Monday, February 1, 2021

नेताजी सुभाषचंद्र बोस ... अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी

 

नेताजी सुभाषचंद्र बोस ... अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी


भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर महापुरुषांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीला लाभलेले अनमोल नररत्न होते. त्यांचं वक्तृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरची साधारण व्यक्ती आपसूकच त्यांच्याशी आणि त्यानंतर स्वातंत्र्यलढ्याशी जोडली जायची! त्याकाळी सुभाष बाबूंनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उचलायला लावणारं  आहे. म्हणूनच त्याकाळी ब्रिटिश सरकारला सुध्दा त्यांची दहशत वाटत होती! 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिनांक २३ जानेवारी १८८७ रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता.

लहानपणापासूनचं ते बंडखोर वृत्तीचे होते. शाळा शिकत असतानाच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू त्यांना मिळाले. शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. त्यामुळे त्यांच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती निर्माण झाली. वयाच्या १५-१६ व्या वर्षीच सुभाषबाबू आपल्या मित्रासोबत गुरूच्या शोधात घराबाहेर पडले होते. त्यासाठी हिमालयावर जाण्याचा त्यांचा मानस होता. त्यांनी त्या दिशेने प्रस्थानही केले होते. मात्र त्यांना काही गुरुदर्शन झाले नाही.  त्यानंतर सुभाषबाबूंनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांना आपले गुरु बनवले.

कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालय शिकत असताना एकदा इंग्रजी शिकवणाऱ्या 'ओटेन' नावाच्या शिक्षकाने  वर्गात भारतीयांना दुषणे देण्यास सुरुवात केली. ते सुभाषबाबूंच्या लक्षात येताच त्याचक्षणी ते उठून उभे राहिले आणि त्या शिक्षकाला गप्प केले. भारत आणि भारतीयांविरोधात काहीही बरळण्याचा त्या शिक्षकाला जाब विचारला आणि संप पुकारला. या कृतीमुळे सुभाषबाबूंना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. 

१९२१ मध्ये सुभाषबाबू उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. मुळातच अतिशय बुद्धिमान असलेल्या सुभाषबाबूंनी  इंडियन सिव्हील सर्व्हिसची परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी ४ था क्रमांक पटकावला होता. त्याकाळी गव्हर्नरला भेटायला जाताना सोबत छत्री घेऊन जाण्यास मनाई होती. परंतु सिव्हील सर्व्हिसची परीक्षा पास झाल्यावर नेताजींनी अशाप्रकारचा तुघलकी फतवा पाळण्यास साफ नकार दिला. त्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन भारतभूमीला स्वतंत्र करण्याच्या इराद्याने सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन सिव्हील सर्विसमधील चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीला लाथाडले. आणि ते भारतात परतले. 

भारतात परतल्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तुमध्ये राहत होते. तेथे२० जुलै१९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.गांधींजीनी त्यांना कलकत्याला जाऊन देशबंधू चित्तरंजन दास बाबूंसोबत कार्य करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कलकत्त्याला आले आणि दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले.

१९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी,कलकत्ता महापालिकेची निवडणूक  स्वराज पक्षाने लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कलकत्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कलकत्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले.या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली होती.

१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. याच सुमारास युरोपात दुसऱ्या महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. मात्र गांधीजी त्यांच्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी  कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छित होते कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे याच मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली. सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली. मात्र नंतर अंतर्गत मतभेद वाढल्याने परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 

त्यानंतर ३ मे १९३९ रोजी सुभाषबाबूंनी  'फॉरवर्ड ब्लॉक' नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले! 

नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. १६ जानेवारी १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत त्यांनी महमद झियाउद्दीन असे नाव धारण केले आणि ते पोलिसांची नजर चुकवून घरातून निसटले. सुभाषबाबूंचे ज्येष्ठ बंधू शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कलकत्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. नंतर भगतरामसोबत सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. शेवटी 'ओरलँडो मझयुटा' नामक इटालियन व्यक्ती बनून सुभाषबाबूंनी काबूलहून रेल्वेने प्रवास करत रशियाची राजधानी मॉस्को गाठले. नंतर जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहचले.

बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप इत्यादी
जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व 'आझाद हिंद रेडिओ'ची  स्थापना केली. याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले. काही दिवसांनी म्हणजे २९ मार्च १९४२ रोजी सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर यांना भेटले. पण हिटलरला भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांने सुभाषबाबूंना सहकार्याचं कोणतंही स्पष्ट वचन दिलं नाही. शेवटी सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे ८ मार्च १९४३ रोजी जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह एका जर्मन पाणबुडीत बसून  पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. या  जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथून त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत जपानी पाणबुडी गाठली. ही पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली. तेथे सुभाषबाबूंना वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस भेटले. नंतर त्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले. नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद 'डायट' समोर भाषण केले.

 २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनी सिंगापुरात 
अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी स्वतः आझाद हिंद सेनेचे सरसेनापती बनले. आझाद हिंद सेनेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. या आझाद हिंद सेनेत स्त्रियांसाठी 'झाँसी की रानी' रेजिमेंटही बनवली गेली. पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा' असा नारा दिला! 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद सेनेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी 'चलो दिल्ली' अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली. 
आझाद हिंद सेना माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

      ६ जुलै १९४४ रोजी आझाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरीचे होते. मग त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या "दोमेई" या वृत्तसंस्थेने जगाला कळवले की,  "१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले! अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या!"

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे!! 

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे! 

या थोर महापुरुषाने... नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला “जय हिंद” चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. जय हिंद!! 
नेताजींच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे. 
९९२३७९७७२५

"टुट सकते है, मगर झुक नहीं सकते!"

 

"टुट सकते है, मगर झुक नहीं सकते!"


एका गावात एक म्हातारी तिच्या झोपडीत राहत होती. तिच्याजवळ एक कुत्रा होता. रात्रीच्या वेळी अचानकपणे काही चोर त्या झोपडीत शिरले. त्याबरोबर कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. त्यामुळे आजूबाजूचे लोक जागे झाले आणि त्यांनी चोरांना पकडले. ही सर्व वस्तुस्थिती न्यायनिवाड्यासाठी राणीच्या समोर आली. राणीने कुत्र्याला कारागृहात ठेवण्याचा आदेश दिला आणि चोरांना सोडून दिले. अशा या विचित्र न्यायनिवाड्याने अचंबित झालेल्या म्हातारीने राणीला विचारलं, "कुत्र्याला कारागृहात का टाकले? आणि चोरांना का सोडले? " त्यावर राणीने उत्तर दिलं, "या राज्यात कोणीही आवाज, गोंधळ, आरडाओरडा करता कामा नये. या आदेशाचे पालन कुत्र्याने न केल्याने त्याला जेलमध्ये टाकले आहे. आणि चोरांनी मात्र कोणताही आवाज न करता आपले काम केलेले असल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले आहे."
त्यावर नाराज होत म्हातारी म्हणाली, "कुत्र्याने भुंकणे, इतरांना जागे करणे हे तर त्याचे कर्तव्यच आहे."
"माझ्या राज्यात कुत्र्यांना भुंकण्याची परवानगी नाही. त्याने केवळ शेपटी हलवत, गोंडा घोळवत मालकाची सेवा करावी हेच अपेक्षित आहे." राणी म्हणाली.
वरील संवाद कुण्या कथा, कादंबरीतील नाहीत तर आपल्याच स्वतंत्र वैभवशाली देशात क्रौर्याची परिसीमा गाठणार्या अणीबाणीच्या काळात मुंबईत ठिकठिकाणी रूपकात्मक सादर केलेल्या पथनाट्यातील आहेत... आणि हे जळजळीत वास्तव 'अणीबाणी लोकशाहीला कलंक' या आपल्या पुस्तकातून मांडलंय त्याकाळी 'मिसा' कायद्यान्वये तुरूंगवास भोगलेल्या लेखक विजय जोशी यांनी!  अणीबाणीच्या काळात त्यांना आलेल्या थरारक अनुभवावर त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून लेखन केलं आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानुसार श्रीमती इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये लढवलेली लोकसभा निवडणुक अवैध ठरवली गेली होती. तसेच पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याने पंतप्रधानपदी राहताच येणार नव्हतं. त्यामुळे इंदिरा गांधींनी ताबडतोब राजीनामा देणे हेच सर्वसामान्य जनतेला अपेक्षित होतं. मात्र आपले पद कुठल्याही परिस्थितीत जाऊ द्यायचे नाही ही ठाम भूमिका घेऊन त्यांनी २५ जून १९७५ च्या मध्यरात्री अणीबाणीच्या प्रस्तावावर राष्ट्रपतींची सही घेऊन आपल्या देशावर अणीबाणी लादली! त्यानंतर २६ जूनच्या पहाटेपासूनच जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मोरारजी देसाई, मधु दंडवते इत्यादी विरोधी पक्षनेत्यांची धरपकड सुरू करून त्यांना अटक करण्यात आली. खर्या अर्थाने हा स्वातंत्र्यावरच घाला होता. वृत्तपत्रे, विरोधी पक्ष, न्यायसंस्था, संघ संस्था, विद्यार्थी, मजूर आदी सर्वांचेच स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. सर्वसामान्य लोकांनाही हळूहळू एकंदरीत परिस्थितीची कल्पना येऊ लागली. काही दिवसातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. मग 'मिसा' या जुलमी कायद्याअंतर्गत अणीबाणीचा विरोध करणार्यांवर बडगा उभारणे सुरू झाले. कसलीही चौकशी न करता कित्येक निरपराध लोकांना पकडून तुरुंगात डांबण्यात आले. ं

अचानक सुरू झालेल्या या मुस्कटदाबीच्या विरोधात लोक संघटित होऊ लागले. या पुस्तकातील 'दमनचक्राचा प्रभाव' या प्रकरणात लेखकांनी त्याकाळी उद् भवलेल्या परिस्थितीचे प्रभावीपणे वर्णन केले आहे. गुप्त पत्रके काढणे, पोस्टर्स तयार करणे, रूपक कथा सांगून जनजागृती करणे, मंदिरामंदिरातून महाआरत्यांच्या निमित्ताने लोकांना संघटित करणे असे कितीतरी प्रयोग सातत्याने केले जात होते. या प्रकरणातील 'एसेम' यांचे पुढील बोल पुरेसे बोलके आहेत... नागपूर येथे साने गुरुजी कथामालेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एस. एम. जोशी यांनी हा विषय प्रभावीपणे मांडला होता. त्यांनी भरगच्च सभागृहात आपल्या भाषणातून सांगितले, "हुकूमशाहीच्या पहिल्या आघातानं लोकशाहीशक्ती नामोहरम झाल्यासारख्या होतात हा जगातला सर्व ठिकाणचा अनुभव आहे. पण एकदा का लोकशक्ती जागृत झाली की हुकूमशाहीची जबरदस्त आणि जुलमी ताकतही या जागृत लोकशक्तीपुढे टिकाव धरू शकत नाही. म्हणून आजच्या परिस्थितीत सर्वांनी निर्भय राहण्याची गरज आहे."

'युवकांचा सहभाग' या प्रकरणातील शैक्षणिक क्षेत्रातील दहशत, 'निर्भय बनो'चा आधार, सत्याग्रहाचा देशभर वणवा इत्यादींचं वर्णन तर आजच्या युवावर्गानं वाचलंच पाहिजे...जेणेकरून त्यांना त्याकाळच्या परिस्थितीची जाणीव करता येईल. तसंच 'अनन्वित अत्याचार' या प्रकरणात नमूद केलेल्या घटना वाचताना अक्षरश: अंगावर काटा उभा राहतो! जुलमी इंग्रजांनाही लाजवतील असे अनन्वित अत्याचार निरपराध सत्याग्रहींवर अणीबाणीच्या काळात करण्यात आल्याचा आवर्जून उल्लेख लेखकांनी या पुस्तकात केला आहे. विवस्त्र करून यातना देणे, उपाशी ठेवणे, सिगारेटचे चटके देणे, उलटे लटकावणे, गुप्तांगात दंडा घुसवणे डोळ्यात आणि गुप्तांगात लाल मिरची पावडर टाकून छळ करणे, हातापायाची नखं उपटून काढणे, विजेचे शाॅक देणे, विवस्त्र करून बूटाने तुडवणे इत्यादी अघोरी प्रकार तुरूंगातील पोलीस बिनदिक्कतपणे करायचे. या स्वकियांपेक्षा इंग्रज तरी बरे होते असं म्हणण्याची पाळी त्यावेळी सत्याग्रहींवर आली होती. त्याचवेळी दिल्लीच्या आयुर्विज्ञान संस्थेत उपचार घेत पडून असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वांना उद्देशून तुरुंगात पत्र पाठवल्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. पत्रासोबत अटलजींची मनोधैर्य वाढवणारी पुढील प्रभावी कविताही होती ...
"दांवपर सबकुछ लगा है, रूक नही सकते...
   टुट सकते है मगर, झुक नहीं सकते!!"

बीड, परभणी, नांदेड, सोलापूर, कुलाबा, ठाणे, पुणे, जळगाव, नागपूर, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होत असलेल्या सत्याग्रहाचं व त्याठिकाणच्या तुरुंगातील ह्रदय द्रावक प्रसंगांचं वर्णन लेखकांनी या प्रकरणात रेखाटलं आहे. तसंच काही ठिकाणी पोलिसातील माणुसकीचा प्रत्यय आल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे. अणीबाणीच्या काळात देशभरात सुमारे दोन लाखाहून जास्त सत्याग्रहींना स्थानबद्ध करण्यात आलं होतं! या सगळ्यांना कारागृहात खितपत ठेवून 'मिसा' चा वापर करण्यात आला. खरंतर त्यावेळची परिस्थिती अत्यंत खडतर होती. काही सत्याग्रही अन्नपाणी आणि औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू पावले होते!

'लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते आणि विकृतीस प्रारंभ होतो!' हे विधान आहे दिनांक ६ ते ८ डिसेंबर १९७५ रोजी कराड येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाबाई भागवत यांचे! वृत्तपत्रांवर लादलेली सेन्साॅरशिप , नागरिकांच्या सप्त स्वातंत्र्याचा गळा घोटल्यामुळे साहित्य संमेलनात काय होणार ही उत्सुकता, अणीबाणीच्या काळात जनजागृती करण्याबाबत साहित्यिकांची भूमिका हे सगळं 'दुर्गाबाईचा दुर्गावतार' या हटके प्रकरणात आपल्याला वाचायला मिळतं.
लेखक विजय जोशी यांनी अणीबाणीच्या कटु आठवणींना उजाळा का दिला असा प्रश्न सामान्य जनांना पडू शकतो. त्याचं अतिशय चपखल उत्तर हवं असल्यास आजच्या पिढीतील प्रत्येकानं 'अणीबाणी लोकशाहीला कलंक' हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. सरळसाधी, सोपी, प्रवाही भाषा हे या पुस्तकाचं बलस्थान आहे. त्यामुळे वाचताना कुठेही कंटाळवाणं होत नाही. उलट लेखकांनी रेखाटलेले अनुभव वाचताना 'आपल्या देशात असंही घडलं होतं!' हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. अणीबाणी म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारं काळंकुट्ट पर्व होतं असंच म्हणावं लागेल! आता तो इतिहास झाला तरी दुर्लक्षित करता येणार नाही!

चपराक प्रकाशनचे जिंदादिल प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांच्या आग्रहानं आणि पुढाकारानं 'अणीबाणी लोकशाहीचा कलंक'ची निर्मिती झाल्याचं लेखकांनी त्यांच्या मनोगतात आवर्जून सांगितलं आहे. तसंच या पुस्तकाला घनश्याम पाटील यांचीच प्रभावी, परखड अशी प्रस्तावना लाभली आहे. चित्रकार संतोष घोंगडे यांनी अतिशय समर्पक व आकर्षक मुखपृष्ठ चितारलं आहे. एकंदरीतच हे पुस्तक, वाचकांनी अमूल्य ठेवा समजून जपून ठेवावा असंच झालं आहे... जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला सुध्दा देशात घडलेल्या काळ्या कुट्ट पर्वाची जाणीव होईल. लेखक विजय जोशी यांना पुढील लेखनासाठी मनापासून शुभेच्छा!!

विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे
भ्र. क्र. ९९२३७९७७२५


काळीज गोंदण'... काळजातून उमटलेलं वास्तव

 

'काळीज गोंदण'...
काळजातून उमटलेलं वास्तव!

"मुखवट्याच्या जगात वावरताना कितीतरी नागडी माणसं आपल्याला भेटतात. अंगावर भरजरी कापडं ल्यालेली नागडी माणसं! कधीकधी तर असं वाटतं, या नागड्यांच्या जगात आपण एकटे कसे अपवाद राहावे...?
किती लावावीत दारे?
सारे उघडे उघडे!
कसे झाकावे कशाला?
सारे नागडे नागडे...! "
अशाप्रकारचं विदारक वास्तव मांडलंय लेखक किरण लोखंडे यांनी आपल्या 'काळीज गोंदण' या आजच्या तथाकथित विचारवंतांनाही विचारात पाडणार्या आपल्या अनोख्या पुस्तकातून... अनोख्या शैलीतून!

काळीज पिळवटून टाकावे असे दाहक प्रसंग, पांढरपेशा समाजाचं वास्तववादी चित्रण या पुस्तकाच्या पानापानातून लेखकानं रेखाटलं आहे. 'कौलातून सांडलेल्या कवडशाचा काजळव्रण' या पहिल्याच लेखातून त्यांच्या ठसठसत्या अपमानाचा चिरंजीवी दाह आणि भोगलेल्या गरिबीच्या अक्षय वेदना वाचताना वाचक नखशिखांत हादरल्याशिवाय राहत नाही! 'माणूस जन्माला का येतो आणि जगतो कशासाठी? ' असा रोखठोक सवाल त्यांनी 'अंतिम सत्याच्या शोधात हरवलेलं ब्रह्म' या लेखातून विचारला आहे. तसंच 'वंशवृद्धीच्या आम्हीला धुंडाळताना... ' या लेखातून नुकतेच लग्न झालेल्या लेखकाची जीवघेणी तगमग प्रकर्षाने जाणवते!

'फुई' म्हणजे लेखकाची मोठी बहीण. तिचं हात माथ्यावरून फिरवून स्वतःच्या कानशिलाजवळ नेऊन बोटं मोडून दृष्ट काढणं, 'आला बाई माझा नन्न्या' असं म्हणून कौतुक करणं... अशी नितांत माया करणारी फुई अचानक हे नश्वर जग सोडून जाते! हे 'नन्नाच्या चेहर्यावरले फुईचे सायीचे हात'मधील वर्णन वाचताना वाचकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवते! त्याचप्रमाणे 'सूर्याच्या सातव्या घोड्याची नाल' या लेखातून पूजा घालणार्या भगताची विकृती वाचताना मन सुन्न होते.

'पदरातल्या आभाळातला उष्टा चांदाचा तुकडा' मधून मुंबईच्या कामाठीपुर्यातील जळजळीत वास्तव लेखकानं या पुस्तकाच्या माध्यमातून रेखाटलं आहे...
"पदर लहान लहान होत गेला
ती मोठी मोठी होत गेली!
अंग झाकायच्या पदराची
गोधडी अपुरी पडत गेली!
डोक्यावरचा पदर फाटत गेला
अन् तिला मात्र पदर आला!
वासनेचा साप पदरात
गरळ ओकत गेला!
कुंवारपणातच पदर गर्भार राहिला
लाचार पदराशी कोणी गाठ बांधली नाही!
पदर लाचार झाला होता
पदराचा तिरंगा
कामाठीपुर्यात डोलू लागला होता!
आता पदरानं पदराला जन्म दिला आहे
वासनेच्या सापाला
आणखी एक पदर मिळाला आहे! "

'घरात माय अन् दारात गाय जिथं असेल तिथं खरंच गोकुळ असतं' अशी लेखाची सुरुवात करून 'शेवरी' गायीसोबतचं आपलं अल्लड बालपण लेखकानं अशा काही आगळ्यावेगळ्या शैलीत मांडलंय की वाचकांचं मन हेलावल्याशिवाय राहत नाही! या लेखात शेवटी ते म्हणतात... ''शेवरी गेली... मायचे डोळे धुरात वाहून गेले! कुडाचं घर पाडून सिमेंटचं घर बांधलं गेलं. पण शेवरी नसल्यानं नव्या घराचं गोकुळ काही झालंच नाही! "

''साकी तेरा मयखाना
जरा खोल के रखना
शायद जन्नत की हवा
हमें रास न आए.... "
'आयुष्याचं ओझं मनावर चढलं की मग पायात ठसठशीत साखळदंड बांधल्याचा जो भास होतो त्यातून सुटका व्हावी म्हणून मग जे मार्ग आपण शोधतो त्यात मद्यानं बेहोष होण्याची दीर्घ नव्हे प्रदीर्घ अशी एक अवस्था असते!' या प्रदीर्घ वाक्यानं सुरूवात केलेला 'साकीच्या प्याल्यातील भान' हा लेख लेखकाचं निराळंच भावविश्व उलगडत जातं. त्यांना बरेच अनुभव आल्यानंतर शेवटी काय दिसावं... त्या दारूच्या ग्लासात होते आईचे व्याकूळ डोळे... हादरलेल्या बापाचं काळीज, कोलमडून पडणार्या घराच्या भिंती, वादळानं उडालेलं छप्पर, दारुड्या नवर्याला वैतागून गल्लीतल्या बाईनं घेतलेला गळफास अन् तडफडणारी पिलं! मी तो प्याला बाजूला सारला. काय करीत होतो मी? घरातून जे औदासीन्य घालवायचं त्यालाच कवटाळत बसलो. साकीच्या त्या प्याल्याचं मला भान आलं! आजपासून दारूला स्पर्श करायचा नाही असं म्हणत तेथून उठलो." हे सगळं वाचताना वाचकांची मती गुंग होते आणि हे लिहिताना लेखकाच्या त्यावेळच्या अवस्थेची कल्पना येते.

'पच्चास पैसा जब पेटसे गाना गाए' या लेखातून रेल्वेच्या डब्यात गाणी गात आपला चरितार्थ चालवणार्या कलाकारांच्या व्यथा, वेदना वाचताना मन विदीर्ण होतं! 'पाऊस असा कोसळला' मधील लेखकाची भावावस्था कळते तर 'माझा हरवलेला पाऊस' या लेखातून ते आपल्या अंतरीच्या वेदना मांडताना दिसतात! 'नासवलेली बाय अन् आभाळाची माय' मधील थरकाप उडवणारं वर्णन, 'भिंतीवर चिकटलेली स्वप्नांची लक्तरं' लेखातील दाहक अनुभव, 'चांदणसखी' च्या माध्यमातून व्यक्त केलेली विफल प्रेमाची अभिव्यक्ती, 'बाप्पाबरोबर विरघळलेला देह' मधून मांडलेले बोलके संवाद, 'गोदामाई'चं अप्रतिम वर्णन वाचताना खर्या अर्थानं 'काळीज गोंदण' ची उंची जाणवते..!

'काळीज गोंदण' पुस्तकातील एकूण तेवीस लेख अतिशय मर्मभेदी आणि पाषाणह्रदयी माणसालाही निश्चितच पाझर फोडणारे आहेत. या सर्वच लेखातून प्रकटलेली भाषा अत्यंत प्रवाही असून अधूनमधून पेरलेल्या समर्पक अशा काव्यपंक्ती लेखनाचं सौंदर्य वाढवतं. एकंदरीतच हे पुस्तक एक संग्राह्य कलाकृती ठरणार यात शंकाच नाही. त्यामुळे रसिक वाचकांनी 'काळीज गोंदण'च्या वाचनाचा अवश्य लाभ घ्यावा असं आवर्जून म्हणावसं वाटते. एवढी अप्रतिम कलाकृती प्रकाशित करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल 'चपराक प्रकाशनचे' घनश्याम पाटील यांना तहे दिलसे शुक्रिया! तसेच लेखक किरण लोखंडे यांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखनकार्यास अनेक अनेक शुभेच्छा!!

विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे.
भ्र.क्र.९९२३७९७७२५