Monday, December 15, 2025

शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर.. मनोगत

 मनोगत...


     अठरा विश्व दारिद्र्य काय असतं... रोजच्या जगण्यासाठी करावा लागणारा आटापिटा, उपासमार, फरफट याचा विदारक अनुभव अण्णा भाऊंनी त्यांच्या अगदी बालपणापासूनच घेतला! त्यामुळे त्यांच्या न कळत्या वयापासून अतोनात दुःख, वेदना, हेटाळणी, अवहेलना त्यांच्या वाट्याला पदोपदी आल्या. मात्र अण्णांनी त्याचा उगाच बाऊ न करता, कुठलंही भांडवल न करता… या दुःखालाच आपलं सामर्थ्य बनवलं आणि येणाऱ्या बिकट परिस्थितीचा त्यांनी अतिशय धैर्याने सामना केला. 

      आपला देश पारतंत्र्यात असताना अण्णांनी त्यांच्या कुटुंबीयांसह वाटेगाव पासून मुंबई पर्यंत केलेला प्रवास अंगावर काटे आणणारा आहे! मुंबई मायानगरीत जगण्यासाठी हातावर पोट असल्यामुळे... त्याकाळात गरिबी, हालअपेष्टा यांचा सामना करत त्यांनी काढलेले हलाखीचे दिवस, केलेली पायपीट खूपच अंतर्मुख करणारी आहे. हे सगळे प्रसंग, घटना 'शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर' या चरित्र कादंबरीत वाचताना सर्व सामान्य माणसाचं मन विदीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही!

     अण्णा भाऊंना अवघ्या दीड दिवसातच शाळा सोडणं भाग पडलं! शिक्षण घेण्यासाठी त्या काळच्या समाज व्यवस्थेनं झिडकारलं तरी नंतर अण्णा भाऊ प्रयत्न पूर्वक लिहिणं, वाचणं शिकले. पुढे गाणंही लिहू लागले... आणि मग कालांतराने त्यांनी काळजाचा ठाव घेणाऱ्या अनेक गीत रचना लिहिल्या. त्यात झंझावाती पोवाडे होते, अतिशय अर्थपूर्ण अशा गवळणी, छक्कड, गाणी सगळं सगळं काही होतं! सर्वसामान्य लोकांचं हृदय पिळवटून निघेल एवढं सामर्थ्य अण्णांच्या गीत रचनेत असायचं! त्यांचं प्रभावी सादरीकरण ऐकून त्याकाळी आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर सोव्हिएत रशियातील लोकही डोलू लागले होते!

     त्यानंतर अण्णा भाऊंनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटके, पथनाट्यं इत्यादी प्रकार हाताळून विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांचं साहित्य चांगलंच लोकप्रिय ठरू लागलं. मात्र तरीही अण्णा भाऊंच्या साहित्याची त्या काळातील समीक्षकांनी म्हणावी तशी दखल घेतली नसल्याने त्यांच्या साहित्याचा यथोचित सन्मान होऊ शकला नाही... तसेच अण्णांना इतर साहित्यिकांप्रमाणे मान सन्मानही मिळाला नाही हे आपल्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचं दुर्दैवच! त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबऱ्या यांची खरी कदर परदेशातच झाली, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही! खरं तर त्याला आपल्या मराठी मनाची संकुचित वृत्तीच कारणीभूत आहे, हेही तितकंच खरं!


       अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या कथा, हृदय पिळवटून टाकणाऱ्या गीत रचना, विचार करायला भाग पाडणाऱ्या कादंबऱ्या एवढं विपुल साहित्य लिहूनही शेवटी अण्णांना काय मिळालं? विवंचना, उपेक्षा, हेटाळणी, अवहेलना इत्यादी गोष्टींचा आयुष्यभर सामना करत शेवटी अण्णा उपेक्षित आणि दुर्लक्षित जीवन जगत राहिले! पुढे सोव्हिएत रशियातून निमंत्रण आल्यामुळे तिथं तरी त्यांच्या साहित्याचा यथायोग्य सन्मान झाला. तिथं त्यांचा सत्कार झाला, अनेक प्रकारचे उत्तम अनुभव मिळाले. मात्र इकडे भारतात परतल्यावर त्यांना काय मिळालं? एक तर अण्णा कम्युनिस्ट पार्टीचं प्रचार कार्य करायचे… त्यामुळे इतर पक्षाचे संधीसाधू नेते वरून तोंड देखलेपणा दाखवत आतून मात्र त्यांचा द्वेषच करायचे! दुसरं असं की अण्णांच्या साहित्याची सततच इतर लेखकांच्या साहित्याशी तुलना केली जायची! त्यामुळे ते ठराविक वर्गाकडून न वाचताच दुर्लक्षित, उपेक्षित ठरवलं जायचं… खरं तर हा आपल्या महाराष्ट्रातील पांढरपेशा मराठी माणसांचा कोतेपणा अन् करंटेपणाच म्हणावा लागेल!


   अण्णा भाऊंना दलित साहित्याचे संस्थापक म्हणूनही श्रेय दिले जाते. मात्र त्यांना कथाकार, कादंबरीकार मानायला त्यांच्या काळातील काही विद्वान तयार नव्हते… तरीही त्यांचं साहित्य हे वाचकप्रिय ठरलं होतं. अण्णांच्या कादंबऱ्यांवर तब्बल आठ सिनेमे निघाले… तर त्यांच्या अनेक कथांवर लघुपट आणि मालिका सुद्धा निघाल्या. मात्र केवळ ‘फकिरा’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन, १९६१ सालचा 'उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार' अण्णा भाऊंना प्रदान करण्यात आला. अण्णांनी मराठी भाषेत जवळपास ३५ कादंबऱ्या लिहिल्या. तसंच त्यांच्या नावावर पंधरा लघुकथांचा संग्रह आहे… त्यातील मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि तब्बल सत्तावीस विदेशी भाषांमध्ये अनुवादित करण्यात आल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त अण्णांनी नाटके, रशियातील प्रवास वर्णन, बारा पटकथा, अनेक अजरामर पोवाडे, गाणी इत्यादी विपुल लेखन केलं आहे.  

       त्याकाळात शाहीर अण्णा भाऊ यांचं साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारं ठरलं. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी त्यांचे पोवाडे दुमदुमले... सर्व सामान्य लोकांनी ते डोक्यावर घेतले! महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात साहित्याचं योगदान हे महत्त्वपूर्ण मानलं जातं. खरं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत अण्णा भाऊ यांचं अविस्मरणीय योगदान आणि साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू कर्तृत्व 'भारत रत्न' पुरस्काराच्या तोडीचं आहे. त्यांच्या साहित्याच्या शब्दाशब्दांमध्ये क्रांती घडवण्याचं सामर्थ्य आहे मात्र तरीही अण्णा भाऊंचं साहित्य आपल्या प्रगत महाराष्ट्रात उपेक्षित, दुर्लक्षित ठरावं यासारखं दुर्दैव नाही!

    पुण्यातील 'दुर्वा एजन्सीज्' या प्रकाशन संस्थेचे सतत कार्यरत राहणारे प्रयोगशील प्रकाशक शैलेंद्र कदम यांनी *शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर* या चरित्र कादंबरीच्या निर्मितीसाठी सतत पाठपुरावा केला... त्यामुळेच ही साहित्यकृती लिहू शकलो हे मी याठिकाणी नम्रपणे नमूद करतो. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार! या चरित्र कादंबरीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणारे डॉ. भगवान लोखंडे यांच्याप्रती धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आकर्षक मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार प्रशांत भारताल आणि अतिशय सुबक लेआऊट, अक्षर जुळवणी करणाऱ्या संगीता जावळकर यांनाही अनेक अनेक धन्यवाद!


... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

    भ्र. क्र. ९९२३७९७७२५

प्रस्तावना… ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’

 प्रस्तावना… ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’


असं म्हणतात… उत्तम विचारांनीच माणूस घडत असतो! मनात चांगले विचार घोळू लागले की मग आपल्या हातून चांगली कृती व्हायला वेळ लागत नाही. अशावेळी एखादी चांगली कृती करताना मनात निश्चितच सकारात्मक विचार येऊ लागतात. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची प्रगती लवकर होताना आपल्याला दिसून येईल. याउलट नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींंना अनेक संकटांना, दुर्धर प्रसंगांना सामोरं जावं लागतं! तसं पाहिलं तर साधारणपणे बऱ्याच लोकांचं आपल्या विचारांकडे लक्षच नसतं. दिवसभरात अनेक विचार प्रत्येकाच्या मनात येत असतात. सतत निरनिराळे विचार मनात आले तर सर्वसामान्य माणसाच्या मनाचा कोंडमारा होतो. अशा विचारांना नकारात्मकतेची झालर लागली तर मग विचारूच नका. त्यावेळी मनाची अवस्था सैरभैर झाल्याशिवाय राहत नाही!

 याठिकाणी महान तत्त्ववेत्ते सॉक्रेटिस यांचं पुढील वचन पुरेसं बोलकं आहे हे दिसून येईल…

 “जगाच्या पाठीवर सर्वत्र राजे, महाराजे राज्य करत असले तरी या जगात खरे राज्य असते… ते उत्तम विचारांचेच!”


       लेखक मित्र प्रा. रमेश वाघ यांनी लिहिलेल्या ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ या ग्रंथातील स्वामीजींचे अलौकिक आणि अनमोल विचार सर्वसामान्य माणसाला जगण्याची निश्चित दिशा दाखवण्यास अत्यंत प्रेरणादायी आहेत… एवढं प्रचंड सामर्थ्य त्यांच्या विचारात आहे. त्यांच्या जीवनसूत्रातील अमूल्य विचार भरकटलेल्या वाटसरूना योग्य वाटेवरून चालण्यासाठी मार्गदर्शन करतात… अंधःकारात चाचपडत असलेल्या माणसाला उगवता सूर्य दाखवतात… सर्व काही गमावलेल्यांच्या मनात नव्याने कमावण्याची उमेद निर्माण करतात… अगदी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या रुग्णाच्या शरीरात प्राण फुंकणारी ऊर्जा निर्माण करतात… निराश होऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त होणाऱ्या व्यक्तीला जगण्याची आशा आणि नवीन दिशा दाखवतात! त्यामुळेच स्वामी विवेकानंद यांचे कालजयी असलेले बहुमूल्य विचार या जगातील सगळ्या प्राणीमात्रांसाठी सदैव आदर्श आणि मोलाचे ठरलेले आहेत. 


      खरं तर जन्माला आल्यावर माणूस निर्मळ पाण्यासारखा स्वच्छ असतो. नंतर तो जसजसा मोठा होत जातो, तसतसे त्याला ईर्षा, द्वेष, राग, लोभ इत्यादी दुर्गुण चिकटत जातात… आणि तो पुढे पार गढूळल्या पाण्यासारखा होत जातो. मात्र हे दुर्गुणही प्रयत्नपूर्वक दूर सुद्धा सारता येऊ शकतात. त्यासाठी आवश्यकता आहे ती चांगल्या संगतीची, चांगल्या विचारांची! मात्र कधीकधी मनात उगाच शंका येते… परस्परांविषयी वाटणारी आत्मियता, सहानुभूती, प्रेम, आपुलकी या मानवाच्या स्वाभाविक भावना पुढच्या पिढीला फक्त कथा, कादंबऱ्यातच वाचायला मिळणार की काय! कारण हावरटपणा, लालसा, 'जेलसी' अशा प्रकारचे प्रतिकूल परिणाम करणारे ‘व्हायरस’ आज समाजातील माणसांमाणसात मोठ्या प्रमाणात पसरलेले आपल्याला दिसून येतात. इतरांची श्रीमंती पाहून जळणे, फजिती पाहून हसणे हे कशाचं लक्षण आहे? आता सांगा... इतरांना रडवण्यात किंवा दुखवण्यात खरंच का सुख असतं? हे सगळं कळतं पण वळत नाही हेच आजचं खरं दुखणं आहे!

       त्यामुळे आजघडीला सर्वत्र अस्वस्थतेचं वातावरण बघितलं तर लेखक रमेश वाघ यांनी लिहिलेलं ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ हे पुस्तक मरगळलेल्या समाजात प्राण फुंकण्यासाठी निश्चितच नवसंजीवनी ठरणारं आहे. लेखक शिक्षकी पेशात असले तरी ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. उत्तम कीर्तनकार आहेत, व्याख्याते आहेत. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते भाविकांना माणुसकीचं दर्शन घडवतात. या जगण्यावर त्यांचं निस्सीम प्रेम आहे… माणसातल्या परमेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा आहे! म्हणूनच ते या पुस्तकात अत्यंत तळमळीनं आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतात… “मानवाचा सुखाचा शोध अनंत काळापासून सुरू आहे. मानवी जीवन सुखी, समृध्द व्हावे हाच जगातल्या सर्व तत्वज्ञानाचा उद्देश आहे. त्यासाठीच सर्व वाङमय आहे. मृण्मय मानवी जीवनाला चिन्मय बनवते, ते खरे वाङमय. वेदान्त तत्वज्ञान मानवी जीवनाला सुसह्य आणि सुकर बनविण्यासाठी जन्माला आले. परंतु त्या वेदान्ताचा खरा अर्थ समाजापर्यंत पोहचलाच नाही. भ्रांत ईश्वरवादी लोकांनी त्याच्याकडे नीट निरखून पाहिले नाही, आणि तथाकथित बुध्दीवाद्यांची परप्रकाशित स्वार्थबुध्दी तिथपर्यंत कधी पोहचलीच नाही. वेदान्त सिध्दान्ताचे अमृत प्राशन करणारा सिंहासारखी डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. तो वेदान्त तुमच्या आमच्या जीवनात उतरावा म्हणून अखंडित तपसाधना करणारा अर्वाचीन काळातला महायोगी संत म्हणजे स्वामी विवेकानंद!”


     आपल्याला खरं निखळ आयुष्य हे बालपणीच उपभोगायला मिळतं. किती निरागसता अन् भाबडेपणा असतो तेव्हाच्या त्या वागण्यात! तेव्हा स्वार्थाचा व खोटेपणाचा लवलेशही नसतो बोलण्यात, कारण त्या वयात विचार करून काहीच बोलावं लागत नाही ना... ना अहंकार, ना मत्सर! कुणाशी हेवेदावे नको की कुणावर कुरघोडी नको. एकमेकांवर रागावणं तेही काही मिनिटांपुरतं, मग गळ्यात गळे घालून पुन्हा जैसे थे! म्हणूनच संतांनी म्हटलं आहे… "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा!"

कालांतराने जसजसे वय वाढत जाते, माणूस मग षडरिपूंच्या चक्रव्यूहात अडकला जातो. तेव्हा तो आपली सद्सदविवेक बुध्दी गहाण ठेवून चुकीचे निर्णय घेण्यास अनेक वेळा बाध्य होतो. मग 'जोरोका झटका' लागला की त्याचे पाय जमिनीवर येतात पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आपण ज्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, मनापासून त्यांच्यावर प्रेम करतो, तेच कधीकधी असे वागतात की आपल्यालाच अपरिचित वाटू लागतात! आपलं नेमकं काय चुकलं ते आपलं आपल्यालाच कळत नाही. अशावेळी अपेक्षाभंगाचे जीवघेणे क्षण आपल्या अगदी जवळच्या माणसांकडून आपल्या वाट्याला येत असतात. अन् एक मात्र खरं, हे अपेक्षाभंगाचं दु:ख परक्या व्यक्तीकडून होणं शक्य नसतं. कारण अपेक्षा या केवळ आपल्याच माणसांकडून केल्या जातात... त्यांना आपले जवळचे समजून! आयुष्यभर आपण आपल्या माणसांसाठी जिवाचं रान करतो मात्र त्या प्रामाणिक प्रयत्नांचं योग्य चीज झालं नाही तर अपेक्षाभंगाचं दु:ख होणारच! कधी कधी असं वाटतं माणसांपेक्षा प्राणी परवडले.. .एखाद्या कुत्र्याला तुम्ही रोज साधं बिस्कीट खायला द्या, तुमची साथ द्यायला मग तो अगदी रात्रंदिवस तयार असतो!

        आज संपूर्ण जगात कधी नव्हे एवढी झपाट्याने प्रगती झाली आहे, अजूनही अविरतपणे होत आहे. मात्र माणसं खोट्या अभिमानाने आणि अहंकाराने नुसती फुलत चालली आहेत. तेवढ्याच झपाट्याने किंबहुना त्यापेक्षा जास्त पटीने माणसांच्या भावना मरत चालल्या आहेत, हे मान्य करावंच लागेल. सूतकी चेहऱ्याने आणि ढिम्मपणाने जगणं लोकांच्या अंगवळणी पडत चाललं असल्याचं पदोपदी निदर्शनास येत आहे. त्यामुळे हल्ली जिवंतपणाचं लक्षण असणाऱ्या लोकांची वानवा जाणवू लागली आहे! अशावेळी मनात आपसूकच एक विचार आल्याशिवाय राहत नाही…एवढ्या मोठ्या दुनियेत सच्चा माणूस मिळणं खरंच दुरापास्त झालं आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मोठं मार्मिक भजन आहे…

"माणूस द्या…मज माणूस द्या… ही भीक मागता प्रभू दिसला!

लोक दर्शना जाती…देव दिसावा म्हणूनिया.

तर देव बोले मज माणूस न दिसे, अजब तमाशा हा कसला?

माणूस द्या, मज माणूस द्या…

ह्रदयाचा जो सरळ असे… सर्वांंवरी जो प्रेम करी, 

कुटील नको असला तसला..!

माणूस द्या… मज माणूस द्या !"


   या ठिकाणी खरं तर सांगायचा मुद्दा असा की… 

माणुसकी हरवत चाललेल्या आणि स्वार्थी वृत्ती झपाट्याने वाढत जाणाऱ्या या मतलबी दुनियेत आजकाल सच्चा माणूस अभावानेच भेटत असल्याचा अनुभव थोड्या फार प्रमाणात अनेकांना येत असतो. त्यामुळे अधोगतीकडे मार्गक्रमणा करणाऱ्या आजच्या समाजात उत्तम विचारांची पेरणी करण्याची कधी नव्हे एवढी नितांत गरज भासते आहे. अशावेळी आपल्या देशाला लाभलेले युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कालजयी विचारांची सुसंगत आणि सुंदर मांडणी केलेला ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ हा प्रेरणादायी ग्रंथ दीपस्तंभ ठरणारा आहे!

    

      सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ या ग्रंथात लेखक रमेश वाघ यांनी एकूण एकवीस प्रकरणे मांडली आहेत. गीतेतील ‘कर्मण्य वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन… या उक्तीप्रमाणे कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता 'कर्म हाच धर्म’ मानून कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर आचरण केलं. कर्मयोगाचं महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. या ग्रंथातील ‘अखंड कर्मयोग करा’ या प्रकरणात स्वामी विवेकानंद यांचे विचार अधिक सुस्पष्ट करताना लेखक लिहितात… जीवन जगताना जो निष्क्रीय बनून राहतो, त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. किंवा चार दिवस काम केले आणि पुन्हा आराम करायला लागत असेल, तर तेही कामाचे नाही. आपण सर्वांनी शाळेत असताना ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलेली असते. कासव हळू असते. ससा वेगवान असतो. परंतु थोड्याशा प्रगतीने ससा खूश होऊन झोपून जातो. कासव आपला चालतच राहतो आणि शेवटी शर्यत जिंकतो. ससा कासवाची ही गोष्ट फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच नाही. तशी ती केवळ मुलांच्या मनोरंजनासाठीही नाही. 

   कोणत्याही कार्याला सुरूवात केल्यानंतर मनामध्ये त्याविषयीचा आळस निर्माण होता कामा नये. शरीराकडून जो आळस होतो त्याला आळस म्हणतात, मनाकडून जो आळस होतो त्याला प्रमाद म्हणतात. मला करायचे आहे, हे कळते आहे. मी केलेच पाहिजे हेही कळते आहे. पण कृती मात्र काही घडत नाही, याला प्रमाद म्हणतात. प्रमादी माणसाला अखंडित कार्यप्रवृत्त राहिल्याशिवाय यश मिळणार नाही. आपल्याकडे ‘अखंड हरिनाम सप्ताह’ असे सप्ताहाच्या पत्रिकेत नाव छापलेले असते. परंतु एकदा सप्ताह पार पडल्यानंतर त्यामध्ये तब्बल एक वर्षाचा खंड पडतो. जी गोष्ट अखंडितपणे करायची त्यात खंड पडतोच. कारण अखंड शब्दातच खंड शब्द आलेला असतो! 

     ‘कर्मयोग करा’ म्हटले की कदाचित काहींच्या डोळ्यासमोर भगव्या कपड्यांमध्ये नाक पकडून बसलेले साधू येत असतील. कारण आतापर्यंत आपलं तत्त्वज्ञान त्याच लोकांनी टिकवलं, वाढवलं. त्यांच्यामुळेच आज मी आपल्याला कृष्णाच्या जीवनसूत्रांविषयी बोलू शकतो. मात्र योग म्हणजे कायम जोडून राहणे, कधीही वेगळे न होणे. तुम्ही जीवनात कोणतीही गोष्ट करीत असाल, तर तिला पक्के घट्ट धरून ठेवणे म्हणजे योग. काहींना योग म्हणजे आसनांमध्ये शरीराच्या ठराविक घड्या करणे, इतकाच योगाचा अर्थ माहीत आहे. वास्तविक कर्मयोग करा म्हणजे अखंडितपणे त्या कर्माला जोडलेले राहा, चिकटलेले राहा. यश मिळवायचे ना, मग सतत युक्त राहा. जोडलेले राहा पण एकटे राहा... समूहात तपश्चर्या होत नसते. तसेच समूहात कर्मयोगही करता येत नाही. दोघं एकत्र झाले की गप्पा सुरू होतात. तीन झाले की मग गोंधळ!

   

    त्याचप्रमाणे आत्मविश्वास किती महत्वाचा असतो याबाबत लेखकाने स्वामीजींच्या आयुष्यातील दुर्धर प्रसंग या पुस्तकात मांडला आहे…

 स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेसाठी गेले तेव्हा त्यांचे सर्वस्व चोरांनी लुटले. सोबत काहीच नव्हते, होता केवळ दुर्दम्य आत्मविश्वास! चोरणारा सगळं काही चोरू शकतो पण तुमचे ज्ञान, तुमची वृत्ती, तुमची विचारक्षमता, बुद्धी कधीही चोरू शकत नाही. सर्वस्व लुटले गेल्यानंतर स्वामी एका गल्लीतून फिरत असताना तिथली मुले कोणीतरी विचित्र माणूस आलाय या भावनेने त्यांची हुर्यो उडवत त्यांच्यामागे फिरत होती. तरीही स्वामीजींनी आपला आत्मविश्वास टिकवून ठेवला. ज्याचा आत्मविश्वास टिकून असतो, त्याला ईश्वरी शक्ती मदत करते. ‘न ऋते श्रान्तस्य सख्याय देवाः’ -ऋग्वेद (४.३.३.११). जो अविरत प्रयत्न करतो, त्याला ईश्वरी शक्ती मदत करते. मला माझ्या कार्यात कुठून ना कुठून मदत मिळेल यावर ठाम विश्वास हवा. अर्थात माझ्या हातचे जे प्रयत्न करायचे, ते मी केलेच पाहिजेत. कदाचित माझ्या प्रयत्नानीच मला यश मिळेल, असाही ईश्वरी शक्तीचा संकेत असू शकतो. स्वामीजींनी उपाशीपोटी हाडे गोठवणाऱ्या थंडीत रेल्वेस्टेशनवर दिवस काढले पण आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही. त्याचा परिणाम आपणा सर्वांना माहितच आहे. स्वामीजींचं ते जग जिंकणारं भाषण आणि त्यानंतरचा तो त्यांचा झंझावात! याला आत्मविश्वास म्हणतात. 

     आत्मविश्वास आणि भीती एकत्र नांदू शकत नाहीत. आत्मविश्वास कमी झाला, की भीती डोके वर काढते. त्यामुळे काहीही झाले तरी तुमचा आत्मविश्वास ढळता कामा नये. तुमचा आत्मविश्वास हाच खरे तर तुमच्या विजयाचा प्रमुख वाटाड्या असतो. आत्मविश्वास गमावला की माणूस लवकर पराजय स्वीकारतो. त्याची लढण्याची वृत्ती मरून जाते. पराभव झाला तरी चालेल पण मी लढाईचे मैदान सोडणार नाही… हा अढळ निश्चय असला की आत्मविश्वास दृढ राहतो. ज्यांच्या ज्यांच्या चरित्रामध्ये आत्मविश्वास आहे, ते लोक कधीही घाबरलेले तुम्हाला दिसणार नाहीत.


    ‘जीवनात अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घाला’ या अत्यंत महत्वाच्या प्रकरणात विज्ञान आणि अध्यात्म परस्परपूरक कसे आहेत, याचं सुरेख विवेचन लेखकाने केलं आहे ... विज्ञान हे निरीक्षण, प्रयोग आणि तर्कशुद्ध विचारांवर आधारित असून, त्याचा उद्देश निसर्गातील नियम समजून घेऊन त्यांचा उपयोग मानवकल्याणासाठी करणे हा आहे. विज्ञानाने मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. चाकाचा शोध हा मानवी इतिहासातील पहिला क्रांतिकारक शोध मानला जातो. त्यानंतर चाकाच्या गतीप्रमाणेच मानवी जीवनाला गती प्राप्त झाल्याचे आपल्या लक्षात येते. आज मानव चंद्र, मंगळ आदी ग्रहांवर वस्ती करण्याचे मनसुबे रचतो आहे.

तर अध्यात्म हे आत्म्याचा, चेतनेचा, आणि परमसत्तेशी असलेल्या नात्याचा शोध घेण्याचे साधन आहे. विज्ञानाने लावलेले शोध नेमके कशासाठी आहेत आहेत आणि ते कसे वापरायचे याचे हॅण्डबूक म्हणजे अध्यात्म आहे. एखादे आधुनिक गॅजेट घरात आणल्यावर ते कसे वापरावे, याचे योग्य ज्ञानच नसेल, तर एक तर त्याचा वापर होणार नाही किंवा चुकीच्या पध्दतीने होईल. विज्ञानाचा वापर माणसाच्या हातून चुकीच्या पध्दतीने होऊ नये, यासाठीचे ईश्वराने मानवासाठी बनवलेले युजर मॅन्युअल म्हणजे अध्यात्म!

     विज्ञान भौतिक जगाचे ज्ञान देते, तर अध्यात्म मनोभूमीचा, चेतनेचा आणि नैतिकतेचा पाया घालते. त्यासाठी अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचाही समन्वय अधिक आवश्यक ठरतो. विज्ञान शरीरासाठी औषध देते, पण मनाला शांती देत नाही. मनाला शांतीसाठी विचारांचीच आवश्यकता आहे. विज्ञान तुम्हाला अत्याधुनिक गादी देऊ शकते पण सुखाच्या झोपेसाठी अध्यात्माचीच कास धरावी लागेल. विज्ञान माणसाला ज्ञान आणि शक्ती देते, तर अध्यात्म त्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याची दिशा दाखवते. विज्ञानाने जग बदलते तर अध्यात्म मन बदलते! विज्ञानाने अणुशक्ती निर्माण केली, पण तिचा उपयोग विनाशासाठीही झाला. जर अध्यात्मिक मूल्ये नसतील, तर विज्ञान आंधळे ठरते. अध्यात्म विज्ञानाला विवेक, संयम आणि करुणेची दृष्टी देते.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, “विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय झाला तरच मानवतेचा खरा विकास होईल.”

विज्ञानाच्या माध्यमातून माणूस अवकाशात पोहचला, पण अध्यात्माच्या माध्यमातून तो आपल्या अंतर्मनात उतरू शकतो. अध्यात्म विज्ञानाला नैतिकता, दिशा आणि मानवी मूल्यांची दृष्टी देते. विज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण आहे पण अध्यात्माशिवाय ते आंधळे आहे. विज्ञान पंख देतं, पण अध्यात्म त्या पंखांना उडण्याची दिशा देते!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यात्म आणि विज्ञानाचं महत्व विशद करताना म्हणतात…

“गुरूदेव ऐसी हो दया, जगका अंधेरा दूर हो।

 सद्धर्म-सूरज की प्रभासे दंभ सारे चूर हो।। 

अध्यात्म और विज्ञान के संयोगसे सब हो सुखी। 

सहयोग-समतासे यही सृष्टी करें हम स्वर्गसी।।”

      ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ या प्रेरणादायी ग्रंथातील सगळीच प्रकरणे अभ्यासपूर्ण आणि सर्वसामान्यांना निश्चित दिशा देणारी असल्यामुळे ती मुळात वाचायलाच हवी अशी सहज, साध्या आणि प्रवाही भाषेत लिहिली आहेत. स्वामींजींचे प्रेरक आणि मार्गदर्शक विचार लेखक रमेश वाघ यांनी प्रयत्नपूर्वक अनेक प्रकारचे दाखले देऊन ते प्रभावीपणे मांडले आहेत. त्यामुळे ही साहित्यकृती हवीहवीशी वाटणारी आणि अतिशय वाचनीय झाली आहे. त्यांच्या या अमूल्य अशा साहित्यकृतीसाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच यापुढेही अनेक प्रेरक साहित्यकृतींची त्यांनी निर्मिती करावी, यासाठी त्यांच्या पुढील उज्ज्वल साहित्यिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा देतो… धन्यवाद!


– विनोद श्रा. पंचभाई, लेखक-कादंबरीकार, पुणे

   भ्र. क्र. ९९२३७९७७२५

जीवन मे तू डरना नही...

 


 जीवन मे तू डरना नहीं!

   अचानक येणारी संकटं किंवा अपरिमित आर्थिक नुकसान आणि मग त्यातून येणारी आत्यंतिक निराशा अशा गोष्टींचा समर्थपणे सामना करणे सहसा सगळ्यांनाच जमत नाही. अशावेळी आपलं मन अगदी समतोल ठेवून आनंदी राहणं हे धाडसी माणसांशिवाय अन्य कोणाला साधता येत नाही. या जगात जे जे थोर महापुरुष होऊन गेलेत, त्यांच्या मोठेपणामागे त्यांची धाडसी मनोवृत्तीच कारणीभूत होती यात शंकाच नाही! अतिशय सामान्य प्रकारचे लोक कुठलंही संकट समोर दिसताक्षणीच डगमगतात आणि त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात नुकसान झालं तरी त्याप्रसंगी पुढचं पाऊल मागे घ्यायला कमी करत नाही. त्यांच्या अंगी धाडसी वृत्ती नसल्यामुळे ते त्यावेळी लगेच अधीर होतात. मात्र मनानं खंबीर असणारे लोक खरेखुरे धाडसी आणि निधड्या छातीचे असतात. ते अशा प्रकारच्या गोष्टींची, छोट्या मोठ्या संकटांची मुळीच पर्वा करत नाही. ते कुठल्याही प्रकारच्या बिकट प्रसंगी आपल्या मनाची समतोल बुद्धी, कणखरपणा जरा सुद्धा ढळू देत नाहीत. उलट आलेल्या प्रसंगाचे टेन्शन न घेता, धैर्याने त्याचा सामना करतात आणि आनंदी वृत्तीने आपले म चालू ठेवतात. खरंतर शौर्य, धैर्य म्हणजेच धाडसीपणा, निधडेपणा त्याचप्रमाणे थोडी फार बेफिकीरी इत्यादी गुण अंगी असल्याशिवाय मनुष्याची वृत्ती आनंदी किंवा प्रफुल्लित राहूच शकत नाही !

    मनुष्य हा नेहमीच आशेकडे आपले डोळे लावून पाहत बसणारा प्राणी आहे. असे असले तरी त्याच्यात हा आशावाद निर्माण होण्यासाठी त्याच्या मनाचा कणखरपणाच कारणीभूत ठरतो यात वाद नाही. ज्याच्याजवळ आशा आहे, म्हणजे आपलं इच्छित कार्य करण्यासाठी ज्याची दिवस रात्र अखंडपणे मनापासून धडपड चाललेली असते, त्याच्याकडे निराशा कधीच चालून येत नाही. आज समोर मिट्ट काळोख, अंधःकार दिसत असला तरी तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, याची त्याला जाणीव असते आणि त्या काळोखानंतर उद्याचा सूर्य आपलाच असणार हेही त्याला पक्के ठाऊक असते !

       असं म्हणतात दुःख, संकटे, त्रास, नुकसान इत्यादि गोष्टी कधीही कोणाच्या वाट्याला येऊ नयेत... हे जरी खरं असलं तरी त्याप्रसंगी आपलं धैर्य गमावून खचून जाणं शहाणपणाचं ठरणार नाही. तर अशा प्रकारच्या दिव्यातून जो तावूनसुलाखून बाहेर पडतो, त्याला वरील गोष्टीपैकी कशाचीही झळ लागत नाही! कारण त्याची धाडसी मनोवृत्ती समोर येणाऱ्या संकटासोबत सामना करण्यासाठी तयार होऊन त्याचे स्वागत करावयास ती सज्ज झालेली असते. खरं बघितलं तर संकटाचा प्रतिकार करायला काही फारशी साधनसामुग्री लागत नाही. थोडा फार बेफिकिरपणा, कमालीचा कणखरपणा आणि मनाचा समतोल या गोष्टी जवळ असल्या की तुमचे कोणीही वाकडे करू शकत नाही मात्र त्यासाठी हाच ठाम विश्वास नित्य मनी बाळगणं तितकंच गरजेचं असतं !


   भय, भीती ही अशी गोष्ट आहे, ती एकदा मनात ठाण मांडून बसली की मग कुठलंच काम व्यवस्थित होत नाही. मग ही सतत वाटणारी भीती विनाकारण टेन्शन वाढवते आणि मनाचा समतोल बिघडवण्यासही कारणीभूत ठरते... माणसामधील आत्मविश्वास कमी करते ! 'ज्याला कर नाही, त्याला डर कशाला' हे ज्याला ठाऊक असतं ना, तो कशालाही घाबरत नसतो. त्याला माहिती असतं आपण कुठलंही खोटंनाटं काम कधी केलं नाही, करत नाही आणि करणारही नाही तर उगाच घाबरायचं कशाला? आपण कुणाचे मिंधे नाही, कुणाचं लांगुलचालन करत नाही, कुणाच्या दबावाखाली काम करत नाही तर भीती कशासाठी

बाळगायची? मग कुणापुढे विनाकारण झुकायचं तरी कशासाठी? अशा प्रकारच्या धाडसी स्वभावाच्या माणसाला चांगलंच ठाऊक असतं... "जीवन मे तू डरना नही, सर निचा कभी करना नहीं!"

 विनोद श्रा. पंचभाई, पुणे 9

923797725