खिळवून ठेवणारी गुढ कादंबरी:
'अमानवी विनवणी'
"ग्रेट वगैरे काही नाही. ह्रदयावर दगड ठेवून बोलतेय मी... आम्ही तिघी म्हणजे लोखंडाचे तुकडे आहोत. तुझ्या सारख्या लोहचुंबकाकडे कायम खेचले जाणारे... आम्ही नाही जाऊ शकत दूर तुझ्यापासून".
" मी पण नाही दूर जाऊ शकत तुझ्यापासून".
" मग हा निर्णय का घेतलास?"
"मला नाही माहीत... कुठली तरी अदृश्य शक्ती हे सारं करायला लावतेय असं वाटायला लागलंय!"
"आता तू तरी असं नको बोलूस."
"ती शक्तीच मला वाचवू शकेल शुभा."
एखाद्या विलक्षण गुढ आणि रहस्यमयी चित्रपटात शोभतील असे जबरदस्त संवाद नुकत्याच 'चपराक प्रकाशन'तर्फे प्रकाशित झालेल्या 'अमानवी विनवणी' या हटके कादंबरीत नुकतेच वाचनात आले. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी ही कादंबरी एकदा हाती घेतली की, ती पूर्ण वाचल्याशिवाय हातची सुटणार नाही एवढी सशक्त गुढरम्य भयकथा लेखकानं यात यशस्वीपणे फुलवली आहे.
एक प्रख्यात आणि लोकप्रिय नाटककार असलेले भास्कर शास्त्री हवापालट म्हणून कोकणातील एका चाहत्याकडे मुक्कामाला जातात. त्यांचं जुनं घर समुद्राजवळच्या घनदाट झाडांच्या मध्यात, फारशी वस्ती नसलेल्या जागी असते! तिथल्या त्या अनोख्या, रम्य वातावरणात त्यांना अचानक एक रोजनिशी हाती लागते... ती वाचताना ते शहारतात! मग एका गुढ, रहस्यमय नाटकाचा विषय त्यांना सुचतो. कोकणातून आपल्या घरी परतल्यावर शास्त्री सुचलेलं भयनाट्य भराभर लिहून मोकळेही होतात. याच भयनाट्याची पार्श्वभूमी या विलक्षण कादंबरीला लाभली आहे. विरूपाक्ष नावाची मध्यवर्ती भूमिका साकारणार्या पात्राभोवती या कादंबरीचं कथानक लेखकांनी त्यांच्या अनोख्या शैलीत ज्या पद्धतीनं फुलवलं आहे, ते वाचत असताना आपण भयचकित झाल्याशिवाय राहत नाही... नकळतपणे त्यातच गुंतत जातो. "हे अस्वस्थ आत्म्यांनो, मला तुमचे भास नाहीत पण श्वास जाणवतायत. मात्र तुम्ही जिवंत शरीर घेऊन जर इप्सित साध्य करू इच्छित असाल तर ते जमणार नाही. सूड घेऊ, सूड घेऊ म्हणून कितीही आक्रंदन केलं तरी या विरूपाक्ष ला ओलांडणे तुम्हाला जमणार नाही. संकेत मिळाले नाहीत तर भटकत रहावं लागेल असंच शतकानुशतकं. सोडा, सूड बुद्धी सोडा आणि मुक्त व्हा... मुक्त व्हा...!" अशाप्रकारचे विरूपाक्षचे भन्नाट संवाद आपल्या अंगावर काटा आणतात!
काही वेळातच कादंबरीचं कथानक आपल्या तनामनाचा, सर्वस्वाचा ताबा घेते... आणि पुढे पुढे तर कमालीचे अनपेक्षित धक्के बसत जातात. विरूपाक्षची भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर अवतरतं आणि जबरदस्त वातावरण निर्मिती होते. नाटक ऐन भरात आलेलं असतं. प्रेक्षक श्वास रोखून बघत असताना, आता रहस्याचा परमोच्च बिंदू गाठणार आणि रहस्य उलगडणार असं वाटत असताना विरूपाक्ष अचानक मंचावर कोसळतो! तेव्हा क्षणभर वाचकांच्याही काळजाचा ठोका चुकतो... मती कुंठित होते! काय असते हे रहस्य? विरूपाक्षची भूमिका करणार्या अनेक पात्रांची अशी अवस्था का होते? शेवटी हे रहस्य कसं उलगडते? या प्रश्नांची नेमकी उत्तरं हवी असेल तर ही शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी विलक्षण रहस्यमय आणि वाचताना अंगावर काटा आणणारी गुढ कादंबरी 'अमानवी विनवणी' प्रत्येकांनी वाचायलाच हवी.
या कादंबरीचे लेखक सदानंद भणगे सर यांनी त्यांच्या मनोगतात त्यांनी शेक्सपियरची नाटके तसेच इंग्रजी कादंबर्या अभ्यासल्याचं नमूद केलेलं आहे. तसेच बर्याच दिवाळी अंकात त्यांच्या भयकथा, रहस्य, गुढकथा प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामुळे 'अमानवी विनवणी'च्या दमदार
आगमनानंतर आता त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या उत्कंठा वाढवणार्या कादंबर्यांचं लेखन अपेक्षित आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. भणगे सरांना पुढील देदीप्यमान वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
'अमानवी विनवणी' ही अतिशय दर्जेदार गुढ, भयकथानक असणारी आगळीवेगळी कादंबरी चपराक प्रकाशनतर्फे प्रकाशित करून प्रकाशक-संपादक घनश्याम पाटील यांनी वाचकांचा आनंद द्विगुणित केला आहे. तसंच अत्यंत समर्पक, गुढ वलय असलेलं मुखपृष्ठ साकारणारे चित्रकार संतोष घोंगडे नक्कीच कौतुकास पात्र ठरले आहेत. त्यांचं मनस्वी अभिनंदन! उत्कंठा वाढवणारं वेगवान कथानक, सहजसोपी प्रवाही भाषा, मनाचा वेध घेणारे प्रभावी संवाद आणि खिळवून ठेवणारं थरारक रहस्य हे या कादंबरीचं यश म्हणता येईल. म्हणूनच बर्याच कालावधीनंतर भेटीला आलेल्या या गुढरम्य भयकथा असलेल्या कादंबरीचा वाचकांनी नक्की लाभ घ्यावा असं येथे आवर्जून नमूद करतो.
धन्यवाद!
... विनोद श्रा. पंचभाई, पुणे
भ्र.क्र. ९९२३७९७७२५
कादंबरीचं नाव... अमानवी विनवणी
प्रकाशक ... चपराक प्रकाशन, पुणे
मूल्य... ₹ २००/-
No comments:
Post a Comment