Monday, December 15, 2025

शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर.. मनोगत

 मनोगत...


     अठरा विश्व दारिद्र्य काय असतं... रोजच्या जगण्यासाठी करावा लागणारा आटापिटा, उपासमार, फरफट याचा विदारक अनुभव अण्णा भाऊंनी त्यांच्या अगदी बालपणापासूनच घेतला! त्यामुळे त्यांच्या न कळत्या वयापासून अतोनात दुःख, वेदना, हेटाळणी, अवहेलना त्यांच्या वाट्याला पदोपदी आल्या. मात्र अण्णांनी त्याचा उगाच बाऊ न करता, कुठलंही भांडवल न करता… या दुःखालाच आपलं सामर्थ्य बनवलं आणि येणाऱ्या बिकट परिस्थितीचा त्यांनी अतिशय धैर्याने सामना केला. 

      आपला देश पारतंत्र्यात असताना अण्णांनी त्यांच्या कुटुंबीयांसह वाटेगाव पासून मुंबई पर्यंत केलेला प्रवास अंगावर काटे आणणारा आहे! मुंबई मायानगरीत जगण्यासाठी हातावर पोट असल्यामुळे... त्याकाळात गरिबी, हालअपेष्टा यांचा सामना करत त्यांनी काढलेले हलाखीचे दिवस, केलेली पायपीट खूपच अंतर्मुख करणारी आहे. हे सगळे प्रसंग, घटना 'शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर' या चरित्र कादंबरीत वाचताना सर्व सामान्य माणसाचं मन विदीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही!

     अण्णा भाऊंना अवघ्या दीड दिवसातच शाळा सोडणं भाग पडलं! शिक्षण घेण्यासाठी त्या काळच्या समाज व्यवस्थेनं झिडकारलं तरी नंतर अण्णा भाऊ प्रयत्न पूर्वक लिहिणं, वाचणं शिकले. पुढे गाणंही लिहू लागले... आणि मग कालांतराने त्यांनी काळजाचा ठाव घेणाऱ्या अनेक गीत रचना लिहिल्या. त्यात झंझावाती पोवाडे होते, अतिशय अर्थपूर्ण अशा गवळणी, छक्कड, गाणी सगळं सगळं काही होतं! सर्वसामान्य लोकांचं हृदय पिळवटून निघेल एवढं सामर्थ्य अण्णांच्या गीत रचनेत असायचं! त्यांचं प्रभावी सादरीकरण ऐकून त्याकाळी आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर सोव्हिएत रशियातील लोकही डोलू लागले होते!

     त्यानंतर अण्णा भाऊंनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटके, पथनाट्यं इत्यादी प्रकार हाताळून विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांचं साहित्य चांगलंच लोकप्रिय ठरू लागलं. मात्र तरीही अण्णा भाऊंच्या साहित्याची त्या काळातील समीक्षकांनी म्हणावी तशी दखल घेतली नसल्याने त्यांच्या साहित्याचा यथोचित सन्मान होऊ शकला नाही... तसेच अण्णांना इतर साहित्यिकांप्रमाणे मान सन्मानही मिळाला नाही हे आपल्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचं दुर्दैवच! त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबऱ्या यांची खरी कदर परदेशातच झाली, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही! खरं तर त्याला आपल्या मराठी मनाची संकुचित वृत्तीच कारणीभूत आहे, हेही तितकंच खरं!


       अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या कथा, हृदय पिळवटून टाकणाऱ्या गीत रचना, विचार करायला भाग पाडणाऱ्या कादंबऱ्या एवढं विपुल साहित्य लिहूनही शेवटी अण्णांना काय मिळालं? विवंचना, उपेक्षा, हेटाळणी, अवहेलना इत्यादी गोष्टींचा आयुष्यभर सामना करत शेवटी अण्णा उपेक्षित आणि दुर्लक्षित जीवन जगत राहिले! पुढे सोव्हिएत रशियातून निमंत्रण आल्यामुळे तिथं तरी त्यांच्या साहित्याचा यथायोग्य सन्मान झाला. तिथं त्यांचा सत्कार झाला, अनेक प्रकारचे उत्तम अनुभव मिळाले. मात्र इकडे भारतात परतल्यावर त्यांना काय मिळालं? एक तर अण्णा कम्युनिस्ट पार्टीचं प्रचार कार्य करायचे… त्यामुळे इतर पक्षाचे संधीसाधू नेते वरून तोंड देखलेपणा दाखवत आतून मात्र त्यांचा द्वेषच करायचे! दुसरं असं की अण्णांच्या साहित्याची सततच इतर लेखकांच्या साहित्याशी तुलना केली जायची! त्यामुळे ते ठराविक वर्गाकडून न वाचताच दुर्लक्षित, उपेक्षित ठरवलं जायचं… खरं तर हा आपल्या महाराष्ट्रातील पांढरपेशा मराठी माणसांचा कोतेपणा अन् करंटेपणाच म्हणावा लागेल!


   अण्णा भाऊंना दलित साहित्याचे संस्थापक म्हणूनही श्रेय दिले जाते. मात्र त्यांना कथाकार, कादंबरीकार मानायला त्यांच्या काळातील काही विद्वान तयार नव्हते… तरीही त्यांचं साहित्य हे वाचकप्रिय ठरलं होतं. अण्णांच्या कादंबऱ्यांवर तब्बल आठ सिनेमे निघाले… तर त्यांच्या अनेक कथांवर लघुपट आणि मालिका सुद्धा निघाल्या. मात्र केवळ ‘फकिरा’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन, १९६१ सालचा 'उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार' अण्णा भाऊंना प्रदान करण्यात आला. अण्णांनी मराठी भाषेत जवळपास ३५ कादंबऱ्या लिहिल्या. तसंच त्यांच्या नावावर पंधरा लघुकथांचा संग्रह आहे… त्यातील मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि तब्बल सत्तावीस विदेशी भाषांमध्ये अनुवादित करण्यात आल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त अण्णांनी नाटके, रशियातील प्रवास वर्णन, बारा पटकथा, अनेक अजरामर पोवाडे, गाणी इत्यादी विपुल लेखन केलं आहे.  

       त्याकाळात शाहीर अण्णा भाऊ यांचं साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारं ठरलं. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी त्यांचे पोवाडे दुमदुमले... सर्व सामान्य लोकांनी ते डोक्यावर घेतले! महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात साहित्याचं योगदान हे महत्त्वपूर्ण मानलं जातं. खरं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत अण्णा भाऊ यांचं अविस्मरणीय योगदान आणि साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू कर्तृत्व 'भारत रत्न' पुरस्काराच्या तोडीचं आहे. त्यांच्या साहित्याच्या शब्दाशब्दांमध्ये क्रांती घडवण्याचं सामर्थ्य आहे मात्र तरीही अण्णा भाऊंचं साहित्य आपल्या प्रगत महाराष्ट्रात उपेक्षित, दुर्लक्षित ठरावं यासारखं दुर्दैव नाही!

    पुण्यातील 'दुर्वा एजन्सीज्' या प्रकाशन संस्थेचे सतत कार्यरत राहणारे प्रयोगशील प्रकाशक शैलेंद्र कदम यांनी *शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर* या चरित्र कादंबरीच्या निर्मितीसाठी सतत पाठपुरावा केला... त्यामुळेच ही साहित्यकृती लिहू शकलो हे मी याठिकाणी नम्रपणे नमूद करतो. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार! या चरित्र कादंबरीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणारे डॉ. भगवान लोखंडे यांच्याप्रती धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आकर्षक मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार प्रशांत भारताल आणि अतिशय सुबक लेआऊट, अक्षर जुळवणी करणाऱ्या संगीता जावळकर यांनाही अनेक अनेक धन्यवाद!


... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

    भ्र. क्र. ९९२३७९७७२५

प्रस्तावना… ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’

 प्रस्तावना… ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’


असं म्हणतात… उत्तम विचारांनीच माणूस घडत असतो! मनात चांगले विचार घोळू लागले की मग आपल्या हातून चांगली कृती व्हायला वेळ लागत नाही. अशावेळी एखादी चांगली कृती करताना मनात निश्चितच सकारात्मक विचार येऊ लागतात. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची प्रगती लवकर होताना आपल्याला दिसून येईल. याउलट नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींंना अनेक संकटांना, दुर्धर प्रसंगांना सामोरं जावं लागतं! तसं पाहिलं तर साधारणपणे बऱ्याच लोकांचं आपल्या विचारांकडे लक्षच नसतं. दिवसभरात अनेक विचार प्रत्येकाच्या मनात येत असतात. सतत निरनिराळे विचार मनात आले तर सर्वसामान्य माणसाच्या मनाचा कोंडमारा होतो. अशा विचारांना नकारात्मकतेची झालर लागली तर मग विचारूच नका. त्यावेळी मनाची अवस्था सैरभैर झाल्याशिवाय राहत नाही!

 याठिकाणी महान तत्त्ववेत्ते सॉक्रेटिस यांचं पुढील वचन पुरेसं बोलकं आहे हे दिसून येईल…

 “जगाच्या पाठीवर सर्वत्र राजे, महाराजे राज्य करत असले तरी या जगात खरे राज्य असते… ते उत्तम विचारांचेच!”


       लेखक मित्र प्रा. रमेश वाघ यांनी लिहिलेल्या ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ या ग्रंथातील स्वामीजींचे अलौकिक आणि अनमोल विचार सर्वसामान्य माणसाला जगण्याची निश्चित दिशा दाखवण्यास अत्यंत प्रेरणादायी आहेत… एवढं प्रचंड सामर्थ्य त्यांच्या विचारात आहे. त्यांच्या जीवनसूत्रातील अमूल्य विचार भरकटलेल्या वाटसरूना योग्य वाटेवरून चालण्यासाठी मार्गदर्शन करतात… अंधःकारात चाचपडत असलेल्या माणसाला उगवता सूर्य दाखवतात… सर्व काही गमावलेल्यांच्या मनात नव्याने कमावण्याची उमेद निर्माण करतात… अगदी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या रुग्णाच्या शरीरात प्राण फुंकणारी ऊर्जा निर्माण करतात… निराश होऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त होणाऱ्या व्यक्तीला जगण्याची आशा आणि नवीन दिशा दाखवतात! त्यामुळेच स्वामी विवेकानंद यांचे कालजयी असलेले बहुमूल्य विचार या जगातील सगळ्या प्राणीमात्रांसाठी सदैव आदर्श आणि मोलाचे ठरलेले आहेत. 


      खरं तर जन्माला आल्यावर माणूस निर्मळ पाण्यासारखा स्वच्छ असतो. नंतर तो जसजसा मोठा होत जातो, तसतसे त्याला ईर्षा, द्वेष, राग, लोभ इत्यादी दुर्गुण चिकटत जातात… आणि तो पुढे पार गढूळल्या पाण्यासारखा होत जातो. मात्र हे दुर्गुणही प्रयत्नपूर्वक दूर सुद्धा सारता येऊ शकतात. त्यासाठी आवश्यकता आहे ती चांगल्या संगतीची, चांगल्या विचारांची! मात्र कधीकधी मनात उगाच शंका येते… परस्परांविषयी वाटणारी आत्मियता, सहानुभूती, प्रेम, आपुलकी या मानवाच्या स्वाभाविक भावना पुढच्या पिढीला फक्त कथा, कादंबऱ्यातच वाचायला मिळणार की काय! कारण हावरटपणा, लालसा, 'जेलसी' अशा प्रकारचे प्रतिकूल परिणाम करणारे ‘व्हायरस’ आज समाजातील माणसांमाणसात मोठ्या प्रमाणात पसरलेले आपल्याला दिसून येतात. इतरांची श्रीमंती पाहून जळणे, फजिती पाहून हसणे हे कशाचं लक्षण आहे? आता सांगा... इतरांना रडवण्यात किंवा दुखवण्यात खरंच का सुख असतं? हे सगळं कळतं पण वळत नाही हेच आजचं खरं दुखणं आहे!

       त्यामुळे आजघडीला सर्वत्र अस्वस्थतेचं वातावरण बघितलं तर लेखक रमेश वाघ यांनी लिहिलेलं ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ हे पुस्तक मरगळलेल्या समाजात प्राण फुंकण्यासाठी निश्चितच नवसंजीवनी ठरणारं आहे. लेखक शिक्षकी पेशात असले तरी ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. उत्तम कीर्तनकार आहेत, व्याख्याते आहेत. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते भाविकांना माणुसकीचं दर्शन घडवतात. या जगण्यावर त्यांचं निस्सीम प्रेम आहे… माणसातल्या परमेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा आहे! म्हणूनच ते या पुस्तकात अत्यंत तळमळीनं आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतात… “मानवाचा सुखाचा शोध अनंत काळापासून सुरू आहे. मानवी जीवन सुखी, समृध्द व्हावे हाच जगातल्या सर्व तत्वज्ञानाचा उद्देश आहे. त्यासाठीच सर्व वाङमय आहे. मृण्मय मानवी जीवनाला चिन्मय बनवते, ते खरे वाङमय. वेदान्त तत्वज्ञान मानवी जीवनाला सुसह्य आणि सुकर बनविण्यासाठी जन्माला आले. परंतु त्या वेदान्ताचा खरा अर्थ समाजापर्यंत पोहचलाच नाही. भ्रांत ईश्वरवादी लोकांनी त्याच्याकडे नीट निरखून पाहिले नाही, आणि तथाकथित बुध्दीवाद्यांची परप्रकाशित स्वार्थबुध्दी तिथपर्यंत कधी पोहचलीच नाही. वेदान्त सिध्दान्ताचे अमृत प्राशन करणारा सिंहासारखी डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. तो वेदान्त तुमच्या आमच्या जीवनात उतरावा म्हणून अखंडित तपसाधना करणारा अर्वाचीन काळातला महायोगी संत म्हणजे स्वामी विवेकानंद!”


     आपल्याला खरं निखळ आयुष्य हे बालपणीच उपभोगायला मिळतं. किती निरागसता अन् भाबडेपणा असतो तेव्हाच्या त्या वागण्यात! तेव्हा स्वार्थाचा व खोटेपणाचा लवलेशही नसतो बोलण्यात, कारण त्या वयात विचार करून काहीच बोलावं लागत नाही ना... ना अहंकार, ना मत्सर! कुणाशी हेवेदावे नको की कुणावर कुरघोडी नको. एकमेकांवर रागावणं तेही काही मिनिटांपुरतं, मग गळ्यात गळे घालून पुन्हा जैसे थे! म्हणूनच संतांनी म्हटलं आहे… "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा!"

कालांतराने जसजसे वय वाढत जाते, माणूस मग षडरिपूंच्या चक्रव्यूहात अडकला जातो. तेव्हा तो आपली सद्सदविवेक बुध्दी गहाण ठेवून चुकीचे निर्णय घेण्यास अनेक वेळा बाध्य होतो. मग 'जोरोका झटका' लागला की त्याचे पाय जमिनीवर येतात पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आपण ज्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, मनापासून त्यांच्यावर प्रेम करतो, तेच कधीकधी असे वागतात की आपल्यालाच अपरिचित वाटू लागतात! आपलं नेमकं काय चुकलं ते आपलं आपल्यालाच कळत नाही. अशावेळी अपेक्षाभंगाचे जीवघेणे क्षण आपल्या अगदी जवळच्या माणसांकडून आपल्या वाट्याला येत असतात. अन् एक मात्र खरं, हे अपेक्षाभंगाचं दु:ख परक्या व्यक्तीकडून होणं शक्य नसतं. कारण अपेक्षा या केवळ आपल्याच माणसांकडून केल्या जातात... त्यांना आपले जवळचे समजून! आयुष्यभर आपण आपल्या माणसांसाठी जिवाचं रान करतो मात्र त्या प्रामाणिक प्रयत्नांचं योग्य चीज झालं नाही तर अपेक्षाभंगाचं दु:ख होणारच! कधी कधी असं वाटतं माणसांपेक्षा प्राणी परवडले.. .एखाद्या कुत्र्याला तुम्ही रोज साधं बिस्कीट खायला द्या, तुमची साथ द्यायला मग तो अगदी रात्रंदिवस तयार असतो!

        आज संपूर्ण जगात कधी नव्हे एवढी झपाट्याने प्रगती झाली आहे, अजूनही अविरतपणे होत आहे. मात्र माणसं खोट्या अभिमानाने आणि अहंकाराने नुसती फुलत चालली आहेत. तेवढ्याच झपाट्याने किंबहुना त्यापेक्षा जास्त पटीने माणसांच्या भावना मरत चालल्या आहेत, हे मान्य करावंच लागेल. सूतकी चेहऱ्याने आणि ढिम्मपणाने जगणं लोकांच्या अंगवळणी पडत चाललं असल्याचं पदोपदी निदर्शनास येत आहे. त्यामुळे हल्ली जिवंतपणाचं लक्षण असणाऱ्या लोकांची वानवा जाणवू लागली आहे! अशावेळी मनात आपसूकच एक विचार आल्याशिवाय राहत नाही…एवढ्या मोठ्या दुनियेत सच्चा माणूस मिळणं खरंच दुरापास्त झालं आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मोठं मार्मिक भजन आहे…

"माणूस द्या…मज माणूस द्या… ही भीक मागता प्रभू दिसला!

लोक दर्शना जाती…देव दिसावा म्हणूनिया.

तर देव बोले मज माणूस न दिसे, अजब तमाशा हा कसला?

माणूस द्या, मज माणूस द्या…

ह्रदयाचा जो सरळ असे… सर्वांंवरी जो प्रेम करी, 

कुटील नको असला तसला..!

माणूस द्या… मज माणूस द्या !"


   या ठिकाणी खरं तर सांगायचा मुद्दा असा की… 

माणुसकी हरवत चाललेल्या आणि स्वार्थी वृत्ती झपाट्याने वाढत जाणाऱ्या या मतलबी दुनियेत आजकाल सच्चा माणूस अभावानेच भेटत असल्याचा अनुभव थोड्या फार प्रमाणात अनेकांना येत असतो. त्यामुळे अधोगतीकडे मार्गक्रमणा करणाऱ्या आजच्या समाजात उत्तम विचारांची पेरणी करण्याची कधी नव्हे एवढी नितांत गरज भासते आहे. अशावेळी आपल्या देशाला लाभलेले युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कालजयी विचारांची सुसंगत आणि सुंदर मांडणी केलेला ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ हा प्रेरणादायी ग्रंथ दीपस्तंभ ठरणारा आहे!

    

      सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ या ग्रंथात लेखक रमेश वाघ यांनी एकूण एकवीस प्रकरणे मांडली आहेत. गीतेतील ‘कर्मण्य वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन… या उक्तीप्रमाणे कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता 'कर्म हाच धर्म’ मानून कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर आचरण केलं. कर्मयोगाचं महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. या ग्रंथातील ‘अखंड कर्मयोग करा’ या प्रकरणात स्वामी विवेकानंद यांचे विचार अधिक सुस्पष्ट करताना लेखक लिहितात… जीवन जगताना जो निष्क्रीय बनून राहतो, त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. किंवा चार दिवस काम केले आणि पुन्हा आराम करायला लागत असेल, तर तेही कामाचे नाही. आपण सर्वांनी शाळेत असताना ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलेली असते. कासव हळू असते. ससा वेगवान असतो. परंतु थोड्याशा प्रगतीने ससा खूश होऊन झोपून जातो. कासव आपला चालतच राहतो आणि शेवटी शर्यत जिंकतो. ससा कासवाची ही गोष्ट फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच नाही. तशी ती केवळ मुलांच्या मनोरंजनासाठीही नाही. 

   कोणत्याही कार्याला सुरूवात केल्यानंतर मनामध्ये त्याविषयीचा आळस निर्माण होता कामा नये. शरीराकडून जो आळस होतो त्याला आळस म्हणतात, मनाकडून जो आळस होतो त्याला प्रमाद म्हणतात. मला करायचे आहे, हे कळते आहे. मी केलेच पाहिजे हेही कळते आहे. पण कृती मात्र काही घडत नाही, याला प्रमाद म्हणतात. प्रमादी माणसाला अखंडित कार्यप्रवृत्त राहिल्याशिवाय यश मिळणार नाही. आपल्याकडे ‘अखंड हरिनाम सप्ताह’ असे सप्ताहाच्या पत्रिकेत नाव छापलेले असते. परंतु एकदा सप्ताह पार पडल्यानंतर त्यामध्ये तब्बल एक वर्षाचा खंड पडतो. जी गोष्ट अखंडितपणे करायची त्यात खंड पडतोच. कारण अखंड शब्दातच खंड शब्द आलेला असतो! 

     ‘कर्मयोग करा’ म्हटले की कदाचित काहींच्या डोळ्यासमोर भगव्या कपड्यांमध्ये नाक पकडून बसलेले साधू येत असतील. कारण आतापर्यंत आपलं तत्त्वज्ञान त्याच लोकांनी टिकवलं, वाढवलं. त्यांच्यामुळेच आज मी आपल्याला कृष्णाच्या जीवनसूत्रांविषयी बोलू शकतो. मात्र योग म्हणजे कायम जोडून राहणे, कधीही वेगळे न होणे. तुम्ही जीवनात कोणतीही गोष्ट करीत असाल, तर तिला पक्के घट्ट धरून ठेवणे म्हणजे योग. काहींना योग म्हणजे आसनांमध्ये शरीराच्या ठराविक घड्या करणे, इतकाच योगाचा अर्थ माहीत आहे. वास्तविक कर्मयोग करा म्हणजे अखंडितपणे त्या कर्माला जोडलेले राहा, चिकटलेले राहा. यश मिळवायचे ना, मग सतत युक्त राहा. जोडलेले राहा पण एकटे राहा... समूहात तपश्चर्या होत नसते. तसेच समूहात कर्मयोगही करता येत नाही. दोघं एकत्र झाले की गप्पा सुरू होतात. तीन झाले की मग गोंधळ!

   

    त्याचप्रमाणे आत्मविश्वास किती महत्वाचा असतो याबाबत लेखकाने स्वामीजींच्या आयुष्यातील दुर्धर प्रसंग या पुस्तकात मांडला आहे…

 स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेसाठी गेले तेव्हा त्यांचे सर्वस्व चोरांनी लुटले. सोबत काहीच नव्हते, होता केवळ दुर्दम्य आत्मविश्वास! चोरणारा सगळं काही चोरू शकतो पण तुमचे ज्ञान, तुमची वृत्ती, तुमची विचारक्षमता, बुद्धी कधीही चोरू शकत नाही. सर्वस्व लुटले गेल्यानंतर स्वामी एका गल्लीतून फिरत असताना तिथली मुले कोणीतरी विचित्र माणूस आलाय या भावनेने त्यांची हुर्यो उडवत त्यांच्यामागे फिरत होती. तरीही स्वामीजींनी आपला आत्मविश्वास टिकवून ठेवला. ज्याचा आत्मविश्वास टिकून असतो, त्याला ईश्वरी शक्ती मदत करते. ‘न ऋते श्रान्तस्य सख्याय देवाः’ -ऋग्वेद (४.३.३.११). जो अविरत प्रयत्न करतो, त्याला ईश्वरी शक्ती मदत करते. मला माझ्या कार्यात कुठून ना कुठून मदत मिळेल यावर ठाम विश्वास हवा. अर्थात माझ्या हातचे जे प्रयत्न करायचे, ते मी केलेच पाहिजेत. कदाचित माझ्या प्रयत्नानीच मला यश मिळेल, असाही ईश्वरी शक्तीचा संकेत असू शकतो. स्वामीजींनी उपाशीपोटी हाडे गोठवणाऱ्या थंडीत रेल्वेस्टेशनवर दिवस काढले पण आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही. त्याचा परिणाम आपणा सर्वांना माहितच आहे. स्वामीजींचं ते जग जिंकणारं भाषण आणि त्यानंतरचा तो त्यांचा झंझावात! याला आत्मविश्वास म्हणतात. 

     आत्मविश्वास आणि भीती एकत्र नांदू शकत नाहीत. आत्मविश्वास कमी झाला, की भीती डोके वर काढते. त्यामुळे काहीही झाले तरी तुमचा आत्मविश्वास ढळता कामा नये. तुमचा आत्मविश्वास हाच खरे तर तुमच्या विजयाचा प्रमुख वाटाड्या असतो. आत्मविश्वास गमावला की माणूस लवकर पराजय स्वीकारतो. त्याची लढण्याची वृत्ती मरून जाते. पराभव झाला तरी चालेल पण मी लढाईचे मैदान सोडणार नाही… हा अढळ निश्चय असला की आत्मविश्वास दृढ राहतो. ज्यांच्या ज्यांच्या चरित्रामध्ये आत्मविश्वास आहे, ते लोक कधीही घाबरलेले तुम्हाला दिसणार नाहीत.


    ‘जीवनात अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घाला’ या अत्यंत महत्वाच्या प्रकरणात विज्ञान आणि अध्यात्म परस्परपूरक कसे आहेत, याचं सुरेख विवेचन लेखकाने केलं आहे ... विज्ञान हे निरीक्षण, प्रयोग आणि तर्कशुद्ध विचारांवर आधारित असून, त्याचा उद्देश निसर्गातील नियम समजून घेऊन त्यांचा उपयोग मानवकल्याणासाठी करणे हा आहे. विज्ञानाने मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. चाकाचा शोध हा मानवी इतिहासातील पहिला क्रांतिकारक शोध मानला जातो. त्यानंतर चाकाच्या गतीप्रमाणेच मानवी जीवनाला गती प्राप्त झाल्याचे आपल्या लक्षात येते. आज मानव चंद्र, मंगळ आदी ग्रहांवर वस्ती करण्याचे मनसुबे रचतो आहे.

तर अध्यात्म हे आत्म्याचा, चेतनेचा, आणि परमसत्तेशी असलेल्या नात्याचा शोध घेण्याचे साधन आहे. विज्ञानाने लावलेले शोध नेमके कशासाठी आहेत आहेत आणि ते कसे वापरायचे याचे हॅण्डबूक म्हणजे अध्यात्म आहे. एखादे आधुनिक गॅजेट घरात आणल्यावर ते कसे वापरावे, याचे योग्य ज्ञानच नसेल, तर एक तर त्याचा वापर होणार नाही किंवा चुकीच्या पध्दतीने होईल. विज्ञानाचा वापर माणसाच्या हातून चुकीच्या पध्दतीने होऊ नये, यासाठीचे ईश्वराने मानवासाठी बनवलेले युजर मॅन्युअल म्हणजे अध्यात्म!

     विज्ञान भौतिक जगाचे ज्ञान देते, तर अध्यात्म मनोभूमीचा, चेतनेचा आणि नैतिकतेचा पाया घालते. त्यासाठी अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचाही समन्वय अधिक आवश्यक ठरतो. विज्ञान शरीरासाठी औषध देते, पण मनाला शांती देत नाही. मनाला शांतीसाठी विचारांचीच आवश्यकता आहे. विज्ञान तुम्हाला अत्याधुनिक गादी देऊ शकते पण सुखाच्या झोपेसाठी अध्यात्माचीच कास धरावी लागेल. विज्ञान माणसाला ज्ञान आणि शक्ती देते, तर अध्यात्म त्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याची दिशा दाखवते. विज्ञानाने जग बदलते तर अध्यात्म मन बदलते! विज्ञानाने अणुशक्ती निर्माण केली, पण तिचा उपयोग विनाशासाठीही झाला. जर अध्यात्मिक मूल्ये नसतील, तर विज्ञान आंधळे ठरते. अध्यात्म विज्ञानाला विवेक, संयम आणि करुणेची दृष्टी देते.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, “विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय झाला तरच मानवतेचा खरा विकास होईल.”

विज्ञानाच्या माध्यमातून माणूस अवकाशात पोहचला, पण अध्यात्माच्या माध्यमातून तो आपल्या अंतर्मनात उतरू शकतो. अध्यात्म विज्ञानाला नैतिकता, दिशा आणि मानवी मूल्यांची दृष्टी देते. विज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण आहे पण अध्यात्माशिवाय ते आंधळे आहे. विज्ञान पंख देतं, पण अध्यात्म त्या पंखांना उडण्याची दिशा देते!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यात्म आणि विज्ञानाचं महत्व विशद करताना म्हणतात…

“गुरूदेव ऐसी हो दया, जगका अंधेरा दूर हो।

 सद्धर्म-सूरज की प्रभासे दंभ सारे चूर हो।। 

अध्यात्म और विज्ञान के संयोगसे सब हो सुखी। 

सहयोग-समतासे यही सृष्टी करें हम स्वर्गसी।।”

      ‘स्वामी विवेकानंदांची जीवनसूत्रे’ या प्रेरणादायी ग्रंथातील सगळीच प्रकरणे अभ्यासपूर्ण आणि सर्वसामान्यांना निश्चित दिशा देणारी असल्यामुळे ती मुळात वाचायलाच हवी अशी सहज, साध्या आणि प्रवाही भाषेत लिहिली आहेत. स्वामींजींचे प्रेरक आणि मार्गदर्शक विचार लेखक रमेश वाघ यांनी प्रयत्नपूर्वक अनेक प्रकारचे दाखले देऊन ते प्रभावीपणे मांडले आहेत. त्यामुळे ही साहित्यकृती हवीहवीशी वाटणारी आणि अतिशय वाचनीय झाली आहे. त्यांच्या या अमूल्य अशा साहित्यकृतीसाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच यापुढेही अनेक प्रेरक साहित्यकृतींची त्यांनी निर्मिती करावी, यासाठी त्यांच्या पुढील उज्ज्वल साहित्यिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा देतो… धन्यवाद!


– विनोद श्रा. पंचभाई, लेखक-कादंबरीकार, पुणे

   भ्र. क्र. ९९२३७९७७२५

जीवन मे तू डरना नही...

 


 जीवन मे तू डरना नहीं!

   अचानक येणारी संकटं किंवा अपरिमित आर्थिक नुकसान आणि मग त्यातून येणारी आत्यंतिक निराशा अशा गोष्टींचा समर्थपणे सामना करणे सहसा सगळ्यांनाच जमत नाही. अशावेळी आपलं मन अगदी समतोल ठेवून आनंदी राहणं हे धाडसी माणसांशिवाय अन्य कोणाला साधता येत नाही. या जगात जे जे थोर महापुरुष होऊन गेलेत, त्यांच्या मोठेपणामागे त्यांची धाडसी मनोवृत्तीच कारणीभूत होती यात शंकाच नाही! अतिशय सामान्य प्रकारचे लोक कुठलंही संकट समोर दिसताक्षणीच डगमगतात आणि त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात नुकसान झालं तरी त्याप्रसंगी पुढचं पाऊल मागे घ्यायला कमी करत नाही. त्यांच्या अंगी धाडसी वृत्ती नसल्यामुळे ते त्यावेळी लगेच अधीर होतात. मात्र मनानं खंबीर असणारे लोक खरेखुरे धाडसी आणि निधड्या छातीचे असतात. ते अशा प्रकारच्या गोष्टींची, छोट्या मोठ्या संकटांची मुळीच पर्वा करत नाही. ते कुठल्याही प्रकारच्या बिकट प्रसंगी आपल्या मनाची समतोल बुद्धी, कणखरपणा जरा सुद्धा ढळू देत नाहीत. उलट आलेल्या प्रसंगाचे टेन्शन न घेता, धैर्याने त्याचा सामना करतात आणि आनंदी वृत्तीने आपले म चालू ठेवतात. खरंतर शौर्य, धैर्य म्हणजेच धाडसीपणा, निधडेपणा त्याचप्रमाणे थोडी फार बेफिकीरी इत्यादी गुण अंगी असल्याशिवाय मनुष्याची वृत्ती आनंदी किंवा प्रफुल्लित राहूच शकत नाही !

    मनुष्य हा नेहमीच आशेकडे आपले डोळे लावून पाहत बसणारा प्राणी आहे. असे असले तरी त्याच्यात हा आशावाद निर्माण होण्यासाठी त्याच्या मनाचा कणखरपणाच कारणीभूत ठरतो यात वाद नाही. ज्याच्याजवळ आशा आहे, म्हणजे आपलं इच्छित कार्य करण्यासाठी ज्याची दिवस रात्र अखंडपणे मनापासून धडपड चाललेली असते, त्याच्याकडे निराशा कधीच चालून येत नाही. आज समोर मिट्ट काळोख, अंधःकार दिसत असला तरी तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, याची त्याला जाणीव असते आणि त्या काळोखानंतर उद्याचा सूर्य आपलाच असणार हेही त्याला पक्के ठाऊक असते !

       असं म्हणतात दुःख, संकटे, त्रास, नुकसान इत्यादि गोष्टी कधीही कोणाच्या वाट्याला येऊ नयेत... हे जरी खरं असलं तरी त्याप्रसंगी आपलं धैर्य गमावून खचून जाणं शहाणपणाचं ठरणार नाही. तर अशा प्रकारच्या दिव्यातून जो तावूनसुलाखून बाहेर पडतो, त्याला वरील गोष्टीपैकी कशाचीही झळ लागत नाही! कारण त्याची धाडसी मनोवृत्ती समोर येणाऱ्या संकटासोबत सामना करण्यासाठी तयार होऊन त्याचे स्वागत करावयास ती सज्ज झालेली असते. खरं बघितलं तर संकटाचा प्रतिकार करायला काही फारशी साधनसामुग्री लागत नाही. थोडा फार बेफिकिरपणा, कमालीचा कणखरपणा आणि मनाचा समतोल या गोष्टी जवळ असल्या की तुमचे कोणीही वाकडे करू शकत नाही मात्र त्यासाठी हाच ठाम विश्वास नित्य मनी बाळगणं तितकंच गरजेचं असतं !


   भय, भीती ही अशी गोष्ट आहे, ती एकदा मनात ठाण मांडून बसली की मग कुठलंच काम व्यवस्थित होत नाही. मग ही सतत वाटणारी भीती विनाकारण टेन्शन वाढवते आणि मनाचा समतोल बिघडवण्यासही कारणीभूत ठरते... माणसामधील आत्मविश्वास कमी करते ! 'ज्याला कर नाही, त्याला डर कशाला' हे ज्याला ठाऊक असतं ना, तो कशालाही घाबरत नसतो. त्याला माहिती असतं आपण कुठलंही खोटंनाटं काम कधी केलं नाही, करत नाही आणि करणारही नाही तर उगाच घाबरायचं कशाला? आपण कुणाचे मिंधे नाही, कुणाचं लांगुलचालन करत नाही, कुणाच्या दबावाखाली काम करत नाही तर भीती कशासाठी

बाळगायची? मग कुणापुढे विनाकारण झुकायचं तरी कशासाठी? अशा प्रकारच्या धाडसी स्वभावाच्या माणसाला चांगलंच ठाऊक असतं... "जीवन मे तू डरना नही, सर निचा कभी करना नहीं!"

 विनोद श्रा. पंचभाई, पुणे 9

923797725

Friday, November 14, 2025

समर्पण

 

         समर्पण 


      एकदा संत कबीर महाराजांकडे एक यूवक आला. त्यानं थोडं संकोचत, चाचरतच संत कबीरांना विचारलं...

"महाराज मला एक गंभीर स्वरूपाचा प्रश्न पडला आहे. प्रश्न थोडा खाजगी आहे. तुम्हाला विचारला तर चालेल का?"

"अरे जीवन जगत असताना आपल्याला प्रश्न पडायलाच हवेत. तू नि:संकोच विचार!" कबीर महाराज त्याला आश्वस्त करत बोलले.

 "महाराज, मी सध्या द्विधा मनस्थितीत सापडलो आहे. माझा प्रश्न असा आहे की, विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?"

      प्रश्न विचारल्यावर आता महाराज काय उत्तर देतात, याबाबत त्या युवकाला खूप उत्सुकता होती. मात्र त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं करत संत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने अत्यंत अधीर होऊन त्या युवकाने परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळी सुद्धा संत कबीरांनी काही उत्तर न देता घरात असलेल्या आपल्या पत्नीला हाक मारली आणि ते म्हणाले...

 "अगं आतून तो कंदील घेऊन ये इकडे."

त्यावेळी त्या युवकाला मोठं आश्चर्य वाटलं. आपल्याकडे साफ दुर्लक्ष करत महाराजांचं हे काय चाललंय असं त्याला वाटलं. मग मात्र न राहवून त्यानं विचारलंच...

 "महाराज आता दिवसाढवळ्या कंदिलाची काय गरज आहे? एवढ्या उजेडात तर सगळं काही स्वच्छ दिसतंय ना!"

त्यावर कबीरांनी हसतच त्याला उत्तर दिलं...

"बेटा! ऐक आता, हेच तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विवाह करताना स्वतःमध्ये पूर्ण समर्पणाचा भाव असणं आवश्यक आहे. तेथे तर्कवितर्क, शंकाकुशंका अशा प्रकारच्या क्षुल्लक गोष्टींना अजिबात थारा नकोच… मी माझ्या पत्नीला आतून कंदील आणायला सांगितला, तिनं तो लगेच आणला सुद्धा! 'कशाला पाहिजे?', 'दिवसा कंदिलाची काय गरज?' अशाप्रकारचे विनाकारण प्रश्न विचारून तिनं शंका उपस्थित केली नाही. तर तिनं कंदील तात्काळ आणून दिला. अशाप्रकारचा समर्पण भाव संसार करताना दोघातही असायला हवा. हा समर्पण भाव तुझ्यामध्ये आणि तुझ्या होणाऱ्या अर्धांगिनीत असल्यास तू निश्चितच विवाह करू शकतोस!"

 संत कबीर महाराजांची वाणी ऐकून त्या युवकाला आपण कृतकृत्य झाल्याचं वाटलं, त्याचं पूर्ण समाधान झालं होतं! संत कबीरांना वंदन करून तो तिथून बाहेर पडला. 

     या प्रसंगावरून आपल्या असं लक्षात येईल की, संसार करताना समर्पण अन् विश्वास किती गरजेचा आहे. आजच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात एकमेकांवरील विश्वासाची भावना कमी होताना दिसत आहे. त्याऐवजी आजकाल निरनिराळ्या शंकाकुशंका विचारून एक दुसऱ्याला भंडावून सोडणं, अगदी क्षुल्लक कारणांवरून भांडण करणं असे प्रकार सर्रास होताना दिसू लागले आहेत. याला कारणंही तशीच आहेत... आपल्या आजूबाजूला नित्यनेमाने घडणाऱ्या दुर्दैवी घटना, प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या अतिरंजित बातम्या तसेच दुरदर्शन संचाच्या विविध वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या ताणतणाव वाढवणाऱ्या मालिका यामुळे नाही म्हटलं तरी सर्वसामान्य जनतेच्या भावना विचलीत होतातच. त्यामुळे मग काही प्रमाणात का होईना आपले विचार कुंठित होण्यास वाव मिळतो. एकदा का आपली सारासार विचार करण्याची शक्ती आणि बुद्धी भ्रमित झाली की तिथं निरनिराळ्या शंकाकुशंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. हे आजचं कटू वास्तव आहे यात शंकाच नाही!

     डॉक्टर अभिजित गाढ झोपेत असताना पहाटे पहाटे त्यांचा मोबाईल वाजल्याने अनिच्छेनंच त्यांनी फोन उचलला. काही बोलायच्या आधीच त्यांना पलीकडून आवाज आला ...

"सर, सर मी रागिणी बोलतेय. कालचा तो पेशन्ट रमेश कसातरीच करतोय ... सारखा हात पाय झाडत आहे सर. तुम्ही सांगितलेलं औषध देण्याचा प्रयत्न केला तर तेही घेत नाही तो आणि..."

तिला पुढचं बोलू न देता डॉ. अभिजित लगेच म्हणाले ...

"हे बघ रागिणी, तू अशी घाबरून जाऊ नकोस. असं कर आता, त्याला अँटीबायोटिक्सचं इंजेक्शन सलाईनमधून दे तोपर्यंत मी पोहचतोच." 

"ओके सर,थँक्स! करून घेते मी." 

       पाचोरासारख्या तालुक्याच्या छोट्या शहरात डॉ. अभिजित यांनी दोन वर्षांपूर्वी आपलं क्लिनिक सुरू केलं होतं. पन्नाशी ओलांडलेले डॉ. अभिजित मुंबईच्या एका बड्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला कंटाळून तिथली आरामाची नोकरी सोडून परत आले होते. त्यांनी त्यावेळी ठरवून टाकलं होतं... काहीही झालं तरी आपण आपल्या कर्तव्याशी तडजोड करायची नाही, आपलं काम प्रामाणिकपणे, अगदी समर्पित भावनेनं आणि निष्ठेनं करायचं! 

        आपल्या क्लिनिकमध्ये पोहचताच डॉ. अभिजित तडक रमेशच्या 

बेडजवळ गेले. तिथं रागिणी त्यांचीच वाट पाहत उभी होती. डॉक्टरांना बघताच ती म्हणाली,

 "सर मी मगाशी इंजेक्शन दिलंय, नुकतीच झोप लागली आहे त्याला!"

"ओके! आपण त्याच्या काही टेस्ट घेऊयात, तू त्या पॅथेलॉजीला फोन करून कोणाला तरी सॅम्पल घ्यायला बोलावून घे." डॉ. अभिजित रमेशची तपासणी करता करता बोलले. 

"येस सर! लगेच बोलावून घेते." रागिणी तत्परतेनं म्हणाली. ती हातात मोबाईल घेऊन पलीकडे वळणार तोच डॉ. अभिजित यांनी तिला अचानक विचारलं... 

"बरं याच्याकडील कोणी नातेवाईक वगैरे आले की नाही?"

"अं, नाही ना सर. याला इथं दाखल करायला सोबत आलेला कालचा तो माणूस पण तुम्ही निघाल्यावर बाहेर पडला. तेव्हापासून तो आलाच नाही."

"ओह... आय सी!" डॉ. अभिजित उदगारले. विचार करतच ते आपल्या केबिनमध्ये जाऊन बसले. नुकतंच उजाडलं असल्यामुळे सर्वत्र शांतता पसरली होती. डोळे मिटून शांतपणे विचार करता करता दोन दिवसापूर्वीच संपन्न झालेल्या व्याख्यानमालेचा कार्यक्रम डॉक्टर अभिजित यांच्या डोळयांसमोर तरळला आणि त्यातील प्रोफेसर सरदेसाई यांची मनाचा ठाव घेणारी प्रभावी वाक्यं त्यांना आठवू लागली ...     

 "सध्याच्या अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे अतिसुशिक्षित माणूस एकप्रकारे आत्मकेंद्रित होऊ लागला आहे. कधी नव्हे इतका तो आपमतलबी सुद्धा होत चालला आहे अन् त्यामुळे जवळच्या नात्यातील दुरावा वाढत चालला आहे असंही आपल्याला हल्ली निदर्शनास येईल. कधीकाळी आपल्या मित्रपरिवारात किंवा आपल्या नातेवाईक मंडळीत सुद्धा आनंदानं रमणारा हा माणूस आज मात्र भलताच आत्मकेंद्रित झालेला दिसून येतो! हा झालेला बदल अचानक एका रात्रीत घडणे शक्य नाही. त्याची निरनिराळी कारणं असल्याचं आपल्या लक्षात येईल. आजूबाजूची परिस्थिती, आयुष्यात अचानक घडलेल्या अप्रिय घटना, जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू तसेच केवळ ऐकीव माहितीच्या आधारे इतरांविषयी झालेले गैरसमज या गोष्टीही कारणीभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे दूरदर्शनच्या निरनिराळ्या चॅनलवरील विविध मालिकांच्या भडिमारामुळे, त्यातून दाखवल्या जाणाऱ्या परिणामकारक दृश्यांची आजचा हा शिकला-सवरलेला माणूस आपल्या खासगी आयुष्याशी तुलना करू लागतो. अशावेळी मात्र तो आपली सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवतो. तसंच समाज माध्यमांमार्फत सतत कानावर पडणाऱ्या बातम्या, वृत्तपत्रांतून वाचण्यात आलेले अतिरंजित प्रसंग याचाही त्याच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही."

"आज आपणा सर्वांनाच माहिती आहे, महिन्याला लाख - दीड लाख रूपये उत्पन्न असणारी व्यक्ती सुद्धा सुखासमाधानात जगताना दिसत नाही. मग सारखी अस्वस्थता, निद्रानाश, ताणतणाव, साशंकता, भीती इत्यादी कारणांमुळे स्वभावात एकप्रकारचा चिडचिडेपणा निर्माण होतो. कालांतराने मग अशी व्यक्ती नैराश्याच्या आहारी जाते. याउलट अगदी हातावर पोट असणारा मजूर वर्ग मात्र आपल्याला शांतपणे जगताना दिसतो. दिवसभर शारिरीक श्रमाची कामे करुन तो रात्री शांतपणे झोपी जातो. त्याला ना चोरांचं भय असतं ना कुठली चिंता असते. रात्री त्याला ना चॅटिंग करण्यात स्वारस्य असते ना तो कुठला क्रिकेटचा सामना बघत जागत असतो ... तर जमिनीवरच मस्तपैकी ताणून देतो. कारण हातावर पोट असलेल्या त्याला सकाळी लवकर कामावर जाण्याची घाई असते. जेवढं आपण जास्त श्रम करू तेवढे जास्त प्रमाणात पैसे मिळणार हे त्याला ठाऊक असतं. म्हणूनच त्याला त्याच्या कामाप्रती एकप्रकारचा समर्पण भाव असतो. त्यामुळे तो अगदी जीव ओतून काम करतो! मग संध्याकाळी आपल्या श्रमाचा मोबदला घेऊनच तो समाधानाने घरी परततो."

"आधीच्या काळात शाळेतील शिक्षक आजच्यासारख्या शिकवण्या न घेता विद्यार्थ्यांना मनापासून शिकवायचे. त्यांना घडवायचे. त्यावेळी शिकवताना ते तल्लीन व्हायचे... स्वतःला झोकून द्यायचे. अशाप्रकारची समर्पित वृत्ती आजच्या शिक्षकांमध्ये अभावानेच आढळून येते. पूर्ण समर्पित भावनेनं शिकवणारे शिक्षक म्हणून याठिकाणी साने गुरुजी यांचं उदाहरण देता येईल. त्यांना मुलांचं मानसशास्त्र अतिशय उत्तमप्रकारे अवगत होतं. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. तसेच आचार्य अत्रे ज्यावेळी शिक्षकीपेशात होते तेव्हा त्यांनी त्यावेळच्या विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांच्यासाठी त्यावेळी 'नवयुग वाचनमाला' सुरू केली होती... ती विद्यार्थी घडवण्याच्या त्यांच्या तळमळीमुळेच! त्याचा परिणाम असा झाला, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने फायदा तर झालाच, शिवाय त्यांना वाचनाची सुद्धा गोडी लागली. अशाप्रकारचे विद्यार्थ्यांची खरी 'नाडी' ओळखणारे शिक्षक आज मात्र खरंच शोधावे लागतात ही वस्तुस्थिती आहे!"

"आज आपण सर्वत्र बघतो, कुठलंही क्षेत्र घ्या... आपलं काम करताना 'शाॅर्टकट मेथड' वापरण्याची वृत्ती फोफावताना दिसून येते. त्यामुळे त्या केलेल्या कार्यात 'क्वालिटी' आढळण्याची शक्यता फारच कमी असते. नवीन इमारतींच्या बांधकामाचं उदाहरण याठिकाणी देता येईल. मात्र काही प्रमाणात याला अपवादही असतात, नाही असं नाही. सरसकट सर्वच लोक 'टाईमपास' प्रकारचे काम न करता अगदी मनापासून आपलं काम करणारे पण आपल्या बघण्यात येतातच! तरीसुद्धा आपल्या कामाप्रती आधीसारखी असलेली समर्पित वृत्ती आजकाल कुठंतरी लुप्त झाली की काय अशी आज एकंदर परिस्थिती उदभवली आहे. कारण कसंतरी चालढकल करून आपलं काम करायचं आणि महिनाअखेर जास्त मोबदल्याची अपेक्षा ठेवण्याची वृत्ती आज सर्वच क्षेत्रात वाढली आहे... आणि यामुळेच कामाप्रती असलेला समर्पण भाव लुप्त होताना दिसतो आहे."

"येणाऱ्या पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवण्यासाठी, आपला समाज समृद्ध आणि सुदृढ करण्यासाठी आपणच ध्यास घ्यायला हवा. त्यासाठी आपण समर्पित भावनेनं कार्य करण्याची आपल्यापासूनच सुरूवात करण्याचा आज संकल्प करूया. आपल्या आदरणीय पूर्वजांपासून प्रेरणा घेऊन आपलं सामाजिक दायित्व पार पाडण्याचा आपण आजच निर्धार करूया … "

  अचानक मोबाईल फोनची रिंग वाजल्यानं डॉ. अभिजित यांची विचारशृंखला खंडित झाली. त्यांनी मोबाईल उचलला. गॅलक्सी पॅथेलॉजीचा कॉल येत असल्याचं दिसताच मोबाईल कानाला लावत ते म्हणाले...

"हं बोला धनंजय, काय म्हणता."

"सर गुडमॉर्निंग! सगळे रिपोर्ट तसे नॉर्मलच आढळून आलेत. मी तुम्हाला व्हाट्सअप केलं आहे सर!"

"ओके! मी बघून घेतो... थँक्स धनंजय."

         आपल्या मोबाईलमधील टेस्ट रिपोर्टवर नजर फिरवल्यानंतर डॉक्टर अभिजित यांनी सवयीनुसार भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. सकाळचे साडेसहा वाजले होते. ते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी एकदा रमेशच्या बेडकडे डोकावून बघितलं. तो गाढ झोपलेला त्यांना दिसला. तसंच पलीकडच्या टेबलावर डोकं ठेवून खुर्चीवर बसलेली रागिणी त्यांच्या नजरेस पडली. बहुधा तिचा डोळा लागला असावा असा विचार करत डॉ. अभिजित स्वतःच क्लिनिकबाहेर पडले आणि सरळ समोरच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेले. त्यांना आवश्यक त्या वस्तूची यादी तिथल्या माणसाला सांगितली. मग त्या सर्व वस्तू शक्य तितक्या लवकर क्लिनिकमध्ये पाठवायला सांगून डॉक्टर आपल्या क्लिनिकमध्ये परतले. 

    आत येणाऱ्या डॉक्टरांची चाहूल लागताच रागिणी तत्परतेनं जागेवरून उठली. ते लक्षात येताच डॉ. अभिजित म्हणाले…

“अगं उठू नकोस…रिलॅक्स! आता थोडी विश्रांती घे… नंतर आपल्याला याच्या अपघातग्रस्त पायाचं ऑपरेशन करावं लागणार आहे! त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूची यादी समोर देऊनच आलोय मी आता.”

“सर तुम्ही मला सांगायचं होतं ना… मी गेले असते त्या मेडिकल शॉपमध्ये.”

“रागिणी, तू रात्रभर आपल्या पेशन्ट्सकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवून असतेस याची मला जाणीव आहे… आता ना खरंच तू थोडा आराम कर,

 बरं का!” डॉ. अभिजित तिला समजावणीच्या सुरात म्हणाले.

“करते सर… पण या पेशंटचे कोणी नातेवाईकही आले नाहीत आणि तो कालचा माणूस पण गायब झालाय…” रागिणीला अडवत डॉक्टर लगेच बोलले…

“त्याची काळजी करू नकोस तू… ते नंतर बघता येईल. आधी याच्या जीवघेण्या वेदना कमी करण्यासाठी आपल्याला लगेच ऑपरेशनची तयारी करायची आहे.”

“हो सर. तुम्ही खरंच आपल्या पेशंटची खूप काळजी घेता सर… मी आधी काम करत होते तिथं, त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला वेगळेच अनुभव यायचे.” रागिणी म्हणाली.

“म्हणजे? नेमकं काय म्हणायचं आहे तुला?” डॉक्टरांनी अचंबितपणे तिच्याकडे पाहत विचारलं.

  “सर, त्या नावाजलेल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर आधी ठराविक रक्कम भरायला सांगतात. मग पोलीस बोलावून घेतात. सर, तोपर्यंत त्या अपघात झालेल्या पेशंटची अवस्था काय होत असेल याची आपल्याला कल्पनाच करवत नाही!”

रागिणीचं बोलणं ऐकून डॉ. अभिजित एकाएकी गंभीर झाले आणि त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलची आठवण आली… तिथला सगळा भोंगळ कारभार, तिथल्या कामाची निराळीच तऱ्हा आठवली! त्याच अवस्थेत ते आपल्या केबिनकडे वळले.


        सगळी व्यवस्था झाल्यानंतर रमेशच्या अपघात झालेल्या पायाचं ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पडलं होतं. मात्र त्या दरम्यान रागिणीच्या मोबाईल फोनवर मध्येच रिंग वाजल्याचं डॉ. अभिजित यांना जाणवलं. मात्र त्याकडे तिनं दुर्लक्ष करून फोन बंद केल्याचंही त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी टेबलावरची बेल वाजवून रागिणीला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि म्हणाले…

“रागिणी, तू आता निघालीस तरी चालेल… बराच वेळ झालाय.”

“सर, त्या चार नंबरच्या पेशंटचं ड्रेसिंग करायचं राहिलं आहे आणि…”

“हे बघ ती संगीता येईलच इतक्यात, तिला सांगतो मी करायला… आणि तुला मगाशी फोन पण येत होता ना, काही प्रॉब्लेम आहे का?”

“नाही सर प्रॉब्लेम काहीच नाही. आज मुलाचा वाढदिवस आहे ना, त्याचाच हॉस्टेलवरून फोन येत होता… निघालीस का म्हणून विचारत होता तो.”

“अरे मग तू हे आधी सांगायचं होतं ना… मगाशी ऑपरेशन झाल्यावर लगेच निघता आलं असतं तुला!”

“कसं सांगणार सर! तुम्ही एवढ्या समर्पित भावनेने काम करत होता आणि मी तुमच्या मदतीसाठी नुसतीच उभी होते… खरंतर मला हे सगळं शिकून घ्यायचं होतं पण नर्सिंगला ऍडमिशनच मिळत नव्हती आणि घरच्यांनी पण लग्नाची घाई केली…” बोलता बोलता रागिणीला खूप गहिवरून आलं. तिला पुढे बोलवत नव्हतं. डॉ. अभिजित जागेवरून उठले आणि तिला पाण्याची बाटली देत म्हणाले…

“ शांत हो रागिणी! इथं बैस, थोडं पाणी घे…आणि नीट ऐक आता, घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नसतो. तू तुझं काम प्रामाणिकपणे करतेस ना, यातच सगळं आलं. इथं माझ्या लक्षात आलंय… तू प्रत्येक पेशंटची व्यवस्थित काळजी घेतेस. कुणाला काय हवं, नको ते बघतेस. हे बघ इथं तुला हळूहळू सगळं शिकून घेता येईल!” 

“तुम्ही शिकवणार सर मला? ते पेशंटला टाके घालायला, त्यांना…” उत्तेजित होत रागिणी बोलत असतानाच डॉक्टरांनी तिला रोखलं आणि म्हणाले…

“हे बघ, तुला या कामाची मनापासून आवड आहे ना, मग क्रमाक्रमाने सगळं जमणार तुला! आता तू असं कर, इथून लगेच निघ. तिकडे मुलगा वाट बघत असणार, त्याला माझ्यातर्फेही वाढदिवसाच्या शुभेच्छा सांग! एक मिनिट… हे घे, त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जा!”

आपल्या पाकिटातून काही पैसे काढून डॉक्टरांनी रागिणीच्या हातावर ठेवले. तेव्हा तिच्या डोळ्यांत आपसूकच आसवं गोळा झाली होती! मात्र स्वतःला सावरत तिनं डॉक्टर अभिजित यांना वाकून नमस्कार केला आणि ती क्लिनिकबाहेर पडली!



शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर अण्णा भाऊ

 शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर अण्णा भाऊ 


*सर्वार्थाने उपेक्षित... दुर्लक्षित!*

‘दर्द है जहां… गीत है वही..!’ या गाण्याप्रमाणे अण्णा भाऊंच्या आयुष्यात अगदी त्यांच्या न कळत्या वयापासून दर्द म्हणजे दुःख, वेदना, अवहेलना त्यांच्या वाट्याला आल्या. मात्र अण्णांनी त्याचा उगाच बाऊ न करता, कुठलंही भांडवल न करता… या दुःखालाच आपलं सामर्थ्य बनवलं, मग त्याचं गाण्यामध्ये रूपांतर केलं… आणि अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या अनेक रचना लिहिल्या. त्यात झंझावाती पोवाडे होते, अतिशय अर्थपूर्ण अशा गवळणी, छक्कड, गाणी सगळं सगळं काही होतं! सर्व सामान्य लोकांचं हृदय पिळवटून निघेल एवढं सामर्थ्य अण्णांच्या गीत रचनेत असायचं! त्यांचं प्रभावी सादरीकरण ऐकून महाराष्ट्रातीलच नव्हे तर रशियातील लोकही डोलू लागले होते!


‘प्यासा’ चित्रपटातील लेखक असलेल्या नायकाच्या गजल, कविता इत्यादी साहित्य … तो हे जग सोडून गेला असं समजून लोक डोक्यावर घेतात. मात्र अभिजात आणि विपुल साहित्य निर्मिती करूनही अण्णांना ठराविक वाचक वर्ग मिळाला हे आपल्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचं दुर्दैवच! अण्णा भाऊंनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबऱ्या यांची खरी कदर परदेशात झाली, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही! खरं तर त्याला आपल्या मराठी मनाची संकुचित वृत्तीच कारणीभूत आहे. कारण तामिळनाडू राज्यात जन्मलेल्या जयकांतन दंडपाणी या तमिळ लेखकाच्या साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळू शकतो आणि अण्णा भाऊंसारख्या संवेदनशील लेखकाचं साहित्य दुर्लक्षित, उपेक्षित ठरतं यातच सगळं आलं! खरं तर जयकांतन दंडपाणी हे अण्णा भाऊंपेक्षा वयाने लहान होते आणि ते सुद्धा अण्णाप्रमाणेच आपलं गाव सोडून मद्राससारख्या मोठ्या शहरातील कम्युनिस्ट पार्टीच्या प्रेसमध्ये काम करण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांना अगदी नाममात्र अक्षर ओळख होती… मात्र नंतर त्यांनी लेखन, वाचन करण्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रगती केली. मग तिथल्या स्थानिक साहित्यिक मंडळीनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना लिहिण्यासाठीही प्रवृत्त केलं. त्यानंतर काही दिवसातच जयकांतन यांच्या साहित्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू लागली. त्यांच्या साहित्याची सकारात्मक दृष्टीने समीक्षा होऊ लागली. म्हणूनच दक्षिणेतल्या वाचकांनी त्यांचं साहित्य उचलून धरलं त्यामुळे त्यांना मान सन्मान, पुरस्कार प्राप्त होऊ लागले. त्या मानाने अण्णा भाऊंच्या साहित्याची म्हणावी तशी दखल आपल्या महाराष्ट्रातील ना राज्यकर्त्यांनी घेतली ना साहित्यिकांनी घेतली. त्यांचं दुर्दैव असं की… एक आचार्य अत्रे सोडले तर त्या काळच्या बाकीच्या थोर म्हणून गणल्या जाणाऱ्या साहित्यिकांनी, समीक्षकांनी आणि हो, पांढरपेशा वाचकांनी सुद्धा अण्णांच्या मर्मभेदी साहित्याची कदर केली नाही… मग मान सन्मान, पुरस्कार तर दूरच राहिले! 

     अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या कथा, हृदय पिळवटून काढणाऱ्या गीत रचना, खोल विचार करायला भाग पाडणाऱ्या कादंबऱ्या एवढं विपुल साहित्य लिहूनही शेवटी अण्णांना काय मिळालं? विवंचना, उपेक्षा, हेटाळणी, अवहेलना इत्यादी गोष्टींचा आयुष्यभर सामना करत अण्णा उपेक्षित जीवन जगत राहिले! नाही म्हणायला त्यांना सोव्हिएत रशियातून निमंत्रण आल्यामुळे तिथं तरी त्यांच्या साहित्याचा यथायोग्य सन्मान झाला… त्यांचा सत्कार वगैरे झाला! मात्र इकडे भारतात परतल्यावर त्यांना काय मिळालं? एक तर अण्णा कम्युनिस्ट पार्टीचं प्रचार कार्य करायचे… त्यामुळे इतर पक्षाचे संधीसाधू नेते वरून तोंड देखलेपणा दाखवत आतून मात्र त्यांचा द्वेषच करायचे! दुसरं असं की अण्णांच्या साहित्याची सततच इतर लेखकांच्या साहित्याशी तुलना केली जायची! त्यामुळे ते न वाचताच दुर्लक्षित, उपेक्षित ठरवलं जायचं… खरं तर हा इथल्या पांढरपेशा मराठी माणसांचा कोतेपणा अन् करंटेपणाच म्हणावा लागेल! त्याचप्रमाणे अण्णा भाऊंचा अनेक साहित्यकृतींवर चित्रपट देखील काढण्यात आले. मात्र त्यावर इतरांनीच स्वतःचा फायदा करून घेतला… त्यावेळी अण्णांना कर्जबाजारी करून त्यांच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन मलिदा खाणाऱ्यांना थोडी सुद्धा शरम वाटली नाही! 


     अण्णांच्या आयुष्याच्या शेवटी का होईना, महाराष्ट्र शासनाने त्यांना मुंबईतील गोरेगाव मध्ये राहायला घर आणि तीनशे रुपये मानधन मंजूर केलं. मात्र त्याचा पुरेपूर लाभ घेणंही अण्णांच्या नशिबी नव्हतं! कारण गोरेगावला राहायला गेल्यावर केवळ वर्षभरातच अण्णा भाऊ हे मतलबी आणि स्वार्थाने बरबटलेलं जग सोडून कायमचे निघून गेले होते!

     त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या प्रसंगी आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉम्रेड एस. ए. डांगे यांच्यासोबत अण्णा भाऊ, शाहीर अमर शेख, गव्हाणकर हे सगळे अग्रक्रमाने सतत अग्रेसर होते, हे अख्ख्या महाराष्ट्रातील आबालवृद्ध जाणतात. त्यानंतरच्या १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र वेगळा झाल्यावर मात्र त्याचं श्रेय कोणाला मिळालं तर ते सत्तेसाठी लोभी असणाऱ्या पुढाऱ्यांनाच! त्यावेळी शाहीर अण्णा भाऊ, शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांची साधी दखल सुद्धा घेण्यात आली नव्हती… मग श्रेय प्रदान करणं तर दूरच!

        अण्णा भाऊ यांची खरी कदर केली ती केवळ साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनीच! कारण केवळ त्यांनी अण्णांना अगदी जवळून ओळखलं होतं! त्यांना माहिती होतं… अण्णा भाऊंचं साहित्य म्हणजे इथल्या अस्सल मातीशी इमान राखून लिहिलेली अक्षरं आहेत, ते अगदी आतून, अंतर्मनातून आलेले शब्द आहेत… त्या शब्दाशब्दांमध्ये क्रांती घडवण्याची विलक्षण ताकद आहे! त्यांना अण्णांच्या एकूण एक साहित्य कलाकृतीच्या दर्जेदारपणाची जाणीव होती. जुगारात सर्व काही गमावलेल्या भिडूसारखी ज्यावेळी अण्णांची अवस्था झाली होती…त्यावेळी त्या अतिशय बेचैनीच्या काळात आचार्य अत्रे यांनी त्यांचं योग्य ते समुपदेशन केलं होतं. मग त्यातून सावरल्यानंतर त्यांनी अण्णा भाऊंना त्यांचं आत्मचरित्र लिहीण्यासाठीही उद्युक्त केलं होतं. त्यामुळेच अण्णा भाऊंच्या अलौकिक साहित्य कलाकृती ज्ञानपीठ पुरस्कारच काय तर सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराच्या तोडीच्या आहेत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही! 





Saturday, August 9, 2025

जीवन चलने का नाम...

 जीवन चलने का नाम…


      ‘चालणे' हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे असं आपण अगदी शालेय विद्यार्थी असल्यापासून ऐकत आलोय. त्याचप्रमाणे 'थांबला तो संपला' ही म्हणसुद्धा सर्वश्रुत आहे! आता साहजिकच एक प्रश्न डोक्यात येतो की सकाळी व्यायाम म्हणून चालणे एक वेळ ठीक आहे पण काही कारण नसताना कधीही नुसतंच निरर्थक चालणाऱ्याला काय म्हणावं ?

      बस किंवा रिक्षासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे आपल्या इच्छितस्थळी पोहचण्यासाठी चालणे, एखादी चालण्याची स्पर्धा आयोजित केली असेल तर त्यात चालण्यासाठी भाग घेणे, पंढरपूरची वारी किंवा दिंडीसोबत स्वयंस्फूर्तिने चालणे, ठराविक प्रभातफेरीमध्ये चालणे, कधीतरी 'बंद' काळात आपल्या कामावर जाण्यासाठी नाइलाजाने चालणे असे चालण्याचे विविध प्रकार आपण नेहमीच अनुभवत असतो! मात्र आपल्या निश्चित ध्येयप्राप्तीसाठी न थांबता, न थकता अविरत चालत राहणे हेच खरे जीवन! 'जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम!' हे गाणं नेमकं हेच सुचित करते.

        मांजर आडवी गेली म्हणून चालता चालता थांबणारे लोक कधीच कुणासाठी आदर्श ठरू शकत नाही! तसेच एखाद्या व्यक्तीचा रस्त्यावर अपघात झाला असल्यास त्याला मदत करायला न थांबता बेडरपणे दुर्लक्ष करून पुढे चालत निघून जाणारे सुद्धा आपल्या समाजात कमी नाहीत ! याउलट आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गनिमी काव्याने शत्रूवर चाल करणारे छत्रपती शिवाजी महाराज, इंग्रजाविरुद्ध आझाद हिंद सेनेची स्थापना करून 'चलो दिल्ली' अशी ललकारी देणारे सुभाषचंद्र बोस किंवा स्वातंत्र्यासाठी 'चले जाव' ची गर्जना करणारे महात्मा गांधी हे खरे युगपुरुष ठरतात!

    आपण कितीही सरळ मार्गाने चालत असलो तरी कुठल्यातरी वळणावर आपल्याला वळण घ्यावंच लागतं! कधीकधी अगदी नाईलाजाने नको त्या वळणावरून चालावं लागतं! अशावेळी कुणी सोबतीला असो अथवा नसो आपल्याला एकट्यालाच चालणे क्रमप्राप्त असते! अशावेळी 'संग चलनेको तेरे कोई हो ना हो तय्यार, हिंमत ना हार! चल चला चल अकेला चल चला चल!' हे अतिशय लोकप्रिय गाणं आठवलं की तुम्हाला नक्कीच खूप प्रेरणा मिळते आणि तुम्ही अधिक उत्साहाने चालू लागता!

     नेहमी चालणाऱ्या माणसाचं आरोग्य व्यवस्थित राहतं. तसेच त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढतो! चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे असं म्हणतात ते उगीच नव्हे ! काहीतरी ध्येय आपल्या नजरेसमोर ठेवून चालणे व नुसतेच चालत राहणे यात खूप फरक आहे ! कधीकधी आपल्या बघण्यात येतं काही लोक केवळ छंद म्हणून कित्येक मैल चालून नवनवीन विक्रम प्रस्थापित करतात. त्यासाठी त्यांना मिळणारं समाधान वेगळंच असतं! काही व्यक्ती आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी किंवा केवळ छंद जोपासण्यासाठी डोंगरदऱ्यातून, काट्याकुट्यातून, खाचखळग्यातून तसेच जीवघेण्या अडथळ्यातून चालताना दिसतात! उदा. गिर्यारोहण करणे, माउंट एवरेस्ट सारखी अतिशय उंच शिखरे सर करणे, जंगल भटकंती इत्यादी इत्यादी... प्राचीन काळी युद्धाच्या प्रसंगी रणांगणात राजे महाराजे किंवा सरदार, मनसबदार त्यांच्या रथ, हत्ती किंवा घोड्यावर स्वार होऊन रणांगणात जायचे पण सर्वात जास्त संख्येनं असलेले सामान्य सैनिक मात्र दूर दूरपर्यंत चालतच जायचे! तेव्हा चालणे हाच त्यांचा परिपाठ असायचा, युद्ध जिंकण्याच्या इर्षेने चालणे हेच जणू त्यांच्या जीवनाचा एक भाग असायचा. अलीकडच्या म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात महात्मा गांधींनी लाखो लोकांच्या साक्षीने ‘दांडी यात्रा’ यशस्वी करून ब्रिटिश सत्तेला जबरदस्त हादरा दिला तोही कित्येक मैल पायी चालत जाऊनच!

      आज मात्र, सकाळी सकाळी जवळच्याच दुकानातून साधी दुधाची पिशवी आणायला बऱ्याच लोकांना वाहनाची गरज भासते. अशा लोकांना जवळ कुठंही जायचं म्हटलं तरी स्कुटर किंवा रिक्षाशिवाय त्यांचं भागातच नाही. आजकालच्या ऐशोआरामाच्या सवयीमुळे पायी चालणे त्यांच्या अगदी जीवावर येते!

      आपल्या मुलाच्या बालपणी त्याच्या वयाचं वर्ष पूर्ण व्हायच्या आतच 'अरे तो बघ चालायला लागला' असं आपण मोठ्या कौतुकाने सगळ्यांना सांगतोच ना! त्यावेळी सगळे जण त्याचे कौतुकच करताना दिसतात! मात्र काही महिन्याने किंवा दोन तीन वर्षातच तो इतका चालायला लागतो की त्याला पळता भुई थोडी होते! मग शाळा किंवा महाविद्यालयात जायला लागला की चालताना त्याचे पाय जमिनीवर थांबत नाहीत हेही आपण बघतोच! म्हणजेच चालणे ही प्रक्रिया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनलेली असते.

     चालताना कितीतरी महाभाग इकडे बघणार, तिकडे चालणार असेही भेटतात! त्यामुळे अशा लोकांचा कधी धक्का लागून आपण पडणार हे कुणी सांगू शकत नाही. यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या 'ग्रामगीता' या ग्रंथात खूपच मार्मिक भाष्य केलेलं आहे...

“चालताना शिस्त नाही। जनलोकांची अजब घाई।

 कोणाचाही पायपोस नाही। पायी कोणाच्या ।।

 कोणी कोणाचे ऐकेना। पुढे धसावयासि करी धिंगाणा।

 याचे शिक्षणही नाही कोणा। कैसे चालावे मार्गाने? 

नाही चालणारांसि शिस्त। चालती जैसी जनावरे समस्त। 

माणसाचे चालणेचि स्वस्थ। विसरले लोक ।।”

      'चल मुसाफिर तेरी मंझिल दूर है तो क्या हुआ' या गाण्यात आपल्याला एक दुर्दम्य आशावाद असल्याचं दिसून येतं! पुढे चालताना… “आपले ध्येय अगदी पक्के आणि इरादे अटळ असले की मग जगातील कुणीही तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहचण्यास रोखू शकणार नाही! तुम्ही कुठेही जा पण आपले प्रयत्न कधी सोडू नका. एक ना एक दिवस यश नक्कीच तुमच्या गळ्यात माळ घालणार हे निश्चित!” हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचं वक्तव्य आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरते. त्यामुळे नुसतं बसून निष्क्रीय राहण्यापेक्षा आपलं ध्येय नजरेसमोर ठेवून दोन पावलं पुढं चालणं, चालायला सुरूवात करणं कधीही श्रेयस्कर!

*दो कदम बढ़ाकर तो देखो… कभी ना कभी मंझिल तक पहुचेंगे जरूर!*

... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

   9923797725

Thursday, May 22, 2025

कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी.


कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी.


'आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी...

देशी विदेशीयों को मंदिर यह हमारा!' अशी सर्वव्यापक ललकारी देणारे तुकडोजी महाराज यांना त्यांचं अलौकिक कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 'राष्ट्रसंत' ही समर्पक उपाधी दिली. त्यांनी लिहिलेल्या 'ग्रामगीता' या ग्रंथाने इतिहास घडवला. त्याबाबत कर्मयोगी गाडगेबाबा यांचं वक्तव्य पुरेसं बोलकं आहे... "तुकडोजी बाबांची 'ग्रामगीता' ही आज गीता-ज्ञानेश्वरीप्रमाणं जनतेला खरं ज्ञान देऊन खेड्यापाड्यात, झोपडी-झोपडीत सुख समाधान पैदा करील असा भरवसा वाटतो. आज अशा ग्रंथाची गावोगावी गरज आहे. भगवंताच्या गीतेचं खरं मर्म 'सर्व जीव देवता समजून सेवा करा' हे या ग्रंथाच्या रुपात आज पाहिजे तशा तऱ्हेनं प्रकट झालं आहे. तुकडोजी बाबांचा बहुमोल प्रसाद सर्वांना ती सुख-शांती देवो, हीच सदिच्छा!"

    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी कर्मयोगी गाडगेबाबांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं! त्यासाठी आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून द्यायचे. त्यांचे उपदेशही साधे, सोपे पण परिणाम साधणारे असायचे. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून परोपरीने सांगायचे. ‘देव दगडात नसून तो माणसांत आहे’ हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा मनापासून प्रयत्न केला. 

     कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांनीही त्यांच्या अभिनव कार्यातून, कीर्तन आणि प्रभावी भजनांच्या माध्यमातून बुरसटलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले आहेत. निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी दोघांनीही त्यांच्या अमोघ वाणीने प्रभावीपणे समाजप्रबोधन केलं आहे. 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी' या पुस्तकात दोन्ही आधुनिक संतांच्या अलौकिक कार्याचा सहजसोप्या भाषेत आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांनाही हे पुस्तक नक्कीच आपलेसे करणार असा विश्वास आहे. 

जगण्याचा आधार... 'आनंदयात्री'

 

      जगण्याचा आधार... 'आनंदयात्री'


     नुकताच म्हणजे परवाच्या रविवारी जागतिक मातृदिन सर्वत्र साजरा करण्यात आला आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी मी आमचे ज्येष्ठ लेखक मित्र श्री. जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेलं 'आनंदयात्री' हे सुंदर पुस्तक वाचायला हाती घेतलं. त्यातील 'वात्सल्यसिंधू आई' हा अतिशय भावस्पर्शी लेख वाचताना नकळतपणे डोळे भरून आले! या लेखात लेखकाने आपल्या आईबद्दलच्या अत्यंत तरल भावना प्रकट केल्या आहेत. ते लिहितात... आईचा स्वभाव आनंदी असल्यामुळे तिच्याबरोबर राहणं हा आनंद सोहळा असायचा! लोकांना खाऊ पिऊ घालण्यात, मदत करण्यात तिला अपार आनंद मिळायचा. स्वतःसाठी म्हणून ती जगलीच नाही, पाणी जसं कोणत्याही रंगात मिसळून जातं, अगदी तसंच तिचं होतं!

    जयंत शंकर कुलकर्णी यांची गजानन महाराज 

यांच्यावरील "श्री गजानन कथासागर", "स्वातंत्र्याचे शिल्पकार भाग -१, २, ३ तसेच "लहानपण वाचव रे देवा!" अशी एकूण पाच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या एवढ्यातच प्रकाशित झालेल्या 'आनंदयात्री' या पुस्तकात लहान मोठे असे एकूण तीस लेख आहेत. सगळे लेख वेगवेगळ्या विषयांवरील असल्याने ते वैविध्यपूर्ण झाल्याचे आढळून येतात, त्यामुळेच ते वाचनीय झाले आहेत. या लेख संग्रहातील 'रांगेतला मी' या पहिल्या खुमासदार लेखापासून सुरुवात करून लेखक जयंत कुलकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून 'अंदमानची सफर' करत असताना पार देश विदेशाच्या विलक्षण सफरी देखील घडवल्या आहेत. त्यात 'विलोभनीय युरोपची रोमहर्षक सफर' तसेच 'छोटा तरी प्रभावी देश कुवेत' यांचाही समावेश आहे. 

     'आनंदयात्री'चे खास वैशिष्ट्य म्हणजे यातील काही लेखांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे व्यक्तीचित्रणही रेखाटण्यात आलं आहे. त्यात प्रामुख्याने 'भावगीत गायक : गजाननराव वाटवे', 'राजा माणूस : विनय लक्ष्मण करमरकर, 'वात्सल्यसिंधू आई' या सोबतच 'संत श्री गजानन महाराज महात्म्य', 'गुरुवीण नाही दुजा आधार' हे लेख वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहेत. त्याचप्रमाणे 'आठवणीतील गाणी, सांगतील जीवन कहाणी..!' या लेखात अनेक कलाकारांचं केलेलं वर्णन खूपच वाचनीय झालं आहे. मुळात हे सगळे लेख वाचायलाच हवेत एवढे सर्वांगसुंदर झाले आहेत. या संग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की... लेखकाने काही लेखातून अधूनमधून समर्पक अशा सुंदर गाण्यांची पखरण केली आहे. त्यामुळे योग्य तो परिणाम साधण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. 'जीवन गाणे होऊ दे..!' आणि 'जिवलगा कधी रे येशील तू?' हे लेख वाचताना ते प्रकर्षाने जाणवतं!

      'आनंदयात्री' मधील 'स्त्री शिवाय विकास? केवळ अशक्य!', 'स्वान्त सुखाय' तसेच 'औदार्य, आत्मसन्मान आणि आनंदी आयुष्य - ज्येष्ठाचे!' हे लेख सामान्य वाचकांना विचार करायला भाग पाडणारे आहेत. तर 'योद्धा' मधला सर्वांना मनापासून मदत करणारा हरहुन्नरी महेश कमालीची चुटपुट लावून जातो! या संग्रहातील निरनिराळ्या प्रसंगावर बेतलेले लेख काही ना काही संदेश देऊन जातात हे मात्र निश्चित! त्यामुळे वाचकांनी ते प्रत्यक्ष वाचूनच त्याचा आनंद घ्यायला हवा असं वाटतं. 

       पुण्यातील 'नरवीर प्रकाशन'तर्फे प्रकाशित झालेला 'आनंदयात्री' हा लेखसंग्रह म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातील धडपड आहे, तळमळ आहे तसाच तो आनंददायी, ऊर्जादायी सुद्धा आहे. तसंच सर्वसामान्य वाचकांना जगण्याची दिशा देणाराही आहे. म्हणूनच 'आनंदयात्री' प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा असं मनापासून वाटतं! इतरांना भेट देण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा 'आनंदयात्री' लेखसंग्रह लिहिल्याबद्दल लेखक जयंत कुलकर्णी यांचं मनस्वी अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा! धन्यवाद!


विनोद श्रा. पंचभाई, पुणे

 मोबाईल क्रमांक ९९२३७९७७२५


    पुस्तकाचे नाव... 'आनंदयात्री' (लेखसंग्रह )

     पाने... १६२

     किंमत.... ₹ २६०/- 

संपर्क... 9923797725, 9423434156


निखळ विनोदाचा नजराणा : 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी'

 निखळ विनोदाचा नजराणा : 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी'


    हल्ली मानवी जीवन खूपच धकाधकीचं झालं आहे. कोणालाही थोडा देखील निवांतपणा नाही, अशी आजची एकंदरीत स्थिती आहे. मग आपसात चेष्टा मस्करी, एकमेकांच्या खोड्या करणं, विनोद करणं तर दूरच! असं म्हणतात, 'एक वेळ कुणाला रडवणं सोपं असतं पण हसवणं महाकठीण कर्म आहे!' हां एक मात्र तितकंच खरं आहे... स्वतःचं चारचौघात हसं करून घेणं सहज घडून जातं. त्यावेळी मात्र लोक हसतातच. किती सोपं असतं नाही, दुसऱ्यावर हसणं!

    मला आठवतो, बऱ्याच वर्षापूर्वीचा जंजीर चित्रपट. त्यात एक दृश्य आहे... अभिनेता प्राण आपल्या गंभीर झालेल्या खास मित्राला म्हणजे अमिताभ बच्चनला हसवण्यासाठी गाण्याच्या माध्यमातून काय काय क्लृप्त्या वापरतो, ते खरंच ऐकण्यासारखं आहे. प्राण म्हणतो,  "छुपा न हमसे, जरा हाल-ए दिल बता दे तू, तेरी हंसी की किमत क्या है ये बता दे तू! कहे तो आसमान से चांद तारे ले आऊ, हसीं जवान और दिलकश नजारे ले आऊ! तेरा ममनून हूं, तुने निभाया याराना! तेरी हंसी है आज सबसे बडा नजराना!" 

    हल्ली गंभीर प्रकारच्या कथा, सतत विचार करायला लावणारे लेख तसेच कधीकधी डोक्यावरून जाणारं साहित्यही आपल्या वाचनात येत असते. त्यामानाने निखळ विनोदी साहित्य मात्र अभावानेच नजरेस पडतं. हलके फुलके प्रासंगिक विनोद, कोपरखळ्या जणू हद्दपार झाल्या की काय अशी आजची अवस्था आहे. त्याऐवजी कित्येक मासिके किंवा साप्ताहिकात ओढून ताणून केलेले पांचट विनोद यांचाच भरणा जास्त केलेला दिसतो! 

    अशा या काहीशा गंभीर परिस्थितीत 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी' हा भन्नाट विनोदी कथासंग्रह नुकताच वाचण्यात आला. या वाचनीय पुस्तकाचे लेखक आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि लोकप्रिय साहित्यिक नागेश शेवाळकर! पुण्यातील 'सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन'चे प्रकाशक सुरेंद्र गोगटे यांनी हा विनोदी कथासंग्रह प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात 'चहा सम्राट', 'देऊनी आवळा, काढला कोथळा!', 'बायको दिन, नवरा दीन', 'श्वानसुंदरी' अशा प्रकारचे आगळेवेगळे व टिपिकल शीर्षक असलेल्या जवळपास चौदा विनोदी कथा आहेत. म्हणजे वाचकांसाठी जणू पर्वणीच! 

     'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी' या कथासंग्रहात शेवाळकर सरांनी 'इंद्रायणी काठी' या पहिल्याच कथेत चौकार, षटकारांची मनसोक्त आतिषबाजी केली आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये जाहीर करण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे किस्से अतिशय धमाल पद्धतीने रंगवले आहेत. या कथेच्या अनुषंगाने कादंबरीमधील वाड्.मय चौर्य करून तसेच सेटिंग करून पुरस्कार कशा प्रकारे मिळवता येतात यावर त्यांनी विनोदी ढंगाने मार्मिक भाष्य केलं आहे. त्यामुळे या कथेची भट्टी मस्त जमून आली आहे. 'चहा सम्राट' कथेत तर लेखकांनी 'पत्नीतुल्य चहा'च्या भन्नाट किस्स्याचे असे काही वर्णन केले आहे की वाचकांची हसता हसता पुरेवाट होते! 'पोस्टमार्टम' ही वेगळ्या धाटणीची विनोदी कथाही छान मनोरंजन करते. 'दुसरी बायको'मधून 'कधीतरी असंही घडू शकतं' असं वाटायला भाग पाडणारी आणि उत्कंठा वाढवणारी इरसाल कथा वाचायला चांगलीच मजा येते. तर 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी' ही शीर्षक कथा वाचताना, आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाढवत अगदी शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. त्याचप्रमाणे 'मला लागली कुणाची...' या दीर्घ कथेतील सविस्तरपणे केलेले खड्डेपुराण अतिशय मिश्किलपणे मांडण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. 

    या कथासंग्रहातील बहुतेक कथेच्या माध्यमातून मर्यादा राखून घेतलेले चिमटे आणि त्यातून निर्माण झालेले निखळ विनोद चांगलीच खसखस पिकवतात. कुठल्याही प्रकारच्या पांचटपणाला येथे थारा नाही. या कथासंग्रहातील प्रत्येक कथेसाठी पात्रांची केलेली निवड, त्यांची अफलातून नावे आणि टिपिकल प्रसंग त्या-त्या कथानकात जिवंतपणा आणतो!

    एकंदरीतच लेखक शेवाळकर सर यांना असलेली निखळ विनोदाची जाण आणि मिश्किलपणा प्रत्येक कथेतून पदोपदी जाणवतो! कुठल्याही प्रकारच्या बोजड आणि अलंकारिक शब्दांचा वापर न करता लेखकांनी त्यांच्या शैलीत कथेत पेरलेली सहज सोपी भाषा, प्रभावी संवादशैली हे या कथासंग्रहाचं खास वैशिष्ट्य आहे. यातील सगळ्याच कथांच्या माध्यमातून सामान्य वाचकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले असल्याचं जाणवतं. म्हणूनच 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी' हा विनोदी कथासंग्रह नक्कीच वाचनीय झाला आहे असं म्हणता येईल. दैनंदिन जीवनातील ताणतणाव घालवण्यासाठी आपल्या मराठी वाचकांनी तरी आवर्जून वाचावा असा हा विनोदी कथासंग्रह आहे... 'बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी'.

     लेखक शेवाळकर सर यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील देदीप्यमान साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो! धन्यवाद!


पुस्तकाचे नाव... 'बायकोची एकसष्टी,नवऱ्याची षष्ठी' 

                         (विनोदी कथासंग्रह )                       

लेखक...            नागेश शेवाळकर, पुणे ( भ्र. क्र. ९४२३१३९०७१)

प्रकाशक...         सुरेंद्र गोगटे, 'सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन', पुणे

किंमत...            ₹ २५० /-

एकूण पाने...       १६४ 

परिचयकर्ता...     विनोद श्रा.पंचभाई, पुणे (भ्र. क्र. ९९२३७९७७२५)

Thursday, March 6, 2025

वाचन का आवश्यक आहे?

        वाचन का आवश्यक आहे?

 पुस्तकांचं वाचन ही अशी सवय आहे ज्यामुळे कुणालाही त्याच्यापासून त्रास होत नाही. वाचन करायला निश्चित वेळ लागत नाही किंवा खूप मोठी जागाही लागत नाही. वाचन कधीही, कुठेही मनात आलं तेव्हा आपण करू शकतो. घरात वीजपुरवठा असो किंवा नसो, पुस्तक वाचन करताना त्याची आवश्यकता भासत नाही... आणि एकटं असताना तर पुस्तकासारखा दुसरा सच्चा मित्र नाही... हा अनुभव स्वतः अनुभवल्यावरच येऊ शकतो. पुस्तक वाचताना तुम्ही कधी गंभीर होता तर कधी खळखळून हसूही शकता! तसंच काही पुस्तकातील विचार आपल्याला बरंच काही शिकवून जातात तर कधीकधी ते अचंबित करणारेही असतात. काही विचार मात्र आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात! 

   आपल्या जवळ असणारी पुस्तकं खरंतर आपले सच्चे साथीदारच असतात. कारण अत्यंत बिकट प्रसंगी सुद्धा ते आपल्याला सोडून जात नाहीत. उलट आयुष्यातील सुखदु:खात ते एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे साथ देण्यासाठी सक्षम असतात. ही साथसंगत पुस्तकं कधीही सोडत नाहीत, म्हणूनच म्हटलं आहे... ग्रंथ हेच खरे गुरू होत! उत्तम पुस्तकं हे आपल्या मनाचं एका अर्थाने पौष्टिक अन्नच असतं असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. मात्र आजकाल लोकांचा ओढा पुस्तकांचं वाचन करण्यात कमी झालेला दिसतो. उलट अर्बटचर्बट खाण्यात किंवा इतर गोष्टीसाठी पैसे उधळण्यातच तो जास्त प्रमाणात दिसून येतो. आता बघा, आपण आपल्या कुटुंबीयांसह एखादा सिनेमा बघण्यासाठी जातो तेव्हा आपले कमीत कमी हजार बाराशे रूपये तरी सहज खर्च होतात. त्यापासून सर्वांना तीन तासात मनोरंजन मिळतं, कधीतरी त्यातून एखादा संदेशही मिळतो, हे ठीकच आहे. मात्र त्याच हजार पाचशे रूपयात जर वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं घरी आणली तर आपण ती वेळ मिळेल तशी वाचू शकतो. घरातील सगळे सदस्य तसंच शेजारीही त्याचा लाभ घेऊ शकतात. गरज आहे, केवळ आपली मानसिकता बदलण्याची!

    लग्न समारंभ, वाढदिवस आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमात आपण मोठ्या उत्साहाने सहभागी होतो. त्याचप्रमाणे कधीतरी साहित्य संमेलनं, ग्रंथ महोत्सव अथवा पुस्तक प्रदर्शन अशा विविध ठिकाणी भेटी देऊन तिथला अनुभव घेणं खरंतर खूपच आनंददायी असते. तेथील पुस्तकं हातात घेऊन बघणं, ती चाळून पाहणं हा सुद्धा एक प्रकारचा संस्कारच आहे. त्यासाठी फक्त आपली मानसिकता थोड्या फार प्रमाणात तरी बदलण्याची गरज आहे. फेसबुक किंवा व्हाट्सअप ग्रुपमार्फत येणाऱ्या पोस्टद्वारे मिळणारं ज्ञान हे वाचकांची दिशाभूल करणारं देखील असू शकते. काही काही पोस्टच्या माध्यमातून जाणीवपूर्वक समाजात गैरसमजही पसरवले जातात. ते सगळं मोबाईलवर डोळे फाडून वाचताना कधीकधी आपली मती कुंठीत झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यात आपला अमूल्य वेळ सुद्धा खर्च होतोच! त्यामुळे अशा प्रकारच्या साहित्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणं हेच श्रेयस्कर ठरतं, याबाबत दुमत नसावं. म्हणूनच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ग्रंथसंपदा, वाचनीय आणि प्रेरणादायी पुस्तकं आपल्याकडे नेहमीच संग्रही असावीत, जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला कधीही घेता येऊ शकतो.

    रेफ्रीजरेटर, एअरकंडिशनर, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन इत्यादी अत्याधुनिक साधने आपल्या घराला घरपण देत असतीलही. मात्र प्रेरणादायी पुस्तकं घराला योग्य ते शहाणपण नक्कीच देऊ शकतात... आणि आपल्या वास्तूला ज्ञानसंपन्न करणाऱ्या अशा पुस्तकांमुळेच आपल्या घराची उंची, श्रीमंती खऱ्या अर्थाने वाढण्यास कारणीभूत ठरतात यात वादच नाही! ज्ञानपीठ विजेते नामवंत साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज म्हणतात..." अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रींना उजळून टाकण्याचं विशाल सामर्थ्य ग्रंथामध्ये असतं. ग्रंथाच्या तेजातच क्रांतीची बीजे असतात. पुस्तकं आपल्याला माणुसकी आणि शांती शिकवतात. या क्रांतीचे, माणुसकीचे, शांतीचे, नवनवे वारसदार निर्माण करण्याचे काम पुस्तकंच करतात."

    यशवंतराव चव्हाण यांनी 'ग्रंथ वाचनाने माणूस मोठा झाला नाही तरी शहाणा जरूर होतो' असं म्हटलं होतं. यशवंतरावांच्या मातोश्री त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घ्यायच्या. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आईचं पुढील वक्तव्य शेवटपर्यंत ध्यानात ठेवलं आणि ते जणू त्यांनी स्वतःच्या मनावर कोरून घेतलं होतं ..."चांगल्या ग्रंथाने चांगुलपणाचा संस्कार नकळतपणे आपल्यावर होत असतो. त्यामुळे चांगला, वाईट यातील फरक कळतो. चांगला ग्रंथ म्हणजे मनाचे स्नान. स्नानानंतर पाणी अंगावर नाही राहिले, तरी मन प्रसन्न होते. तसेच एखादी ओवी एक वेळ नाही कळली तरी चालेल पण ओव्या वाचनाच्या अभ्यंग स्नानाने मन प्रसन्न होते. न कळलेला भाग हळूहळू समजू लागतो. त्यातूनच आपली समज वाढते."

     टीव्ही वरील मालिकेमध्ये असे कित्येक विषय दाखवले जातात, ज्यांचा आपल्या जीवनाशी काहीही संबध नसतो. सध्या बातम्यांच्या वाहिन्यावर कितीतरी फालतू विषय घेऊन चर्चा होताना दिसून येतात आणि त्या ऐकून काही लोक आपलं मन कलुषित करून घेतात... आपलं मत त्या संबंधित व्यक्तीच्या मतानुसार बनवलं तर त्यासारखं दुसरं दुर्दैव नाही! आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना चांगल्या विचारांची शिदोरी देऊ शकत नसलो तर हा सुद्धा आपला वैचारिक पराभवच म्हणावा लागेल. त्याच त्याच बातम्या ऐकायला आणि दर्जाहीन मालिका बघायला माणसं टीव्हीसमोर कसं काय चिटकून बसू शकतात... हे न उलगडणारं कोडंच म्हणता येईल. पुस्तकांच्या बाबतीत मात्र असं होऊ शकत नाही... कारण योग्य पुस्तकं आपल्याला निवडता येतात. ते निवडताना आपल्याला वैचारिक स्वातंत्र्यही असते. चांगली प्रेरणादायी पुस्तकं आपल्या विचार प्रक्रियेला, बुद्धिला चालना देण्याचं, मनावर संस्कार करण्याचं मोलाचं काम करू शकतात.

   'संसार सागरात भरकटणाऱ्या जीवन नौकेला किनारी लावण्याचे काम ग्रंथ करत असतात' असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटलं होतं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 'पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असते' असं म्हटलं आहे. वि. स. खांडेकर यांनी 'पुस्तकांच्या जगात शिरले, की मनावरचे मळभ दूर होते' असं खात्रीशीर सांगितलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर ग्रंथांनाच आपला प्राण मानायचे.

  भगवदगीता आणि महाभारतासारख्या ग्रंथामधून आपल्या आयुष्याचं संपूर्ण सार सांगितलं आहे. आपल्या जीवनातील असा एकही प्रसंग किंवा एकही समस्या नसेल, ज्याचं उत्तर या ग्रंथात सापडणार नाही. जीवन जगण्याची एक वेगळी दिशा देण्याची शक्ती या ग्रंथामध्ये निश्चितच आहे. रामायणातील तर प्रत्येक पात्र आपल्या जीवनाचा एक एक आदर्श आहेत. ते मानवी जीवनाच्या विविध पैलूचं दर्शन घडवतात. ही आपली आदर्श भारतीय संस्कृती आहे  

       चांगल्या प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन करण्यासाठी त्यांची कधीतरी खरेदी करणं मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने नितांत गरजेचं आहे, हे आजच्या सुजाण पालकांनी लक्षात ठेवायला हवं. आजकाल अनेक कुटुंब दैनंदिन धावपळीतून वेळ काढून थोडा तरी बदल म्हणून महिन्यातून एखादा दिवस बाहेरच्या ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जेवण करायला जातात. ते सगळं स्वाभाविकच आहे, त्याला हरकत नसावी. मात्र त्यांनी एखाद्या दिवसातील काही वेळ तरी आपल्या कुटुंबीयांसमवेत पुस्तकांची खरेदी करून त्याचाही आनंद घेऊन पहावा. हॉटेलमधील खाल्लेले चमचमीत पदार्थ शरीरात रात्रभरासाठीच टिकतील पण दर्जेदार आणि वाचनीय पुस्तकं मात्र आयुष्याच्या अखेरपर्यंत आपली साथ देतील, आपल्याला जगण्याची दिशा देण्यासाठी सोबतही करतील हे निश्चित! संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात...

"आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने। 

शब्दांचीच शस्त्रे यत्न करू॥

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन| 

शब्द वाटू धन जनलोका|| 

तुका म्हणे पहा शब्दचि हा देव| 

शब्दचि गौरव पूजा करूll"

 आपणही आपल्या जीवनात... आपण वास्तव्य करत असलेल्या वास्तुमध्ये शब्दरूपी रत्नांना, प्रेरणादायी पुस्तकांना योग्य ते मानाचं स्थान देऊन आपलं आयुष्य आनंदी, समाधानी करूया!

विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

मोबाईल क्र.9923797725






सच कहो तो...

सच कहो तो...

बड़ी देर कर देते हैं हम 

अपने आपको पहचानने में!

बहोत देर कर देते हैं हम 

अपनी कीमत समझने में ..!

जो हमसे दूर जाना चाहते हैं,

बेशक उन्हें जाने दीजिये!

 वैसे भी उन्हे रोकने से, 

जोर जबरदस्ती से, 

फिजूल की जिद करने से,

अपना अधिकार जताने से, 

कोई रिश्ता चल भी तो नहीं सकता!

सच कहो तो...

इस आपाधापी में 

इस खिचातानी मे 

क्या सही मे अपनापन होता है ?

अक्सर सभीं का दिल रखने के लिये 

 हम खुदको ही वक्त नहीं दे पाते!

फिर भी कुछ रिश्तों को रहती है

 हमेशा हमसे ही शिकायतें!

वैसे तो इतनी थोडीसी जिंदगी मे 

 मुश्किल से वक्त मिल पाता है हमे!

जिंदगी की कश्मकश मे...

इसका पता ही नहीं चलता हमे!

सच कहो तो...

बड़ी देर कर देते हैं हम 

अपने आप को पहचानने में!

शायद हम अपनी कीमत 

बहोत पहलेही समझ पाते!

बहोत पहलेही समझ पाते!!

... विनोद श्रा. पंचभाई, पुणे ९९२३७९७७२५

 

मनोगत... 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी'

 मनोगत... 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी'


       आपल्या खंडप्राय भारत देशाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत कबीर महाराज, संत तुलसीदास, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज अशा कितीतरी असंख्य संतांची परंपरा लाभली आहे. या सर्वच महान संतांनी सर्वसामान्य लोकांना जगण्याची योग्य दिशा दाखवण्याचं मोलाचं कार्य केलं आहे. त्याचप्रमाणे अतिशय प्रभावीपणे समाज प्रबोधन करून वेळोवेळी मार्गदर्शनही केलं आहे. समाजातील विविध जातिधर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रसंगी अनेक हालअपेष्टांचा सामना देखील कित्येक संतांना करावा लागला.

    आपल्या समाजातील अज्ञान, अनिष्ट रूढी, बुरसटलेल्या चालीरिती, परंपरा, अंधश्रद्धा यांना दूर करण्यासाठी संतांनीच पुढाकार घेतल्याचा इतिहास आहे. याच संत परंपरेतील आधुनिक समाज सुधारक संत वैराग्यमूर्ती कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या प्रभावी वाणीने समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धेवर, अस्पृश्यतेवर तसंच जुनाट रूढी, परंपरेवर कठोर प्रहार केले आहेत. खेडेगावात पसरलेली कमालीची अस्वच्छता, निरक्षरता आणि अंधश्रद्धा या कारणांनी सामाजिक आरोग्य दूषित होत असल्याचं कर्मयोगी गाडगेबाबा यांनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन लोकांना 'आपलं घरदार, परिसर स्वच्छ असेल तर मनही स्वच्छ राहतं!’ असा स्वच्छतेचा मंत्र दिला आणि विशेष परिणाम साधणाऱ्या आपल्या कीर्तनातून शिक्षणाच्या प्रसारावरही भर दिला. “शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणामुळे मनुष्याच्या अंगी शहाणपणा येतो, तो स्वतंत्रपणे विचार करायला शिकतो. शिक्षणामुळे त्याची प्रगती होते आणि त्यामुळे त्याची जगाच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकत नाही. शिक्षणाविना माणूस म्हणजे निव्वळ धोंडा असतो!” अशाप्रकारचे विचार ते अत्यंत कळकळीनं आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर बिंबवायचे. त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतील ओव्यांचा दाखला देत समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करायलाही गाडगेबाबा डगमगले नाही.

''अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ!

त्याचे गळा माळ असो नसो!"... या तुकाराम महाराजांच्या वचनानुसार अंतःकरणानं निर्मळ असलेला आणि ज्याचं बोलणं ऐकायला छान वाटतं, त्याला गळ्यात कुठलीही माळ घालायची गरज नाही. याप्रमाणे सांगत असतानाच ... 'नवसे पुत्र होती, मग का करणे लागे पती?' असा रोकडा सवाल सुद्धा गाडगेबाबा जनसमुदायासमोर विचारायला कमी करत नव्हते. ‘देव दगडात नसून तो माणसांत आहे’ हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा मनापासून प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी गाडगेबाबांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं! 

ज्याप्रमाणे कर्मयोगी गाडगेबाबा यांची समाजाला प्रबोधन करण्याची विशिष्ट पद्धत होती, तशीच आपल्या खंजरी भजनाच्या माध्यमातून जमलेल्या जनतेच्या मनावर पकड घेण्याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खास शैली होती. वंदनीय राष्ट्रसंत हे वर्तमान परिस्थितीचं भान ठेवून भविष्याचा वेध घेणारे आदर्श दिशादर्शक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशभक्तीनं ओतप्रोत अशा भजनांच्या माध्यमातून गावागावातील सर्वसामान्य जनतेमध्ये देशप्रेम जागवणारे आणि आपल्या देशासाठी तुरूंगवास भोगणारे ते एकमेव क्रांतिकारी संत होते.


   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या प्रेरणादायी आणि परिणामकारक साहित्यातून सर्वसामान्य लोकांसाठी प्रभावीपणे प्रबोधन केलं आहे. इतर तथाकथित साहित्यिकांप्रमाणे उगाच कुठल्याही बोजड आणि अलंकारिक शब्दांचा वापर न करता त्यांनी त्यांच्या मराठीतील साहित्यासोबत हिंदी भाषेतील भजनातूनही सहज, साध्या शब्दांनी अत्यंत सोप्या भाषेत योग्य तो परिणाम साधला आहे. राष्ट्रसंत त्यांच्या ‘ग्रामगीता’ या अदभूत ग्रंथात म्हणतात…

''मंदिरी बैसोनि नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे! 

दुःखितासि प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि!!''


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची साहित्यसंपदा खूप मोठी आहे. त्यात असलेला मराठी आणि हिंदी भाषेतील विपुल ठेवा चिरकाल प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या अनमोल कार्याचा वारसा आणि वसा जपत आजही हजारो कार्यकर्ते समाज प्रबोधनाच्या कार्यात सहभागी होत असतात. राष्ट्रसंतांच्या साहित्यावर, त्यांच्या समाजोपयोगी कार्यावर असंख्य व्यक्तींनी पीएचडी संपादन केली आहे. 


       विदर्भातल्या या दोन महान संतांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने 'ग्राम स्वच्छता अभियान' सर्व जिल्ह्यातील गावागावात राबवून त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे. त्याचप्रमाणे अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचं आणि नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देऊन दोन्ही विद्यापीठांना शैक्षणिक कार्याची नवी दिशा देण्याचं कार्यही शासनानं केलं आहे.


*कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी* या पुस्तकासाठी डॉ. शांतिदास लुंगे दादा यांनी त्यांच्या प्रभावी शैलीत अप्रतिम प्रस्तावना लिहिली आहे. तसेच श्री.दिलीप गाडगे दादा यांनी या पुस्तकासाठी सुंदर अशी पाठराखण शब्दबद्ध केली. माझ्यासाठी हे आराध्यस्वरूप असलेलं पुस्तक लिहायला सतत प्रेरणा देणारे आदरणीय बाळकृष्ण पाचभाई दादा आणि ऍड. कृपालदादा भोयर यांनी या साहित्य कृतीसाठी ओघवत्या भाषेत त्यांचे मर्मस्पर्शी असे शुभेच्छा संदेश दिले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार न मानता या सर्वांच्या ऋणातच राहू इच्छितो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला सुपरिचित असलेले चित्रकार मित्र संतोष घोंगडे यांनी 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी' या साहित्य कृतीसाठी अप्रतिम असं बोलकं मुखपृष्ठ चितारलं आहे. दुर्वा एजन्सीज् प्रकाशन संस्थेचे सर्वेसर्वा शैलेंद्र कदम यांनी सतत पाठपुरावा करत हे चरित्रात्मक पुस्तक माझ्याकडून पूर्ण करून घेतलं... त्यांनी प्रकाशित केलेली ही माझी दहावी साहित्यकृती! या पुस्तकाची अप्रतिम मांडणी आणि अक्षर जुळवणी संगीताताई जावळकर यांनी केली आहे. या सर्वांचेच मनापासून आभार! धन्यवाद!

... विनोद श्रा. पंचभाई 

मोबाईल क्र.९९२३७९७७२५