Tuesday, December 24, 2024

ज्येष्ठ नागरिक म्हणजे महातारे...

 ज्येष्ठ नागरिक म्हणजे महातारे...

      या लेखाच्या निमित्ताने सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ लोकप्रिय साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या बाबतीत घडलेला किस्सा येथे आवर्जून नमूद करणं माझं कर्तव्य समजतो...
पु. ल. म्हणतात, वय हे मनाला असतं... शरीराला वय असतं असं मला वाटत नाही. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. विख्यात पंडित सातवळेकर होते, ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं. त्यांना जेंव्हा शंभरावं वर्ष लागलं तेंव्हा मला असंच मनात आलं की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे तर आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करुन यावं. म्हणून मी पंडित सातवळेकरांकडे गेलो. शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. विचार केला, आजारी असतील, आपण दोन मिनिटात नमस्कार करावा, बरं वाटतंय ना, काळजी घ्या वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला त्यांच्याकडे गेलो त्या वेळेला बघतो तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं
तपासत बसले होते. तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते.
       मी त्यांना नमस्कार वगैरे केला. अचानक मला ते म्हणाले, "मी वाचलं आहे तुमचं साहित्य!"
मी घाबरलोच एकदम. त्यावेळी 'असलं काही लिहिण्यापेक्षा बरं
लिहा' असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पंडित 
सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील असं मला कधीही
वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे,
म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं.
 नंतर ते म्हणाले "आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम
एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या
तरुण पोरांना माहीत नाहीत ते मी निवडून काढणार आहे
आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात
पुढली आठ-दहा वर्ष जातील".

    त्यावेळी तब्बल शंभराव्या वर्षी सुद्धा पुढील आठ-दहा वर्षांचं नियोजन पंडित सातवळेकर यांच्याकडे होतं. बरेचदा ज्येष्ठ नागरिक म्हातारे अशासाठी होतात... आपण जगतोय कशासाठी? या साध्या 
प्रश्नाचं उत्तर देखील त्यांना देता यायचं नाही. केवळ आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी किंवा महिना संपल्यावर पेन्शन अथवा नोकरी करत असल्यास पगारासाठी हे यावरचं उत्तर होऊ शकणार नाही.
आपण कशासाठी जगतोय? हा प्रश्न ज्येष्ठ नागरिकाला पडला की 
एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन डोळयांसमोर यायला हवं! आता कुणी म्हणेल, सर्वसामान्य मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिकाला बऱ्याच बाबतीत आर्थिक विवंचना तसेच अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत असतात. अशावेळी त्याच्या डोळ्यासमोर उदात्त प्रयोजन येणं तरी शक्य होईल का? मान्य आहे, सगळेच पंडित किंवा विद्वान नसतात! मात्र काही प्रमाणात तरी समाधान, शांती मिळेल असं जगणं आपल्या नशिबी यावं एवढी रास्त अपेक्षा सर्वांचीच असते. त्यासाठीच साधंसं का असेना, जीवनात निदान कुठलं तरी नियोजन नजरेसमोर असावं असं वाटतं. मग अशा प्रकारच्या नियोजनासाठी वाचन करणं, संगीत शिकणं, पेंटिंग करणं इत्यादी अनेक कलांचा आधार सामान्य ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रात ते बरंच काही करू शकतात. उदाहरणार्थ... शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक गरजवंतांना ज्ञानदान करू शकतात. तसेच इतर मंडळी आपली शारीरिक आणि आर्थिक क्षमता पाहून विधायक समाज कार्याचं उद्दिष्टही ठरवू शकतात... जेणेकरून सतत कार्यरत राहिल्याने म्हातारपण नावालाही जाणवणार नाही आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक महातारे ठरतील यात शंकाच नाही!
     साधारणपणे ज्येष्ठ नागरिकांची मूळ समस्या आहे एकटेपणाची! एकत्रित कुटुंबात राहूनही आपली उपेक्षा होत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते आणि ते स्वत:ला एकटे समजतात, असे 'एज वेल फाऊंडेशन'ने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. आणखी एक ठळक बाब या सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आली... ती म्हणजे काही दशकापूर्वी ज्येष्ठांच्या ज्या समस्या होत्या, त्यात आता आमूलाग्र बदल झालेले आहेत. कारण काही वर्षांपूर्वी मोठ्या संख्येने आपल्या देशातील युवक नोकरीच्या शोधात परदेशात गेले आणि लग्न वगैरे करून तेथेच स्थायिक झालेत. मग काही लोकांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्यासोबत राहण्यासाठी परदेशात बोलावून घेतले. तर काही वृद्ध दांपत्य स्वतःच्या मिळकतीतून मोठे घर बांधून आपली मुलं कधी तरी परत येतील या आशेवर पुढची स्वप्ने रंगवत भारतातच राहिले!
       परदेशी जाणाऱ्या काही ज्येष्ठांनी आपली गावातील सर्व संपत्ती विकून टाकली. उर्वरित आयुष्य परदेशात मुलांसोबत चांगल्या प्रकारे व्यतीत करू असा विचार त्यांनी त्यावेळी केला असावा. मात्र तिकडे गेल्यावर त्यांचा लवकरच भ्रमनिरास झाला! एक तर अनोळखी प्रदेशात कोणी बोलायला नाही. मग दिवसभर नातवांची देखभाल करायची आणि कसेतरी दिवस ढकलायचे हे जिणं त्यांच्या नशिबी आलं... कालांतराने एकटेपणाचं दुःखही त्यांच्या वाट्याला आलं! थोड्या फार प्रमाणात हीच समस्या भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची देखील आहे. 
     बऱ्याच मध्यमवर्गीय कुटुंबातील युवक, युवती रोजगाराच्या शोधात शहरात जातात. महागाईमुळे पती, पत्नी दोघांनाही नोकरी करावी लागते. मग ते आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्यासोबत राहण्यासाठी गावाकडून शहरात बोलावून घेतात. मात्र शहरातील 'फास्ट लाईफ'मुळे आपल्या आईवडिलांच्या नेमक्या काय समस्या आहेत, हे जाणून घ्यायला त्यांना सवड नसते! आपल्या मुलांसोबत त्यांनी वेळ घालवावा, त्यांची काळजी घ्यावी ही अपेक्षा ते करतात. मात्र वृद्ध सासू सासऱ्यांनी नातवावर गावाकडील संस्कार करण्याचा प्रयत्न केला तर ते सुनांना आवडत नाही. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती असते... ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाने व सुनेने त्यांच्याकडे फक्त नातवंडांना सांभाळणारा सेवक म्हणूनच पाहिलेले असते!
       जे ज्येष्ठ नागरिक शहरात किंवा गावात एकटेच राहतात, त्यांना हल्ली कमालीचा एकटेपणा अनुभवायला येतो. त्यांच्यापेक्षा कमी वयाचे लोक सुद्धा त्यांच्यासोबत बोलायला तयार नसतात मग ज्येष्ठासोबत मिळून मिसळून राहणे तर दूरच! कारण ज्येष्ठ लोक आपल्याला एखादे काम सांगेल, अशी भीती त्यांना असते.
       परदेशात राहणाऱ्या मुलांच्या आईवडिलांपैकी कुणीतरी एक अस्वस्थ असेल तर परिस्थिती खूपच बिकट होऊन बसते. नाईलाजाने अशा वृद्ध जोडप्यास घरात एकटेच राहून जीवन व्यतीत करावे लागते. आपल्या मुलांशी, नातवाशी ते फक्त फोनवरच बोलू शकतात. फार तर व्हिडीओ कॉल करूनच त्यांना पाहू शकतात. दुर्दैवाने मग ते तशा परिस्थितीत फक्त मरणाचीच वाट पाहत असतात! 
     या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच सकारात्मक विचार करून त्यावर तोडगा काढण्याचा मनापासून प्रयत्न करायला हवा असे वाटते. आणि ते तशा प्रकारचा प्रयत्न निश्चितच करू शकतात. त्यासाठी आपलं आता वय झालं आहे, आपण म्हातारे झालो आहोत हा विचार मनातून समूळ काढून टाकायला हवा. आपण म्हातारे नव्हे तर महातारे आहोत हेच मनावर बिंबवायला हवं!
     एका विचारवंतानं म्हटलं आहे... "प्रॉब्लेम कुणाला नसतात, ते अगदी शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक प्रॉब्लेमवर तोडगा हा असतोच. तो सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा हवा असतो तर कधी माणसं हवी असतात. या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो!"
तसंच आपल्या आयुष्यात येणारे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम किंवा समस्या देखील प्रयत्न केल्यास सुटू शकतात. ते कधीही सुटणार नाहीत असा आपण उगाच समज करून घेतो. मात्र या समस्या सोडवण्यासाठी थोडे पेशन्स महत्वाचे ठरतात. त्यासाठी वर सांगितल्यानुसार आपल्या आवडीचे कुठलेही छंद जोपासायला सुरुवात तरी करावी. मित्र परिवार वाढवावा, त्यांच्यात मिसळून मनसोक्त गप्पा माराव्यात. एखादा हास्य क्लब जॉईन करावा. व्यायाम, प्राणायाम, मेडिटेशनची सवय लावून घ्यायला हवी. वाचनीय पुस्तकं वाचावीत किंवा एखाद्या वाचनालयात फेरफटका मारून मासिके तरी चाळावीत. जीवनात पुष्कळ काही करण्यासारखं आहे... आपण उगाच बाऊ करून घेतो, मला हे जमणार नाही किंवा मी हे कसं करू, माझ्याच्यानं नक्की होणार का? कधी कधी आपला इगो, स्टेटसही आडवा येतो, मात्र त्याला इलाज नाही! तुम्हाला खूश राहायचं ना... मग त्या इगोला, ऍटिट्यूडला वेळीच मूठमाती द्यायला हवी आणि आपल्या जगण्याला नवी दिशा द्यायला हवी... अगदी आजपासून, नव्हे आत्तापासून!
'दो कदम आगे बढाकर तो देखो!
किसी को जरा हसाकर तो देखो!!'

... विनोद श्रा. पंचभाई 
     मोबाईल क्रमांक : 9923797725

.

वेगळ्या धाटणीचा वाचनीय कथासंग्रह

 

वेगळ्या धाटणीचा वाचनीय कथासंग्रह : राघव शेला


               नुकताच कवयित्री,लेखिका सौ. स्वाती विवेक कुंभार यांचा 'राघव शेला' हा सर्वांगसुंदर कथासंग्रह वाचनात आला. यातील 'गौरीची गोष्ट' वाचत असताना आपसूकच 'जंजीर' या चित्रपटातील गाणं आठवलं... "तेरी हंसी की किमत क्या है, ये बता दे तू!..... कहे तो आसमां से चांद तारे ले आऊं..." अभिनेत्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरण्यासाठी त्याचा मित्र ना-ना प्रकारे आपल्या गाण्यातून त्याला साद घालत असतो. त्याची मनस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असतो!

               असं म्हणतात की 'माणसाला होणाऱ्या आजारापैकी जवळपास ९५ टक्के आजार त्याच्या मानसिकतेतून उत्पन्न झालेले असतात.' आजार झाला की आपण तो बरा करण्यासाठी भरमसाट औषधांचा वापर करतो, मात्र रोगाच्या मुळाशी असलेल्या मनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही! बरेचदा मनात येणारे नकारात्मक विचार, विनाकारण वाटणारी भीती, मग बदलत जाणारी मनस्थिती यातूनही शरीरातील लहानमोठ्या आजारांना चालना मिळण्यास मदत होते. 'राघव शेला' या कथासंग्रहाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या 'गौरीच्या गोष्टी'तील गौरीला कुठल्याही प्रसंगी जमलेल्या गर्दीची भीती वाटत असते! ती कशामुळे वाटते? गौरीला भीती वाटण्याचं नेमकं काय कारण असतं? तिच्या आयुष्यात असं काय काय घडतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही गुंतवून ठेवणारी दीर्घकथा वाचताना वाचकांना उलगडत जातात.

                या कथासंग्रहात अगदी सुरुवातीलाच सादर केलेली 'गौरीची गोष्ट : जी२०' ही भावस्पर्शी दीर्घकथा, जणू एखादी लघुकादंबरी शोभावी इतकी छान जमली आहे. यातील गौरीच्या आयुष्यात येणारे आशुतोष, शिल्पा, कबीर आणि इतर पात्र यांचे आपसातील संवाद वेळप्रसंगी योग्य तो परिणाम साधण्यात यशस्वी ठरले आहेत. तसेच अधूनमधून प्रसंगानुरूप पेरलेल्या 'आप से जो हुई बातें, फिर किसी से कही नही गयी...' किंवा 'पुराने गम अब गम नही लगते, हाँ अब तुम सितमगर नही लगते!' अशाप्रकारच्या शेरोशायरींनी या कथेत बहार आणली आहे. एकूणच 'गौरीची गोष्ट' छान जमल्यामुळे वाचनीय ठरली आहे. 

                  'आपण कितीही आधुनिक झालो तरी आपण आपली मुळं, आपले संस्कार, आपले आदर्श सोडत नाही. कुठे ना कुठे ते आपल्या वागण्या-बोलण्यातून जाणवतातच!' अशा प्रकारचं निवेदन लेखिकेने आपल्या मनोगतात व्यक्त केलं आहे. त्याची प्रचिती 'राघव शेला' मधील कथा वाचताना पदोपदी येत राहते. 'कळा ह्या लागल्या जीवा', 'गुरूदक्षिणा', 'मौसम है आशिकाना', 'ऋणानुबंध' या कथा वाचताना ते प्रकर्षाने जाणवते! तर 'इन मीन साडे तीन...!' ही टिपिकल कथा विचार करायला भाग पाडते. 

                  'फेलो ट्रॅव्हलर', 'बेस कलर' तसेच 'तपस्या', 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..!' या वेगळ्या धाटणीच्या कथा जगण्यासाठीचा वेगळाच संदेश देऊन जातात. या 'राघव शेला' कथासंग्रहात लेखिकेने निरनिराळे विषय हाताळले आहेत, त्यामुळे प्रत्येक कथेत वैविध्य जाणवल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे या कथासंग्रहाचा शेवट एकूण चार वेगवेगळ्या विषयांच्या 'अलक'ने अर्थात अति लघुत्तम कथांनी आणि तीन शब्दकथा 'शुक्रवार कॅलेंडर पर्वत'ने केला आहे. एकंदरीत या संग्रहातील सर्वच कथा वाचनीय ठरल्या आहेत.

                  कुठलीही अलंकारिक आणि बोजड भाषा नाही की उपदेशांचे डोस नाही. सहज, सोपी तसेच मनाचा ठाव घेणारी भाषा हे या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट्य आहे. तद्वतच कथेत आवश्यक त्या प्रसंगी केलेली अनुरूप अशा काव्याची उधळण हेही वाचकांच्या मनाला भावणारं आहे. त्यासाठी लेखिकेचं मनापासून कौतुकच करायला हवं! 

                  पुण्यातील 'वैशाली प्रकाशन'मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या 'राघव शेला' या कथासंग्रहाला ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांचा अप्रतिम अभिप्राय लाभला आहे. तसेच समर्पक आणि देखणे मुखपृष्ठ सौ. रुपिका अनिकेत पाटील यांनी रेखाटले आहे. 'राघव शेला' या अप्रतिम आणि सर्वार्थाने वेगळ्या शैलीच्या कथासंग्रहाच्या लेखिका सौ. स्वाती विवेक कुंभार यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

पुस्तकाचं शीर्षक : राघव शेला ( कथा संग्रह )

लेखिका : सौ. स्वाती विवेक कुंभार 

प्रकाशक : वैशाली प्रकाशन, पुणे 

किंमत : ₹ १६० 

पाने : १००

पुस्तक परिचय : विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

                      





एक पर्व संपले..!

 एक पर्व संपले..!

   
   मुक्काम पोस्ट : तपोवन सोसायटी, वारजे... 
आमची तपोवन सोसायटी म्हणजे एक भलं मोठं आदर्श कुटुंबच! एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे सदस्य, आपसात असणारी आपलेपणाची भावना, गरजवंतांना नेहमी मदत करण्याची भावना ही येथील ठळक वैशिष्ट्यं! महत्वाचं म्हणजे तपोवनमध्ये वावरणारी ज्येष्ठ मंडळी म्हणजे सगळ्यासाठी आधारस्तंभ, जणू प्रत्येकाच्या मायेचा आधार! त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीतून बहुतेकांना काही ना काही शिकता आलं... बरेचदा त्यांचं मोलाचं मार्गदर्शनही लाभलं. माझं म्हणालं तर मागील जवळपास वीस वर्षांत मला आपल्या तपोवनमधील या ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळीकडून बरंच काही शिकता आलं. त्यांच्या अनुभवसंपन्न खजिन्यातून काही ना काही मिळवता आलं, त्याबाबतीत मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. 

     मात्र गेल्या काही वर्षात, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडावे तसे एका पाठोपाठ एक, तपोवनला अभिमान वाटावा अशी आधारस्तंभ असलेली ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी हळूहळू गळून पडायला सुरुवात झाली! इथं मला लिहिताना यातना होत आहेत... पण केवळ आपल्या भावना व्यक्त करण्याशिवाय आता पर्याय उरला नाही. केळकरकाका, देशपांडेकाका, चितळेकाका यांच्यासोबत बरेचदा साहित्यविषयक चर्चा व्हायच्या. तसेच उत्तमराव जोशीकाका त्यांच्या पोलीस खात्यातील रोमहर्षक अनुभव त्यांच्या शैलीत सांगायचे. तर खाजगीवालेकाका मुंबईच्या गमतीजमती सांगायचे. सडेतोड बोलणारे उकिडवे आजोबा त्यांच्या मिश्किल गप्पामधून कुठल्यातरी गंभीर मुद्द्यावरही चर्चा करायचे. त्याचप्रमाणे आगरकर काकू त्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेन्ट खात्यातील किस्से मस्त रंगवून वर्णन करायच्या. आता ही सर्व आदरणीय मंडळी काळाच्या पडद्याआड विसावली आहे, चिरविश्रांती घेत आहेत! 

     केळकर काकांकडे अनेक लेखकांच्या साहित्यकृतींचा मोठा खजिनाच होता. त्यामार्फतच मला माहिती नसलेल्या काही दिग्गज साहित्यिकांची ओळख झाली. काकांचं वाचन किती अफाट आहे, हे त्यावरून जाणवलं. सुप्रसिद्ध लेखक विश्राम बेडेकर आणि मुंबईच्या इतर साहित्यिकांविषयी केळकर काका भरभरून बोलायचे... त्यावेळी त्यांनी बोलत राहावं आणि आपण नुसतं ऐकत राहावं असंच वाटायचं! ते ऐकून, कानात साठवून आपण खरंच साहित्यसंपन्न झाल्याचा खूप अभिमान वाटतो. विश्राम बेडेकर यांचं ‘एक झाड, दोन पक्षी’ हे आत्मचरित्र केळकर काकांनी मला आवर्जून वाचायला दिलं होतं…त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहील!

     पुणे शहरात प्रसिद्ध असलेल्या 'ब्रिटिश लायब्ररी'चे सभासद असणारे आणि तेथील पुस्तकं नियमितपणे वाचणारे तसंच त्यावर नेहमी चर्चा करणारे चितळे काका म्हणजे तपोवनमधील प्रसन्न व्यक्तीमत्व! त्यांच्याशी बोलताना आपण किती सामान्य आहोत याची प्रचिती त्यावेळी यायची, एवढं त्यांचं अफाट विश्व अनुभवसंपन्न होतं! मला आठवतं... 'महानायक' कादंबरीच्या निमित्ताने बोलताना चितळे काकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस या अतुलनीय महापुरुषाबद्दल आगळीवेगळी आणि बारीकसारीक माहिती सांगितली होती. त्यांची ते वर्णन करण्याची शैली खरंच अदभूत होती. आता मात्र फक्त आठवणी उरल्या आहेत! 

      उत्तमराव जोशी काका म्हणजे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले रुबाबदार व्यक्तीमत्व! ते पुण्यातील महत्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या डेक्कन पोलीस स्टेशनला नेमणूकीला होते. तिथं कार्यरत असताना त्यांच्या कारकिर्दीत घडलेले अनेक किस्से आणि घटना जोशीकाका त्यांच्या विशिष्ट शैलीत सांगायचे. त्यावेळी ते किस्से ऐकणारे भान हरपून जायचे आणि काका पुढं काय बोलतात, त्यासाठी सगळे सावरून बसायचे. काही काही आरोपीबाबतचे विलक्षण प्रसंग तर उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणारे असायचे... दुर्दैवाने आता जोशी काका नसल्यामुळे ते किस्से निश्चितच कायम स्मृतीत बंदिस्त राहतील यात शंका नाही!

      त्याचप्रमाणे आमच्या शेजारीच राहणारे उकिडवे आजोबा घरी आले की आमची मस्त गप्पांची महफिल रंगायची. आमच्या त्या गप्पांमध्ये कधीकधी वर राहणाऱ्या आगरकर काकू देखील सहभागी व्हायच्या. उकिडवे आजोबा यांची बोलण्याची लकब मजेशीर पण सडेतोड होती. कोणाचा मुलाहिजा न बाळगता ते स्पष्ट आणि रोखठोक बोलायचे. आगरकर काकू त्यांच्या ऑफिसमधील लोकांच्या वागणुकीच्या करामती छानपैकी रंगवून सांगायच्या. दोघांसोबत होणाऱ्या सविस्तर चर्चेतून त्यावेळी आम्हाला बरंच काही शिकता आलं. त्त्यांच्या अनुभवांचे बोल आताही मार्गदर्शक ठरतात हे विशेष! 

       आपल्या मिश्किल बोलण्यातून अधूनमधून कोपरखळ्या करणारे आणि समोरच्याचा गमतीने हळूच चिमटा काढणारे देशपांडे काका मला खरंतर तपोवनचे पु. लं. (देशपांडे ) वाटायचे! त्यामुळे त्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटायचा. त्यांच्या सानिध्यातले तास दोन तास जगण्यासाठी अनोखी ऊर्जा देऊन जायचे. देशपांडे काकांना वाचनाची प्रचंड आवड होती, तसंच त्यांची संगीताची जाणही विलक्षण होती. ते पेटी ( हार्मोनियम ) अप्रतिमरित्या वाजवायचे... आयुष्याच्या शेवटपर्यंत हार्मोनियमने त्यांना साथ दिली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही! एक आवर्जून सांगावंस वाटतं, देशपांडे काकांकडे गेल्यावर त्यांचा पहिला प्रश्न असायचा... "आता कुठल्या विषयावर लिहितोस?      तसंच मी लिहिलेल्या पुस्तकातील त्यांना काय काय आवडलं, ते छान वर्णन करून काका आवर्जून सांगायचे. त्यावेळी त्यांची ती मिळालेली पावती म्हणजे माझ्यासाठी मोठा पुरस्कारच वाटायचा! कधीकधी तर पाच सहा दिवसात भेट झाली नाही तरी काका अधिकारवाणीने विचारायचे, "अरे कुठे होतास इतके दिवस? मला भेटायला आला नाहीस!" 

        हे नश्वर जग सोडायच्या आधी देशपांडे काका भेटले ते दीनानाथ हॉस्पिटलच्या बेडवरच! त्यावेळी त्यांच्या शरीरात विविध प्रकारच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. आयसीयूमध्ये भेटायला आत गेलो तेव्हा ते जागेच होते. मी जवळ पोहचल्याची चाहूल त्यांना लागली असावी. ते बहुधा बोलायच्या प्रयत्नात होते, मात्र ते शक्य नसल्यामुळे मी लगेच त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. आयसीयूमध्ये जास्त वेळ थांबता येत नसल्याने बाहेर जाताना मी काकांना नमस्कार केला, त्यांनी माझ्याकडे बघितलं. दुसऱ्याच दिवशी काका व्हेंटिलेटरवर असल्याचं समजलं... आणि लगेच काही दिवसातच ते आपल्याला सोडून गेल्याचा निरोप मिळाला! त्यादिवशी आयसीयूमधून बाहेर पडताना काकांना केलेला नमस्कार, 'अखेरचा दंडवत' ठरेल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. एक पर्व संपलं होतं! 

        या ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि परम आदरणीय असलेल्या वरील मंडळीनी तपोवनला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं. त्यांच्या नित्य सहवासामुळे, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याने वैयक्तिकरित्या मी श्रीमंत झालो हे इथं नम्रपणे नमूद करतो. मात्र आता ते देदिप्यमान पर्व संपल्याने एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे... हे आपल्या तपोवनचं दुर्दैवच म्हणावं लागेल!
        सोडून गेलेल्या पण आशीर्वादरूपाने कायम आपल्यासोबत असलेल्या आधारस्तंभांना 
भावपूर्ण विनम्र आदरांजली!

… विनोद श्रा. पंचभाई,

देशभक्त उद्योगपती रतन टाटा

     जगाच्या इतिहासात पिढ्यान् पिढ्या धनाढ्य असणारे कित्येक संस्थानिक, राजकारणी किंवा उद्योगपती होऊन गेले आहेत. गर्भश्रीमंतीचा वरदहस्त लाभलेल्या कितीतरी दिग्गज व्यक्ती आपल्याला भारतीय समाजात वावरताना दिसतात. मात्र त्यातील सर्वच बाबतीत यशस्वी ठरलेले बोटावर मोजण्याइतकेही आढळून येणार नाही. आपल्या बापजाद्याच्या इस्टेटीवर निव्वळ मजा मारणारे, वारसाने मिळालेला वारेमाप पैसा पाण्यासारखा उधळणारे, गरिबांना कवडीमोल समजणारे, कुणाशी काही देणं घेणं नसण्याची वृत्ती असणारे या खंडप्राय देशात सर्वत्र आढळतील. मात्र समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो अशी प्रकर्षाने जाणीव असणारे, इतरांना सढळ हाताने मदत करणारे, दीनदुबळ्याविषयी, मुक्या प्राण्यांबद्दल आत्यंतिक कळवळा असणारे गर्भश्रीमंत अभावानेच दिसून येतील. त्यामुळेच इथं नमूद करावंसं वाटतं... सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणारे सगळेच खऱ्या अर्थाने श्रीमंत नसतात. म्हणूनच आजच्या या मतलबी जगात रतन टाटा यांचासारखा एखादाच सर्वार्थाने 'श्रीमंत' ठरतो!   

   रतन टाटा यांची सौम्य, शांत मूर्ती डोळ्यासमोर आली की लहान-मोठा असो की कुणी अमीर-गरीब असो प्रत्येक जण त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. हे भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी आलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही, विशेषतः उद्योगपतींच्या बाबतीत तरी! रतन टाटा यांचे स्वभावगुण खरोखरच वाखाणण्यासारखे आहेत. अतिशय साधी राहणी, प्रखर देशप्रेम, नीतिमत्ता, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा दुजाभाव न करणे, कामगारांबद्दलची अपार तळमळ, प्राण्यांविषयीचं आत्यंतिक प्रेम, जिव्हाळा, गरजवंतांना मदत करण्याची तत्परता अशा कितीतरी स्वभाव गुणांनी रतनजींचं व्यक्तीमत्व खुलून दिसायचं.          मैदानातील एखाद्या सांघिक खेळात विजय मिळवण्यासाठी संघातील सर्वच खेळाडूंमध्ये आपसात ताळमेळ असणं गरजेचं असतं. सामना खेळताना परस्पर सहकार्याची आणि संघात आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी उत्कृष्टरीत्या पेलण्याची जबाबदारी प्रत्येक खेळाडूला घ्यावी लागते. नेमका हाच ताळमेळ रतनजी टाटा यांनी टाटा उद्योग समूहामध्ये जुळवून आणला. टाटा समूहामधील सर्व कंपन्यांना एकत्र आणून रतनजींनी त्यांच्यात समन्वय साधला. या समन्वयामुळे कंपनीच्या विकासाला एक प्रकारची सांघिक गती मिळवून दिली. सांघिक ताळमेळामुळे नवीन निर्णय घेणं आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करणं खूप सोयीचं झालं. एका समूहामध्ये असलेल्या अनेक कंपन्या असोत किंवा एकाच कंपनीमधील अनेक विभाग आणि त्या विभागातील सर्व कामगार असोत... या सर्वांमध्ये आपसात ताळमेळ असणं खूप गरजेचं असतं. असा ताळमेळ नसेल तर कंपनीत गोंधळाची स्थिती निर्माण होऊन व्यवस्थापन करणं अवघड होऊ शकतं याची जाणीव, व्यापक दूरदृष्टी असलेल्या रतनजी टाटा यांना होती. त्यामुळेच त्यांची संपूर्ण कारकीर्द देदीप्यमान आणि विलक्षण लक्षवेधी ठरली!

गरुडझेप अंतराळवीरांची

 ब्लर्ब… 


    आकाशातून ये जा करणारे विमान सर्वसामान्यांसाठी आता कुतूहलाची बाब राहिली नाही. मात्र अवकाशात, अंतराळात झेप घेणारे एखादे अंतराळयान नक्कीच उत्सुकता वाढवणारा विषय ठरतो. मग त्यातून जोखीम पत्करून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांबद्दल जाणून घ्यायला कुणालाही आवडेल. पहिला अंतराळवीर कोण किंवा पहिली महिला अंतराळवीर कोण होती? हाही प्रश्न पडणं साहजिकच आहे. 
      चंद्राच्या पृष्ठभागावर पहिलं पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग, पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा, त्याचप्रमाणे भारतीय मूळ असलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या आणि अशा अनेक अंतराळवीरांच्या कारकिर्दीची माहिती या पुस्तकातून करून देण्यात आली आहे. भारतासह रशिया, अमेरिका, चीन, जपान या देशातील बऱ्याच अंतराळवीरांची सविस्तर ओळख ‘गरुडझेप अंतराळवीरांची’ या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिली असल्यामुळे हे पुस्तक सर्व प्रकारच्या विद्यार्थी मित्रांच्या ज्ञान आणि माहितीमध्ये निश्चितच मोलाची भर टाकणारे ठरणार असा विश्वास आहे. 
     

Friday, May 31, 2024

जे होते ते चांगल्यासाठी होते...

 

जे होते ते चांगल्यासाठी होते...


         सतीशनं अलार्म लावूनही त्याचा उपयोग झाला नाही. वेळेवर त्याचा अलार्म वाजलाच नाही. त्यामुळे त्याला सकाळी लवकर जाग आली नाही. उशिरा उठल्यामुळे त्याची खूप चिडचिड झाली. कसंही करून वेळेच्या आत विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. मग त्यानं झटपट आवरायला सुरूवात केली. मात्र नेमका वीजपुरवठा बंद झाल्यानं गिझर सुरू करता येत नव्हता. मग त्याने निर्णय घेतला, आज अंघोळ करायचीच नाही! कशीतरी गार पाण्यानं त्यानं दाढी करून घेतली. त्यानंतर थोडे खाऊन कॅब बूक करण्यासाठी मोबाईल हातात घेतला.

कॅब लवकर उपलब्ध होत नव्हती म्हणून सतीशनं तो प्रयत्न सोडून दिला आणि झटपट शूज घालून, एअर बॅग सोबत घेऊन घराबाहेर पडला. रस्त्यावर पोहोचल्यानंतर त्यानं रिक्षा थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. कितीतरी रिक्षावाले रिकाम्या रिक्षाने येत जात होते पण कोणी थांबेल तर शपथ! सतीशनं मनगटावरच्या घड्याळात बघितलं. काटे पुढे पुढे सरकत होते... 'वेळ कुणासाठी थांबत नाही हे त्रिकालाबाधित सत्य' असल्याची खात्री आज त्याला पटली होती! नंतर काही वेळाने का होईना, एक रिक्षा वेग कमी करत रस्त्याच्या कडेला थांबली... तशी सतीशनं पळत जाऊन ती पकडली आणि 'चला लवकर एअरपोर्टला' म्हणत तो आपल्या बॅगेसह रिक्षात जाऊन बसला.

"साहेब मीटर बंद पडलेलं आहे. साडेतीनशे रूपये पडतील!"

"का? मीटरने तर अडीचशे होतात, मी नेहमी जातो... बरं तीनशे घ्या पण लवकर चला!"

"ठीक आहे साहेब. तुमची बॅग धरून बसा... साईड राॅड तुटलेला आहे, बॅग कधीही पडू शकते."

"ओके.. चला पळवा रिक्षा, स्पीड वाढवा जरा. वेळ खूप कमी आहे!"

    रिक्षाचालक वेग वाढवून रिक्षा सुसाट पळवत होता. मात्र येणाऱ्या चौकात ट्रॅफिक सिग्नल पडला की नाईलाजाने त्याला थांबणं भाग पडायचं! त्यामुळे सतीशचा वैताग क्षणाक्षणाला वाढू लागला. तो स्वतःवरच चरफडला... आपल्या जगण्याला आता खरंच शिस्त लावण्याची गरज आहे. रात्रीचं जागरण करणं अजिबात बंद करायलाच हवं, भलेही त्या दिवशीचं काम झालं नाही तरी चालेल. लवकर आणि वेळेवर जेवण आटोपलं की झोपायला देखील उशीर होणार नाही. मग सकाळी पण लवकर उठणे शक्य होईल. अशा प्रकारची शिस्त लावण्याचा प्रयत्न आपण उद्यापासूनच करायचा असं सतीशनं आपल्या मनाशी पक्कं ठरवून टाकलं.

         काही वेळाने रिक्षा एयरपोर्ट परिसरात पोहचल्याचं सतीशला जाणवलं. त्यानं मनगटावरील घड्याळ बघितलं. बापरे! बराच उशीर झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. आता जर का फ्लाईट डिले असेल तरच आपल्याला मिळू शकते अशी त्यानं समजूत करून घेतली आणि एक दीर्घ श्वास घेतला! बघूया, जे काही पुढे घडणार त्यासाठी आपण तयार राहायला हवं, तशी आपली मानसिकताच करून घ्यायला हवी असा विचार त्याच्या मनात आला.

       एकदाची रिक्षा एअरपोर्टच्या आत येऊन थांबली. घाई करत सतीश उतरला आणि आधीच हातात काढून ठेवलेले तीनशे रुपये त्यानं रिक्षाचालकाला दिले. मग मागं वळून न बघता त्यानं तडक प्रवेश द्वाराकडे झेप घेतली. आवश्यक तपासणीची औपचारिकता पार पडल्यानंतर सतीश इच्छित काउंटरवर पोहचला. मात्र तिथं पोहचल्यावर त्याला कळलं... ज्या फ्लाईटने तो एवढ्या तातडीने दिल्लीला जाणार होता, ती फ्लाईट दिल्लीमधील अत्यंत खराब हवामानामुळे थोड्या वेळापूर्वी रद्द करण्यात आली आहे. सतीश विचार करू लागला... एवढी धावपळ करून काय मिळालं? कधी कधी परिस्थितीच अशी उदभवते, आपल्या हातात काहीच नसतं! शेवटी 'जे होते ते चांगल्यासाठीच होते' हेच खरं!

...विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

   मोबाईल क्र. 9923797725



'क्रांतिलढ्याचे महानायक : उमाजीराजे नाईक'

 प्रस्तावना 'क्रांतिलढ्याचे महानायक : उमाजीराजे नाईक'

     वीर उमाजी नाईक हे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे एवढे महत्वाचे आहे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह जेजुरीच्या खंडोबारायासमोर भंडारा उधळत इंग्रजी सत्ता नष्ट करण्याची शपथ घेणारा हा नरवीर, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरी शिवशंकरासमोर घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेशी निष्ठा सांगतो. त्यानंतर लगेचच इंग्रज असोत की जुलुमी वतनदार असोत, त्यांच्यावर हल्ले करून त्यांना सळो की पळो करून सोडतो. लुटलेली संपत्ती गोर-गरिबांना वाटतो. आया-बहिणींची अब्रू वाचवतो. असा हा स्वातंत्र्यसेनानी महाराष्ट्रभूमीत झाला याचा आम्हा मराठी माणसांना अभिमान वाटला पाहिजे. उमाजी नाईक यांचे  हे अत्यंत स्फूर्तीदायी चरित्र विनोद श्रा. पंचभाई यांच्यासारख्या प्रथितयश साहित्यिकाने लिहिलेले आहे. त्याची पारायणे करायला प्रेरित करत जाज्ज्वल्य स्वातंत्र्यनिष्ठा प्रत्येकाच्या हृदयात निर्माण होईल एवढ्या प्रभावी भाषेत लिहिले गेलेले हे प्रेरणादायी  चरित्र आहे. उमाजी नाईक यांना शेवटी इंग्रजांनी फितुरीने पकडले आणि त्यांना  पुण्यातील मामलेदार कचेरीसमोर दिनांक ३ फेब्रुवारी १८३२ रोजी जाहीर फाशी देण्यात आली. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात हौतात्म्य पत्करलेला हा पहिला हुतात्मा! त्याचे नित्य स्मरण होत राहिले पाहिजे.

    उमाजी नाईक रामोशी जमातीचा. पुरंदर किल्ल्याची किल्लेदारी त्यांच्या घराण्याकडे होती, जी जुलमी  इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत काढून घेतली. शिवपूर्व काळापासून महाराष्ट्रातील आणखी बऱ्याच किल्ल्याचे किल्लेदार हे रामोशी, भिल्ल, कोळी, महार अशा पराक्रमी जाती-जमातीचे असत. उदाहणार्थ मुहम्मद तुघलकाने जेव्हा १३२७ साली देवगिरीला आपली राजधानी हलवली तेव्हा कोंडाणा किल्ला आपल्या ताब्यात नाही यामुळे त्याला स्थिरता वाटत नव्हती. कोंडाणा किल्ला तेव्हा नागनायक नावाच्या कोळी किल्लेदाराच्या ताब्यात होता. मुहम्मदाने वेढा घातल्यानंतर नागनायक याने आपल्या साथीदारांच्या मदतीने आठ महिने किल्ला लढवला. शेवटी रसद संपल्यावर नागनायक किल्ल्यावरून तुघलकाला गुंगारा देऊन निघून गेला होता. जव्हार संस्थानाचा संस्थापक राजा तो हाच! धनगर, भिल्ल, कोळी, महार आणि रामोशी हे मुळात पराक्रमी असल्याने ते किल्ले, गावे, नगरे आणि व्यापारी तांड्यांचे रक्षक असत. इंग्रजानी त्यांच्या राजवटीत आणलेल्या नव्या व्यवस्थेमुळे वरील जमातींचे मुळचे स्वातंत्र्य लोप पावले आणि त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. जुलमी इंग्रजी सत्ता नष्ट केल्याखेरीज आपले स्वातंत्र्य संरक्षित होणार नाही याची जाणीव झालेला उमाजी नाईक हा पहिला तरुण!

   इंग्रजांशी पहिला स्वातंत्र्यलढा पुकारणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर यांनी तत्पूर्वी पुकारलेला सर्वकष लढाही उमाजी नाईकांची प्रेरणा ठरली असल्यास नवल नाही. स्वातंत्र्याचे हे लोण सर्व स्तरांवर पोचले तर आपली अवस्था अतिशय बिकट होईल हे ओळखलेल्या चाणाक्ष  इंग्रजांनी अखेर लढवय्या उमाजीला फितुरीने पकडले. फासावर चढवले! हे येथेच थांबले नाही. इंग्रजांनी पुढे देशभरातील रामोशी, भिल्ल, कोळी आणि समकक्ष लढाऊ जमातींना गुन्हेगार जाती-जमातीत टाकून त्यांचे  जगण्याचेही स्वातंत्र्य नाकारले. त्यांना बंदिस्त वसाहतीत रहायला भाग पाडले. स्वातंत्र्ययुद्ध झाले तर ते याच जमाती करतील ही खात्री असल्याने जुलमी इंग्रजांनी हे पाऊल उचलले. या जमातींवर “गुन्हेगारी” शिक्का बसला तो कायमचाच! त्यानंतर तो निघाला... तो १९५२ साली पंतप्रधान पंडित नेहरूंनी हा शिक्का काढून त्यांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर. तरीही इंग्रज कायदेप्रणालीत शिक्षित झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीत फारसा फरक आजही पडलेला दिसून येत नाही हे दुर्दैव! आपल्या समाजानेही त्या जाती-जमातींना पुरेसा सन्मान व प्रतिष्ठा दिल्याचे सहसा आढळून येणार नाही. वीर उमाजी नाईक महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्य सेनानी असूनही त्याला तो सन्मान दिला गेलेला नाही. त्याच्याबद्दल सर्वसामान्यांना विशेष माहितही नाही हे तमाम भारतीय माणसांचे दुर्दैवच. ज्याचे नित्य पोवाडे गायले जायला हवेत, त्यालाच दुर्लक्षित ठेवणे हा मराठी माणसाचा अपराधच आहे यात शंका नसावी.

     विनोद पंचभाई यांनी उमाजीराजेंचे हे चरित्र लिहून मराठी साहित्यातील एक मोठीच उणीव दूर केलेली आहे. इतिहासवंचित स्वातंत्र्यवीराला मानाची आदरांजली वाहिली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भसाधने वापरली असून हे चरित्र अधिकाधिक प्रामाणिक होईल याची काळजी घेतली आहे. त्यांची शैलीही अत्यंत सुगम असून वाचकाला उमाजी नाईक यांच्यासोबत सफर करायला भाग पाडते. त्यांचे संघर्ष आणि त्यांच्याशी द्रोह करणाऱ्या  स्वजनांचे वास्तविक दर्शन या पुस्तकात उत्कटतेने घडते!

     मराठी वाचक 'क्रांतिलढ्याचे महानायक : उमाजीराजे नाईक' या चरित्राचे स्वागत करतील, याच्या प्रती सार्वत्रिक करून या महान स्वातंत्र्ययोद्ध्यास मानवंदना देतील हीच  अपेक्षा आहे.

     धन्यवाद!

...संजय सोनवणी

   ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास संशोधक 

   आणि प्राकृत भाषेचे अभ्यासक, पुणे 


Tuesday, April 30, 2024

शब्द की खैरात हूं मै...

 शब्द की खैरात हूं मै...


         वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 'ग्रामगीता' या अदभूत ग्रंथाची रचना करून गुरू, शास्त्र आणि स्वानुभवाचे प्रात्यक्षिकच या नश्वर जगापुढे मांडले आहे. राष्ट्रसंत हे कर्मप्रधान आणि क्रांतिदर्शी 'साहित्यिक' असल्यामुळे त्यांनी लिहिलेली ग्रामगीता ही आजच्या आधुनिक युगातील जणू भगवदगीता असल्याचा अनेकांना प्रत्यय आलेला आहे. अशी ही प्रेरणादायी ग्रामगीता मराठी भाषेसोबत हिंदी, इंग्रजी तसेच इतर अन्य भाषेतही उपलब्ध आहे. ग्रामगीतेतील ग्रंथ महिमा या अध्यायात राष्ट्रसंत सुरुवातीलाच म्हणतात...

"ग्रामगीता शाब्दिक सेवा, परि दृढ करी संस्काराचा ठेवा!

तेणे ईश्वरी राज्य गावा, नांदेल सदा सर्वकाळ!!

ग्रामगीता दुःखाशी नाशवी, ग्रामगीता मृत्यूशी हसवी!

ग्रामगीता सहकारी तत्त्व वाढवी, मानवधर्मा फुलावया!!"

       हा अदभूत ग्रंथ पठन करताना 'ग्रामगीता नोहे पारायणासि' असा इशारा देत राष्ट्रसंत या ग्रंथाचे महत्व स्पष्ट करतात. ग्रामगीता वाचनाने काय काय घडू शकते, सामान्य जणात कुठलं आमुलाग्र परिवर्तन होऊ शकतं याचा वस्तुपाठ त्यांच्या पुढील ओव्यामधून दिसून येईल...

"स्त्रिया-मुले होतील आदर्शपूर्ण, हा ग्रंथ घरी होता पठन!

ग्राम होईल वैकुंठभुवन, वाचता वर्तता ग्रामगीता!

भिकारी, बेकारी गावी राहिना! सत्तेची बंधने नुरतील कोणा!

सर्वचि शिकतील शहाणपणा, ग्रामगीता वाचूनिया!!

ग्राम नांदेल स्वर्गापरी, सुखी होतील नर नारी!

परमार्थाच्या खुलतील घरोघरी, आनंद - लहरी!!"

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या प्रेरणादायी आणि परिणामकारक साहित्यातून सर्वसामान्य लोकांसाठी प्रभावीपणे प्रबोधन केले आहे. इतर तथाकथित साहित्यिकांप्रमाणे उगाच कुठल्याही बोजड शब्दांचा वापर न करता त्यांनी त्यांच्या मराठीतील साहित्यासोबत हिंदी भाषेतील भजनातूनही सहजसाध्या शब्दांनी अत्यंत सोप्या भाषेत योग्य तो परिणाम साधला आहे. राष्ट्रसंत म्हणतात...

''मंदिरी बसोनि नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे!

दुःखितासि प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि!!'' बघा किती सोप्या, सरळसाध्या शब्दात आपल्याला कर्तव्याची जाणीव करून दिली आहे महाराजांनी!

            तसेच आजच्या युवक, युवतींसाठी राष्ट्रसंतांनी केलेले अमूल्य प्रबोधन जगातील कुठल्याही विद्यापीठात आढळून येणार नाही एवढे परिणामकारक आहे. महाराज ग्रामगीतेतील 'जीवन शिक्षण' या अध्यायात मार्गदर्शन करताना म्हणतात...

'मुलात एखादा तरी असावा गुण, ज्याने पोट भरेल त्यात निपुण! न ये संसारामाजी अडचण, कोणत्याही परि!!'

'मुलगी बहु शिकली शाळेमाझारी, परि स्वयंपाक करता न ये घरी! काय करावी विद्याचातुरी? कामाविण लंगडी ती!!'


           'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे!

            हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे!'  या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ध्येयगीतातून अतिशय साध्या भाषेत महाराजांनी आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचं परिपूर्ण दर्शनच घडवलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांनी त्यांच्या असंख्य हिंदी रचनेतून अतिशय सोप्या शैलीतून तेवढेच मोलाचे प्रबोधन केले असल्याचे दिसून येईल.

 'हर देश मे तू, हर भेष मे तू, तेरे नाम अनेक तू एकही है!' किती सरळ साधे शब्द... मात्र यात किती गहन अर्थ व्यापला आहे!

तसेच 'ऐ विश्व के चालक प्रभो! मुझको समझ दे विश्व की!' किती ताकद आहे या शब्दात... अगदी कमी शिकलेल्या, रंजल्या गांजलेल्या लोकांना सहज कळेल अशी ही सुंदर वाक्य रचना!

          आपल्या देशातील आजच्या कठीण परिस्थितीत देखील प्रेरणादायी ठरणाऱ्या महाराजांच्या पुढील भजनातील या ओळी पहा...

"दिल - मनसे गाऊंगा तेरा भजन!

उंचा उठा दे मेरा प्यारा वतन!

मेरे वतन की बिछुडी है जनता

किसीका किसीके संग नही बनता!

इसके लिये मैने ठानी है मनता!

सब नेताओ मे कर दे मिलन

तब दूर हो मेरे दिल की जलन!"


'झाड झाडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना!

पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे..!' अशा प्रकारच्या स्फूर्तिदायक गीतांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नवचेतना निर्माण करण्यात महाराज अग्रेसर होते. यावरून राष्ट्रसंतांची अष्टपैलू भूमिका आपल्याला दिसून येते. शब्दात किती ताकद असू शकते, याचा अनुभव आपण राष्ट्रसंतांच्या 'लहर की बरखा' या ग्रंथातील पुढील काही ओळी वाचून निश्चितपणे घेऊ शकतो...

"मैं शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है!

मुर्दे जगा दूं शब्द से, होता अशुभ का ऱ्हास है!

मैं नही किसे पहचानता, मुह देख के नही बोलता!

सत क्या, असत क्या, सोचकर ही बात अपनी खोलता!"

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!🙏🙏

... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

    9923797725

Friday, April 19, 2024

थरार चोवीस तासातला : परिचय

 ठाणे शहर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी श्री. गजानन राणे सर यांनी माझ्या 'थरार चोवीस तासातला'

या रहस्यमय कादंबरीविषयी थोडक्यात पण अतिशय बोलका अभिप्राय पाठवला आहे. तो इथे शेअर करतो...

    लेखक विनोद पंचभाई यांची थरार चोवीस तासातला ही कादंबरी हातात घेतली. सहज दोन तीन पाने वाचल्यानंतर उत्सुकता वाढली आणि मग ती कादंबरी पूर्ण वाचून झाल्यावरच टेबलावर ठेवली. या कादंबरीमधील सस्पेन्स आपल्याला इतका गुंतवून ठेवतो की पुस्तक हातून सुटत नाही. एका बैठकीत वाचल्याशिवाय समाधान मिळत नाही. सतत आता पुढे काय घडणार याची उत्कंठा लागून राहते. या कादंबरीतील पात्रांचे संवाद खूप प्रभावी आहेत. तसेच कथानकही मनावर पकड घेणारे असल्याने कादंबरीची भट्टी छान जमली आहे. त्यामुळे वाचताना कुठेही रटाळवाणे वाटत नाही. एखाद्या सस्पेन्स सिनेमाप्रमाणे शेवटपर्यंत खिळून राहणे काय असते याचा अनुभव थरार कादंबरी वाचताना आला. शेवटी रहस्य उलगडल्यावर आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहत नाही. या कादंबरीचे वैशिष्ट असे की आजच्या तरुण पिढीने कसे सावध राहायला हवे याबाबत या कादंबरीच्या माध्यमातून मोलाचा संदेश दिला आहे.

  लेखक विनोद पंचभाई यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कादंबरी लेखनासाठी शुभेच्छा देतो!

... गजानन राणे, पोलीस निरीक्षक, ठाणे शहर


  

मुंह मे राम बगल मे छुरी...

 मुंह मे राम बगल मे छुरी...


   'मुहं मे राम बगल मे छुरी' ही हिंदी भाषेतील म्हण बहुतेकांनी ऐकली असणारच. स्पष्ट शब्दात सांगायचं तर रामाच्या नावाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांची संख्या आपल्या समाजात दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त राजकीय क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रात देखील रामाचं नाव घेऊन आपली पोळी भाजून घेणे सर्रासपणे सुरू आहे. सांस्कृतिक अन साहित्य क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. रामाला स्वतःचा आदर्श मानणारे काही तथाकथित, स्वतःला सुसंस्कृत समजणारे महाभाग रावणासारखं वागताना दिसतात. असहाय नवोदितांची फसवणूक करताना दिसतात. अशावेळी 'मुहं मे राम बगल मे छुरी' ही म्हण तंतोतंत लागू पडते!


      शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा फार वेगळी स्थिती नाही. लाखो रुपये डोनेशन घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या शिक्षण संस्थाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा शिक्षण संस्थामधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल तर बोलायलाच नको. खरंतर 'स्टँडर्ड' समजण्यात येणाऱ्या या शिक्षण संस्थामधील शिक्षकांनाच आज शिक्षणाची गरज आहे हे दुर्दैवाने नमूद करावे लागते. 

    परम आदरणीय आणि श्रद्धेय समजण्यात येणारे क्षेत्र म्हणजे अध्यात्मिक क्षेत्र!  दुर्दैवाने आजकाल या क्षेत्रात पुढाकार घेणारे साधू आहेत की संधीसाधू हेच कळत नाही. अशा संधीसाधू बुवांनी देशभर आपापली दुकानं थाटली असल्याचं आढळून येईल. भोळ्याभाबळ्या जनतेला आपल्या मार्गी लावून, या भोंदू बुवांच्या भाषेत सांगायचं झालं तर भक्तिमार्गाला लावून त्यांची लुबाडणूक केली जाते. पीडित भक्त आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल या आशेने अशा बुवांच्या बोलण्यावर विश्वास (की आंधळा विश्वास ) ठेवतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा करतो. कालांतराने त्याला स्वतःची फसवणूक झाल्याचं लक्षात येतं त्यावेळी बराच उशीर झालेला असतो!

         आजकाल बऱ्याच बुवा, बाबांचे वेगवेगळे चॅनल्स , वेबसाईट्स निघालेल्या आहेत. त्यावर मोठमोठी आश्वासनं दिली जातात. एखाद्याला पुत्र प्राप्ती होत नसेल, व्यवसायात सतत अपयश येत असेल अथवा मनासारखी नोकरी मिळत नसेल तर त्यावर हमखास उपाय सुचविले जाणार अशा जाहिराती करण्यात येतात. एका युट्युब चॅनलवर तर चक्क...

'मोक्ष प्राप्त करने के लिये हमारा चॅनल लाईक करके सब्सक्राईब किजीये!' असं ऐकायला मिळते, आता बोला! सत्संग, संत समागम या भक्तिमय शीर्षकाखाली किती मलिदा गोळा केला जातो आणि सरळ साध्या पद्धतीने जीवन जगणाऱ्या गोरगरीब लोकांची कशी पिळवणूक केली जाते याची आपल्या विशाल देशात मोजदादच नाही! बरं आपल्या देशातील सामान्य जनता इतकी भोळी भाबडी आहे की... कसलीही शहानिशा न करता या भोंदू बाबांच्या भूलथापांवर चटकन विश्वास ठेवते आणि त्याच्या नादी लागते. त्यावेळी त्यांची आपल्या कुठल्याही हितचिंतकांचे सावधगिरीचे बोल ऐकण्याची मनस्थिती नसते! त्यामुळेच 'मुहं मे राम बगल मे छुरी' या धूर्त नीतीने वागणाऱ्या अशा संधीसाधू बुवा, बाबांचे फावते. सामान्य जनतेला आपली घोर फसवणूक झाल्याचं कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते!

      अशा सर्वच क्षेत्रातील तथाकथित महाभागाना प्रभू श्रीराम सदबुद्धी देवो हीच प्रार्थना! शेवटी 'मन से जो रावन निकाले राम उसके मन मे है!' हेच खरं! 

... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

    9923797725

Tuesday, April 16, 2024

आम्ही मराठी...

      आम्ही मराठी...


      आम्ही मराठी आहोत, मराठी असण्याचा आम्हाला अभिमान आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. आम्ही घरातल्या जुन्या झालेल्या वस्तू बदलू, इंग्रजीत असलेल्या दुकानाच्या पाट्या मराठीत बदलण्यासाठी आग्रह धरू, या गावातून त्या गावात एकदा काय दहावेळा घरही बदलू पण आम्ही आमची वृत्ती बदलणार नाही! जुन्या बुरसटलेल्या परंपरा, चालीरिती आम्ही बदलणार नाही. त्या चुकीच्या असल्या तरी त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एवढंच काय 'विचार बदलला तर तुम्ही बदलणार' हे तर आम्हाला मुळीच मान्य नाही.

     इतरांची बदललेली परिस्थिती पण आम्हाला अजिबात खपत नाही. आमच्याच बांधवांची झालेली प्रगती आम्हाला डोळ्यात खुपते! स्वतःच्या पायावर उभं राहण्याची औकात नसताना आपल्याच माणसांचे पाय ओढण्यात आम्ही धन्यता मानतो. स्वतःच्या किरकोळ स्वार्थासाठी आम्ही परकीयांना आनंदाने मदत करतो. इतरांचे कौतुक सोहळे साजरे करू पण आपल्याच माणसांना मात्र एका शब्दानेही शाबासकी देणार नाही कारण आमची कोती वृत्ती, परंपरागत मानसिकता आड येते, आमचा 'इगो' दुखावला जातो ना!

        कुणातरी थोर तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे, 'तुम्ही एक पाऊल पुढे टाका, आपोआपच तुमचे दुसरे पाऊल पुढे सरकेल, मग तुमच्या मंझिलपर्यंत तुम्ही आरामात पोहचू शकाल.' पण आम्ही नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हणा किंवा इतर नवीन कुठलाही उपक्रम म्हणा, आपले पाऊल पुढे टाकण्यास आम्ही धजावतच नाही किंवा कुणी तसे धाडस केले तर त्याला प्रोत्साहित करत नाही. उलट दुसऱ्यांचे पाऊल मागे कसे खेचता येईल हाच विचार करत बसतो. ही आपल्या मराठी माणसाची कुपमंडूक वृत्तीच आपल्याला पदोपदी मारक ठरत आहे! तरीही आम्ही ही मानसिकता बदलत नाही किंवा तसा प्रयत्नही करत नाही हे आम्हा मराठी माणसांचं मोठे दुर्दैवच म्हणावं लागेल!

      अगदी आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वकियांनीच जास्त विरोध केल्याचे आपण इतिहासात बघतो. स्वराज्य उभारणीच्या वेळी कित्येक मराठा सरदारांनीच स्वत:च्या किरकोळ स्वार्थासाठी वेळोवेळी अडथळे आणले. निरनिराळ्या अडचणी निर्माण केल्या पण त्या अफाट झंझावातासमोर पत्त्याच्या बंगल्यागत सारेच नेस्तनाबूत झाले. तशाप्रकारचा विलक्षण झंझावात आता येथे होणे नाही! महाराजांचे इतके मोठे जबरदस्त उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर असूनही आम्ही मराठी बांधव आपली वृत्ती, मानसिकता का बदलू शकत नाही?

        बालपणी सोबत खेळलेला, बरोबरीनं शिकलेला आपला जिवलग मित्र अथवा आपला अगदी जवळचा नातलग, कालांतराने 'मोठ्ठा साहेब' झाल्यावर आपल्याशी तुटकपणे वागत असतो, संबंध ठेवायला तयार नसतो. साधी विचारपूस तर सोडाच, कधी कुठेतरी मोठ्या कार्यक्रमात अपघाताने भेटला तरी आपला चेहरा लपवतो. (कारण तेथे उपस्थित असलेल्या मोठ्या लोकात त्याच्या 'स्टेटस'चा प्रश्न असतो ना!) इतका जिवाभावाचा मराठी बांधव का असा वागतो? परिवर्तन हाच जगाचा नियम आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे! पिढ्या न पिढ्या गर्भश्रीमंत असणारेही कधीतरी दोन वेळच्या साध्या जेवणालाही मोताद होताना आपल्या बघण्यात येते. एखादा भयंकर भूकंप किंवा अक्राळविक्राळ त्सुनामी एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकते! म्हणजेच कुणाचीच परिस्थिती सदासर्वकाळ एकसारखीच असणार हे गृहीत धरता येत नाही. अशा या कधीही बदलणाऱ्या

परिस्थितीचं भान माणसानं ठेवायलाच हवं... विशेषतः आम्ही मराठी माणसांनी तरी ! कारण आपण नेहमी बघतो इतर समाजातील, उदाहरणादाखल सिंधी किंवा गुजराती बांधव बघा, कितीही हलाखीची परिस्थिती त्यांच्यातील कुणावरही आली तरी ते एकमेकांना तत्परतेने मदतीचा हात देतात. ते तुम्हाला कोणापुढे हात पसरताना आढळणार नाहीत. अन् आपला मराठी बांधव बघा... खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्याच बांधवांविरूद्ध कोर्टकचेरीच्या इतक्या चकरा मारतो की, मग पार कर्जबाजारी होऊन भिकेला लागलो तरी ते आपल्याला चालतं! अशावेळी आपण केवळ वकिलाचं पोट भरायला मदत करत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही.

    आम्हा मराठी माणसांचा एक मोठ्ठा 'प्रॉब्लेम' म्हणजे कमालीचा संकुचितपणा! मी तेली-तू माळी, मी विणकर-तू धनगर, मी कासार-तू चांभार, मी मराठा-तू ब्राह्मण असा भेदाभेद आजही झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या जगात सर्वत्र आढळतो. आमचे आपआपसातील हेवेदावे आपल्याच भरभराटीला बाधक ठरणार हा साधा विचारही आपल्या मनात कधी येत नसतो. मग 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' म्हणण्याची लाजिरवाणी वेळ आपल्यावर येऊन ठेपते! आणि हो, आपलं दुर्दैव असं की एवढा भीमपराक्रम गाजवलेले असामान्य कर्तृत्व करून अजरामर झालेले आपले थोर पुरुषसुद्धा (लोकमान्य टिळक, महात्मा फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर) आपण मराठी माणसांनीच आपल्या संकुचित व कोत्या वृत्तीने विभागून टाकलेले हल्ली दिसून येते! किती ही लाचारी...!


आपल्या आजच्या दुरवस्थेला खरंतर आपणच मराठी लोक जबाबदार आहोत. 'मराठी वाचवा, मराठी वाचवा' असा शंख करणाऱ्यांनी, मराठी माणूस कशाप्रकारे व्यापक दृष्टिकोन असलेला होईल यावर विचार करणे आवश्यक आहे. मराठी माणूस सर्वसमावेशक विचारसरणीचा, मोठ्या मनाचा व दिलदार वृत्तीचा कसा होईल ? विशाल आणि अखंड असा आपला महाराष्ट्र आहे, तेवढ्याच विशाल मनाचे आपण मराठी बांधव आहोत. 'एक ना एक दिवस आपण एक होऊन आपली ओळख जगात कायम करूया' असा संकल्प व निर्धार व्यक्त करण्यास कुणाचेच दुमत नसावे!

जय महाराष्ट्र!


... विनोद श्रा. पंचभाई

     9923797725


उमाजीराजे... मनोगत

 

उमाजीराजे... मनोगत


      शूर, पराक्रमी राजे - महाराजे यांची महान परंपरा लाभलेला आपला देश कालांतराने, ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांच्या जुलमी सत्तेच्या गुलामगिरीत जखडला गेला. त्या काळात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक महापुरुषांनी निकराचे प्रयत्न केले. कित्येक लढे उभारले गेले. चळवळी झाल्या, सत्याग्रह झाले. जुलमी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात देशभर जनसागर पेटून उठला. त्यांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी आपल्या असंख्य देशबांधवांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावली... प्रसंगी कित्येकांनी प्राणांची आहुती दिली! सशस्त्र क्रांतीची ठिणगी भडकली आणि आपल्या जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यासाठी लढणारे नीडर क्रांतिकारक उदयास येऊ लागले. क्रांतिकारक हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर नावे येतात ती हसत हसत फाशीचा दोर आपल्या गळ्यात अडकवणारे महान क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची!

      क्रांतिकारकांची ही महान परंपरा पूर्वापार म्हणजे अगदी 1857 च्या स्वातंत्र्याच्या सशस्त्र उठावापूर्वीपासून चालत आली होती. त्याकाळी प्रामुख्याने महाराजा यशवंतराव होळकर यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सशस्त्र क्रांतिलढा उभारला होता. ते ब्रिटिशांविरुद्ध तब्बल अठरा युद्धात अपराजित राहिले आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला... सलग एकही लढाई न हरणारा एकमेव महाराजा अशी त्यांनी ख्याती मिळवली होती. त्यानंतर उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिलढ्याचे जणू शिरोमणी ठरले. भारताच्या इतिहासात अनेक रक्तरंजित ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. त्यातल्या काहींची नोंद झाली तर काही घटनांची दखलच घेण्यात आली नाही. उमाजी नाईक यांनी छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान कारकिर्दीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते! त्यासाठी त्यांनी आपल्या रामोशी साथीदारांसोबत सशस्त्र क्रांतिलढा उभारून ब्रिटिशांना यशस्वीपणे टक्कर दिली आणि जवळजवळ चौदा वर्षे त्यांच्या नाकी नऊ आणले!

             दिनांक ३ फेब्रुवारी हा उमाजीराजे या आद्यक्रांतिवीराचा स्मृतिदिन... मात्र दुर्दैवाने हा स्मृतिदिन रामोशी बेरड समाजाशिवाय नेहमीप्रमाणे इतर कोणाच्याच लक्षात राहत नाही, हा केवढा दैवदुर्विलास! क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्माच्या लोकांनी केले पाहिजे, याबाबत कुणाचेच दुमत नसावे... मग आद्यक्रांतिवीर असलेले उमाजी नाईक अशाप्रकारे उपेक्षित का राहून गेले हे खरोखरच आश्चर्य वाटण्यासारखे आहे! "मरावे परि क्रांतिरूपे उरावे" ही समर्पक उक्ती सशस्त्र क्रांतिलढ्याचे महानायक ठरलेले उमाजी नाईक यांच्याबाबत अगदी तंतोतंत जुळते. ब्रिटिशांच्या विरोधात लढताना ते स्वतःच्या अ‌द्भुत क्रांतिकार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांचा गौरव करण्यापासून, त्यांचे कट्टर शत्रू असलेले इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत.

             ''क्रांतिलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक'' ही कादंबरी लिहिण्याची जबाबदारी पुण्यातील अग्रगण्य प्रकाशन संस्था असलेल्या 'प्राजक्त प्रकाशन'चे तडफदार प्रकाशक जालिंदर चांदगुडे यांनी माझ्यावर सोपवली. त्यांनी या कादंबरीला लागणाऱ्या महत्वाच्या संदर्भासाठी ज्येष्ठ साहित्यिक सदाशिव आठवले यांचा ग्रंथ 'उमाजी राजे, मुक्काम डोंगर' आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांचे 'प्राईड ऑफ स्वराज उमाजीराजे नाईक' हे पुस्तक महत्प्रयासाने उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी सर यांनी देखील काही अत्यंत महत्वपूर्ण संदर्भ पुरविल्याने ही कादंबरी पूर्णत्वास यायला मोलाची मदत झाली असे मी येथे नम्रपणे नमूद करतो. तसेच सोनवणी सरांनी ''क्रांतिलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक'' या कादंबरीसाठी त्यांच्या प्रभावी शैलीत प्रस्तावना लिहिली, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो! तसेच या कादंबरीसाठी आकर्षक मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार यांचेही खूप धन्यवाद!


... विनोद श्रा. पंचभाई, पुणे  


Wednesday, April 3, 2024

समय तू धीरे धीरे चल...

 समय तू धीरे धीरे चल !

      काही काही क्षण आपल्या आयुष्यात असे येत असतात, इतके आनंददायी असतात की वाटतं... हे क्षण आपल्यासाठी असेच थांबावेत, ही वेळ कधीच पुढे सरकू नये! खूप दिवसांनंतर येणारे असे हे आनंददायी क्षण अवर्णनीय असतात... जसे घरात होणारे नव्या बाळाचे आगमन, अथक परिश्रमानंतर मिळणारे परिक्षेतील उत्तुंग यश, मनासारखी मिळालेली नोकरी, खूप दिवसानी भेटणारा दुरावलेला आपला प्रिय मित्र, भल्या सकाळी दिसणाऱ्या सूर्योदयाचा मनोहारी लालिमा.. इत्यादी इत्यादी..!

      बोर्डाची परीक्षा सुरु असल्याने निखिलला टेन्शन होतेच. मराठीचा पहिलाच पेपर सोडवून त्याने घरात पाय ठेवला अन् ताईचा आवाज कानी पडला.. "काय म्हणतोय आजचा पेपर ? मनासारखा सोडवलास ना?"

"अगं पेपर तसा सोप्पाच होता, मला सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत असूनही वेळच पुरला नाही गं! इतक्या स्पीडने लिहूनही पुरेसा वेळ नव्हता, थोडा तरी वेळ मिळाला असता ना, तर पूर्ण शंभर गुणांचा पेपर नक्कीच सोडवला असता! दहा गुणाचा अख्खा प्रश्न मला उत्तर येत असूनही वेळेअभावी लिहू शकलो नाही याची रूखरुख वाटते, किती लवकरच तीन तास संपतात गं! असे प्रसंग आपल्या पैकी बहुतेकांवर कधी ना कधी तरी येत असतात त्यावेळी वाटतं आपल्यासाठी घड्याळाचे काटे थोडे धिम्या गतीने चालावेत !

           एखाद्या सीमेवरच्या सैनिकाला बऱ्याच कालावधीनंतर घरी जाण्यासाठी रजा मिळत असते तेव्हा त्या रजेचा कालावधी लवकर संपूच नये असे घरच्यांना वाटणे स्वाभाविक आहे. रजा संपत येते तेव्हा वाटतं, किती भराभर संपला हा अख्खा महिना ! मग वेळ खरंच कुणासाठी थांबत नाही याची खात्री पटते. घरातील कुटुंबीयांची तेव्हा चलबिचल सुरु होते पण त्याप्रसंगी तेथे भावनेला थारा नसतो! तेव्हा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरते अन् रजा संपताच आपल्या नियोजित ठिकाणी जाणे बंधनकारक असल्याने त्या सैनिकाला घर सोडावेच लागते! या भूतलावरती प्रत्येकावर काही काही प्रसंग असे ओढवतात की त्यावर काही इलाज नसतो. जसे कुटुंबीयातील अगदी जवळच्या नातेवाईकाचा अचानक होणारा मृत्यू ! त्यावेळी "अहो हे काय त्याचं जाण्याचं वय होतं? त्याला खूप शिकून मोठा माणूस व्हायचं होतं ! त्याला जीवनात बरंच काही करायचं होतं!" असे बोल आपल्या कानी पडतात. अशाप्रसंगी सगळंच जिथल्या तिथं राहून जातं अन् दुर्दैवानं कुटुंबीयांच्या आशाआकांक्षा भंगतात ! याउलट काही प्रसंग असेही येतात... कधी कधी खूपच प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या मोठ्या जीवघेण्या प्रसंगातून आपल्या प्रिय व्यक्तीची अगदी आश्चर्यकारकरित्या सुटका होते !

      जीवन हे क्षणभंगूर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण ते कशाप्रकारे जगावं याबाबत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा असणे स्वाभाविक आहे. काही काही व्यक्ती आपली कामे झटपट वेळेच्या आत व्हावीत यासाठी फारच आग्रही असतात तर काही बेफिकीर वृत्तीचे लोक "अरे यार इतनी भी जल्दी क्या है? देखेंगे कल करेंगे!" अशीही मुक्ताफळे उधळणारे असतात. अशा महाभागांना ना वेळेचे महत्त्व पटलेलं असतं ना माणसांची किंमत असते !

     आजकाल प्रचंड वाहतुकीमुळे सगळ्यांनाच आपल्या कामावर लवकर पोहचण्याची घाई असते. मग एखाद्या दिवशी अचानक कुणाचा तरी दुर्दैवानं अपघात होतो अन् ध्यानीमनी नसताना दवाखान्यात दिवस मोजण्याची त्याच्यावर पाळी येते! मग तेथे फक्त चार पाच दिवस झाले तरी त्याला वाटायला लागते... "किती दिवस झालेत इथं अडकून पडलोय आपण, हे प्लॅस्टर कधी काढणार कुणास ठाऊक? कधी सुटका होणार यातून आपली?" तेव्हा वेळ जात नसल्यामुळे त्याचा जीव अगदी मेटाकुटीस येतो अन् त्याची अवस्था अशी होते की, 'काटो तो कटते नहीं ये दिन ! रातभी गुजरती नहीं तारे गिन गिन!"

    काही वेळेस टीव्हीवरची एखादी मालिका इतकी उत्कंठा वाढवणारी असते की, वाटतं हा प्रसंग आजच पूर्ण बघायला मिळावा पण होतं काय की जेव्हां आपली उत्सुकता ताणली जाते अगदी तेव्हाच त्या दिवसाचा तो भाग (एपिसोड) संपतो! त्यावेळी सहज वाटून जातं ह्या मालिकेसाठी जास्त वेळ द्यायला हवा होता! असे बरेच प्रसंग आपल्या जीवनात सातत्याने येत असतात, जेव्हा वाटतं घड्याळाचे काटे जरा हळूहळू पुढे सरकावेत..! सायंकाळी पालक आपल्या मुलांना एखाद्या बागेत सहज विरंगुळा म्हणून घेऊन जातात. मुलंही खेळण्यात रमतात. बागेतील निरनिराळ्या खेळणीवर (घसरगुंडी इत्यादी ) तल्लीन होऊन त्यांचा खेळ सुरु असतो. मग अचानक शिट्टीचा फुर्रर्र आवाज कानी पडतो, पाठोपाठ रखवालदार ओरडतो "चला निघा वेळ संपलीय, बाग बंद करायची आहे आता!" मग त्या मुलांना साहजिकच वाटतं... आत्ताच तर आपला खेळ सुरु झाला अन् लगेच वेळ संपली, अजून थोडा वेळ खेळू दिलं असतं तर..! 

       तुरुंगात असलेला एखादा कैदी आपल्या हातून घडलेल्या कर्माचा पश्चात्ताप करत शिक्षा भोगत असतो ! तेव्हा तो एक एक दिवस मोजत असतो. त्यावेळी आपली वर्तणूक व राहणीमान तो चांगले ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो... शिक्षेत काही सुट मिळून लवकर सुटका होणार या आशेने! त्याला भेटायला तेथे जवळचे नातेवाईक किंवा मित्र वगैरे येत असतात. मग तब्येतीची विचारपूस, भेटीची औपचारिकता पूर्ण होते. अशातच घरचा डबा घेऊन त्याची प्रिय व्यक्ती भेटायला येते मग त्यांच्या गप्पा रंगतात! थोडा वेळ ते आपल्याच भावविश्वात रमतात अन् अचानक कानावर कडक आवाज पडतो..." मिलनेका वक्त खत्म हुआ है... जल्दी करो और बाहर निकलो!" तेव्हा दोघांनाही नकळत वाटून जातं..."समय तू धीरे धीरे चल...!!"

... विनोद श्रा. पंचभाई 

     9923797725



Tuesday, April 2, 2024

सच काम किया जग मे जिसने...

 सच काम किया जगमे जिसने...

       माझा एक 'टीपीकल' मित्र आहे. गजानन त्याचं नाव. सतत बडबडत राहणं, मध्येच एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणणं हा त्याचा आवडता छंद ! मित्रपरिवारात गप्पा मारताना कधी कधी त्याच्या तोंडून एक प्रार्थना हमखास आमच्या ऐकण्यात येते..." हे ईश्वरा, माझ्या सर्व मित्रांना सुख, शांती, समृद्धी लाभू दे पण सुरुवात मात्र माझ्यापासून कर..!" आता बोला, काय म्हणावं याला ? माझं एक प्रामाणिक मत आहे बघा पटतं का... आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी चांगलं काम करीत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काहीतरी चांगलंच घडत असतं... तेव्हा काम करताना आपला हेतू शुद्ध अन् निस्वार्थ असावा इतकंच !

आता हेच बघा ना, आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमीच बघतो... परीक्षेला जाणारा विद्यार्थी असो किंवा एखाद्या मुलाखतीला जाणारा युवक असो तो मनोमन हीच प्रार्थना करत असतो... 'देवा आजचा माझा पेपर सोप्पा सुटू दे, सगळं माझ्या मनासारखं होऊ दे' (मग भलेही त्या विद्यार्थ्याने पुरेसा अभ्यास केला नसेल अथवा त्या युवकाने मुलाखतीसाठी विशेष तयारी केली नसेल तरीही!) काय आहे आजकाल सगळ्यांनाच सगळं शॉर्टकट हवं असतं, जणू शॉर्टकटचं व्यसनच जडलंय हल्ली! आता यांना कोण सांगणार... 'जितना तपता है सोना उतना लेता है निखार.!' म्हणजेच तुम्ही जितके प्रामाणिक व सच्चे प्रयत्न करणार तितकं यश तुमच्या गळ्यात माळ घालणार हे निश्चित! मात्र याकडे आजकाल सोयीस्करपणे दुर्लक्षच केलं जातं, सगळ्यांनाच कळतं पण वळत नाही हेच खरं!

           श्रावण महिना आला रे आला की आपल्याकडे पूजेची किंवा सत्यनारायण पूजा घालायची लगबग सुरू होताना दिसते. मग गुरुजी किंवा भटजी यांच्याकडे तारखांचे बुकिंग करणे सुरु होते. ठरलेल्या तारखांना मनोभावे पूजा संपन्न होते. तेवढ्यापुरते मनाला समाधानही लाभते पण काही दिवसातच मनाची अवस्था परत 'जैसे थे' होतेच ना! ही झाली सर्व साधारण पापभीरू लोकांची कथा. काही महाभाग मात्र केव्हा एकदाचा श्रावण संपतो आणि कधी आपण 'गटारी' साजरी करतो याचीच वाट बघत असतात. मग असं देव देव करणं, केवळ औपचारिकता म्हणून आपल्या घरी पूजापाठ करणं व अख्ख्या सोसायटीला प्रसादाला बोलावणं याला काही अर्थ तरी उरतो का?

       वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या एका भजनात खूपच मार्मिक भाष्य केलेलं आहे..

"सच काम किया जग मे जिसने, 

प्रभु नाम उसने लिया ना लिया।"

म्हणजेच काय तर आपल्या नियमित दिनक्रमात, आपल्या रोजच्या कार्यात प्रामाणिकपणा असल्यास, आपलं रोजचं कार्य हेच ईश्वराचं कार्य समजून केल्यास मग अशाप्रकारच्या औपचारिकतेची गरज पडणार नाही. आपलं मनापासून केलेलं प्रामाणिक कार्य हीच त्या जगन्नियंत्याची खरी पूजा ठरणार यात शंकाच नाही.

हल्ली मात्र आपल्या असं बघण्यात येतं... खूप गाजावाजा करत बरेच हौशी लोक गणपती बाप्पाची स्थापना करतात. दहा- पाच मिनिटात आरती वगैरे उरकतात अन् मग पुढील दहा दिवस म्हणजे विसर्जनापर्यंत कान अगदी बधीर होईस्तोवर कर्कश्य आवाजातील गाण्यांचा भडिमार... केव्हा एकदाचं हे सगळं संपतं असंच आता सामान्यजनांना वाटायला लागलं आहे ! या दिवसात प्रत्यक्ष गणरायाला सुद्धा जीव अगदी नकोसा होत असणार नाही का? बरं विसर्जनाच्या वेळी 'गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला' म्हणणारे हेच हौशी लोक परतताना मात्र डी. जे. च्या तालावर 'झिंग झिंग झिंगाट' अशा प्रकारची बिभत्स नृत्य करताना सर्वत्र दिसतात. हीच का यांची गणेशभक्ती !!

काही विधायक कार्ये करणारीही गणेश मंडळं आपल्याकडे आहेत, नाही असं नाही; मात्र दुर्दैवानं तीही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी अत्यल्प ! काही का असेना अशा मंडळांचं कार्य खरोखरंच दखलपात्र ठरतं. गरीब विद्यार्थ्यांना, निराश्रितांना साह्य करणं, निरनिराळ्या वृद्धाश्रमात मदत पोहचवणं इत्यादी कार्य म्हणजे पूजनाहूनही श्रेष्ठ ठरतं ! याप्रकारे तळमळीने कार्य करणाऱ्या अशा मंडळांच्या कार्यकर्त्यांना मग वेगळे पूजेचे अवडंबर करण्याचे काहीच कारण नसते... त्यांना त्यांची योग्य दिशा मिळालेली असते... आपल्या ध्येयप्राप्तीची ! त्यांना प्रत्येक सजीवात आपला जिवाभावाचा परमेश्वर दिसत असतो... मग त्याचे 'नाम' घेतले न घेतले तरी काही फरक पडत नसतो. ते (नाम) कायम मनात कोरलेलेच असते !

विनोद श्रा. पंचभाई, पुणे

मो. 9923797725


Monday, April 1, 2024

अति उच्चतम जीवन बने...

 अति उच्चतम जीवन बने...

        संस्कृत भाषेत एक श्लोक आहे ज्याचा अर्थ असा आहे, "जो सकाळी उठून नियमितपणे  पाणी पितो, रात्री जेवण झाल्यावर दूध पितो व दुपारी जेवणानंतर ताक पितो त्याला वैद्याची गरज पडत नाही."अर्थात शरीर निरोगी राहण्याची ही गुरुकिल्ली होय. शरीर निरोगी असेल तर मन निरोगी राखण्यास मदत होणार यात शंका नाही. मन निरोगी, निर्मळ झाल्यास मग स्वतःसह इतरांचेही भले कसे करता येईल अशा प्रकारचे उदात्त विचार मनात आपसूकच येतील.

पण... पण जो माणूस सकाळी उठल्या उठल्याच दारूचा ग्लास हाती घेतो, त्याची मग पापांची मालिकाच जन्मभर सुरू असते, हे वेगळे सांगायला नको. आज आपण बघतो समाजात विकृती वाढत आहे. नको ती व्यसने लोक सहज गंमत म्हणून अंगीकारत आहेत. मात्र नंतर त्याची किंमत मोजताना अख्ख्या आयुष्याची कमाईसुध्दा पुरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे "व्यसने सगळी सोडुनि द्याना । सरळपणाचे जीवन जगा ना ।।" ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आर्त हाकेला आपण सगळ्यांनी 'ओ' देवून आपले जीवन उच्चतम बनवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी महाराजांनी सांगितलेली सामुदायिक प्रार्थना तसेच सामुदायिक ध्यान करणे ही आजच्या घडीला एक नवसंजीवनी ठरणार यात वाद नाही.

      प्रातःसमयी उठून, स्नान करून, शुचिर्भूत झाल्यावर "आवो सभी मिल जायके, प्रभू ध्यान धरेंगे। 'सबका भला करो' यही आवाज करेंगे ।।" हे राष्ट्रसंतांचे संकल्पगीत म्हणून आपण दिवसाची सुरूवात करू शकतो. तसेच "हे सर्वधर्म मे सर्व संत मे, समस्त संसारमे रममाण होनेवाले चैतन्यधन । हम तेरे लिये, तेरे देश के लिये, हर जीवजंतू के लिये कुटिलताका, छलछिद्रद्रोहता का त्याग करे ऐसा साहस दे।"

"हे जगदव्यापी परमेश्वर । हम हर मनुष्यमात्रसे प्रेमका, सत्यता का, बंधुत्वभावका आचरण करे और सुखः दुखमे सम रहे ऐसी हमको शक्ती दे, युक्ति दे और भक्ती दे ।" याप्रमाणे ध्यान करून आपल्या मनाला योग्य वळण लावू शकतो. त्यामुळे मनात येणारे विकारी विचार दूर पळवू शकतो. पर्यायाने आपले व आपल्या सहवासातील सगळ्यांचे जीवन सुंदरतेने सजवू शकतो.

        त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांनी सांगितलेली सामुदायिक प्रार्थना नित्यनेमाने संध्याकाळी करून आपण एक आदर्श जीवन जगू शकतो. "है प्रार्थना गुरुदेवसे, यह स्वर्गसम संसार हो । अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ।।" यापासून सुरू होणारे प्रार्थनाष्टक म्हणून त्याप्रमाणे आचरण केल्यास जगाच्या पाठीवरील कुठल्याही तीर्थक्षेत्री जाण्याची गरज कुणाला भासणार नाही. सारे जीवनच कर्ममय बनून दुसऱ्यांसाठी, दीन-दुबळ्यांसाठी आपण काहीतरी करावे ही भावना मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ३० एप्रिल हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म दिनांक. परंतु महाराजांनी 'तो' दिवस ग्रामजयंती दिवस म्हणून साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. 'गावागावाशी जागवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा' अशी राष्ट्रसंतांनी ललकारी देऊन ग्रामाचा विकास हाच राष्ट्राचा विकास ही दूरदृष्टी समाजाला दिली. गावातला बळीराजा हाच खरा देशाचा पालनकर्ता असे संबोधून 'ग्रामगीता' हा विलक्षण ग्रंथ रचून त्यास समर्पित केला. मात्र त्यांनी 'ग्रामगीता नव्हे पारायणासि' असा इशाराही दिलेला आहे. नुसती फुले वाहून ग्रामगीतेचे पारायण करू नका तर त्यात सुचविल्यानुसार त्याप्रमाणे आचरण केल्यास तुमचे जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही समस्त समाजाला महाराजांनी अत्यंत आत्मियतेने दिली आहे.

      मित्रहो, आजच्या वातावरणात आपल्याला आपले जीवन गर्तेत लोटायचे आहे की जीवन उच्चतम बनवायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. परमेश्वराने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहेच. ती सुबुद्धी समजून आपण आपले आचरण उच्चतम ठेवून जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया !

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना ग्रामजयंती दिनानिमित्त मनापासून आदरांजली वाहूया. जयगुरू !

... विनोद श्रा. पंचभाई

    9923797725


Monday, March 11, 2024

सावधान! तरुण तरुणीनो...

सावधान... तरुण तरुणींनो सावधान!

तुमच्या बाबतीत असंही घडू शकते कधीतरी!

तुम्ही फ्लॅटमध्ये राहताना प्रत्येकाने काळजी तर घ्यायलाच हवी... मात्र अचानक घरी येणारे, जाणारे अनोळखी असतील तर?

मनासारखी नोकरी करत असताना, सर्व काही नीट, व्यवस्थित सुरू असताना एका क्षणात हसत्या खेळत्या आयुष्याची राखरांगोळी होऊन जाते... कुणाशी काही देणं घेणं नसताना, ना कुणाच्या अध्यात ना मध्यात असताना एक सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या तरुणीला आपल्या बहुमूल्य प्राणाची किंमत मोजावी लागते! का घडतं असं? नेमकं तिच्याच बाबतीत असं का घडतं? कोण असतो तिचा अज्ञात मारेकरी? का संपवलं जातं तिचं सुंदर निष्पाप आयुष्य? काय रहस्य असतं तिच्या निर्घृण खुनाचं??

अशा एक ना अनेक न उलगडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी वाचा कादंबरीकार, लेखक विनोद श्रा. पंचभाई यांची नवीकोरी रहस्यमय कादंबरी..."थरार चोवीस तासातला!"