सदाचार आणि प्रामाणिकपणा
लालबहादूर शास्त्रीजींचे सदाचार आणि प्रामाणिकपणाचे किस्से सर्वश्रुत आहेत. तसेच त्यांच्या साधेपणाचे, सच्चेपणाचे अनेक प्रसंगही प्रसिद्ध आहेत. त्यातील काही प्रसंग याठिकाणी आवर्जून नमूद करणे निश्चितच औचित्याचे ठरेल.
सायंकाळची वेळ होती. शास्त्रीजी नुकतेच घरी पोहचले होते. पत्नी ललितादेवी यांच्यासोबत त्यांचे कुठल्यातरी घरगुती विषयावर बोलणे सुरू होते. तेवढ्यात अचानक शास्त्रीजींचे एक जवळचे मित्र त्यांच्याकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून न राहवून शास्त्रीजींनी त्यांना कारण विचारलं. ते हात जोडून हळू आवाजात म्हणाले, "शास्त्रीजी घरी पत्नीची तब्येत खालावली आहे. तिच्या औषधासाठी माझ्या जवळ पुरेसे पैसे नाहीत. तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलो आहे. कृपाकरून मला पन्नास रुपये उसने द्या. थोडे थोडे करून मी नक्की परत करणार!"
"यावेळी पन्नास रुपये तर माझ्याजवळ नाहीत. पाच दहा रुपयाची मदत मी आता करू शकतो." शास्त्रीजी नम्रपणे म्हणाले. त्यांच्या उत्तराने निराश झालेले मित्र उठले आणि जाण्यासाठी वळले. तेवढ्यात ललितादेवीनी त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या, "थांबा भाऊजी, मी देते तुम्हाला पन्नास रुपये!"
ते ऐकून शास्त्रीजी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी ललितादेवींना विचारलं, "तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आलेत?"
त्यांनी हसतच उत्तर दिलं, "तुम्ही पगाराचे पन्नास रुपये माझ्याकडे देता ना, त्यातून मी घरखर्च करताना काटकसर करून दर महिन्याला पाच रुपये वाचवत होते. तेच जमा होऊन आता पन्नास रुपये झाले आहेत. मी लगेच घेऊन येते हं!"
आता पैसे मिळणार म्हणून मित्राचा चेहरा उजळला. मात्र शास्त्रीजी गंभीर झाले होते. ते विचारात पडले. तेवढ्यात ललितादेवींनी त्यांच्या हातावर आतून आणलेले पन्नास रुपये ठेवले. ते त्यांनी मोजून मित्राकडे दिले. पैसे मिळताच ते जागेवरून उठले आणि समाधानाने घराबाहेर पडले. शास्त्रीजी मात्र अजूनही गंभीरच होते. ते काही बोलले नाही.
दुसऱ्या दिवशी कार्यालयात गेल्यावर त्यांनी लगेच एक अर्ज लिहिला. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे होता...
'मला सध्या मिळत असलेल्या पगारातून कृपया पाच रुपये कपात करण्यात यावी. पंचेचाळीस रुपयात माझा महिन्याभराचा खर्च भागत असल्यामुळे तेवढा पगार पुरेसा आहे.'
एकदा शास्त्रीजी आठवडे बाजारात गेले होते. भाजी आणि इतर साहित्य वगैरे घेतल्यावर ते चालतच घराकडे निघाले. घरी पोहचल्यावर त्यांनी पिशव्या ललितादेवींच्या ताब्यात दिल्या आणि ते बाजारातील खर्चाचा हिशेब करू लागले. शास्त्रीजींना रोजचा खर्च नोंदवून ठेवण्याची सवय होती. त्याप्रमाणे हिशेब करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं, भाजीवाल्याकडून आपल्याला दहा पैसे जास्त आले आहेत. त्यांनी ते लगेच परत करण्याचा निर्णय घेतला आणि जागेवरून उठले. तेवढ्यात ललितादेवींनी त्यांना विचारलं, "काय झालं? तुम्ही आताच तर घरी आलेत आणि आता परत कुठं निघाले ?"
"भाजीवाल्याचे पैसे परत करायला. त्यानं पैसे परत करताना चुकून दहा पैसे मला जास्त दिले. मी जाऊन येतो लगेच..." शास्त्रीजी लगीबगीन म्हणाले.
"अहो आता सायंकाळ झाली आहे. चांगलं अंधारून आलंय. कधीही पाऊस येऊ शकतो. तुम्ही उद्या गेले तरी चालेल. आताच एवढं दोन किलोमीटर चालत आले!" ललितादेवी काकुळतीनं बोलल्या.
"उद्या तो भाजीवाला कसा भेटणार? आठवडे बाजार आता पुढच्या आठवड्यात भरणार ना, मला आताच गेलं पाहिजे. चल मी जाऊन येतो तोपर्यंत तू घरातील आवरून घे!" शास्त्रीजी ठामपणे म्हणाले अन घराबाहेर पडले सुद्धा. मग ते दोन किलोमीटर चालत आठवडे बाजारात पोहचले. नंतर त्या भाजीवाल्याला शोधून त्यांनी त्याला दहा पैसे परत केले आणि दिलगिरी व्यक्त केली. शास्त्रीजींचा प्रामाणिकपणा पाहून भाजीवालाही आश्चर्यचकित झाला!
असे होते आपले थोर शास्त्रीजी. त्यांनी आपल्या आचरणातून जीवन कसे जगावे याचा वस्तूपाठ आणि आदर्श घालून दिला, जो आजच्या नेते मंडळीत औषधालाही सापडणार नाही. पुढे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. त्यांच्या कारकिर्दीत तमिळनाडू राज्यात असलेल्या अरियालूरजवळ भीषण रेल्वे अपघात झाला! बरेच लोक मृत्यूमुखी पडले, असंख्य गंभीर जखमी झाले. अपघाताची बातमी समजताच शास्त्रीजी अस्वस्थ झाले आणि लगेच घटनास्थळी पोहोचले. तेथील भीषणता लक्षात येताच मदत आणि सेवा कार्यावर त्यांनी जातीचे भर दिला. त्याकाळात शास्त्रीजी खूपच अस्वस्थ होते. तशा अवस्थेत त्यांना रात्री झोप लागत नव्हती. शेवटी रेल्वेमंत्री म्हणून अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी राजीनामा दिला होता.
काही काळ उलटल्यावर पंडित नेहरू यांच्या निधनानंतर शास्त्रीजी पंतप्रधान पदावर विराजमान झाले. पुढच्याच वर्षी म्हणजे 1965 साली झालेल्या भारत - पाकिस्तान युद्धमुळे त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा शास्त्रीजींनी परिस्थितीचे भान ठेवून स्वतःचे मानधन घेणे बंद केले होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत एक घटना घडली. त्यावेळी शास्त्रीजींना कठोर निर्णय घ्यावा लागला. त्यांचा धाकटा मुलगा हरीकृष्ण याचे काही व्यापाऱ्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्याने वडिलांच्या अधिकार पदाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांसाठी कामे केल्याचा आरोप हरीकृष्णवर ठेवण्यात आला. हे प्रकरण शास्त्रीजींच्या कानावर पडताच त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानातून मुलाला बाहेर काढले होते.
शास्त्रीजी पंतप्रधान पदावर असताना सुद्धा त्यांची वागणूक अत्यंत साधी होती. त्यांनी कधीही सरकारी गाडीचा वापर केला नाही. मात्र त्यांच्या मुलाने स्वतःच्या खाजगी कामासाठी एकदा सरकारी गाडी वापरली. तेव्हा ती गोष्ट शास्त्रीजींना समजताच त्यांनी किलोमीटरच्या हिशेबाने पेट्रोलची रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली होती.
शास्त्रींजींनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे अमूल्य योगदान आणि अभूतपूर्व कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरणार यात शंका नाही.
No comments:
Post a Comment