Tuesday, July 16, 2019

सद् गुरू ... सौख्याचा सागरू

सद् गुरू ... सौख्याचा सागरू

एखादं बाळ जन्माला आल्यावर जेव्हा त्याच्या पाठीत बळ येतं, तेव्हा ते पालथं पडतं. मग काही दिवसांनी त्याच्या हातात बळ आलं की ते रांगायला लागतं...आणि कालांतराने त्या बाळाच्या पायात बळ येतं तेव्हा ते चालायला शिकतं. त्यावेळी ते बाळ आपलं पहिलं पाऊल आपल्या आईच्या साक्षीनं टाकतं! मग जसजसं बाळ मोठं होतं, तसतसं ते जास्तीत जास्त वेळ आपल्या आईच्या सानिध्यातच आपलं बालपण उपभोगत असतं. त्यावेळी त्या नकळत्या वयात त्याच्यावर संस्कार रुजले जातात. नंतर काही वर्षाने तो जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी आपल्या आईला विसरू शकत नाही. कारण जीवनातील पहिला गुरू त्याच्यासाठी त्याची प्रिय आईच असते.

आयुष्य जगताना प्रत्येकालाच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कधी कधी आपलं जीवन विलक्षण गुंतागुंतीचं होऊन जातं. अशावेळी मग आपल्या आईवडिलांची आपल्याला प्रकर्षानं आठवण येते. त्यांनी वेळोवेळी केलेले मोलाचे मार्गदर्शन, आपल्यावर रूजवलेले संस्कार आपल्याला आठवतात. कारण तेच आपले 'खरे गुरू ' असतात. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या आईवडिलांनी केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरत असते. आपल्या एकंदरीत आयुष्यातील त्यांचे योगदान हे इतरांपेक्षा खूपच मोठे असते. म्हणूनच त्यांची तुलना आपण इतर क्षेत्रातील गुरूंसोबत कधीही करू शकत नाही.


काही लोक म्हणतात, शाळेत शिकवणारे शिक्षक हेच आपले पहिले गुरू असतात. मात्र मला तरी वैयक्तिकरित्या हे मान्य नाही, हे मी येथे नम्रपणे नमूद करतो. कारण कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता शिकवणारे 'गुरू' आजतरी या भूतलावर सापडणार नाही. याउलट आपले आईवडिल अगदी निस्वार्थ भावनेनं आपल्याला आयुष्याचे प्राथमिक धडे देत असतात. आपल्यावर योग्य ते संस्कार करताना, वाढत्या वयानुसार मार्गदर्शन करताना आपल्या मुलांचा उत्कर्ष व्हावा हेच आईवडिलांना अभिप्रेत असते. आपल्या मुलांनी त्यांचे ध्येय साध्य करावे म्हणून आईबाबा अतोनात कष्ट घेत असतात, मुलांच्या जडणघडणीसाठीच त्यांचा सगळा आटापिटा असतो. एकप्रकारचा ध्यास घेऊनच ते आपलं दायित्व पार पाडत असतात. आपण जरी कमी शिकलो तरी आपल्या मुलांनी शिक्षणाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करावी हीच आईवडिलांची आंतरिक इच्छा असते. त्यासाठी, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी ते आपला फाटका संसार कमालीचा नेटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आई आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सकारात्मकतेनं सामोरं जाऊन, वेळप्रसंगी काटकसर करत, येणारी परिस्थिती अनुकूल कशी करता येईल हे शिकवते. तर वडील आपल्या मुलांना व्यवहारश्ज्ञानाचे धडे देतात, येणाऱ्या प्रसंगांना धीटपणे, निर्भयपणे कसं सामोरं जावं हे शिकवतात.

दादा! आमचे आदरणीय वडील, आमचे पूजनीय सद् गुरू!  अत्यंत बिकट परिस्थितीत जीवनाच्या सारीपाटावरील वेगवेगळ्या सोंगट्या यशस्वीपणे आणि धिरोदात्तपणे शुन्यातून निर्माण केलेलं विश्व त्यांनी समृद्ध केलं! दुर्दैवानं  अगदी नकळत्या वयातच ते पितृछत्राला पारखे झाले! त्यामुळे बालवयापासून त्यांनी आपल्या आईसोबत छोटीमोठी कामे केली. प्रसंगी हमाली करत आईच्या संसारात मदत केली. 'हातावरचं पोट' अशी अवस्था असल्याने काबाडकष्ट म्हणजेच जीवन हेच जणू त्यांच्या जगण्याचं समीकरण होऊन गेलं. त्यामुळे दुर्दैवानं त्यांचं शिक्षण अपुरं राहिलं! काही दिवसांनी मात्र त्यांच्या सुदैवानं किशोरवयापासूनच त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अनमोल सहवास लाभला. "अरे कशाला रिकामा फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ! " आणि "मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे!" या राष्ट्रसंतांच्या भजनांनी त्यावेळी दादांवर मोहिनी घातली आणि ते त्यांचेच होऊन गेले, राष्ट्रसंतांना मनोमनी आपल्या  ह्रदयात गुरुस्थानी बसवलं!  मग दिवसभर काबाडकष्ट करून आईला मदत करणे आणि रात्री महाराजांच्या भजन, प्रवचनाला आवर्जून हजेरी लावणे असा त्यांचा दिनक्रमच ठरुन गेला.

ज्यावेळी राष्ट्रसंतांचा बाहेर गावी दौरा असायचा, तेव्हा अतिशय आतूर होऊन दादा त्यांची वाट बघायचे. त्यांची भजने ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसलेले असायचे. अशातच एकदा अमरावती जिल्ह्याचा दौरा आटोपून राष्ट्रसंत नागपूरला परत येत असल्याची बातमी दादांना मिळाली. मग केव्हा एकदा महाराजांचं दर्शन घेतो अशी त्यांची अवस्था झाली! त्यादिवशी रात्री नागपूरच्या महाल विभागातील अयाचित मंदिराजवळच्या पटांगणात राष्ट्रसंतांचे भजन, कीर्तन होणार होते. मात्र बातमी ऐकल्यापासून दादांना धीर धरवेना. त्यांना वाटलं, आपण दुपारीच जावं ... महाराज प्रवास करून थकले असणार, त्यांची अनुमती घेऊन त्यांचे पाय चेपून द्यावे असंही दादांना मनोमन वाटलं! मग काय, कानात वारु शिरल्याप्रमाणे त्यांनी धूम ठोकली आणि पोहोचले थेट अयाचित वाड्याजवळ! तेथे पोहचताच राष्ट्रसंतांची प्रतीक्षा करत असलेले काही लोक त्यांना दिसले. थोड्या वेळातच मोजक्या
सहका-यांसह राष्ट्रसंत वाड्याच्या प्रवेशद्वाराकडे येताना सगळ्यांना दिसले. शेजारीच उभे असलेले दादा लगेच प्रवेशद्वाराजवळ गेले. त्यांची अन् राष्ट्रसंतांची नजरानजर झाली. चालता चालता वाड्यात शिरताना त्यांनी  दादांच्या खांद्यावर अचानक हात ठेवला आणि म्हणाले, "अरे तुला माझे पाय चेपायचे होते ना! मग चल लवकर ..."
महाराजांचं बोलणं कानावर पडताच दादा आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघतच राहिले अन् डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. मग त्यादिवशी दादांची आंतरिक इच्छा पूर्ण झाली, त्यांना कृतकत्य झाल्याचं मनस्वी समाधान लाभलं! ( हा प्रसंग स्वतः दादा तल्लीन होऊन सांगायचे)

अयाचित मंदिराशेजारच्या चौकात एक नवीनच दारूचा गुत्ता सुरू झाला होता. तेथे दिवसभर गर्दी व्हायला लागली. सरळसाध्या लोकांना सुद्धा दारुचं आकर्षण वाटायला लागलं. एकंदरीत जनजीवन विस्कळीत होऊ लागलं. त्यामुळे तो गुत्ता बंद व्हावा म्हणून समाज प्रबोधनाच्या भावनेतून आयोजकांनी रात्री राष्ट्रसंतांचं भजन- कीर्तन आयोजित केलं होतं. अंधार पडू लागताच अयाचित मंदिरालगतच्या पटांगणात श्रोते व प्रेक्षकांची गर्दी जमू लागली. दादा आणि त्यांचे मित्रांनी वेळेआधीच पुढील जागा पटकावली होती. अगदी वेळेवर राष्ट्रसंत आपल्या
सहका-यासह मंचावर स्थानापन्न झाले अन् इतका वेळ गोंधळ करत असलेले श्रोते एकदम शांत झाले. आता महाराजांच्या मुखातून निघणारे शब्द कधी एकदा कानावर पडतात अशी त्यांची अवस्था झाली होती! मग आपल्या प्रिय खंजेरीवर थाप देऊन राष्ट्रसंतांनी भजनाला सुरूवात केली... "घडी घडी मनी तुझे नाम जपावे रे..." तेथे उपस्थित श्रोते शब्द न् शब्द आपल्या कानात साठवत डोलू लागले. दादा आणि त्यांचे मित्र सुद्धा तल्लीन होऊन भजन ऐकत होते. भजन संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

आपल्या खड्या आवाजात अत्यंत मौलिक समाज प्रबोधन करून राष्ट्रसंतांनी पुढील भजनाला सुरूवात केली,
" व्यसने सगळी सोडून द्या ना... सरळपणाचे जीवन जगा ना..!" मंत्रमुग्ध होऊन श्रोते डोलू लागले. काहींच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहू लागले, दादांचीही अवस्था वेगळी नव्हती! या भजनाचा समाजमनावर असा काही परिणाम झाला... दारूच्या गुत्त्यावर जाणाऱ्यांपैकी बरेचसे राष्ट्रसंतांच्या पाया पडायला मंचाजवळ गर्दी करु लागले. तेव्हा त्यांना हाताच्या इशा-यानेच महाराजांनी थांबवले. मग सर्वांना तेथे प्रतिज्ञा घ्यायला लावली, "आजपासून कधीही दारूला शिवणार नाही. कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही! " त्यानंतर त्यांनी उपस्थित श्रोत्यांना उद्देशून निक्षून सांगितलं,  "पाया त्यांनीच पडावे, ज्यांनी आपल्या कर्माला चुकावे. बंधूंनो, आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे केले तर कुणाच्याही पाया पडायची गरज भासणार नाही! "

आपल्या कर्मावर, मेहनतीवर असलेला विश्वास आणि राष्ट्रसंतांवरील अढळ श्रध्दा असल्याने दादांच्या लग्न समारंभाला शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद द्यायला राष्ट्रसंत आवर्जून उपस्थित होते असं दादा मोठ्या अभिमानानं सांगायचे. महाराजांच्या गुरू परंपरेचा वारसा लाभल्यानं दादांनी राष्ट्रसंतांचं लेखन साहित्य गावागावात जाऊन वाटप करणं सुरू केलं. वेळ प्रसंगी स्वतःजवळची रोखरक्कम खर्च करून उत्साहानं त्यांनी हे मोलाचं कार्य केलं. 'ग्रामगीता' या राष्ट्रसंतांच्या अतिशय प्रेरक व अमूल्य ग्रंथाच्या असंख्य प्रती दादांनी स्वखर्चाने छापून महाराजांच्या ग्रामजयंती आणि पुण्यतिथी महोत्सवात भाविकांना भेट स्वरूपात वाटल्या. पुण्यतिथी महोत्सव हिवाळ्यात येत असल्याने गुरूकुंज मोझरी येथे जाऊन दादांनी अनेक गरजूंना वूलनचे स्वेटरही पुरवले. त्याचप्रमाणे सामुदायिक प्रार्थनेची पत्रके छापून, लॅमिनेशन करून असंख्य लोकांना ते सहर्ष देत असत. घरी आलेली कुठलीही व्यक्ती, मग ती ओळखीची असो की अनोळखी असो, कधीही रिकाम्या हाताने परत गेली नाही ... अगदी प्राणी, पक्षी सुद्धा! दादा म्हणजे आमच्यासाठी संस्काराचं चालतं बोलतं विद्यापीठच... अजूनही ते सदैव आमच्या आसपास असल्याचंच जाणवतं! कितीतरी वेळा याची अनुभूती आणि प्रचिती आलेली आहे. जीवनात कुठल्याही प्रकारचा बिकट प्रसंग आला तरी तो सहज निभावून जाणारच हा दृढ विश्वास आहे...तो दादांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आणि बहुमोल संस्कारामुळेच!

आज इतक्या दिवसानंतर, वर्षांनंतर सुद्धा दादांची आठवण स्मृतिपटलावर कायमच ताजी आहे. त्यांनी आमच्यासाठी घेतलेले अपार कष्ट, प्रतिकूल परिस्थितीत तसेच आजारी अवस्थेतही कुटुंबासाठी सोसलेल्या हालअपेष्टांना खरंतर  तोडच नाही. त्यांचं एक अतिशय आवडतं गाणं होतं, मदर इंडिया या सिनेमातलं... "दुनियामे हम आये है तो जीना ही पडेगा, जीवन है अगर जहर पीना ही पडेगा।"
दादांचं कर्ममय आदर्श जीवन, सतत हसतमुख असणं, सदा शांत, निर्मळ स्वभाव आम्हा सगळ्यांसाठी नित्य प्रेरणादायी ठरत आहे यात तिळमात्र शंका नाही. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील 'जीवन शिक्षण' या अध्यायातून आम्ही विद्यार्थी जीवनात काही ना काहीतरी आत्मसात करावं हीच त्यांची सुरूवातीपासूनची तळमळ होती! या 'जीवन शिक्षण' मधील .....
"मुलात एखादा तरी असावा गुण,ज्याने पोट भरेल त्यात निपुण। न ये संसारामाजी अडचण। कोणत्याही परी।।"

"मुलगी बहु शिकली शाळेमाझारी,परि स्वयंपाक करता न ये घरी। काय करावी विद्याचातुरी। कामाविण लंगडी ती।।"

"जीवनाचे प्रत्येक अंग। शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग।
काम करावयाची चांग। लाज नसावी विद्यार्थ्या।।" यासारख्या स्वावलंबनाचा पुरस्कार करणाऱ्या आणि सदैव प्रेरित करणाऱ्या ओव्या आपल्या सर्वांसाठीच अनुकरणीय आहेत.

आमच्या दादांनी आयुष्यभर ख-या अर्थाने कर्मयोगाला प्राधान्य दिले. कधीही ते स्वस्थ बसले नाहीत. सतत कुठल्या ना कुठल्या कामात ते व्यग्र असायचे. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. त्यांनी केलेल्या अनुपम कार्याची, त्यांच्या दातृत्वाची, त्यांच्या त्यागाची, त्यांच्या निर्मोही जीवनाची कुणीही बरोबरी करू शकणार नाही. मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सतत कार्यरत राहण्याचा मनापासून संकल्प केलेला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निस्वार्थ आणि प्रामाणिक प्रयत्न करणे हीच या गुरू पौर्णिमेच्या पवित्र पर्वात दादांसाठी खरी आदरांजली ठरेल!
दादांच्या निर्मळ आणि पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
वंदनीय राष्ट्रसंतांच्या प्रेरणादायी स्मृतीस विनम्र अभिवादन!
       
             ॥ सद् गुरू नाथ महाराज की जय।।

...विनोद श्रा. पंचभाई
    वारजे,  पुणे.
   ९९२३७९७७२५

Tuesday, July 9, 2019

समर्पण

समर्पण

एकदा संत कबीर महाराजांकडे एक यूवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, "महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य? " ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या यूवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने यूवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, "अगं आतून जरा कंदील घेऊन ये."
तेव्हा यूवकाला मोठं आश्चर्य वाटलं. न राहवून तो म्हणाला, "महाराज आता दिवसाढवळ्या कंदिलाची काय गरज आहे? एवढ्या उजेडात तर सगळं काही स्वच्छ दिसतंय ना!"

त्यावर कबीरांनी हसतच उत्तर दिलं,
"बेटा हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. विवाह करताना पूर्ण समर्पणाच्या भाव असणं आवश्यक आहे. तेथे तर्क वितर्क अशा प्रकारच्या क्षुल्लक गोष्टींना अजिबात जागा नकोच. मी माझ्या पत्नीला आतून कंदील आणायला सांगितला, तिनं तो लगेच आणला सुद्धा!  'कशाला पाहिजे?' , 'दिवसा कंदिलाची काय गरज?' अशाप्रकारचे प्रश्न विचारुन तिनं शंका उपस्थित केली नाही. मला कंदील तात्काळ आणून दिला. अशाप्रकारचा समर्पण भाव संसार करताना दोघातही असायला हवा. हा समर्पण भाव तुझ्यात आणि तुझ्या होणाऱ्या अर्धांगिनीत असल्यास तू निश्चितच विवाह करू शकतोस!"

या प्रसंगावरुन आपल्या असं लक्षात येईल की, संसार करताना समर्पण अन् विश्वास किती गरजेचा आहे. आजच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात एकमेकांवरील विश्वासाची भावना कमी होताना दिसत आहे. त्याऐवजी आजकाल निरनिराळ्या शंकाकुशंका विचारून एक दुसर्याला भंडावून सोडणे, क्षुल्लक कारणांवरुन भांडणे असे प्रकार सर्रास होताना दिसू लागले आहेत. याला कारणंही तशीच आहेत... आपल्या आजूबाजूला नित्यनेमाने घडणार्या दुर्दैवी घटना, माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या अतिरंजित बातम्या तसेच दुरदर्शन संचाच्या विविध वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या ताणतणाव वाढवणार्या मालिका यामुळे नाही म्हटलं तरी सर्वसामान्य जनतेच्या भावना विचलीत होतातच. त्यामुळे मग काही प्रमाणात का होईना आपले विचार कुंठित होण्यास वाव मिळतो. एकदा का आपली सारासार विचार करण्याची शक्ती आणि बुद्धी भ्रमित झाली तरी तेथे निरनिराळ्या शंकाकुशंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. हेच आजचं कटू वास्तव आहे यात शंकाच नाही!

दुसरं असं की, सध्याच्या अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे अतिसुशिक्षित माणूस एकप्रकारे आत्मकेंद्रित होऊ लागला आहे. कधी नव्हे इतका तो आपमतलबी सुद्धा होत चालला आहे अन् त्यामुळे जवळच्या नात्यातील दुरावा वाढत आहे असंही आपल्याला हल्ली निदर्शनास येईल. कधीकाळी आपल्या मित्रपरिवारात किंवा आपल्या नातेवाईक मंडळीत सुद्धा आनंदानं रमणारा हा माणूस आज मात्र भलताच आत्मकेंद्रित झालेला दिसून येतो! हा झालेला बदल अचानक एका रात्रीत घडणे शक्य नाही. त्याची निरनिराळी कारणं असल्याचं आपल्या लक्षात येईल. आजूबाजूची परिस्थिती , आयुष्यात अचानक घडलेल्या अप्रिय घटना, जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू तसेच ऐकीव माहितीच्या आधारे इतरांविषयी झालेले गैरसमज या गोष्टीही कारणीभूत ठरु शकतात. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरील विविध मालिकांच्या भडिमारामुळे, त्यातून दाखवल्या जाणाऱ्या परिणामकारक दृश्यांची हा शिकला सवरलेला माणूस आपल्या खासगी आयुष्याशी तुलना करू लागतो. अशावेळी मात्र तो आपली सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवतो. तसंच माध्यमांमार्फत सतत कानावर पडणाऱ्या बातम्या, वृत्तपत्रांतून वाचण्यात आलेले प्रसंग याचाही त्याच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

आज आपणा सर्वांनाच माहिती आहे, महिन्याला लाख दीड लाख रूपये उत्पन्न असणारी व्यक्ती सुद्धा सुखासमाधानात जगताना दिसत नाही. सारखी अस्वस्थता, निद्रानाश, ताणतणाव, साशंकता, भीती इत्यादी कारणांमुळे त्याच्या स्वभावात एकप्रकारचा चिडचिडपणा निर्माण होतो. कालांतराने मग अशी व्यक्ती नैराश्याच्या आहारी जाते. याउलट अगदी हातावर पोट असणारा मजूर वर्ग मात्र आपल्याला शांतपणे जगताना दिसतो. दिवसभर शारिरीक श्रमाची कामे करुन तो रात्री शांतपणे झोपी जातो. त्याला ना चोरांचं भय असतं ना कुठली चिंता असते . रात्री त्याला ना चॅटिंग करण्यात स्वारस्य असते ना तो कुठला क्रिकेटचा सामना बघत जागतो. तर जमिनीवरच मस्तपैकी ताणून देतो. कारण हातावर पोट असलेल्या त्याला सकाळी लवकर कामावर जाण्याची घाई असते. जेवढं आपण जास्त श्रम करू तेवढे जास्त प्रमाणात पैसे मिळणार हे त्याला ठाऊक असतं. म्हणूनच त्याला त्याच्या कामाप्रती एकप्रकारचा समर्पण भाव असतो. त्यामुळे तो अगदी जीव ओतून काम करतो! मग संध्याकाळी आपल्या श्रमाचा मोबदला घेऊन तो समाधानाने घरी जातो.

आधीच्या काळात शाळेतील शिक्षक आजच्यासारख्या शिकवण्या न घेता विद्यार्थ्यांना मनापासून शिकवायचे. त्यांना घडवायचे. त्यावेळी ते शिकवताना तल्लीन व्हायचे, स्वतःला झोकून द्यायचे. अशाप्रकारची समर्पित वृत्ती आजच्या शिक्षकांमध्ये अभावानेच आढळून येते. पूर्ण समर्पित भावनेनं शिकवणारे शिक्षक म्हणून याठिकाणी साने गुरुजींचं उदाहरण देता येईल. त्यांना मुलांचं मानसशास्त्र उत्तमप्रकारे अवगत होतं. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. तसेच आचार्य अत्रे ज्यावेळी शिक्षकीपेशात होते तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांच्यासाठी त्यावेळी 'नवयुग वाचनमाला' सुरू केली होती...ती विद्यार्थी घडवण्याच्या त्यांच्या तळमळीमुळेच! त्याचा परिणाम असा झाला... विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने तर फायदा झालाच, शिवाय त्यांना वाचनाची सुद्धा गोडी लागली. अशाप्रकारचे विद्यार्थ्यांची "नस" ओळखणारे शिक्षक आज मात्र खरंच शोधावे लागतात , ही वस्तुस्थिती आहे! 

आज आपण सर्वत्र बघतो, कुठलंही क्षेत्र घ्या... आपलं काम करताना 'शाॅर्टकट मेथड' वापरण्याची वृत्ती फोफावताना दिसून येते. त्यामुळे त्या केलेल्या कार्यात 'क्वालिटी' आढळण्याची शक्यता फारच कमी असते.( उदाहरणार्थ... नवीन इमारतींचे बांधकाम ) मात्र काही प्रमाणात याला अपवादही असतात, नाही असं नाही. सरसकट सर्वच लोक 'टाईमपास' प्रकारचे काम न करता अगदी मनापासून आपलं काम करणारे पण आपल्या बघण्यात येतातच! तरीसुद्धा आपल्या कामाप्रती आधीसारखी असलेली समर्पित वृत्ती आजकाल कुठंतरी लुप्त झाली की काय अशी आज एकंदर परिस्थिती आहे. कारण कसंतरी चालढकल करून आपलं काम करायचं अन् महिनाअखेर जास्त मोबदल्याची अपेक्षा ठेवण्याची वृत्ती आज सर्वच क्षेत्रात वाढली आहे... आणि यामुळेच कामाप्रती असलेला समर्पण भाव लुप्त होताना दिसतो आहे.  

येणाऱ्या पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवण्यासाठी, आपला समाज समृद्ध व सुदृढ करण्यासाठी आपणच ध्यास घ्यायला हवा. त्यासाठी आपण समर्पित भावनेनं कार्य करण्याची आपल्यापासूनच सुरूवात करण्याचा संकल्प करुया. आपल्या आदरणीय पूर्वजांपासून प्रेरणा घेऊन आपलं सामाजिक दायित्व पार पाडण्याचा आपण आजच निर्धार करूया!!

विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे.
भ्र.क्र.९९२३७९७७२५


पर्यावरण ...गंभीर समस्या


पर्यावरण ...गंभीर समस्या 
उपनिषदात एक कथा आहे... एक मानवी शरीर असतं. त्या शरीराला डोळे, कान, हात, पाय असे विविध अवयव असतात. काही दिवसांनी या अवयवाचा अहंकार जागृत होतो. त्यांना वाटतं, आपल्यामुळेच हे अख्खं शरीर काम करतं. डोळ्यांना वाटतं, माझ्यामुळेच हे शरीर बघू शकतं. मी नसलो तर शरीर काम करणार नाही. कानांना वाटतं... माझ्यामुळेच शरीर ऐकू शकतं, मी ऐकणं बंद केलं तर शरीर काम करणार नाही. हातांना वाटतं, मीच सगळी कामे करतो. माझ्यामुळेच शरीराचं कामकाज चालतं. तसेच पायांना वाटतं, मीच सगळ्या शरीराचा भार सोसतो. त्यामुळे माझ्याशिवाय शरीर काम करूच शकत नाही. अहंकाराने पीडित सगळे अवयव काही दिवसातच आपापली कामे करणं बंद करतात. शरीर अगदी निपचित पडून राहतं. शेवटी शरीरात उरतो, तो फक्त प्राण ! मग प्राणालाही वाटतं, आता या निपचित पडलेल्या शरीरात आपला काय उपयोग? क्षणार्धात प्राण सुद्धा शरीराचा त्याग करून निघून जातो, आणि शरीर मृतप्राय होतं !

उपनिषदातील या कथेप्रमाणेच आपल्या या सुंदर निसर्गाचा, जीवसृष्टीचा "प्राण" पर्यावरण आहे! एक काळ होता, सम्पूर्ण जगात नैसर्गिकरीत्या पर्यावरणाचा समतोल राखला  जायचा. त्यावेळेस भरपूर वनसंपदा, मुबलक पाणी, आरोग्यसंपन्न हवा हे  सर्वत्र उपलब्ध असायचे. त्यामुळे शेती करणारा बळीराजा सुखी, समाधानी होता. कारण त्याला त्यावेळी आपली शेती मनाप्रमाणे करता येत होती. सगळीकडे सुजलाम् सुफलाम् असं आल्हाददायक वातावरण होतं ! एकंदरीतच सर्वसामान्य माणूस तणावविरहित आणि आनंदी होता. मात्र आज परिस्थिती अशी आहे की, शहरीकरणामुळे आणि झपाट्याने वाढलेल्या औद्यौगिकरणामुळे पर्यावरणाचा समतोल खूपच ढासळला आहे. छोट्यामोठ्या सर्वच शहरात तसेच अगदी खेडेगावात सुद्धा वाहनांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे वायुप्रदुषण, ध्वनीप्रदूषण कमालीचे वाढले आहे. आज ग्रामीण क्षेत्रातील परिस्थिती पण फारशी आल्हाददायक नाही. कारण पावसाच्या अभावामुळे म्हणा किंवा जलस्रोत खूप कमी झाल्याने आजकाल शेतकर्यांच्या मनासारखी शेती होताना दिसत नाही. सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलेलं दिसून येते. त्यामुळेच खेड्यातील लोकांचा ओढा शहराकडे धाव घेत आहे. आजची ही भिषण परिस्थिती पर्यावरणाचा समतोल ढासळल्यानेच उद्भवली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

बेसुमार जंगलतोड, अनेक शहरांतील रस्त्यावरील मोठमोठी झाडे तोडणे तसेच शहराच्या आसपासच्या डोंगरावरील वनसंपदा नष्ट करून सिमेंटचे जंगल वाढवणे  म्हणजेच मोठया इमारती उभारणे हीच पर्यावरणाचा -हास होण्याची प्रमुख कारणे सांगता येतील. या गंभीर परिस्थितीमुळेच पाऊस पडण्याचं प्रमाण सुद्धा  खूपच कमी झालं आहे. पर्यायाने तापमान वाढीचा धोका निर्माण झाला आहे. हे सगळं कुठंतरी थांबवण्याचा आपण आज ध्यास घ्यायला हवा. आपण सर्वसामान्य लोकांनी सर्वत्र जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवण्यासाठी संघर्ष करायला पाहिजे. हीच काळाची गरज असल्याचं लक्षात घेऊन पर्यावरणाच्या दृष्टिने आपलं दायित्व आपणच पार पाडणं आवश्यक आहे

 येणार्या काळात आपल्याला पर्यावरणाच्या बिकट समस्यांना सामोरं जाण्याचा मोठा धोका संभवतो आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला शुध्द प्राणवायू मिळणार की नाही ही शंकाच आहे. कुणी सांगावं, कदाचित उद्याच्या काळात आम्हाला 'आक्सिजन मास्क' सुद्धा वापरावे लागणार असं वाटतं! दुर्दैवानं अशाप्रकारची समस्या उद्भवली तर हे आक्सिजन मास्क सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नसणार हे मात्र नक्की. कारण आक्सिजन मास्क वापरणे ही बाब अत्यंत खर्चिक असणार आहे. त्यामुळे भविष्यातील येणारे धोके ओळखून आपण आजपासूनच आपल्या समाजापुढे आपल्या कृतीतून एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला जागोजागी वृक्षारोपण करत असतानाच पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याची सवय लावण्याचा संकल्प पण करावा लागणार आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सामान्य नागरिक स्वयंस्फूर्तीने बर्याच गोष्टी करु शकतो. जसे ... आपल्याला कुठं जवळपास जायचं असल्यास स्कूटर अथवा बाइकचा वापर न करता चालत जाण्याची सवय लावायला पाहिजे. ऊठसूट गाडी किंवा चारचाकीचा वापर टाळायला हवा, जेणेकरून प्रदूषण कमी होण्यास मदतच होईल. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्या, पालिथीनचा वापर न करता आपण  कापडी पिशव्या वापरण्याचा ध्यास घेणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच समजायला हवे ! यासाठी सर्वत्र जनजागृती करता येऊ शकते. आपल्या जीवनातून प्लॅस्टिकला हद्दपार करण्याचा ध्यास प्रत्येकानं घेण्यासाठी आपण कसोशीनं प्रयत्न करायला हवे. त्याची सुरुवात आपल्यापासूनच करणे गरजेचे आहे. आपण फक्त स्वतःपुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आपल्यावर येऊन ठेपली आहे, याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा!

आपले तसेच या सृष्टीतील तमाम प्राणीमात्रांचे अस्तित्व टिकवण्यासाठी, आपल्याला सुदैवाने मिळालेले हे अमूल्य जीवन जगण्यासाठी आपण सर्वच पर्यावरणावर अवलंबून असतो. आपल्याला श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. पोटासाठी अन्नपाणी लागते. राहण्यासाठी घर लागते, वस्त्र लागते. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणापासूनच मिळतात. त्यामुळे पर्यावरणाला होणारा धोका वेळीच ओळखून आपण आपापल्या परीनं प्रयत्न करण्याची आज नितांत गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे, याचे भान ठेवून, तसा ध्यास घेऊन आपण आपले दायित्व पार पाडण्याचा पक्का निर्धार करूया!

   विनोद श्रा. पंचभाई
  तपोवन सोसायटी,वारजे, पुणे 
  भ्र.क्र. ९९२३७९७७२५