मांगल्याचा शुभारंभ --- गुढी पाडवा सण
आपल्या भारतीय संस्कृतीत बहुतेक सर्वच सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसंच प्रत्येक सण साजरा करण्यामागे विशिष्ट हेतू असतो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला असाच एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढी पाडवा! या सणाने आपल्या नववर्षाची सुरूवातहोते म्हणजेच ख-या अर्थाने मांगल्याचा शुभारंभ होतो. त्यामुळे सगळीकडे मनामनात नवचैतन्य निर्माण होताना दिसते! आपसातील वैरभाव विसरून, गैरसमज दूर करून अस्वस्थता, उदासीनता यावर विजय प्राप्त करणारा अन् चैतन्याची उधळण करणारा हा मंगलमय गुढी पाडवा सण !
गुढी पाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला, सदाबहार वसंत ऋतुच्या साक्षीने महाराष्ट्रासह देशभर सर्वत्र साजरा केला जातो. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीनिमित्त विजय दिन म्हणून 'संवत्सर पाडवो' या नावाने साजरा करण्यात येतो. तसंच उगादी, चेट्रीचंड इत्यादी नावानेही हा सण देशाच्या विविध भागात साजरा होतो. त्याचप्रमाणे शालिवाहन संवत्सराचा सुद्धा हा पहिला दिवस आहे. गुढी पाडवा हा पूर्ण शुभ मुहूर्त असल्याने यादिवशी नवीन वस्तूंची खरेदी तसंच नवीन उपक्रमांचा किंवा व्यवसायाचा प्रारंभ केला जातो. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणेही अतिशय लाभदायक मानले जाते. गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्राची सुरूवात होते. त्यामुळे पुढे येणाऱ्या श्रीराम जन्मोत्सवाची तयारी पण या दिवसापासून केली जाते.
या मंगलमय सणाला सांस्कृतिक इतिहास आहे. गुढी पाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदेला सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाने अखंड विश्वाची निर्मिती केली असं आपल्या वेदांमध्ये वर्णन आहे. त्यामुळे हा सण निर्मितीच्या सृजनाचाही आहे. तसंच प्रभू श्रीरामचंद्रांनी चौदा वर्षाचा वनवास भोगल्यानंतर लंकानरेश रावणाचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी गुढ्या उभारून, पताका - तोरणे लावून अयोध्या नगरी सुशोभित केली होती. याच दिवशी शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला होता! या राजाच्या नावानेच आपल्याकडे नवीन कालगणना म्हणून शालिवाहन शक सुरू झाला. या शालिवाहन शकावरच आपल्याकडील पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके आधारलेली आहेत.
गुढी पाडव्याच्या दिवशी लोक सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर गुढ्या उभारतात. गुढी उभारणीसाठी बांबूपासून काठी तयार केली जाते. ही काठी स्वच्छ धुवून तिच्या टोकाला नवीन वस्त्र किंवा साडी गुंडाळून त्यावर कडूनिंबाची डहाळी, साखरेची गाठी, आंब्याची पानं आणि फुलांचा हार घालण्यात येतो. नंतर या काठीच्या टोकावर तांब्याचा, पितळेचा किंवा चांदीचा आपल्या सोयीनुसार जसा जमेल तसा तांब्या अथवा फुलपात्र बसवले जाते. गुढी उभारायची जागा व्यवस्थितपणे स्वच्छ करून रांगोळी काढून सुशोभित करण्यात येते. मग तयार केलेली गुढी घराच्या प्रवेश द्वारावर उंच ठिकाणी उभारली जाते. काही लोक आपापल्या सोयीप्रमाणे गच्चीवर किंवा गॅलरीत सुद्धा गुढीची उभारणी करतात. नंतर गुढीला गंध, फुलं, अक्षता वाहून पूजा केली जाते. निरांजन लावून दूध साखरेचा तसंच गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटण्यात येतो. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा फुलं, अक्षता वाहून उभारलेली गुढी सावकाश उतरवली जाते! अशी ही गुढी पाडवा सणाची पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे. यादिवशी लोक उत्साहात, आनंदात सण साजरा करून एकमेकांना नववर्षा निमित्त शुभेच्छांचे आदानप्रदान करतात.
आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही गुढी पाडवा महत्त्वाचा सण मानला जातो. गुढीसाठी कडूनिंबाची पाने वापरली जातात. ही पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. गुढी उभारल्यानंतर ओवा, मीठ, हिंग, मिरे व साखर कडूनिंबाच्या पानासोबत वाटून खाण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश होणे, त्वचा रोग बरा होणे, धान्यातील कीड थांबवणे अशाप्रकारचे अनेक औषधी गुण या कडूनिंबाच्या पानात आहेत, असा आयुर्वेदात उल्लेख आहे. गुढी पाडवा हा सण ऋतुंचा राजा असलेल्या वसंत ऋतुच्या कालखंडात येत असल्यामुळे या दिवसांमध्ये चैतन्य फुललेलं असते! सर्वत्र उत्साहाचं वातावरण असते. या वसंत ऋतुत पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. आपल्या सणांमध्ये पानं,फुलं, पत्री यांना अतिशय महत्त्व आहे. या पाना - फुलांना , झाडांना महत्त्व देण्याचा खरा उद्देश म्हणजे झाडांची निगा राखणे, त्यांचे संवर्धन करणे! पर्यायाने पर्यावरणाचेही संवर्धन होते. तद्वतच आपल्या सद् गुणांचंही संवर्धन करणे हा गुढी पाडवा साजरा करण्यामागचा उद्देश समजून घेणं गरजेचं आहे.
आपल्याकडे आजकाल एक नवीनच पद्धत अनुभवायला मिळत आहे. 'गुढी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा' किती सहजसुंदर आणि ऐकायला गोड वाटणारे शब्द आहेत... पण नाही! आम्ही 'हॅपी गुढी पाडवा' च म्हणणार! आमच्या काँन्व्हेन्टमध्ये इंग्रजी शिवाय दुसरी भाषा बोलण्याची परवानगी नाही, असं मोठ्या अभिमानाने सांगणारी एक नवीन पिढी या देशात तयार होत आहे. तसंच इंग्रजांचे गोडवे गाणारे अजूनही आपल्या देशात कमी नाहीत. त्यांना आपला सांस्कृतिक वारसा तसंच गुढी पाडव्यासारख्या सणांशी काही देणे-घेणे नसते! मात्र ३१ डिसेंबरला अशा महाभागांना सांगावं लागत नाही. इंग्रजी नववर्षाची चाहूल यांना नाताळापासूनच लागते. इंग्रजी नवीन वर्ष हे सर्व जगात साजरे केले जाते हे मान्य, पण आपल्या भारतीय नववर्षाची सुरूवात ही गुढी पाडव्यापासून होते हे आपल्याला नवीन पिढीला सांगावं लागतं, त्याची आठवण करून द्यावी लागते हे दुर्दैवच! भावी पिढी आधुनिक भारताचा आधारस्तंभ आहे असं आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो. मात्र ही पिढी सुसंस्कारित व्हावी यावर सखोल चिंतन करण्याची वेळ या गुढी पाडव्याच्या निमित्तानं येऊन ठेपली आहे इतकंच प्रामाणिकपणे सांगावंस वाटतं!
गुढी उभारूया ऐक्याची
समाधान अन् सौख्याची!
स्वागत करूया नववर्षाचे
मनामनातल्या हर्षाचे! !
...विनोद श्रा. पंचभाई
भ्र. क्र. ९९२३७९७७२५

No comments:
Post a Comment