Sunday, December 18, 2022

मज्जाच मज्जा परीक्षण

 

मज्जाच मज्जा

  ज्यांच्या रामायण - महाभारतातील कथा, अकबर- बिरबलाचे किस्से आणि परिकथेच्या गमतीजमती वाचत एक पिढी घडली, असे महाराष्ट्रातील सुपरिचित ज्येष्ठ बालसाहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांच्या बालकवितांचा 'मज्जाच मज्जा' हा संग्रह नुकत्याच झालेल्या दिवाळी सणापूर्वी प्रकाशित झाला आहे. हा दर्जेदार बालकवितांचा खाऊ पुण्यातील आघाडीच्या 'दिलीपराज प्रकाशन' या संस्थेने संपूर्ण रंगीत आणि अतिशय आकर्षक स्वरूपात बालकुमारांसाठी उपलब्ध करून दिला आहे. जगदीश पाटील यांनी चितारलेले लाजवाब मुखपृष्ठ आणि बोलकी चित्रे तसेच सहजसुंदर, मनाला भुरळ पाडणारी सोपी भाषा या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. सुभाषचंद्र वैष्णव यांची जवळपास शंभर पेक्षा जास्त बालसाहित्यावरची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

'मज्जाच मज्जा' या बालकविता संग्रहात कवीने विविध विषयांवरील वाचनीय आणि सहज गुणगुणत राहाव्यात अशा कविता सादर केल्या आहेत.
'दप्तर भर, डबा दे
आई मला शाळेत ने'

'एकदा बंडूला दिसला चोर
त्यानं आणला मोठा दोर'     किंवा

'बोकोबा एकदा सिनेमाला गेले
पहिल्या रांगेत जाऊन बसले'
अशाप्रकारच्या अगदी सहजसोप्या, साध्या भाषेत या कविता असल्याने बालकुमारांसाठी ही खरी मनोरंजनाची मेजवानी आहे. शाळेतील रोजचे 'होमवर्क' करून कंटाळलेल्या बालमनाला अशा सुंदर कवितांनी नक्कीच संजीवनी मिळणार यात शंकाच नाही. या संग्रहात मनोरंजनासोबतच 'एक झाड लावू', 'खरा आनंद', 'रानात जाऊ', 'बचत विजेची',  'मंत्र' यासारख्या प्रबोधनात्मक कवितांची भर असल्याने नकळतपणे कवीने बालमनावर उत्तम संस्कार रुजवण्याचे बहुमोल कामही केले आहे.

'मज्जाच मज्जा' मध्ये काय नाही...
त्यात दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. भरपूर खेळ अन् खाऊ आहे. हवाहवासा वाटणारा पाऊस आहे, पावसाच्या सरी आहेत. जत्रेतील गमतीजमती आहेत. रानावनातील प्राणी आहेत. आजीच्या छान छान गोष्टी आहेत. एवढेच काय मांजर आणि बोकोबाही आहे. चित्रपटनायक माकड आहे, पार्श्वगायक गाढव आहे. भरीस भर म्हणजे जंतरमंतर जादू आहे. सर्कशीतला विदूषक आहे, त्याच्या हसवण्याच्या करामती आहेत.

रोजचे धकाधकीचे जीवन जगत असताना, आजच्या बालकुमारांच्या मनाला निर्भेळ आणि निर्मळ आनंद द्यायला हवा असं पालकांना वाटत असेल तर "मज्जाच मज्जा" हा बालकविता संग्रह त्यांना आवर्जून वाचायला द्यावा असं प्रकर्षानं वाटतं. आणि या संग्रहातील खालील एकच बालकविता वाचली तरी रसिक वाचक, पालक 'मज्जाच मज्जा' आपल्या बच्चे कंपनीसाठी आवर्जून घेतील असा विश्वास आहे...

        'नवल'
मांजरीचं तोंड ताकाने भाजलं
तेव्हा तिने 'बरनाॅल' लावलं!
कुत्र्याला एकदा शिंगं फुटली
पागोट्यात त्यानं लपवून घेतली!
माशाला जेव्हा सर्दी झाली
'विक्स'ची बाटली विकत आणली!
वाघाला जेव्हा फुटले पंख
ओरडून त्याने केला शंख!
रानात एकदा हे नवल घडलं
पेपरात सारं छापून आलं!
.

मज्जाच मज्जा     
(बालकविता संग्रह)...कवी सुभाषचंद्र वैष्णव, पुणे
                             भ्र.क्र. ९९६०९९४२४५
प्रकाशक...          दिलीपराज प्रकाशन, पुणे
                         दुरध्वनी क्र. ०२०/२४४७१७२३,
                              २४४८३९९५, २४४९५३१४
मूल्य...                ₹ १००/-
पुस्तक परिचय...  विनोद श्रा.पंचभाई, पुणे
                          भ्र. क्र. ९९२३७९७७२५

No comments:

Post a Comment