Monday, October 28, 2019

संपन्नतेचे प्रतीक ... धनत्रयोदशी

संपन्नतेचे प्रतीक... धनत्रयोदशी

दिवाळी हा सण अतिशय मांगल्याचा आणि संपन्नतेचा सण म्हणून आपल्या देशात सर्वत्र साजरा केला जातो. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस! धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा करतात. या दिवशी धन म्हणजे पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत रहावी अशी प्रार्थना केली जाते. धनत्रयोदशीला आपल्या देशातील
काही भागात धनतेरस असेही म्हणतात. या मंगलमय दिवसापासूनच दिवाळीची खरी सुरूवात होते.

धनत्रयोदशी या सणामागे मनाचा वेध घेणारी एक विलक्षण कथा सांगितली जाते..... राजजोतिष्याने सांगितलेल्या भविष्यवाणीनुसार हेम राजाचा पुत्र आपल्या ऐन तारूण्यावस्थेत मृत्यूमुखी पडणार असतो! त्यामुळे राजा, राणी सतत उदास आणि तणावात राहतात. तरीही ते आपल्या राजपुत्राचे जीवन सुखी व्हावे या आशेने त्याचे लग्न लावून देतात. मात्र लग्नानंतर चौथ्या दिवशीच तो मृत्यूमुखी पडणार असे भविष्य वर्तविलेले असल्याने तो दिवस त्याच्यासाठी अत्यंत कसोटीचा असतो. त्यादिवशी त्याची पत्नी त्याला रात्री झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. तसेच राजमहालाचे प्रवेशद्वार सुद्धा सोन्या-चांदीने भरून रोखण्यात येते. सर्व महालात मोठमोठे दिवे प्रज्वलित करून सगळीकडे लखलखीत प्रकाश केला जातो. राजपुत्राची पत्नी त्याला रंजक गोष्टी सांगून जागे ठेवण्यात यशस्वी होते. त्यानंतर जेव्हा यम राजपुत्राच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीच्या प्रखरतेने आणि तेथील प्रकाशाच्या लखलखाटाने दिपून जातात! त्यामुळे यम आपल्या यमलोकात परत निघून जातो. अशाप्रकारे राजपुत्राचे प्राण वाचतात. म्हणून या दिवसाला 'यमदीपदान' असेही म्हणतात. यादिवशी सायंकाळी घराबाहेर दिवे लावून त्यांच्या वातीचे टोक दक्षिण दिशेकडे ठेवतात आणि दिव्याला मनोभावे नमस्कार करतात. असे केल्याने अपमृत्यू टळतो असा समज आहे!

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा प्रचलित आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’! जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणासाठी समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला 'धन्वंतरी जयंती' असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने धनत्रयोदशी या दिवसाला धन्वंतरी जयंतीचे अतिशय महत्त्व आहे. वैद्य मंडळी यादिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. नंतर कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर प्रसाद म्हणून लोकांना वाटला जातो. आयुर्वेदात यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे अशी मान्यता आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी कडूनिंब आणि साखर धन्वंतरीचा प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.

व्यापारी वर्गात सुद्धा धनत्रयोदशीच्या पूजेला विशेष महत्त्व असते. यादिवशी सायंकाळी व्यापारी लोक आपल्या दुकानातील पेढीची मनोभावे पूजा करतात. त्यांच्या हिशेबांच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आपल्याकडे फार आधीपासूनच आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशातील काही ग्रामीण भागात धनत्रयोदशीला घरातील कानाकोपऱ्यात धने पसरून ठेवण्याची परंपराही आहे. यामुळे घराघरात धनधान्याची वृद्धी होते असा दृढ समज आहे.

तसेच धनत्रयोदशी सणाचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणावर सामान्यजन सोने खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक संपन्नता येते असा लोकांचा विश्वास आहे. जर कुणी सोने खरेदी नाही करू शकले तर ते कुठलीही एखादी नवीन वस्तू यादिवशी खरेदी करतात! असा हा
धनत्रयोदशी हा दिवाळी सणाचा पहिला मंगलमय दिवस लौकिकार्थाने संपन्नतेचे प्रतीकच आहे.

...विनोद श्रा.पंचभाई
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

No comments:

Post a Comment