Thursday, September 28, 2023

थरार चोवीस तासातला... प्रस्तावना

 

प्रस्तावना...

*थर.. थर्र...थर्रारक कथानक!*
     रहस्यमय, गुढकथा म्हटलं की, अनेक नावं ठळकपणे समोर येतात ती म्हणजे बाबुराव अर्नाळकर, रत्नाकर मतकरी,  सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर, मुरली खैरनार, नारायण धारप, संजय सोनवणी, सदानंद भणगे इत्यादी. या यादीत एक नाव लक्षवेधीपणे समाविष्ट होते आहे ते म्हणजे विनोद श्रा. पंचभाई! 'हॉटेल हवेली' आणि 'सुगावा...The Clue' या दोन रहस्यमयी कादंबऱ्यानंतर पंचभाई यांची 'थरार चोवीस तासातला' ही नवी कोरी कादंबरी वाचकांच्या हातात येत आहे.
     विनोद श्रा. पंचभाई हे नाव साहित्य क्षेत्रात सर्वदूर परिचित आहे. ते केवळ रहस्य कथालेखक नाहीत तर ऐतिहासिक, चरित्र लेखन यासोबत त्यांनी बाल साहित्याचेही लेखन विपुल प्रमाणात केले आहे. एक अष्टपैलू साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. साहित्याच्या प्रांगणात मुक्तपणे विहार सुरू असताना लेखक पंचभाई रहस्यमयी कथालेखनाकडे का वळले असावेत याचे रहस्य ते ज्या खात्यात नोकरीला होते त्या पोलीस बिनतारी संदेश खात्यातील त्यांच्या सखोल अनुभव आणि अभ्यासाला द्यावे लागेल.
    साहित्य लेखन हा प्रकार तसा अवघडच! भरपूर वाचन, चिंतन, मनन, अनुभवाची शिदोरी यासह अनेक रस लेखनात येत असतात पण त्यासोबतच लेखकाचा आत्मविश्वास, धाडस अशा बऱ्याच गोष्टी लेखकाजवळ असायला हव्यात. इतर लेखनापेक्षा रहस्य, गुढ लेखन बरेच अवघड, गुंतागुंतीचे असते! रहस्य कथा म्हटलं की, कुणाच्या अंगावर रोमांच थरथरतो, कैक जणांच्या शरीरावर भीतीचे शहारे येतात तर अनेकांच्या मुखातून भीतीयुक्त चित्कार बाहेर पडतात. अनेकदा वाचक पुस्तकातील भीतीदायक मजकूर वगळून इतर कथानक वाचतो किंवा हातातील पुस्तक बाजूला ठेवतो आणि सुटकेचा निःश्वास सोडतो. अशाप्रकारचे लेखन करत असताना लेखकाची अवस्था नेमकी कशी होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! कारण कथानकातील प्रत्येक प्रसंग त्याला व्यक्तिशः जिवंत उभे करावे लागतात तसे करताना त्यांना भीती, हुरहूर‌ वाटत नसेल का? त्यांना प्रत्येक प्रसंग आणि शब्द अनुभवावा लागतो.
     'थरार चोवीस तासातला' ही अशीच एक विलक्षण रहस्यमय कादंबरी आहे. रहस्य कथा म्हटलं की, बहुतेक कथानकात खुनाची पार्श्वभूमी असते. या कादंबरीचा थरार अगदी कादंबरीच्या पहिल्या परिच्छेदापासून सुरू होतो... आय टी अभियंता असलेल्या तरुणीच्या खुनाने! या थरारक कादंबरीचे रहस्य केवळ चोवीस तासात उलगडले जाते हे आपल्या पोलीस खात्याचे यश, तत्परता, चातुर्य सिद्ध करणारे आहे.
    या कादंबरीत अंजली, अनुश्री, सोनम, मोनाली, सतीश, राकेश ही प्रमुख पात्रं आहेत. त्यांच्यासोबत अनुश्रीचे मामा-मामी, अंजलीचे आई-बाबा, अभिजित, राणे, वाॅचमन काशीनाथ, हरिया आणि त्याचा गुत्तेदार अशा काही पात्रांची नाममात्र उपस्थिती चंचुप्रवेश ठरते परंतु वाचकांच्या मनातील खुनी कोण यावर विचार करण्यासाठी रहस्यमय ठरते.
   अंजली -अनुश्री, सोनम-मोनाली या मैत्रिणींच्या दोन जोड्यांमध्ये स्वभाव, राहणीमान, वागणूक यात भिन्नता असली तरीही कॉलेजमधील होस्टेलच्या एका खोलीत त्या एकत्रित राहतात. अंजली -अनुश्री या दोघी बालपणापासून ते  महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकत्रच शिकतात. दोघींच्या मैत्रींची वीण इतकी घट्ट असते की, दोघी एकमेकींच्या संकटात धावून जातात. दोघींची राहणी एकदम साधी, सुसंस्कारित असते. दुसरीकडे सोनम-मोनाली यांचे वागणे एकदम विपरित असते, या दोघींचे वागणे अंजू-अनुला आवडत नाही पण चौघीही सोबत राहतात. सोनमच्या वाढदिवसाचा प्रसंग चौघी मैत्रिणींच्या स्वभावातील फरक स्पष्ट करणारा आहे.
     सतीश हा अनुश्रीचा मामेभाऊ! तोही नोकरीच्या निमित्ताने पुणे शहरात येतो. त्यावेळी अनुश्रीमुळे त्याचा अंजलीशी परिचय होतो. हा परिचय नंतर मैत्रीत बदलतो. मग मैत्रीचे सान्निध्य प्रेमात रुपांतरित व्हायला वेळ लागत नाही. मैत्रीचं बीज आणि प्रेमाचा सुकोमल अंकुर उमलत असताना पाच वर्षे लोटतात. परंतु तीव्र इच्छा असूनही पुढाकार कुणी घ्यावा या विचारात पाच वर्षे निघून जातात. वाचक ज्या गोष्टीची वाट पाहतात; सतीश शेवटी स्वतःचं मन अंजलीकडे मोकळं करतो. अंजलीही त्याला लगेच होकार देते आणि सतीश तिला भेटायला जातो तेव्हा एक अनपेक्षित वळण कथानकात येते... ते म्हणजे एक खून! कथानकाला वेळोवेळी अनपेक्षित वळण देण्यात लेखक विनोद श्रा. पंचभाई यांची लेखणी वाकबगार आहे.
     विशेष म्हणजे खून झालेल्या तरुणीला रहस्यमय कादंबरी वाचण्याची आवड असते. योगायोग म्हणावा की, दैवदुर्विलास म्हणावा की निसर्गाची करणी म्हणावी कारण तिचा खूनही रहस्यमय मार्गानेच होतो.
    या कादंबरीत मैत्रीचे वेगवेगळे पदर गुंफण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. अंजली -अनुश्री, सोनम-मोनाली, सतीश- अंजली, सतीश-राकेश आणि अंजलीच्या बाबांचे मित्रमंडळ हे सर्व जण एकमेकांना संकटसमयी जी मदत करतात तेव्हा पूर्वापार चालत आलेल्या मैत्रीची व्याख्या दृढ होते! ती म्हणजे,'संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र!'
    तरुणीच्या खुनानंतर पोलीसांचे चक्र वेगाने फिरत असताना ते सतीश, मोनाली, राकेश, अंजली यांच्या भोवती गरगरत असते. पोलिसांनी खुनाचा तपास करण्यासाठी वापरलेले सीसीटीव्ही फुटेजचे तंत्र आणि संशयित व्यक्तीचं लोकेशन तपासणं कौतुकास्पद आहे. तसेच लग्न करून दुबईला गेलेली मोनाली अचानक पाच वर्षांनी पुण्याला येते तीही अंजलीच्या सदनिकेत राहते. त्याचवेळी वाचकांच्या संशयाची सुईही विविध व्यक्तिरेखांकडे वळते; अगदी सतीश-अनुश्री यांच्याकडेही! कारण ही दोघे नात्याने मामेभाऊ - बहीण असतात आणि या नात्यांमध्येही विवाह होऊ शकतो.
    संशयित आरोपींची चौकशी सुरू असताना पोलिसांची चातुर्यता, कुशाग्र बुध्दी, बारीक नजर, दृढता इत्यादी गोष्टी वाचकांच्या दृष्टीसमोर आणण्यासाठी लेखक तन्मयतेने प्रसंगाचे वर्णन करतात आणि खून झालेली तरुणी कोण? तिचा खुनी कोण? या रहस्यावरचा पडदा बाजूला करतात तोही केवळ चोवीस तासात! पोलीस वर्ग... सलाम!
    कादंबरीत सतीशचा मित्र राकेश हा नोकरीसाठी कर्ज काढून लाखो रुपये देऊ करतो ही बाब खूप चिंतनशील तर आहेच परंतु एक जळजळीत सत्य उजागर करणारी आहे. सोबतच मैत्रीचे नाते निभावताना सतीश क्षणाचाही विलंब न करता होकार भरतो नि मित्राला लाखो रुपयांची मदत करतो ही बाब लक्षणीय आहे.
    या रहस्यमय कथानकाचे एक वैशिष्ट्य जाणवणारे आहे ते म्हणजे यातील संवाद! विशेषतः अंजलीचे बाबा दवाखान्यात 'आयसीयू'मध्ये असताना तिचा आईशी झालेला संवाद असेल किंवा अंजली -अनुश्री या दोघींमध्ये झालेली चर्चा असेल अत्यंत हृदयस्पर्शी आहेत.
   पोलीस आणि वाचकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विनोद श्रा. पंचभाई यांची 'थरार चोवीस तासातला' ही कादंबरी वाचायलाच हवी. अत्यंत साध्या, सरळ, सोप्या भाषेत परंतु वेगवेगळे वळण घेत उद्दिष्टांपर्यंत पोहोचणारी ही कादंबरी वाचनीय आहे, रहस्यमय असली तरीही कंटाळवाणी नाही! मित्रवर्य विनोद श्रा. पंचभाई यांच्या सर्वंकष लेखनासाठी भरपूर शुभेच्छा! धन्यवाद!
         ००००
      नागेश सू. शेवाळकर, पुणे
     भ्रमणध्वनी...९४२३१३९०७१

No comments:

Post a Comment