशकाचं, घनश्याम पाटील यांचं विशेष कौतुक आणि जोरदार अभिनंदन करायलाच हवं. तसेच विषयाला अनुसरून अप्रतिम मुखपृष्ठ साकारणारे चित्रकार संतोष घोंगडे यांचंही अभिनंदन! या 'विचारदुर्ग'चे विचारवंत लेखक रमेश वाघ यांच्याकडून आणखी बर्याच चिंतनशील, वैचारिक कलाकृतींची अपेक्षा करायला हरकत नाही. त्यांना त्यांच्या भावी लेखनकार्यास मनापासून शुभेच्छा!!

विनोद श्रा.पंचभाई, पुणे
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

Monday, February 1, 2021

नेताजी सुभाषचंद्र बोस ... अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी

 

नेताजी सुभाषचंद्र बोस ... अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी


भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर महापुरुषांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीला लाभलेले अनमोल नररत्न होते. त्यांचं वक्तृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरची साधारण व्यक्ती आपसूकच त्यांच्याशी आणि त्यानंतर स्वातंत्र्यलढ्याशी जोडली जायची! त्याकाळी सुभाष बाबूंनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उचलायला लावणारं  आहे. म्हणूनच त्याकाळी ब्रिटिश सरकारला सुध्दा त्यांची दहशत वाटत होती! 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिनांक २३ जानेवारी १८८७ रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता.

लहानपणापासूनचं ते बंडखोर वृत्तीचे होते. शाळा शिकत असतानाच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू त्यांना मिळाले. शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. त्यामुळे त्यांच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती निर्माण झाली. वयाच्या १५-१६ व्या वर्षीच सुभाषबाबू आपल्या मित्रासोबत गुरूच्या शोधात घराबाहेर पडले होते. त्यासाठी हिमालयावर जाण्याचा त्यांचा मानस होता. त्यांनी त्या दिशेने प्रस्थानही केले होते. मात्र त्यांना काही गुरुदर्शन झाले नाही.  त्यानंतर सुभाषबाबूंनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांना आपले गुरु बनवले.

कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालय शिकत असताना एकदा इंग्रजी शिकवणाऱ्या 'ओटेन' नावाच्या शिक्षकाने  वर्गात भारतीयांना दुषणे देण्यास सुरुवात केली. ते सुभाषबाबूंच्या लक्षात येताच त्याचक्षणी ते उठून उभे राहिले आणि त्या शिक्षकाला गप्प केले. भारत आणि भारतीयांविरोधात काहीही बरळण्याचा त्या शिक्षकाला जाब विचारला आणि संप पुकारला. या कृतीमुळे सुभाषबाबूंना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. 

१९२१ मध्ये सुभाषबाबू उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. मुळातच अतिशय बुद्धिमान असलेल्या सुभाषबाबूंनी  इंडियन सिव्हील सर्व्हिसची परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी ४ था क्रमांक पटकावला होता. त्याकाळी गव्हर्नरला भेटायला जाताना सोबत छत्री घेऊन जाण्यास मनाई होती. परंतु सिव्हील सर्व्हिसची परीक्षा पास झाल्यावर नेताजींनी अशाप्रकारचा तुघलकी फतवा पाळण्यास साफ नकार दिला. त्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन भारतभूमीला स्वतंत्र करण्याच्या इराद्याने सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन सिव्हील सर्विसमधील चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीला लाथाडले. आणि ते भारतात परतले. 

भारतात परतल्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तुमध्ये राहत होते. तेथे२० जुलै१९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.गांधींजीनी त्यांना कलकत्याला जाऊन देशबंधू चित्तरंजन दास बाबूंसोबत कार्य करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कलकत्त्याला आले आणि दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले.

१९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी,कलकत्ता महापालिकेची निवडणूक  स्वराज पक्षाने लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कलकत्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कलकत्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले.या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली होती.

१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. याच सुमारास युरोपात दुसऱ्या महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. मात्र गांधीजी त्यांच्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी  कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छित होते कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे याच मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली. सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली. मात्र नंतर अंतर्गत मतभेद वाढल्याने परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 

त्यानंतर ३ मे १९३९ रोजी सुभाषबाबूंनी  'फॉरवर्ड ब्लॉक' नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले! 

नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. १६ जानेवारी १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत त्यांनी महमद झियाउद्दीन असे नाव धारण केले आणि ते पोलिसांची नजर चुकवून घरातून निसटले. सुभाषबाबूंचे ज्येष्ठ बंधू शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कलकत्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. नंतर भगतरामसोबत सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. शेवटी 'ओरलँडो मझयुटा' नामक इटालियन व्यक्ती बनून सुभाषबाबूंनी काबूलहून रेल्वेने प्रवास करत रशियाची राजधानी मॉस्को गाठले. नंतर जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहचले.

बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप इत्यादी
जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व 'आझाद हिंद रेडिओ'ची  स्थापना केली. याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले. काही दिवसांनी म्हणजे २९ मार्च १९४२ रोजी सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर यांना भेटले. पण हिटलरला भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांने सुभाषबाबूंना सहकार्याचं कोणतंही स्पष्ट वचन दिलं नाही. शेवटी सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे ८ मार्च १९४३ रोजी जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह एका जर्मन पाणबुडीत बसून  पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. या  जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथून त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत जपानी पाणबुडी गाठली. ही पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली. तेथे सुभाषबाबूंना वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस भेटले. नंतर त्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले. नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद 'डायट' समोर भाषण केले.

 २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनी सिंगापुरात 
अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी स्वतः आझाद हिंद सेनेचे सरसेनापती बनले. आझाद हिंद सेनेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. या आझाद हिंद सेनेत स्त्रियांसाठी 'झाँसी की रानी' रेजिमेंटही बनवली गेली. पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा' असा नारा दिला! 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद सेनेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी 'चलो दिल्ली' अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली. 
आझाद हिंद सेना माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

      ६ जुलै १९४४ रोजी आझाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरीचे होते. मग त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या "दोमेई" या वृत्तसंस्थेने जगाला कळवले की,  "१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले! अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या!"

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे!! 

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे! 

या थोर महापुरुषाने... नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला “जय हिंद” चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. जय हिंद!! 
नेताजींच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे. 
९९२३७९७७२५