Wednesday, November 22, 2023

श्री गजानन कथासागर... परीक्षण

                                    II श्री ll


 श्री गजानन कथासागर... परीक्षण 

        जगाच्या पाठीवर आजपावेतो कितीतरी बलशाली राजे-महाराजे, सम्राट, सुलतान, हुकूमशहा आले आणि गेले. त्यांची बलशाली सत्ताही कायम न राहता ती धुळीला मिळाल्याचा इतिहास आहे. कित्येकांच्या वारसदारांचं नामोनिशाणही आज अस्तित्वात राहिलं नाही! अख्खं जग जिंकण्याची ईर्षा बाळगून अनेक राज्ये पादाक्रांत करत रुबाबात निघालेला सिकंदर देखील शेवटी अयशस्वी ठरल्यानंतर रिकाम्या हातानंच हे जग सोडून गेला, हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. मात्र या अखिल विश्वावर एकछत्री अंमल कायम टिकून राहिला तो संतांच्या अनमोल विचारांचाच... हे त्रिकालाबाधित सत्य आहे! लौकिकार्थानं अजूनही संतांचंच राज्य या भूतलावर असल्यानं ही चराचर सृष्टी, मानवजात अस्तित्वात आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातील पुढील समर्पक ओव्या वाचल्यावर त्याची साक्ष पटते …

"राजे किती आले, गेले। त्यांचे कायदे नष्ट झाले।

सत्तेचे दरबार उजाडले। परि राज्य चाले संतांचे।।

संतांचा तो प्रचार अमर। अजूनिही लोक-मनावर।

राज्य चालवोनि निरंतर। लाखो जीवां उद्धरितो।।

न लगे सत्तेचा बडगा। नको भयभीतीहि सन्मार्गा।

आपापले कर्तव्य जगा। प्रचारसूर्यचि दाखवी।।"

            लेखक श्री.जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेला विदेही, योगी संत असलेल्या श्री गजानन महाराजांवरील चरित्रात्मक ग्रंथ 'श्री गजानन कथासागर' नुकताच वाचनात आला. हा ग्रंथ वाचताना पदोपदी महाराजांनी आबालवृद्धासाठी केलेल्या अदभूत कार्याचा प्रत्यय येतो. पूजनीय दासगणू महाराज रचित श्री गजानन विजय ग्रंथामध्ये ओव्याच्या स्वरूपात एकवीस अध्यायांचं प्रकटीकरण करण्यात आलं आहे. या एकवीस अध्यायातील ओव्याना अप्रतिम कथांचं स्वरूप देऊन 'श्री गजानन कथासागर'मध्ये कुलकर्णी माऊलीनी भाविक वाचकांसाठी जणू आध्यात्मिक मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून ओघवत्या सुंदर शैलीत लिहिलेल्या या कथा अतिशय वाचनीय झाल्या आहेत.

           शेगाव तीर्थक्षेत्री देविदास पातूरकर यांच्या घरी ऋतूशांतीचा विधी असल्यामुळे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजन झाल्यावर उष्ट्या पत्रावळी पातूरकरांच्या वाड्याबाहेर वडाच्या झाडाखाली टाकल्या जात होत्या. हे वडाचे झाड म्हणजेच श्री गजानन महाराज यांचे प्रकट स्थान! तो दिवस होता 23 मार्च 1878! मार्च महिन्यातील भर उन्हाळ्यातील माध्यन्ह… त्यावेळी एक तेजस्वी युवक वडाच्या झाडाखाली टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्न वेचून खात होता. कदाचित 'अन्न हे परब्रह्म' आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याचवेळी बंकटलाल आगरवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी हे दोन मित्र त्या रस्त्याने जात होते. त्या दोघांचेही त्या युवकांकडे लक्ष गेले. आधी त्यांना युवक वेडसर किंवा भिकारी असावा असे वाटले. मात्र दोघंही धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले असता तो युवक कोणी सामान्य व्यक्ती नसून थोर विभूती असल्याची त्यांना अनुभूती आली…"तो सतेज कांती मनोहर l दंड गर्दन पीळदार l                                                    भव्य छाती दृष्टी स्थिर l भ्रूकुटी ठायी झाली असे ll"  'श्री गजानन कथासागर' या ग्रंथातील हा भावस्पर्शी प्रसंग वाचताना भाविक तल्लीन झाल्याशिवाय राहत नाही आणि सदगदित होऊन नकळत डोळ्यात आसवं उभी राहतात!

          'श्री गजानन कथासागर' या ग्रंथातील दुसऱ्या भागात शेगाव संस्थानच्या अद्वितीय कार्याची माहिती वाचताना 'सेवा हीच खरी साधना' या उक्तीची महती जाणवते! दर्शनार्थी भाविकांसाठी अत्यल्प देणगीच्या स्वरूपात संस्थान मार्फत निवसाची सेवा उपलब्ध आहे. तसेच श्री गजानन महाराज समाधी मंदिर ते बसस्टॅन्ड, रेल्वे स्टेशन आणि आनंद सागर या मार्गावर संस्थानच्या वतीने विनामूल्य बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. संस्थानतर्फे आदिवासी विकास प्रकल्प, अंगणवाडी सेवा प्रकल्प, मुले आणि मुलींसाठी निवासी मतिमंद विद्यालय कार्यरत आहेत. शिवाय गरजूसाठी शाळा, महाविद्यालये, अपंग पूनर्वसन केंद्र, विनामूल्य नेत्रशस्त्रक्रिया अशा अनेक विविध सोयी शेगाव संस्थान तर्फे सातत्याने राबविल्या जातात. श्री गजानन महाराजांची कृपा आणि भाविकांची निस्सीम श्रद्धा यामुळे हे अविरतपणे घडते आहे अशीच संस्थानची धारणा आहे.

           या ग्रंथातील अनेक प्रसंग वाचताना वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाला अशा प्रकारचे प्रसंग अतिशयोक्ती वाटू शकतात. मात्र सिद्धकोटीला पोहचलेले संत, योगी महापुरुष यांच्यासाठी हे सहज शक्य आहे. कोणी त्याला चमत्काराची उपमा देतात तर काही महाभाग अंधश्रद्धा देखील म्हणू शकतात. परंतु जे खरोखरच योगाभ्यासाची महती जाणतात, त्यांनाच योगक्रियेच्या द्वारे घडणारे असे चमत्कारसदृश अनुभव क्षुल्लक वाटतात. सामान्य भाविक मात्र याला श्रद्धारुपी कृपाप्रसाद मानतात, कारण त्यांना अशा विलक्षण प्रसंगाची अनुभूती आलेली असते. ते ती शब्दात व्यक्त करू शकत नाही! आपले भाग्य थोर म्हणून महाराजांचा कृपाप्रसाद मानून स्वतःला धन्य समजतात.

           'श्री गजानन कथासागर' या वाचनीय ग्रंथात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक आलेले असताना त्याठिकाणी गजानन महाराज यांच्या उपस्थितीचा प्रसंग लेखकांनी खूप अप्रतिमरित्या मांडला आहे. त्याचप्रमाणे नागपूरमधील सीताबर्डी भागातील गर्भश्रीमंत व्यक्ती बुटी यांना त्यांच्या गडगंज संपत्तीचा झालेला अहंकार महाराजांनी कोणत्या पद्धतीने उतरवला हे जाणून घेण्यासाठी आणि असे एक ना अनेक भावोत्कट प्रसंग, आश्चर्यचकित घटना अनुभवण्यासाठी या ग्रंथातील कथा प्रत्यक्षात वाचायलाच हव्या.

            लेखक श्री जयंत कुलकर्णी हे स्वतः श्री गजानन महाराजांचे भक्त असल्यामुळे त्यांच्या हातून 'गजानन विजय' या ओवीबध्य ग्रंथाची असंख्य वेळा पारायणे झाली आहेत. त्यामुळे महाराजांच्या कृपाप्रसादनेच 'श्री गजानन कथासागर' हा अप्रतिम कथांचा वाचनीय ग्रंथ प्रत्यक्षात लिहिला गेला अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे. या ग्रंथासाठी महाराष्ट्रचे लोकप्रिय आणि जेष्ठ साहित्यिक श्री.नागेश शेवाळकर यांची अभ्यासपूर्ण आणि प्रवाही प्रस्तावना लाभली आहे. लेखकांनी ग्रंथातील कथा अतिशय साध्या सहजसोप्या भाषेत मांडल्या आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अलंकारिक भाषेचा वापर न केल्यामुळे सर्वसामान्य वाचकांना तसेच भाविकांना सहजपणे या कथाचा आनंदाने रसास्वाद घेत भक्तिरसात चिंब भिजता येईल याची निश्चितच खात्री वाटते. 

             श्री. जयंत कुलकर्णी यांनी दीर्घ कालावधीपासून महाराष्ट्रआतील अनेक वृत्तपत्रात,मासिकात, साप्ताहिकात तसेच निरनिराळ्या दिवाळी अंकात सातत्याने लेखन केले आहे आणि करीत आहेत. त्यांचे स्फूट लेखन, विविध विषयांवरील लेख, वैचारिक तसेच ललित लेख समाजाला आरसा दाखवणारे ठरले आहे. त्यामुळे ते नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. असे असले तरी नुकतेच प्रकाशित झालेले 'श्री गजानन कथासागर' हे त्यांचे पहिलेच पुस्तक आहे. गजानन महाराजांचे आकर्षक मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक शॉपिजेन या आघाडीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले असून ते आता वाचकांसाठी सर्वत्र उपलब्ध आहे. लेखक श्री. जयंत कुलकर्णी यांच्याकडून अनेकानेक उत्तम साहित्यकृतीची अपेक्षा बाळगून त्यांना पुढील साहित्य प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद!

… विनोद श्रा.पंचभाई, पुणे

     भ्र.क्र. ९९२३७९७७२५



 


No comments:

Post a Comment