Monday, October 28, 2019

संपन्नतेचे प्रतीक ... धनत्रयोदशी

संपन्नतेचे प्रतीक... धनत्रयोदशी

दिवाळी हा सण अतिशय मांगल्याचा आणि संपन्नतेचा सण म्हणून आपल्या देशात सर्वत्र साजरा केला जातो. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस! धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा करतात. या दिवशी धन म्हणजे पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत रहावी अशी प्रार्थना केली जाते. धनत्रयोदशीला आपल्या देशातील
काही भागात धनतेरस असेही म्हणतात. या मंगलमय दिवसापासूनच दिवाळीची खरी सुरूवात होते.

धनत्रयोदशी या सणामागे मनाचा वेध घेणारी एक विलक्षण कथा सांगितली जाते..... राजजोतिष्याने सांगितलेल्या भविष्यवाणीनुसार हेम राजाचा पुत्र आपल्या ऐन तारूण्यावस्थेत मृत्यूमुखी पडणार असतो! त्यामुळे राजा, राणी सतत उदास आणि तणावात राहतात. तरीही ते आपल्या राजपुत्राचे जीवन सुखी व्हावे या आशेने त्याचे लग्न लावून देतात. मात्र लग्नानंतर चौथ्या दिवशीच तो मृत्यूमुखी पडणार असे भविष्य वर्तविलेले असल्याने तो दिवस त्याच्यासाठी अत्यंत कसोटीचा असतो. त्यादिवशी त्याची पत्नी त्याला रात्री झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. तसेच राजमहालाचे प्रवेशद्वार सुद्धा सोन्या-चांदीने भरून रोखण्यात येते. सर्व महालात मोठमोठे दिवे प्रज्वलित करून सगळीकडे लखलखीत प्रकाश केला जातो. राजपुत्राची पत्नी त्याला रंजक गोष्टी सांगून जागे ठेवण्यात यशस्वी होते. त्यानंतर जेव्हा यम राजपुत्राच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीच्या प्रखरतेने आणि तेथील प्रकाशाच्या लखलखाटाने दिपून जातात! त्यामुळे यम आपल्या यमलोकात परत निघून जातो. अशाप्रकारे राजपुत्राचे प्राण वाचतात. म्हणून या दिवसाला 'यमदीपदान' असेही म्हणतात. यादिवशी सायंकाळी घराबाहेर दिवे लावून त्यांच्या वातीचे टोक दक्षिण दिशेकडे ठेवतात आणि दिव्याला मनोभावे नमस्कार करतात. असे केल्याने अपमृत्यू टळतो असा समज आहे!

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा प्रचलित आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’! जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणासाठी समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला 'धन्वंतरी जयंती' असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने धनत्रयोदशी या दिवसाला धन्वंतरी जयंतीचे अतिशय महत्त्व आहे. वैद्य मंडळी यादिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. नंतर कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर प्रसाद म्हणून लोकांना वाटला जातो. आयुर्वेदात यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे अशी मान्यता आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी कडूनिंब आणि साखर धन्वंतरीचा प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.

व्यापारी वर्गात सुद्धा धनत्रयोदशीच्या पूजेला विशेष महत्त्व असते. यादिवशी सायंकाळी व्यापारी लोक आपल्या दुकानातील पेढीची मनोभावे पूजा करतात. त्यांच्या हिशेबांच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आपल्याकडे फार आधीपासूनच आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशातील काही ग्रामीण भागात धनत्रयोदशीला घरातील कानाकोपऱ्यात धने पसरून ठेवण्याची परंपराही आहे. यामुळे घराघरात धनधान्याची वृद्धी होते असा दृढ समज आहे.

तसेच धनत्रयोदशी सणाचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणावर सामान्यजन सोने खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक संपन्नता येते असा लोकांचा विश्वास आहे. जर कुणी सोने खरेदी नाही करू शकले तर ते कुठलीही एखादी नवीन वस्तू यादिवशी खरेदी करतात! असा हा
धनत्रयोदशी हा दिवाळी सणाचा पहिला मंगलमय दिवस लौकिकार्थाने संपन्नतेचे प्रतीकच आहे.

...विनोद श्रा.पंचभाई
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

Sunday, October 20, 2019

मंगलमय दिवाळी पाडवा

मंगलमय दिवाळी पाडवा

आपल्या भारतीय लोकांमध्ये निरनिराळे सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात कमालीचा उत्साह आढळून येतो. असाच दिवाळी हा आपला एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रमुख सण! अश्विन महिन्यात येणाऱ्या या सणात थंडीची चाहूल लागली असते. हवेत सुखद गारवा जाणवतो. अशा या आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणात दिवाळी सण साजरा करण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो. तसं पाहिलं तर 'वसुबारसे'च्या दिवसापासून या सणाची सुरूवात होते, मात्र दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत पाच दिवसांचा! पहिल्या दिवशी धनत्रयोदशी त्यानंतर नरक चतुर्दशी आणि तिसऱ्या दिवशी अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. मग दिवाळीच्या चौथ्या दिवशी येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी असलेल्या दिवाळी पाडवा या दिवसाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विक्रम संवत् कालगणनेचा प्रारंभही याच पाडव्याच्या  दिवसापासून होतो. उज्जैनीचा महापराक्रमी राजा असलेला विक्रमादित्य याने परकीय शकांचे आक्रमण परतवून लावत त्यांचा पराभव केला. त्या रोमहर्षक विजयाचं प्रतीक म्हणून राजा विक्रमादित्य याने 'विक्रम संवत्' ही कालगणना सुरू केली. इसवी सन पूर्व ५७ पासून ही कालगणना अजूनही प्रचलित आहे. इसवी सन पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचं, सभ्यतेचं आणि न्यायप्रिय एकछत्री राज्य व्यवस्थेचं हे गौरवशाली उदाहरण आहे.

दिवाळी पाडवा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो. बळीराजासारख्या प्रजाहितदक्ष, पराक्रमी आणि दानशूर असलेल्या मात्र नंतर अहंकारी बनलेल्या राजाला बटु वामनाचं रूप घेतलेल्या श्रीविष्णूने तीन पावलांचं दान मागून भानावर आणलं अशी पौराणिक कथा आहे. या बळीराजाचाच बलिप्रतिपदा हा दिवस मानला जातो.
 त्याचप्रमाणे गोकुळातील सर्वसामान्य गोपगोपियांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता अशी आख्यायिका आहे. या घटनेचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन आपल्या देशाच्या काही भागात दिवाळी पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले वाहिली जातात. तसेच श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती मांडून त्याची मनोभावे पूजा केली जाते. त्यानंतर गावातील गोधन म्हणजे गायी, वासरांना सुशोभित करून, त्यांची पूजा करून उत्साहात मिरवणूकही या दिवशी काढली जाते. गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. त्यामुळे पूजा करणाऱ्यांना श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद् गुणांचे संवर्धन होते अशा प्रकारची भावना श्रध्दावान लोक व्यक्त करतात.

पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतीक असणारा कार्तिक महिन्याचा पहिला दिवस   असलेला हा दिवाळी पाडवा आणखी एका दृष्टीनं अत्यंत  महत्त्वाचा आहे. आपल्याकडील परंपरेने पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं, अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे.
आपल्या मनात दिवाळीच्या पाडव्याविषयीचे एक पारंपरिक चित्र रेखाटलं गेलं आहे...नवीन पेहराव आणि आभुषणं परिधान केलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते आहे. निरांजनातल्या ज्योतींचा मंद प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यांवर पडतो आणि त्यात परस्परांविषयीचा विश्वास, प्रेम आणि आदर प्रकर्षाने जाणवतो. आजही हे चित्र बदललेलं नाही!

 आज आपण बघतो, आपल्या देशात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. स्वतंत्रपणे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व व्यवसाय आत्मविश्वासाने सांभाळताना त्या दिसतात. अगदी मोलकरणीपासून वैमानिकापर्यंत स्त्री समर्थपणे कार्य करताना आपण बघतो. नोकरी करणाऱ्यांना तर अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. तरीही आपलं घर प्रेमानं आणि जबाबदारीनं सांभाळणारी, आपल्या मुलांचं संगोपन करणारी, आपल्या कुटुंबात सामंजस्य राखण्यासाठी सदैव झटणारी तसेच सासर आणि माहेरच्या नात्यातला स्नेह जोपासला जावा यासाठी सजग असणारी अशी भारतीय स्त्रीची कितीतरी रूपे आपल्या समाजात बघायला मिळतात. मात्र आपल्या संस्कारांना प्राधान्य देऊन तसेच  परंपरांचा मान राखून आपल्याकडील स्त्रिया अतिशय उत्साहानं दिवाळी पाडवा साजरा करताना दिसतात.

 अतुट विश्वास आणि प्रेम यावर आधारलेलं पती-पत्नीचं नातं निभवायला तसं सर्वात कठीण! एक उत्तम सहजीवन साकारणे ही एक कौशल्याची गोष्ट आहे. त्यासाठी दोघांनाही अनेक कसोट्यांना सामोरं जावं लागतं! निरनिराळ्या जबाबदाऱ्या सतत पार पाडाव्या लागतात.  एकमेकांचे स्वभाव, आजूबाजूची बदलती परिस्थिती, सतत बदलणारा काळ, वाढत जाणारं वय, जीवनात येणारे कटु- गोड अनुभव यामुळे पती - पत्नीचं  नातं अधिकाधिक प्रगल्भ होत गेलं पाहिजे अशी दोघांचीही अपेक्षा असते.  मात्र हे नातं आयुष्यभराच्या एकमेकांच्या सततच्या सहवासाचं असल्याने काहीवेळा ते अधिक गुंतागुंतीचं आणि अवघड बनून जातं. परस्परांविषयीचे समज-गैरसमज, संशय, एकमेकांना गृहीत धरण्याची सवय, एककल्ली वृत्ती अशा अनेक गोष्टींचं गालबोट या नात्याला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कधीतरी झालेल्या या गैरसमजुती विसरूनच नव्याने या नात्याला उजाळा देण्याचा प्रयत्न पाडव्याच्या या मंगलमय दिवशी मनापासून केला जातो.

कधीकधी पती-पत्नीमध्ये आपसात गैरसमज झाल्याने सुरुवातीला हे जमत नाही. दोन्ही बाजूंनी तीव्र शाब्दिक चकमक झाल्याने वाद, भांडणं होऊ शकतात. दुरावाही निर्माण होण्याची शक्यता असते ; पण जसजसे सहजीवन परिपक्व होत जाते तसतशी एकमेकांच्या स्वभावाची अन्  उणिवांची खरी ओळख पटत जाते आणि त्याप्रमाणे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व प्रवासात पती आणि पत्नी हे नातं बरोबरीचं आहे याची जाणीव मात्र  दोघांना आणि कुटुंबातील इतरांनाही होणे अतिशय आवश्यक ठरते. आपसातील विश्वास, सामंजस्य कायम राखल्यास मग घराला घरपण आल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने नात्यातला जिव्हाळा, आपुलकी वृद्धिंगत होणार हे निश्चितच आणि त्याचंच प्रतीक म्हणून पाडवा साजरा केला जावा. तो केवळ फादर्स डे किंवा मदर्स डे सारखा पती-पत्नी डे असा एकच दिवस न राहता कायम रोज स्मरणात राहण्यासारखा असावा. एकमेकांसाठी म्हणून काही गोष्टी आनंदाने करण्याचा असावा. पती-पत्नीतल्या नात्याला दृढ करणारा, एकमेकांच्या साथसंगतीने वाढण्याचा, परस्परांविषयीचं प्रेम, विश्वास आणि आदर वृद्धिंगत करणारा असावा! म्हणूनच म्हणावेसे वाटते .....
जपण्यासाठी आपसातील नात्यातला गोडवा!
साजरा करूया आनंदाने हा मंगलमय पाडवा!!

...विनोद श्रा. पंचभाई, वारजे पुणे
    भ्र.क्र. ९९२३७९७७२५

Thursday, October 17, 2019

गुरूपुष्यामृत ... विशेषता आणि महत्त्व

गुरुपुष्यामृत योग ---- विशेषता आणि महत्त्व


आपली भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक राज्यासाठी करण्यात आलेल्या प्रांतवार भाषा रचना तसेच तेथील वेगवगळ्या रूढी परंपरा या त्या-त्या राज्यांचं वैशिष्ट्य मानलं गेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निरनिराळ्या सणांना तसेच विविध प्रकारची व्रतवैकल्ये,  नक्षत्रे, मुहूर्त यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्याकडील ज्योतिष शास्त्रामध्ये विशिष्ट ग्रह, नक्षत्र, तिथी, महिना आणि सोमवारपासून रविवारपर्यंतचे वार या महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. "या घटकांचा प्रभाव आणि युती यांच्यामुळे मानवी जीवनात शुभ व अशुभ काळ निर्माण होत असतो. तसेच ग्रह, नक्षत्र, तिथी इत्यादी घटकांच्या मदतीनेच मानवाला इच्छित कार्यात यश प्राप्त होऊ शकते" असे ज्योतिष शास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे. 

जर गुरूवारी पुष्य नक्षत्राचा दिवस आला, तर तो अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस व नक्षत्र यांच्या संयोगातून गुरूपुष्यामृत योग निर्माण होतो. कुठल्याही चांगल्या कार्यात जवळजवळ नव्व्यान्नव टक्के यशस्वी होण्यासाठी, त्या कार्याची सुरूवात या गुरुपुष्यामृताच्या दिवशी केली जाते. कारण सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गणल्या गेलेला "गुरू" हा ग्रह आपल्याकडे ज्ञान आणि यश प्राप्त करण्याचं प्रतीक मानल्या गेलं आहे! 

म्हणूनच गुरूपुष्यामृत योग असलेल्या दिवशी उच्च शिक्षण किंवा तंत्रज्ञानाचं शिक्षण सुरू करणे अत्यंत लाभदायक ठरते.  त्याचप्रमाणे  विविध कला प्रकार, साहित्य, नाट्य, वाद्य तसेच निरनिराळ्या विषयातील संशोधनाचा प्रारंभ करणे या दिवशी शुभ मानले जाते. शैक्षणिक किंवा आध्यात्मिक गुरू यांच्याकडून मंत्र वा दीक्षा घेणे, विदेशवारी करणे, नवीन व्यवसायाची सुरूवात, धार्मिक कार्याचा प्रारंभ, नवीन वास्तू किंवा निवासस्थानात प्रवेश करणे गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरूपुष्यामृत योगाच्या काळात सोने, चांदी किंवा नवीन वाहन खरेदी केल्यास त्यापासून लाभ तर होतोच आणि ते चिरकाल टिकून राहते, असाही बरेच तज्ज्ञ सल्ला देतात. तसेच या दिवशी पिवळा पुष्कराज बोटाच्या अंगठीमध्ये धारण करणे हे सुध्दा अत्यंत फलदायी मानले गेले आहे. 

सध्या सुरु असलेल्या २०१९ या सालात गुरूवार
 दिनांक ६ जून रोजी गुरुपुष्यामृत योग नुकताच येऊन गेला. तसेच पुढील आठवड्यात दिनांक ४ जुलैच्या गुरूवारी या वर्षातील दुसरा गुरुपुष्यामृत योग येत आहे. त्याचा  कालावधी ४ जुलैच्या सकाळी सहा वाजून आठ मिनिटांपासून ते ५ जुलैच्या पहाटे दोन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे या शुभ काळात आपण वर नमूद केल्याप्रमाणे गुरूपुष्यामृताचा नक्कीच लाभ घेऊ शकतो! तेव्हा शुभस्य शीघ्रम्!!

                                           विनोद श्रा. पंचभाई
                                                       वारजे, पुणे 
                                           भ्र.९९२३७९७७२५

नवरात्र ...

नवरात्र ---- महात्म्य आणि उद्देश 

नवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. नऊ दिवस देवीची - आदिशक्तीची आराधना करण्याचा हा सण आहे. त्यासाठी नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येते. घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणं म्हणजे घट स्थापना! या नऊ दिवसांत रात्रंदिवस अखंडपणे दीप तेवत ठेवला जातो. 

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतुचं आगमन होतं. त्यामुळे या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाला शारदीय नवरात्र असं म्हणतात. एकूण नऊ दिवस सलग उत्सव चालत असल्यानं हा नवरात्रोत्सव होय! नंतर दहाव्या दिवशी येणारा विजयादशमी म्हणजेच दसरा सण. या दसऱ्याच्या आदल्या रात्री नवरात्र उत्सवाची सांगता होते. स्थापन केलेल्या घटांचं विसर्जन केलं जातं !

आपण दररोज घरी पूजा करतो. तेव्हा आपल्या देवघरात असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावं, तिचं आपल्या राहत्या घरावर तसंच कुटुंबियांवर कृपाछत्र असावं या शुद्ध व निर्मळ हेतूनं नवरात्र केलं जातं. त्याचप्रमाणे कुठल्याही अदृश्य शक्तीपासून कुलदेवतेचं आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावं या उद्देशानं शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलं आहे. हे नवरात्र व्रत अगदी मनापासून आणि भक्तिभावानं केल्यास घरात सुख, शांती तर नांदणारच शिवाय आगळंवेगळं समाधानही आपल्याला प्राप्त होईल!

देवीची रूपे ---

१) शैलपुत्री ... देवीचं पहिलं रूप शैलपुत्री! शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ निश्चयता येण्यास मदत होते. भटकणारं मन देवीच्या या रूपाच्या स्मरणामुळे खंबीर, निडर अन् शांत होतं!
२) ब्रह्यचारिणी ... ब्रह्यचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होतं. आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्यचर्याचे गुण जागृत होण्यास मदत होते. अशावेळी आपली चेतना अनंताचा अनोखा अनुभव घेणे सुरू करते! त्यामुळे आपल्याला तणावमुक्त झाल्याची आगळीवेगळी अनुभूती मिळते.
३) चंद्रघंटा ... नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. चंद्राचा संबंध मानवी मनाशी जोडला गेला आहे आणि घंटेचा नाद आपल्या मनाला वर्तमान क्षणात घेऊन येण्यास कारणीभूत ठरतो. चंद्राच्या कलांप्रमाणे आपलं मन सुद्धा सतत बदलत असतं. मात्र देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केल्यास आपलं मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४) कुष्मांडा ... कुष्मांड म्हणजे कोहळं! कोहळ्यामध्ये भरपूर बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये असंख्य कोहळे उत्पन्न करण्याची क्षमता असते.म्हणूनच कोहळं हे निर्मितीचं प्रतिक आहे.कोहळ्याप्रमाणेच देवीमध्ये सगळं विश्व सामावलं आहे. ही कुष्मांडा देवी आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते.
५) स्कंदमाता ... स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता! बाल कार्तिकेयासोबत सिंहावर विराजमान असं तिचं रूप आहे. हे रूप शौर्य आणि करूणेचं प्रतिक आहे. स्कंदचा अर्थ निष्णात किंवा निपुण असणं! मात्र सर्वसाधारणपणे जे निष्णात किंवा तज्ज्ञ असतात ते थोडे अहंकारी असतात. परंतु येथे निरागसता वाढवणारी निपुणता आहे. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास आपल्याला कौशल्यासह निरागसता आणि शौर्यासोबत करूणा हे गुण प्राप्त होतात.
६) कात्यायनी ... देवीच्या मातृत्वाचं वैशिष्ट्य दर्शवणारं हे रूप आहे. उत्तम वरप्राप्तीसाठी अविवाहित मुली देवीच्या या रूपाची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबध्दता, सहजीवन अन् आपलेपणा! ही देवी नातेसंबंधांमध्ये आवश्यक असलेल्या या गुणांची प्रतिक आहे.
७) कालरात्री  ... काल म्हणजे वेळ!  काळामध्ये या जगातील सारं काही सामावलं आहे आणि हा काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती... शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती! विश्रांती मिळाल्याशिवाय आपण परत ताजंतवानं होऊ शकत नाही. कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती. म्हणून देवीच्या या रूपाची आराधना केल्यास आपल्याला अशाप्रकारची विश्रांती लाभू शकते!
८) महागौरी  ... गौर म्हणजे गोरा, सफेद! सफेद, पांढरा रंग शुध्दतेचं प्रतिक आहे. शुध्दता निरागसतेतून येत असते. महागौरी हे देवीचं रूप म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ आहे. महागौरीची आराधना केल्यास ती आपल्याला जीवनाबाबतचं उच्च ज्ञान प्रदान करते!
९) सिद्धिदात्री  ... जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री! जे हवं आहे ते इच्छित मागण्यापूर्वी अपेक्षेपेक्षा जास्त मिळणं म्हणजे सिद्धी. साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. गुरूपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकानं गुरूपरंपरेच्या ज्ञानमार्गावर वाटचाल केल्यास सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची प्राप्ती करून देते. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास गुरूकृपेमुळे अपेक्षापूर्ती होऊ शकते.

स्त्री ही आपल्या समाजातील उपेक्षित, वंचित घटक नाही हे तिनं आजच्या काळात स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं सिद्ध केलं आहे. मात्र काही तथाकथित समाजधुरिण हे मान्य करत नाही. स्त्री आपल्यापेक्षा वरचढ कशी काय होऊ शकते, ही त्यांची समस्या अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना स्वस्थ बसू देत नाही! त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांकडून समाजातील स्त्रीचा अनादर केला जातो. तिला अपमानित केले जाते. मात्र ही स्त्रीशक्ती जेव्हा अन्यायाविरूद्ध पेटून उठते तेव्हा ती महिषासूरासारख्या बलाढ्य राक्षसाचा संहार करते! त्याच्यावर अभूतपूर्व असा विजय प्राप्त करते. हेच नवरात्र सणाचं महात्म्य आहे!

आजच्या काळातील स्त्रीने स्वतःच्या स्त्रीत्वाची जपणूक करण्यासाठी उग्ररूप धारण करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे या सणाचा उदात्त हेतू लक्षात घेऊन तो साजरा करण्यावर भर देणं संयुक्तिक ठरेल. नवरात्राच्या नऊ दिवसांत नऊ रंगांची विविध वस्त्रं परिधान करून मिरवणं तसंच नटूनथटून मौज म्हणून दांडिया खेळणं म्हणजे नवरात्र साजरा करणं असं जे चित्र आजकाल सर्वत्र बघायला मिळतं, त्यावर विचार होणं गरजेचं आहे. या नवरात्र उत्सवाचं पावित्र्य आणि गांभीर्य समजून घेऊन त्यादृष्टीने पालन करणं तसंच घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचा मूळ उद्देश लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास आपल्याला एकप्रकारचे मानसिक समाधान प्राप्त करून घेता येईल हे निश्चित!!

... विनोद श्रा. पंचभाई
भ्र.क्र.९९२३७९७७२५

वाचाल तरच वाचाल

वाचाल तरच वाचाल...

असं म्हणतात... "अजून काही वर्षानंतर आपण कुठं असणार हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र त्यावेळी आपल्या सहवासात येणाऱ्या चांगल्या व्यक्ती आणि हातात पडणारं योग्य पुस्तक या दोनच गोष्टी आपली योग्य दिशा ठरवण्यास पुरेशा असतात." या धकाधकीच्या जीवनात बरेचदा आपल्याला मनाच्या द्विधा अवस्थेचा सामना करावा लागतो. आपल्या अडचणी, मनाची व्यथा कुणाजवळ सांगू शकत नाही. या जगात कुणीही आपल्याला समजून घेणारं नाही असंही त्यावेळी प्रकर्षानं जाणवतं! अशावेळी कधीकधी नैराश्यही येतं. निर्णयक्षमता जणू कुंठित झाली की काय अशी वेळ आपल्यावर येते. मनाच्या या दोलायमान अवस्थेत एखादं पुस्तक हाती पडलं तर ते निश्चितच मार्गदर्शक ठरू शकतं. आपण कुठल्या प्रकारचं वाचन करतो यावरही बरंच काही अवलंबून असतं. तसं पाहता प्रत्येक पुस्तकात काही ना काही तरी संदेश दडलेला असतोच. असंच एखादं पुस्तक आपल्याला बरंच काही शिकवून जातं, ज्याची आपण कधी कल्पना सुद्धा केलेली नसते. 

 डाॅ. अब्दुल कलामांसारख्या आदर्श व्यक्तीचं चरित्र  आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतं. अशा प्रेरणादायी पुस्तकामुळे एखाद्याचं पुढील आयुष्य बदलू शकतं एवढं सामर्थ्य पुस्तक वाचनात निश्चितच असतं. आपल्या मराठी भाषेत वेगवेगळ्या विषयांवरील विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहेत. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, महाराणा प्रतापसिंह यांंच्यासारख्यांचं अचंबित करणारं थोर कार्य, त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले असंख्य क्रांतिकारक आणि महापुरूषांचं अपूर्व योगदान वाचताना पुस्तक हातातून सुटत नाही हेच वाचनाचं खरं सामर्थ्य आहे. तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा अनेक थोर संतमहंतांची परंपरा लाभलेल्या आपल्या देशाला त्यांच्या समाज प्रबोधनानं एक प्रकारची संजीवनी प्राप्त झाली आहे. त्यांच्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या संतसाहित्यात सर्वसामान्यांचं आयुष्य बदलण्याची, योग्य दिशा देण्याची शक्ती नक्कीच आहे. आपल्याला गरज आहे फक्त ते मनापासून वाचण्याची!

वाचन ही अशी सवय आहे ज्यामुळे कुणालाही तिच्यापासून त्रास होत नाही. वाचन करायला निश्चित वेळ लागत नाही, जागा लागत नाही. वाचन कधीही, कुठेही मनात आलं तेव्हा आपण करू शकतो. घरात वीज पुरवठा असो किंवा नसो, पुस्तक वाचन करताना त्याची आवश्यकता भासत नाही. आणि एकटं असताना तर पुस्तकासारखा दुसरा सच्चा मित्र नाही, हा अनुभव अनुभवल्यावरच येऊ शकतो. पुस्तक वाचताना तुम्ही कधी गंभीर होता तर कधी खळखळून हसूही शकता! तसंच काही पुस्तकातील विचार कधीकधी अचंबित करणारे असतात तर कधी ते आपल्याला अंतर्मुख पण करतात! 

आपण आपल्या कुटुंबियांसह एखादा सिनेमा बघण्यासाठी जातो तेव्हा आपले कमीत कमी हजार रूपये तरी सहज खर्च होतात. त्यापासून सर्वांना तीन तासात मनोरंजन मिळतं, काही अंशी प्रबोधन होतं. एखादा संदेशही मिळतो हे ठीकच आहे. मात्र त्याच हजार रूपयात जर वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके घरी आणली तर आपण ती वेळ मिळेल तशी वाचू शकतो. घरातील सगळे सदस्य तसंच शेजारीही त्याचा लाभ घेऊ शकतात. गरज आहे केवळ आपली मानसिकता बदलण्याची!

पुस्तकासाठी खर्च करणे ही संकल्पनाच कित्येक लोकांना मान्य नसते. काही व्यक्ती  ऊठसूट कुठल्याही गोष्टीवर पैसे खर्च करतील मात्र साधं वर्तमानपत्र वाचायचा शेजारी मित्राकडे जातील, ही वस्तुस्थिती आहे. पैसे देऊन वर्तमानपत्र किंवा एखादं छोटं पुस्तक विकत घेणं यांच्या पचनीच पडत नाही. याला अपवाद असणारे मित्रही असतात, नाही असं नाही! आवडलेल्या एकाच पुस्तकाच्या पाच-दहा प्रती घेऊन आपल्या मित्र, नातेवाईकांना भेट देणारेही सच्चे वाचनप्रेमी कधीकधी आपल्याला भेटतात. याठिकाणी सांगायचा मुद्दा असा की, अशाप्रकारच्या पुस्तकप्रेमी मित्राकडून भेट स्वरूपात पुस्तक हस्तगत करण्याची वाट न बघता स्वतःजवळचे पैसे स्वतः खर्च करून पुस्तक खरेदी करावं आणि आपली वाचनाची हौस वृद्धिंगत करावी असं वाटतं. बघा पटतंय का??😊 

...विनोद श्रा.पंचभाई, पुणे