Saturday, December 23, 2023

दिशा...

"दिशा"

रोज-रोज असे मरण्यापेक्षा एकदा कायमचे मेलेले बरे असा विचार करत रमेश तडक रेल्वे स्टेशनकडे निघाला. चालताना निरनिराळ्या विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली आपल्यापासून कोणालाच काही सुख  नाही, उलट  आपला प्रत्येकाला त्रासच होतो हे त्याला पदोपदी जाणवत होते. सगळे कसे हिडीस फिडिस करायचे. आपल्या जाण्याने कुणाला काहीच फरक पडणार नव्हता. उलट नस्ती ब्याद गेली म्हणून सगळेच सुस्कारा सोडतील. विचार करता करता रमेशला 'त्या' रात्रीची आठवण आली... त्या मदनच्या संगतीने आपल्याना हे न सुटणारं व्यसन जडलं! मात्र   आता पश्चाताप करुन काय उपयोग होणार ?

  रात्रीच्या किर्र अंधारात रमेश स्टेशनच्या मागील बाजूने चालू लागला. आजू बाजूला कोणी बघणारे नव्हतेच. तरीही सावध नजरेने तो दूर असलेल्या रुळाकडे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्र. ६ कडे जाण्यासाठी वळला.  मध्यरात्र उलटून गेली होती. त्यामुळे प्लॅट फॉर्मवर गर्दी अशी नव्हतीच. पलीकडे असलेल्या जवळच्या वस्तीतील काही टवाळखोर पोरं गप्पात रंगून गेलेली त्याला दिसली. मग मागे वळून न बघता तो झपझप पावले टाकत दूरपर्यंत जाऊन पोहचला. नंतर पुढच पाऊल टाकणार तोच कुत्र्याचं भुंकणे त्याच्या कानावर पडलं. त्याने चमकून शेजारच्या झुडूपात बघितलं. तर कुत्र्यांचे अख्खे कुटूंब त्याच्याकडे बघून गुरगुरत होते. घामाघुम अवस्थत रमेश माघारी फिरला. मग कसलासा विचार करून त्याची पावलं प्लेटफॉर्मकडे चालू लागली. गाडी येण्याची सुचना (उद्घोषणा होईपर्यंत) मिळेपर्यंत प्लॅटफॉर्मवरच थांबावे असा विचार करून तो चालू लागला.

" गाडी नं. ३१३३ निर्धारित वेळेपेक्षा साडेतीन तास उशीराने येणार" असे कळल्याने रमेश रेल्वे स्टेशनच्या प्रतिक्षालयात घुसला. तेथे त्याला एक मोठी सुटकेस आणि एअरबॅग दिसली. त्याशिवाय तिथं त्याला कुणीही आढळून आले नाही. कोणाचे सामान असेल हे ? असा विचार करत असतानाच त्याला बाथरूममधून एक व्यक्ती येताना दिसली. त्या व्यक्तीकडे बघताच रमेशचा चेहरा पांढराफटक पडला!

 "अरे तू रमेशन ना? एवढ्या रात्री इथे काय काम करतोस ? अन् काय ही तुझी अवस्था; बरं नाही का है तुला?"

रमेश गडबडून बोलून गेला...

" सर, सर तुम्ही कुठे निघालात ? मी आपला सहजच.... "

काय बोलावे त्याला काहीच सुचलं नव्हतं. अचानक एवढ्या दिवसांनी देसाई सरांशी त्याचा सामना झाला होता. मग रमेशच्या जवळ जाऊन त्याला धीर देत सरांनी बोलतं केलं. त्यानंतर सगळं खरं खरं बोलून रमेशनं एकदाचं आपलं मन मोकळं केलं आणि तो हमसून हमसून रडू लागला.

"हे बघ रमेश, मी आता बडो‌द्याला जाण्यास निघणार होतो. पण गाडी साडेतीन तास लेट असल्यामुळे तिकडे जाण्याचा प्लॅन रद्द केलाय. आता तू असं कर माझ्यासोबत घरी चल. उद्या आपण माझ्या एका मित्राच्या केंद्रात जाऊ. सगळं ठीक होईल. अरे बाबा, हे जीवन फार अमूल्य आहे, ते संपवायचा आपल्याला काहीच अधिकार नाही, जीवन सुंदर कसं करता येईल त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत!" सरांचे आश्वासक बोल ऐकून रमेशला खूपच हायसं वाटलं. त्यानं गमावलेला आत्मविश्वास सरांच्या प्रेमळ शब्दांमुळे परत मिळायला मदत झाली.

'आनंद व्यसनमुक्ती केंद्र' प्रवेशद्वाराच्या कमानीवर लागलेला मोठा फलक बघत रमेश सरांसोबत आत गेला. तिथल्या फादर डेव्हीड यांनी त्यांचे हसत मुखाने स्वागत केले. रमेश आता बराच सावरला होता, त्याच्या चेहऱ्यावर आता तणावाचा लवलेशही नव्हता. एकमेकांशी ओळख करून घेण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यावर फादर डेव्हीड यांनी अतिशय आपुलकीने आणि मायेने रमेशची विचारपूस केली. त्यानंही मग न संकोचता चुकीच्या मित्रांच्या संगतीने आपण कसे वाहवत गेलो आणि नकळत कशी आपल्या जीवनाची दिशाच हरवून बसलो हे फादर डेव्हीड यांना कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलं. त्यांनीही आस्थेनं सगळं ऐकून घेतलं.

        त्यानंतर थोडा विचार करत शांतपणे फादर डेव्हीड म्हणाले...

"तुला येथे आमच्यासोबत कमीत कमी तीन महिने काढावे लागतील. या तीन महिन्यात येथील दररोजच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त एक रोजगाराभिमुख कोर्स सुद्धा तुला पूर्ण करावा लागेल. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याची तुला निश्चितच मदत होईल!"

रमेश आता बराच सावरला होता, त्याच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता.

तो फादर डेव्हीड यांना दोन्ही हात जोडून नम्रपणे एवढंच म्हणाला...

"फादर तुम्ही जे सांगाल, जसं ठरवाल अगदी तसंच मी वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार!"

     देसाई सर जागेवरून उठले. त्यांनी फादर डेव्हीडसोबत हसतांदोलन केलं. नंतर ते रमेशचा निरोप घेण्यासाठी त्याच्याकडे वळले. तोच रमेश सरांचा पाया पडण्यासाठी झुकला. त्याला खूप गलबलून आलं होतं! त्याचे डोळे आसवांनी डबडबले होते!

"सर... सर! तुमच्यामुळेच आज मला जगण्याची एक नवी दिशा लाभली आहे. तुमचे उपकार कसे फेडायचे तेच कळत नाही. सर मी... मला..!" त्याला पुढे बोलू न देता देसाई सरांनी रमेशचे दोन्ही खांदे धरून आपल्या हृदयाशी लावलं आणि मग त्याच्या पाठीवर थोपटत हसतच म्हणाले...

"अरे वेड्या, करता-करविता तो वरून सगळे बघतो आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. तो तुला काहीही कमी पडू देणार नाही. आता आपलं पुढील आयुष्य भरभरून जग, माझा तुला कायम आशीर्वाद आहे, माझ्या सदिच्छाही सदैव तुझ्या पाठीशी आहेतच आणि हो कधी काही मदत लागली तर मला नि:संकोच कॉल कर!"

"खूप खूप आभारी आहे सर तुमचा! आता मी काय बोलू तेच कळत नाही!" रमेश दोन्ही हात जोडून सरांपुढे नम्रपणे उभा होता.

... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

   मो. 9923797725


Monday, December 18, 2023

तेरी हंसी की किमत क्या है!

    तेरी हंसी की किमत क्या है 

      शेजारी राहणाऱ्या चौधरींचा मकरंद, दहा वर्षाचा गोड चुणचुणीत मुलगा. सदा हसतमुख. मित्रांशी गप्पा करताना खळखळून हसायचा. शाळेत कुठल्याही सरांच्या प्रश्नाचं हसूनच उत्तर देणं त्याच्या स्वभावाचा एक भाग बनला होता.

एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली! शाळेच्या जिन्यावरून उतरताना मकरंद पाय घसरून पडला व घरंगळत सरळ खाली आला. त्याच्या डोक्याला, कपाळाला खूप मार लागला! जीव वाचला पण दृष्टी मात्र गेली. बरेच उपचार केले. एकाहून एक निष्णात डॉक्टरांना दाखवून झालं पण प्रतिसाद शून्यच! दृष्टी नसतानाही मकरंद लवकरच सावरला. नेहमीसारखाच सगळ्यांशी तो हसत बोलू लागला.

जवळपास नऊ वर्षांनी मकरंदच्या आयुष्यात चमत्कार घडला! त्याला अंधुकसं दिसायला लागलं. मग काही दिवसांच्या औषधोपचारांनी व एका छोट्या ऑपरेशनने त्याची दृष्टी पूर्ववत आली. डोळ्यावरची पट्टी काढताना त्याला वाटलं... 'आता सगळेच आपलं हसूनच स्वागत करणार!' मग हसऱ्या चेहऱ्यानं, उत्सुकतेनं, हळूहळू त्यांनं डोळे उघडले पण कसचं काय! प्रत्येकाच्या मुखकमलावर त्याला कमालीचा तणावच दिसला !

'रूसूबाई रूसू, कोपऱ्यात बसू! येऊ दे ना गाली तुझ्या खुदकन हसू!' हे गाणं बहुतेकांनी आपल्या बालपणी नक्कीच ऐकलं असणार. तसंच काहींनी ते अनुभवलंही असणार! म्हणजेच बालपणीचं हसू किती निर्मळ, निर्व्याज असतं, नाही? त्यात एकप्रकारचा प्रांजळपणा, सच्चेपणा असतो. म्हणूनच म्हणतात ना... 'मुलं म्हणजे देवाघरची फुलं!' नुकत्याच उमललेल्या, बहरलेल्या फुलांसारखं असतं छोट्या मुलांचं हसू... त्यात खोटेपणाचा लवलेशही नसतो!

मग जसजसं आपण मोठं होत जातो, तसतसं ओठावरचं हसू हळूहळू लुप्त व्हायला लागतं! शाळेत कुणा मित्राची फजिती झाली तर किंवा कुणी जिन्याच्या पायऱ्यांवरून चालताना पडला तर लगेच मोठ्यानं निलाजरं हसायचं असे प्रकार सुरू होतात. या अशा प्रकारातूनच मग कधीकधी आपापसात एकप्रकारची खुन्नस  निर्माण होते! त्यातूनच एकमेकांवर कुरघोडी करत 'कशी जिरवली' असा आव आणत खोटं खूनशी हसू काहींच्या चेहऱ्यांवर दिसू लागतं. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना एखाद्या विद्यार्थ्यांची उडालेली भंबेरी बघूनही कित्येकांना आपलं हसू आवरत नाही!

     कालांतराने शाळेनंतर मग महाविद्यालयीन जीवनाची सुरूवात होते. तेव्हा मोठ्या शहरातील धनिकांची मुलं, छोट्या गावातून किंवा ग्रामीण भागातून आलेल्या नवख्या विद्यार्थ्यांच्या राहणीमानावरून, त्यांच्या भाषेवरून हमखासपणे हसताना दिसतात.... हे हसू निश्चितच कुत्सित किंवा छद्मी प्रकारातलं असतं! तसंच महाविद्यालयात नवीनच शिकवायला आलेल्या एखाद्या प्राध्यापकावर काही विद्यार्थी नको त्या प्रश्नांची सरबत्ती सुरू करतात. वर्गातील काही टारगट मुलं त्या प्राध्यापकालाच 'टार्गेट' करून पूर्णपणे 'हसी का पात्र' बनवून टाकतात! तसंच काही महाविद्यालयात 'रॅगिंग'चे प्रकारही बघायला मिळतात. तेव्हा तर प्रथमच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पार रडकुंडीला आणताना... 'आपण खूप मोठा पराक्रम गाजवला' अशा आवेशात कित्येक महाभाग दात काढत जल्लोष करताना दिसतात. असे प्रकार इतक्यात खूपच गंभीर स्वरूप धारण करत असल्याचं दृश्य दुर्दैवानं बघण्यात येतं!


कुणाच्या व्यंगावर, लाचारीवर, फजितीवर हसू नये! तसेच कुणाच्या गरीबीवर अन् संकटात असलेल्यांवर तर अजिबात हसू नये. उलट त्यांना काही मदत करता आली तर उत्तमच! आता बघा, आपल्या एखाद्या मित्राने हलकाफुलका विनोद केला तर त्यावेळी त्याला मनमुराद हसून दाद नक्कीच द्यावी, मात्र कुणाच्या व्यंगावरून पाणचट विनोद करायची काही गरज आहे का ? कुणाची भावना न दुखावता निखळ विनोदनिर्मिती करणं आजकाल फारच दुर्मीळ होत चाललंय हे इथं खेदानं नमूद करावं लागतं!

    'जिंदगी हसने गाने के लिए है' हे गाणं म्हणत सतत फिदीफिदी हसत राहणंही बरं नाही, तर या गाण्याचा मतितार्थ जाणून त्याप्रमाणे वागणंच खरं शहाणपणाचं! आपण आपल्या रोजच्या धावपळीत हल्ली सहजतेनं हसणंच विसरून गेलो आहे म्हणा ना... नाही म्हणायला सकाळी अनेक हास्य क्लबांमधून हसण्याचे विविध आवाज आपल्या कानी पडतात. मात्र त्या हसण्याला निर्व्याज, निखळ हसू म्हणू शकतो का आपण? बरं, एखादा विनोदी चित्रपट बघायला जायचं म्हटलं तर त्याची किंमत मोजूनच तो बघता येणार, नाही का...? म्हणजेच आता हसायलाही पैसे मोजावे लागतात असंच ना! कधीकधी अशाप्रकारचा विनोदी चित्रपट एकदम रटाळ, ज्यात ओढून ताणून तयार केलेले विनोद असतील तर मग काही विचारूच नका. त्यावेळी असा चित्रपट बघून, चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपण स्वतःचंच हसू करून घेतो अगदी नाईलाजास्तव..!

     हसण्याने आपले आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते, हसण्यामुळे ताणतणाव कमी होतो हे सगळं ठीक आहे. मात्र त्यासाठी हसणंही नैसर्गिक हवं ना! ओढून ताणून चेहऱ्यावर हसू आणणं, आपल्या आजूबाजूचे हसतात म्हणून आपणही विनाकारण हसणं याला काय अर्थ? निर्भेळ, नैसर्गिक हसू सध्या लोप पावत चाललंय की काय अशी परिस्थिती सर्वत्र दिसत आहे! अशा गंभीर परिस्थितीला आपले आपणच कारणीभूत आहोत याबाबत कुणाचं दुमत नसावं. आता बघा ना... मूल अडीच तीन वर्षाचं झालं की त्याला शिक्षणाच्या नावाखाली नर्सरीच्या वर्गाला जुंपतो ते आपण सुजाण पालकच ना..! आपण पालक तर आपलं हसू हल्ली विसरतच चाललोय म्हणा...  मात्र आपल्या चिमुकल्या बाळाचंही नैसर्गिक, निर्व्याज, बालसुलभ हसू नकळत आपण हिरावत तर नाही ना? याची जाणीव ठेवण्याची आज खरी गरज आहे!

       हसा, अगदी खळखळून मनसोक्त हसा... कसलंही 'टेंशन' न घेता हसा. मात्र काळाचं, वेळेचं भान ठेवूनच आपण हसायला हवं. सर्कसमधील विदुषकाच्या निरनिराळ्या करामती बघून हसायला हवं. अस्सल व दर्जेदार विनोद निर्मितीला दाद देऊन दिलखुलासपणे हसायलाच हवं! नाहीतर आपल्या बघण्यात काही महाभाग असेही येतात... ज्यांच्या नाकावरची साधी माशीही उडत नाही. अगदी गुदगुल्या केल्या तरी यांना हसू येणार नाही! म्हणूनच आपल्यावर दुर्दैवानं कधीही अशी वेळ न येवो, की लोक नाईलाजाने विचारतील... "बता तेरी हँसी की किमत क्या है?"

किसी को दिल मे बसाकर तो देखो!कि

सी को थोडा हसाकर तो देखो!!

विनोद श्रा. पंचभाई

9923797725

Wednesday, December 13, 2023

माणूस म्हणून जगताना...

 


*माणूस म्हणून जगताना...* 

एक छोटासाच प्रसंग! दोन छोटी मुलं,असतील आठ दहा वर्षे वयोगटातील. शाळा सुटल्यावर आपापले दप्तर सांभाळत, बसची वाट बघत, आपापसात गप्पा मारत झाडाखाली उभी होती. त्यांचं संभाषण ओघानेच माझ्या कानावर पडलं...
"अरे चिन्या, म्हटलं आज माझा वाढदिवस आहे".
"मग तुझे बाबा तुझ्यासाठी केक आणणार का..?" चिन्याचा भाबडा प्रश्न.
" नाही रे राजा... माझी आई मस्त पैकी पुरणपोळी करणार आहे आज. मग मी बाबांची टोपी घालून पाटावर बसणार. आई मला ओवाळणार आणि हो बाबा माझ्यासाठी दहा रूपयेवाला मोठ्ठा चाँकलेट पण आणणार आहेत.त्यातला तुला मी उद्या नक्की देणार बरं का चिन्या!"
"हो...बस आली बघ माझी, भेटूया उद्या , चल" असं ओरडतच चिन्या बसमध्ये चढला. त्याच्या पाठोपाठ मीही चढलो.
  खरंच माणूस जन्माला आला की खरं निखळ आयुष्य हे बालपणीच उपभोगायला मिळतं. किती निरागसता अन् भाबडेपणा असतो तेव्हाच्या त्या वागण्यात!तेव्हा स्वार्थाचा व खोटेपणाचा  लवलेशही नसतो बोलण्यात, कारण त्या वयात विचार करून काहीच बोलावं लागत नाही ना... ना अहंकार, ना मत्सर! कुणाशी हेवेदावे नको की कुणावर कुरघोडी नको. एकमेकांवर रागावणं तेही काही मिनिटांपुरतं, मग गळ्यात गळे घालून पुन्हा जैसे थे! म्हणूनच संतांनी म्हटलं आहे,"लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।"
कालांतराने जसजसे वय वाढत जाते, माणूस मग षडरिपूंच्या चक्रव्यूहात अडकला जातो. तेव्हा तो आपली सद्सद्विवेक बुध्दी गहाण ठेवून चुकीचे निर्णय घेण्यास अनेक वेळा बाध्य होतो.मग 'जोरोका झटका' लागला की त्याचे पाय जमिनीवर येतात पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आपण ज्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, मनापासून त्यांच्या वर प्रेम करतो, तेच कधी कधी असे वागतात की आपल्यालाच अपरिचित वाटू लागतात! आपलं नेमकं काय चुकलं ते आपलं आपल्यालाच कळत नाही. अशावेळी अपेक्षाभंगाचे जीवघेणे क्षण आपल्या अगदी जवळच्या माणसांकडून आपल्या वाट्याला येत असतात. अन् एक मात्र खरं, हे अपेक्षाभंगाचं दु:ख परक्या व्यक्ती कडून होणं शक्य नसतं. कारण अपेक्षा या केवळ आपल्याच माणसांकडून केल्या जातात... त्यांना आपले जवळचे समजून! आयुष्यभर आपण आपल्या माणसांसाठी जिवाचं रान करतो मात्र त्या प्रामाणिक प्रयत्नांचं योग्य चीज झालं नाही तर अपेक्षाभंगाचं दु:ख होणारच!कधी कधी असं वाटतं माणसांपेक्षा प्राणी परवडले...एखाद्या कुत्र्याला तुम्ही रोज साधं बिस्कीट खायला द्या, तुमची साथ द्यायला मग तो रात्रंदिवस तयार असतो.
  परमेश्वरानं दिलेलं बहुमुल्य जीवन जगत असताना आपलं शरीर हे नाशवंत आहे हेच नेमकं आपण विसरायला लागलो आहे. तरीसुध्दा त्याचा आपल्याला ताठा, अभिमान तरी किती..! क्रांतिकारी संत कबीरांचं वचन आहे...
"यह तन काचा कुंभ है,लिया फिरै थे साथ।
टपका लागा फुटि गया, कछू न आया हाथ।"
माणसाचं शरीर म्हणजे मातीचा कच्चा घडा आहे आणि ते खरंही आहे. या शरीराचा कुठल्याही क्षुल्लक कारणानं कधी नाश होईल हे कुणी सांगू शकतं का? कबीरजी पुढे म्हणतात...
"माटी कहे कुम्हारसे क्या तू रोंदे मोहे।
एक दिन ऐसा आवेगा मै रोंदूगी तोहे।"
अर्थात, कुंभारानं मातीला पायाखाली कितीही तुडवलं तरी त्याचंही शरीर एक दिवस त्या मातीतच जाणार असतं हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे दोष न बघता त्यांच्यातील केवळ गुण बघून त्याकडे आपण लक्ष दिलं तरच माणूस परक्यावरही, अगदी आपल्या शत्रुवरही प्रेम करू शकतो. नेमकं हेच वास्तव संत कबीरांनी पुढील दोह्यात प्रकट केलं आहे...
"बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोय।
जो दिल खोजा आपना,मुझसा बुरा न कोय।"
 इतरांचे दोष न बघता स्वतःमधीलच दोष शोधून ते नाहीसे करण्याचा प्रत्येक माणसाने प्रयत्न केला तर हे जग किती सुंदर होणार नाही का! रूढी, परंपरा, मानपान असल्या तद्दन फालतू गोष्टींसाठी आज माणूस, आपल्या माणसांपासून दूर होताना दिसतो. किरकोळ स्वार्थापोटी त्यांचा अहंभाव जागृत होताना दिसतो. काही दिवसांपूर्वीचा एका परिचिताकडील एका पारंपरिक सोहळ्यातील प्रसंग येथे नमूद करतो... बरीच आप्तेष्ट मंडळी आपल्या कुटुंबियासह सोहळ्याला जमलेली. काही सधन घराण्यातील, काही उच्च विद्याविभूषित तर काही आपले सर्वसाधारण मध्यमवर्गीय!तर अशा या भव्य सोहळ्यासाठी कोण कोण, काय काय कपडे परिधान करून आलं...कोण कुठली साडी नेसून आली याकडेच बहुतेकांचं जास्त लक्ष. बरं आजकाल "रिटर्न गिफ्ट्स"ची पध्दत असल्याने ते गिफ्ट तोडीस तोड मिळालं नाही तर पुन्हा रुसवे फुगवे, अबोला हेही ओघाने आलंच.अशावेळी "तुमचं फंक्शन गेलं खड्ड्यात, आमचा काही मानपान आहे की नाही" अशी टोकाची वाक्यं बोलायलाही माणसं कमी करत नाहीत.अन् अशाप्रकारच्या सोहळ्यात थोडी 'टाकून' आलेल्या व्यक्ती सामील झाल्या तर मग विचारायलाच नको. मग त्यांची उतरेपर्यंत गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो. यावेळी सामोपचाराने न घेता वाद वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले तर माणसं कायमस्वरूपी दुरावली जातात. मग त्यात "सुक्याबरोबर ओलंही जळतं" या न्यायाने ज्यांचा अशा प्रकारच्या घटनेस काडीचाही संबंध आलेला नसतो, त्यांनाही भुर्दंड सोसावा लागतो.
   असं म्हणतात, माणसं तोडायला एक क्षुल्लक क्षण पुरेसा ठरतो, पण माणसं जोडायला कित्येक वर्षे, तपं उलटतात!कधी कधी तर पिढ्यानपिढ्या अबोला, खुन्नस कायम 'टिकवलेली' असल्याची काही खानदानी कुटुंबाची परंपरा आपल्या बघण्यात येते. कारण काय तर घराण्याची इज्जत... वा रे इज्जत..! एकमेकांशी प्रेमाने बोलल्याने, मधुर व्यवहार केल्याने 'यांची' इज्जत जाते. त्यापेक्षा गरीब बिचारे मुके प्राणी गुण्यागोविंदाने गावागावात बागडताना दिसतात.
      "कोण दिवस येईल कसा कोण जाणतो?" या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे येणारा काळ खरंच खूप कठीण आहे. 'माणूस' म्हणून जगताना आपल्या समोरचाही 'माणूसच' आहे याचे आपण सदैव भान ठेवायला हवे. आणि एक दिवस कधीतरी अचानक आपल्याला शेवटच्या प्रवासाला "जाणे" आहे याची जाण सुद्धा ठेवायला हवी. भिन्न भिन्न परिस्थिती, संकटे ही थोड्याफार फरकाने प्रत्येकावरच येत असतात. त्यावर मात करण्यासाठी आज माणसातील "ईन्सानियत"ची खरी गरज आहे.

"माणसाने माणसाशी
 माणसासारखे वागावे।
स्वार्थासाठी नाही तर
 परोपकारासाठी जगावे।

           .....विनोद श्रा.पंचभाई, पुणे
                 मो.क्र.९९२३७९७७२५

अंतिम सत्य

  अंतीम सत्य..

 काही दिवसांपूर्वी एक विलक्षण बातमी वाचण्यात आली... आँस्ट्रेलिया देशाचे एक मोठे शास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड गुडाल वय वर्षे अवघे १०४ नाबाद! त्यांना इच्छामरण हवं होतं. मात्र तिथलं सरकार त्यांच्या कायद्याप्रमाणे इच्छामरणासाठी त्यांना परवानगी द्यायला तयार नव्हतं! मग त्यांनी एक शक्कल लढवली आणि स्वित्झर्लंड देश गाठला. तेथील कायद्यानुसार आपल्या इच्छामरणाची परवानगी मिळवली आणि आपलं आवडतं संगीत "बिथोवन" ऐकत त्यांनी धीरोदात्तपणे मृत्यूला कवटाळलं ! म्हणजेच डॉ. डेव्हिड गुडाल अगदी कसलंही भय न बाळगता या जगातील अंतीम सत्याला सामोरे गेले..!

        आज जगाच्या पाठीवर अशी एकही व्यक्ती नसेल, ज्याला मृत्यूचं भय वाटत नाही. अपवाद म्हणून एखादा सिद्धी प्राप्त असलेला महापुरुष किंवा ज्याला आपण 'विदेही संत' ही उपाधी देतो त्यालाच फक्त जीवन आणि मृत्यू सारखेच! मात्र आज तरी अशी शक्यता फारच कमी आहे. कारण एवढ्यात अनेक प्रकारचे बाबा तसेच देवासोबत 'डायरेक्ट' बोलण्याचा आव आणणारे साधू अन् संधीसाधू बरेच दिसतात. नंतर त्यांच्यामधला ढोंगीपणा उघडकीस आला की हे बाबा अचानक अंतर्धान पावतात!

"मृत्यू हे अंतीम सत्य आहे" असं कुणातरी महापुरुषाने म्हटलं आहे, अन् हे त्रिकालाबाधित सत्य कुणीही नाकारु शकत नाही. कारण मृत्यूनंतर माणूस नेमका कुठे जातो ? याचा शोध सध्यातरी लागलेला नाही ! शेवटच्या घटका मोजणाऱ्यालाही मृत्यूचं भय असतंच... तसंच लहानमोठा, गरीबश्रीमंत, दुबळा बलवान कोणीही असो, एखादं जीवघेणं संकट समोर आलं की तो मृत्यूच्या भयानं एकदम गर्भगळीत होतो ! अगदी स्वतःला नास्तिक म्हणवणाराही अशावेळी त्या परमेश्वराची प्रार्थना करताना दिसतो. काही जण तर 'देवा, मला या जीवघेण्या संकटातून वाचव रे बाबा... मी तुझ्या नावानं सगळ्यांंना पाच किलोचे पेढे वाटणार' अशी लालूच प्रत्यक्ष ईश्वरालाच दाखवतात!

  आजकाल रोजच्या धावपळीत सर्वसामान्य माणसाला कितीतरी समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग त्या समस्यांना वैतागून कधीकधी 'नको हे जीवघेणं जगणं' असंही वाटतं. अशा जगण्याला कंटाळून एखादा विहिरीत उडी मारतो. नंतर नाकातोंडात पाणी गेलं की प्राणभयानं 'वाचवा कोणी तरी मला' म्हणून मोठ्या आवाजात आरडाओरडा पण करतो ! असं म्हणतात, माकडीण जेव्हा पाण्यात बुडू लागते तेव्हा आपल्या पोटच्या पिलाला सुद्धा पायाखाली घ्यायला कमी करत नाही..! म्हणजेच मृत्यूचं भय हे जगातील प्रत्येक प्राणीमात्राला असतेच, ते कोणी नाकारु शकत नाही.

    दैनंदिन जीवनात कधी हसत खेळत तर कधी काहीशा तणावात सगळ्यांंचा रोजचा संसार सुरू असतो. एक दिवस अचानक फोन येतो. आपला जवळचा नातेवाईक किंवा मित्र आपल्याला 'सोडून गेल्याची' बातमी मिळते. मग आपण आपली कामं सोडून तिकडे जातो. तेथे पोहचल्यावर तेथील वार्तालाप तसंच विलाप आपल्या कानावर पडतो. त्याचं 'जाण्याचं' वय नसताना मित्र अचानक गेल्यामुळे आपल्याला सुद्धा वाईट वाटतं ! तेव्हा आता यानंतर आपलाच 'नंबर' आहे की काय... अशी एक अनामिक भीती पण आपल्याला वाटायला लागते! जे आपण कधीही टाळू शकत नाही असं हे कधीतरी अचानक घडतं. अगदी क्षणभरातच होत्याचं नव्हतं होऊन जातं , अन् आपण नुसतं बघत बसण्याशिवाय काहीही करु शकत नाही. खरंच किती सामर्थ्य असतं ना या मृत्यूमध्ये ... या अंतीम सत्यात !

  " देही नित्यमवध्यो$यं देहे सर्वस्य भारत। 

     तस्मात्स अर्वाणि भूतानी न त्वं शोचितुमर्हसि।।"

अर्थात...'सर्वांच्या देहातील आत्मा हा सर्वदा अवध्य आहे. म्हणूनच कोणाच्याही मृत्यूविषयी शोक करणे योग्य नाही!' या भगवद्गीतेतील श्लोकाचा मतितार्थ लक्षात घेतला तरी आपल्या जवळची, लोकप्रिय किंवा अगदी जिवाभावाची व्यक्ती अचानक 'निघून' गेल्यावर जाणत्या लोकांनाही आपला शोक आवरणं कठीण होऊन जातं ! मात्र मृत्यूबद्दल संतांनी "मृत्यूसारखा सखा नाही!" असंही संबोधलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत म्हटलं आहे...

"मृत्यूसंस्काराचा ऐका खुलासा। लोक मृत्यूशी समजती भलतिसा। मी म्हणतो मृत्यूजैसा। उत्तम नाही कोणी।।

जैसी नदी सागरासि मिळे। सोडोनि भेदभाव कष्टबळे।तिचे कार्यचि होते सगळे। मिळण्यासाठी सागरी।।"

      म्हणूनच संतांनी सांगितल्याप्रमाणे सरळपणाचं जीवन जगण्यातच खरा आनंद आहे. त्यातच खरे समाधान आहे. आपल्या इतिहासाची प्रत्यक्ष साक्ष आहे... आजपर्यंत अनेक धुरंधर राजेमहाराजे, रथीमहारथी येथे होऊन गेलेत. त्यांनी अनेक लढाया लढल्या. कोणी कपटाने तर कोणी कुटनीतीचा वापर करून कित्येक राज्यं पादाक्रांत केली. पण शेवटी सगळे धुळीलाच मिळाले ! सम्राट अशोकासारखा एखादा कलिंगच्या युध्दानंतर थोडा 'सावरला'. मग त्यानं भगवान बुद्धांंनी सांगितलेल्या मार्गाचं जन्मभर आचरण केलं. म्हणूनच त्याचं नाव संपूर्ण भारतात आदरानं घेतलं जातं. म्हणजेच काय तर शेवटी या भूतलावर कोणी तरी अदृश्य पण पवित्र शक्तिची अबाधित सत्ता अस्तित्वात आहे. कोणी तिला राम म्हणतो तर कोणी रहीम म्हणतो. कोणी स्वामी समर्थ तर कोणी साईबाबा म्हणत असतो ! तरीही आज समाजात आपल्याला सर्वत्र भोंदूबाबांचे किंवा महाराजांचे जाळे अन् त्यात आयतेच फसत गेलेले साधेभोळे भाविक दिसून येतात. दिवसाआड आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो... 'आज या बाबाचे पितळ उघडे पडले' ... 'त्या महाराजाचा पर्दाफाश झाला!' एवढे घडून सुद्धा  त्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्या भक्तांची संख्या काही कमी होताना दिसत नाही, हे दुर्दैवच..!

           अशा प्रकारच्या या बाबांना शरण जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या मार्फत 'मोक्ष'ही हवा असतो अन् 'मोह'ही सुटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्यांच्या तनमनातच रावण भरलेला असताना, असे भक्त राम दर्शनासाठी अशा प्रकारच्या भोंदूबाबांच्या मागे लागतात. किती ही अगतिकता..! आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील किती तरी संतांनी त्यांच्या पवित्र ग्रंथसंपदेतून आपल्यासाठी ज्ञानाचे, मोक्षप्राप्तीचे भांडार खुले करून ठेवले आहे. त्याचा लाभ घेण्याचं सोडून भोळे भाविक नको त्या मोहात अडकले जातात , अन् 'लोभापायी दरिद्री' या उक्तीप्रमाणे आपलं सर्वस्व गमावून बसतात!

        सांगायचा मुद्दा असा की, आजच्या धावपळीच्या जीवनात, आपल्याला नको त्या ताणतणावाला सामोरं जावं लागतं. मग हा तणाव हलका करण्यासाठी आपण निरनिराळे मार्ग शोधत असतो. कोणी दारू किंवा गांजा जवळ करतात, तर कोणी इतर दुसऱ्या व्यसनांना बळी पडतात. मात्र सरळ साधी माणसं निर्मोही अध्यात्माकडे वळताना दिसतात! त्यांनी जर थोडं सावधपणे पाऊल टाकलं तर या गल्लाभरू बाबांचं अजिबात फावणार नाही हे निश्चित! खरंतर अगदी निर्भयपणे मनापासून तुम्ही त्या जगन्नियंत्याचं केवळ नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला ती अद्भूत शक्ती नक्कीच मदत करणार यात शंका नाही. आणि मग कुणा बाबा, महाराज यांच्यामागे जाण्याची गरज उरणार नाही... म्हणजेच पर्यायाने सारखं मृत्यूचं भय वाटणार नाही..! 

   ........  विनोद श्रा. पंचभाई , 9923797725

Friday, November 24, 2023

मिशन मून (अपोलो 11 ते चांद्रयान 3)

मिशन मून अपोलो..११ ते चांद्रयान..३ 
        
        आपल्या पृथ्वीपासून हजारो नव्हे तर लाखो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या चंद्राचे सर्वांनाच फार पूर्वीपासून आकर्षण आणि कुतूहल आहे. या विलक्षण कुतूहलाचा विषय ठरलेल्या चंद्रावर पृथ्वीप्रमाणे पाणी असणार का? तेथील पृष्ठभागावर सजीव सृष्टी असेल का? चंद्रावरील वातावरण कशाप्रकारचे असणार? तेथे गुरूत्वाकर्षण असणार का? अशा अनेक प्रकारच्या रहस्यांची उकल करण्यासाठी सोव्हियत रशिया आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी सर्वप्रथम प्रयत्न सुरू केले. त्यादृष्टीने सद्यस्थितीत चीन आणि भारताचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. १४ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने पाठवलेले लूना-२ हे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले खरे... मात्र दुर्दैवाने हे लूना-२ यान तेथेच नष्ट झाले! तरीही यशापयशाचा विचार न करता रशियाने त्यानंतर कित्येक यशस्वी चांद्रमोहिमा राबवल्या. या स्पर्धेत अमेरिकेने सुध्दा मागे न राहता आपले महत्त्वाकांक्षी 'अपोलो अभियान' यशस्वीपणे राबवून अख्ख्या जगावर वेगळाच ठसा उमटवला. त्यांची अपोलो..११ ही चांद्रमोहीम कमालीची यशस्वी ठरली आणि 'नील आर्मस्ट्रॉंग'च्या रूपाने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले मानवी पाऊल टाकण्याचा बहुमान त्यांना मिळाला. तसेच उत्कंठा वाढवणारी चांद्रयान-२ ही भारताची चांद्रमोहीम आपण यापूर्वी अनुभवली आहेच. त्याचप्रमाणे नुकतीच पार पडलेली आणि कमालीची यशस्वी ठरलेली महत्वाकांक्षी चांद्रयान..३ मोहीम अख्ख्या जगासाठी अभिमानाचा विषय ठरली आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावरील पृष्ठभागावर भारताने चांद्रयान..३ चे विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर ( बग्गी ) अलगदपणे उतरवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या निमित्ताने चंद्राच्या दक्षिण धृवावरील पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. भारताच्या चांद्रयान.. २ आणि चांद्रयान.. ३ या मोहिमांचा अगदी सुरुवातीपासूनचा रोमहर्षक प्रवास तसेच रशिया, अमेरिका आणि चीन या देशांच्या उत्सुकता वाढवणाऱ्या चांद्रमोहिमांच्या विलक्षण सफरींचा सविस्तर आढावा 'मिशन मून' या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच गटातील शालेय विद्यार्थ्यांसोबतच पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचक या सर्वांसाठी 'मिशन मून' हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार याची खात्री आहे. 'मिशन मून अपोलो..11 ते चांद्रयान..3' या प्रेरणादायी पुस्तकासाठी साजेसे मुखपृष्ठ पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार प्रशांत भारताल यांनी रेखाटलं आहे. तसेच अंतर्गत सजावट आणि अक्षर जुळवणी संगीता जावळकर यांनी केली आहे. या दोघांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या पुस्तकासाठी सुरुवातीपासून सतत पाठपुरावा करणारे आणि मेहनत घेणारे प्रकाशक मित्र शैलेंद्र कदम यांना मनापासून धन्यवाद देतो.
 ... विनोद श्रा. पंचभाई
 भ्रमणध्वनी 9923797725

Wednesday, November 22, 2023

श्री गजानन कथासागर... परीक्षण

                                    II श्री ll


 श्री गजानन कथासागर... परीक्षण 

        जगाच्या पाठीवर आजपावेतो कितीतरी बलशाली राजे-महाराजे, सम्राट, सुलतान, हुकूमशहा आले आणि गेले. त्यांची बलशाली सत्ताही कायम न राहता ती धुळीला मिळाल्याचा इतिहास आहे. कित्येकांच्या वारसदारांचं नामोनिशाणही आज अस्तित्वात राहिलं नाही! अख्खं जग जिंकण्याची ईर्षा बाळगून अनेक राज्ये पादाक्रांत करत रुबाबात निघालेला सिकंदर देखील शेवटी अयशस्वी ठरल्यानंतर रिकाम्या हातानंच हे जग सोडून गेला, हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. मात्र या अखिल विश्वावर एकछत्री अंमल कायम टिकून राहिला तो संतांच्या अनमोल विचारांचाच... हे त्रिकालाबाधित सत्य आहे! लौकिकार्थानं अजूनही संतांचंच राज्य या भूतलावर असल्यानं ही चराचर सृष्टी, मानवजात अस्तित्वात आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातील पुढील समर्पक ओव्या वाचल्यावर त्याची साक्ष पटते …

"राजे किती आले, गेले। त्यांचे कायदे नष्ट झाले।

सत्तेचे दरबार उजाडले। परि राज्य चाले संतांचे।।

संतांचा तो प्रचार अमर। अजूनिही लोक-मनावर।

राज्य चालवोनि निरंतर। लाखो जीवां उद्धरितो।।

न लगे सत्तेचा बडगा। नको भयभीतीहि सन्मार्गा।

आपापले कर्तव्य जगा। प्रचारसूर्यचि दाखवी।।"

            लेखक श्री.जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेला विदेही, योगी संत असलेल्या श्री गजानन महाराजांवरील चरित्रात्मक ग्रंथ 'श्री गजानन कथासागर' नुकताच वाचनात आला. हा ग्रंथ वाचताना पदोपदी महाराजांनी आबालवृद्धासाठी केलेल्या अदभूत कार्याचा प्रत्यय येतो. पूजनीय दासगणू महाराज रचित श्री गजानन विजय ग्रंथामध्ये ओव्याच्या स्वरूपात एकवीस अध्यायांचं प्रकटीकरण करण्यात आलं आहे. या एकवीस अध्यायातील ओव्याना अप्रतिम कथांचं स्वरूप देऊन 'श्री गजानन कथासागर'मध्ये कुलकर्णी माऊलीनी भाविक वाचकांसाठी जणू आध्यात्मिक मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून ओघवत्या सुंदर शैलीत लिहिलेल्या या कथा अतिशय वाचनीय झाल्या आहेत.

           शेगाव तीर्थक्षेत्री देविदास पातूरकर यांच्या घरी ऋतूशांतीचा विधी असल्यामुळे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजन झाल्यावर उष्ट्या पत्रावळी पातूरकरांच्या वाड्याबाहेर वडाच्या झाडाखाली टाकल्या जात होत्या. हे वडाचे झाड म्हणजेच श्री गजानन महाराज यांचे प्रकट स्थान! तो दिवस होता 23 मार्च 1878! मार्च महिन्यातील भर उन्हाळ्यातील माध्यन्ह… त्यावेळी एक तेजस्वी युवक वडाच्या झाडाखाली टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्न वेचून खात होता. कदाचित 'अन्न हे परब्रह्म' आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याचवेळी बंकटलाल आगरवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी हे दोन मित्र त्या रस्त्याने जात होते. त्या दोघांचेही त्या युवकांकडे लक्ष गेले. आधी त्यांना युवक वेडसर किंवा भिकारी असावा असे वाटले. मात्र दोघंही धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले असता तो युवक कोणी सामान्य व्यक्ती नसून थोर विभूती असल्याची त्यांना अनुभूती आली…"तो सतेज कांती मनोहर l दंड गर्दन पीळदार l                                                    भव्य छाती दृष्टी स्थिर l भ्रूकुटी ठायी झाली असे ll"  'श्री गजानन कथासागर' या ग्रंथातील हा भावस्पर्शी प्रसंग वाचताना भाविक तल्लीन झाल्याशिवाय राहत नाही आणि सदगदित होऊन नकळत डोळ्यात आसवं उभी राहतात!

          'श्री गजानन कथासागर' या ग्रंथातील दुसऱ्या भागात शेगाव संस्थानच्या अद्वितीय कार्याची माहिती वाचताना 'सेवा हीच खरी साधना' या उक्तीची महती जाणवते! दर्शनार्थी भाविकांसाठी अत्यल्प देणगीच्या स्वरूपात संस्थान मार्फत निवसाची सेवा उपलब्ध आहे. तसेच श्री गजानन महाराज समाधी मंदिर ते बसस्टॅन्ड, रेल्वे स्टेशन आणि आनंद सागर या मार्गावर संस्थानच्या वतीने विनामूल्य बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. संस्थानतर्फे आदिवासी विकास प्रकल्प, अंगणवाडी सेवा प्रकल्प, मुले आणि मुलींसाठी निवासी मतिमंद विद्यालय कार्यरत आहेत. शिवाय गरजूसाठी शाळा, महाविद्यालये, अपंग पूनर्वसन केंद्र, विनामूल्य नेत्रशस्त्रक्रिया अशा अनेक विविध सोयी शेगाव संस्थान तर्फे सातत्याने राबविल्या जातात. श्री गजानन महाराजांची कृपा आणि भाविकांची निस्सीम श्रद्धा यामुळे हे अविरतपणे घडते आहे अशीच संस्थानची धारणा आहे.

           या ग्रंथातील अनेक प्रसंग वाचताना वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाला अशा प्रकारचे प्रसंग अतिशयोक्ती वाटू शकतात. मात्र सिद्धकोटीला पोहचलेले संत, योगी महापुरुष यांच्यासाठी हे सहज शक्य आहे. कोणी त्याला चमत्काराची उपमा देतात तर काही महाभाग अंधश्रद्धा देखील म्हणू शकतात. परंतु जे खरोखरच योगाभ्यासाची महती जाणतात, त्यांनाच योगक्रियेच्या द्वारे घडणारे असे चमत्कारसदृश अनुभव क्षुल्लक वाटतात. सामान्य भाविक मात्र याला श्रद्धारुपी कृपाप्रसाद मानतात, कारण त्यांना अशा विलक्षण प्रसंगाची अनुभूती आलेली असते. ते ती शब्दात व्यक्त करू शकत नाही! आपले भाग्य थोर म्हणून महाराजांचा कृपाप्रसाद मानून स्वतःला धन्य समजतात.

           'श्री गजानन कथासागर' या वाचनीय ग्रंथात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक आलेले असताना त्याठिकाणी गजानन महाराज यांच्या उपस्थितीचा प्रसंग लेखकांनी खूप अप्रतिमरित्या मांडला आहे. त्याचप्रमाणे नागपूरमधील सीताबर्डी भागातील गर्भश्रीमंत व्यक्ती बुटी यांना त्यांच्या गडगंज संपत्तीचा झालेला अहंकार महाराजांनी कोणत्या पद्धतीने उतरवला हे जाणून घेण्यासाठी आणि असे एक ना अनेक भावोत्कट प्रसंग, आश्चर्यचकित घटना अनुभवण्यासाठी या ग्रंथातील कथा प्रत्यक्षात वाचायलाच हव्या.

            लेखक श्री जयंत कुलकर्णी हे स्वतः श्री गजानन महाराजांचे भक्त असल्यामुळे त्यांच्या हातून 'गजानन विजय' या ओवीबध्य ग्रंथाची असंख्य वेळा पारायणे झाली आहेत. त्यामुळे महाराजांच्या कृपाप्रसादनेच 'श्री गजानन कथासागर' हा अप्रतिम कथांचा वाचनीय ग्रंथ प्रत्यक्षात लिहिला गेला अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे. या ग्रंथासाठी महाराष्ट्रचे लोकप्रिय आणि जेष्ठ साहित्यिक श्री.नागेश शेवाळकर यांची अभ्यासपूर्ण आणि प्रवाही प्रस्तावना लाभली आहे. लेखकांनी ग्रंथातील कथा अतिशय साध्या सहजसोप्या भाषेत मांडल्या आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अलंकारिक भाषेचा वापर न केल्यामुळे सर्वसामान्य वाचकांना तसेच भाविकांना सहजपणे या कथाचा आनंदाने रसास्वाद घेत भक्तिरसात चिंब भिजता येईल याची निश्चितच खात्री वाटते. 

             श्री. जयंत कुलकर्णी यांनी दीर्घ कालावधीपासून महाराष्ट्रआतील अनेक वृत्तपत्रात,मासिकात, साप्ताहिकात तसेच निरनिराळ्या दिवाळी अंकात सातत्याने लेखन केले आहे आणि करीत आहेत. त्यांचे स्फूट लेखन, विविध विषयांवरील लेख, वैचारिक तसेच ललित लेख समाजाला आरसा दाखवणारे ठरले आहे. त्यामुळे ते नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. असे असले तरी नुकतेच प्रकाशित झालेले 'श्री गजानन कथासागर' हे त्यांचे पहिलेच पुस्तक आहे. गजानन महाराजांचे आकर्षक मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक शॉपिजेन या आघाडीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले असून ते आता वाचकांसाठी सर्वत्र उपलब्ध आहे. लेखक श्री. जयंत कुलकर्णी यांच्याकडून अनेकानेक उत्तम साहित्यकृतीची अपेक्षा बाळगून त्यांना पुढील साहित्य प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद!

… विनोद श्रा.पंचभाई, पुणे

     भ्र.क्र. ९९२३७९७७२५



 


Tuesday, November 21, 2023

बेफिकीरी नाही बरी!

 "ए आई, आज ना मला सुट्टी आहे. मी जाऊ पियूकडे खेळायला?" संकेत अधीरतेनं म्हणाला.

"अरे थांब जरा, माझं आवरलं की, तुला सोडून येते."

"अगं मी जातो ना एकटाच, इथं जवळच तर आहे पियूचं घर...."

"अरे बाबा, मला माहिती आहे ते, जवळ आहे पण रस्ता ओलांडून जावं लागतं ना.... आणि केवढी रहदारी असते त्या रस्त्यावर!"

"अगं जातो ना मी, तू नकोच काळजी करू... मी व्यवस्थित रस्ता ओलांडतो ना!"

"अरे बाळा, काळजी मी करणार नाही तर कोण करणार? थांब थोडा शांत रहा जरा." आई संकेतला समजावणीच्या सुरात म्हणाली. अशाप्रकारचे प्रसंग आपल्याला नेहमीच घरोघरी बघायला मिळतात.

चिंता करणं किंवा काळजी घेणं हा मनुष्यप्राण्याचा स्वभावधर्म आहे. आईला आपल्या बाळाची काळजी असतेच.. तसेच डॉक्टरला आपल्या रुग्णांची तर शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी लागते! बसचालक असो की रेल्वेगाडीचा चालक असो किंवा विमान चालवणाऱ्या पायलटला पण आपल्या प्रवाशांची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागते. नगरसेवकापासून ते मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या खासदारांना सुद्धा आपल्या मतदार संघातील मतदारांची काळजी घ्यावी लागते... त्यात त्यांचा स्वार्थ असतो हे सांगायला नकोच! प्राणीसुद्धा याला अपवाद नाही. जगाच्या पाठीवरील कुठल्याही प्राणीमात्राला आपल्या पिल्लांची काळजी असते आणि ते साहजिकच आहे म्हणा! काही व्यक्ती इतक्या संवेदनशील असतात, के व्यक्ती इतक्या संवेदनशील जास्त काळजी असक्तःपेक्षा इतरांचीच स्वतःच्या बाबतीत मात्र कमालीचे बाईक चालवताना बहुतांश अनुभव नक्कीच येत असणार, लोकांना एक असताना आपल्या पक्षका साधु पाईत

वाहतुकीचे नियम पाळणे आणि रस्ता ओलांडतानाही काळजी घेणे आवश्यक आहे! कारण आपल्याप्रमाणेच इतरांनासुद्धा त्यांच्या कुटुंबाची काळजी असते ही जाणीव आपल्याला असायला हवी. काही महाभाग कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अगदी बेफाम होऊन सुसाट वेगाने गाड्या चालवताना दिसतात. आपल्यामुळे लोकांना काही त्रास होत असणार हे त्यांच्या गावीही नसते. या अशा प्रकारच्या बिलंदरांना दुसऱ्याबद्दल काही सोयरसुतक नसते आणि स्वतःबाबतही हे लोक कमालीचे बेफिकीर असतात. मग एखाद्या दिवशी जीवावर बेतणारा अपघात झाल्यास पश्चाताप करण्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाहीत! आजकाल बरेच पालक आपल्या



काढायला चुकून आपण विसरलो तर आपली काळजी घेणारे व आपल्याला तो स्टँड काढायची आठवण करून देणारे अनोळखी हितचिंतक हमखास भेटतात. मला वाटतं, अखिल विश्वात आपली सगळ्यात जास्त काळजी करणारे हेच अनोळखी हितचिंतक असावेत नाही का...! त्यांना असंख्य सलाम!


काही महाविद्यालयीन विद्यार्थी कमालीचे संवेदनशील असतात. परीक्षा जवळ आली की त्यांना खूप टेंशन येत असल्याचं जाणवतं ! मग अभ्यासाच्या काळजीपोटी त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होतो. त्यांचा अभ्यास जर वेळेआधी पूर्ण झाला नाही तर ते कुठल्या थराला जाणार याचा काही नेम नसतो. अभ्यास झाला नाही तर त्यांचा भ्रमनिरास होतो. ते खूप लवकर निराश होतात आणि प्रसंगी दुर्दैवाने आत्महत्येच्या आहारी जातात! खरंतर अशा प्रकारच्या विद्याथ्यांना समुपदेशन करणे आवश्यक आहे!


आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेणं जसं आवश्यक आहे तसंच रस्त्यावर वाहन चालवताना आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं सुध्दा अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे


मुलांना शाळेत घेऊन जाण्यापासून तर त्याच्या अभ्यासाची नको तितकी काळजी घेताना दिसतात. काही जणांना तर आपल्या मुलांचं अख्खं होमवर्क पूर्ण करण्याची काळजी घेण्यांचं खूप टेंशन असतं. हे जरा अति होतं, नाही का? करू द्या ना... त्यांचा अभ्यास त्यांना, वेळ पडल्यास तुम्ही मार्गदर्शन करू शकताच ना! तशीही आपल्याकडील स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीमुळे, आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाची काळजी घ्यावीच लागते. आईला ज्याप्रमाणे आपल्या मुलांची काळजी असते, त्याप्रमाणे बरेच प्रामाणिक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेताना दिसतात. शेवटी त्यांच्या शाळेचा निकाल तसंच एकंदरीत दर्जा पण त्यांच्यावरच अवलंबून असतो म्हणा..!

      अखिल विश्वाचं कल्याण होण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी त्या जगन्नियंत्याजवळ पसायदान मागितलं, ते आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी असलेल्या आत्यंतिक काळजीपोटीच! आपणही आपल्या कुटुंबासाठी, समाजातील दीन दुबळ्यांसाठी, आपल्या देशासाठी काळजी असी जाण नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे अशी जाण ठेवायला हवी! मग प्रत्येकाचं जगणं सुसह्य झाल्याशिवाय राहणार नाही.

विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

चाणाक्ष...


          चाणाक्ष...

         दुपारीच सतीशला सरकारी नोकरीची अपॉईंटमेंट ऑर्डर मिळाल्याने तो आज जास्तच खुशीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम मंदिरात जावे व मग सर्व मित्रांना आनंदाची बातमी द्यावी असा बेत त्याने आखला. रात्री जेवण वगैरे आटोपून आपल्या बिछान्यावर तो आडवा  झाला, पण कसचं काय, झोप येईल तर शपथ ! बराच वेळ विचार करण्यात गेला. अंतिम मुलाखतीला जाताना झालेली धावपळ त्याला आठवली. महाराष्ट्र एक्सप्रेसचे रिझर्वेशन वेटींगवर मिळाल्याने जागेसाठी त्याला बरीच खटपट करावी लागली. त्यातल्या त्यात कुठलीतरी मालगाडी रूळावरून खाली घसरल्याने महाराष्ट्र एक्सप्रेस नेहमीपेक्षा तीन-साडेतीन तास उशीराने धावत होती. त्यामुळे सतीशच्या जीवाची सारखी घालमेल सुरू होती. 'आपण वेळेवर पोहचणार की नाही, मुलाखतीसाठी केलेली एवढी तयारी वाया तर जाणार नाही, नाना शंकांनी त्याचे डोके बधीर झाले होते. मात्र सगळ्या संकटांवर मात करून महाराष्ट्र एक्सप्रेस एकदाची पुण्याला पोहचली व सतीशच्या जीवात जीव आला.

    मग रिक्षा करून सतीश के.ई.एम. रूग्णालयाशेजारी असलेल्या मामाच्या घरी पोहोचला पण पाहतो तो काय घराला भलेमोठे कुलूप! त्याने घड्याळाकडे नजर फिरवली, फक्त दीड तास हातात होता. जास्त वेळ न दवडता जवळच असलेल्या संत श्री. गाडगे महाराज धर्मशाळेत येऊन तो तयारीला लागला. तेथेच त्याची भेट राजेंद्र मानकर याच्याशी झाली. योगायोगाने राजेंद्रसुद्धा त्याच्याच गावचा असल्यानं व तोपण मुलाखतीसाठी आल्याचे सतीशला कळून चुकले. सोबतीला राजेंद्र असल्याने त्याला जरा हायसे वाटले. दोघेही सोबतच त्या धर्मशाळेबाहेर पडले व त्यांनी रिक्षाने तडक कार्यालय गाठले. दोघांचेही डोळे घड्याळावरून हलत नव्हते आणि वेळेच्या आत पोहचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. तरीसुद्धा मुलाखतीचे टेंशन मात्र दोघांनाही सारखेच होते. काही वेळाने रिसेप्शनिस्टने नाव पुकारताच सतीशची छाती धडधडू लागली. पण लगेच स्वतःला सावरून मनोमन देवाचं नाव घेत त्याने हॉलमध्ये प्रवेश केला. स्वतःची ओळख करून देत सगळी प्रमाणपत्रे त्याने सादर केली. तेथील अधिकाऱ्यांनी त्याला काही जुजबी पण मार्मिक प्रश्न विचारले. त्याने दिलेल्या उत्तरांनी अधिकाऱ्यांचे बरेचसे समाधान झाल्याचे सतीशच्या लक्षात आले. त्याला मुलाखत घेणारे सर्वच अधिकारी प्रामाणिक वाटले. एकंदरीत सर्वकाही मनासारखे घडल्याने तो समाधानाचा सुस्कारा सोडतच हॉलबाहेर पडला. बाहेर राजेंद्र त्याची  वाट बघतच बसला होता. त्याला उत्सुकता होतीच पण त्याने ती जाणवू दिली नाही. तीन-चार उमेदवारानंतर राजेंद्रचा नंबर आला. सतीशने त्याला बेस्ट लक दिले.

  बराच वेळ झाला तरी राजेंद्र बाहेर येण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी जवळपास एक ते सव्वा तासानंतर राजेंद्र हॉलबाहेर पडला. तो गंभीर व पडेल चेहरा घेऊनच! सतीश लगेच त्याच्याजवळ गेला व खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देऊ लागला. तो काही बोलण्याच्या मनःस्थितीत नाही असे समजून सतीश त्याला घेऊन जवळच्या कॅन्टीनमध्ये आला. दोघांनाही जाम भूक लागली होती. जेवणावर यथेच्छ ताव मारून झाल्यावर राजेंद्र काहीतरी बोलणार अशी सतीश अपेक्षा बाळगून होता. पण एक ना दोन. मुलाखत कशी झाली. कुठले प्रश्न विचारले, नेमके काय घडले असे अनेक प्रश्न विचारूनही राजेंद्र ढिम्मच होता. त्या विषयावर आपण नंतर बोलू असे तो म्हणाला. शेवटी गावाला परतण्याबाबत दोघांचेही एकमत झाले व सतीशने जेवणाचे बील देऊन दोघांनी कँटीन सोडली.

        मध्यरात्री उशिरा झोप लागल्याने सतीशला आईच्या हाकेने जाग आली. डोळे किलकिले करून त्याने घड्याकडे नजर फिरवली. ८-४५ झाले होते. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. कारण रोज तो सकाळी सहा वाजताच स्वतःहून उठून फिरायला जायचा. त्याने लगबगीने अंथरूण सोडले व आवरायला लागला. घाईघाईत अंघोळ वगैरे आटोपून आईसोबत गणपतीच्या मंदिरात गेला. मनोभावे दर्शन घेऊन परतणार तोच त्याला राजेंद्र येताना दिसला. सतीशने आनंदाने उत्तेजित होऊन त्याला पेढा दिला व अपॉईंटमेंट लेटर मिळाल्याची खबर राजेंद्रला दिली. पण त्याने सगळे निर्विकारपणे ऐकून घेतले व संध्याकाळी पार्टी घेण्यासाठी घरी येतो असे बोलून सतीशचा निरोप घेतला.

     सतीश आनंदाच्या भरात जणू हवेतच तरंगत होता. सगळ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना घरी जाऊन त्याने पेढे वाटले. घरी गप्पागोष्टींना उधाण आल्याने कुणाला वेळेचे भानच नव्हते. पण संध्याकाळी भेटू म्हणणारा राजेंद्र पाच वाजताच प्रकटल्याने सतीश व घरच्यांना आश्चर्य वाटले. सोबत असलेल्या बालमित्रांची त्याने राजेंद्रसोबत ओळख करून दिली. मग 'तुला काय आता तर सरकारी नोकरी लागली आहे. तुझ्याकडून सिनेमा बघायलाच हवा.' राजेंद्रने पुढाकार घेतला. तसा सगळ्या मित्रांनी त्याची री ओढली. सतीशने लगेच आईकडे पैशांसाठी तगादा लावला. तिने काटकसर करून गोळा केलेले पैसे त्याच्या हवाली केले.

      राजेंद्रसोबत सतीश व त्याचे मित्र 'नमक हराम' सिनेमाला गेले. तिकिटे अर्थातच सतीशने काढली. सिनेमाचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर घरी परतण्याच्या उद्देशाने सगळी मंडळी बस स्टॉपकडे वळली. तोच राजेंद्रने सतीशला 'पार्टी पाहिजे' म्हणून लकडा लावला. आता मात्र सतीशच्या अगदी जीवावर आले होते. त्याने जवळच्या मित्रांकडून उसनवारीने काही पैसे घेतले व नाईलाजास्तव सगळ्यांना सोबत घेऊन एका हॉटेलात गेला. मसाला डोसा, रसमलई इ. पदार्थाचा राजेंद्रने मनसोक्त आस्वाद घेतला. सतीशने मात्र पोट बिघडल्याची सबब सांगून फक्त ताक घेतले. 'पार्टी' उरकल्यानंतर सगळे बाहेर पडले. तोच विकट, गडगडाटी हास्य करीत राजेंद्र सतीशला म्हणाला,

''अरे दोस्ता मला सुद्धा अपॉईंटमेंट ऑर्डर मिळाली आहे. ही बघ. याची पार्टी मी उद्या नक्की देईन.''

सतीशचा सकाळचा प्रफुल्लीत चेहरा मार खाल्ल्यागत कोमेजून गेला होता. तो व त्याचे मित्र उदास मनाने घरी परतले.

   त्यानंतर राजेंद्रचा पार्टी देण्याचा उद्याचा दिवस कधीच उगवला नाही व पुन्हा राजेंद्र सतीशला भेटला सुद्धा नाही.

विनोद श्रा. पंचभाई, पुणे.

Sunday, November 12, 2023

थरार चोवीस तासातला'

 मनोगत… (थरार! चोवीस तासातला…)

              शहरातील गँगवॉरचा आणखी एक बळी! राजकीय वैमनस्यातून सूड उगवला! संपत्तीच्या वादातून जवळच्या नातेवाईकाचा निर्घृण खून! अशाप्रकारच्या बातम्या कानावर पडणं आता नित्याचंच झालं आहे. त्या आपल्या चांगल्याच अंगवळणी पडल्या आहेत. परंतु काही कारण नसताना एखाद्या व्यक्तीचा हकनाक जीव जातो त्यावेळी मात्र आपल्याला निश्चितच वाईट वाटल्याशिवाय राहत नाही. अशावेळी 'अरेरे… बिचारा नाहक जीवानिशी गेला!' म्हणून समाजात हळहळ व्यक्त होताना आपण पाहतो! कोणी सामान्य माणूस सरळ रस्त्यावरून चालत असताना किंवा रस्ता ओलांडत असताना एखादे अज्ञात वाहन अचानकपणे येऊन त्याला धडकते आणि त्या माणसाला गंभीर इजा पोहचते. कधीकधी त्याच्या प्राणावरही बेतते आणि अशावेळी त्याचा हकनाक जीवही जाऊ शकतो! अशा दुर्दैवी प्रसंगी त्या सामान्य माणसाची काहीही चूक नसताना त्याला आपला अमूल्य जीव गमवावा लागतो. दैनंदिन जीवन जगत असताना अशाप्रकारच्या दुर्दैवी घटना घडताना आपण कधीकधी दूरदर्शनच्या वाहिन्यावर बघत असतो अथवा वृत्तपत्रांत देखील अशा अघटित बातम्या आपल्या वाचनात येत असतात.

              त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती नियतीच्या सापळ्यात अशी काही अडकत जाते… की तिची काहीही चूक नसताना तिच्यावर अनवधानाने जीवघेणा हल्ला होतो आणि तिला आपल्या प्रिय प्राणाला मुकावं लागतं! एका हसत्या खेळत्या आयुष्याचं नकळतपणे एकाएकी होत्याचं नव्हतं होऊन जातं. अशा घटना डोळ्याने बघितल्या किंवा नुसत्या कानाने ऐकल्या तरी सर्वसामान्य माणसाची मती गुंग होऊन जाते, मन बधीर होतं! मग त्यातून सावरायला त्याला वेळही लागतो… सारखी तीच तीच घटना त्याच्या डोळ्यासमोर येत असते!

               माझ्या 'थरार! चोवीस तासातला' या रहस्यमय कादंबरीत एका सरळ साध्या, निष्पाप तरुणीचा तिच्या ध्यानीमनी नसताना, कुठलाही अपराध नसताना तिची नृशंसपणे हत्या करण्यात येते आणि त्यात तिच्या सुंदर जीवनाची अवचितपणे अखेर होते! मनासारखी नोकरी करत सर्व काही नीट, व्यवस्थित सुरू असताना एका क्षणात आयुष्याची राखरांगोळी होऊन जाते. कुणाशी काही देणं घेणं नसताना, ना कुणाच्या अध्यात ना मध्यात असताना एक सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या तरुणीला आपल्या बहुमूल्य प्राणाची किंमत मोजावी लागते! का घडतं असं? तिच्याच बाबतीत असं का घडतं? कोण असतो तिचा अज्ञात मारेकरी? का संपवलं जातं तिला? काय रहस्य असतं तिच्या निर्घृण खुनाचं?

                या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यानंतर उलगडत जाणारं रहस्य जाणून घेण्याचा आगळावेगळा थरारक अनुभव 'थरार चोवीस तासातला' वाचताना रसिकवाचकांना आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ही कादंबरी शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या कादंबरीपूर्वी प्रकाशित झालेल्या "हॉटेल हवेली" आणि "सुगावा…The Clue" या माझ्या दोन्ही विलक्षण रहस्यमय कादंबऱ्यांना वाचकांनी उत्स्फूर्तपणे भरघोस असा प्रतिसाद दिला. अनेकांनी फोन करून त्यावर चर्चाही केली. त्याबद्दल मी रसिकवाचकांचा आत्यंतिक ऋणी आहे.

                 'थरार चोवीस तासातला' या कादंबरीसाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री. नागेश शेवाळकर सरांनी त्यांच्या अनोख्या शैलीत आणि सुंदर,  प्रवाही भाषेत लिहिलेली प्रस्तावना लाभली आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो. प्रसिद्ध चित्रकार श्रीकृष्ण ढोरे यांनी कादंबरीच्या विषयाला साजेसं मुखपृष्ठ चितारलं आहे. तसेच आर्टिस्ट संगीता जावळकर यांनी सुंदर सजावट आणि लेआऊट करून दिले. पुण्यातील 'दुर्वा एजन्सीज'चे प्रकाशक शैलेंद्र कदम यांनी 'थरार चोवीस तासातला'च्या रहस्यमयी कथानकाला पुस्तकरूप बहाल करून दिले. या सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद देतो. 'दुर्वा एजन्सीज' या प्रकाशन संस्थेने आतापर्यंत माझी 'आपले राष्ट्रपती : डॉ. राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद, ओळख भारतीय शास्त्रज्ञाची, हॉटेल हवेली, भारताचे पंतप्रधान : पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी आणि सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रौपदी मुर्मू अशी विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली आहेत. या सर्वच पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आता 'थरार चोवीस तासातला' ही शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी रहस्यमय कादंबरी रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे. धन्यवाद!

 … विनोद श्रा. पंचभाई

     

Tuesday, October 3, 2023

प्रस्तावना... 'चारोळ्या मनातल्या - जनातल्या'

 प्रस्तावना...  'चारोळ्या मनातल्या - जनातल्या'


           लेखक, कवी मित्रवर्य श्री. प्रल्हाद दुधाळ यांचं जगण्यावर तसंच निसर्गावर निरतिशय प्रेम आहे. ते पेशाने बीएसएनएलचे अभियंता असले तरीही मनाने मात्र खूप संवेदनशील आहेत. ही अंतःकरणातील संवेदनशीलता त्यांच्या 'सजवलेले क्षण' आणि 'काही असे काही तसे' या कविता संग्रहातील बहरलेल्या काव्यप्रतिभेतून रसिक वाचकांना पदोपदी जाणवली आहेच! आता 'चारोळ्या मनातल्या - जनातल्या' या आपल्या आगळ्यावेगळ्या कलाकृतीमधून त्यांनी अत्यंत कमी शब्दांतून खूप मोठा आशय व्यक्त करण्याचा स्तुत्त्य प्रयोग रसिकासाठी सादर केला आहे.


             कविता, गझल, चारोळी इत्यादी काव्य प्रकार साहित्याचा सर्वोत्तम आविष्कार असल्यामुळे कवीला ते अतिशय कमी शब्दात व्यक्त होणं आणि नंतर वाचकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहचवणं हे खरं तर आव्हानात्मक आणि जिकिरीचं काम असतं. मात्र दुधाळ सरांनी हे आव्हान 'चारोळ्या मनातल्या - जनातल्या'च्या माध्यमातून लीलया पेललं आहे. या अनोख्या चारोळी संग्रहात त्यांनी विविध विषयांवरील शंभराहून अधिक, एक से बढकर एक अशा अप्रतिम रचना मांडल्या आहेत. त्यातील चारोळ्या आशयसंपन्न आणि विचार करायला लावणाऱ्या तर आहेच, शिवाय काही रचना आजच्या तथाकथित समाजाला आरसा दाखवण्याचंही काम करतात. त्याचप्रमाणे प्रेमी जीवांना हुरहूर लावणाऱ्या, काळजाला हात घालणाऱ्या अन थेट पंढरीच्या वाटेची गोडी लावणाऱ्या रचना वाचताना वाचक अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाहीत!


         "पाठीवरती घ्यावी थाप,

          हात असे आता उरले कुठे?

          लोटांगण घ्यावे तयाशी,

          पाय असे आता उरले कुठे?" अशाप्रकारची मर्मस्पर्शी खंत 'उरले कुठे? या चारोळीतून व्यक्त करताना कवी आजच्या कोडग्या वृत्तीच्या राजकारण्यांनाही इशारा देताना त्यांच्या एका चारोळीत म्हणतात…

             ''सच्चे, शिक्षित व संस्कारी

              निवडून असे देऊ कारभारी!

              भ्रष्ट, कोडगे हाकलून द्यावे,

              येईल समृद्धी देशाच्या दारी!''


           कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कवी अगदी रोखठोकपणे जगण्याला प्राधान्य देताना दिसतात. तसेच ते आत्मसन्मानाने जगण्याचा संदेशही देतात. त्यांच्या पुढील 'आव्हान' या चारोळीतून त्याची प्रचिती येत असल्याचं प्रकर्षानं जाणवतं…

      "आलोय मेटाकुटीला पेलताना

      इथल्या या जगण्यातले आव्हान..!

        कसे काय राखत बसावे भान

        घडोघडी सोडून आत्मसन्मान..?"


            त्याचप्रमाणे दैनंदिन जीवन जगत असताना सामाजिक भान राखण्याची आपल्याला किती नितांत आवश्यकता आहे हे त्यांच्या पुढील काही चारोळ्यामधून दिसून येईल. ते आजच्या तरूणांना निश्चित दिशा दाखवण्यासाठी म्हणतात…

             "विचारांची दिशा             

                बदल रे थोडी.

               वाढेल निश्चित

              आयुष्याची गोडी!"


तसेच आपल्या माय मराठी भाषेविषयीची तळमळ व्यक्त करताना कवी…

            "शिवजयंती, महाराष्ट्र दिनाला

               मराठीचा नगारा वाजतो.

                 एरवीला मराठी माणूस,

                घरातही इंग्रजीच बोलतो!"

  अशाप्रकारचे खडे बोल सुनावण्यास कमी करत नाही. तसंच आपल्या आसपास वावरणाऱ्या माणसांची ओळख ही त्यांच्या वागण्या बोलण्यातून तर होतेच पण खरी ओळख मात्र त्यांच्या विचारातूनच होत असते. हे अधिक स्पष्ट करताना कवी दुधाळ निर्भीडपणे व्यक्त होतात…   "अशी माणसे ही 

      कशी माणसे..?                     खुजी विचाराने

    नव्हे माणसे ही…!"


          त्यांची अफाट निरीक्षणक्षमता आणि समाजाविषयीची जागरूकता पुढील काही चारोळ्यामधून प्रकर्षाने जाणवते. त्यावर गांभीर्याने चिंतन करणे नितांत गरजेचं आहे असं वाटतं…

    "निसर्ग चक्राशी खेळणं

     आतातरी थांबायला हवे.

    प्रकोप झाला निसर्गाचा

     त्यावरून शिकायला हवे!"


                     "धन दौलत बंगला गाडी

                   व्यर्थ जर नाही तेथे नीती,

                      माणुसकी धर्म हवा     

                    अन् दिलदार मनाची श्रीमंती!"                                 

 

     "सांभाळूनच जरा मुली   

      नाजूक तुझी गं पावलं

       थिरकू दे तालासुरात

       दाखव कौशल्य आपलं!" 


                           "जरी दाटले मळभ,

                           तरी सोडू नये आस.

                          कोंदटली जरी हवा,

                        मातीचा येतोय वास!"


        कवी प्रल्हाद दुधाळ यांची पंढरीच्या विठूमाऊलीवर अढळ श्रद्धा आहे. सरळ साधं आयुष्य जगत असताना ऐहिक सुखाच्या मागे न धावता हरिनामाचं महत्त्व ते पटवून देतात. अतिशय कमी शब्दात ते नामाचा महिमा मांडताना म्हणतात ...          "नामाचा महिमा वर्णावा तो किती           ब्रह्मानंदी टाळी घेता विठूनाम..!               नाचती ठेक्यात टाळ मृदंगाच्या             भक्तीच्या या उत्सवी नुरते भान..!"             


      "ऐहिक सुखाचा मार्ग तो जीवघेणा                                                 

        पांडुरंग नामाने डोळे ओलावले..!                                                                

     आषाढी भीमेकाठी वैष्णवांचा मेळा  

         पाय पंढरीच्या वाटेने ओढावले!"


         चारोळी काव्यप्रकारात केवळ चार ओळीत किती मोठा मतितार्थ दडलेला असतो हे उलगडताना त्या अवघ्या चार ओळी प्रभावीपणे कशा मांडता येतील हे खरं कसब कवीच्या ठायी असावं लागतं. कवी प्रल्हाद दुधाळ यांनी हे शिवधनुष्य उत्तमरित्या पेललं असल्याचं वाचकांना त्यांची प्रत्येक चारोळी वाचताना जाणवेल हे निश्चित! त्यांच्याच शब्दात...

           "मोजक्या शब्दांची

              अर्थपूर्ण मोळी

               संवाद साधते

           छोटीशी चारोळी!" असा संवाद साधत त्यांनी पुढील चारोळीतून नाती फुलवण्याचा अनमोल संदेश देत मानवी जीवनातलं चैतन्य अधोरेखित केलं आहे…                                                                                                              "माया ममतेचा फिरता हात                                                        घराचे या सुंदर होते गोकुळ.                                                        संवादानेच फुले नातीगोती                                                     जीवनातल्या चैतन्याचे मूळ!"


           'चारोळ्या मनातल्या - जनातल्या' या अप्रतिम कलाकृतीसाठी लेखक, कवी श्री. प्रल्हाद दुधाळ यांचे मनापासून अभिनंदन! तसेच त्यांच्या पुढील दर्जेदार साहित्य सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा!


…विनोद श्रा. पंचभाई, पुणे

    भ्रमणध्वनी : 9923797725

Thursday, September 28, 2023

थरार चोवीस तासातला... प्रस्तावना

 

प्रस्तावना...

*थर.. थर्र...थर्रारक कथानक!*
     रहस्यमय, गुढकथा म्हटलं की, अनेक नावं ठळकपणे समोर येतात ती म्हणजे बाबुराव अर्नाळकर, रत्नाकर मतकरी,  सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर, मुरली खैरनार, नारायण धारप, संजय सोनवणी, सदानंद भणगे इत्यादी. या यादीत एक नाव लक्षवेधीपणे समाविष्ट होते आहे ते म्हणजे विनोद श्रा. पंचभाई! 'हॉटेल हवेली' आणि 'सुगावा...The Clue' या दोन रहस्यमयी कादंबऱ्यानंतर पंचभाई यांची 'थरार चोवीस तासातला' ही नवी कोरी कादंबरी वाचकांच्या हातात येत आहे.
     विनोद श्रा. पंचभाई हे नाव साहित्य क्षेत्रात सर्वदूर परिचित आहे. ते केवळ रहस्य कथालेखक नाहीत तर ऐतिहासिक, चरित्र लेखन यासोबत त्यांनी बाल साहित्याचेही लेखन विपुल प्रमाणात केले आहे. एक अष्टपैलू साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. साहित्याच्या प्रांगणात मुक्तपणे विहार सुरू असताना लेखक पंचभाई रहस्यमयी कथालेखनाकडे का वळले असावेत याचे रहस्य ते ज्या खात्यात नोकरीला होते त्या पोलीस बिनतारी संदेश खात्यातील त्यांच्या सखोल अनुभव आणि अभ्यासाला द्यावे लागेल.
    साहित्य लेखन हा प्रकार तसा अवघडच! भरपूर वाचन, चिंतन, मनन, अनुभवाची शिदोरी यासह अनेक रस लेखनात येत असतात पण त्यासोबतच लेखकाचा आत्मविश्वास, धाडस अशा बऱ्याच गोष्टी लेखकाजवळ असायला हव्यात. इतर लेखनापेक्षा रहस्य, गुढ लेखन बरेच अवघड, गुंतागुंतीचे असते! रहस्य कथा म्हटलं की, कुणाच्या अंगावर रोमांच थरथरतो, कैक जणांच्या शरीरावर भीतीचे शहारे येतात तर अनेकांच्या मुखातून भीतीयुक्त चित्कार बाहेर पडतात. अनेकदा वाचक पुस्तकातील भीतीदायक मजकूर वगळून इतर कथानक वाचतो किंवा हातातील पुस्तक बाजूला ठेवतो आणि सुटकेचा निःश्वास सोडतो. अशाप्रकारचे लेखन करत असताना लेखकाची अवस्था नेमकी कशी होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! कारण कथानकातील प्रत्येक प्रसंग त्याला व्यक्तिशः जिवंत उभे करावे लागतात तसे करताना त्यांना भीती, हुरहूर‌ वाटत नसेल का? त्यांना प्रत्येक प्रसंग आणि शब्द अनुभवावा लागतो.
     'थरार चोवीस तासातला' ही अशीच एक विलक्षण रहस्यमय कादंबरी आहे. रहस्य कथा म्हटलं की, बहुतेक कथानकात खुनाची पार्श्वभूमी असते. या कादंबरीचा थरार अगदी कादंबरीच्या पहिल्या परिच्छेदापासून सुरू होतो... आय टी अभियंता असलेल्या तरुणीच्या खुनाने! या थरारक कादंबरीचे रहस्य केवळ चोवीस तासात उलगडले जाते हे आपल्या पोलीस खात्याचे यश, तत्परता, चातुर्य सिद्ध करणारे आहे.
    या कादंबरीत अंजली, अनुश्री, सोनम, मोनाली, सतीश, राकेश ही प्रमुख पात्रं आहेत. त्यांच्यासोबत अनुश्रीचे मामा-मामी, अंजलीचे आई-बाबा, अभिजित, राणे, वाॅचमन काशीनाथ, हरिया आणि त्याचा गुत्तेदार अशा काही पात्रांची नाममात्र उपस्थिती चंचुप्रवेश ठरते परंतु वाचकांच्या मनातील खुनी कोण यावर विचार करण्यासाठी रहस्यमय ठरते.
   अंजली -अनुश्री, सोनम-मोनाली या मैत्रिणींच्या दोन जोड्यांमध्ये स्वभाव, राहणीमान, वागणूक यात भिन्नता असली तरीही कॉलेजमधील होस्टेलच्या एका खोलीत त्या एकत्रित राहतात. अंजली -अनुश्री या दोघी बालपणापासून ते  महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकत्रच शिकतात. दोघींच्या मैत्रींची वीण इतकी घट्ट असते की, दोघी एकमेकींच्या संकटात धावून जातात. दोघींची राहणी एकदम साधी, सुसंस्कारित असते. दुसरीकडे सोनम-मोनाली यांचे वागणे एकदम विपरित असते, या दोघींचे वागणे अंजू-अनुला आवडत नाही पण चौघीही सोबत राहतात. सोनमच्या वाढदिवसाचा प्रसंग चौघी मैत्रिणींच्या स्वभावातील फरक स्पष्ट करणारा आहे.
     सतीश हा अनुश्रीचा मामेभाऊ! तोही नोकरीच्या निमित्ताने पुणे शहरात येतो. त्यावेळी अनुश्रीमुळे त्याचा अंजलीशी परिचय होतो. हा परिचय नंतर मैत्रीत बदलतो. मग मैत्रीचे सान्निध्य प्रेमात रुपांतरित व्हायला वेळ लागत नाही. मैत्रीचं बीज आणि प्रेमाचा सुकोमल अंकुर उमलत असताना पाच वर्षे लोटतात. परंतु तीव्र इच्छा असूनही पुढाकार कुणी घ्यावा या विचारात पाच वर्षे निघून जातात. वाचक ज्या गोष्टीची वाट पाहतात; सतीश शेवटी स्वतःचं मन अंजलीकडे मोकळं करतो. अंजलीही त्याला लगेच होकार देते आणि सतीश तिला भेटायला जातो तेव्हा एक अनपेक्षित वळण कथानकात येते... ते म्हणजे एक खून! कथानकाला वेळोवेळी अनपेक्षित वळण देण्यात लेखक विनोद श्रा. पंचभाई यांची लेखणी वाकबगार आहे.
     विशेष म्हणजे खून झालेल्या तरुणीला रहस्यमय कादंबरी वाचण्याची आवड असते. योगायोग म्हणावा की, दैवदुर्विलास म्हणावा की निसर्गाची करणी म्हणावी कारण तिचा खूनही रहस्यमय मार्गानेच होतो.
    या कादंबरीत मैत्रीचे वेगवेगळे पदर गुंफण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. अंजली -अनुश्री, सोनम-मोनाली, सतीश- अंजली, सतीश-राकेश आणि अंजलीच्या बाबांचे मित्रमंडळ हे सर्व जण एकमेकांना संकटसमयी जी मदत करतात तेव्हा पूर्वापार चालत आलेल्या मैत्रीची व्याख्या दृढ होते! ती म्हणजे,'संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र!'
    तरुणीच्या खुनानंतर पोलीसांचे चक्र वेगाने फिरत असताना ते सतीश, मोनाली, राकेश, अंजली यांच्या भोवती गरगरत असते. पोलिसांनी खुनाचा तपास करण्यासाठी वापरलेले सीसीटीव्ही फुटेजचे तंत्र आणि संशयित व्यक्तीचं लोकेशन तपासणं कौतुकास्पद आहे. तसेच लग्न करून दुबईला गेलेली मोनाली अचानक पाच वर्षांनी पुण्याला येते तीही अंजलीच्या सदनिकेत राहते. त्याचवेळी वाचकांच्या संशयाची सुईही विविध व्यक्तिरेखांकडे वळते; अगदी सतीश-अनुश्री यांच्याकडेही! कारण ही दोघे नात्याने मामेभाऊ - बहीण असतात आणि या नात्यांमध्येही विवाह होऊ शकतो.
    संशयित आरोपींची चौकशी सुरू असताना पोलिसांची चातुर्यता, कुशाग्र बुध्दी, बारीक नजर, दृढता इत्यादी गोष्टी वाचकांच्या दृष्टीसमोर आणण्यासाठी लेखक तन्मयतेने प्रसंगाचे वर्णन करतात आणि खून झालेली तरुणी कोण? तिचा खुनी कोण? या रहस्यावरचा पडदा बाजूला करतात तोही केवळ चोवीस तासात! पोलीस वर्ग... सलाम!
    कादंबरीत सतीशचा मित्र राकेश हा नोकरीसाठी कर्ज काढून लाखो रुपये देऊ करतो ही बाब खूप चिंतनशील तर आहेच परंतु एक जळजळीत सत्य उजागर करणारी आहे. सोबतच मैत्रीचे नाते निभावताना सतीश क्षणाचाही विलंब न करता होकार भरतो नि मित्राला लाखो रुपयांची मदत करतो ही बाब लक्षणीय आहे.
    या रहस्यमय कथानकाचे एक वैशिष्ट्य जाणवणारे आहे ते म्हणजे यातील संवाद! विशेषतः अंजलीचे बाबा दवाखान्यात 'आयसीयू'मध्ये असताना तिचा आईशी झालेला संवाद असेल किंवा अंजली -अनुश्री या दोघींमध्ये झालेली चर्चा असेल अत्यंत हृदयस्पर्शी आहेत.
   पोलीस आणि वाचकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विनोद श्रा. पंचभाई यांची 'थरार चोवीस तासातला' ही कादंबरी वाचायलाच हवी. अत्यंत साध्या, सरळ, सोप्या भाषेत परंतु वेगवेगळे वळण घेत उद्दिष्टांपर्यंत पोहोचणारी ही कादंबरी वाचनीय आहे, रहस्यमय असली तरीही कंटाळवाणी नाही! मित्रवर्य विनोद श्रा. पंचभाई यांच्या सर्वंकष लेखनासाठी भरपूर शुभेच्छा! धन्यवाद!
         ००००
      नागेश सू. शेवाळकर, पुणे
     भ्रमणध्वनी...९४२३१३९०७१

संस्काराचे विचारदुर्ग...

 

संस्काराचे विचारदुर्ग...

"जाति न पुछो साधू की
पूछ लिजिए ज्ञान।
मोल करो तलवार का
पडी रहेन दो म्यान ।।"
या संत कबीर महाराजांच्या दोह्यानुसार संतांना वेगवेगळ्या जातीपातीत न अडकवता त्यांनी अखिल मानवजातीसाठी दिलेला एकात्मतेचा संदेश युवा कीर्तनकार असलेले लेखक रमेश वाघ यांनी 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' या आपल्या पहिल्यावहिल्या दर्जेदार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. 'ज्ञानियांचा राजा' ज्ञानोबा माउलीपासून ते समर्थ रामदास स्वामी यांच्यापर्यंत एकूण दहा थोर संतांच्या अलौकिक कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक नुकतेच पुण्यातील ख्यातनाम प्रकाशन संस्था 'चपराक' तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
जगाच्या पाठीवर आजपावेतो कितीतरी बलशाली राजे-महाराजे, सम्राट, सुलतान, हुकूमशहा आले आणि गेले. त्यांची कायम न टिकणारी सत्ता देखील धुळीला मिळाली. अख्खं जग जिंकण्याची ईर्षा बाळगून अनेक राज्ये पादाक्रांत करत रुबाबात निघालेला सिकंदरही शेवटी त्याच्या मनसुब्यात अयशस्वी ठरल्यानंतर रिकाम्या हातानंच हे जग सोडून गेला, हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. मात्र या अखिल विश्वावर एकछत्री अंमल कायम टिकून राहिला तो संतांच्या अनमोल विचारांचाच... हे त्रिकालाबाधित सत्य कोणीही नाकारू शकत नाही! लौकिकार्थानं अजूनही संतांचंच राज्य या भूतलावर असल्यानं ही चराचर सृष्टी, मानवजात अस्तित्वात आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातील पुढील समर्पक ओव्या वाचल्यावर त्याची साक्ष पटते ...
"राजे किती आले, गेले। त्यांचे कायदे नष्ट झाले।
सत्तेचे दरबार उजाडले। परि राज्य चाले संतांचे।।
संतांचा तो प्रचार अमर। अजूनिही लोक-मनावर।
राज्य चालवोनि निरंतर। लाखो जीवां उद्धरितो।।
न लगे सत्तेचा बडगा। नको भयभीतीहि सन्मार्गा।
आपापले कर्तव्य जगा। प्रचारसूर्यचि दाखवी।।"

लेखक रमेश वाघ हे पेशाने शिक्षक असून त्यांचं विद्यार्थी घडवण्याचं निरंतर कार्य अभिमानास्पद आहेच. आता 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' या संतांची मांदियाळी असलेल्या त्यांच्या अनोख्या पुस्तकातून, त्यातील संतांच्या अमूल्य विचारांच्या माध्यमातून संस्कारक्षम 'माणूस' घडवण्याचं कार्यही निश्चितच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. तरीही ते त्यांच्या मनोगतातून "आपुलिया बळे नाही मी बोलत। सखा कृपावंत वाचा त्याची।।" अशाप्रकारच्या प्रामाणिक भावना व्यक्त करतात.

या विचारदुर्गात ज्ञानोबा माउली, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबाकाका, नरहरी सोनार, सेना महाराज, चोखामेळा, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी अशा एकूण दहा महनीय संतांच्या चरित्रांची अतिशय साध्या,सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तकाचे प्रत्येक पान वाचताना वाचक 'भावविभोर' होऊन जातो आणि त्याचं अंत:करण हेलावल्याशिवाय राहत नाही! अनेक मार्मिक आणि भावस्पर्शी प्रसंग, त्यांना अनुसरून लिहिलेली प्रभावी संवादशैली ही 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' ची खासियतच म्हणावी लागेल. या पुस्तकातील एकच प्रसंग याठिकाणी नमूद करतो...
एकनाथ महाराज एकेदिवशी गोदावरीवरुन स्नान करून येत होते. रस्त्यामध्ये एक माडी होती. तिथे एक यवन पान खाऊन खिडकीमध्ये बसलेला होता.
तो नाथांच्या अंगावर थुंकला. नाथ पुन्हा गोदावरीवर गेले. आंघोळ करून परतले. पुन्हा तो थुंकला! असं एकशे आठ वेळा घडलं. नाथ काहीच बोलले नाहीत. त्यानंतर तो यवन नाथांना शरण आला व म्हणाला, "माझं चुकलं महाराज, मला क्षमा करा."
नाथ म्हणाले, "तुझं काहीच चुकलं नाही. उलट तुझ्यामुळे मला गोदावरीचं एकशे आठ वेळा स्नान घडलं त्यासाठी मीच तुझे आभार मानावयास हवेत."
काहीही झालं तरी कुणावर रागवायचं नाही हे नाथांचं ठरलेलं होतं. किती सहनशीलता... केवढा मोठा मनाचा संयम! हल्ली आपण बघतो, अगदी क्षुल्लक गोष्टींवरून सुध्दा आपल्याला राग येतो. मनाचा संयम, सहनशीलता जणू लुप्त होत चाललीय! या पुस्तकातील महान संतांच्या चरित्रांचे वाचन केल्यानंतर त्यांच्या अलौकिक विचारांचं निदान काही अंशी तरी आपण सामान्य जणांनी आचरण केलं तरी हे अनोखं पुस्तक लिहिण्याचं सार्थक होईल असं वाटतं.
'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' हे खरंतर संस्कारांचं विचारदुर्ग आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक पालकानं आपल्या मुलांसाठी आवर्जून संग्रही ठेवावं असं सुचवावसं वाटतं.
एक दोन नव्हे तब्बल दहा संतांच्या चरित्रांना पुस्तक रूप बहाल करणार्या अवलिया संपादक, प्रकाशकाचं, घनश्याम पाटील यांचं विशेष कौतुक आणि जोरदार अभिनंदन करायलाच हवं. तसेच विषयाला अनुसरून अप्रतिम मुखपृष्ठ साकारणारे चित्रकार संतोष घोंगडे यांचंही अभिनंदन! या 'विचारदुर्ग'चे विचारवंत लेखक रमेश वाघ यांच्याकडून आणखी बर्याच चिंतनशील, वैचारिक कलाकृतींची अपेक्षा करायला हरकत नाही. त्यांना त्यांच्या भावी लेखनकार्यास मनापासून शुभेच्छा!!

विनोद श्रा.पंचभाई, पुणे
भ्र.क्र. ९९२३७९७७२५


 

मोगरा... प्रस्तावना

 प्रस्तावना...


पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे... 'प्रॉब्लेम कुणाला नसतात, ते अगदी शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक प्रॉब्लेमवर तोडगा हा असतोच. तो सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं हवी असतात. या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो !'


तसंच आपल्या आयुष्यात येणारे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा गुंते देखील प्रयत्न केल्यास सुटू शकतात. ते कधीही सुटणार नाहीत असा आपण उगाच समज करून घेतो. मात्र आयुष्यातील प्रॉब्लेम किंवा गुंता सोडवण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो, अशावेळी पेशन्स महत्वाचे ठरतात! असे हे न सुटणारे गुंते कधी नातेसंबंधातले असतात तर कधी मैत्रीमुळे निर्माण झालेल्या ऋणानुबंधामधील किंवा प्रेमसंबंधातील असतात. बरेचदा नातेसंबंधांमधील गुंता हा अगदी क्षुल्लक कारणावरून किंवा गैरसमजातून निर्माण होताना दिसून येतो. गैरसमज वाढले की जिवाभावाची घट्ट मैत्री सुद्धा क्षणात तुटताना आपण पाहतो. तसेच आपसातील निस्सीम प्रेमातही कमालीचा दुरावा वाढतो.


लेखक दत्तात्रय वायचळ यांनी त्यांच्या 'मोगरा' या कादंबरीच्या माध्यमातून अतूट मैत्रीतून निर्माण झालेले ऋणानुबंध आणि त्यानंतर त्यातून अंकुरत गेलेल्या प्रेमभावना यांचा विलक्षण आविष्कार संवादशैलीतून सादर केला आहे. कुठेही बोजड, क्लिष्ट शब्द तसंच अलंकारिक भाषा न वापरता सहजसोप्या भाषेत त्यांनी मांडणी केली आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीयझाली आहे. या 'मोगरा' कादंबरीपूर्वी त्यांची 'गजरा' आणि 'स्वप्नातलं पुणं' ही दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या दोन्ही पुस्तकांना रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.


कुण्यातरी विचारवंताने म्हटलंच आहे, 'अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही. स्वतःचे अस्तित्व, आपले कुटुंबातील तसेच समाजातील स्थान यांची जर निश्चित जाणीव असेल तर तुमचे कोणाशिवाय काहीही अडणार नाही. दुसऱ्यांवर प्रेम जरूर करा मात्र त्याआधी स्वतःवर प्रेम करायला शिका !' प्रेम आणि मैत्री या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या विषयावर अनेक लेखकांनी कथा, कविता, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. मात्र लेखक दत्तात्रय वायचळ यांनी त्यांच्या 'मोगरा' या कादंबरीत प्रेम आणि मैत्री या मानवी भावना परिणामकारकरित्या अधोरेखित केलेल्या आहेत. तसे पाहता या कादंबरीत मुख्य पात्र चारच आहेत... अनिता, विद्या, सुरेश आणि सुशांत! अनिता, विद्या आणि सुरेश हे तिघे बालपणीचे जिवाभावाचे मित्र. कालांतराने तारुण्यसुलभ वयात आल्यावर त्यांच्यात नैसर्गिकरित्या एकमेकांविषयी ओढ निर्माण होते, आपुलकी वाढते. एकमेकांप्रती वाटणारा कमालीचा जिव्हाळा, प्रेम वाढीस लागते. या वयात एकमेकांबद्दल एकप्रकारची ओढ वाटणे स्वाभाविकच असते. आणि मग एक दिवस अनिताच्या आयुष्यात अचानक सुशांतचा प्रवेश होतो. खरंतर सुशांत हा सुरेशचा जिगरी दोस्त असतो. मात्र त्याबाबत अनिता आणि विद्या पूर्णतः अनभिज्ञ असतात. मग अशा दोलायमान अवस्थेत सुरू होते अनिताच्या मनाची जीवघेणी घालमेल... बालपणीचा मित्र सुरेश की कॉलेजच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने अचानक भेटलेला सुशांत! त्यावर काहीतरी तोडगा काढता यावा म्हणून ती तिची जिवलग मैत्रीण विद्याजवळ आपलं मन मोकळं करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात पुण्यात असलेला सुरेश नेहमीसाठी सुशांतकडे मुंबईला येणार असतो. त्यावेळी सुशांतला आपल्या खास मित्राला एक खास सरप्राईज द्यायचं असतं!


काय असतं सुशांतचं सरप्राईज ? सुरेश, अनिता आणि सुशांत यांच्या प्रेमाच्या ट्रॅगलमध्ये कोण जिंकतं? तसंच सुरेशवर मनापासून प्रेम करणाऱ्या विद्याचं काय होतं? सुरेश आणि सुशांत यांच्या घट्ट मैत्रीचं शेवटी कायहोतं? विलक्षण प्रेमाचा आणि अतूट मैत्रीचा गुंता शेवटी कशाप्रकारे उलगडला जातो ? अशा स्वाभाविकपणे उद्भणाऱ्या प्रश्नांची उत्तरे रसिक वाचकांना या कादंबरीतील प्रभावी संवादातून मिळतात. 'मोगरा' मधील सरळसाधी, प्रवाही भाषा आणि संवादशैली लेखक दत्तात्रय वायचळ यांची खासियत आहे हे येथे आवर्जून नमूद करावे लागेल. त्यामुळेच ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. 'मोगरा' कादंबरीसाठी लेखकाचं आणि प्रकाशक मित्र विलास पायगुडे यांचं मनापासून अभिनंदन ! पुढील लेखनप्रवासाठी खूप खूप शुभेच्छा !


विनोद श्रा. पंचभाई लेखक, पुणे


९९२३७९७७२५

Sunday, July 9, 2023

एका समर्पित आणि प्रेरणादायी जीवनाची अखेर!

 


एका समर्पित आणि प्रेरणादायी जीवनाची अखेर!

               आई वडील यांच्यानंतर नतमस्तक व्हावं असं जिव्हाळ्याचं, आपुलकी वाटावं असं श्रद्धास्थान म्हणजे प्रत्येकाला माया लावणारी, आदरणीय जिजाबाई! एक हक्काचं ठिकाण... मुक्काम पोस्ट नांदुरा (पुलाचा) तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ. लहानपणी शाळेत शिकत असताना नागपूर येथून नांदुऱ्याला नेहमी जाणं व्हायचं. कधी आईच्या मागे लागून तर कधी आमच्या दादांसोबत! त्यावेळी मला आठवतं जिजाबाईच्या घरी समोरच दर्शनी भागात एक छोटंसं किराणा दुकान होतं... ते श्यामदादांना आणि जिगरी दोस्त शिवाजी राजेंना ( तात्याला ) चांगलंच आठवत असणार! त्यावेळी त्या बालवयात दुकानातून गोळ्या, बिस्किटे खायला मिळणं म्हणजे पर्वणीच असल्यामुळे आमची मस्त चंगळ असायची. जवळपास सारख्याच वयाचे असल्यामुळे माझी शिवाजीसोबत सुरुवातीपासूनच मस्त गट्टी जमली होती. मग शेजारी राहत असलेले तानाजी, गुणाजी आणि इतर दोस्त मंडळी जमली की बेंबळा नदीच्या पात्राच्या परिसरात हुंदडायला मजा वाटायची. त्यावेळी बेंबळा नदीला भरपूर पाणी असल्यामुळे आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आल्हाददायक वाटायचा!
                  मनासारखं हुंदडून झाल्यावर मग मनसोक्त खेळून घरी परतलो की कधीकधी काका शिवाजीवर ओरडायचे. तेव्हा आम्ही सर्व जण खूप घाबरून जायचो. मात्र त्यावेळी जिजाबाई लगेच मध्ये पडून आमची बाजू घ्यायची. सर्वांना प्रेमानं समजावून सांगायची,
"बाळांनो नदीचं पाणी वाहतं असते, त्यापासून दूर राहायचं! तिकडे उन्हातान्हात जास्त वेळ भटकत जाऊ नका... वाटल्यास इकडे आपल्या घराजवळ दिवसभर खेळा... भूक लागली की मला सांगा!"
नंतर आम्हाला भूक लागली की गाईच्या दुधासोबत गरम भाकरी खायला द्यायची. त्या दुधात कुस्करून खाल्लेल्या भाकरीची चव विसरणं शक्यच नाही. आपल्या गालावरून हात फिरवून प्रेमानं, अतिशय आत्मीयतेनं बोलण्याची, समजावून सांगण्याची त्या माऊलीची तऱ्हा खरंच जगावेगळी होती! मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, बालपणीचा काही काळ तरी जिजाबाईच्या प्रेमळ आणि निर्मळ सहवासात गेला. तिनं कधी कुणाला रागावलेलं, मारलेलं मी तरी बघितलं नाही. उलट घरातील मुलं रुसून बसली की, ती अत्यंत मायेनं त्यांना जवळ घ्यायची... त्याची किंवा तिची समजूत काढायची... खरंच तिच्यासारखी आई होणे नाही! कधी कोणी नाराज झालं किंवा कोणामध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून काही धुसफूस झाली तर ती कशी निस्तरायची हे तिला चांगलं ठाऊक होतं. अतिशय शांततेनं कुठलंही प्रकरण मिटवून टाकण्यात तिचा हातखंडा होता!
           त्या काळचा एक प्रसंग आठवतो... त्या वेळी मी आणि शिवाजी बहुतेक सातवीत किंवा आठव्या वर्गात होतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे आमच्या दादांसोबत मी नागपूरहून नांदुऱ्याला आलो होतो. दुसऱ्या दिवशी दादा नागपूरला परत गेले पण मी हट्ट करून तिथंच राहिलो. मग जिजाबाई आणि शिवाजीसोबत कधी शेतात जायला मिळायचं तर कधी नदीवर... त्यावेळचा तिथल्या प्रसन्न वातावरणाचा तो अनुभव माझ्यासाठी खूप विलक्षण होता! असाच एक दिवस घरातील बैलांना आंघोळ घालण्यासाठी म्हणून बैलजोडी घेऊन नदीवर जायला शिवाजी आणि मी निघालो होतो. त्यावेळी जिजाबाईनं मला बजावलं होतं, "जास्त पाण्याकडे अजिबात जायचं नाही, काठावरच थांबून राहायचं!" सोबत शेजारचा गुणाजी पण होता.  नदीच्या पात्राजवळ पोहचल्यावर बैलांना पाण्यात सोडून त्यांच्या पाठोपाठ शिवाजीही गेला. गुडघाभर पाण्यात थांबून त्यानं बैलांना धुणं सुरू केलं. मी काठावर उभा राहून मजा पाहत होतो आणि आमच्या गोष्टी पण सुरू होत्या. तेवढ्यात शिवाजीनं मला पाण्यात येण्याचा इशारा केला. मात्र त्या वेळी मला पोहता येत नसल्याने पाण्यात उतरण्याचं धाडस होत नव्हतं!
           शेवटी एका बैलाला घेऊन शिवाजी काठाजवळ आला आणि मला म्हणाला, "या बैलाची शेपटी घट्ट धरून ठेव आणि हळूहळू सोबत पाण्यात ये... घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहेच!" मग मी त्या बैलाची शेपटी धरली आणि सर्व धैर्य एकवटून त्याच्या मागोमाग पाण्यात उतरलो. सुरुवातीला खूप मजा वाटली. मात्र जसजसा त्या बैलासोबत पाण्यात पुढे पुढे सरकू लागलो, तसतसा पाण्याची लेव्हल वाढल्याचं जाणवत होतं. लवकरच पाणी चांगलं कंबरेच्या वर आलं होतं. आणखी पुढे गेल्यावर मात्र घाबरलो आणि मग मी बैलाच्या शेपटीच्या वरच्या बाजूला घट्ट पकडलं. त्यामुळे बैल अचानक बिथरला, त्यानं मागं वळून पाहिलं आणि मागचा पाय झाडून शेपटीला जोरात हिसका दिला. त्यामुळे माझे हात सुटले आणि मी पलीकडे पाण्यात फेकला गेलो. त्यावेळी प्रचंड घाबरल्यामुळे मी जोरात ओरडलो! मागं असलेला शिवाजी ओरडून सांगत होता...
"अरे दोन्ही हात पाय हालव... घाबरू नकोस. मी आलोच."
माझ्या चांगलं गळ्यापर्यंत पाणी आलं असल्यामुळे मला भानच नव्हतं. अचानक ते नाकातोंडांत पण जाऊ लागलं मात्र नेमक्या त्याचवेळी जवळ आलेल्या शिवाजीनं माझा दंड धरला आणि पोहत पोहत मला काठावर आणलं. त्यावेळी मी खूप घाबरलो होतो आणि पूर्ण भिजलोही होतो! त्या दिवशी केवळ शिवाजीमुळेच मी त्या संकटातून वाचलो... त्याचा मी जन्मभर ऋणी राहील हे वेगळं सांगायला नकोच!
        घरी परतल्यावर माझा भिजलेला अवतार पाहून जिजाबाई काय समजायचं ते समजली. त्या दिवशी माझ्यामुळे माझ्या जिगरी दोस्ताला, शिवाजीला खूप बोलणी खावी लागली... मला खूप वाईट वाटलं. सारखं रडायला येत होतं! त्या काळात मोबाईल तर नव्हतेच शिवाय टेलिफोन सुद्धा फारसे कुणाकडे नव्हते. त्यामुळे नागपूरला संपर्क करणं शक्य नव्हतं. मग सतत कामात असलेल्या काकांनी ( शिवाजीचे वडिलांनी ) नाईलाजाने मला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायला सांगितलं आणि आम्ही सरळ नागपूर गाठलं. घरी पोहचल्यावर मला खूप भीती वाटत होती, आता आपली नदीवरची करामत काका माझ्या आई दादांना सांगणार! मात्र त्यांनी तो विषय देखील काढला नाही... खरंच आपल्या पूर्वीची पिढी खऱ्या अर्थाने किती समजदार आणि दूरदृष्टीची असणारी होती हे आज पटते! त्यानंतर काका त्याच दिवशी संध्याकाळी नांदुऱ्याला परतले. पुन्हा वरील विषय कोणी मुद्दामहून काढला नाही. मात्र हा मनावर कोरलेला प्रसंग आठवला की अजूनही अंगावर काटा येतो!
            वरील प्रसंगानंतर बरेच दिवस कोणाचंही एकमेकांकडे जाणं येणं झालं नाही. कोणाचं तरी लग्न कार्य असलं तरच ते शक्य व्हायचं. मला आठवतं, माझ्या चुलत बहिणीचं, छबूताईचं लग्न नागपूरला होतं त्यावेळी जिजाबाईसह सर्वजण नागपूरला आले होते. तिच्यासोबत श्यामदादा, शिवाजी, तानाजी, कोकिळाताई (राजूची आई ), मालाताई आणि बहुतेक तानाजीच्या बहिणी असल्याचंही आठवते. तेव्हा आम्ही बच्चे कंपनीनं खूप धमाल केली होती. जिजाबाईसोबत महालवरच्या भारत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढल्याचंही आठवलं. त्यावेळी गांधीसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या बगिच्यात सकाळ संध्याकाळी जाणं आणि मनसोक्त खेळणं, मग उशीर झाल्यावर आईने सगळ्यांना बोलवायला येणं हे ठरलेलंच असायचं. त्या दिवसांच्या आता फक्त आठवणी शिल्लक आहेत... बाकी काही नाही! ते दिवस आठवले की आजही गहिवरून येते, आपण खूप काही मिस करतोय याची प्रकर्षाने जाणीव होते!

नंतर जिजाबाईचं नागपूरला कधीतरी येणं व्हायचं पण ते अगदी थोड्या दिवसासाठी! कारण तिला साऱ्या जगाची चिंता असायची असंच म्हणावं लागेल. माझी आई जिजाबाईविषयी नेहमी म्हणायची... "ती नागपूरला असली तरी तिचं मन मात्र तिकडे नांदुऱ्यात असतं!" खूपच संवेदनशील मन होतं तिचं, जणू सिनेमातली श्यामची आईच! श्यामची आई (श्यामदादाची आई )तर ती होतीच पण शिवाजीची आई असल्यामुळे मी तिला गमतीने म्हणायचो, तू शिवाजी राजेंची खरीखुरी आईच जास्त शोभतेस, रायगडावरची जिजाबाई! कारण ती जशी मनानं संवेदनशील होती, हळवी होती तितकीच खंबीर आणि धाडसी, निर्भयी होती. त्या काळात नांदुऱ्याला रात्र झाली की सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरायचा.  गावातील पोलवर आजच्यासारखे लाईट नव्हते. अंधारात समोरच्या हॉलमध्ये किंवा घराच्या मागच्या बाजूला जायची भीती वाटायची! जिजाबाई मात्र न घाबरता तिकडे दिवा, कंदील घेऊन जायची. घराच्या मागच्या बाजूला गायी, बैल इत्यादी बांधलेले असायचे... त्यांचीही काळजी जिजाबाईला असायची. कारण तिकडे साप पण निघायचे! त्या मुक्या प्राण्यांना चारा खाऊ घालायला अंधार असला तरी ती स्वतः जायची. कंटाळा करताना मी तिला कधी बघितलं नाही. तिचं अख्ख जीवनच संघर्षमय होतं. तिनं आपल्या कुटुंबासाठी अतोनात कष्ट घेतले! कुठलंही काम ती अगदी समर्पित भावनेनं करताना दिसायची! अगदी पहाटेपासून तिच्या कामांना सुरुवात व्हायची. सगळं घर ती एकटीच सारवून लख्ख करायची. देवावर तिची अपार श्रद्धा होती. मला वाटतं ती आठवड्यातून तब्बल चार उपवास करायची. कधी तिला बरं वाटत नसलं तरी आपल्या भावना व्यक्त करायला ती टाळायची. तिनं कधीही कोणाबद्दल वाईटसाईट किंवा उलटसुलट बोललेलं मी ऐकलं नाही. तिच्या ते स्वभावातच नव्हतं म्हणा!
          माझी बदली नेमकी यवतमाळ येथे झाल्यावर सर्वात आधी आम्ही सर्वजण अपूर्वा, रुधीर लहान असल्यामुळे व्हेस्पा गाडीवर बसून नांदुऱ्याला गेलो. त्यावेळी जिजाबाईच्या डोळ्यात दिसलेला असीम आनंद मला आजही आठवतो. तेव्हा मला तिनं दिलेला कानमंत्र चांगलाच लक्षात आहे... "तुम्ही आपल्या गावापासून, घरापासून इकडे दूर आल्यामुळे नेहमी सावध रहा. एकमेकांशी भांडू नका. सुखाने संसार करा!" एवढं बोलल्यानंतर चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवून मनापासून आशीर्वाद देणं हे फक्त आणि फक्त जिजाबाईच करू शकते हा अनुभव तिच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच आला असणार यात शंका नाही! त्यानंतर तिचं आमच्या यवतमाळच्या घरी येणं, आमचं तिच्याकडे जाणं हे नित्याचंच झालं होतं. नांदुऱ्याच्या घरी गेल्यावर जिजाबाई आमच्यासाठी मनापासून स्वयंपाक करायची... तिथं तिच्या हातची चवदार पुरणपोळी ठरलेलीच असायची! मग चार वर्षानंतर माझी नागपूरला बदली झाल्याची बातमी तिला समजली. आम्ही यवतमाळ सोडून जाणार हे समजताच ती राजूसोबत आमच्याकडे आली होती. भेटल्यावर नेहमी हसतमुख दिसणारी जिजाबाई त्या दिवशी खूप उदास होती! तिला सारखं भरून येत होतं! आम्हालाही यवतमाळ सोडून जाणं, जिजाबाईपासून दूर जाणं खूप जड गेलं... सगळ्यांनाच गहिवरून आलं होतं! त्या दिवशी तिला सोडून जाताना बघितलेला तिचा रडवेला, उदास चेहरा काळजात घर करून गेला होता. यवतमाळमध्ये व्यतित केलेल्या चार वर्षात तिनं मुलांना, आम्हा सर्वानाच खूप माया लावली होती! नंतर नागपूरला पोहचल्यावर सुद्धा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.
       मात्र काही महिन्यातच आमच्या भेटीचा योग जुळून येणार होता. राजूचं लग्न ठरल्याचं कळलं. मला वाटतं राजूच्या लग्न सोहळ्याचा समारंभ आर्णी येथे पार पडला होता. त्यावेळी नागपूरहून आम्ही दोघं आणि बरीच मंडळी आली होती. सगळ्यांच्याच जिजाबाईसोबत भेटीगाठी झाल्या. नातवाचं लग्न असल्यामुळे ती खूप आनंदात होती. राजूला अगदी तान्हा बाळ असल्यापासून जिजाबाईनं सांभाळलं होतं. हे काम खचितच सोपं नव्हतं. त्यावेळी मनावर दगड ठेवून तिनं आपलं कर्तव्य पार पाडलं होतं! त्यानंतर अकोला येथे वसंतराव पाटील सर आणि वंदूताई यांनी केलेल्या संस्कारामुळे राजूच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली हे सर्वांना माहितीच आहे. परमेश्वरानं दिलेल्या एकाच आयुष्यात जिजाबाईनं, आपण कल्पना करू शकणार नाही एवढ्या विविध भूमिका पार पाडल्या. त्यामुळे तिचं अवघे जीवन आजच्या नवीन पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही!
     2004 साली पुण्यात बदली झाल्याने म्हणा अथवा रुधीर, अपूर्वाच्या शिक्षणामुळे आम्ही इकडेच स्थिरावलो. मग क्वचितच यवतमाळला जाणं व्हायचं. त्यामुळे जिजाबाईची भेटही दुर्मीळ झाली! इच्छा असूनही काही ना काही कारणामुळे जाणं होत नव्हतं.
      2019 साल उजाडलं! यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्यामुळे मी तिथं सहभागी होण्यासाठी पुण्याहून यवतमाळला राजूकडे गेलो. त्यानंतर तेथे भेटलेले पाटील सर आणि गजानन मस्के सर यांच्यासोबत साहित्य संमेलनाचा आनंद लुटता आला. राजू, शिल्पा यांनी केलेल्या आदरातिथ्याने आणि पाहुणचाराने अक्षरश: भारावून गेलो. मग दुसऱ्या दिवशी पाटील सरांच्या सानिध्यातच नांदुऱ्याला जाण्याचा योग जुळून आला. त्यावेळी तिथं पोहचल्यावर जिजाबाईला बघितलं आणि मन उचंबळून आलं. मनात अनेक शंका-कुशंका गर्दी करू लागल्या! ती खूप थकली असल्याचं जाणवलं! शरीरानं थकली असली तरी ती मनानं खचली नव्हती हे विशेष... कारण तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य अजूनही कायम होतं. मग बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या... वय झालं तरी तिची स्मरणशक्ती कमालीची होती. ऐकायला सुद्धा त्रास होत नव्हता. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यावेळी सगळे खळखळून हसलो, जिजाबाईला असं हसताना पाहून खूप बरं वाटलं!
         आणि आता अगदी काल परवाचीच गोष्ट असल्यासारखी घटना... राजूशी तसं नेहमीच मोबाईलवर बोलणं व्हायचं. मात्र त्या दिवशी आलेल्या फोनमुळे वेगळीच बातमी ऐकायला मिळाली...  जिजाबाई पलंगावरून पडली असल्याचं कळलं. ते ऐकून मन अस्वस्थ झालं,  क्षणार्धात तिचा चेहरा नजरेसमोर तरळला! मग लगेच ठरवलं, आपण आता जाऊन जिजाबाईला भेटायलाच हवं. त्यासाठी नागपूर गाठलं. मग दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव असल्यामुळे ऑक्टोबर 2022च्या शेवटच्या आठवड्यात धाकटा भाऊ सुनिलसोबत गुरुकुंज मोझरी येथे पोहचलो. तिथं दरवर्षीप्रमाणे चार वाजून अठ्ठावन मिनिटांनी तीन साडेतीन लाख लोकांच्या समुदायाच्या उपस्थितीत अगदी शिस्तीत मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला! त्यानंतर त्या अलोट गर्दीतून वाट काढत सुनिलसह रात्री नागपूरला पोहचलो... मग भल्या सकाळीच एसटीनं यवतमाळसाठी रवाना झालो.
       यवतमाळला राजू वाट पाहतच होता. त्याच्यासह आर्णी रोडवर असलेल्या त्याच्या घरी गेलो... सोबतच जेवण आटोपलं आणि मग ठरल्याप्रमाणे राजू आणि मी नांदुऱ्याच्या रस्त्याला लागलो. तिथं पोहचल्यावर अचानक आम्हाला पाहून जिजाबाईला भरून आलं. तिची ती असहाय अवस्था बघून मलाही गलबलून आलं! पलंगावर पडलेल्या जिजाबाईची अगतिकता खरंच पाहवत नव्हती. नकळत डोळ्यात अश्रू तरळले! ते प्रयत्नपूर्वक थांबवत तिच्या शेजारी पलंगावर बसलो आणि तिचा हात आपल्या हातात घेत गुरुकुंज मोझरीला जाऊन आल्याचं सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर तिची अपार श्रद्धा होती. त्यामुळे तिला खूप बरं वाटलं. मग तिनं आमच्या दादांची आठवण काढली आणि थरथरत म्हणाली, "तुझे दादा महाराजांचे भजन ऐकायला मला न्यायचे रे विनू... खूप भक्ती होती त्यायची महाराजांवर... तू पण भक्ती सोडू नको!"
नंतर तिनं तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चेहऱ्यावरून हात फिरवत सगळ्यांची विचारपूसही केली आणि म्हणाली, "येत जा मा असाच भेटायले... लई बरं वाटते!"
त्यावेळी मला ठाऊक नव्हतं, ही आपली जिजाबाईसोबतची शेवटचीच भेट ठरणार म्हणून..! गेल्या 20 तारखेला (20 मे ) अनिकेतचा नांदुऱ्याहून फोन आला, सकाळी आठ साडेआठ वाजले असणार त्यावेळी... तो म्हणाला, आजी गेली!  कानावर विश्वास बसला नाही. म्हणून मी त्याला विचारलं, आपली जिजाबाई गेली का? तर तो हो म्हणाला आणि त्यानं सांगितलं, संध्याकाळी चार वाजता नेणार आहेत!
पुण्यात असल्यामुळे तीव्र इच्छा असूनही नांदुऱ्याला जाता आलं नाही ही रुखरुख आयुष्यभर सलत राहील! नागपूरला असलेल्या सुनिलला फोन करून दुःखद बातमी कळवली. त्यानं लगेच नांदुऱ्याला जाण्याची तयारी दर्शवली आणि त्यानं तिथं वेळेच्या आत जाऊन जिजाबाईचं अंतिम दर्शन घेतलं! आता राहिल्या केवळ जिजाबाईच्या आठवणी... त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण करू शकतो आणि त्यापासून प्रेरणा घेऊन काहीतरी चांगलं कार्य आपल्या हातून घडवू शकतो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.
         या भूतलावरील सर्वांना जिजाबाईसारखी प्रेमळ, मायाळू आई मिळो अशी त्या आकाशातल्या परमेश्वराला प्रार्थना करूया... आणि भेटूया येत्या 2 तारखेला जिजाबाईच्या चौदावीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने... आपल्या जिजाबाईला भावपूर्ण आदरांजली वाहूया!
सर्वांना नमस्कार!!🙏🙏

विनोद श्रा. पंचभाई, पुणे
मो.9923797725

सुगावा... मनोगत

 


सुगावा... The Clue!
                         मनोगत
        सर्वसामान्य माणसाला रोजच कुठल्या ना कुठल्या बऱ्यावाईट  प्रसंगांना सामोरं जावं लागतं. कधी ते प्रसंग खाजगी आयुष्यातले असतात तर कधी ते नोकरी करत असताना किंवा कामधंदा करताना येत असतात. सार्वजनिक ठिकाणी वावरताना एखादा असा प्रसंग आयुष्यात येतो, ज्याने मती गुंग होऊन जाते! मग नकळतपणे तो त्यात गुंतत जातो. अगदी अनपेक्षितपणे त्याच्या डोळ्यासमोर एखादी अशी घटना घडते, ज्यात तो बेमालूमपणे गुरफटला जातो आणि होत्याचं नव्हतं होण्याची पाळीही त्याच्यावर येऊन ठेपते. कितीही प्रयत्न केले तरी त्यातून त्याची सुटका होत नाही. मग नाईलाजाने या सामान्य माणसावर कमालीचा मनस्ताप सहन करण्याची वेळ येते!
        आणि नंतर सुरू होतो पोलिसांच्या तपासाचा ससेमिरा, कोर्टाच्या तारखांच्या फेऱ्या! काहीही संबंध नसताना विनाकारण आलेल्या अशा प्रसंगाला सामोरं जाताना त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबीयांना देखील त्रास सहन करावा लागतो. एखाद्या वेळी कुठल्यातरी अज्ञात वाहनाची धडक लागून या सामान्य माणसाचा जीव सुद्धा संकटात सापडतो. तर त्याची कुठलीही चूक नसताना, सर्व नियम धाब्यावर बसवून अचानक त्याच्या अंगावर आलेल्या एखाद्या वाहनामुळे कायमचे अपंगत्वही येऊ शकते.
         आपण कितीही सावध असलो तरी अशाप्रकारचे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडत असतात आणि 'हुश्श ... थोडक्यात बचावलो' असं म्हणण्याची पाळीही आपल्यावर येते! अशावेळी अज्ञात गुन्हेगार राजरोसपणे मोकाट फिरत असतात. मात्र सर्वसामान्य माणसं सतत तणावात जगत असतात. कधीकधी सामान्य माणसाला अशाप्रकारच्या आकस्मिक प्रसंगाची जबर किंमतही चुकवावी लागते!
        "सुगावा... The Clue!" या माझ्या दुसऱ्या रहस्यमय कादंबरीत रोजचे जीवन जगत असताना आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित प्रसंगांना सामान्य माणसाला कुठल्या दिव्यांना सामोरं जावं लागतं? अचानक उदभवलेल्या संकटांना तो कशाप्रकारे तोंड देतो? त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याची जीवघेणी धडपड यशस्वी होते का? अज्ञात आरोपीचा माग घेण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलीस कशाप्रकारे शक्कल लढवतात? त्यांना कोणाची मदत होते? ते काय काय योजना आखतात? शेवटी गुन्हेगार हुलकावणी देण्यात यशस्वी होतात की ते पोलिसांच्या जाळ्यात अडकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे, रहस्यांचा उलगडा सहज सोप्या संवादशैलीत या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हेगारांच्या निरनिराळ्या क्लृप्त्या, त्यावर मात करणारे पोलिसांचे अफलातून तपासकार्य, त्यातून निर्माण होणारी कमालीची गुंतागुंत आणि मग हळूहळू उलगडत जाणारे अचंबित करणारे रहस्य हे सगळं वाचताना उत्कंठा शिगेला पोहचल्याशिवाय राहत नाही. या कादंबरीतील क्षणाक्षणाला धक्के देणारे अनेक प्रसंग वाचकांना खिळवून ठेवण्यास भाग पाडतात. त्यामुळे 'सुगावा... The Clue!' निश्चितच वाचकप्रिय ठरणार याची खात्री आहे.
          यापूर्वी प्रकाशित झालेल्या 'हॉटेल हवेली' या माझ्या पहिल्याच रहस्यमय कादंबरीला रसिक वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. त्यासाठी वाचकांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच याठिकाणी मी नम्रतापूर्वक नमूद करतो, विख्यात साहित्यिक आणि संशोधक, प्राकृत भाषा अभ्यासक संजय सोनवणी यांनी 'हॉटेल हवेली'साठी लिहिलेल्या प्रस्तावनेमुळेच मला 'सुगावा... The Clue' ही रहस्यमय कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि मग झपाटल्यासारखा लिहित गेलो.
           नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात विविध मागण्यासाठी  निघालेले मोर्चे, मग जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक अनियंत्रित झालेल्या एका मोर्चावर होणारा पोलिसांचा लाठीमार आणि त्या मोर्चाच्या धामधूमीचा फायदा घेऊन गुन्हेगारांनी बेमालुमपणे  पाडलेला भीषण खून! त्यानंतर घडणारे निरपराध माणसांचे अपहरण नाट्य, अनेक वेगवान घटना, गुन्हेगांराच्या कल्पना करू शकणार नाही अशा नवनवीन नामी युक्त्या मग त्यावर कुरघोडी करण्यासाठी पोलिसांच्या अफलातून तपासाचा थरार आणि उत्कंठा शिगेला पोहचल्यावर शेवटी उलगडत जाणारे खुनाचे रहस्य अशी एकंदरीत पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे.
          आता या शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या 'सुगावा... The Clue' कादंबरीला पुण्यातील 'प्राजक्त प्रकाशन' या नामवंत संस्थेचे प्रकाशक जालिंदर चांदगुडे यांनी अत्यंत आकर्षक रीतीने पुस्तकरूप बहाल केले आहे.  'सुगावा... The Clue!'साठी प्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांनी साजेसे मुखपृष्ठ रेखाटले आहे. तसेच आर्टिस्ट विलास भंडारी यांनी या कादंबरीसाठी सुंदर लेआऊट करून दिले आहे. या सर्वांचेच मन:पूर्वक आभार !

...विनोद श्रा. पंचभाई
भ्र. क्र.९९२३७९७७२५

        

वाईट सवय...

 

                वाईट सवय... (बोधकथा)

         पिंटू तसा बालपणापासूनच खोडकर होता. अभ्यासात मात्र तो हुशार होता. थोडा मोठा झाल्यावर पिंटूला जिथं तिथं थुंकण्याची वाईट सवय जडली. घरात असला तरी तो वॉश बेसिनमध्ये थुंकायचा नाही... तर तो घराच्या खिडकीतून, दरवाजातून कुठंही थुंकायचा. त्यामुळे पिंटूच्या या वाईट सवयीवरून त्याचे आईबाबा त्याला सतत ओरडायचे. तरी सुद्धा त्याची ही खोड काही केल्या जात नव्हती.
कुणाला अशी शंका यायची, हा पिंटू गुटखा, सुपारी तर खात नसेल! मात्र तसलं काही नव्हतं. त्याला कुठलंही व्यसन नव्हतं. का कुणास ठाऊक पण कुठंही थुंकण्याची वाईट सवय त्याला लागली होती.  रस्त्यानं येता - जाताना किंवा शाळेत वर्गातल्या खिडकीतून पिंटू थुंकला नाही असं कधीही घडलं नाही.
       एकदा पिंटूच्या शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार होती. त्यासाठी शाळेत वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक आले होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आणि शेवटी त्यांनी सार्वजनिक स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयावर भाषण दिले. त्यांनी बोलताना रस्त्यावर कचरा, घाण टाकणे, थुंकणे या विषयावरही माहिती दिली. ते म्हणाले, “आपल्यापैकी अनेकांना रस्त्यावर केरकचरा टाकण्याची किंवा थुंकण्याची सवय असते."
डॉक्टरांचे बोलणे ऐकून सगळेच पिंटूकडे बघत खो खो हसू लागले. तेव्हा त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं.
नंतर सर्वांना शांत करत डॉक्टर म्हणाले, “अनेकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची वाईट सवय असते. रस्त्यावर थुंकल्यामुळे परिसरात घाण, दुर्गंधी पसरते. थुंकीवर माशा बसून रोगराई पसरण्याचा धोका संभवतो. पावसाळ्याच्या दिवसांत थुंकीच्या घाणीपासून साथीचे रोग पसरण्याचाही धोका असतो. तेव्हा तुम्ही प्रत्येकाने आपल्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे."
डॉक्टर पुढे म्हणाले, “आता तर आपल्या राज्यात शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार कुणी रस्त्यावर थुंकताना आढळल्यास एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षाही निश्चित केली आहे.''
डॉक्टरांचे भाषण ऐकून पिंटूला थुंकणे किती घातक असते ते समजले. मात्र त्याची थुंकण्याची सवय सुटता सुटत नव्हती. त्यामुळे तो खूप उदास राहू लागला.
         दिवस असेच जात होते. बघता बघता
दसऱ्याचा सण आला. पिंटूच्या बाबांनी  त्याच्यासाठी भारीमधला ड्रेस आणला होता. त्यामुळे साहजिकच पिंटू खूप खूश होता. मग
नवीन ड्रेस घालून सायंकाळी तो बाबांच्या दुचाकीवरून बाबांच्या मित्रांकडे सोने वाटायला निघाला. थोडं पुढे गेल्यावर चौकात वाहतूक खोळंबली होती. तसंच रस्त्यावरही लोकांची गर्दी जमली होती.
    पिंटूच्या बाबांनी  गाडी हळूहळू चालवत कसातरी रस्ता पार केला. पलीकडे गेल्यावर काही वेळाने सुरळीत वाहतूक सुरू असताना शेजारून एक पीएमटी बस गेली. बसच्या खिडकीत बसलेला पान खाणारा माणूस अचानक खिडकीतून बाहेर थुंकला. ती थुंकीची पिचकारी नेमकी पिंटूच्या अंगावर पडली आणि त्याच्या नव्याकोऱ्या कपड्यांची वाट लागली. पिंटू जोरात ओरडला. त्याच्या आवाजानं बाबा गडबडले आणि त्यांनी वेग कमी करत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तेव्हा कुठं काय घडलं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी कपाळावर हात मारून घेतला! पिंटू तर रडायलाच लागला. दसरा साजरा करण्याचा त्याचा मूड गेला.
        त्यानंतर बाबांनी गाडी घराकडे वळवली. दोघंही घरी पोहोचले मात्र पिंटूचं रडणं थांबलं नव्हतं. त्याच्या आईनं त्याची समजूत घातली आणि त्याला कपडे बदलायला दिले. आता परत जाण्यात अर्थ नाही असा विचार करून पिंटूला जवळ घेऊन बाबा म्हणाले, “पिंटू, आता समजलं का सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व? अरे, इतके दिवस आम्ही तुला सांगत तुला होतो. घराच्या खिडकीतून, दारातून  रस्त्यावर किंवा इकडे तिकडे थुंकू नकोस! तुझ्या थुंकण्यामुळे किती लोकांना त्रास झाला, किती लोक घरी भांडायला आले ? ते कशासाठी आता समजलं ना! थुंकीमुळे आज तुझे कपडे घाण झाले तर तुला रडायला आलं. तुझा मूड खराब झाला. आपल्यामुळे दुसऱ्यांना देखील त्रास होऊ शकतो हे कळलं ना तुला आता! "
      बाबांचं बोलणं ऐकून पिंटूचे डोळे उघडले. त्यानं खाली मान घातली. त्याला खूप वाईट वाटलं. त्या दिवसापासून पिंटूनं निर्धार केला... वाटेल तिथं, सार्वजनिक ठिकाणी अजिबात थुंकायचं नाही म्हणजे नाहीच!

विनोद श्रा. पंचभाई, पुणे
९९२३७९७७२५

Amazing video

 https://youtu.be/ra0EkbViWwo


नक्की बघा विस्मयकारक व्हिडिओ👆

Thursday, June 29, 2023

सातासमुद्रापार

 



सातासमुद्रापार


प्रिय आजी, किती छान, सुंदर सजवलंस गं तू तुझं नवीन घर! नक्षीकाम केलेला हा दर्शनी दरवाजा खरंच मोहक वाटतो अन् खिडक्यांची तावदानंसुद्धा अप्रतिमच! तुझ्या घराच्या या उंचच उंच भिंती आणि त्यावर साधलेली आकर्षक रंगसंगती कुणालाही वेड लावणारं असं वाटतं. प्रशस्त हॉलमधील ते देखणे झुंबर तसेच जमिनीवर अंथरलेले हे सुंदर गालीचे मनापासून आवडलेत आजी मला!


आवारातील बाग बघतच रहाविशी वाटते इतकी उत्तमप्रकारे आजी तू 'मेन्टेन' केलीस! आणि हो, मध्यभागी बसवलेली कारंजी संध्याकाळी या परिसराची शोभा वाढवतात. पण एक सांगू आजी तू एवढ्या कष्टानं, जिकिरीनं बांधलेलं हे घर बघायला पप्पा खरंच येणार आहेत का? बरं एवढं मोठं घर बघायला आले तर ते राहणार तरी किती दिवस ?


आजी थोडं मनातलं सांगू माझ्या... अगं मला खरंच इथे राहायला आवडलं असतं तुझ्या सहवासात. तुझं हे नवीन घर मला मनापासून आवडले. पण मम्मीनं माझी 'अँडमिशन' केली ना....-तिकडे यूएसला! अन् तुला पण माहिती आहे मम्मीनं एकदा ठरवलं की ते पप्पासुध्दा बदलू शकत नाही. मम्मीचा निर्णय म्हणजे जणू काळ्या दगडावरची रेघच! ती कुठल्याच 'डस्टरनं' पुसता यायची नाही! मग डोळ्यातून येणाऱ्या अश्रुंना पुसता पुसता आपणच स्वतःला सावरायचं असतं. ते शिकलो मी सरावानं, तू मनाला लावून घेऊ नकोस आजी!


Saturday, February 4, 2023

"सामान्य शिक्षा ते राष्ट्रपती: द्रौपदी मुर्मू"

 "सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती: द्रौपदी मुर्मू"


काल परवापर्यंत कोणाला फारसं परिचित नसलेलं द्रौपदी मुर्मू हे नाव आता खूप चर्चेत आलं आहे. राष्ट्रपतीपदासाठी त्यांची उमेदवारी घोषित होईपर्यंत त्यांचं नाव सर्वसामान्यांना तसं अनोळखीच होतं. एका सामान्य आदिवासी, गरीब कुटुंबातील महिलेला राष्ट्रपती पदासारख्या देशाच्या सर्वोच्च पदासाठी उमेदवारी मिळणे हीच आपल्या बलशाली लोकशाहीची थक्क करणारी साक्ष आहे. खंडप्राय असलेल्या आपल्या विशाल भारत देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचा रोमहर्षक, संघर्षमय जीवनप्रवास खूपच चित्तथरारक आहे. खरंतर जगातील तमाम महिलांना त्यांचा जीवनसंघर्ष प्रेरणादायी ठरणारा आणि भावनाशील करणारा आहे. घराणेशाहीची परंपरा, अमर्याद संपत्तीचा वारसा आणि राजेशाही थाट असा कुठलाही बडेजाव नसलेल्या द्रौपदी मुर्मू या सामान्य शिक्षिकेची राष्ट्रपतीपदापर्यंतची खडतर वाटचाल सर्वसामान्यांना अभिमान वाटावा अशी विलक्षण लक्षवेधी आहे.

         मानवी जीवनात कुठलीही गोष्ट शाश्वत नसते. जीवन हे क्षणभंगूर असून क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं! हसत्या - खेळत्या आयुष्यात  अचानक जीवघेणी संकटं आली की माणूस सैरभैर होतो. मग त्यातून सावरण्यासाठी त्याला संपूर्ण आयुष्य पुरतं. तर काही लोक पर्वताएवढ्या दुःखातूनही बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग निवडताना दिसतात. त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वीही होतात. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या अनंत संकटांवर मात करून जीवघेण्या दुःखाच्या आणि नैराश्येच्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी अध्यात्माचा आश्रय घेतला. आभाळाएवढ्या जीवघेण्या दुःखाचं ओझं पेलत त्यांनी त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना अध्यात्मासोबतच त्यांच्या मुलीची - इतिश्रीची भावनिक साथही लाभली. म्हणूनच एक सामान्य शिक्षिका म्हणून आपल्या जीवनाची सुरूवात करणाऱ्या आणि देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहचणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचा अतिशय संघर्षमय आणि तेवढाच खडतर प्रवास जाणून घेणं सामान्यजनासाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. 

        हा प्रवास आहे एका सामान्य शिक्षिकेचा, हा प्रवास आहे झुंजार आदिवासी समाजातील एका कर्तृत्ववान महिलेचा, हा प्रवास आहे एका निस्वार्थी समाजसेविकेचा, हा प्रवास आहे एका जिद्दी आणि संघर्षमय चरित्राचा, हा प्रवास आहे एका आध्यात्मिक आणि समर्पित जीवनाचा! 

        अत्यंत शांत, संयमी स्वभावाच्या द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या अगदी बालपणापासून करावा लागलेला संघर्ष, त्यांच्या पुत्रांच्या आणि पतीच्या वियोगानंतर त्यांची झालेली अवस्था, त्यातून सावरण्यासाठी त्यांनी घेतलेलं कष्ट, मग त्यातून जिद्दीने मार्ग काढत केलेलं समाजकार्य आणि राजकीय वाटचाल अशाप्रकारे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा  'सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती: द्रौपदी मुर्मू' या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. 

...विनोद श्रा. पंचभाई, पुणे

  भ्रमणध्वनी क्रमांक : 9923797725