Wednesday, December 13, 2023

अंतिम सत्य

  अंतीम सत्य..

 काही दिवसांपूर्वी एक विलक्षण बातमी वाचण्यात आली... आँस्ट्रेलिया देशाचे एक मोठे शास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड गुडाल वय वर्षे अवघे १०४ नाबाद! त्यांना इच्छामरण हवं होतं. मात्र तिथलं सरकार त्यांच्या कायद्याप्रमाणे इच्छामरणासाठी त्यांना परवानगी द्यायला तयार नव्हतं! मग त्यांनी एक शक्कल लढवली आणि स्वित्झर्लंड देश गाठला. तेथील कायद्यानुसार आपल्या इच्छामरणाची परवानगी मिळवली आणि आपलं आवडतं संगीत "बिथोवन" ऐकत त्यांनी धीरोदात्तपणे मृत्यूला कवटाळलं ! म्हणजेच डॉ. डेव्हिड गुडाल अगदी कसलंही भय न बाळगता या जगातील अंतीम सत्याला सामोरे गेले..!

        आज जगाच्या पाठीवर अशी एकही व्यक्ती नसेल, ज्याला मृत्यूचं भय वाटत नाही. अपवाद म्हणून एखादा सिद्धी प्राप्त असलेला महापुरुष किंवा ज्याला आपण 'विदेही संत' ही उपाधी देतो त्यालाच फक्त जीवन आणि मृत्यू सारखेच! मात्र आज तरी अशी शक्यता फारच कमी आहे. कारण एवढ्यात अनेक प्रकारचे बाबा तसेच देवासोबत 'डायरेक्ट' बोलण्याचा आव आणणारे साधू अन् संधीसाधू बरेच दिसतात. नंतर त्यांच्यामधला ढोंगीपणा उघडकीस आला की हे बाबा अचानक अंतर्धान पावतात!

"मृत्यू हे अंतीम सत्य आहे" असं कुणातरी महापुरुषाने म्हटलं आहे, अन् हे त्रिकालाबाधित सत्य कुणीही नाकारु शकत नाही. कारण मृत्यूनंतर माणूस नेमका कुठे जातो ? याचा शोध सध्यातरी लागलेला नाही ! शेवटच्या घटका मोजणाऱ्यालाही मृत्यूचं भय असतंच... तसंच लहानमोठा, गरीबश्रीमंत, दुबळा बलवान कोणीही असो, एखादं जीवघेणं संकट समोर आलं की तो मृत्यूच्या भयानं एकदम गर्भगळीत होतो ! अगदी स्वतःला नास्तिक म्हणवणाराही अशावेळी त्या परमेश्वराची प्रार्थना करताना दिसतो. काही जण तर 'देवा, मला या जीवघेण्या संकटातून वाचव रे बाबा... मी तुझ्या नावानं सगळ्यांंना पाच किलोचे पेढे वाटणार' अशी लालूच प्रत्यक्ष ईश्वरालाच दाखवतात!

  आजकाल रोजच्या धावपळीत सर्वसामान्य माणसाला कितीतरी समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग त्या समस्यांना वैतागून कधीकधी 'नको हे जीवघेणं जगणं' असंही वाटतं. अशा जगण्याला कंटाळून एखादा विहिरीत उडी मारतो. नंतर नाकातोंडात पाणी गेलं की प्राणभयानं 'वाचवा कोणी तरी मला' म्हणून मोठ्या आवाजात आरडाओरडा पण करतो ! असं म्हणतात, माकडीण जेव्हा पाण्यात बुडू लागते तेव्हा आपल्या पोटच्या पिलाला सुद्धा पायाखाली घ्यायला कमी करत नाही..! म्हणजेच मृत्यूचं भय हे जगातील प्रत्येक प्राणीमात्राला असतेच, ते कोणी नाकारु शकत नाही.

    दैनंदिन जीवनात कधी हसत खेळत तर कधी काहीशा तणावात सगळ्यांंचा रोजचा संसार सुरू असतो. एक दिवस अचानक फोन येतो. आपला जवळचा नातेवाईक किंवा मित्र आपल्याला 'सोडून गेल्याची' बातमी मिळते. मग आपण आपली कामं सोडून तिकडे जातो. तेथे पोहचल्यावर तेथील वार्तालाप तसंच विलाप आपल्या कानावर पडतो. त्याचं 'जाण्याचं' वय नसताना मित्र अचानक गेल्यामुळे आपल्याला सुद्धा वाईट वाटतं ! तेव्हा आता यानंतर आपलाच 'नंबर' आहे की काय... अशी एक अनामिक भीती पण आपल्याला वाटायला लागते! जे आपण कधीही टाळू शकत नाही असं हे कधीतरी अचानक घडतं. अगदी क्षणभरातच होत्याचं नव्हतं होऊन जातं , अन् आपण नुसतं बघत बसण्याशिवाय काहीही करु शकत नाही. खरंच किती सामर्थ्य असतं ना या मृत्यूमध्ये ... या अंतीम सत्यात !

  " देही नित्यमवध्यो$यं देहे सर्वस्य भारत। 

     तस्मात्स अर्वाणि भूतानी न त्वं शोचितुमर्हसि।।"

अर्थात...'सर्वांच्या देहातील आत्मा हा सर्वदा अवध्य आहे. म्हणूनच कोणाच्याही मृत्यूविषयी शोक करणे योग्य नाही!' या भगवद्गीतेतील श्लोकाचा मतितार्थ लक्षात घेतला तरी आपल्या जवळची, लोकप्रिय किंवा अगदी जिवाभावाची व्यक्ती अचानक 'निघून' गेल्यावर जाणत्या लोकांनाही आपला शोक आवरणं कठीण होऊन जातं ! मात्र मृत्यूबद्दल संतांनी "मृत्यूसारखा सखा नाही!" असंही संबोधलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत म्हटलं आहे...

"मृत्यूसंस्काराचा ऐका खुलासा। लोक मृत्यूशी समजती भलतिसा। मी म्हणतो मृत्यूजैसा। उत्तम नाही कोणी।।

जैसी नदी सागरासि मिळे। सोडोनि भेदभाव कष्टबळे।तिचे कार्यचि होते सगळे। मिळण्यासाठी सागरी।।"

      म्हणूनच संतांनी सांगितल्याप्रमाणे सरळपणाचं जीवन जगण्यातच खरा आनंद आहे. त्यातच खरे समाधान आहे. आपल्या इतिहासाची प्रत्यक्ष साक्ष आहे... आजपर्यंत अनेक धुरंधर राजेमहाराजे, रथीमहारथी येथे होऊन गेलेत. त्यांनी अनेक लढाया लढल्या. कोणी कपटाने तर कोणी कुटनीतीचा वापर करून कित्येक राज्यं पादाक्रांत केली. पण शेवटी सगळे धुळीलाच मिळाले ! सम्राट अशोकासारखा एखादा कलिंगच्या युध्दानंतर थोडा 'सावरला'. मग त्यानं भगवान बुद्धांंनी सांगितलेल्या मार्गाचं जन्मभर आचरण केलं. म्हणूनच त्याचं नाव संपूर्ण भारतात आदरानं घेतलं जातं. म्हणजेच काय तर शेवटी या भूतलावर कोणी तरी अदृश्य पण पवित्र शक्तिची अबाधित सत्ता अस्तित्वात आहे. कोणी तिला राम म्हणतो तर कोणी रहीम म्हणतो. कोणी स्वामी समर्थ तर कोणी साईबाबा म्हणत असतो ! तरीही आज समाजात आपल्याला सर्वत्र भोंदूबाबांचे किंवा महाराजांचे जाळे अन् त्यात आयतेच फसत गेलेले साधेभोळे भाविक दिसून येतात. दिवसाआड आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो... 'आज या बाबाचे पितळ उघडे पडले' ... 'त्या महाराजाचा पर्दाफाश झाला!' एवढे घडून सुद्धा  त्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्या भक्तांची संख्या काही कमी होताना दिसत नाही, हे दुर्दैवच..!

           अशा प्रकारच्या या बाबांना शरण जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या मार्फत 'मोक्ष'ही हवा असतो अन् 'मोह'ही सुटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्यांच्या तनमनातच रावण भरलेला असताना, असे भक्त राम दर्शनासाठी अशा प्रकारच्या भोंदूबाबांच्या मागे लागतात. किती ही अगतिकता..! आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील किती तरी संतांनी त्यांच्या पवित्र ग्रंथसंपदेतून आपल्यासाठी ज्ञानाचे, मोक्षप्राप्तीचे भांडार खुले करून ठेवले आहे. त्याचा लाभ घेण्याचं सोडून भोळे भाविक नको त्या मोहात अडकले जातात , अन् 'लोभापायी दरिद्री' या उक्तीप्रमाणे आपलं सर्वस्व गमावून बसतात!

        सांगायचा मुद्दा असा की, आजच्या धावपळीच्या जीवनात, आपल्याला नको त्या ताणतणावाला सामोरं जावं लागतं. मग हा तणाव हलका करण्यासाठी आपण निरनिराळे मार्ग शोधत असतो. कोणी दारू किंवा गांजा जवळ करतात, तर कोणी इतर दुसऱ्या व्यसनांना बळी पडतात. मात्र सरळ साधी माणसं निर्मोही अध्यात्माकडे वळताना दिसतात! त्यांनी जर थोडं सावधपणे पाऊल टाकलं तर या गल्लाभरू बाबांचं अजिबात फावणार नाही हे निश्चित! खरंतर अगदी निर्भयपणे मनापासून तुम्ही त्या जगन्नियंत्याचं केवळ नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला ती अद्भूत शक्ती नक्कीच मदत करणार यात शंका नाही. आणि मग कुणा बाबा, महाराज यांच्यामागे जाण्याची गरज उरणार नाही... म्हणजेच पर्यायाने सारखं मृत्यूचं भय वाटणार नाही..! 

   ........  विनोद श्रा. पंचभाई , 9923797725

No comments:

Post a Comment