आजचे शिक्षण ... विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता
एक काळ असा होता, म्हणजे इंग्रजांच्या काळात आपल्याकडे शाळा खूपच कमी प्रमाणात होत्या. आणि ज्या मिशनरी शाळा अस्तित्वात होत्या त्या सुद्धा इंग्रजी सत्तेच्या अंमलाखाली होत्या. कालांतराने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. मात्र त्यासाठी त्यांना कमालीचा संघर्ष करावा लागला. अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी मागासवर्गीयांसाठी सुद्धा विनामूल्य शाळा सुरू केल्या. अशाप्रकारे त्यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या.
मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशातील अगदी खेड्यापाड्यातही मोफत शाळा सुरू झाल्या. त्यामुळे सर्वांसाठीच शिक्षणाची दारे खुली झाली. आपले विद्यार्थी चांगले घडावे, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्याकाळातील शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. शिक्षणाचा जणू ध्यास घेऊन ते आपले दायित्व उत्तमप्रकारे पार पाडायचे.शाळेतील
शिक्षणासोबतच मूल्यशिशिक्षणाचे धडेही विद्यार्थ्यांना द्यायचे. मात्र आज परिस्थिती अशी आहे की, आता शाळा, महाविद्यालयांची कमतरता नाही. अगदी छोट्या छोट्या शहरात सुद्धा इंग्रजीत शिक्षण देणाऱ्या काँन्व्हेन्टच्या सोयी झाल्या आहेत. पण आजचे शिक्षण तुलनेने खूपच महागडे झाले आहे. आज शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेशासाठी अव्वाच्या सव्वा फीस आकारली जाते. त्याचप्रमाणे शाळेत शिकवायला शिक्षक असूनही वेगळे शिकवणी वर्ग लावणे जणू अत्यावश्यक झाले आहे!
आजच्या काळात आपल्याला सर्व शाखेतील तसेच संगणकीय, वैद्यकीय आणि इतर प्रकारचे शिक्षण घेणे सहजतेने उपलब्ध आहे . मात्र त्यासाठी आपली आर्थिक बाजू कशी आहे यावरच सगळं काही अवलंबून असते! साने गुरूजींसारखे मोफत शिक्षण देणारे आणि अत्यंत तळमळीने शिकवणारे आदर्श शिक्षक आज शोधूनही सापडणार नाही हीच आपल्या समाजाची खरी शोकांतिका आहे! त्यामुळे आर्थिक बाजूने कमजोर पण अतिशय तल्लख बुद्धीची हुशार मुले शिक्षणापासून वंचित राहणार की काय, अशी आजची दयनीय स्थिती आहे.
तसेच आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकातील ठराविक माहिती काही ठराविक वेळेत पुन्हा उतरवून काढणे याला आजकाल परीक्षा म्हटले जाते. पुस्तकाच्या बाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची मुभा आजकाल विद्यार्थ्याला आणि शिक्षकालाही नसते. त्यामुळे विद्यार्थ्याची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही. आज पदव्यांना अवास्तव महत्व प्राप्त होवून त्या मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु असल्याचे जाणवते आहे. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवणे ही गोष्ट आज दुर्लभ झाली आहे. दिवसेंदिवस महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा मात्र वेगाने घसरत आहे. आज वाढत्या औद्योगिकीकरणाच्या परिस्थितीत व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची खरी गरज आहे. परंतु ते न करता आज पुस्तकी शिक्षणावरच जास्त भर दिलेला आढळतो. व्यक्तीविकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यास नृत्य, गायन, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलाविभागांचाही शिक्षणात अंतर्भाव करायला हवा असे वाटते. मात्र या विषयांकडे अजूनही आपल्याकडे उपेक्षेने पाहिल्या जाते हे दुर्दैवच!
आजच्या शिक्षणामुळे मनुष्य सुशिक्षित होतो, उच्च विद्याविभुषित होईल पण तो सुसंस्कृत होईलच असे नाही. वास्तविक पाहता शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती सुसंस्कृत असायला हवी. दुर्दैवाने तसे चित्र आज फारसे दिसत नाही. उलट आजकाल शिक्षित माणसे आत्मकेंद्रित, स्वार्थी व संकुचित वृत्तीची झालेली आढळतात. हुंड्याची राक्षसी प्रथा सुशिक्षितांमध्येच आज मोठ्या प्रमाणात आढळून येते. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरी त्याची पत्नी ही गृहलक्ष्मी मानली जाते. काही सुशिक्षितांमध्ये घरी येणारी नववधू ही केवळ माहेराहून खूप मोठा हुंडा घेवून येणारी व्यक्ती असेच समजले जाते. कोणताही मोठा त्याग करण्याची वेळ आली तर अडाणी, अशिक्षित माणूस मागचा- पुढचा विचार न करता कर्तव्य भावनेने त्याग करतो. उलट अशा प्रत्येक गोष्टीचे स्वार्थासाठी भांडवल करण्याची वृत्ती सुशिक्षितातच आढळते. आर्थिक गुन्हेगारीचे प्रकार व प्रमाण सुशिक्षितांतच अधिक आढळतात. आजच्या शिक्षणपद्धतीची ही शोकांतिकाच आहे!
शिक्षणाच्या बाबतीत अशीच परिस्थिती राहिली तर उद्याच्या काळात आपल्याला भयंकर समस्यांचा सामना लागणार हेे निश्चित! कुणी सांगावे... येत्या काही वर्षात आपल्याकडे शाळा आणि महाविद्यालयांची संख्या कमी झालेली दिसू शकते. कारण आज परदेशात आहे त्याप्रमाणे आपल्याकडे सुद्धा संगणकीय पद्धतीने घरी बसून शिक्षण घेणे सहज शक्य होऊ शकते. मात्र अशाप्रकारच्या शिक्षण पद्धतीत एक मोठा धोका संभवतो. तो हा की, ज्याची आर्थिक स्थिती हलाखीची आहे त्याला हे खर्चिक शिक्षण घेणे परवडणार नाही! त्यामुळे गोरगरीबांची मुले, मग ती हुशार असली तरी अत्याधुनिक शिक्षणापासून भविष्यात दुर्दैवाने वंचित राहणार ही भीती आहेच!
आजच्या अत्यंत खर्चिक शिक्षणामुळे आणि कधी नव्हे इतक्या प्रचंड स्पर्धेमुळे पालकसुद्धा द्विधा मन:स्थितीत असल्याचे आढळून येतात. त्यामुळे होतं काय की, ज्यांची मुलं अभ्यासात "सो सो" असतात असे पालक अतिशय तणावग्रस्त अवस्थेत वावरताना दिसतात. तरीही हल्ली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला बरे दिवस आल्याने एक आशेचा किरण आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. शिक्षक वर्गात शिकवताना नेहमी म्हणतात, 'आजचे विद्यार्थीच उद्याचे राष्ट्र प्रणेते होऊ शकतात' .... पण त्यासाठी आवश्यकता आहे आपल्या शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल करण्याचा! तसेच देशातील निरनिराळ्या शाळा, महाविद्यालयात आकारण्यात येणारे अव्वाच्या सव्वा शिक्षण शुल्क कमी करून ते एकसमान पातळीवर कसं आणता येईल याचाही गंभीरपणे विचार करून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची आज खरी गरज आहे! आपण आशा करूया ते दिवस लवकरच बघायला मिळतील ... वो सुबह जरूर आयेगी!!
विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे