राम जन्मला गं सखे...
"लळा जिव्हाळा शब्दच खोटे
मासा माशा खाई !
कुणी कुणाचे नाही राजा
कुणी कुणाचे नाही!!"
यासारखी अतिशय अर्थपूर्ण, भावपूर्ण आणि अजरामर गाणी लिहिणारे गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात आधुनिक वाल्मिकी गदिमा! दरवर्षी रामनवमीचा मंगलमय सण जवळ आला की गदिमांच्या अविस्मरणीय अशा 'गीतरामायण' मधील गीते सर्वत्र कानी पडू लागतात. सगळीकडच्या परिसरातील वातावरण अक्षरशः राममय होऊन जाते! या अभूतपूर्व अशा गीतरामायणात एकूण ५६ गीतांच्या रचनांंचा समावेश आहे. साक्षात सरस्वती माता प्रसन्न असणाऱ्या गदिमांनी त्यांच्या काळात गीतरामायणातील एक एक पद लिहायला सुरुवात केली. त्यांच्या गीतांमधील शब्दाशब्दात अत्यंत गहन अर्थ भरलेला आपल्याला दिसून येतो.
गीतरामायणाचा कार्यक्रम सर्वप्रथम १ एप्रिल १९५५ रोजी रामनवमीच्या दिवशी पुणे आकाशवाणी केंद्रावर प्रसारित करण्यात आला. त्या प्रसंगीचा अनुभव सांगताना स्वतः गदिमा म्हणतात..."गीतरामायण आकाशवाणीवर प्रसारित करण्याचा पहिलाच दिवस होता. पहिलं गीत लिहून, चाल लावून तयार होतं. बाबुजींनी फक्त सादर करण्याचा अवकाश होता. आकाशवाणीने प्रसारणाच्या सर्व वेळा आधीच जाहीर केल्या होत्या. आणि रामायणाचे गीतरुपांतर ऐकायला अनेक जण उत्सुकतेने वाट बघत होते दहा वाजण्याची! मात्र अचानक एक अडचण उद् भवली... सकाळी आकाशवाणी केंद्रावर ऐनवेळी गाण्याची प्रतच सापडेना." भरपूर शोध घेतला पण सगळं व्यर्थ! प्रसारणाची वेळ जवळ येत होती. काय करावं कुणाला काही सुचत नव्हतं. मग केवळ अर्ध्या तासाच्या आत प्रतिभावंत गदिमांनी नवीन गीत लिहून काढलं. त्या गीताला लगेच बाबुजींनी म्हणजे गायक-संगीतकार सुधीर फडके यांनी एक अजरामर चाल लावली. त्यानंतर प्रसारणाच्या अगदी वेळेवर त्यांनी सादर केलं एक नितांत सुंदर अन् अजरामर गीत... " स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती!"
अशीच एक विलक्षण आठवण... गदिमांच्या सहधर्मचारिणी विद्याताई माडगूळकर यांनी सांगितलेली...
स्थळ - पुण्याच्या वाकडेवाडी परिसरातील निसर्गरम्य पंचवटी बंगला. गदिमांचे निवासस्थान. त्यावेळी गदिमांना गीतरामायणातील रामजन्माचा प्रसंग लिहायचा होता. सकाळी उठल्यानंतर सर्व आवरुन गदिमांनी आंघोळ उरकली. नंतर त्यांनी चहा, नाश्ता घेतला. मग आपल्या लिखाणाचं साहित्य घेऊन गदिमांनी बैठक मारली. त्यांचं चिंतन, मनन सुरू झालं. विचार करता करता दोन प्रहर उलटले. गीतरामायणात एकूण ५६ गीते गदिमांनी लिहिली आहेत, पण गीतातील शब्द सुचायला त्यांना कधी वेळ लागला किंवा त्रास झाला असं कधीच झालं नव्हतं. यावेळी मात्र त्यांना समर्पक शब्द सुचत नव्हते.
काही वेळाने गदिमा घराच्या आवारातील तुळशी वृंदावनाजवळच्या कट्ट्यावर जाऊन बसले. थोड्या वेळातच दिवेलागणीची वेळ झाल्यानं तिथं काळोख पसरू लागला...मात्र कागदावर एक शब्दही उमटू शकला नाही! गदिमा आपल्याच तंद्रीत होते ! अंधार पडायला लागल्यानं घरातील कुणीतरी आवारात इलेक्ट्रीक बल्बची सोय केली. गदिमा विचार करत थोड्या येरझारा घालायचे आणि पुन्हा कट्ट्यावर बसायचे. रामजन्माचा प्रसंग हा एकच विषय त्यांच्या डोक्यात पिंगा घालत होता... मनात तोच विषय घोळत होता! दुसरं काही सुचत नव्हतं.
बघता बघता मध्यरात्र उलटली! विद्याताईंंना अचानक जाग आली. त्यांनी माडीवरच्या खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं. गदिमा आपल्याच तंद्रीत बसलेले त्यांना दिसून आले. तेव्हा त्यांनी आवाज देऊन सहज गमतीनं विचारलं... "झाला की नाही रामजन्म...?"
सौ.चा आवाज कानी पडताच गदिमा उद् गारले, "हा कुण्या माडगूळकरांच्या घराण्यातील जन्म नव्हे, तर प्रत्यक्ष प्रभुरामचंद्र जन्माला यायचे आहेत. कळलं का..?"
गदिमांची जणू समाधी लागली होती. काही वेळाने त्यांनी आपल्याच तंद्रीत विचार करता करता लेखणी उचलली. मग पहाटेच्या त्या आल्हाददायक प्रहरी कागदावर शब्द उमटू लागले....
" चैत्रमास, त्यात शुध्द नवमी ही तिथी
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती !
दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला?
राम जन्मला गं सखे राम जन्मला!!"
............... विनोद श्रा. पंचभाई
No comments:
Post a Comment