वाचन का आवश्यक आहे?
पुस्तकांचं वाचन ही अशी सवय आहे ज्यामुळे कुणालाही त्याच्यापासून त्रास होत नाही. वाचन करायला निश्चित वेळ लागत नाही किंवा खूप मोठी जागाही लागत नाही. वाचन कधीही, कुठेही मनात आलं तेव्हा आपण करू शकतो. घरात वीजपुरवठा असो किंवा नसो, पुस्तक वाचन करताना त्याची आवश्यकता भासत नाही... आणि एकटं असताना तर पुस्तकासारखा दुसरा सच्चा मित्र नाही... हा अनुभव स्वतः अनुभवल्यावरच येऊ शकतो. पुस्तक वाचताना तुम्ही कधी गंभीर होता तर कधी खळखळून हसूही शकता! तसंच काही पुस्तकातील विचार आपल्याला बरंच काही शिकवून जातात तर कधीकधी ते अचंबित करणारेही असतात. काही विचार मात्र आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात!
आपल्या जवळ असणारी पुस्तकं खरंतर आपले सच्चे साथीदारच असतात. कारण अत्यंत बिकट प्रसंगी सुद्धा ते आपल्याला सोडून जात नाहीत. उलट आयुष्यातील सुखदु:खात ते एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे साथ देण्यासाठी सक्षम असतात. ही साथसंगत पुस्तकं कधीही सोडत नाहीत, म्हणूनच म्हटलं आहे... ग्रंथ हेच खरे गुरू होत! उत्तम पुस्तकं हे आपल्या मनाचं एका अर्थाने पौष्टिक अन्नच असतं असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. मात्र आजकाल लोकांचा ओढा पुस्तकांचं वाचन करण्यात कमी झालेला दिसतो. उलट अर्बटचर्बट खाण्यात किंवा इतर गोष्टीसाठी पैसे उधळण्यातच तो जास्त प्रमाणात दिसून येतो. आता बघा, आपण आपल्या कुटुंबीयांसह एखादा सिनेमा बघण्यासाठी जातो तेव्हा आपले कमीत कमी हजार बाराशे रूपये तरी सहज खर्च होतात. त्यापासून सर्वांना तीन तासात मनोरंजन मिळतं, कधीतरी त्यातून एखादा संदेशही मिळतो, हे ठीकच आहे. मात्र त्याच हजार पाचशे रूपयात जर वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं घरी आणली तर आपण ती वेळ मिळेल तशी वाचू शकतो. घरातील सगळे सदस्य तसंच शेजारीही त्याचा लाभ घेऊ शकतात. गरज आहे, केवळ आपली मानसिकता बदलण्याची!
लग्न समारंभ, वाढदिवस आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमात आपण मोठ्या उत्साहाने सहभागी होतो. त्याचप्रमाणे कधीतरी साहित्य संमेलनं, ग्रंथ महोत्सव अथवा पुस्तक प्रदर्शन अशा विविध ठिकाणी भेटी देऊन तिथला अनुभव घेणं खरंतर खूपच आनंददायी असते. तेथील पुस्तकं हातात घेऊन बघणं, ती चाळून पाहणं हा सुद्धा एक प्रकारचा संस्कारच आहे. त्यासाठी फक्त आपली मानसिकता थोड्या फार प्रमाणात तरी बदलण्याची गरज आहे. फेसबुक किंवा व्हाट्सअप ग्रुपमार्फत येणाऱ्या पोस्टद्वारे मिळणारं ज्ञान हे वाचकांची दिशाभूल करणारं देखील असू शकते. काही काही पोस्टच्या माध्यमातून जाणीवपूर्वक समाजात गैरसमजही पसरवले जातात. ते सगळं मोबाईलवर डोळे फाडून वाचताना कधीकधी आपली मती कुंठीत झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यात आपला अमूल्य वेळ सुद्धा खर्च होतोच! त्यामुळे अशा प्रकारच्या साहित्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणं हेच श्रेयस्कर ठरतं, याबाबत दुमत नसावं. म्हणूनच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ग्रंथसंपदा, वाचनीय आणि प्रेरणादायी पुस्तकं आपल्याकडे नेहमीच संग्रही असावीत, जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला कधीही घेता येऊ शकतो.
रेफ्रीजरेटर, एअरकंडिशनर, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन इत्यादी अत्याधुनिक साधने आपल्या घराला घरपण देत असतीलही. मात्र प्रेरणादायी पुस्तकं घराला योग्य ते शहाणपण नक्कीच देऊ शकतात... आणि आपल्या वास्तूला ज्ञानसंपन्न करणाऱ्या अशा पुस्तकांमुळेच आपल्या घराची उंची, श्रीमंती खऱ्या अर्थाने वाढण्यास कारणीभूत ठरतात यात वादच नाही! ज्ञानपीठ विजेते नामवंत साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज म्हणतात..." अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रींना उजळून टाकण्याचं विशाल सामर्थ्य ग्रंथामध्ये असतं. ग्रंथाच्या तेजातच क्रांतीची बीजे असतात. पुस्तकं आपल्याला माणुसकी आणि शांती शिकवतात. या क्रांतीचे, माणुसकीचे, शांतीचे, नवनवे वारसदार निर्माण करण्याचे काम पुस्तकंच करतात."
यशवंतराव चव्हाण यांनी 'ग्रंथ वाचनाने माणूस मोठा झाला नाही तरी शहाणा जरूर होतो' असं म्हटलं होतं. यशवंतरावांच्या मातोश्री त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घ्यायच्या. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आईचं पुढील वक्तव्य शेवटपर्यंत ध्यानात ठेवलं आणि ते जणू त्यांनी स्वतःच्या मनावर कोरून घेतलं होतं ..."चांगल्या ग्रंथाने चांगुलपणाचा संस्कार नकळतपणे आपल्यावर होत असतो. त्यामुळे चांगला, वाईट यातील फरक कळतो. चांगला ग्रंथ म्हणजे मनाचे स्नान. स्नानानंतर पाणी अंगावर नाही राहिले, तरी मन प्रसन्न होते. तसेच एखादी ओवी एक वेळ नाही कळली तरी चालेल पण ओव्या वाचनाच्या अभ्यंग स्नानाने मन प्रसन्न होते. न कळलेला भाग हळूहळू समजू लागतो. त्यातूनच आपली समज वाढते."
टीव्ही वरील मालिकेमध्ये असे कित्येक विषय दाखवले जातात, ज्यांचा आपल्या जीवनाशी काहीही संबध नसतो. सध्या बातम्यांच्या वाहिन्यावर कितीतरी फालतू विषय घेऊन चर्चा होताना दिसून येतात आणि त्या ऐकून काही लोक आपलं मन कलुषित करून घेतात... आपलं मत त्या संबंधित व्यक्तीच्या मतानुसार बनवलं तर त्यासारखं दुसरं दुर्दैव नाही! आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना चांगल्या विचारांची शिदोरी देऊ शकत नसलो तर हा सुद्धा आपला वैचारिक पराभवच म्हणावा लागेल. त्याच त्याच बातम्या ऐकायला आणि दर्जाहीन मालिका बघायला माणसं टीव्हीसमोर कसं काय चिटकून बसू शकतात... हे न उलगडणारं कोडंच म्हणता येईल. पुस्तकांच्या बाबतीत मात्र असं होऊ शकत नाही... कारण योग्य पुस्तकं आपल्याला निवडता येतात. ते निवडताना आपल्याला वैचारिक स्वातंत्र्यही असते. चांगली प्रेरणादायी पुस्तकं आपल्या विचार प्रक्रियेला, बुद्धिला चालना देण्याचं, मनावर संस्कार करण्याचं मोलाचं काम करू शकतात.
'संसार सागरात भरकटणाऱ्या जीवन नौकेला किनारी लावण्याचे काम ग्रंथ करत असतात' असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटलं होतं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 'पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असते' असं म्हटलं आहे. वि. स. खांडेकर यांनी 'पुस्तकांच्या जगात शिरले, की मनावरचे मळभ दूर होते' असं खात्रीशीर सांगितलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर ग्रंथांनाच आपला प्राण मानायचे.
भगवदगीता आणि महाभारतासारख्या ग्रंथामधून आपल्या आयुष्याचं संपूर्ण सार सांगितलं आहे. आपल्या जीवनातील असा एकही प्रसंग किंवा एकही समस्या नसेल, ज्याचं उत्तर या ग्रंथात सापडणार नाही. जीवन जगण्याची एक वेगळी दिशा देण्याची शक्ती या ग्रंथामध्ये निश्चितच आहे. रामायणातील तर प्रत्येक पात्र आपल्या जीवनाचा एक एक आदर्श आहेत. ते मानवी जीवनाच्या विविध पैलूचं दर्शन घडवतात. ही आपली आदर्श भारतीय संस्कृती आहे
चांगल्या प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन करण्यासाठी त्यांची कधीतरी खरेदी करणं मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने नितांत गरजेचं आहे, हे आजच्या सुजाण पालकांनी लक्षात ठेवायला हवं. आजकाल अनेक कुटुंब दैनंदिन धावपळीतून वेळ काढून थोडा तरी बदल म्हणून महिन्यातून एखादा दिवस बाहेरच्या ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जेवण करायला जातात. ते सगळं स्वाभाविकच आहे, त्याला हरकत नसावी. मात्र त्यांनी एखाद्या दिवसातील काही वेळ तरी आपल्या कुटुंबीयांसमवेत पुस्तकांची खरेदी करून त्याचाही आनंद घेऊन पहावा. हॉटेलमधील खाल्लेले चमचमीत पदार्थ शरीरात रात्रभरासाठीच टिकतील पण दर्जेदार आणि वाचनीय पुस्तकं मात्र आयुष्याच्या अखेरपर्यंत आपली साथ देतील, आपल्याला जगण्याची दिशा देण्यासाठी सोबतही करतील हे निश्चित! संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात...
"आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन|
शब्द वाटू धन जनलोका||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव|
शब्दचि गौरव पूजा करूll"
आपणही आपल्या जीवनात... आपण वास्तव्य करत असलेल्या वास्तुमध्ये शब्दरूपी रत्नांना, प्रेरणादायी पुस्तकांना योग्य ते मानाचं स्थान देऊन आपलं आयुष्य आनंदी, समाधानी करूया!
विनोद श्रा. पंचभाई, पुणे
मोबाईल क्र.9923797725
No comments:
Post a Comment