पर्यावरण ...गंभीर समस्या
उपनिषदात एक कथा आहे... एक मानवी शरीर असतं. त्या शरीराला डोळे, कान, हात, पाय असे विविध अवयव असतात. काही दिवसांनी या अवयवाचा अहंकार जागृत होतो. त्यांना वाटतं, आपल्यामुळेच हे अख्खं शरीर काम करतं. डोळ्यांना वाटतं, माझ्यामुळेच हे शरीर बघू शकतं. मी नसलो तर शरीर काम करणार नाही. कानांना वाटतं... माझ्यामुळेच शरीर ऐकू शकतं, मी ऐकणं बंद केलं तर शरीर काम करणार नाही. हातांना वाटतं, मीच सगळी कामे करतो. माझ्यामुळेच शरीराचं कामकाज चालतं. तसेच पायांना वाटतं, मीच सगळ्या शरीराचा भार सोसतो. त्यामुळे माझ्याशिवाय शरीर काम करूच शकत नाही. अहंकाराने पीडित सगळे अवयव काही दिवसातच आपापली कामे करणं बंद करतात. शरीर अगदी निपचित पडून राहतं. शेवटी शरीरात उरतो, तो फक्त प्राण ! मग प्राणालाही वाटतं, आता या निपचित पडलेल्या शरीरात आपला काय उपयोग? क्षणार्धात प्राण सुद्धा शरीराचा त्याग करून निघून जातो, आणि शरीर मृतप्राय होतं !
उपनिषदातील या कथेप्रमाणेच आपल्या या सुंदर निसर्गाचा, जीवसृष्टीचा "प्राण" पर्यावरण आहे! एक काळ होता, सम्पूर्ण जगात नैसर्गिकरीत्या पर्यावरणाचा समतोल राखला जायचा. त्यावेळेस भरपूर वनसंपदा, मुबलक पाणी, आरोग्यसंपन्न हवा हे सर्वत्र उपलब्ध असायचे. त्यामुळे शेती करणारा बळीराजा सुखी, समाधानी होता. कारण त्याला त्यावेळी आपली शेती मनाप्रमाणे करता येत होती. सगळीकडे सुजलाम् सुफलाम् असं आल्हाददायक वातावरण होतं ! एकंदरीतच सर्वसामान्य माणूस तणावविरहित आणि आनंदी होता. मात्र आज परिस्थिती अशी आहे की, शहरीकरणामुळे आणि झपाट्याने वाढलेल्या औद्यौगिकरणामुळे पर्यावरणाचा समतोल खूपच ढासळला आहे. छोट्यामोठ्या सर्वच शहरात तसेच अगदी खेडेगावात सुद्धा वाहनांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे वायुप्रदुषण, ध्वनीप्रदूषण कमालीचे वाढले आहे. आज ग्रामीण क्षेत्रातील परिस्थिती पण फारशी आल्हाददायक नाही. कारण पावसाच्या अभावामुळे म्हणा किंवा जलस्रोत खूप कमी झाल्याने आजकाल शेतकर्यांच्या मनासारखी शेती होताना दिसत नाही. सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलेलं दिसून येते. त्यामुळेच खेड्यातील लोकांचा ओढा शहराकडे धाव घेत आहे. आजची ही भिषण परिस्थिती पर्यावरणाचा समतोल ढासळल्यानेच उद्भवली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
बेसुमार जंगलतोड, अनेक शहरांतील रस्त्यावरील मोठमोठी झाडे तोडणे तसेच शहराच्या आसपासच्या डोंगरावरील वनसंपदा नष्ट करून सिमेंटचे जंगल वाढवणे म्हणजेच मोठया इमारती उभारणे हीच पर्यावरणाचा -हास होण्याची प्रमुख कारणे सांगता येतील. या गंभीर परिस्थितीमुळेच पाऊस पडण्याचं प्रमाण सुद्धा खूपच कमी झालं आहे. पर्यायाने तापमान वाढीचा धोका निर्माण झाला आहे. हे सगळं कुठंतरी थांबवण्याचा आपण आज ध्यास घ्यायला हवा. आपण सर्वसामान्य लोकांनी सर्वत्र जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवण्यासाठी संघर्ष करायला पाहिजे. हीच काळाची गरज असल्याचं लक्षात घेऊन पर्यावरणाच्या दृष्टिने आपलं दायित्व आपणच पार पाडणं आवश्यक आहे
येणार्या काळात आपल्याला पर्यावरणाच्या बिकट समस्यांना सामोरं जाण्याचा मोठा धोका संभवतो आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला शुध्द प्राणवायू मिळणार की नाही ही शंकाच आहे. कुणी सांगावं, कदाचित उद्याच्या काळात आम्हाला 'आक्सिजन मास्क' सुद्धा वापरावे लागणार असं वाटतं! दुर्दैवानं अशाप्रकारची समस्या उद्भवली तर हे आक्सिजन मास्क सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नसणार हे मात्र नक्की. कारण आक्सिजन मास्क वापरणे ही बाब अत्यंत खर्चिक असणार आहे. त्यामुळे भविष्यातील येणारे धोके ओळखून आपण आजपासूनच आपल्या समाजापुढे आपल्या कृतीतून एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला जागोजागी वृक्षारोपण करत असतानाच पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याची सवय लावण्याचा संकल्प पण करावा लागणार आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सामान्य नागरिक स्वयंस्फूर्तीने बर्याच गोष्टी करु शकतो. जसे ... आपल्याला कुठं जवळपास जायचं असल्यास स्कूटर अथवा बाइकचा वापर न करता चालत जाण्याची सवय लावायला पाहिजे. ऊठसूट गाडी किंवा चारचाकीचा वापर टाळायला हवा, जेणेकरून प्रदूषण कमी होण्यास मदतच होईल. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्या, पालिथीनचा वापर न करता आपण कापडी पिशव्या वापरण्याचा ध्यास घेणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच समजायला हवे ! यासाठी सर्वत्र जनजागृती करता येऊ शकते. आपल्या जीवनातून प्लॅस्टिकला हद्दपार करण्याचा ध्यास प्रत्येकानं घेण्यासाठी आपण कसोशीनं प्रयत्न करायला हवे. त्याची सुरुवात आपल्यापासूनच करणे गरजेचे आहे. आपण फक्त स्वतःपुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आपल्यावर येऊन ठेपली आहे, याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा!
आपले तसेच या सृष्टीतील तमाम प्राणीमात्रांचे अस्तित्व टिकवण्यासाठी, आपल्याला सुदैवाने मिळालेले हे अमूल्य जीवन जगण्यासाठी आपण सर्वच पर्यावरणावर अवलंबून असतो. आपल्याला श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. पोटासाठी अन्नपाणी लागते. राहण्यासाठी घर लागते, वस्त्र लागते. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणापासूनच मिळतात. त्यामुळे पर्यावरणाला होणारा धोका वेळीच ओळखून आपण आपापल्या परीनं प्रयत्न करण्याची आज नितांत गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे, याचे भान ठेवून, तसा ध्यास घेऊन आपण आपले दायित्व पार पाडण्याचा पक्का निर्धार करूया!
विनोद श्रा. पंचभाई
तपोवन सोसायटी,वारजे, पुणे
भ्र.क्र. ९९२३७९७७२५
No comments:
Post a Comment