Tuesday, December 24, 2024

वेगळ्या धाटणीचा वाचनीय कथासंग्रह

 

वेगळ्या धाटणीचा वाचनीय कथासंग्रह : राघव शेला


               नुकताच कवयित्री,लेखिका सौ. स्वाती विवेक कुंभार यांचा 'राघव शेला' हा सर्वांगसुंदर कथासंग्रह वाचनात आला. यातील 'गौरीची गोष्ट' वाचत असताना आपसूकच 'जंजीर' या चित्रपटातील गाणं आठवलं... "तेरी हंसी की किमत क्या है, ये बता दे तू!..... कहे तो आसमां से चांद तारे ले आऊं..." अभिनेत्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरण्यासाठी त्याचा मित्र ना-ना प्रकारे आपल्या गाण्यातून त्याला साद घालत असतो. त्याची मनस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असतो!

               असं म्हणतात की 'माणसाला होणाऱ्या आजारापैकी जवळपास ९५ टक्के आजार त्याच्या मानसिकतेतून उत्पन्न झालेले असतात.' आजार झाला की आपण तो बरा करण्यासाठी भरमसाट औषधांचा वापर करतो, मात्र रोगाच्या मुळाशी असलेल्या मनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही! बरेचदा मनात येणारे नकारात्मक विचार, विनाकारण वाटणारी भीती, मग बदलत जाणारी मनस्थिती यातूनही शरीरातील लहानमोठ्या आजारांना चालना मिळण्यास मदत होते. 'राघव शेला' या कथासंग्रहाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या 'गौरीच्या गोष्टी'तील गौरीला कुठल्याही प्रसंगी जमलेल्या गर्दीची भीती वाटत असते! ती कशामुळे वाटते? गौरीला भीती वाटण्याचं नेमकं काय कारण असतं? तिच्या आयुष्यात असं काय काय घडतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही गुंतवून ठेवणारी दीर्घकथा वाचताना वाचकांना उलगडत जातात.

                या कथासंग्रहात अगदी सुरुवातीलाच सादर केलेली 'गौरीची गोष्ट : जी२०' ही भावस्पर्शी दीर्घकथा, जणू एखादी लघुकादंबरी शोभावी इतकी छान जमली आहे. यातील गौरीच्या आयुष्यात येणारे आशुतोष, शिल्पा, कबीर आणि इतर पात्र यांचे आपसातील संवाद वेळप्रसंगी योग्य तो परिणाम साधण्यात यशस्वी ठरले आहेत. तसेच अधूनमधून प्रसंगानुरूप पेरलेल्या 'आप से जो हुई बातें, फिर किसी से कही नही गयी...' किंवा 'पुराने गम अब गम नही लगते, हाँ अब तुम सितमगर नही लगते!' अशाप्रकारच्या शेरोशायरींनी या कथेत बहार आणली आहे. एकूणच 'गौरीची गोष्ट' छान जमल्यामुळे वाचनीय ठरली आहे. 

                  'आपण कितीही आधुनिक झालो तरी आपण आपली मुळं, आपले संस्कार, आपले आदर्श सोडत नाही. कुठे ना कुठे ते आपल्या वागण्या-बोलण्यातून जाणवतातच!' अशा प्रकारचं निवेदन लेखिकेने आपल्या मनोगतात व्यक्त केलं आहे. त्याची प्रचिती 'राघव शेला' मधील कथा वाचताना पदोपदी येत राहते. 'कळा ह्या लागल्या जीवा', 'गुरूदक्षिणा', 'मौसम है आशिकाना', 'ऋणानुबंध' या कथा वाचताना ते प्रकर्षाने जाणवते! तर 'इन मीन साडे तीन...!' ही टिपिकल कथा विचार करायला भाग पाडते. 

                  'फेलो ट्रॅव्हलर', 'बेस कलर' तसेच 'तपस्या', 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..!' या वेगळ्या धाटणीच्या कथा जगण्यासाठीचा वेगळाच संदेश देऊन जातात. या 'राघव शेला' कथासंग्रहात लेखिकेने निरनिराळे विषय हाताळले आहेत, त्यामुळे प्रत्येक कथेत वैविध्य जाणवल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे या कथासंग्रहाचा शेवट एकूण चार वेगवेगळ्या विषयांच्या 'अलक'ने अर्थात अति लघुत्तम कथांनी आणि तीन शब्दकथा 'शुक्रवार कॅलेंडर पर्वत'ने केला आहे. एकंदरीत या संग्रहातील सर्वच कथा वाचनीय ठरल्या आहेत.

                  कुठलीही अलंकारिक आणि बोजड भाषा नाही की उपदेशांचे डोस नाही. सहज, सोपी तसेच मनाचा ठाव घेणारी भाषा हे या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट्य आहे. तद्वतच कथेत आवश्यक त्या प्रसंगी केलेली अनुरूप अशा काव्याची उधळण हेही वाचकांच्या मनाला भावणारं आहे. त्यासाठी लेखिकेचं मनापासून कौतुकच करायला हवं! 

                  पुण्यातील 'वैशाली प्रकाशन'मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या 'राघव शेला' या कथासंग्रहाला ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांचा अप्रतिम अभिप्राय लाभला आहे. तसेच समर्पक आणि देखणे मुखपृष्ठ सौ. रुपिका अनिकेत पाटील यांनी रेखाटले आहे. 'राघव शेला' या अप्रतिम आणि सर्वार्थाने वेगळ्या शैलीच्या कथासंग्रहाच्या लेखिका सौ. स्वाती विवेक कुंभार यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

पुस्तकाचं शीर्षक : राघव शेला ( कथा संग्रह )

लेखिका : सौ. स्वाती विवेक कुंभार 

प्रकाशक : वैशाली प्रकाशन, पुणे 

किंमत : ₹ १६० 

पाने : १००

पुस्तक परिचय : विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

                      





No comments:

Post a Comment