Friday, December 13, 2019

रामदासी संप्रदाय : एक अनुभूती


रामदासी संप्रदाय ... एक अनुभूती

आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. अनेक जातींचे, धर्मांचे लोक येथे गुण्यागोविदानं वावरताना दिसतात. तसेच विविध प्रकारचे संप्रदाय एकमेकांचा आदर राखून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपापली मार्गक्रमणा करताना आढळतात. आपल्या देशात गणेशोत्सवासारखे हिंदूंचे सण साजरे करत असताना मुस्लिम धर्मबांधव तसेच इतर जातिधर्माचे लोक सुद्धा त्यात हिरीरीने भाग घेतात. त्याचप्रमाणे मुस्लिम धर्माची रमजान ईद असो किंवा ख्रिस्ती लोकांचा सण ख्रिसमस असो, त्याच असंख्य हिंदू बांधवही सम्मिलीत होताना दिसतात. निरनिराळ्या ईफ्तार पार्ट्यांच्या आयोजनाच्या वेळी अगदी सामान्य माणसापासून ते अनेक नेते अभिनेते त्यात हजेरी लावतात. त्यावेळी तेथे विविध जातीधर्माचे लोक आढळतात. या विविधतेचे कारण म्हणजे संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ ठरलेली आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचे उत्तमप्रकारे जतन करण्यासाठी आपल्याला लाभलेली थोर संत परंपरा !   

'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती। देह कष्टविती परोपकारे॥' तसेच  'आधी केले मग सांगितले' या उक्तीनुसार समर्थ श्री रामदास स्वामी यांचा रामदासी संप्रदाय आपल्याकडे सर्वश्रुत आहे. या संप्रदायाचे नेमके स्वरूप काय, संप्रदायाचे कार्य आणि वैशिष्ट्ये कोणती त्याचप्रमाणे संप्रदायाची पुढील यशस्वी वाटचाल कशी झाली याबाबतची इत्यंभूत माहिती "रामदासी संप्रदाय : एक अनुभूती " या पुस्तकात सविस्तरपणे दिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे स.भ. डाॅ. भास्कर गिरिधारी यांनी मार्गदर्शित केलेला प्रबंध असून विलक्षण पुस्तकाचे लेखन डाॅ. कु. साधना दिगंबर कुलकर्णी यांनी केले आहे. 

या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने समर्थ रामदास स्वामी यांच्या भव्यदिव्य कार्याची सामान्य वाचकांना खरी ओळख करून दिली आहे. तत्कालीन रूढींचा त्याग करून रामदासी संप्रदायाने उच्चवर्णीयांनाच नव्हे तर समाजातील निरनिराळ्या जातीतील स्त्री पुरूषांना सुद्धा प्रवेश दिला. इतकेच नव्हे तर या विशाल संप्रदायात मध्यमवर्गीय लोकांबरोबरच समाजातील श्रमिक व दलितांना सुद्धा समाविष्ट करून घेतले. ही एक सामाजिक क्रांती असल्याने रामदासी संप्रदायाने आपल्या समाजमनाची जागृतीच केली असं म्हणावं लागेल. पूर्वीच्या काळात अनेक संप्रदाय अस्तित्वात होते पण त्या त्या संप्रदायाची व्याप्ती मर्यादित होती असं आपल्या लक्षात येते. मात्र लेखिकेच्या संशोधनानुसार आजही जोमाने कार्य करणारे समर्थांचे एकूण ६२ मठ अस्तित्वात आहेत. तसेच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवणार्या एकूण २० संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या मार्फत सामाजिक कार्यासाठी आर्थिक पाठबळ सुद्धा पुरवले जाते. एकूणच विधायक, सेवाभावी कार्यासाठी मठ आणि संस्था सतत  कार्यरत असतात!

 ''रामदासी संप्रदाय : एक अनुभूती'' या पुस्तकात समर्थांच्या पूर्वी असलेल्या महाराष्ट्रात प्रचलित असलेले विविध संप्रदाय व त्यांचे स्वरूप, रामदासकालीन समाज जीवनाचे स्वरूप, रामदासी संप्रदायाची निर्मिती - प्रेरणा व स्वरूप, संप्रदायाची आचारसंहिता , तत्त्वज्ञान आणि साहित्यसंपदा, रामदासी संप्रदायकृत लोकशिक्षण व जनसंघटन, संप्रदायाची वाटचाल अशाप्रकारची सविस्तर  माहिती एकूण सहा प्रकरणात वाचायला मिळते. यात आपल्या देशाची समर्थकालीन धार्मिक स्थिती, महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती तसेच त्याकाळातील एकंदरीत आर्थिक स्थिती प्रकर्षाने नमूद केलेली आहे. तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या थोडक्यात चरित्राचाही वाचकांना लाभ घेता येऊ शकतो. 

' वारकरी पंथ हा एक वैदिक धर्मांतर्गत पंथ आहे. तो वैदिक धर्माविरुध्द बंड न पुकारता मूळच्या भागवत धर्माला उजाळा देण्यासाठी जन्माला आलेला आहे. या संप्रदायातील संतांनी वेदांचे प्रामाण्य मान्य केले आहे. केवळ वैदिक धर्माला उजाळा देणारा हा पंथ नव्हे तर श्रद्धा, निखळ नामस्मरण स्वरूप भक्ती या पायावर उभारलेला हा धर्म आहे' अशाप्रकारचे 'वारकरी संप्रदाया'बाबतचे विचार लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून भक्त पुंडलिक यांना ओळखले जाते. संत निवृत्तीनाथांनी आपल्या पुढील अभंगात पुंडलिकाच्या परंपरेचा उल्लेख करताना म्हटलं आहे...
"प्राणिया उध्दार सर्व हा श्रीधर। ब्रह्य हे साचार कृष्णमूर्ती।
ते रुप भीवरे पांडुरंग खरे। पुंडलिक सौरस पुरवीत.।
युगे अठ्ठावीस उभा ऋषिकेश। पुंडलिक सौरस पुरवीत।
निवृत्तीचे गुज पांडुरंग बीज। विश्वजन काज पुरे कोडे।। "

तसेच संत जनाबाईंनी आपल्या अभंगात पांडुरंगाचं वर्णन करताना म्हटलं आहे...
"भक्तामाजी अग्रगणी। पुंडलिक महामुनी.।
त्याच्या प्रसादे तरले। साधुसंत उध्दरिले.।।
तेचि प्रसाद आम्हासि। विटेवरी ऋषिकेशी।
पुंडलिक मायबाप.। दासी जनी वंदीपाय।।"

'ग्यानबा - तुकाराम' आणि 'जयजय राम कृष्ण हरी' हे वारकरी संप्रदायाच्या नित्य उपासनेचे मूलमंत्र आहेत. यात 'राम कृष्ण हरी' हा मंत्र विशेष आहे. या मंत्राचा अर्थ ...
राम म्हणजे ह्रदयात रमविणारा, कृष्ण आकर्षित करणारा व हरी म्हणजे ऐक्य रुप असणारा परमात्मा असा 'रामकृष्णहरी' 
अशाप्रकारे वारकरी संप्रदायाबद्दलची विस्तृत माहिती आणि वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान, आचारधर्म, सांप्रदायिक भूषणे,वाङमय, कीर्तन परंपरा इत्यादींचं वर्णन लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. यात
ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, संत नामदेव, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत जनाबाई या संतांच्या अभंगातील ओव्यांचा आनंद वाचकांना मिळतो. तसेच दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, महानुभाव संप्रदायाची माहिती सुद्धा या अभूतपूर्व पुस्तकात विशद केलेली आहे.


श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या घराण्याचा पूर्व इतिहास, समर्थ चरित्राची रूपरेषा, समर्थांची बाललीला व शिक्षण, त्यांचे लग्न मंडपातून पलायन, समर्थांचे तीर्थाटन व समाज अवलोकन तसेच त्यांच्या दिव्य कार्याचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. समर्थांनी एकटयासाठी नव्हे तर देशासाठी व धर्मासाठी आपला देह झिजवला. तीर्थाटनाचा आनंद म्हणजे ठायी ठायी संत सज्जनांना भेटून कष्टाचा व श्रमाचा परिहार होतो, दृष्टीत व्यापकता येते. मेरुस्वामी यांनी समर्थांच्या तीर्थाटनातील प्रवासाचं वर्णन पुढील प्रमाणे केलं आहे....
"प्रारब्धयोगे वनांतर.। विरक्तीदशेने दुर्धर।
नाना स्थलांतरे दुस्तर.। संचरती तेथे.।।
विरक्तीचे आंगी वारे। उदास वृत्तीने वावरे।
वस्तीने गिरीकंदरे। वसविली बहू॥
नाही क्षुधेतृषेचे देही भान। नाही विश्रांती निद्रा जाणं
वायूसारिखे संचरण.। होत असे स्वइच्छा ॥
शरीर उपजीविकाजीवन। सदोदित रघुनंदन।
निजप्राणाचाही प्राणमय नित्य तृप्तीने असे.॥"

 समर्थांचे तीर्थाटन हे देशाटनच होय . यात्रेत आलेला अनुभव म्हणजे सर्व समाजाची अवस्था! समर्थांनी हर तीर्थाटन 'पायी तीर्थयात्रा मुखी हरीनाम' अशा केल्या नाहीत तर सर्व देवाच्या ठिकाणी माझा रामच आहे या हेतूने केल्या.
"कर्ता राम मी नव्हे आपण। ऐसे सगुण निवेदन.।
निर्गुणी ते अनन्य। निर्गुणचि होईजे.॥"

या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने रामदासी संप्रदायात समर्थांनी जी चतु:सूत्री सांगितली आहे, ती म्हणजे हरिकथा निरुपण, राजकारण, सावधपणा, साक्षेप याबरोबरच संप्रदायाच्या शिकवणूकीतून प्रपंच व परमार्थ, अध्यात्म व व्यवहार, धर्मकारण व राजकारण या सर्व विषयांवर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे हे पुस्तक ज्ञानप्रेमी उपासकांसाठी तसेच सर्व सामान्य वाचकांना सुद्धा अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. त्यादृष्टीने 'रामदासी संप्रदाय : एक अनुभूती' सगळ्यांकडेच संग्रही असावे असे वाटते. एवढे उपयोगी आणि सुंदर पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!!

.....विनोद श्रा. पंचभाई 










 




No comments:

Post a Comment