*माणूस म्हणून जगताना...*
एक छोटासाच प्रसंग! दोन छोटी मुलं,असतील आठ दहा वर्षे वयोगटातील. शाळा सुटल्यावर आपापले दप्तर सांभाळत, बसची वाट बघत, आपापसात गप्पा मारत झाडाखाली उभी होती. त्यांचं संभाषण ओघानेच माझ्या कानावर पडलं...
"अरे चिन्या, म्हटलं आज माझा वाढदिवस आहे".
"मग तुझे बाबा तुझ्यासाठी केक आणणार का..?" चिन्याचा भाबडा प्रश्न.
" नाही रे राजा... माझी आई मस्त पैकी पुरणपोळी करणार आहे आज. मग मी बाबांची टोपी घालून पाटावर बसणार. आई मला ओवाळणार आणि हो बाबा माझ्यासाठी दहा रूपयेवाला मोठ्ठा चाँकलेट पण आणणार आहेत.त्यातला तुला मी उद्या नक्की देणार बरं का चिन्या!"
"हो...बस आली बघ माझी, भेटूया उद्या , चल" असं ओरडतच चिन्या बसमध्ये चढला. त्याच्या पाठोपाठ मीही चढलो.
खरंच माणूस जन्माला आला की खरं निखळ आयुष्य हे बालपणीच उपभोगायला मिळतं. किती निरागसता अन् भाबडेपणा असतो तेव्हाच्या त्या वागण्यात!तेव्हा स्वार्थाचा व खोटेपणाचा लवलेशही नसतो बोलण्यात, कारण त्या वयात विचार करून काहीच बोलावं लागत नाही ना... ना अहंकार, ना मत्सर! कुणाशी हेवेदावे नको की कुणावर कुरघोडी नको. एकमेकांवर रागावणं तेही काही मिनिटांपुरतं, मग गळ्यात गळे घालून पुन्हा जैसे थे! म्हणूनच संतांनी म्हटलं आहे,"लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।"
कालांतराने जसजसे वय वाढत जाते, माणूस मग षडरिपूंच्या चक्रव्यूहात अडकला जातो. तेव्हा तो आपली सद्सद्विवेक बुध्दी गहाण ठेवून चुकीचे निर्णय घेण्यास अनेक वेळा बाध्य होतो.मग 'जोरोका झटका' लागला की त्याचे पाय जमिनीवर येतात पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आपण ज्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, मनापासून त्यांच्या वर प्रेम करतो, तेच कधी कधी असे वागतात की आपल्यालाच अपरिचित वाटू लागतात! आपलं नेमकं काय चुकलं ते आपलं आपल्यालाच कळत नाही. अशावेळी अपेक्षाभंगाचे जीवघेणे क्षण आपल्या अगदी जवळच्या माणसांकडून आपल्या वाट्याला येत असतात. अन् एक मात्र खरं, हे अपेक्षाभंगाचं दु:ख परक्या व्यक्ती कडून होणं शक्य नसतं. कारण अपेक्षा या केवळ आपल्याच माणसांकडून केल्या जातात... त्यांना आपले जवळचे समजून! आयुष्यभर आपण आपल्या माणसांसाठी जिवाचं रान करतो मात्र त्या प्रामाणिक प्रयत्नांचं योग्य चीज झालं नाही तर अपेक्षाभंगाचं दु:ख होणारच!कधी कधी असं वाटतं माणसांपेक्षा प्राणी परवडले...एखाद्या कुत्र्याला तुम्ही रोज साधं बिस्कीट खायला द्या, तुमची साथ द्यायला मग तो रात्रंदिवस तयार असतो.
परमेश्वरानं दिलेलं बहुमुल्य जीवन जगत असताना आपलं शरीर हे नाशवंत आहे हेच नेमकं आपण विसरायला लागलो आहे. तरीसुध्दा त्याचा आपल्याला ताठा, अभिमान तरी किती..! क्रांतिकारी संत कबीरांचं वचन आहे...
"यह तन काचा कुंभ है,लिया फिरै थे साथ।
टपका लागा फुटि गया, कछू न आया हाथ।"
माणसाचं शरीर म्हणजे मातीचा कच्चा घडा आहे आणि ते खरंही आहे. या शरीराचा कुठल्याही क्षुल्लक कारणानं कधी नाश होईल हे कुणी सांगू शकतं का? कबीरजी पुढे म्हणतात...
"माटी कहे कुम्हारसे क्या तू रोंदे मोहे।
एक दिन ऐसा आवेगा मै रोंदूगी तोहे।"
अर्थात, कुंभारानं मातीला पायाखाली कितीही तुडवलं तरी त्याचंही शरीर एक दिवस त्या मातीतच जाणार असतं हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे दोष न बघता त्यांच्यातील केवळ गुण बघून त्याकडे आपण लक्ष दिलं तरच माणूस परक्यावरही, अगदी आपल्या शत्रुवरही प्रेम करू शकतो. नेमकं हेच वास्तव संत कबीरांनी पुढील दोह्यात प्रकट केलं आहे...
"बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोय।
जो दिल खोजा आपना,मुझसा बुरा न कोय।"
इतरांचे दोष न बघता स्वतःमधीलच दोष शोधून ते नाहीसे करण्याचा प्रत्येक माणसाने प्रयत्न केला तर हे जग किती सुंदर होणार नाही का! रूढी, परंपरा, मानपान असल्या तद्दन फालतू गोष्टींसाठी आज माणूस, आपल्या माणसांपासून दूर होताना दिसतो. किरकोळ स्वार्थापोटी त्यांचा अहंभाव जागृत होताना दिसतो. काही दिवसांपूर्वीचा एका परिचिताकडील एका पारंपरिक सोहळ्यातील प्रसंग येथे नमूद करतो... बरीच आप्तेष्ट मंडळी आपल्या कुटुंबियासह सोहळ्याला जमलेली. काही सधन घराण्यातील, काही उच्च विद्याविभूषित तर काही आपले सर्वसाधारण मध्यमवर्गीय!तर अशा या भव्य सोहळ्यासाठी कोण कोण, काय काय कपडे परिधान करून आलं...कोण कुठली साडी नेसून आली याकडेच बहुतेकांचं जास्त लक्ष. बरं आजकाल "रिटर्न गिफ्ट्स"ची पध्दत असल्याने ते गिफ्ट तोडीस तोड मिळालं नाही तर पुन्हा रुसवे फुगवे, अबोला हेही ओघाने आलंच.अशावेळी "तुमचं फंक्शन गेलं खड्ड्यात, आमचा काही मानपान आहे की नाही" अशी टोकाची वाक्यं बोलायलाही माणसं कमी करत नाहीत.अन् अशाप्रकारच्या सोहळ्यात थोडी 'टाकून' आलेल्या व्यक्ती सामील झाल्या तर मग विचारायलाच नको. मग त्यांची उतरेपर्यंत गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो. यावेळी सामोपचाराने न घेता वाद वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले तर माणसं कायमस्वरूपी दुरावली जातात. मग त्यात "सुक्याबरोबर ओलंही जळतं" या न्यायाने ज्यांचा अशा प्रकारच्या घटनेस काडीचाही संबंध आलेला नसतो, त्यांनाही भुर्दंड सोसावा लागतो.
असं म्हणतात, माणसं तोडायला एक क्षुल्लक क्षण पुरेसा ठरतो, पण माणसं जोडायला कित्येक वर्षे, तपं उलटतात!कधी कधी तर पिढ्यानपिढ्या अबोला, खुन्नस कायम 'टिकवलेली' असल्याची काही खानदानी कुटुंबाची परंपरा आपल्या बघण्यात येते. कारण काय तर घराण्याची इज्जत... वा रे इज्जत..! एकमेकांशी प्रेमाने बोलल्याने, मधुर व्यवहार केल्याने 'यांची' इज्जत जाते. त्यापेक्षा गरीब बिचारे मुके प्राणी गुण्यागोविंदाने गावागावात बागडताना दिसतात.
"कोण दिवस येईल कसा कोण जाणतो?" या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे येणारा काळ खरंच खूप कठीण आहे. 'माणूस' म्हणून जगताना आपल्या समोरचाही 'माणूसच' आहे याचे आपण सदैव भान ठेवायला हवे. आणि एक दिवस कधीतरी अचानक आपल्याला शेवटच्या प्रवासाला "जाणे" आहे याची जाण सुद्धा ठेवायला हवी. भिन्न भिन्न परिस्थिती, संकटे ही थोड्याफार फरकाने प्रत्येकावरच येत असतात. त्यावर मात करण्यासाठी आज माणसातील "ईन्सानियत"ची खरी गरज आहे.
"माणसाने माणसाशी
माणसासारखे वागावे।
स्वार्थासाठी नाही तर
परोपकारासाठी जगावे।
.....विनोद श्रा.पंचभाई, पुणे
मो.क्र.९९२३७९७७२५
No comments:
Post a Comment