प्रस्तावना 'क्रांतिलढ्याचे महानायक : उमाजीराजे नाईक'
वीर उमाजी नाईक हे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे एवढे महत्वाचे आहे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह जेजुरीच्या खंडोबारायासमोर भंडारा उधळत इंग्रजी सत्ता नष्ट करण्याची शपथ घेणारा हा नरवीर, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरी शिवशंकरासमोर घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेशी निष्ठा सांगतो. त्यानंतर लगेचच इंग्रज असोत की जुलुमी वतनदार असोत, त्यांच्यावर हल्ले करून त्यांना सळो की पळो करून सोडतो. लुटलेली संपत्ती गोर-गरिबांना वाटतो. आया-बहिणींची अब्रू वाचवतो. असा हा स्वातंत्र्यसेनानी महाराष्ट्रभूमीत झाला याचा आम्हा मराठी माणसांना अभिमान वाटला पाहिजे. उमाजी नाईक यांचे हे अत्यंत स्फूर्तीदायी चरित्र विनोद श्रा. पंचभाई यांच्यासारख्या प्रथितयश साहित्यिकाने लिहिलेले आहे. त्याची पारायणे करायला प्रेरित करत जाज्ज्वल्य स्वातंत्र्यनिष्ठा प्रत्येकाच्या हृदयात निर्माण होईल एवढ्या प्रभावी भाषेत लिहिले गेलेले हे प्रेरणादायी चरित्र आहे. उमाजी नाईक यांना शेवटी इंग्रजांनी फितुरीने पकडले आणि त्यांना पुण्यातील मामलेदार कचेरीसमोर दिनांक ३ फेब्रुवारी १८३२ रोजी जाहीर फाशी देण्यात आली. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात हौतात्म्य पत्करलेला हा पहिला हुतात्मा! त्याचे नित्य स्मरण होत राहिले पाहिजे.
उमाजी नाईक रामोशी जमातीचा. पुरंदर किल्ल्याची किल्लेदारी त्यांच्या घराण्याकडे होती, जी जुलमी इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत काढून घेतली. शिवपूर्व काळापासून महाराष्ट्रातील आणखी बऱ्याच किल्ल्याचे किल्लेदार हे रामोशी, भिल्ल, कोळी, महार अशा पराक्रमी जाती-जमातीचे असत. उदाहणार्थ मुहम्मद तुघलकाने जेव्हा १३२७ साली देवगिरीला आपली राजधानी हलवली तेव्हा कोंडाणा किल्ला आपल्या ताब्यात नाही यामुळे त्याला स्थिरता वाटत नव्हती. कोंडाणा किल्ला तेव्हा नागनायक नावाच्या कोळी किल्लेदाराच्या ताब्यात होता. मुहम्मदाने वेढा घातल्यानंतर नागनायक याने आपल्या साथीदारांच्या मदतीने आठ महिने किल्ला लढवला. शेवटी रसद संपल्यावर नागनायक किल्ल्यावरून तुघलकाला गुंगारा देऊन निघून गेला होता. जव्हार संस्थानाचा संस्थापक राजा तो हाच! धनगर, भिल्ल, कोळी, महार आणि रामोशी हे मुळात पराक्रमी असल्याने ते किल्ले, गावे, नगरे आणि व्यापारी तांड्यांचे रक्षक असत. इंग्रजानी त्यांच्या राजवटीत आणलेल्या नव्या व्यवस्थेमुळे वरील जमातींचे मुळचे स्वातंत्र्य लोप पावले आणि त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. जुलमी इंग्रजी सत्ता नष्ट केल्याखेरीज आपले स्वातंत्र्य संरक्षित होणार नाही याची जाणीव झालेला उमाजी नाईक हा पहिला तरुण!
इंग्रजांशी पहिला स्वातंत्र्यलढा पुकारणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर यांनी तत्पूर्वी पुकारलेला सर्वकष लढाही उमाजी नाईकांची प्रेरणा ठरली असल्यास नवल नाही. स्वातंत्र्याचे हे लोण सर्व स्तरांवर पोचले तर आपली अवस्था अतिशय बिकट होईल हे ओळखलेल्या चाणाक्ष इंग्रजांनी अखेर लढवय्या उमाजीला फितुरीने पकडले. फासावर चढवले! हे येथेच थांबले नाही. इंग्रजांनी पुढे देशभरातील रामोशी, भिल्ल, कोळी आणि समकक्ष लढाऊ जमातींना गुन्हेगार जाती-जमातीत टाकून त्यांचे जगण्याचेही स्वातंत्र्य नाकारले. त्यांना बंदिस्त वसाहतीत रहायला भाग पाडले. स्वातंत्र्ययुद्ध झाले तर ते याच जमाती करतील ही खात्री असल्याने जुलमी इंग्रजांनी हे पाऊल उचलले. या जमातींवर “गुन्हेगारी” शिक्का बसला तो कायमचाच! त्यानंतर तो निघाला... तो १९५२ साली पंतप्रधान पंडित नेहरूंनी हा शिक्का काढून त्यांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर. तरीही इंग्रज कायदेप्रणालीत शिक्षित झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीत फारसा फरक आजही पडलेला दिसून येत नाही हे दुर्दैव! आपल्या समाजानेही त्या जाती-जमातींना पुरेसा सन्मान व प्रतिष्ठा दिल्याचे सहसा आढळून येणार नाही. वीर उमाजी नाईक महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्य सेनानी असूनही त्याला तो सन्मान दिला गेलेला नाही. त्याच्याबद्दल सर्वसामान्यांना विशेष माहितही नाही हे तमाम भारतीय माणसांचे दुर्दैवच. ज्याचे नित्य पोवाडे गायले जायला हवेत, त्यालाच दुर्लक्षित ठेवणे हा मराठी माणसाचा अपराधच आहे यात शंका नसावी.
विनोद पंचभाई यांनी उमाजीराजेंचे हे चरित्र लिहून मराठी साहित्यातील एक मोठीच उणीव दूर केलेली आहे. इतिहासवंचित स्वातंत्र्यवीराला मानाची आदरांजली वाहिली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भसाधने वापरली असून हे चरित्र अधिकाधिक प्रामाणिक होईल याची काळजी घेतली आहे. त्यांची शैलीही अत्यंत सुगम असून वाचकाला उमाजी नाईक यांच्यासोबत सफर करायला भाग पाडते. त्यांचे संघर्ष आणि त्यांच्याशी द्रोह करणाऱ्या स्वजनांचे वास्तविक दर्शन या पुस्तकात उत्कटतेने घडते!
मराठी वाचक 'क्रांतिलढ्याचे महानायक : उमाजीराजे नाईक' या चरित्राचे स्वागत करतील, याच्या प्रती सार्वत्रिक करून या महान स्वातंत्र्ययोद्ध्यास मानवंदना देतील हीच अपेक्षा आहे.
धन्यवाद!
...संजय सोनवणी
ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास संशोधक
आणि प्राकृत भाषेचे अभ्यासक, पुणे
No comments:
Post a Comment