Monday, January 9, 2023

वाचनाचा छंद... निर्भेळ आनंद!

 सुप्रभात मित्रांनो!

आपणांस आजच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त

 भरभरून शुभेच्छा!😊 


वाचनाचा छंद... निर्भेळ आनंद!


असं म्हणतात...एखादं पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. मला वाटतं हे अगदी खरंय !

कारण लहानपणापासून आतापर्यंत माझ्या वाचनात बरीच पुस्तकं आली आहेत. मात्र थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे "अग्निपंख" हे पुस्तक जेव्हा मी वाचले त्यावेळी एक प्रकारची ऊर्जाच  मिळाली. जगण्याला जणू चालना मिळाली. आगळीवेगळी उर्मी, उत्साह अंगात संचारल्यासारखं वाटलं ! नैराश्य कुठल्या कुठे पळून गेलं !


"अग्निपंख " हे खरंतर डॉ. कलाम यांचं आत्मचरित्र आहे. हे पुस्तक वाचताना  त्यांनी अगदी बालपणापासून केलेला जीवनसंघर्ष,  शिक्षणासाठीची त्यांची प्रामाणिक धडपड आपल्याला एक नवी दिशा देते. एस. एल. व्ही.  या भारतीय बनावटीच्या पहिल्या प्रक्षेपणास्त्र  वाहकाच्या अत्यंत अवघड निर्मितीच्या वेळी  डॉ. कलाम यांना सुरुवातीला अपयश आलं. मात्र खचून न जाता त्यांनी त्या संबंधीच्या संशोधनात स्वतःला  झोकून दिलं. आणि आपल्या सहकाऱ्यांसह अतिशय परिश्रम घेऊन एस. एल. व्ही.ची निर्मिती केली. यावरून आपल्याला जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो हे नक्की !


महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक "मुंशी प्रेमचंद" यांचे 'गोदान' हे  त्यावेळेसचं लोकप्रिय पुस्तक वाचण्यात आलं. अतिशय गरीब परिस्थितीत रोजचा जगण्याचा जीवघेणा संघर्ष, दोन वेळच्या जेवणासाठी करावा लागणारा आटापिटा तर कधीकधी मजबूरीनं  उपाशी राहण्यासाठी केलेली मानसिकता हे प्रसंग वाचताना त्यावेळेस विद्यार्थीदशेत 'गोदान' मधून बरंच काही शिकायला मिळालं. कुठल्याही परिस्थितीशी दोन हात कसे करायचे याबाबत जणू मार्गदर्शन लाभले. नंतरही  'प्रेमचंद' यांच्या बऱ्याच कथा वाचण्यात आल्या. त्यातून सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत खंबीर कसं राहायला हवं याचे अमूल्य असे धडे मिळाले.


साने गुरुजी यांचं "श्यामची आई" म्हणजे अखिल विश्वातील आईसाठी आदर्श उदाहरणच! जे कोणी हे पुस्तक वाचतील  ते नक्कीच अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही. "एक होता कार्वर" हेही असेच खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा  "ग्रामगीता" ग्रंथ तर सर्वसामान्यांना संपूर्ण जीवनाचं सोप्या भाषेत तत्वज्ञान सांगते एवढं त्यात सामर्थ्य आहे. राष्ट्रसंतानी ग्रामगीतेतून अगदी छोट्या छोट्या ओव्यांमधून अतिशय प्रेरणादायी उपदेश देऊन कर्मयोगाला प्राधान्य दिले आहे. "ग्रामगीता नाही पारायणासि...वाचता वाट दावी जनासि!!" हे सांगताना राष्ट्रसंतानी निरर्थक कर्मकांड कुचकामी ठरविले आहे.


  "एक तरी अंगी असू दे कला!

नाही तर काय फुका जन्मला!!" असा इशारा देतानाच राष्ट्रसंतानी....

 "मुलात एखादा तरी असावा गुण!

 ज्यात पोट भरेल त्यात निपुण!

न ये संसारामाजी अडचण! कोणत्याही परि!!" आणि

"मुलगी बहु शिकली शाळेमाझारी!

परि स्वयंपाक करता न ये घरी !

काय करावी विद्या चातुरी? कामाविण लंगडी ती!!

अशाप्रकारे विद्यार्थी दशेपासून अनमोल संस्कार दिलेले आहेत. म्हणूनच 'ग्रामगीता' या दिव्य ग्रंथाचा माझ्यावर विशेष प्रभाव आहे.


मला वाचनाची आवड असल्यानं कुठल्याही व्यसनापासून दूर राहण्याचा जीवनात खूप मोठा फायदा झाला आहे. कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने माणूस जेव्हा नैराश्याच्या आहारी जातो, तेव्हा त्याला कुठलं तरी व्यसन सहज जडतं. मात्र तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर व्यसनापासून तुम्ही निश्चितच दूर राहू शकता हे मी स्वानुभवाने सांगतो. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडण्यास मदतच होते हे मुद्दाम आवर्जून सांगावेसे वाटते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे याविषयी एक खूपच मार्मिक वाक्य आहे... "वाचन हे आपल्याला एकांतात सांगोपांग विचार करण्याचा निखळ आनंद देते !"


                     ......  विनोद श्रा. पंचभाई

                             भ्र.क्र.९९२३७९७७२५

No comments:

Post a Comment