Friday, December 13, 2019

संताजी जगनाडे महाराज आणि अभंगगाथा



संताजी जगनाडे महाराज आणि अभंगगाथा 

आपल्या देशात असे अनेक दिव्य महापुरूष होऊन गेलेत, ज्यांनी अनमोल कर्तृत्वाने जगाच्या इतिहासात आपले नाव कोरलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला थोर संत महंतांची परंपरा लाभली आहे. संताना जात नसते. संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठीच असते. श्ज्ञानोबा माऊली, तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सावता माळी, गोरा कुंभार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशाप्रकारे अनेक संतांनी त्यांच्या काळात सर्वसामान्य जनतेला मोलाचे प्रबोधन करून वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. याच परंपरेतील एक संत आहेत संताजी जगनाडे महाराज! संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून त्याकाळात त्यांनी समाज सुधारणेचे काम केले आहे. 

 संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी पुणे जिल्ह्यातील चाकण जवळच्या सुदुंबरे या छोट्याशा गावी  झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठोबाशेठ जगनाडे  तर आई सुदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई! त्याकाळी  संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेलाच्या धंद्याचा परिचय करून दिला, कारण त्यांचा मुख्य व्यवसाय होता घाण्याचे तेल काढणे. त्यांचे लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील यमुनाबाई बरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. 

संताजींची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबांच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दीर्घ आजाराने वारल्या. संताजींना  किर्तनात पाहताच तुकाराम महाराजांना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्याकारणाने त्यांना संताजीबद्दल प्रेम, आपुलकी वाटू लागली. त्यामुळे तुकोबांनी संताजींना आपल्या सानिध्यात ठेवले. तुकाराम महाराजांचे लेखक म्हणुन संताजी महाराजांच्या ओव्या व भजने लिहिलेली आढळुन येतात. वास्तविक पाहता तुकाराम महाराजांना अशा प्रकारच्या लेखनिकाची गरज होती असे नाही. ते स्वत: उत्तम प्रकारे लिहू व वाचु शकत होते. परंतु किर्तनाच्या प्रसंगी तुकोबांच्या तोंडुन निघणारे शिघ्रकाव्य व नवीन अभंग संताजी लिहून ठेवत असत, ही वस्तुस्थिती आहे!

     संताजींनी तुकाराम महाराजांना मनोमन गुरूस्थानी मानले होते. आणि खरंतर त्यांच्यामुळेच तुकाराम महाराजांचा अनमोल साहित्याचा ठेवा आज आपल्याला मिळाला आहे. संताजींचे अक्षर फारच सुंदर होते. तुकोबांचे नवनवीन अभंग ते आपल्या वहीत लिहुन ठेवत असत. हजारो अभंग त्यांनी संग्रहीत करून ठेवले होते. संताजींची  स्मरण शक्ती खरोखरच वाखणण्यासारखी होती. त्यांनी स्वत: रचलेले घाण्याचे अभंग आजही बर्‍याच ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागातून ऐकायला मिळतात. अगदी तरूण असताना पासूनच संताजी महाराजांना तुकाराम महाराजांचे किर्तन एैकण्यास मिळाले. आणि तेव्हापासूनच त्यांना किर्तनाची ओढ निर्माण झाली व त्यातून ते तुकाराम महाराजांकडे आकर्षित झाले जणू तुकाराम महाराजांशी त्यांचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंधच होते!

    तुकाराम महाराजांचा नियमित सहवास व मार्गदर्शनामुळे संताजींची जडणघडण अगदी व्यवस्थितपणे झाली. विशेष म्हणजे  मोगली आक्रमणाच्या वेळेला तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या, किर्तनाच्या आणि कवितांच्या वह्यांचे रक्षण संताजी महाराजांनी जिवाची पर्वा न करता केले.  चाकणच्या किर्तनानंतर संताजी नेहमी सतत तुकाराम महाराजांच्या सहवासात राहू लागले. त्यांचा   सहवास सतत मिळत गेल्यामुळे तुकारामांच्या अभंगांचे लेखनही रोज होऊ| लागले. महाराजांच्या सहवासाचा आणि किर्तनाचा संताजींच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. त्यामुळे घराकडे व संसाराकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले. 

रोज होणार्‍या तुुुकोबांच्या किर्तनातून आणि अभंगातून सामान्य माणसांच्या समस्यांचे निवारण होत होते. त्यामुळे आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जाणत्या पंडितांकडे सामान्यजन जाईनासे झाले. परिणामी त्यांचे नुकसान होऊ लागले. त्यांना दक्षिणा मिळणे बंद झाले. आणि मग सरतेशेवटी त्याचा सर्व राग तुकाराम महाराजांवर निघाला. त्यांच्या विरोधात धर्मसभा घेऊन धार्मिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.  त्याठिकाणी रामेश्वर भट हे स्वत: न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. त्यांनी आपला निर्णय जाहीर केला...  "तुकारामाला गाथा लिहिण्याचा अधिकार नाही. कारण तो शुद्र आहे. कीर्तन सांगणे व पाया पडून घेण्याचा अधिकार त्याला नाही. त्याची संपत्ती जप्त करून गावातून हाकलून द्यावे आणि त्याच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकाव्या." अशाप्रकारचा निकाल स्वत: रामेश्वर भटांनी दिला. त्यावेळी  तुकाराम महाराजांना  मारहाणही झाली. त्याचे संताजी महाराज साक्षीदार आहेत. त्याकाळात त्यांनी तुकाराम महाराजांना एकटे कधी सोडले नाही. त्यामुळे संताजी महाराजांना सुद्धा बर्‍याच वेळा धमक्या देण्यात येत होत्या. त्यांच्यावर अनेक वेळा हल्लेही झालेले आहेत. तरीही संताजी महाराज घाबरले नाहीत. रामेश्वर भटांनी तुकोबारायांच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याचा निकाल तर दिलाच होता. परिणामी आयुष्यभर कष्ट करून अभंगांचे लिखाण केलेल्या सर्व वह्या धार्मिक दबावामुळे पाण्यात बुडविण्यात आल्या!

     संताजी महाराजांची पुढील तेरा दिवसात तहान भूक हरपून आपल्या प्रबळ स्मरणशक्तीच्या जोरावर पुन्हा अभंग लिहायला सुरूवात केली. सर्व अभंग, कीर्तन पुन्हा जसेच्या तसे लिहुन काढले. त्याकाळी  'गाथा इंद्रायणी नदीतून कोरड्या वर आल्या... पांडुरंग प्रसन्न झाला, चमत्कार झाला!' अशा प्रकारचा प्रचार सर्वत्र करण्यात आला. परंतु स्थानिक सामान्यजनांना वस्तुस्थिती माहिती होती. तुकाराम महाराजांच्या गाथेचे रक्षण संताजी महाराजांनी केल्यामुळे त्याकाळात त्यांच्याबद्दल लोकांना फार कौतुक वाटले आणि त्यांच्याविषयी आदर, प्रेम, श्रद्धा निर्माण झाली. संताजी महाराजांनी दिलेले योगदान हे आपल्या समाजासाठी फार कौतुकास्पद आहे. त्यांचे मार्गदर्शन अभंगांच्या माध्यमातून केलेले उपदेश आजही आपल्याला त्यांची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. ते सांगायचे, "किर्ती शिल्लक राहील असे काम करा. त्यासाठी आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे. त्याचा उपयोग करा ! सावध व्हा, मृत्यू अटळ आहे. तो कोणत्याही क्षणी येईल. त्याला सामोरे जा ! या जीवनाचा सदुपयोग करा. एकदा मनुष्य जन्म संपला की तो पुन्हा येणार नाही!" असा विचार संताजी महाराजांनी मांडला.

     त्यानंतर वयाच्या ७६ व्या वर्षी १७०० साली मार्गशिर्ष वद्य १३ ला संताजी महाराजांचे निधन झाले!  निधनानंतरच्या निघालेल्या अंत्ययात्रेत भजनांच्या दिंड्या चालत होत्या. त्यांच्या देहावर हार, फुले, गुलाल, व पैशाची उधळण होत होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात त्यांना निरोप देण्यात येत होता.

             संताजी महाराज समाधिस्त झाल्यापासून सुदुंबरे येथे चाकण, खेड, कडुस, पुणे शहर व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन मार्गशिर्ष वद्य १३ ला. अनेक भाविक तेथे जातात. सर्व ग्रामस्थांच्या मदतीने उत्सव साजरा करतात. त्यावेळी भजन कीर्तन व प्रसादाच्या माध्यमातुन भोजनाचा कार्यक्रम ठेवला जातो.

    तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकर्‍यांपैकी संताजी महाराज हे एक असले तरी तुकारामाच्या खांद्याला खांदा लावून बरेच कार्य संताजी महाराजांनी केलेले आहे. अनेक प्रकारच्या अभंगाची रचना त्यांनी केलेली आहे. संताजी हे भक्तीमार्गी होते हे यावरून सिद्ध होते. संताजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या सानिध्यात सतत राहत असल्यामुळे त्यांनाही पांडुरंगाचा साक्षात्कार झाला होता!

     त्यांच्या कार्याची जाण ठेवून जय संताजी फक्त ओठातुन न बोलता ते पोटातुन निघावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!

  जय संताजी... जय जय रघुवीर समर्थ !!

... विनोद श्रा. पंचभाई.  वारजे, पुणे 
     भ्र. क्र.९९२३७९७७२५

No comments:

Post a Comment