Friday, September 30, 2022

नवरात्र... महात्म्य आणि उद्देश


देवीची रूपे ---

१) शैलपुत्री ... देवीचं पहिलं रूप शैलपुत्री! शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ निश्चयता येण्यास मदत होते. भटकणारं मन देवीच्या या रूपाच्या स्मरणामुळे खंबीर, निडर अन् शांत होतं! 

२) ब्रह्यचारिणी ... ब्रह्यचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होतं. आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्यचर्याचे गुण जागृत होण्यास मदत होते. अशावेळी आपली चेतना अनंताचा अनोखा अनुभव घेणे सुरू करते! त्यामुळे आपल्याला तणावमुक्त झाल्याची आगळीवेगळी अनुभूती मिळते.

३) चंद्रघंटा ... नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. चंद्राचा संबंध मानवी मनाशी जोडला गेला आहे आणि घंटेचा नाद आपल्या मनाला वर्तमान क्षणात घेऊन येण्यास कारणीभूत ठरतो. चंद्राच्या कलांप्रमाणे आपलं मन सुद्धा सतत बदलत असतं. मात्र देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केल्यास आपलं मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४) कुष्मांडा ... कुष्मांड म्हणजे कोहळं! कोहळ्यामध्ये भरपूर बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये असंख्य कोहळे उत्पन्न करण्याची क्षमता असते.म्हणूनच कोहळं हे निर्मितीचं प्रतिक आहे.कोहळ्याप्रमाणेच देवीमध्ये सगळं विश्व सामावलं आहे. ही कुष्मांडा देवी आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते.

५) स्कंदमाता ... स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता! बाल कार्तिकेयासोबत सिंहावर विराजमान असं तिचं रूप आहे. हे रूप शौर्य आणि करूणेचं प्रतिक आहे. स्कंदचा अर्थ निष्णात किंवा निपुण असणं! मात्र सर्वसाधारणपणे जे निष्णात किंवा तज्ज्ञ असतात ते थोडे अहंकारी असतात. परंतु येथे निरागसता वाढवणारी निपुणता आहे. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास आपल्याला कौशल्यासह निरागसता आणि शौर्यासोबत करूणा हे गुण प्राप्त होतात.

६) कात्यायनी ... देवीच्या मातृत्वाचं वैशिष्ट्य दर्शवणारं हे रूप आहे. उत्तम वरप्राप्तीसाठी अविवाहित मुली देवीच्या या रूपाची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबध्दता, सहजीवन अन् आपलेपणा! ही देवी नातेसंबंधांमध्ये आवश्यक असलेल्या या गुणांची प्रतिक आहे.

७) कालरात्री  ... काल म्हणजे वेळ!  काळामध्ये या जगातील सारं काही सामावलं आहे आणि हा काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती... शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती! विश्रांती मिळाल्याशिवाय आपण परत ताजंतवानं होऊ शकत नाही. कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती. म्हणून देवीच्या या रूपाची आराधना केल्यास आपल्याला अशाप्रकारची विश्रांती लाभू शकते!

८) महागौरी  ... गौर म्हणजे गोरा, सफेद! सफेद, पांढरा रंग शुध्दतेचं प्रतिक आहे. शुध्दता निरागसतेतून येत असते. महागौरी हे देवीचं रूप म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ आहे. महागौरीची आराधना केल्यास ती आपल्याला जीवनाबाबतचं उच्च ज्ञान प्रदान करते!

९) सिद्धिदात्री  ... जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री! जे हवं आहे ते इच्छित मागण्यापूर्वी अपेक्षेपेक्षा जास्त मिळणं म्हणजे सिद्धी. साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. गुरूपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकानं गुरूपरंपरेच्या ज्ञानमार्गावर वाटचाल केल्यास सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची प्राप्ती करून देते. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास गुरूकृपेमुळे अपेक्षापूर्ती होऊ शकते. 

   स्त्री ही आपल्या समाजातील उपेक्षित, वंचित घटक नाही हे तिनं आजच्या काळात स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं सिद्ध केलं आहे. मात्र काही तथाकथित समाजधुरिण हे मान्य करत नाही. स्त्री आपल्यापेक्षा वरचढ कशी काय होऊ शकते, ही त्यांची समस्या अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना स्वस्थ बसू देत नाही! त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांकडून समाजातील स्त्रीचा अनादर केला जातो. तिला अपमानित केले जाते. मात्र ही स्त्रीशक्ती जेव्हा अन्यायाविरूद्ध पेटून उठते तेव्हा ती महिषासूरासारख्या बलाढ्य राक्षसाचा संहार करते! त्याच्यावर अभूतपूर्व असा विजय प्राप्त करते. हेच नवरात्र सणाचं महात्म्य आहे!

    आजच्या काळातील स्त्रीने स्वतःच्या स्त्रीत्वाची जपणूक करण्यासाठी उग्ररूप धारण करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे या सणाचा उदात्त हेतू लक्षात घेऊन तो साजरा करण्यावर भर देणं संयुक्तिक ठरेल. नवरात्राच्या नऊ दिवसांत नऊ रंगांची विविध वस्त्रं परिधान करून मिरवणं तसंच नटूनथटून मौज म्हणून दांडिया खेळणं म्हणजे नवरात्र साजरा करणं असं जे चित्र आजकाल सर्वत्र बघायला मिळतं, त्यावर विचार होणं गरजेचं आहे. या नवरात्र उत्सवाचं पावित्र्य आणि गांभीर्य समजून घेऊन त्यादृष्टीने पालन करणं तसंच घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचा मूळ उद्देश लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास आपल्याला एकप्रकारचे मानसिक समाधान प्राप्त करून घेता येईल हे निश्चित!

... विनोद श्रा. पंचभाई

No comments:

Post a Comment