प्रस्तावना... 'चारोळ्या मनातल्या - जनातल्या'
लेखक, कवी मित्रवर्य श्री. प्रल्हाद दुधाळ यांचं जगण्यावर तसंच निसर्गावर निरतिशय प्रेम आहे. ते पेशाने बीएसएनएलचे अभियंता असले तरीही मनाने मात्र खूप संवेदनशील आहेत. ही अंतःकरणातील संवेदनशीलता त्यांच्या 'सजवलेले क्षण' आणि 'काही असे काही तसे' या कविता संग्रहातील बहरलेल्या काव्यप्रतिभेतून रसिक वाचकांना पदोपदी जाणवली आहेच! आता 'चारोळ्या मनातल्या - जनातल्या' या आपल्या आगळ्यावेगळ्या कलाकृतीमधून त्यांनी अत्यंत कमी शब्दांतून खूप मोठा आशय व्यक्त करण्याचा स्तुत्त्य प्रयोग रसिकासाठी सादर केला आहे.
कविता, गझल, चारोळी इत्यादी काव्य प्रकार साहित्याचा सर्वोत्तम आविष्कार असल्यामुळे कवीला ते अतिशय कमी शब्दात व्यक्त होणं आणि नंतर वाचकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहचवणं हे खरं तर आव्हानात्मक आणि जिकिरीचं काम असतं. मात्र दुधाळ सरांनी हे आव्हान 'चारोळ्या मनातल्या - जनातल्या'च्या माध्यमातून लीलया पेललं आहे. या अनोख्या चारोळी संग्रहात त्यांनी विविध विषयांवरील शंभराहून अधिक, एक से बढकर एक अशा अप्रतिम रचना मांडल्या आहेत. त्यातील चारोळ्या आशयसंपन्न आणि विचार करायला लावणाऱ्या तर आहेच, शिवाय काही रचना आजच्या तथाकथित समाजाला आरसा दाखवण्याचंही काम करतात. त्याचप्रमाणे प्रेमी जीवांना हुरहूर लावणाऱ्या, काळजाला हात घालणाऱ्या अन थेट पंढरीच्या वाटेची गोडी लावणाऱ्या रचना वाचताना वाचक अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाहीत!
"पाठीवरती घ्यावी थाप,
हात असे आता उरले कुठे?
लोटांगण घ्यावे तयाशी,
पाय असे आता उरले कुठे?" अशाप्रकारची मर्मस्पर्शी खंत 'उरले कुठे? या चारोळीतून व्यक्त करताना कवी आजच्या कोडग्या वृत्तीच्या राजकारण्यांनाही इशारा देताना त्यांच्या एका चारोळीत म्हणतात…
''सच्चे, शिक्षित व संस्कारी
निवडून असे देऊ कारभारी!
भ्रष्ट, कोडगे हाकलून द्यावे,
येईल समृद्धी देशाच्या दारी!''
कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कवी अगदी रोखठोकपणे जगण्याला प्राधान्य देताना दिसतात. तसेच ते आत्मसन्मानाने जगण्याचा संदेशही देतात. त्यांच्या पुढील 'आव्हान' या चारोळीतून त्याची प्रचिती येत असल्याचं प्रकर्षानं जाणवतं…
"आलोय मेटाकुटीला पेलताना
इथल्या या जगण्यातले आव्हान..!
कसे काय राखत बसावे भान
घडोघडी सोडून आत्मसन्मान..?"
त्याचप्रमाणे दैनंदिन जीवन जगत असताना सामाजिक भान राखण्याची आपल्याला किती नितांत आवश्यकता आहे हे त्यांच्या पुढील काही चारोळ्यामधून दिसून येईल. ते आजच्या तरूणांना निश्चित दिशा दाखवण्यासाठी म्हणतात…
"विचारांची दिशा
बदल रे थोडी.
वाढेल निश्चित
आयुष्याची गोडी!"
तसेच आपल्या माय मराठी भाषेविषयीची तळमळ व्यक्त करताना कवी…
"शिवजयंती, महाराष्ट्र दिनाला
मराठीचा नगारा वाजतो.
एरवीला मराठी माणूस,
घरातही इंग्रजीच बोलतो!"
अशाप्रकारचे खडे बोल सुनावण्यास कमी करत नाही. तसंच आपल्या आसपास वावरणाऱ्या माणसांची ओळख ही त्यांच्या वागण्या बोलण्यातून तर होतेच पण खरी ओळख मात्र त्यांच्या विचारातूनच होत असते. हे अधिक स्पष्ट करताना कवी दुधाळ निर्भीडपणे व्यक्त होतात… "अशी माणसे ही
कशी माणसे..? खुजी विचाराने
नव्हे माणसे ही…!"
त्यांची अफाट निरीक्षणक्षमता आणि समाजाविषयीची जागरूकता पुढील काही चारोळ्यामधून प्रकर्षाने जाणवते. त्यावर गांभीर्याने चिंतन करणे नितांत गरजेचं आहे असं वाटतं…
"निसर्ग चक्राशी खेळणं
आतातरी थांबायला हवे.
प्रकोप झाला निसर्गाचा
त्यावरून शिकायला हवे!"
"धन दौलत बंगला गाडी
व्यर्थ जर नाही तेथे नीती,
माणुसकी धर्म हवा
अन् दिलदार मनाची श्रीमंती!"
"सांभाळूनच जरा मुली
नाजूक तुझी गं पावलं
थिरकू दे तालासुरात
दाखव कौशल्य आपलं!"
"जरी दाटले मळभ,
तरी सोडू नये आस.
कोंदटली जरी हवा,
मातीचा येतोय वास!"
कवी प्रल्हाद दुधाळ यांची पंढरीच्या विठूमाऊलीवर अढळ श्रद्धा आहे. सरळ साधं आयुष्य जगत असताना ऐहिक सुखाच्या मागे न धावता हरिनामाचं महत्त्व ते पटवून देतात. अतिशय कमी शब्दात ते नामाचा महिमा मांडताना म्हणतात ... "नामाचा महिमा वर्णावा तो किती ब्रह्मानंदी टाळी घेता विठूनाम..! नाचती ठेक्यात टाळ मृदंगाच्या भक्तीच्या या उत्सवी नुरते भान..!"
"ऐहिक सुखाचा मार्ग तो जीवघेणा
पांडुरंग नामाने डोळे ओलावले..!
आषाढी भीमेकाठी वैष्णवांचा मेळा
पाय पंढरीच्या वाटेने ओढावले!"
चारोळी काव्यप्रकारात केवळ चार ओळीत किती मोठा मतितार्थ दडलेला असतो हे उलगडताना त्या अवघ्या चार ओळी प्रभावीपणे कशा मांडता येतील हे खरं कसब कवीच्या ठायी असावं लागतं. कवी प्रल्हाद दुधाळ यांनी हे शिवधनुष्य उत्तमरित्या पेललं असल्याचं वाचकांना त्यांची प्रत्येक चारोळी वाचताना जाणवेल हे निश्चित! त्यांच्याच शब्दात...
"मोजक्या शब्दांची
अर्थपूर्ण मोळी
संवाद साधते
छोटीशी चारोळी!" असा संवाद साधत त्यांनी पुढील चारोळीतून नाती फुलवण्याचा अनमोल संदेश देत मानवी जीवनातलं चैतन्य अधोरेखित केलं आहे… "माया ममतेचा फिरता हात घराचे या सुंदर होते गोकुळ. संवादानेच फुले नातीगोती जीवनातल्या चैतन्याचे मूळ!"
'चारोळ्या मनातल्या - जनातल्या' या अप्रतिम कलाकृतीसाठी लेखक, कवी श्री. प्रल्हाद दुधाळ यांचे मनापासून अभिनंदन! तसेच त्यांच्या पुढील दर्जेदार साहित्य सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा!
…विनोद श्रा. पंचभाई, पुणे
भ्रमणध्वनी : 9923797725
No comments:
Post a Comment