"दिशा"
रोज-रोज असे मरण्यापेक्षा एकदा कायमचे मेलेले बरे असा विचार करत रमेश तडक रेल्वे स्टेशनकडे निघाला. चालताना निरनिराळ्या विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली आपल्यापासून कोणालाच काही सुख नाही, उलट आपला प्रत्येकाला त्रासच होतो हे त्याला पदोपदी जाणवत होते. सगळे कसे हिडीस फिडिस करायचे. आपल्या जाण्याने कुणाला काहीच फरक पडणार नव्हता. उलट नस्ती ब्याद गेली म्हणून सगळेच सुस्कारा सोडतील. विचार करता करता रमेशला 'त्या' रात्रीची आठवण आली... त्या मदनच्या संगतीने आपल्याना हे न सुटणारं व्यसन जडलं! मात्र आता पश्चाताप करुन काय उपयोग होणार ?
रात्रीच्या किर्र अंधारात रमेश स्टेशनच्या मागील बाजूने चालू लागला. आजू बाजूला कोणी बघणारे नव्हतेच. तरीही सावध नजरेने तो दूर असलेल्या रुळाकडे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्र. ६ कडे जाण्यासाठी वळला. मध्यरात्र उलटून गेली होती. त्यामुळे प्लॅट फॉर्मवर गर्दी अशी नव्हतीच. पलीकडे असलेल्या जवळच्या वस्तीतील काही टवाळखोर पोरं गप्पात रंगून गेलेली त्याला दिसली. मग मागे वळून न बघता तो झपझप पावले टाकत दूरपर्यंत जाऊन पोहचला. नंतर पुढच पाऊल टाकणार तोच कुत्र्याचं भुंकणे त्याच्या कानावर पडलं. त्याने चमकून शेजारच्या झुडूपात बघितलं. तर कुत्र्यांचे अख्खे कुटूंब त्याच्याकडे बघून गुरगुरत होते. घामाघुम अवस्थत रमेश माघारी फिरला. मग कसलासा विचार करून त्याची पावलं प्लेटफॉर्मकडे चालू लागली. गाडी येण्याची सुचना (उद्घोषणा होईपर्यंत) मिळेपर्यंत प्लॅटफॉर्मवरच थांबावे असा विचार करून तो चालू लागला.
" गाडी नं. ३१३३ निर्धारित वेळेपेक्षा साडेतीन तास उशीराने येणार" असे कळल्याने रमेश रेल्वे स्टेशनच्या प्रतिक्षालयात घुसला. तेथे त्याला एक मोठी सुटकेस आणि एअरबॅग दिसली. त्याशिवाय तिथं त्याला कुणीही आढळून आले नाही. कोणाचे सामान असेल हे ? असा विचार करत असतानाच त्याला बाथरूममधून एक व्यक्ती येताना दिसली. त्या व्यक्तीकडे बघताच रमेशचा चेहरा पांढराफटक पडला!
"अरे तू रमेशन ना? एवढ्या रात्री इथे काय काम करतोस ? अन् काय ही तुझी अवस्था; बरं नाही का है तुला?"
रमेश गडबडून बोलून गेला...
" सर, सर तुम्ही कुठे निघालात ? मी आपला सहजच.... "
काय बोलावे त्याला काहीच सुचलं नव्हतं. अचानक एवढ्या दिवसांनी देसाई सरांशी त्याचा सामना झाला होता. मग रमेशच्या जवळ जाऊन त्याला धीर देत सरांनी बोलतं केलं. त्यानंतर सगळं खरं खरं बोलून रमेशनं एकदाचं आपलं मन मोकळं केलं आणि तो हमसून हमसून रडू लागला.
"हे बघ रमेश, मी आता बडोद्याला जाण्यास निघणार होतो. पण गाडी साडेतीन तास लेट असल्यामुळे तिकडे जाण्याचा प्लॅन रद्द केलाय. आता तू असं कर माझ्यासोबत घरी चल. उद्या आपण माझ्या एका मित्राच्या केंद्रात जाऊ. सगळं ठीक होईल. अरे बाबा, हे जीवन फार अमूल्य आहे, ते संपवायचा आपल्याला काहीच अधिकार नाही, जीवन सुंदर कसं करता येईल त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत!" सरांचे आश्वासक बोल ऐकून रमेशला खूपच हायसं वाटलं. त्यानं गमावलेला आत्मविश्वास सरांच्या प्रेमळ शब्दांमुळे परत मिळायला मदत झाली.
'आनंद व्यसनमुक्ती केंद्र' प्रवेशद्वाराच्या कमानीवर लागलेला मोठा फलक बघत रमेश सरांसोबत आत गेला. तिथल्या फादर डेव्हीड यांनी त्यांचे हसत मुखाने स्वागत केले. रमेश आता बराच सावरला होता, त्याच्या चेहऱ्यावर आता तणावाचा लवलेशही नव्हता. एकमेकांशी ओळख करून घेण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यावर फादर डेव्हीड यांनी अतिशय आपुलकीने आणि मायेने रमेशची विचारपूस केली. त्यानंही मग न संकोचता चुकीच्या मित्रांच्या संगतीने आपण कसे वाहवत गेलो आणि नकळत कशी आपल्या जीवनाची दिशाच हरवून बसलो हे फादर डेव्हीड यांना कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलं. त्यांनीही आस्थेनं सगळं ऐकून घेतलं.
त्यानंतर थोडा विचार करत शांतपणे फादर डेव्हीड म्हणाले...
"तुला येथे आमच्यासोबत कमीत कमी तीन महिने काढावे लागतील. या तीन महिन्यात येथील दररोजच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त एक रोजगाराभिमुख कोर्स सुद्धा तुला पूर्ण करावा लागेल. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याची तुला निश्चितच मदत होईल!"
रमेश आता बराच सावरला होता, त्याच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता.
तो फादर डेव्हीड यांना दोन्ही हात जोडून नम्रपणे एवढंच म्हणाला...
"फादर तुम्ही जे सांगाल, जसं ठरवाल अगदी तसंच मी वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार!"
देसाई सर जागेवरून उठले. त्यांनी फादर डेव्हीडसोबत हसतांदोलन केलं. नंतर ते रमेशचा निरोप घेण्यासाठी त्याच्याकडे वळले. तोच रमेश सरांचा पाया पडण्यासाठी झुकला. त्याला खूप गलबलून आलं होतं! त्याचे डोळे आसवांनी डबडबले होते!
"सर... सर! तुमच्यामुळेच आज मला जगण्याची एक नवी दिशा लाभली आहे. तुमचे उपकार कसे फेडायचे तेच कळत नाही. सर मी... मला..!" त्याला पुढे बोलू न देता देसाई सरांनी रमेशचे दोन्ही खांदे धरून आपल्या हृदयाशी लावलं आणि मग त्याच्या पाठीवर थोपटत हसतच म्हणाले...
"अरे वेड्या, करता-करविता तो वरून सगळे बघतो आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. तो तुला काहीही कमी पडू देणार नाही. आता आपलं पुढील आयुष्य भरभरून जग, माझा तुला कायम आशीर्वाद आहे, माझ्या सदिच्छाही सदैव तुझ्या पाठीशी आहेतच आणि हो कधी काही मदत लागली तर मला नि:संकोच कॉल कर!"
"खूप खूप आभारी आहे सर तुमचा! आता मी काय बोलू तेच कळत नाही!" रमेश दोन्ही हात जोडून सरांपुढे नम्रपणे उभा होता.
... विनोद श्रा. पंचभाई, पुणे
मो. 9923797725
No comments:
Post a Comment