"सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती: द्रौपदी मुर्मू"
काल परवापर्यंत कोणाला फारसं परिचित नसलेलं द्रौपदी मुर्मू हे नाव आता खूप चर्चेत आलं आहे. राष्ट्रपतीपदासाठी त्यांची उमेदवारी घोषित होईपर्यंत त्यांचं नाव सर्वसामान्यांना तसं अनोळखीच होतं. एका सामान्य आदिवासी, गरीब कुटुंबातील महिलेला राष्ट्रपती पदासारख्या देशाच्या सर्वोच्च पदासाठी उमेदवारी मिळणे हीच आपल्या बलशाली लोकशाहीची थक्क करणारी साक्ष आहे. खंडप्राय असलेल्या आपल्या विशाल भारत देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचा रोमहर्षक, संघर्षमय जीवनप्रवास खूपच चित्तथरारक आहे. खरंतर जगातील तमाम महिलांना त्यांचा जीवनसंघर्ष प्रेरणादायी ठरणारा आणि भावनाशील करणारा आहे. घराणेशाहीची परंपरा, अमर्याद संपत्तीचा वारसा आणि राजेशाही थाट असा कुठलाही बडेजाव नसलेल्या द्रौपदी मुर्मू या सामान्य शिक्षिकेची राष्ट्रपतीपदापर्यंतची खडतर वाटचाल सर्वसामान्यांना अभिमान वाटावा अशी विलक्षण लक्षवेधी आहे.
मानवी जीवनात कुठलीही गोष्ट शाश्वत नसते. जीवन हे क्षणभंगूर असून क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं! हसत्या - खेळत्या आयुष्यात अचानक जीवघेणी संकटं आली की माणूस सैरभैर होतो. मग त्यातून सावरण्यासाठी त्याला संपूर्ण आयुष्य पुरतं. तर काही लोक पर्वताएवढ्या दुःखातूनही बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग निवडताना दिसतात. त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वीही होतात. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या अनंत संकटांवर मात करून जीवघेण्या दुःखाच्या आणि नैराश्येच्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी अध्यात्माचा आश्रय घेतला. आभाळाएवढ्या जीवघेण्या दुःखाचं ओझं पेलत त्यांनी त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना अध्यात्मासोबतच त्यांच्या मुलीची - इतिश्रीची भावनिक साथही लाभली. म्हणूनच एक सामान्य शिक्षिका म्हणून आपल्या जीवनाची सुरूवात करणाऱ्या आणि देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहचणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचा अतिशय संघर्षमय आणि तेवढाच खडतर प्रवास जाणून घेणं सामान्यजनासाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.
हा प्रवास आहे एका सामान्य शिक्षिकेचा, हा प्रवास आहे झुंजार आदिवासी समाजातील एका कर्तृत्ववान महिलेचा, हा प्रवास आहे एका निस्वार्थी समाजसेविकेचा, हा प्रवास आहे एका जिद्दी आणि संघर्षमय चरित्राचा, हा प्रवास आहे एका आध्यात्मिक आणि समर्पित जीवनाचा!
अत्यंत शांत, संयमी स्वभावाच्या द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या अगदी बालपणापासून करावा लागलेला संघर्ष, त्यांच्या पुत्रांच्या आणि पतीच्या वियोगानंतर त्यांची झालेली अवस्था, त्यातून सावरण्यासाठी त्यांनी घेतलेलं कष्ट, मग त्यातून जिद्दीने मार्ग काढत केलेलं समाजकार्य आणि राजकीय वाटचाल अशाप्रकारे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा 'सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती: द्रौपदी मुर्मू' या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
...विनोद श्रा. पंचभाई, पुणे
भ्रमणध्वनी क्रमांक : 9923797725
No comments:
Post a Comment