Sunday, December 15, 2019

आजचे शिक्षण... विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता


आजचे शिक्षण ... विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता

आपल्या मानसिक गुणांचे संवर्धन आणि आपणामधील दोषांचे उच्चाटन जे करते ते खरे शिक्षण! जगात सर्वत्र वावरण्यासाठी, स्वत:चा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान म्हणजेच शिक्षण... यात शाळेतील मिळणाऱ्या शिक्षणासोबतच समाजातील निरनिराळ्या व्यक्त्तींकडून मिळणारे व्यवहार
ज्ञान सुद्धा अपेक्षित आहे.

एक काळ असा होता, म्हणजे इंग्रजांच्या काळात आपल्याकडे शाळा खूपच कमी प्रमाणात होत्या. आणि ज्या मिशनरी शाळा अस्तित्वात होत्या त्या सुद्धा इंग्रजी सत्तेच्या अंमलाखाली होत्या. कालांतराने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. मात्र त्यासाठी त्यांना कमालीचा संघर्ष करावा लागला. अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी मागासवर्गीयांसाठी सुद्धा विनामूल्य शाळा सुरू केल्या. अशाप्रकारे त्यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. 

मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशातील अगदी खेड्यापाड्यातही मोफत शाळा सुरू झाल्या. त्यामुळे  सर्वांसाठीच शिक्षणाची दारे खुली झाली. आपले विद्यार्थी चांगले घडावे, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्याकाळातील शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. शिक्षणाचा जणू ध्यास घेऊन ते आपले दायित्व उत्तमप्रकारे पार पाडायचे.शाळेतील
शिक्षणासोबतच मूल्यशिशिक्षणाचे धडेही विद्यार्थ्यांना द्यायचे. मात्र आज परिस्थिती अशी आहे की, आता शाळा, महाविद्यालयांची कमतरता नाही. अगदी छोट्या छोट्या शहरात सुद्धा इंग्रजीत शिक्षण देणाऱ्या काँन्व्हेन्टच्या सोयी झाल्या आहेत. पण आजचे शिक्षण तुलनेने खूपच महागडे झाले आहे. आज शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेशासाठी अव्वाच्या सव्वा फीस आकारली जाते. त्याचप्रमाणे शाळेत शिकवायला शिक्षक असूनही वेगळे शिकवणी वर्ग लावणे जणू अत्यावश्यक झाले आहे!

आजच्या काळात आपल्याला सर्व शाखेतील तसेच संगणकीय, वैद्यकीय आणि इतर प्रकारचे शिक्षण घेणे सहजतेने उपलब्ध आहे . मात्र त्यासाठी आपली आर्थिक बाजू कशी आहे यावरच सगळं काही अवलंबून असते! साने गुरूजींसारखे मोफत शिक्षण देणारे आणि अत्यंत तळमळीने शिकवणारे आदर्श शिक्षक आज शोधूनही सापडणार नाही हीच आपल्या समाजाची खरी शोकांतिका आहे! त्यामुळे आर्थिक बाजूने कमजोर पण अतिशय तल्लख बुद्धीची हुशार मुले शिक्षणापासून वंचित राहणार की काय, अशी आजची दयनीय स्थिती आहे. 

तसेच आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकातील ठराविक माहिती काही  ठराविक वेळेत पुन्हा उतरवून काढणे याला आजकाल परीक्षा म्हटले जाते. पुस्तकाच्या बाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची मुभा आजकाल विद्यार्थ्याला आणि शिक्षकालाही नसते. त्यामुळे विद्यार्थ्याची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही. आज पदव्यांना अवास्तव महत्व प्राप्त होवून त्या मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु असल्याचे जाणवते आहे. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवणे ही गोष्ट आज दुर्लभ झाली आहे. दिवसेंदिवस महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा मात्र  वेगाने घसरत आहे. आज वाढत्या औद्योगिकीकरणाच्या परिस्थितीत व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची खरी गरज आहे. परंतु ते न करता आज पुस्तकी शिक्षणावरच जास्त भर दिलेला आढळतो. व्यक्तीविकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यास नृत्य, गायन, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलाविभागांचाही शिक्षणात अंतर्भाव करायला हवा असे वाटते. मात्र या विषयांकडे अजूनही आपल्याकडे उपेक्षेने पाहिल्या जाते हे दुर्दैवच! 
 आजच्या शिक्षणामुळे मनुष्य सुशिक्षित होतो, उच्च विद्याविभुषित होईल पण तो सुसंस्कृत होईलच असे नाही. वास्तविक पाहता  शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती सुसंस्कृत असायला हवी. दुर्दैवाने तसे चित्र आज फारसे दिसत नाही. उलट आजकाल शिक्षित माणसे आत्मकेंद्रित, स्वार्थी व संकुचित वृत्तीची झालेली आढळतात. हुंड्याची राक्षसी प्रथा सुशिक्षितांमध्येच आज मोठ्या प्रमाणात आढळून येते. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरी त्याची पत्नी ही गृहलक्ष्मी मानली जाते. काही सुशिक्षितांमध्ये घरी येणारी नववधू ही केवळ माहेराहून खूप मोठा हुंडा घेवून येणारी व्यक्ती असेच समजले जाते. कोणताही मोठा त्याग करण्याची वेळ आली तर अडाणी, अशिक्षित माणूस मागचा- पुढचा विचार न करता कर्तव्य भावनेने त्याग करतो. उलट अशा प्रत्येक गोष्टीचे स्वार्थासाठी भांडवल करण्याची वृत्ती सुशिक्षितातच आढळते. आर्थिक गुन्हेगारीचे प्रकार व प्रमाण सुशिक्षितांतच अधिक आढळतात. आजच्या शिक्षणपद्धतीची ही शोकांतिकाच आहे!
 शिक्षणाच्या बाबतीत अशीच परिस्थिती राहिली तर उद्याच्या काळात आपल्याला भयंकर समस्यांचा सामना लागणार हेे निश्चित! कुणी सांगावे... येत्या काही वर्षात आपल्याकडे शाळा आणि महाविद्यालयांची संख्या कमी झालेली दिसू शकते. कारण आज परदेशात आहे  त्याप्रमाणे आपल्याकडे सुद्धा संगणकीय पद्धतीने घरी बसून शिक्षण घेणे सहज शक्य होऊ शकते. मात्र अशाप्रकारच्या शिक्षण पद्धतीत एक मोठा धोका संभवतो. तो हा की, ज्याची आर्थिक स्थिती हलाखीची आहे त्याला हे खर्चिक  शिक्षण घेणे परवडणार नाही! त्यामुळे गोरगरीबांची मुले, मग ती हुशार असली तरी अत्याधुनिक शिक्षणापासून भविष्यात दुर्दैवाने वंचित राहणार ही भीती आहेच! 
आजच्या अत्यंत खर्चिक शिक्षणामुळे आणि कधी नव्हे इतक्या प्रचंड स्पर्धेमुळे पालकसुद्धा द्विधा मन:स्थितीत असल्याचे आढळून येतात. त्यामुळे होतं काय की, ज्यांची मुलं अभ्यासात "सो सो" असतात असे पालक अतिशय तणावग्रस्त अवस्थेत वावरताना दिसतात. तरीही हल्ली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला बरे दिवस आल्याने एक आशेचा किरण आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. शिक्षक वर्गात शिकवताना नेहमी म्हणतात, 'आजचे विद्यार्थीच उद्याचे राष्ट्र प्रणेते होऊ शकतात' .... पण त्यासाठी आवश्यकता आहे आपल्या शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल करण्याचा! तसेच  देशातील निरनिराळ्या शाळा, महाविद्यालयात आकारण्यात येणारे अव्वाच्या सव्वा शिक्षण शुल्क कमी करून ते एकसमान पातळीवर कसं आणता येईल याचाही गंभीरपणे विचार करून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची आज खरी गरज आहे! आपण आशा करूया ते दिवस लवकरच बघायला मिळतील ... वो सुबह जरूर आयेगी!!
विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे


स्वावलंबन आणि शिस्त

स्वावलंबन आणि शिस्त

 एक कथा आहे... एक मानवी शरीर असतं. त्या शरीराला डोळे, कान, हात, पाय असे विविध अवयव असतात. काही दिवसांनी या अवयवाचा अहंकार जागृत होतो. त्यांना वाटतं, आपल्यामुळेच हे अख्खं शरीर काम करतं. डोळ्यांना वाटतं, माझ्यामुळेच हे शरीर बघू शकतं. मी नसलो तर शरीर काम करणार नाही. कानांना वाटतं... माझ्यामुळेच शरीर ऐकू शकतं, मी ऐकणं बंद केलं तर शरीर काम करणार नाही. हातांना वाटतं, मीच सगळी कामे करतो. माझ्यामुळेच शरीराचं कामकाज चालतं. तसेच पायांना वाटतं, मीच सगळ्या शरीराचा भार सोसतो. त्यामुळे माझ्याशिवाय शरीर काम करूच शकत नाही. अहंकाराने पीडित झालेले सगळे अवयव काही दिवसातच आपापली कामे करणं बंद करतात. शरीर अगदी निपचित पडून राहतं. शेवटी शरीरात उरतो, तो फक्त प्राण ! मग प्राणालाही वाटतं, आता या निपचित पडलेल्या शरीरात आपला काय उपयोग? क्षणार्धात प्राण सुद्धा शरीराचा त्याग करून निघून जातो, आणि शरीर मृतप्राय होतं !

उपनिषदातील या कथेप्रमाणेच आपल्याला मिळालेले हे सुंदर जीवन जगण्यासाठी स्वावलंबन आणि शिस्त जणू 'प्राण'च आहेत. आपल्या रोजच्या जगण्यात स्वावलंबन नसेल तर आळसामुळे आपले जगणे निरस झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच आपल्या वागण्यात शिस्त नसेल तर या सुंदर जीवनाचा आपण पुरेपूर आनंद उपभोगू शकणार नाही! त्यामुळे स्वावलंबन आणि शिस्तीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे याबाबत कुणाचंही दुमत नसावं. 

आधीच्या काळात म्हणजे आधुनिक सुखसोयी सहजतेनं  उपलब्ध होण्यापूर्वी आपल्याकडे बहुतेकांचा स्वावलंबनाकडे ओढा होता. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापलं काम अगदी मन लावून करायची. घरातील पाणी भरणं, दूध आणणं, बाजारातून रोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आणणं आणि इतर किरकोळ कामे स्वतः करण्यावर भर होता. परंतु आज परिस्थिती अशी आहे की माणूस नको इतका परावलंबी झाला आहे. त्यामुळे पालकच आळसपणा करत असतील तर त्यांची मुलंसुद्धा परावलंबी होणारच! आजकाल घरोघरी आपण बघतो, मुलांना सगळं कसं हातात हवं असतं. घरून अगदी चार पावलांवर जायचं असलं तरी त्यांना गाडी हवी असते. काही घरात तर स्वतः पालकच आपल्या मुलांचे 'होमवर्क' करून देताना दिसतात. हे कुठंतरी थांबायला हवं. आजच्या पिढीला पालकांनी तसंच शिक्षकांनी स्वावलंबनाचे धडे देणं हे कधी नव्हे इतकं आज नितांत गरजेचं झालं आहे.

"आधी केले मग सांगितले!" किंवा "केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे! " या उक्तीनुसार पालकांनी स्वतःच्या कृतीतून स्वावलंबनाचा आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवणं आजघडीला अत्यंत गरजेचं आहे. कारण मुलं ही अनुकरणप्रिय असतात. घरातील आईवडिल जसे वागतील,  त्याप्रमाणेच त्यांची मुलंही आचरण करणार हे निश्चित! आजची परिस्थिती जर बदलली नाही तर येणाऱ्या काळात आपल्याला खूप भयंकर समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे जास्त उशीर न करता आजच्या सुजाण पालकांनी आपल्या मुलांना स्वावलंबनाचं महत्त्व पटवून देणं, त्याचे फायदे त्यांच्या लक्षात आणून देणं हे आपलं आद्य कर्तव्यच समजायला हवं. तसंच त्याबाबतचं गांभीर्य ध्यानात घेऊन सतत पाठपुरावा करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी घरी असताना मुलांसमोर तरी आपला मोबाईल प्रयत्नपूर्वक स्वतःपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. तसेच मुलांसमोर जास्त वेळ टीव्ही न बघता एखादं पुस्तक किंवा मासिक, वर्तमानपत्र वाचनात वेळ घालवला तर मुलंही उत्सुकतेनं तुमचं अनुकरण करतील. यासाठी निश्चितच पालकांना आपला वेळ द्यावा लागणार आहे पण आपल्या मुलांकरीता तसा प्रयत्न करायला तरी हरकत नसावी!

एकदा का मुलांना स्वावलंबनाची सवय जडली की मग जगण्याला शिस्त लागायला वेळ लागणार नाही. पर्यायानं त्यांच्यात सकारात्मक वृत्ती वाढणार हे वेगळं सांगायला नको. त्यासाठी अगदी लहानपणापासूनच मुलांना योग्य वळण लावणं, निदान पालकांनी तसा प्रयत्न करणं आजच्या परिस्थितीत खूपच आवश्यक आहे. आपण बघतो, आजकाल घराघरात मुलं त्यांच्या अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि मग सकाळी उठायला त्यांना नऊ दहा वाजतात. उलट रात्री लवकर झोपून पहाटे उठणं कधीही चांगलं! कारण पहाटे केलेला अभ्यास जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतो हा अनेकांचा अनुभव आहे. त्यासाठी मुलांना अगदी लहानपणीच सकाळी लवकर उठण्याची सवय ( शिस्त ) लावणं तसेच उठल्यावर स्वतःच्या पांघरूणाची घडी घालायला लावणं हे शिस्त लावण्याच्या दृष्टीने गरजेचं वाटतं. सुरूवातीला मुलांना थोडा कंटाळा येणार, नाही असं नाही मात्र हळूहळू मुलं मोठी झाली की त्यांच्या अंगी नीटनेटकेपणा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपली अभ्यासाची पुस्तकं, वह्या आणि इतर वस्तू नीटनेटकेपणानं जागच्या जागी ठेवणं, सकाळी शाळा असल्यास स्वतःच तयारी करणं, शाळेतून परत आल्यावर दप्तर, बूट वगैरे ठराविक जागीच ठेवणं अशा चांगल्या सवयींची शिस्त मुलांना क्रमाक्रमाने तरी लागणारच.  शिवाय त्यांना सकाळचा नाश्ता अन् दूध पिणं झाल्यावर स्वतःची कपबशी विसळणं, एखादा हातरूमाल धुणं, थोडं वय वाढल्यावर कपड्यांची इस्त्री करणं ही कामे सुद्धा त्यांना त्यांच्या कलाने करायला लावली तर ती स्वावलंबी होणारच आणि मग त्यांना शिस्त लागायला वेळ लागणार नाही! 

आजकाल बर्याच घरात एकुलतं एकच मूल असल्याचं बघण्यात येतं. त्यामुळे त्याची आवडनिवडही प्रमाणाबाहेर जपली जाते. त्याचे नको तेवढे लाड पुरवले जातात. जेवण किंवा काही खाण्याच्या बाबतीत 'मूल म्हणेल तीच पूर्व दिशा' असंही घराघरात आढळून येतं. मग हतबल झालेले पालक मूल मोठं झाल्यावर सुद्धा, ते हट्टी झाल्यानं त्याचे लाड पुरवतात. अशाप्रकारे त्या लाडोबाचेच ऐकत गेल्यास पालकांची अवस्था दयनीय व्हायला वेळ लागत नाही. हे सर्व थांबावं असं वाटणं साहजिकच आहे. मात्र त्यासाठी पालक स्वतः सद् वर्तनी असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच तो आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून सुसंस्कारित होण्याच्या दृष्टीने त्यांना छोट्याछोट्या गोष्टीतून शिस्त लावू शकतो. चांगल्या सवयी लावू शकतो. 'आळस हा आपला पहिल्या नंबरचा शत्रु आहे' हे मुलांच्या मनावर बिंबवू शकतो!

अशाप्रकारे मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच योग्य वळण लागले तर त्यांना एकप्रकारची शिस्तही आपसूकच लागणार. मुलं स्वावलंबी झाल्यामुळे त्यांच्यात सकारात्मकताही वाढेल. पर्यायाने त्यांच्यात आत्मविश्वास जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच त्यांना जगण्याची योग्य दिशा लाभणार हे नक्की! मग सर्व दृष्टीने 'मॅच्यूअर्ड' झालेली ही मुलं आपल्या आईवडिलांसोबतच इतर थोरामोठ्यांचाही आदर राखतील हे वेगळं सांगायला नको. त्यांना आपल्या गुरूजनांबद्दल, समाजाबद्दल तसेच आपल्या देशाबद्दल प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत होत राहणार हेही ओघाने आलंच. त्याकरीता पालकांना आवश्यकता आहे ... हे जीवन सुंदर बनवण्यासाठी मुलांना स्वावलंबन आणि शिस्त लावण्याची ... आणि त्यासाठी स्वतःपासून सुरूवात करण्याची!!

..... विनोद श्रा.पंचभाई, वारजे, पुणे
       भ्र.क्र.९९२३७९७७२५

Friday, December 13, 2019

आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का?


आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का? 


आपल्या देशात इंग्रजांच्या काळात एखाद्या भयंकर रोगाची साथ आली की लोक पटापट मृत्यूमुखी पडायचे! पुरेशा वैद्यकीय उपाययोजना नसल्यामुळे सर्वसामान्य जनता  अगदी हतबल व्हायची. त्याकाळात प्लेग रोगाची साथ आल्याने लोकांना जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला होता!  कारण त्यावेळी आजच्यासारख्या आरोग्यसेवा उपलब्ध नव्हत्या, आणि ज्या काही परंपरागत उपचार पध्दती होत्या, त्या सुद्धा तोकड्या पडायच्या. कधीकधी कुचकामी ठरायच्या. नाही म्हणायला इंग्रजी राजवटीच्या अमलाखालील मिशनरी दवाखाने अस्तित्वात होते पण त्यात जायला लोक घाबरायचे!

आज मात्र आपल्या देशात सर्वप्रकारच्या आरोग्यसेवा सहज उपलब्ध आहेत. साथीच्या रोगांवरही प्रभावी उपाययोजना आहेत. मात्र एखाद्या अगदी सामान्य व्यक्तीला कर्करोग, क्षयरोग, ह्रदयविकार यासारखा अतिशय गंभीर आजार अचानक उद् भवला तर तो हवालदिल होतो. कारण अशाप्रकारच्या आजारांवरची उपचारपद्धती अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे आधुनिक सोयीसुविधा असलेल्या खासगी रूग्णालयात उपचार घेण्यापासून सर्वसामान्य माणूस वंचित राहतो! काही सरकारी रूग्णालयात सुद्धा आधुनिक आरोग्यसेवा सुरू झाल्या आहेत. मात्र दुर्दैवाने या रूग्णालयातील बर्याचशा यंत्रसामग्री (उदाहरणार्थ एक्स रे, सिटीस्कॅन मशीन इत्यादी) बंद पडलेल्या असतात आणि ही वस्तुस्थिती आहे! तरीही आपल्या समाजात काही आदर्श डाॅक्टर असेही आहेत, जे अत्यल्प दरात आरोग्यसेवा देण्यासाठी तत्पर असतात. परंतु त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नगण्य आहे!  

   मध्यंतरी पुण्यात एका कार्यक्रमात आरोग्य विषयक व्याख्यान ऐकण्याचा योग आला. तेथे एका तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली.... जागतिक आरोग्य संघटनेच्या ( World Health Organization ) एका सर्वेक्षणानुसार येत्या काही वर्षात भारतीय उपखंडात तब्बल ८३ टक्के लोकांना कर्करोगाची लागण झालेली असणार अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. एवढ्या झपाट्याने या कर्करोगाचा भस्मासूर आपल्या देशात पसरतो आहे. हा खरोखरच अतिशय काळजी करण्याचा विषय आहे. त्यावेळी त्यांनी याचे कारण स्पष्ट करताना म्हटले, 'भारतीय नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमची आजची अत्याधुनिक जीवन शैली!' हे अगदी खरं आहे आणि या बदललेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आज सर्वत्र दिसून येत आहेत. 

आज आपण बघतो, आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची जीवनशैली त्यांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार सतत बदलत असते. एवढंच कशाला सामान्य लोक सुद्धा आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे यातच धन्यता मानतात. त्यामुळे दिवसभराचे नियमित वेळापत्रक कोलमडून जाते. हे सर्व आजारी पडल्यावरच आपल्या लक्षात येते. मग डाॅक्टर औषध देताना बजावून सांगतातही... औषधं वेळच्या वेळी घ्या, भरपूर पाणी प्या. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा पाळा. सकाळी लवकर उठून फिरायला जा. योगासने, व्यायाम करा वगैरे वगैरे! मात्र आपण याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. काही न खाता औषध घेणे, थोडं बरं वाटलं की परत औषध न घेणे म्हणजेच औषधाचा डोस पूर्ण न करणे, घरचे सात्विक जेवण न करता बाहेरचे अर्बटचर्बट खाणे असले प्रकार आपल्याला आजकाल घरोघरी बघायला मिळतात. अशा प्रकारामुळे परत उलटून ताप येतो! म्हणजेच काय आपणच आजाराला निमंत्रण देण्यासारखा हा प्रकार असतो. कधीकधी तर हा साधारण वाटणारा ताप डेंग्यू सारख्या एखाद्या गंभीर आजारात सुद्धा रूपांतरित होण्याचा धोका असतो. मग सुरू होते एक जीवघेणी धावपळ, आर्थिक अंदाजपत्रक कोलमडल्यामुळे त्यासाठी करावा लागणारा आटापिटा, आजारी माणसासोबतच स्वतःच्या तब्येतीची काळजी! या सर्व घाईगडबडीत होतं काय की घरातील कर्त्या माणसाला अतिशय खंबीर राहावं लागतं. स्वतःची मानसिक स्थिती, मनाचा तोल ढासळू न देता धैर्याने एकंदर परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला सज्ज राहावं लागतं. त्यात तो कमी पडला आणि समजा त्यावेळी दुर्दैवाने मृत्यू सारखी अप्रिय घटना घडली तर घरातील हा कर्ता माणूसच मानसिक रूग्ण होऊ शकतो! त्यासाठी आपण आपल्या आरोग्याबाबत सदैव जागरूक राहणे आज नितांत गरजेचं आहे.

आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणे अनिवार्य झालेलं आहे. त्यासाठी पुरेसा व्यायाम करणे, जेवणाच्या वेळा पाळणे, बर्गर - पिझ्झा सारखे फास्ट फूड टाळणे, सकाळी लवकर उठणे, रात्री जागरण न करता वेळेवर झोपणे अत्यंत गरजेचं आहे. आजकाल आपण बघतो, व्यायामासाठी जिकडेतिकडे  'जिम' चे पेव फुटलेले आहे. अशा या जिममध्ये तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊ शकता. समजा सकाळी जमलं नाही तर सायंकाळी तेथे जायचा पर्याय खुला असतो. एका मर्यादेपर्यंत ते ठीक आहे पण आपल्या शरीरासाठी व्यायाम हा नियमितपणे करायला हवा आणि तोही आरोग्याच्या दृष्टीने सकाळच्या वेळी करणे जास्त हितावह आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र आजकाल जो तो आपल्या मनाला येईल तसेच वागताना दिसतो. आता हेच बघा ना, अनेक जण सकाळी लवकर उठून फिरायला जाताना दिसतात. मात्र बहुतेक लोक मोबाईल जवळ बाळगतात. कित्येक जण तर अगदी कानाला हेडफोन लावून फिरताना दिसतात. कमीत कमी फिरायला जाताना, व्यायाम करताना तरी मोबाईलचा मोह टाळायला हवा असं वाटतं, जेणेकरून त्यावेळी एकाग्रता साधणे शक्य होऊ शकते. कारण योगासने, प्राणायाम करताना एकाग्रता साधणे खूप महत्त्वाचे असते. त्याचा आपल्या आरोग्यावर अनुकूल परिणाम होण्यासही मदत होते. 

सतत वाढणारी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची संख्या, निरनिराळ्या कारखान्यांचा धूर व दूषित पाणी तसेच प्लॅस्टिकचा बेसुमार वापर यामुळे वायुप्रदुषण व ध्वनिप्रदुषण कमालीचे वाढले आहे. त्याचप्रमाणे 'ग्लोबल वाॅर्मिंग'च्या धोक्याची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहेच! या कारणांमुळेही आज सर्वसामान्य माणसाची प्रतिकार शक्ती कमी कमी होत चालली आहे यात शंका नाही. म्हणूनच कधी नव्हे इतकी आज आपल्या आरोग्याची काळजी घेणे, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आजघडीला अतिशय गरजेचं आहे. कोणातरी तज्ज्ञाने म्हटलेच आहे..."आरोग्यदायी शरीरातच चांगले मन वास करते! " त्याप्रमाणे आपणही त्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करूया आणि आपल्या आरोग्याबाबत सदैव जागरूक राहूया!!

आवो कदम से कदम मिलायेंगे सभी!
कल की राह ना देखो, आज और अभी!!

...विनोद श्रा. पंचभाई , पुणे
   भ्र.क्र. ९९२३७९७७२५




रामदासी संप्रदाय : एक अनुभूती


रामदासी संप्रदाय ... एक अनुभूती

आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. अनेक जातींचे, धर्मांचे लोक येथे गुण्यागोविदानं वावरताना दिसतात. तसेच विविध प्रकारचे संप्रदाय एकमेकांचा आदर राखून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपापली मार्गक्रमणा करताना आढळतात. आपल्या देशात गणेशोत्सवासारखे हिंदूंचे सण साजरे करत असताना मुस्लिम धर्मबांधव तसेच इतर जातिधर्माचे लोक सुद्धा त्यात हिरीरीने भाग घेतात. त्याचप्रमाणे मुस्लिम धर्माची रमजान ईद असो किंवा ख्रिस्ती लोकांचा सण ख्रिसमस असो, त्याच असंख्य हिंदू बांधवही सम्मिलीत होताना दिसतात. निरनिराळ्या ईफ्तार पार्ट्यांच्या आयोजनाच्या वेळी अगदी सामान्य माणसापासून ते अनेक नेते अभिनेते त्यात हजेरी लावतात. त्यावेळी तेथे विविध जातीधर्माचे लोक आढळतात. या विविधतेचे कारण म्हणजे संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ ठरलेली आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचे उत्तमप्रकारे जतन करण्यासाठी आपल्याला लाभलेली थोर संत परंपरा !   

'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती। देह कष्टविती परोपकारे॥' तसेच  'आधी केले मग सांगितले' या उक्तीनुसार समर्थ श्री रामदास स्वामी यांचा रामदासी संप्रदाय आपल्याकडे सर्वश्रुत आहे. या संप्रदायाचे नेमके स्वरूप काय, संप्रदायाचे कार्य आणि वैशिष्ट्ये कोणती त्याचप्रमाणे संप्रदायाची पुढील यशस्वी वाटचाल कशी झाली याबाबतची इत्यंभूत माहिती "रामदासी संप्रदाय : एक अनुभूती " या पुस्तकात सविस्तरपणे दिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे स.भ. डाॅ. भास्कर गिरिधारी यांनी मार्गदर्शित केलेला प्रबंध असून विलक्षण पुस्तकाचे लेखन डाॅ. कु. साधना दिगंबर कुलकर्णी यांनी केले आहे. 

या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने समर्थ रामदास स्वामी यांच्या भव्यदिव्य कार्याची सामान्य वाचकांना खरी ओळख करून दिली आहे. तत्कालीन रूढींचा त्याग करून रामदासी संप्रदायाने उच्चवर्णीयांनाच नव्हे तर समाजातील निरनिराळ्या जातीतील स्त्री पुरूषांना सुद्धा प्रवेश दिला. इतकेच नव्हे तर या विशाल संप्रदायात मध्यमवर्गीय लोकांबरोबरच समाजातील श्रमिक व दलितांना सुद्धा समाविष्ट करून घेतले. ही एक सामाजिक क्रांती असल्याने रामदासी संप्रदायाने आपल्या समाजमनाची जागृतीच केली असं म्हणावं लागेल. पूर्वीच्या काळात अनेक संप्रदाय अस्तित्वात होते पण त्या त्या संप्रदायाची व्याप्ती मर्यादित होती असं आपल्या लक्षात येते. मात्र लेखिकेच्या संशोधनानुसार आजही जोमाने कार्य करणारे समर्थांचे एकूण ६२ मठ अस्तित्वात आहेत. तसेच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवणार्या एकूण २० संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या मार्फत सामाजिक कार्यासाठी आर्थिक पाठबळ सुद्धा पुरवले जाते. एकूणच विधायक, सेवाभावी कार्यासाठी मठ आणि संस्था सतत  कार्यरत असतात!

 ''रामदासी संप्रदाय : एक अनुभूती'' या पुस्तकात समर्थांच्या पूर्वी असलेल्या महाराष्ट्रात प्रचलित असलेले विविध संप्रदाय व त्यांचे स्वरूप, रामदासकालीन समाज जीवनाचे स्वरूप, रामदासी संप्रदायाची निर्मिती - प्रेरणा व स्वरूप, संप्रदायाची आचारसंहिता , तत्त्वज्ञान आणि साहित्यसंपदा, रामदासी संप्रदायकृत लोकशिक्षण व जनसंघटन, संप्रदायाची वाटचाल अशाप्रकारची सविस्तर  माहिती एकूण सहा प्रकरणात वाचायला मिळते. यात आपल्या देशाची समर्थकालीन धार्मिक स्थिती, महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती तसेच त्याकाळातील एकंदरीत आर्थिक स्थिती प्रकर्षाने नमूद केलेली आहे. तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या थोडक्यात चरित्राचाही वाचकांना लाभ घेता येऊ शकतो. 

' वारकरी पंथ हा एक वैदिक धर्मांतर्गत पंथ आहे. तो वैदिक धर्माविरुध्द बंड न पुकारता मूळच्या भागवत धर्माला उजाळा देण्यासाठी जन्माला आलेला आहे. या संप्रदायातील संतांनी वेदांचे प्रामाण्य मान्य केले आहे. केवळ वैदिक धर्माला उजाळा देणारा हा पंथ नव्हे तर श्रद्धा, निखळ नामस्मरण स्वरूप भक्ती या पायावर उभारलेला हा धर्म आहे' अशाप्रकारचे 'वारकरी संप्रदाया'बाबतचे विचार लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून भक्त पुंडलिक यांना ओळखले जाते. संत निवृत्तीनाथांनी आपल्या पुढील अभंगात पुंडलिकाच्या परंपरेचा उल्लेख करताना म्हटलं आहे...
"प्राणिया उध्दार सर्व हा श्रीधर। ब्रह्य हे साचार कृष्णमूर्ती।
ते रुप भीवरे पांडुरंग खरे। पुंडलिक सौरस पुरवीत.।
युगे अठ्ठावीस उभा ऋषिकेश। पुंडलिक सौरस पुरवीत।
निवृत्तीचे गुज पांडुरंग बीज। विश्वजन काज पुरे कोडे।। "

तसेच संत जनाबाईंनी आपल्या अभंगात पांडुरंगाचं वर्णन करताना म्हटलं आहे...
"भक्तामाजी अग्रगणी। पुंडलिक महामुनी.।
त्याच्या प्रसादे तरले। साधुसंत उध्दरिले.।।
तेचि प्रसाद आम्हासि। विटेवरी ऋषिकेशी।
पुंडलिक मायबाप.। दासी जनी वंदीपाय।।"

'ग्यानबा - तुकाराम' आणि 'जयजय राम कृष्ण हरी' हे वारकरी संप्रदायाच्या नित्य उपासनेचे मूलमंत्र आहेत. यात 'राम कृष्ण हरी' हा मंत्र विशेष आहे. या मंत्राचा अर्थ ...
राम म्हणजे ह्रदयात रमविणारा, कृष्ण आकर्षित करणारा व हरी म्हणजे ऐक्य रुप असणारा परमात्मा असा 'रामकृष्णहरी' 
अशाप्रकारे वारकरी संप्रदायाबद्दलची विस्तृत माहिती आणि वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान, आचारधर्म, सांप्रदायिक भूषणे,वाङमय, कीर्तन परंपरा इत्यादींचं वर्णन लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. यात
ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, संत नामदेव, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत जनाबाई या संतांच्या अभंगातील ओव्यांचा आनंद वाचकांना मिळतो. तसेच दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, महानुभाव संप्रदायाची माहिती सुद्धा या अभूतपूर्व पुस्तकात विशद केलेली आहे.


श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या घराण्याचा पूर्व इतिहास, समर्थ चरित्राची रूपरेषा, समर्थांची बाललीला व शिक्षण, त्यांचे लग्न मंडपातून पलायन, समर्थांचे तीर्थाटन व समाज अवलोकन तसेच त्यांच्या दिव्य कार्याचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. समर्थांनी एकटयासाठी नव्हे तर देशासाठी व धर्मासाठी आपला देह झिजवला. तीर्थाटनाचा आनंद म्हणजे ठायी ठायी संत सज्जनांना भेटून कष्टाचा व श्रमाचा परिहार होतो, दृष्टीत व्यापकता येते. मेरुस्वामी यांनी समर्थांच्या तीर्थाटनातील प्रवासाचं वर्णन पुढील प्रमाणे केलं आहे....
"प्रारब्धयोगे वनांतर.। विरक्तीदशेने दुर्धर।
नाना स्थलांतरे दुस्तर.। संचरती तेथे.।।
विरक्तीचे आंगी वारे। उदास वृत्तीने वावरे।
वस्तीने गिरीकंदरे। वसविली बहू॥
नाही क्षुधेतृषेचे देही भान। नाही विश्रांती निद्रा जाणं
वायूसारिखे संचरण.। होत असे स्वइच्छा ॥
शरीर उपजीविकाजीवन। सदोदित रघुनंदन।
निजप्राणाचाही प्राणमय नित्य तृप्तीने असे.॥"

 समर्थांचे तीर्थाटन हे देशाटनच होय . यात्रेत आलेला अनुभव म्हणजे सर्व समाजाची अवस्था! समर्थांनी हर तीर्थाटन 'पायी तीर्थयात्रा मुखी हरीनाम' अशा केल्या नाहीत तर सर्व देवाच्या ठिकाणी माझा रामच आहे या हेतूने केल्या.
"कर्ता राम मी नव्हे आपण। ऐसे सगुण निवेदन.।
निर्गुणी ते अनन्य। निर्गुणचि होईजे.॥"

या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने रामदासी संप्रदायात समर्थांनी जी चतु:सूत्री सांगितली आहे, ती म्हणजे हरिकथा निरुपण, राजकारण, सावधपणा, साक्षेप याबरोबरच संप्रदायाच्या शिकवणूकीतून प्रपंच व परमार्थ, अध्यात्म व व्यवहार, धर्मकारण व राजकारण या सर्व विषयांवर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे हे पुस्तक ज्ञानप्रेमी उपासकांसाठी तसेच सर्व सामान्य वाचकांना सुद्धा अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. त्यादृष्टीने 'रामदासी संप्रदाय : एक अनुभूती' सगळ्यांकडेच संग्रही असावे असे वाटते. एवढे उपयोगी आणि सुंदर पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!!

.....विनोद श्रा. पंचभाई 










 




संताजी जगनाडे महाराज आणि अभंगगाथा



संताजी जगनाडे महाराज आणि अभंगगाथा 

आपल्या देशात असे अनेक दिव्य महापुरूष होऊन गेलेत, ज्यांनी अनमोल कर्तृत्वाने जगाच्या इतिहासात आपले नाव कोरलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला थोर संत महंतांची परंपरा लाभली आहे. संताना जात नसते. संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठीच असते. श्ज्ञानोबा माऊली, तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सावता माळी, गोरा कुंभार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशाप्रकारे अनेक संतांनी त्यांच्या काळात सर्वसामान्य जनतेला मोलाचे प्रबोधन करून वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. याच परंपरेतील एक संत आहेत संताजी जगनाडे महाराज! संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून त्याकाळात त्यांनी समाज सुधारणेचे काम केले आहे. 

 संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी पुणे जिल्ह्यातील चाकण जवळच्या सुदुंबरे या छोट्याशा गावी  झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठोबाशेठ जगनाडे  तर आई सुदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई! त्याकाळी  संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेलाच्या धंद्याचा परिचय करून दिला, कारण त्यांचा मुख्य व्यवसाय होता घाण्याचे तेल काढणे. त्यांचे लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील यमुनाबाई बरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. 

संताजींची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबांच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दीर्घ आजाराने वारल्या. संताजींना  किर्तनात पाहताच तुकाराम महाराजांना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्याकारणाने त्यांना संताजीबद्दल प्रेम, आपुलकी वाटू लागली. त्यामुळे तुकोबांनी संताजींना आपल्या सानिध्यात ठेवले. तुकाराम महाराजांचे लेखक म्हणुन संताजी महाराजांच्या ओव्या व भजने लिहिलेली आढळुन येतात. वास्तविक पाहता तुकाराम महाराजांना अशा प्रकारच्या लेखनिकाची गरज होती असे नाही. ते स्वत: उत्तम प्रकारे लिहू व वाचु शकत होते. परंतु किर्तनाच्या प्रसंगी तुकोबांच्या तोंडुन निघणारे शिघ्रकाव्य व नवीन अभंग संताजी लिहून ठेवत असत, ही वस्तुस्थिती आहे!

     संताजींनी तुकाराम महाराजांना मनोमन गुरूस्थानी मानले होते. आणि खरंतर त्यांच्यामुळेच तुकाराम महाराजांचा अनमोल साहित्याचा ठेवा आज आपल्याला मिळाला आहे. संताजींचे अक्षर फारच सुंदर होते. तुकोबांचे नवनवीन अभंग ते आपल्या वहीत लिहुन ठेवत असत. हजारो अभंग त्यांनी संग्रहीत करून ठेवले होते. संताजींची  स्मरण शक्ती खरोखरच वाखणण्यासारखी होती. त्यांनी स्वत: रचलेले घाण्याचे अभंग आजही बर्‍याच ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागातून ऐकायला मिळतात. अगदी तरूण असताना पासूनच संताजी महाराजांना तुकाराम महाराजांचे किर्तन एैकण्यास मिळाले. आणि तेव्हापासूनच त्यांना किर्तनाची ओढ निर्माण झाली व त्यातून ते तुकाराम महाराजांकडे आकर्षित झाले जणू तुकाराम महाराजांशी त्यांचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंधच होते!

    तुकाराम महाराजांचा नियमित सहवास व मार्गदर्शनामुळे संताजींची जडणघडण अगदी व्यवस्थितपणे झाली. विशेष म्हणजे  मोगली आक्रमणाच्या वेळेला तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या, किर्तनाच्या आणि कवितांच्या वह्यांचे रक्षण संताजी महाराजांनी जिवाची पर्वा न करता केले.  चाकणच्या किर्तनानंतर संताजी नेहमी सतत तुकाराम महाराजांच्या सहवासात राहू लागले. त्यांचा   सहवास सतत मिळत गेल्यामुळे तुकारामांच्या अभंगांचे लेखनही रोज होऊ| लागले. महाराजांच्या सहवासाचा आणि किर्तनाचा संताजींच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. त्यामुळे घराकडे व संसाराकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले. 

रोज होणार्‍या तुुुकोबांच्या किर्तनातून आणि अभंगातून सामान्य माणसांच्या समस्यांचे निवारण होत होते. त्यामुळे आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जाणत्या पंडितांकडे सामान्यजन जाईनासे झाले. परिणामी त्यांचे नुकसान होऊ लागले. त्यांना दक्षिणा मिळणे बंद झाले. आणि मग सरतेशेवटी त्याचा सर्व राग तुकाराम महाराजांवर निघाला. त्यांच्या विरोधात धर्मसभा घेऊन धार्मिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.  त्याठिकाणी रामेश्वर भट हे स्वत: न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. त्यांनी आपला निर्णय जाहीर केला...  "तुकारामाला गाथा लिहिण्याचा अधिकार नाही. कारण तो शुद्र आहे. कीर्तन सांगणे व पाया पडून घेण्याचा अधिकार त्याला नाही. त्याची संपत्ती जप्त करून गावातून हाकलून द्यावे आणि त्याच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकाव्या." अशाप्रकारचा निकाल स्वत: रामेश्वर भटांनी दिला. त्यावेळी  तुकाराम महाराजांना  मारहाणही झाली. त्याचे संताजी महाराज साक्षीदार आहेत. त्याकाळात त्यांनी तुकाराम महाराजांना एकटे कधी सोडले नाही. त्यामुळे संताजी महाराजांना सुद्धा बर्‍याच वेळा धमक्या देण्यात येत होत्या. त्यांच्यावर अनेक वेळा हल्लेही झालेले आहेत. तरीही संताजी महाराज घाबरले नाहीत. रामेश्वर भटांनी तुकोबारायांच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याचा निकाल तर दिलाच होता. परिणामी आयुष्यभर कष्ट करून अभंगांचे लिखाण केलेल्या सर्व वह्या धार्मिक दबावामुळे पाण्यात बुडविण्यात आल्या!

     संताजी महाराजांची पुढील तेरा दिवसात तहान भूक हरपून आपल्या प्रबळ स्मरणशक्तीच्या जोरावर पुन्हा अभंग लिहायला सुरूवात केली. सर्व अभंग, कीर्तन पुन्हा जसेच्या तसे लिहुन काढले. त्याकाळी  'गाथा इंद्रायणी नदीतून कोरड्या वर आल्या... पांडुरंग प्रसन्न झाला, चमत्कार झाला!' अशा प्रकारचा प्रचार सर्वत्र करण्यात आला. परंतु स्थानिक सामान्यजनांना वस्तुस्थिती माहिती होती. तुकाराम महाराजांच्या गाथेचे रक्षण संताजी महाराजांनी केल्यामुळे त्याकाळात त्यांच्याबद्दल लोकांना फार कौतुक वाटले आणि त्यांच्याविषयी आदर, प्रेम, श्रद्धा निर्माण झाली. संताजी महाराजांनी दिलेले योगदान हे आपल्या समाजासाठी फार कौतुकास्पद आहे. त्यांचे मार्गदर्शन अभंगांच्या माध्यमातून केलेले उपदेश आजही आपल्याला त्यांची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. ते सांगायचे, "किर्ती शिल्लक राहील असे काम करा. त्यासाठी आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे. त्याचा उपयोग करा ! सावध व्हा, मृत्यू अटळ आहे. तो कोणत्याही क्षणी येईल. त्याला सामोरे जा ! या जीवनाचा सदुपयोग करा. एकदा मनुष्य जन्म संपला की तो पुन्हा येणार नाही!" असा विचार संताजी महाराजांनी मांडला.

     त्यानंतर वयाच्या ७६ व्या वर्षी १७०० साली मार्गशिर्ष वद्य १३ ला संताजी महाराजांचे निधन झाले!  निधनानंतरच्या निघालेल्या अंत्ययात्रेत भजनांच्या दिंड्या चालत होत्या. त्यांच्या देहावर हार, फुले, गुलाल, व पैशाची उधळण होत होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात त्यांना निरोप देण्यात येत होता.

             संताजी महाराज समाधिस्त झाल्यापासून सुदुंबरे येथे चाकण, खेड, कडुस, पुणे शहर व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन मार्गशिर्ष वद्य १३ ला. अनेक भाविक तेथे जातात. सर्व ग्रामस्थांच्या मदतीने उत्सव साजरा करतात. त्यावेळी भजन कीर्तन व प्रसादाच्या माध्यमातुन भोजनाचा कार्यक्रम ठेवला जातो.

    तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकर्‍यांपैकी संताजी महाराज हे एक असले तरी तुकारामाच्या खांद्याला खांदा लावून बरेच कार्य संताजी महाराजांनी केलेले आहे. अनेक प्रकारच्या अभंगाची रचना त्यांनी केलेली आहे. संताजी हे भक्तीमार्गी होते हे यावरून सिद्ध होते. संताजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या सानिध्यात सतत राहत असल्यामुळे त्यांनाही पांडुरंगाचा साक्षात्कार झाला होता!

     त्यांच्या कार्याची जाण ठेवून जय संताजी फक्त ओठातुन न बोलता ते पोटातुन निघावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!

  जय संताजी... जय जय रघुवीर समर्थ !!

... विनोद श्रा. पंचभाई.  वारजे, पुणे 
     भ्र. क्र.९९२३७९७७२५