अंतर्मुख करणारा बालकथा संग्रह: लाल दिनांक
बालकांचं मानसशास्त्र तरलतेनं जाणणार्या लेखक नागेश शेवाळकर यांचा 'लाल दिनांक' हा आगळावेगळा बालकथा संग्रह काही दिवसांपूर्वी वाचनात आला. यात वेगवेगळ्या विषयांवरील एकूण पंधरा बालकथा त्यांनी सहजसुंदर शैलीत मांडल्या आहेत. अगदी सुरुवातीलाच 'आमच्या मिस... आजी' या कथेच्या माध्यमातून हल्लीच्या काळात हरवून गेलेला 'मामाचं पत्र हरवलं' हा खेळ मस्त फुलवला आहे. तसंच रोजच्या खेळाला कंटाळलेल्या मुलांना अनेक जुने खेळ शिकवताना मिस आजी त्यांच्यात कशा समरसून जातात, हेही कथा वाचताना जाणवतं!
चार वर्षांनी एकदाच म्हणजे लिप ईयरला येणारा २९ फेब्रुवारी हा दिवस! या दिवशी जर एखाद्या मुलाचा वाढदिवस असला तर..? आपला वाढदिवस असणारी २९ फेब्रुवारी ही तारीख दरवर्षी का येत नाही म्हणून सचिनची होणारी तगमग, मग त्याचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करायचा, त्यासाठी त्याचे आईबाबा आणि शिक्षिका कशाप्रकारे सचिनची समजूत काढतात हे सगळं आपल्याला 'वाढदिवस सचिनचा' या अत्यंत भावस्पर्शी कथेत वाचायला मिळते. ते वाचताना आपण नकळतपणे अंतर्मुख होतो!
"का रे श्रावण, आम्ही तुला एवढे चिडवतो. तुला राग येत नाही का?"
"राग कशाला येईल? किर्तनात बुवा काय सांगतात माहीत आहे... ते म्हणतात की, प्रत्येकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे. जे आपल्याशी वाईट वागतात, त्यांच्याशीही प्रेमानेच वागावे. आपण जर त्यांना जशास तसे उत्तर दिले तर मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहतो? प्रेमाने, संयमाने जग जिंकता येते."
"आम्हाला नाही जमणार बुवा तुझ्या सारखे."
"प्रयत्न केला तर सारे जमते. इच्छा तेथे मार्ग. परवाच्या दिवशी मंदिरात एका मोठ्या बुवांचे कीर्तन झाले. ते म्हणाले, " या जगात पाण्यासारखे सरळमार्गी कोणीही नाही. पाणी ज्या रस्त्याने जाते, त्या मार्गावरील छोटे छोटे अडथळे ते बाजूला करते आणि पुढे जात राहते. त्याचप्रमाणे आपण संयमाने वागलो तर चिडवणारे आपोआप शांत होतात."
हे ह्रदयस्पर्शी आणि भावनिक संवाद आहेत 'श्रावणबाळ' या मनोवेधक कथेतील! या कथेच्या माध्यमातून लेखकाने लहान थोर सर्वांनाच खूप मोठी शिकवण दिली आहे. कथा वाचताना आपण तिच्याशी कधी एकरूप होऊन जातो हे आपले आपल्यालाच कळत नाही!
'एक वाढदिवस असाही' या कथेत महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी येणारा अजयचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा होतो? त्याची आजी त्याच्यासाठी कुठल्या नामी युक्तीचा आधार घेते हे प्रत्यक्ष वाचणे मनोरंजक ठरेल. तसंच 'नातू माझा भला'च्या माध्यमातून लेखकाने आजी आणि नातवाचं भावनिक, मर्मस्पर्शी नातं अशा काही मार्मिकपणे फुलवलंय की नकळत डोळ्यात आसवं गोळा होतात!
या बालकथा संग्रहात श्यामची पत्रावळ, परीकथा, बक्षिसाची किमया, पत्र बाप्पाचे या वेगळ्या धाटणीच्या पण अर्थपूर्ण आणि वाचनीय कथा आहेत. एकापेक्षा एक मनाचा वेध घेणार्या कथा आणि त्या फुलवताना वापरलेली ओघवती शैली, साधी सोपी भाषा हे 'लाल दिनांक'चं बलस्थान म्हणता येईल. पुस्तकाचं शिर्षक असलेली 'लाल दिनांक' ही कथा तर भन्नाटच आहे आणि कथेला अनुसरून सुंदर, विलोभनीय मुखपृष्ठ साकारलं गेलं आहे. हे सर्वांगसुंदर पुस्तक आपल्या पाल्यांसाठी, बालमित्रांसाठी विकत घेऊनच यातील कथांचा आस्वाद वाचकांनी घ्यायला हवा असं याठिकाणी आवर्जून नमूद करतो.
लेखक नागेश शेवाळकर यांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा! धन्यवाद!
... विनोद श्रा. पंचभाई
भ्र. क्र. ९९२३७९७७२५
पुस्तकाचे नाव... लाल दिनांक
प्रकाशक ... सोहम क्रिएशन अॅंड पब्लिकेशन, पुणे
मूल्य ... ₹ १५०/-
No comments:
Post a Comment