Friday, October 28, 2022

जे होते ते चांगल्यासाठी होते...

 होते ते चांगल्यासाठी होते... 

सतीशनं अलार्म लावूनही त्याचा उजेपयोग झाला नाही. वेळेवर त्याचा अलार्म वाजलाच नाही. त्यामुळे त्याला सकाळी लवकर जाग आली नाही. उशिरा उठल्यामुळे त्याची चिडचिड झाली. कसंही करून वेळेच्या आत विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. मग त्यानं झटपट आवरायला सुरूवात केली. मात्र नेमका वीजपुरवठा बंद झाल्यानं गिझर सुरू करता येत नव्हता. मग त्याने निर्णय घेतला, आज अंघोळ करायचीच नाही! कशीतरी गार पाण्यानं त्यानं दाढी करून घेतली. त्यानंतर थोडे खाऊन कॅब बूक करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. 

कॅब लवकर उपलब्ध होत नव्हती म्हणून सतीशनं तो प्रयत्न सोडून दिला आणि झटपट शूज घालून, एअर बॅग सोबत घेऊन घराबाहेर पडला. रस्त्यावर पोहोचल्यानंतर  रिक्षा थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. कितीतरी रिक्षावाले रिकाम्या रिक्षाने येत जात होते पण कोणी थांबेल तर शपथ! सतीशनं मनगटावरच्या घड्याळात बघितलं. काटे पुढे पुढे सरकत होते... 'वेळ कुणासाठी थांबत नाही हे त्रिकालाबाधित सत्य'

असल्याची खात्री आज त्याला पटली होती! नंतर काही वेळाने का होईना, एक रिक्षा वेग कमी करत रस्त्याच्या कडेला थांबली... तशी सतीशनं पळत जाऊन ती पकडली आणि 'चला लवकर एअरपोर्ट ला' म्हणत तो आपल्या बॅगेसह रिक्षात जाऊन बसला. 

"साहेब मीटर बंद पडलेलं आहे. साडेतीनशे रूपये पडतील!" 

"का? मीटरने तर अडीचशे होतात, मी नेहमी जातो... बरं तीनशे घ्या पण लवकर चला!"

"ठीक आहे साहेब. तुमची बॅग धरून बसा... साईड राॅड तुटलेला आहे, बॅग कधीही पडू शकते."

"ओके.. चला पळवा रिक्षा, स्पीड वाढवा जरा. वेळ खूप कमी आहे!" 

रिक्षाचालक वेग वाढवून रिक्षा सुसाट पळवत होता. मात्र येणाऱ्या चौकात ट्रॅफिक सिग्नल पडला की नाईलाजाने त्याला थांबणं भाग पडायचं! त्यामुळे सतीशचा वैताग क्षणाक्षणाला वाढू लागला. तो स्वतःवरच चरफडला... आपल्या जगण्याला आता शिस्त लावण्याची गरज आहे. रात्रीचं जागरण करणं अजिबात बंद करायलाच हवं, मग भलेही त्या दिवशीचं काम झालं नाही तरी चालेल. लवकर आणि वेळेवर जेवण आटोपलं की झोपायलादेखील उशीर होणार नाही. मग सकाळी पण लवकर उठणे शक्य होईल. अशा प्रकारची शिस्त लावण्याचा प्रयत्न आपण उद्यापासून करायचाच असं सतीशनं आपल्या मनाशी पक्कं ठरवून टाकलं. 

काही वेळाने रिक्षा एयरपोर्ट परिसरात पोहचल्याचं सतीशला जाणवलं. त्यानं मनगटावरील घड्याळ बघितलं. बापरे! बराच उशीर झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. आता जर का फ्लाईट डिले असेल तरच आपल्याला मिळू शकते अशी त्यानं समजूत करून घेतली आणि एक दीर्घ श्वास घेतला! बघूया, जे काही पुढे घडणार त्यासाठी आपण तयार राहायला हवं, तशी आपली मानसिकताच करून घ्यायला हवी असा विचार त्याच्या मनात आला. 

एकदाची रिक्षा एअरपोर्टच्या आत येऊन  जवळ थांबली. घाई करत सतीश उतरला आणि आधीच हातात काढून ठेवलेले तीनशे रुपये त्यानं रिक्षाचालकाला दिले. 

विनोद श्रा. पंचभाई, पुणे