या जगात प्रत्येकावरच कधी ना कधी अशी वेळ येते, की त्यावेळी त्याला खूप एकटं एकटं वाटतं! जगण्यातच राम वाटत नाही... कुणाचं काही ऐकून घ्यावसं वाटत नाही अन् कुणाशी बोलावंसंही वाटत नाही. अशावेळी कुणी मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, कोणीही आपला वाटत नाही. सगळं जगच परकं वाटतं.!
अशा या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी सुदैवानं कोणी आपल्याला समजून घेणारं भेटलं, तरच आपली 'नैया' पार होऊ शकते..! त्याचप्रमाणे आपल्या दु:खाच्या प्रसंगी जवळचा कोण, परका कोण याचीही खरी ओळख होत असते. एक प्रसंग येथे मुद्दाम नमूद करावासा वाटतो... जवळचे एक नातेवाईक गंभीर आजाराने त्रस्त असल्याने त्यांना एका नामांकित दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टर त्यांचे व्यवस्थित उपचार करत होते. त्यावेळी त्यांच्या संपर्कातील बरीच मित्रमंडळी भेटायला यायची. तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांशी काहीतरी वाद किंवा मतभेद असल्याने त्यांच्याशी न बोलणारे सुद्धा त्यांना भेटायला यायचे. ते बघून खरोखरीच त्यांचं कौतुक करावंसं वाटलं. मात्र अशाप्रकारच्या घटना अपवादानेच बघायला मिळतात.
लग्न समारंभ किंवा इतर सुखद प्रसंगात आप्तस्वकीय, नातेवाईक इत्यादी एकत्र येत असतात. त्यावेळी तेथे गप्पांंना ऊत आलेला असतो. मग त्याठिकाणी हजर न राहू शकलेल्या नातेवाईकांबद्दल
बरीच चर्चा होते. काही लोक त्यांंच्या कागाळ्या करणे तसंच ते कसे वाईट आहेत याचंच चर्वितचर्वण करताना दिसतात. मग त्या ठिकाणी नसलेल्या 'त्या' नातेवाईकांच्या स्नेहीजणांच्या कानावर ही गोष्ट पडते आणि वादविवाद सुरु होतात. कधीकधी तर आपसातील वाद इतके विकोपाला जातात, की हमरीतुमरीवरुन मारामारीचे प्रसंगही उद्भवतात! अशाप्रकारच्या निरर्थक वाद घालण्याला खरंतर काहीच अर्थ नसतो. उलट त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या इतर निमंत्रित लोकांचे मनोरंजन होते! असे वाद सामंजस्याने टाळलेही जाऊ शकतात, पण कुणीही पुढाकार घेण्यास तयार नसतो.
दुर्दैवाने आपल्या मित्रांपैकी किंवा नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीचे निधन होते! अशावेळी बरेच ओळखीचे तसेच अनोळखी लोक सुद्धा त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र येतात. त्यांचे जवळचे जिवाभावाचे मित्र गोळा होतात. तसेच त्यांच्यासोबत शत्रूप्रमाणे वागणारे लोकही तेथे उपस्थित असलेले दिसतात. अशा प्रसंगात आपसातील मतभेद विसरून, आपसात चर्चा करून तो प्रसंग निभावून नेताना आपल्या बघण्यात येते. त्यावेळी आपसात न बोलणारे सुद्धा भूतकाळ विसरून सलोख्याने वागताना दिसतात.
याठिकाणी सांगण्यासारखा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की आपण फक्त दु:खाच्या प्रसंगी किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगीच आपसातील मतभेद विसरून अगदी सामोपचाराने वागतो. त्याचप्रमाणे नेहमीसाठी जर गोडीगुलाबीने राहिलो तर आपलं जगणं किती सुखकर होईल हाही विचार व्हायला हवा. मतभेद तर प्रत्येक ठिकाणी असतातच. ते शांतपणे सोडवलेही जाऊ शकतात. आवश्यकता आहे , आपला अहम् पणा सोडून पुढाकार घेण्याची! कुणीतरी एकाने जर नम्रपणे पुढाकार घेतला तर सगळ्या प्रक्रिया सहज घडू शकतात. नंतर सामंजस्याने चर्चा करून त्यावर निर्णायक तोडगा निश्चितच काढला जाऊ शकतो. अगदी क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद नक्कीच टाळता येतात..!
No comments:
Post a Comment