Friday, November 24, 2023

मिशन मून (अपोलो 11 ते चांद्रयान 3)

मिशन मून अपोलो..११ ते चांद्रयान..३ 
        
        आपल्या पृथ्वीपासून हजारो नव्हे तर लाखो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या चंद्राचे सर्वांनाच फार पूर्वीपासून आकर्षण आणि कुतूहल आहे. या विलक्षण कुतूहलाचा विषय ठरलेल्या चंद्रावर पृथ्वीप्रमाणे पाणी असणार का? तेथील पृष्ठभागावर सजीव सृष्टी असेल का? चंद्रावरील वातावरण कशाप्रकारचे असणार? तेथे गुरूत्वाकर्षण असणार का? अशा अनेक प्रकारच्या रहस्यांची उकल करण्यासाठी सोव्हियत रशिया आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी सर्वप्रथम प्रयत्न सुरू केले. त्यादृष्टीने सद्यस्थितीत चीन आणि भारताचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. १४ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने पाठवलेले लूना-२ हे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले खरे... मात्र दुर्दैवाने हे लूना-२ यान तेथेच नष्ट झाले! तरीही यशापयशाचा विचार न करता रशियाने त्यानंतर कित्येक यशस्वी चांद्रमोहिमा राबवल्या. या स्पर्धेत अमेरिकेने सुध्दा मागे न राहता आपले महत्त्वाकांक्षी 'अपोलो अभियान' यशस्वीपणे राबवून अख्ख्या जगावर वेगळाच ठसा उमटवला. त्यांची अपोलो..११ ही चांद्रमोहीम कमालीची यशस्वी ठरली आणि 'नील आर्मस्ट्रॉंग'च्या रूपाने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले मानवी पाऊल टाकण्याचा बहुमान त्यांना मिळाला. तसेच उत्कंठा वाढवणारी चांद्रयान-२ ही भारताची चांद्रमोहीम आपण यापूर्वी अनुभवली आहेच. त्याचप्रमाणे नुकतीच पार पडलेली आणि कमालीची यशस्वी ठरलेली महत्वाकांक्षी चांद्रयान..३ मोहीम अख्ख्या जगासाठी अभिमानाचा विषय ठरली आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावरील पृष्ठभागावर भारताने चांद्रयान..३ चे विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर ( बग्गी ) अलगदपणे उतरवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या निमित्ताने चंद्राच्या दक्षिण धृवावरील पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. भारताच्या चांद्रयान.. २ आणि चांद्रयान.. ३ या मोहिमांचा अगदी सुरुवातीपासूनचा रोमहर्षक प्रवास तसेच रशिया, अमेरिका आणि चीन या देशांच्या उत्सुकता वाढवणाऱ्या चांद्रमोहिमांच्या विलक्षण सफरींचा सविस्तर आढावा 'मिशन मून' या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच गटातील शालेय विद्यार्थ्यांसोबतच पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचक या सर्वांसाठी 'मिशन मून' हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार याची खात्री आहे. 'मिशन मून अपोलो..11 ते चांद्रयान..3' या प्रेरणादायी पुस्तकासाठी साजेसे मुखपृष्ठ पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार प्रशांत भारताल यांनी रेखाटलं आहे. तसेच अंतर्गत सजावट आणि अक्षर जुळवणी संगीता जावळकर यांनी केली आहे. या दोघांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या पुस्तकासाठी सुरुवातीपासून सतत पाठपुरावा करणारे आणि मेहनत घेणारे प्रकाशक मित्र शैलेंद्र कदम यांना मनापासून धन्यवाद देतो.
 ... विनोद श्रा. पंचभाई
 भ्रमणध्वनी 9923797725

Wednesday, November 22, 2023

श्री गजानन कथासागर... परीक्षण

                                    II श्री ll


 श्री गजानन कथासागर... परीक्षण 

        जगाच्या पाठीवर आजपावेतो कितीतरी बलशाली राजे-महाराजे, सम्राट, सुलतान, हुकूमशहा आले आणि गेले. त्यांची बलशाली सत्ताही कायम न राहता ती धुळीला मिळाल्याचा इतिहास आहे. कित्येकांच्या वारसदारांचं नामोनिशाणही आज अस्तित्वात राहिलं नाही! अख्खं जग जिंकण्याची ईर्षा बाळगून अनेक राज्ये पादाक्रांत करत रुबाबात निघालेला सिकंदर देखील शेवटी अयशस्वी ठरल्यानंतर रिकाम्या हातानंच हे जग सोडून गेला, हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. मात्र या अखिल विश्वावर एकछत्री अंमल कायम टिकून राहिला तो संतांच्या अनमोल विचारांचाच... हे त्रिकालाबाधित सत्य आहे! लौकिकार्थानं अजूनही संतांचंच राज्य या भूतलावर असल्यानं ही चराचर सृष्टी, मानवजात अस्तित्वात आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातील पुढील समर्पक ओव्या वाचल्यावर त्याची साक्ष पटते …

"राजे किती आले, गेले। त्यांचे कायदे नष्ट झाले।

सत्तेचे दरबार उजाडले। परि राज्य चाले संतांचे।।

संतांचा तो प्रचार अमर। अजूनिही लोक-मनावर।

राज्य चालवोनि निरंतर। लाखो जीवां उद्धरितो।।

न लगे सत्तेचा बडगा। नको भयभीतीहि सन्मार्गा।

आपापले कर्तव्य जगा। प्रचारसूर्यचि दाखवी।।"

            लेखक श्री.जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेला विदेही, योगी संत असलेल्या श्री गजानन महाराजांवरील चरित्रात्मक ग्रंथ 'श्री गजानन कथासागर' नुकताच वाचनात आला. हा ग्रंथ वाचताना पदोपदी महाराजांनी आबालवृद्धासाठी केलेल्या अदभूत कार्याचा प्रत्यय येतो. पूजनीय दासगणू महाराज रचित श्री गजानन विजय ग्रंथामध्ये ओव्याच्या स्वरूपात एकवीस अध्यायांचं प्रकटीकरण करण्यात आलं आहे. या एकवीस अध्यायातील ओव्याना अप्रतिम कथांचं स्वरूप देऊन 'श्री गजानन कथासागर'मध्ये कुलकर्णी माऊलीनी भाविक वाचकांसाठी जणू आध्यात्मिक मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून ओघवत्या सुंदर शैलीत लिहिलेल्या या कथा अतिशय वाचनीय झाल्या आहेत.

           शेगाव तीर्थक्षेत्री देविदास पातूरकर यांच्या घरी ऋतूशांतीचा विधी असल्यामुळे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजन झाल्यावर उष्ट्या पत्रावळी पातूरकरांच्या वाड्याबाहेर वडाच्या झाडाखाली टाकल्या जात होत्या. हे वडाचे झाड म्हणजेच श्री गजानन महाराज यांचे प्रकट स्थान! तो दिवस होता 23 मार्च 1878! मार्च महिन्यातील भर उन्हाळ्यातील माध्यन्ह… त्यावेळी एक तेजस्वी युवक वडाच्या झाडाखाली टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्न वेचून खात होता. कदाचित 'अन्न हे परब्रह्म' आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याचवेळी बंकटलाल आगरवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी हे दोन मित्र त्या रस्त्याने जात होते. त्या दोघांचेही त्या युवकांकडे लक्ष गेले. आधी त्यांना युवक वेडसर किंवा भिकारी असावा असे वाटले. मात्र दोघंही धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले असता तो युवक कोणी सामान्य व्यक्ती नसून थोर विभूती असल्याची त्यांना अनुभूती आली…"तो सतेज कांती मनोहर l दंड गर्दन पीळदार l                                                    भव्य छाती दृष्टी स्थिर l भ्रूकुटी ठायी झाली असे ll"  'श्री गजानन कथासागर' या ग्रंथातील हा भावस्पर्शी प्रसंग वाचताना भाविक तल्लीन झाल्याशिवाय राहत नाही आणि सदगदित होऊन नकळत डोळ्यात आसवं उभी राहतात!

          'श्री गजानन कथासागर' या ग्रंथातील दुसऱ्या भागात शेगाव संस्थानच्या अद्वितीय कार्याची माहिती वाचताना 'सेवा हीच खरी साधना' या उक्तीची महती जाणवते! दर्शनार्थी भाविकांसाठी अत्यल्प देणगीच्या स्वरूपात संस्थान मार्फत निवसाची सेवा उपलब्ध आहे. तसेच श्री गजानन महाराज समाधी मंदिर ते बसस्टॅन्ड, रेल्वे स्टेशन आणि आनंद सागर या मार्गावर संस्थानच्या वतीने विनामूल्य बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. संस्थानतर्फे आदिवासी विकास प्रकल्प, अंगणवाडी सेवा प्रकल्प, मुले आणि मुलींसाठी निवासी मतिमंद विद्यालय कार्यरत आहेत. शिवाय गरजूसाठी शाळा, महाविद्यालये, अपंग पूनर्वसन केंद्र, विनामूल्य नेत्रशस्त्रक्रिया अशा अनेक विविध सोयी शेगाव संस्थान तर्फे सातत्याने राबविल्या जातात. श्री गजानन महाराजांची कृपा आणि भाविकांची निस्सीम श्रद्धा यामुळे हे अविरतपणे घडते आहे अशीच संस्थानची धारणा आहे.

           या ग्रंथातील अनेक प्रसंग वाचताना वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाला अशा प्रकारचे प्रसंग अतिशयोक्ती वाटू शकतात. मात्र सिद्धकोटीला पोहचलेले संत, योगी महापुरुष यांच्यासाठी हे सहज शक्य आहे. कोणी त्याला चमत्काराची उपमा देतात तर काही महाभाग अंधश्रद्धा देखील म्हणू शकतात. परंतु जे खरोखरच योगाभ्यासाची महती जाणतात, त्यांनाच योगक्रियेच्या द्वारे घडणारे असे चमत्कारसदृश अनुभव क्षुल्लक वाटतात. सामान्य भाविक मात्र याला श्रद्धारुपी कृपाप्रसाद मानतात, कारण त्यांना अशा विलक्षण प्रसंगाची अनुभूती आलेली असते. ते ती शब्दात व्यक्त करू शकत नाही! आपले भाग्य थोर म्हणून महाराजांचा कृपाप्रसाद मानून स्वतःला धन्य समजतात.

           'श्री गजानन कथासागर' या वाचनीय ग्रंथात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक आलेले असताना त्याठिकाणी गजानन महाराज यांच्या उपस्थितीचा प्रसंग लेखकांनी खूप अप्रतिमरित्या मांडला आहे. त्याचप्रमाणे नागपूरमधील सीताबर्डी भागातील गर्भश्रीमंत व्यक्ती बुटी यांना त्यांच्या गडगंज संपत्तीचा झालेला अहंकार महाराजांनी कोणत्या पद्धतीने उतरवला हे जाणून घेण्यासाठी आणि असे एक ना अनेक भावोत्कट प्रसंग, आश्चर्यचकित घटना अनुभवण्यासाठी या ग्रंथातील कथा प्रत्यक्षात वाचायलाच हव्या.

            लेखक श्री जयंत कुलकर्णी हे स्वतः श्री गजानन महाराजांचे भक्त असल्यामुळे त्यांच्या हातून 'गजानन विजय' या ओवीबध्य ग्रंथाची असंख्य वेळा पारायणे झाली आहेत. त्यामुळे महाराजांच्या कृपाप्रसादनेच 'श्री गजानन कथासागर' हा अप्रतिम कथांचा वाचनीय ग्रंथ प्रत्यक्षात लिहिला गेला अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे. या ग्रंथासाठी महाराष्ट्रचे लोकप्रिय आणि जेष्ठ साहित्यिक श्री.नागेश शेवाळकर यांची अभ्यासपूर्ण आणि प्रवाही प्रस्तावना लाभली आहे. लेखकांनी ग्रंथातील कथा अतिशय साध्या सहजसोप्या भाषेत मांडल्या आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अलंकारिक भाषेचा वापर न केल्यामुळे सर्वसामान्य वाचकांना तसेच भाविकांना सहजपणे या कथाचा आनंदाने रसास्वाद घेत भक्तिरसात चिंब भिजता येईल याची निश्चितच खात्री वाटते. 

             श्री. जयंत कुलकर्णी यांनी दीर्घ कालावधीपासून महाराष्ट्रआतील अनेक वृत्तपत्रात,मासिकात, साप्ताहिकात तसेच निरनिराळ्या दिवाळी अंकात सातत्याने लेखन केले आहे आणि करीत आहेत. त्यांचे स्फूट लेखन, विविध विषयांवरील लेख, वैचारिक तसेच ललित लेख समाजाला आरसा दाखवणारे ठरले आहे. त्यामुळे ते नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. असे असले तरी नुकतेच प्रकाशित झालेले 'श्री गजानन कथासागर' हे त्यांचे पहिलेच पुस्तक आहे. गजानन महाराजांचे आकर्षक मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक शॉपिजेन या आघाडीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले असून ते आता वाचकांसाठी सर्वत्र उपलब्ध आहे. लेखक श्री. जयंत कुलकर्णी यांच्याकडून अनेकानेक उत्तम साहित्यकृतीची अपेक्षा बाळगून त्यांना पुढील साहित्य प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद!

… विनोद श्रा.पंचभाई, पुणे

     भ्र.क्र. ९९२३७९७७२५



 


Tuesday, November 21, 2023

बेफिकीरी नाही बरी!

 "ए आई, आज ना मला सुट्टी आहे. मी जाऊ पियूकडे खेळायला?" संकेत अधीरतेनं म्हणाला.

"अरे थांब जरा, माझं आवरलं की, तुला सोडून येते."

"अगं मी जातो ना एकटाच, इथं जवळच तर आहे पियूचं घर...."

"अरे बाबा, मला माहिती आहे ते, जवळ आहे पण रस्ता ओलांडून जावं लागतं ना.... आणि केवढी रहदारी असते त्या रस्त्यावर!"

"अगं जातो ना मी, तू नकोच काळजी करू... मी व्यवस्थित रस्ता ओलांडतो ना!"

"अरे बाळा, काळजी मी करणार नाही तर कोण करणार? थांब थोडा शांत रहा जरा." आई संकेतला समजावणीच्या सुरात म्हणाली. अशाप्रकारचे प्रसंग आपल्याला नेहमीच घरोघरी बघायला मिळतात.

चिंता करणं किंवा काळजी घेणं हा मनुष्यप्राण्याचा स्वभावधर्म आहे. आईला आपल्या बाळाची काळजी असतेच.. तसेच डॉक्टरला आपल्या रुग्णांची तर शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी लागते! बसचालक असो की रेल्वेगाडीचा चालक असो किंवा विमान चालवणाऱ्या पायलटला पण आपल्या प्रवाशांची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागते. नगरसेवकापासून ते मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या खासदारांना सुद्धा आपल्या मतदार संघातील मतदारांची काळजी घ्यावी लागते... त्यात त्यांचा स्वार्थ असतो हे सांगायला नकोच! प्राणीसुद्धा याला अपवाद नाही. जगाच्या पाठीवरील कुठल्याही प्राणीमात्राला आपल्या पिल्लांची काळजी असते आणि ते साहजिकच आहे म्हणा! काही व्यक्ती इतक्या संवेदनशील असतात, के व्यक्ती इतक्या संवेदनशील जास्त काळजी असक्तःपेक्षा इतरांचीच स्वतःच्या बाबतीत मात्र कमालीचे बाईक चालवताना बहुतांश अनुभव नक्कीच येत असणार, लोकांना एक असताना आपल्या पक्षका साधु पाईत

वाहतुकीचे नियम पाळणे आणि रस्ता ओलांडतानाही काळजी घेणे आवश्यक आहे! कारण आपल्याप्रमाणेच इतरांनासुद्धा त्यांच्या कुटुंबाची काळजी असते ही जाणीव आपल्याला असायला हवी. काही महाभाग कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अगदी बेफाम होऊन सुसाट वेगाने गाड्या चालवताना दिसतात. आपल्यामुळे लोकांना काही त्रास होत असणार हे त्यांच्या गावीही नसते. या अशा प्रकारच्या बिलंदरांना दुसऱ्याबद्दल काही सोयरसुतक नसते आणि स्वतःबाबतही हे लोक कमालीचे बेफिकीर असतात. मग एखाद्या दिवशी जीवावर बेतणारा अपघात झाल्यास पश्चाताप करण्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाहीत! आजकाल बरेच पालक आपल्या



काढायला चुकून आपण विसरलो तर आपली काळजी घेणारे व आपल्याला तो स्टँड काढायची आठवण करून देणारे अनोळखी हितचिंतक हमखास भेटतात. मला वाटतं, अखिल विश्वात आपली सगळ्यात जास्त काळजी करणारे हेच अनोळखी हितचिंतक असावेत नाही का...! त्यांना असंख्य सलाम!


काही महाविद्यालयीन विद्यार्थी कमालीचे संवेदनशील असतात. परीक्षा जवळ आली की त्यांना खूप टेंशन येत असल्याचं जाणवतं ! मग अभ्यासाच्या काळजीपोटी त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होतो. त्यांचा अभ्यास जर वेळेआधी पूर्ण झाला नाही तर ते कुठल्या थराला जाणार याचा काही नेम नसतो. अभ्यास झाला नाही तर त्यांचा भ्रमनिरास होतो. ते खूप लवकर निराश होतात आणि प्रसंगी दुर्दैवाने आत्महत्येच्या आहारी जातात! खरंतर अशा प्रकारच्या विद्याथ्यांना समुपदेशन करणे आवश्यक आहे!


आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेणं जसं आवश्यक आहे तसंच रस्त्यावर वाहन चालवताना आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं सुध्दा अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे


मुलांना शाळेत घेऊन जाण्यापासून तर त्याच्या अभ्यासाची नको तितकी काळजी घेताना दिसतात. काही जणांना तर आपल्या मुलांचं अख्खं होमवर्क पूर्ण करण्याची काळजी घेण्यांचं खूप टेंशन असतं. हे जरा अति होतं, नाही का? करू द्या ना... त्यांचा अभ्यास त्यांना, वेळ पडल्यास तुम्ही मार्गदर्शन करू शकताच ना! तशीही आपल्याकडील स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीमुळे, आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाची काळजी घ्यावीच लागते. आईला ज्याप्रमाणे आपल्या मुलांची काळजी असते, त्याप्रमाणे बरेच प्रामाणिक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेताना दिसतात. शेवटी त्यांच्या शाळेचा निकाल तसंच एकंदरीत दर्जा पण त्यांच्यावरच अवलंबून असतो म्हणा..!

      अखिल विश्वाचं कल्याण होण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी त्या जगन्नियंत्याजवळ पसायदान मागितलं, ते आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी असलेल्या आत्यंतिक काळजीपोटीच! आपणही आपल्या कुटुंबासाठी, समाजातील दीन दुबळ्यांसाठी, आपल्या देशासाठी काळजी असी जाण नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे अशी जाण ठेवायला हवी! मग प्रत्येकाचं जगणं सुसह्य झाल्याशिवाय राहणार नाही.

विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

चाणाक्ष...


          चाणाक्ष...

         दुपारीच सतीशला सरकारी नोकरीची अपॉईंटमेंट ऑर्डर मिळाल्याने तो आज जास्तच खुशीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम मंदिरात जावे व मग सर्व मित्रांना आनंदाची बातमी द्यावी असा बेत त्याने आखला. रात्री जेवण वगैरे आटोपून आपल्या बिछान्यावर तो आडवा  झाला, पण कसचं काय, झोप येईल तर शपथ ! बराच वेळ विचार करण्यात गेला. अंतिम मुलाखतीला जाताना झालेली धावपळ त्याला आठवली. महाराष्ट्र एक्सप्रेसचे रिझर्वेशन वेटींगवर मिळाल्याने जागेसाठी त्याला बरीच खटपट करावी लागली. त्यातल्या त्यात कुठलीतरी मालगाडी रूळावरून खाली घसरल्याने महाराष्ट्र एक्सप्रेस नेहमीपेक्षा तीन-साडेतीन तास उशीराने धावत होती. त्यामुळे सतीशच्या जीवाची सारखी घालमेल सुरू होती. 'आपण वेळेवर पोहचणार की नाही, मुलाखतीसाठी केलेली एवढी तयारी वाया तर जाणार नाही, नाना शंकांनी त्याचे डोके बधीर झाले होते. मात्र सगळ्या संकटांवर मात करून महाराष्ट्र एक्सप्रेस एकदाची पुण्याला पोहचली व सतीशच्या जीवात जीव आला.

    मग रिक्षा करून सतीश के.ई.एम. रूग्णालयाशेजारी असलेल्या मामाच्या घरी पोहोचला पण पाहतो तो काय घराला भलेमोठे कुलूप! त्याने घड्याळाकडे नजर फिरवली, फक्त दीड तास हातात होता. जास्त वेळ न दवडता जवळच असलेल्या संत श्री. गाडगे महाराज धर्मशाळेत येऊन तो तयारीला लागला. तेथेच त्याची भेट राजेंद्र मानकर याच्याशी झाली. योगायोगाने राजेंद्रसुद्धा त्याच्याच गावचा असल्यानं व तोपण मुलाखतीसाठी आल्याचे सतीशला कळून चुकले. सोबतीला राजेंद्र असल्याने त्याला जरा हायसे वाटले. दोघेही सोबतच त्या धर्मशाळेबाहेर पडले व त्यांनी रिक्षाने तडक कार्यालय गाठले. दोघांचेही डोळे घड्याळावरून हलत नव्हते आणि वेळेच्या आत पोहचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. तरीसुद्धा मुलाखतीचे टेंशन मात्र दोघांनाही सारखेच होते. काही वेळाने रिसेप्शनिस्टने नाव पुकारताच सतीशची छाती धडधडू लागली. पण लगेच स्वतःला सावरून मनोमन देवाचं नाव घेत त्याने हॉलमध्ये प्रवेश केला. स्वतःची ओळख करून देत सगळी प्रमाणपत्रे त्याने सादर केली. तेथील अधिकाऱ्यांनी त्याला काही जुजबी पण मार्मिक प्रश्न विचारले. त्याने दिलेल्या उत्तरांनी अधिकाऱ्यांचे बरेचसे समाधान झाल्याचे सतीशच्या लक्षात आले. त्याला मुलाखत घेणारे सर्वच अधिकारी प्रामाणिक वाटले. एकंदरीत सर्वकाही मनासारखे घडल्याने तो समाधानाचा सुस्कारा सोडतच हॉलबाहेर पडला. बाहेर राजेंद्र त्याची  वाट बघतच बसला होता. त्याला उत्सुकता होतीच पण त्याने ती जाणवू दिली नाही. तीन-चार उमेदवारानंतर राजेंद्रचा नंबर आला. सतीशने त्याला बेस्ट लक दिले.

  बराच वेळ झाला तरी राजेंद्र बाहेर येण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी जवळपास एक ते सव्वा तासानंतर राजेंद्र हॉलबाहेर पडला. तो गंभीर व पडेल चेहरा घेऊनच! सतीश लगेच त्याच्याजवळ गेला व खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देऊ लागला. तो काही बोलण्याच्या मनःस्थितीत नाही असे समजून सतीश त्याला घेऊन जवळच्या कॅन्टीनमध्ये आला. दोघांनाही जाम भूक लागली होती. जेवणावर यथेच्छ ताव मारून झाल्यावर राजेंद्र काहीतरी बोलणार अशी सतीश अपेक्षा बाळगून होता. पण एक ना दोन. मुलाखत कशी झाली. कुठले प्रश्न विचारले, नेमके काय घडले असे अनेक प्रश्न विचारूनही राजेंद्र ढिम्मच होता. त्या विषयावर आपण नंतर बोलू असे तो म्हणाला. शेवटी गावाला परतण्याबाबत दोघांचेही एकमत झाले व सतीशने जेवणाचे बील देऊन दोघांनी कँटीन सोडली.

        मध्यरात्री उशिरा झोप लागल्याने सतीशला आईच्या हाकेने जाग आली. डोळे किलकिले करून त्याने घड्याकडे नजर फिरवली. ८-४५ झाले होते. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. कारण रोज तो सकाळी सहा वाजताच स्वतःहून उठून फिरायला जायचा. त्याने लगबगीने अंथरूण सोडले व आवरायला लागला. घाईघाईत अंघोळ वगैरे आटोपून आईसोबत गणपतीच्या मंदिरात गेला. मनोभावे दर्शन घेऊन परतणार तोच त्याला राजेंद्र येताना दिसला. सतीशने आनंदाने उत्तेजित होऊन त्याला पेढा दिला व अपॉईंटमेंट लेटर मिळाल्याची खबर राजेंद्रला दिली. पण त्याने सगळे निर्विकारपणे ऐकून घेतले व संध्याकाळी पार्टी घेण्यासाठी घरी येतो असे बोलून सतीशचा निरोप घेतला.

     सतीश आनंदाच्या भरात जणू हवेतच तरंगत होता. सगळ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना घरी जाऊन त्याने पेढे वाटले. घरी गप्पागोष्टींना उधाण आल्याने कुणाला वेळेचे भानच नव्हते. पण संध्याकाळी भेटू म्हणणारा राजेंद्र पाच वाजताच प्रकटल्याने सतीश व घरच्यांना आश्चर्य वाटले. सोबत असलेल्या बालमित्रांची त्याने राजेंद्रसोबत ओळख करून दिली. मग 'तुला काय आता तर सरकारी नोकरी लागली आहे. तुझ्याकडून सिनेमा बघायलाच हवा.' राजेंद्रने पुढाकार घेतला. तसा सगळ्या मित्रांनी त्याची री ओढली. सतीशने लगेच आईकडे पैशांसाठी तगादा लावला. तिने काटकसर करून गोळा केलेले पैसे त्याच्या हवाली केले.

      राजेंद्रसोबत सतीश व त्याचे मित्र 'नमक हराम' सिनेमाला गेले. तिकिटे अर्थातच सतीशने काढली. सिनेमाचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर घरी परतण्याच्या उद्देशाने सगळी मंडळी बस स्टॉपकडे वळली. तोच राजेंद्रने सतीशला 'पार्टी पाहिजे' म्हणून लकडा लावला. आता मात्र सतीशच्या अगदी जीवावर आले होते. त्याने जवळच्या मित्रांकडून उसनवारीने काही पैसे घेतले व नाईलाजास्तव सगळ्यांना सोबत घेऊन एका हॉटेलात गेला. मसाला डोसा, रसमलई इ. पदार्थाचा राजेंद्रने मनसोक्त आस्वाद घेतला. सतीशने मात्र पोट बिघडल्याची सबब सांगून फक्त ताक घेतले. 'पार्टी' उरकल्यानंतर सगळे बाहेर पडले. तोच विकट, गडगडाटी हास्य करीत राजेंद्र सतीशला म्हणाला,

''अरे दोस्ता मला सुद्धा अपॉईंटमेंट ऑर्डर मिळाली आहे. ही बघ. याची पार्टी मी उद्या नक्की देईन.''

सतीशचा सकाळचा प्रफुल्लीत चेहरा मार खाल्ल्यागत कोमेजून गेला होता. तो व त्याचे मित्र उदास मनाने घरी परतले.

   त्यानंतर राजेंद्रचा पार्टी देण्याचा उद्याचा दिवस कधीच उगवला नाही व पुन्हा राजेंद्र सतीशला भेटला सुद्धा नाही.

विनोद श्रा. पंचभाई, पुणे.

Sunday, November 12, 2023

थरार चोवीस तासातला'

 मनोगत… (थरार! चोवीस तासातला…)

              शहरातील गँगवॉरचा आणखी एक बळी! राजकीय वैमनस्यातून सूड उगवला! संपत्तीच्या वादातून जवळच्या नातेवाईकाचा निर्घृण खून! अशाप्रकारच्या बातम्या कानावर पडणं आता नित्याचंच झालं आहे. त्या आपल्या चांगल्याच अंगवळणी पडल्या आहेत. परंतु काही कारण नसताना एखाद्या व्यक्तीचा हकनाक जीव जातो त्यावेळी मात्र आपल्याला निश्चितच वाईट वाटल्याशिवाय राहत नाही. अशावेळी 'अरेरे… बिचारा नाहक जीवानिशी गेला!' म्हणून समाजात हळहळ व्यक्त होताना आपण पाहतो! कोणी सामान्य माणूस सरळ रस्त्यावरून चालत असताना किंवा रस्ता ओलांडत असताना एखादे अज्ञात वाहन अचानकपणे येऊन त्याला धडकते आणि त्या माणसाला गंभीर इजा पोहचते. कधीकधी त्याच्या प्राणावरही बेतते आणि अशावेळी त्याचा हकनाक जीवही जाऊ शकतो! अशा दुर्दैवी प्रसंगी त्या सामान्य माणसाची काहीही चूक नसताना त्याला आपला अमूल्य जीव गमवावा लागतो. दैनंदिन जीवन जगत असताना अशाप्रकारच्या दुर्दैवी घटना घडताना आपण कधीकधी दूरदर्शनच्या वाहिन्यावर बघत असतो अथवा वृत्तपत्रांत देखील अशा अघटित बातम्या आपल्या वाचनात येत असतात.

              त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती नियतीच्या सापळ्यात अशी काही अडकत जाते… की तिची काहीही चूक नसताना तिच्यावर अनवधानाने जीवघेणा हल्ला होतो आणि तिला आपल्या प्रिय प्राणाला मुकावं लागतं! एका हसत्या खेळत्या आयुष्याचं नकळतपणे एकाएकी होत्याचं नव्हतं होऊन जातं. अशा घटना डोळ्याने बघितल्या किंवा नुसत्या कानाने ऐकल्या तरी सर्वसामान्य माणसाची मती गुंग होऊन जाते, मन बधीर होतं! मग त्यातून सावरायला त्याला वेळही लागतो… सारखी तीच तीच घटना त्याच्या डोळ्यासमोर येत असते!

               माझ्या 'थरार! चोवीस तासातला' या रहस्यमय कादंबरीत एका सरळ साध्या, निष्पाप तरुणीचा तिच्या ध्यानीमनी नसताना, कुठलाही अपराध नसताना तिची नृशंसपणे हत्या करण्यात येते आणि त्यात तिच्या सुंदर जीवनाची अवचितपणे अखेर होते! मनासारखी नोकरी करत सर्व काही नीट, व्यवस्थित सुरू असताना एका क्षणात आयुष्याची राखरांगोळी होऊन जाते. कुणाशी काही देणं घेणं नसताना, ना कुणाच्या अध्यात ना मध्यात असताना एक सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या तरुणीला आपल्या बहुमूल्य प्राणाची किंमत मोजावी लागते! का घडतं असं? तिच्याच बाबतीत असं का घडतं? कोण असतो तिचा अज्ञात मारेकरी? का संपवलं जातं तिला? काय रहस्य असतं तिच्या निर्घृण खुनाचं?

                या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यानंतर उलगडत जाणारं रहस्य जाणून घेण्याचा आगळावेगळा थरारक अनुभव 'थरार चोवीस तासातला' वाचताना रसिकवाचकांना आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ही कादंबरी शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या कादंबरीपूर्वी प्रकाशित झालेल्या "हॉटेल हवेली" आणि "सुगावा…The Clue" या माझ्या दोन्ही विलक्षण रहस्यमय कादंबऱ्यांना वाचकांनी उत्स्फूर्तपणे भरघोस असा प्रतिसाद दिला. अनेकांनी फोन करून त्यावर चर्चाही केली. त्याबद्दल मी रसिकवाचकांचा आत्यंतिक ऋणी आहे.

                 'थरार चोवीस तासातला' या कादंबरीसाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री. नागेश शेवाळकर सरांनी त्यांच्या अनोख्या शैलीत आणि सुंदर,  प्रवाही भाषेत लिहिलेली प्रस्तावना लाभली आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो. प्रसिद्ध चित्रकार श्रीकृष्ण ढोरे यांनी कादंबरीच्या विषयाला साजेसं मुखपृष्ठ चितारलं आहे. तसेच आर्टिस्ट संगीता जावळकर यांनी सुंदर सजावट आणि लेआऊट करून दिले. पुण्यातील 'दुर्वा एजन्सीज'चे प्रकाशक शैलेंद्र कदम यांनी 'थरार चोवीस तासातला'च्या रहस्यमयी कथानकाला पुस्तकरूप बहाल करून दिले. या सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद देतो. 'दुर्वा एजन्सीज' या प्रकाशन संस्थेने आतापर्यंत माझी 'आपले राष्ट्रपती : डॉ. राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद, ओळख भारतीय शास्त्रज्ञाची, हॉटेल हवेली, भारताचे पंतप्रधान : पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी आणि सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रौपदी मुर्मू अशी विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली आहेत. या सर्वच पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आता 'थरार चोवीस तासातला' ही शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी रहस्यमय कादंबरी रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे. धन्यवाद!

 … विनोद श्रा. पंचभाई