हजार धागे सुखाचे
माणूस संवेदनशील अन् भावनाप्रधान असला की त्याचे विचारही भावस्पर्शी आणि मनाचा ठाव घेणारे असतात. लेखक किरण सोनार यांच्या बाबतीत असंच काहीसं त्यांच्या कथा वाचताना जाणवतं! त्यांचा 'हजार धागे सुखाचे' हा कथासंग्रह नुकताच पुण्यातील 'चपराक' प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आला. यात वेगवेगळ्या पठडीतील आणि 'हटके' म्हणता येतील अशा एकूण आठ कथांचा समावेश करण्यात आला आहे.
'पोरका बाप' ही पहिलीच कथा वाचताना ती मनाला चटका लावून जाते आणि वाचक अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही! या कथेतील अण्णा आणि प्रवीणचे संवाद आपल्याला अस्वस्थ करतात. 'अनमोल श्वास' ही कथा वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चांगलीच यशस्वी ठरली आहे . या कथेतील दुकानमालक असलेला योगेश छोट्या स्वामीला कुत्र्याचं पिलू फुकट द्यायला का तयार होतो याची उत्सुकता वाचताना जाणवते. 'इरपाची लढाई' ही नक्षलवादाच्या दाहकतेवर बोट ठेवणारी कथाही आपल्या मनाचा ठाव घेते! यातील लालू मडावी आणि त्याचा मुलगा इरपा यांचं पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात जणू 'सँडविच' होतं. 'इकडे अाड तिकडे विहीर' अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवते. मात्र इरपाच्या पुढाकारानं गावकऱ्यांच्या श्रमदानातून शेततळं बांधण्याचं कार्य पूर्णत्वास जातं! या कथेच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागातील स्थानिक लोकांसाठी एक सकारात्मक आशावाद लेखकानं फुलवला आहे.
सुख, समाधान, आनंद आणि याच्या विपरीत गोष्ट म्हणजे दु:ख! या चार गोष्टी भोवतीच आपलं अख्खं आयुष्य आपण जगत असतो. तसं पाहिलं तर सुख, आनंद आणि समाधान हे तिन्ही शब्द जवळपास सारखेच वाटतात मात्र तसं अजिबात नाही. एखाद्या गोष्टीमध्ये सुख वाटत असलं तरी त्यापासून समाधान प्राप्त होईलच असं नाही! किंवा एखादी आनंद देणारी घटना सुख देईलच असंही नसतं. सुख आणि आनंद हे क्षणिक असतं मात्र समाधानाचं तसं नसतं! काही काही गोष्टीपासून मिळणारं समाधान हे चिरकालही टिकू शकतं. नेमका अशाप्रकारचा सकारात्मक भाव 'हजार धागे सुखाचे' या कथेतून लेखकानं अतिशय परिणामकारक रीतीने मांडला आहे. तसंच या कथासंग्रहातील 'अनपेक्षित पाऊल वाट' मधून दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. 'नजरेतून शिक्षा', 'शाळेची खिचडी', 'स्कार्फवाली बाई' या कथाही वाचनीय ठरल्या आहेत. एकंदरीत 'हजार धागे सुखाचे' हा कथासंग्रह अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरला आहे.
प्रभावी संवाद आणि उत्कंठा वाढवणारी लेखकाची भाषाशैली या कथासंग्रहाच्या निश्चितच जमेच्या बाजू आहेत. 'हजार धागे सुखाचे' साठी ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड यांची सुरेख प्रस्तावना लाभली आहे. तसंच प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांनी प्रभावी पाठराखण लिहिले आहे. "माध्यमाच्या रूपाने होणारी निर्मिती बहुतेक वेळा अल्पकाळ टिकणारी असते तर साहित्य निर्मिती दीर्घकाळ टिकते. अर्थात साहित्य निर्मितीची ठिणगी पेटविण्याचे काम माध्यमेच करीत असतात हे तेवढेच सत्य आहे." असे विचार लेखकानं आपल्या मनोगतात मांडले आहेत.
'हजार धागे सुखाचे'
'चपराक' प्रकाशन
पृष्ठे -- ८०
किंमत -- ₹ १०१/-
No comments:
Post a Comment