जगाच्या इतिहासात पिढ्यान् पिढ्या धनाढ्य असणारे कित्येक संस्थानिक, राजकारणी किंवा उद्योगपती होऊन गेले आहेत. गर्भश्रीमंतीचा वरदहस्त लाभलेल्या कितीतरी दिग्गज व्यक्ती आपल्याला भारतीय समाजात वावरताना दिसतात. मात्र त्यातील सर्वच बाबतीत यशस्वी ठरलेले बोटावर मोजण्याइतकेही आढळून येणार नाही. आपल्या बापजाद्याच्या इस्टेटीवर निव्वळ मजा मारणारे, वारसाने मिळालेला वारेमाप पैसा पाण्यासारखा उधळणारे, गरिबांना कवडीमोल समजणारे, कुणाशी काही देणं घेणं नसण्याची वृत्ती असणारे या खंडप्राय देशात सर्वत्र आढळतील. मात्र समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो अशी प्रकर्षाने जाणीव असणारे, इतरांना सढळ हाताने मदत करणारे, दीनदुबळ्याविषयी, मुक्या प्राण्यांबद्दल आत्यंतिक कळवळा असणारे गर्भश्रीमंत अभावानेच दिसून येतील. त्यामुळेच इथं नमूद करावंसं वाटतं... सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणारे सगळेच खऱ्या अर्थाने श्रीमंत नसतात. म्हणूनच आजच्या या मतलबी जगात रतन टाटा यांचासारखा एखादाच सर्वार्थाने 'श्रीमंत' ठरतो!
रतन टाटा यांची सौम्य, शांत मूर्ती डोळ्यासमोर आली की लहान-मोठा असो की कुणी अमीर-गरीब असो प्रत्येक जण त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. हे भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी आलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही, विशेषतः उद्योगपतींच्या बाबतीत तरी! रतन टाटा यांचे स्वभावगुण खरोखरच वाखाणण्यासारखे आहेत. अतिशय साधी राहणी, प्रखर देशप्रेम, नीतिमत्ता, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा दुजाभाव न करणे, कामगारांबद्दलची अपार तळमळ, प्राण्यांविषयीचं आत्यंतिक प्रेम, जिव्हाळा, गरजवंतांना मदत करण्याची तत्परता अशा कितीतरी स्वभाव गुणांनी रतनजींचं व्यक्तीमत्व खुलून दिसायचं. मैदानातील एखाद्या सांघिक खेळात विजय मिळवण्यासाठी संघातील सर्वच खेळाडूंमध्ये आपसात ताळमेळ असणं गरजेचं असतं. सामना खेळताना परस्पर सहकार्याची आणि संघात आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी उत्कृष्टरीत्या पेलण्याची जबाबदारी प्रत्येक खेळाडूला घ्यावी लागते. नेमका हाच ताळमेळ रतनजी टाटा यांनी टाटा उद्योग समूहामध्ये जुळवून आणला. टाटा समूहामधील सर्व कंपन्यांना एकत्र आणून रतनजींनी त्यांच्यात समन्वय साधला. या समन्वयामुळे कंपनीच्या विकासाला एक प्रकारची सांघिक गती मिळवून दिली. सांघिक ताळमेळामुळे नवीन निर्णय घेणं आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करणं खूप सोयीचं झालं. एका समूहामध्ये असलेल्या अनेक कंपन्या असोत किंवा एकाच कंपनीमधील अनेक विभाग आणि त्या विभागातील सर्व कामगार असोत... या सर्वांमध्ये आपसात ताळमेळ असणं खूप गरजेचं असतं. असा ताळमेळ नसेल तर कंपनीत गोंधळाची स्थिती निर्माण होऊन व्यवस्थापन करणं अवघड होऊ शकतं याची जाणीव, व्यापक दूरदृष्टी असलेल्या रतनजी टाटा यांना होती. त्यामुळेच त्यांची संपूर्ण कारकीर्द देदीप्यमान आणि विलक्षण लक्षवेधी ठरली!
No comments:
Post a Comment