चाणाक्ष...
दुपारीच सतीशला सरकारी नोकरीची अपॉईंटमेंट ऑर्डर मिळाल्याने तो आज जास्तच खुशीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम मंदिरात जावे व मग सर्व मित्रांना आनंदाची बातमी द्यावी असा बेत त्याने आखला. रात्री जेवण वगैरे आटोपून आपल्या बिछान्यावर तो आडवा झाला, पण कसचं काय, झोप येईल तर शपथ ! बराच वेळ विचार करण्यात गेला. अंतिम मुलाखतीला जाताना झालेली धावपळ त्याला आठवली. महाराष्ट्र एक्सप्रेसचे रिझर्वेशन वेटींगवर मिळाल्याने जागेसाठी त्याला बरीच खटपट करावी लागली. त्यातल्या त्यात कुठलीतरी मालगाडी रूळावरून खाली घसरल्याने महाराष्ट्र एक्सप्रेस नेहमीपेक्षा तीन-साडेतीन तास उशीराने धावत होती. त्यामुळे सतीशच्या जीवाची सारखी घालमेल सुरू होती. 'आपण वेळेवर पोहचणार की नाही, मुलाखतीसाठी केलेली एवढी तयारी वाया तर जाणार नाही, नाना शंकांनी त्याचे डोके बधीर झाले होते. मात्र सगळ्या संकटांवर मात करून महाराष्ट्र एक्सप्रेस एकदाची पुण्याला पोहचली व सतीशच्या जीवात जीव आला.
मग रिक्षा करून सतीश के.ई.एम. रूग्णालयाशेजारी असलेल्या मामाच्या घरी पोहोचला पण पाहतो तो काय घराला भलेमोठे कुलूप! त्याने घड्याळाकडे नजर फिरवली, फक्त दीड तास हातात होता. जास्त वेळ न दवडता जवळच असलेल्या संत श्री. गाडगे महाराज धर्मशाळेत येऊन तो तयारीला लागला. तेथेच त्याची भेट राजेंद्र मानकर याच्याशी झाली. योगायोगाने राजेंद्रसुद्धा त्याच्याच गावचा असल्यानं व तोपण मुलाखतीसाठी आल्याचे सतीशला कळून चुकले. सोबतीला राजेंद्र असल्याने त्याला जरा हायसे वाटले. दोघेही सोबतच त्या धर्मशाळेबाहेर पडले व त्यांनी रिक्षाने तडक कार्यालय गाठले. दोघांचेही डोळे घड्याळावरून हलत नव्हते आणि वेळेच्या आत पोहचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. तरीसुद्धा मुलाखतीचे टेंशन मात्र दोघांनाही सारखेच होते. काही वेळाने रिसेप्शनिस्टने नाव पुकारताच सतीशची छाती धडधडू लागली. पण लगेच स्वतःला सावरून मनोमन देवाचं नाव घेत त्याने हॉलमध्ये प्रवेश केला. स्वतःची ओळख करून देत सगळी प्रमाणपत्रे त्याने सादर केली. तेथील अधिकाऱ्यांनी त्याला काही जुजबी पण मार्मिक प्रश्न विचारले. त्याने दिलेल्या उत्तरांनी अधिकाऱ्यांचे बरेचसे समाधान झाल्याचे सतीशच्या लक्षात आले. त्याला मुलाखत घेणारे सर्वच अधिकारी प्रामाणिक वाटले. एकंदरीत सर्वकाही मनासारखे घडल्याने तो समाधानाचा सुस्कारा सोडतच हॉलबाहेर पडला. बाहेर राजेंद्र त्याची वाट बघतच बसला होता. त्याला उत्सुकता होतीच पण त्याने ती जाणवू दिली नाही. तीन-चार उमेदवारानंतर राजेंद्रचा नंबर आला. सतीशने त्याला बेस्ट लक दिले.
बराच वेळ झाला तरी राजेंद्र बाहेर येण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी जवळपास एक ते सव्वा तासानंतर राजेंद्र हॉलबाहेर पडला. तो गंभीर व पडेल चेहरा घेऊनच! सतीश लगेच त्याच्याजवळ गेला व खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देऊ लागला. तो काही बोलण्याच्या मनःस्थितीत नाही असे समजून सतीश त्याला घेऊन जवळच्या कॅन्टीनमध्ये आला. दोघांनाही जाम भूक लागली होती. जेवणावर यथेच्छ ताव मारून झाल्यावर राजेंद्र काहीतरी बोलणार अशी सतीश अपेक्षा बाळगून होता. पण एक ना दोन. मुलाखत कशी झाली. कुठले प्रश्न विचारले, नेमके काय घडले असे अनेक प्रश्न विचारूनही राजेंद्र ढिम्मच होता. त्या विषयावर आपण नंतर बोलू असे तो म्हणाला. शेवटी गावाला परतण्याबाबत दोघांचेही एकमत झाले व सतीशने जेवणाचे बील देऊन दोघांनी कँटीन सोडली.
मध्यरात्री उशिरा झोप लागल्याने सतीशला आईच्या हाकेने जाग आली. डोळे किलकिले करून त्याने घड्याकडे नजर फिरवली. ८-४५ झाले होते. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. कारण रोज तो सकाळी सहा वाजताच स्वतःहून उठून फिरायला जायचा. त्याने लगबगीने अंथरूण सोडले व आवरायला लागला. घाईघाईत अंघोळ वगैरे आटोपून आईसोबत गणपतीच्या मंदिरात गेला. मनोभावे दर्शन घेऊन परतणार तोच त्याला राजेंद्र येताना दिसला. सतीशने आनंदाने उत्तेजित होऊन त्याला पेढा दिला व अपॉईंटमेंट लेटर मिळाल्याची खबर राजेंद्रला दिली. पण त्याने सगळे निर्विकारपणे ऐकून घेतले व संध्याकाळी पार्टी घेण्यासाठी घरी येतो असे बोलून सतीशचा निरोप घेतला.
सतीश आनंदाच्या भरात जणू हवेतच तरंगत होता. सगळ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना घरी जाऊन त्याने पेढे वाटले. घरी गप्पागोष्टींना उधाण आल्याने कुणाला वेळेचे भानच नव्हते. पण संध्याकाळी भेटू म्हणणारा राजेंद्र पाच वाजताच प्रकटल्याने सतीश व घरच्यांना आश्चर्य वाटले. सोबत असलेल्या बालमित्रांची त्याने राजेंद्रसोबत ओळख करून दिली. मग 'तुला काय आता तर सरकारी नोकरी लागली आहे. तुझ्याकडून सिनेमा बघायलाच हवा.' राजेंद्रने पुढाकार घेतला. तसा सगळ्या मित्रांनी त्याची री ओढली. सतीशने लगेच आईकडे पैशांसाठी तगादा लावला. तिने काटकसर करून गोळा केलेले पैसे त्याच्या हवाली केले.
राजेंद्रसोबत सतीश व त्याचे मित्र 'नमक हराम' सिनेमाला गेले. तिकिटे अर्थातच सतीशने काढली. सिनेमाचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर घरी परतण्याच्या उद्देशाने सगळी मंडळी बस स्टॉपकडे वळली. तोच राजेंद्रने सतीशला 'पार्टी पाहिजे' म्हणून लकडा लावला. आता मात्र सतीशच्या अगदी जीवावर आले होते. त्याने जवळच्या मित्रांकडून उसनवारीने काही पैसे घेतले व नाईलाजास्तव सगळ्यांना सोबत घेऊन एका हॉटेलात गेला. मसाला डोसा, रसमलई इ. पदार्थाचा राजेंद्रने मनसोक्त आस्वाद घेतला. सतीशने मात्र पोट बिघडल्याची सबब सांगून फक्त ताक घेतले. 'पार्टी' उरकल्यानंतर सगळे बाहेर पडले. तोच विकट, गडगडाटी हास्य करीत राजेंद्र सतीशला म्हणाला,
''अरे दोस्ता मला सुद्धा अपॉईंटमेंट ऑर्डर मिळाली आहे. ही बघ. याची पार्टी मी उद्या नक्की देईन.''
सतीशचा सकाळचा प्रफुल्लीत चेहरा मार खाल्ल्यागत कोमेजून गेला होता. तो व त्याचे मित्र उदास मनाने घरी परतले.
त्यानंतर राजेंद्रचा पार्टी देण्याचा उद्याचा दिवस कधीच उगवला नाही व पुन्हा राजेंद्र सतीशला भेटला सुद्धा नाही.
विनोद श्रा. पंचभाई, पुणे.
No comments:
Post a Comment