वाचाल तरच वाचाल...
असं म्हणतात... "अजून काही वर्षानंतर आपण कुठं असणार हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र त्यावेळी आपल्या सहवासात येणाऱ्या चांगल्या व्यक्ती आणि हातात पडणारं योग्य पुस्तक या दोनच गोष्टी आपली योग्य दिशा ठरवण्यास पुरेशा असतात." या धकाधकीच्या जीवनात बरेचदा आपल्याला मनाच्या द्विधा अवस्थेचा सामना करावा लागतो. आपल्या अडचणी, मनाची व्यथा कुणाजवळ सांगू शकत नाही. या जगात कुणीही आपल्याला समजून घेणारं नाही असंही त्यावेळी प्रकर्षानं जाणवतं! अशावेळी कधीकधी नैराश्यही येतं. निर्णयक्षमता जणू कुंठित झाली की काय अशी वेळ आपल्यावर येते. मनाच्या या दोलायमान अवस्थेत एखादं पुस्तक हाती पडलं तर ते निश्चितच मार्गदर्शक ठरू शकतं. आपण कुठल्या प्रकारचं वाचन करतो यावरही बरंच काही अवलंबून असतं. तसं पाहता प्रत्येक पुस्तकात काही ना काही तरी संदेश दडलेला असतोच. असंच एखादं पुस्तक आपल्याला बरंच काही शिकवून जातं, ज्याची आपण कधी कल्पना सुद्धा केलेली नसते.
डाॅ. अब्दुल कलामांसारख्या आदर्श व्यक्तीचं चरित्र आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतं. अशा प्रेरणादायी पुस्तकामुळे एखाद्याचं पुढील आयुष्य बदलू शकतं एवढं सामर्थ्य पुस्तक वाचनात निश्चितच असतं. आपल्या मराठी भाषेत वेगवेगळ्या विषयांवरील विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहेत. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, महाराणा प्रतापसिंह यांंच्यासारख्यांचं अचंबित करणारं थोर कार्य, त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले असंख्य क्रांतिकारक आणि महापुरूषांचं अपूर्व योगदान वाचताना पुस्तक हातातून सुटत नाही हेच वाचनाचं खरं सामर्थ्य आहे. तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा अनेक थोर संतमहंतांची परंपरा लाभलेल्या आपल्या देशाला त्यांच्या समाज प्रबोधनानं एक प्रकारची संजीवनी प्राप्त झाली आहे. त्यांच्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या संतसाहित्यात सर्वसामान्यांचं आयुष्य बदलण्याची, योग्य दिशा देण्याची शक्ती नक्कीच आहे. आपल्याला गरज आहे फक्त ते मनापासून वाचण्याची!
वाचन ही अशी सवय आहे ज्यामुळे कुणालाही तिच्यापासून त्रास होत नाही. वाचन करायला निश्चित वेळ लागत नाही, जागा लागत नाही. वाचन कधीही, कुठेही मनात आलं तेव्हा आपण करू शकतो. घरात वीज पुरवठा असो किंवा नसो, पुस्तक वाचन करताना त्याची आवश्यकता भासत नाही. आणि एकटं असताना तर पुस्तकासारखा दुसरा सच्चा मित्र नाही, हा अनुभव अनुभवल्यावरच येऊ शकतो. पुस्तक वाचताना तुम्ही कधी गंभीर होता तर कधी खळखळून हसूही शकता! तसंच काही पुस्तकातील विचार कधीकधी अचंबित करणारे असतात तर कधी ते आपल्याला अंतर्मुख पण करतात!
आपण आपल्या कुटुंबियांसह एखादा सिनेमा बघण्यासाठी जातो तेव्हा आपले कमीत कमी हजार रूपये तरी सहज खर्च होतात. त्यापासून सर्वांना तीन तासात मनोरंजन मिळतं, काही अंशी प्रबोधन होतं. एखादा संदेशही मिळतो हे ठीकच आहे. मात्र त्याच हजार रूपयात जर वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके घरी आणली तर आपण ती वेळ मिळेल तशी वाचू शकतो. घरातील सगळे सदस्य तसंच शेजारीही त्याचा लाभ घेऊ शकतात. गरज आहे केवळ आपली मानसिकता बदलण्याची!
पुस्तकासाठी खर्च करणे ही संकल्पनाच कित्येक लोकांना मान्य नसते. काही व्यक्ती ऊठसूट कुठल्याही गोष्टीवर पैसे खर्च करतील मात्र साधं वर्तमानपत्र वाचायचा शेजारी मित्राकडे जातील, ही वस्तुस्थिती आहे. पैसे देऊन वर्तमानपत्र किंवा एखादं छोटं पुस्तक विकत घेणं यांच्या पचनीच पडत नाही. याला अपवाद असणारे मित्रही असतात, नाही असं नाही! आवडलेल्या एकाच पुस्तकाच्या पाच-दहा प्रती घेऊन आपल्या मित्र, नातेवाईकांना भेट देणारेही सच्चे वाचनप्रेमी कधीकधी आपल्याला भेटतात. याठिकाणी सांगायचा मुद्दा असा की, अशाप्रकारच्या पुस्तकप्रेमी मित्राकडून भेट स्वरूपात पुस्तक हस्तगत करण्याची वाट न बघता स्वतःजवळचे पैसे स्वतः खर्च करून पुस्तक खरेदी करावं आणि आपली वाचनाची हौस वृद्धिंगत करावी असं वाटतं. बघा पटतंय का??😊
...विनोद श्रा.पंचभाई, पुणे
No comments:
Post a Comment