मनोगत… (थरार! चोवीस तासातला…)
शहरातील गँगवॉरचा आणखी एक बळी! राजकीय वैमनस्यातून सूड उगवला! संपत्तीच्या वादातून जवळच्या नातेवाईकाचा निर्घृण खून! अशाप्रकारच्या बातम्या कानावर पडणं आता नित्याचंच झालं आहे. त्या आपल्या चांगल्याच अंगवळणी पडल्या आहेत. परंतु काही कारण नसताना एखाद्या व्यक्तीचा हकनाक जीव जातो त्यावेळी मात्र आपल्याला निश्चितच वाईट वाटल्याशिवाय राहत नाही. अशावेळी 'अरेरे… बिचारा नाहक जीवानिशी गेला!' म्हणून समाजात हळहळ व्यक्त होताना आपण पाहतो! कोणी सामान्य माणूस सरळ रस्त्यावरून चालत असताना किंवा रस्ता ओलांडत असताना एखादे अज्ञात वाहन अचानकपणे येऊन त्याला धडकते आणि त्या माणसाला गंभीर इजा पोहचते. कधीकधी त्याच्या प्राणावरही बेतते आणि अशावेळी त्याचा हकनाक जीवही जाऊ शकतो! अशा दुर्दैवी प्रसंगी त्या सामान्य माणसाची काहीही चूक नसताना त्याला आपला अमूल्य जीव गमवावा लागतो. दैनंदिन जीवन जगत असताना अशाप्रकारच्या दुर्दैवी घटना घडताना आपण कधीकधी दूरदर्शनच्या वाहिन्यावर बघत असतो अथवा वृत्तपत्रांत देखील अशा अघटित बातम्या आपल्या वाचनात येत असतात.
त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती नियतीच्या सापळ्यात अशी काही अडकत जाते… की तिची काहीही चूक नसताना तिच्यावर अनवधानाने जीवघेणा हल्ला होतो आणि तिला आपल्या प्रिय प्राणाला मुकावं लागतं! एका हसत्या खेळत्या आयुष्याचं नकळतपणे एकाएकी होत्याचं नव्हतं होऊन जातं. अशा घटना डोळ्याने बघितल्या किंवा नुसत्या कानाने ऐकल्या तरी सर्वसामान्य माणसाची मती गुंग होऊन जाते, मन बधीर होतं! मग त्यातून सावरायला त्याला वेळही लागतो… सारखी तीच तीच घटना त्याच्या डोळ्यासमोर येत असते!
माझ्या 'थरार! चोवीस तासातला' या रहस्यमय कादंबरीत एका सरळ साध्या, निष्पाप तरुणीचा तिच्या ध्यानीमनी नसताना, कुठलाही अपराध नसताना तिची नृशंसपणे हत्या करण्यात येते आणि त्यात तिच्या सुंदर जीवनाची अवचितपणे अखेर होते! मनासारखी नोकरी करत सर्व काही नीट, व्यवस्थित सुरू असताना एका क्षणात आयुष्याची राखरांगोळी होऊन जाते. कुणाशी काही देणं घेणं नसताना, ना कुणाच्या अध्यात ना मध्यात असताना एक सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या तरुणीला आपल्या बहुमूल्य प्राणाची किंमत मोजावी लागते! का घडतं असं? तिच्याच बाबतीत असं का घडतं? कोण असतो तिचा अज्ञात मारेकरी? का संपवलं जातं तिला? काय रहस्य असतं तिच्या निर्घृण खुनाचं?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यानंतर उलगडत जाणारं रहस्य जाणून घेण्याचा आगळावेगळा थरारक अनुभव 'थरार चोवीस तासातला' वाचताना रसिकवाचकांना आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ही कादंबरी शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या कादंबरीपूर्वी प्रकाशित झालेल्या "हॉटेल हवेली" आणि "सुगावा…The Clue" या माझ्या दोन्ही विलक्षण रहस्यमय कादंबऱ्यांना वाचकांनी उत्स्फूर्तपणे भरघोस असा प्रतिसाद दिला. अनेकांनी फोन करून त्यावर चर्चाही केली. त्याबद्दल मी रसिकवाचकांचा आत्यंतिक ऋणी आहे.
'थरार चोवीस तासातला' या कादंबरीसाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री. नागेश शेवाळकर सरांनी त्यांच्या अनोख्या शैलीत आणि सुंदर, प्रवाही भाषेत लिहिलेली प्रस्तावना लाभली आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो. प्रसिद्ध चित्रकार श्रीकृष्ण ढोरे यांनी कादंबरीच्या विषयाला साजेसं मुखपृष्ठ चितारलं आहे. तसेच आर्टिस्ट संगीता जावळकर यांनी सुंदर सजावट आणि लेआऊट करून दिले. पुण्यातील 'दुर्वा एजन्सीज'चे प्रकाशक शैलेंद्र कदम यांनी 'थरार चोवीस तासातला'च्या रहस्यमयी कथानकाला पुस्तकरूप बहाल करून दिले. या सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद देतो. 'दुर्वा एजन्सीज' या प्रकाशन संस्थेने आतापर्यंत माझी 'आपले राष्ट्रपती : डॉ. राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद, ओळख भारतीय शास्त्रज्ञाची, हॉटेल हवेली, भारताचे पंतप्रधान : पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी आणि सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रौपदी मुर्मू अशी विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली आहेत. या सर्वच पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आता 'थरार चोवीस तासातला' ही शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी रहस्यमय कादंबरी रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे. धन्यवाद!
… विनोद श्रा. पंचभाई
No comments:
Post a Comment