तेरी हंसी की किमत क्या है
शेजारी राहणाऱ्या चौधरींचा मकरंद, दहा वर्षाचा गोड चुणचुणीत मुलगा. सदा हसतमुख. मित्रांशी गप्पा करताना खळखळून हसायचा. शाळेत कुठल्याही सरांच्या प्रश्नाचं हसूनच उत्तर देणं त्याच्या स्वभावाचा एक भाग बनला होता.
एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली! शाळेच्या जिन्यावरून उतरताना मकरंद पाय घसरून पडला व घरंगळत सरळ खाली आला. त्याच्या डोक्याला, कपाळाला खूप मार लागला! जीव वाचला पण दृष्टी मात्र गेली. बरेच उपचार केले. एकाहून एक निष्णात डॉक्टरांना दाखवून झालं पण प्रतिसाद शून्यच! दृष्टी नसतानाही मकरंद लवकरच सावरला. नेहमीसारखाच सगळ्यांशी तो हसत बोलू लागला.
जवळपास नऊ वर्षांनी मकरंदच्या आयुष्यात चमत्कार घडला! त्याला अंधुकसं दिसायला लागलं. मग काही दिवसांच्या औषधोपचारांनी व एका छोट्या ऑपरेशनने त्याची दृष्टी पूर्ववत आली. डोळ्यावरची पट्टी काढताना त्याला वाटलं... 'आता सगळेच आपलं हसूनच स्वागत करणार!' मग हसऱ्या चेहऱ्यानं, उत्सुकतेनं, हळूहळू त्यांनं डोळे उघडले पण कसचं काय! प्रत्येकाच्या मुखकमलावर त्याला कमालीचा तणावच दिसला !
'रूसूबाई रूसू, कोपऱ्यात बसू! येऊ दे ना गाली तुझ्या खुदकन हसू!' हे गाणं बहुतेकांनी आपल्या बालपणी नक्कीच ऐकलं असणार. तसंच काहींनी ते अनुभवलंही असणार! म्हणजेच बालपणीचं हसू किती निर्मळ, निर्व्याज असतं, नाही? त्यात एकप्रकारचा प्रांजळपणा, सच्चेपणा असतो. म्हणूनच म्हणतात ना... 'मुलं म्हणजे देवाघरची फुलं!' नुकत्याच उमललेल्या, बहरलेल्या फुलांसारखं असतं छोट्या मुलांचं हसू... त्यात खोटेपणाचा लवलेशही नसतो!
मग जसजसं आपण मोठं होत जातो, तसतसं ओठावरचं हसू हळूहळू लुप्त व्हायला लागतं! शाळेत कुणा मित्राची फजिती झाली तर किंवा कुणी जिन्याच्या पायऱ्यांवरून चालताना पडला तर लगेच मोठ्यानं निलाजरं हसायचं असे प्रकार सुरू होतात. या अशा प्रकारातूनच मग कधीकधी आपापसात एकप्रकारची खुन्नस निर्माण होते! त्यातूनच एकमेकांवर कुरघोडी करत 'कशी जिरवली' असा आव आणत खोटं खूनशी हसू काहींच्या चेहऱ्यांवर दिसू लागतं. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना एखाद्या विद्यार्थ्यांची उडालेली भंबेरी बघूनही कित्येकांना आपलं हसू आवरत नाही!
कालांतराने शाळेनंतर मग महाविद्यालयीन जीवनाची सुरूवात होते. तेव्हा मोठ्या शहरातील धनिकांची मुलं, छोट्या गावातून किंवा ग्रामीण भागातून आलेल्या नवख्या विद्यार्थ्यांच्या राहणीमानावरून, त्यांच्या भाषेवरून हमखासपणे हसताना दिसतात.... हे हसू निश्चितच कुत्सित किंवा छद्मी प्रकारातलं असतं! तसंच महाविद्यालयात नवीनच शिकवायला आलेल्या एखाद्या प्राध्यापकावर काही विद्यार्थी नको त्या प्रश्नांची सरबत्ती सुरू करतात. वर्गातील काही टारगट मुलं त्या प्राध्यापकालाच 'टार्गेट' करून पूर्णपणे 'हसी का पात्र' बनवून टाकतात! तसंच काही महाविद्यालयात 'रॅगिंग'चे प्रकारही बघायला मिळतात. तेव्हा तर प्रथमच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पार रडकुंडीला आणताना... 'आपण खूप मोठा पराक्रम गाजवला' अशा आवेशात कित्येक महाभाग दात काढत जल्लोष करताना दिसतात. असे प्रकार इतक्यात खूपच गंभीर स्वरूप धारण करत असल्याचं दृश्य दुर्दैवानं बघण्यात येतं!
कुणाच्या व्यंगावर, लाचारीवर, फजितीवर हसू नये! तसेच कुणाच्या गरीबीवर अन् संकटात असलेल्यांवर तर अजिबात हसू नये. उलट त्यांना काही मदत करता आली तर उत्तमच! आता बघा, आपल्या एखाद्या मित्राने हलकाफुलका विनोद केला तर त्यावेळी त्याला मनमुराद हसून दाद नक्कीच द्यावी, मात्र कुणाच्या व्यंगावरून पाणचट विनोद करायची काही गरज आहे का ? कुणाची भावना न दुखावता निखळ विनोदनिर्मिती करणं आजकाल फारच दुर्मीळ होत चाललंय हे इथं खेदानं नमूद करावं लागतं!
'जिंदगी हसने गाने के लिए है' हे गाणं म्हणत सतत फिदीफिदी हसत राहणंही बरं नाही, तर या गाण्याचा मतितार्थ जाणून त्याप्रमाणे वागणंच खरं शहाणपणाचं! आपण आपल्या रोजच्या धावपळीत हल्ली सहजतेनं हसणंच विसरून गेलो आहे म्हणा ना... नाही म्हणायला सकाळी अनेक हास्य क्लबांमधून हसण्याचे विविध आवाज आपल्या कानी पडतात. मात्र त्या हसण्याला निर्व्याज, निखळ हसू म्हणू शकतो का आपण? बरं, एखादा विनोदी चित्रपट बघायला जायचं म्हटलं तर त्याची किंमत मोजूनच तो बघता येणार, नाही का...? म्हणजेच आता हसायलाही पैसे मोजावे लागतात असंच ना! कधीकधी अशाप्रकारचा विनोदी चित्रपट एकदम रटाळ, ज्यात ओढून ताणून तयार केलेले विनोद असतील तर मग काही विचारूच नका. त्यावेळी असा चित्रपट बघून, चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपण स्वतःचंच हसू करून घेतो अगदी नाईलाजास्तव..!
हसण्याने आपले आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते, हसण्यामुळे ताणतणाव कमी होतो हे सगळं ठीक आहे. मात्र त्यासाठी हसणंही नैसर्गिक हवं ना! ओढून ताणून चेहऱ्यावर हसू आणणं, आपल्या आजूबाजूचे हसतात म्हणून आपणही विनाकारण हसणं याला काय अर्थ? निर्भेळ, नैसर्गिक हसू सध्या लोप पावत चाललंय की काय अशी परिस्थिती सर्वत्र दिसत आहे! अशा गंभीर परिस्थितीला आपले आपणच कारणीभूत आहोत याबाबत कुणाचं दुमत नसावं. आता बघा ना... मूल अडीच तीन वर्षाचं झालं की त्याला शिक्षणाच्या नावाखाली नर्सरीच्या वर्गाला जुंपतो ते आपण सुजाण पालकच ना..! आपण पालक तर आपलं हसू हल्ली विसरतच चाललोय म्हणा... मात्र आपल्या चिमुकल्या बाळाचंही नैसर्गिक, निर्व्याज, बालसुलभ हसू नकळत आपण हिरावत तर नाही ना? याची जाणीव ठेवण्याची आज खरी गरज आहे!
हसा, अगदी खळखळून मनसोक्त हसा... कसलंही 'टेंशन' न घेता हसा. मात्र काळाचं, वेळेचं भान ठेवूनच आपण हसायला हवं. सर्कसमधील विदुषकाच्या निरनिराळ्या करामती बघून हसायला हवं. अस्सल व दर्जेदार विनोद निर्मितीला दाद देऊन दिलखुलासपणे हसायलाच हवं! नाहीतर आपल्या बघण्यात काही महाभाग असेही येतात... ज्यांच्या नाकावरची साधी माशीही उडत नाही. अगदी गुदगुल्या केल्या तरी यांना हसू येणार नाही! म्हणूनच आपल्यावर दुर्दैवानं कधीही अशी वेळ न येवो, की लोक नाईलाजाने विचारतील... "बता तेरी हँसी की किमत क्या है?"
किसी को दिल मे बसाकर तो देखो!कि
सी को थोडा हसाकर तो देखो!!
विनोद श्रा. पंचभाई
9923797725
No comments:
Post a Comment